धनगर समाजाची राजकीय जाणीव टोकदोर होतेय…
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
  • Wed , 31 May 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar अहिल्याबाई होळकर Punyashlok Ahilyadevi Holkar धनगर समाज Dhangar Samaj आरक्षण Reservation

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९२ जयंती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुमधडाक्यात साजरी होईल. आजच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी राज्यातला धनगर समाज बहुसंख्येनं जमतो. भक्तिभावानं अहिल्यादेवींच्या प्रेरक चरित्राचं जागरण करतो. त्यापासून स्फूर्ती घेतो. दरवर्षी इथं मोठा मेळावा भरतो. याही वर्षी आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठा मेळावा होतोय. मृदजलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव इथं जमत आहेत.

धनगर समाजातले सर्व आजी-माजी मंत्री, आमदार-खासदार, कार्यकर्ते, जिल्हा परिषद-पंचायत समित्यांचे सदस्य, विविध पक्षांचे राजकीय कार्यकर्ते या मेळाव्याला हजर असतात. या वेळी केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री एस.पी.सिंग बघेल हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अण्णा डांगे, खासदार विकास महात्मेही आहेत.

चोंडीचा मेळावा हा समाजाचा एकोपा आणि राजकीय जागृती दर्शवणारा कार्यक्रम असतो. गेल्या पाच वर्षांत धनगर समाज अधिक संघटित होऊन राज्याच्या राजकीय वातावरणात स्वत:ची जागा शोधताना दिसतोय. अनुसूचित जातीत समाविष्ट करा (एस.टी. आरक्षण द्या) या मागणीने जोर धरल्यानंतर धनगर समाजातील तरुण पिढी मोठ्या संख्येनं राजकीयदृष्टया जागृत झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाने मोठमोठी आंदोलनं उभी केली होती. त्यातलं बारामती (जि. पुणे)चं आंदोलन वादळी ठरलं होतं. या आंदोलनातून जागी झालेली धनगर समाजातील तरुणांची नवी पिढी आरक्षण नाकारणाऱ्या तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधात बंड करती झाली. भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सरकार आलं की, पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देऊ या आश्वासनामुळे हा समाज एकमुखी भाजपमागे एकवटला होता.

आरक्षणाचं आंदोलन उभारून आणि भाजपची सोबत देऊन धनगर समाजाने राज्याच्या सत्ताबदलात आपला वाटा उचलला होता. ही कृती धनगर समाजाची राजकीय जाणीव टोकदोर होतेय हे दर्शवणारी ठरली.

खरं तर राज्यात जनसंघाचे वसंतराव भागवत यांनी सत्ताधारी काँग्रेसविरोधात माळी, धनगर, वंजारी (माधवं) एकजुटीचा फॉर्म्युला मांडला. त्यातून अण्णा डांगे, प्रा. ना.स. फरांदे आणि गोपीनाथ मुंडे हे नेते पुढे आले. त्या काळापासूनच धनगर समाज संघटित, जागृत व्हायला सुरुवात झाली होती. आधी जनसंघ, नंतर भाजपने ठरवून धनगर समाजात काम उभं केलं. माधवं जागृतीमुळे भाजपला राज्यात पाय रोवता आले. माधवं फॉर्म्युल्यातल्या माळी आणि वंजारी या जातींनी जागृत होऊन सत्तेत आपला लक्षणीय वाटा पदरात पाडून घेतला. त्या तुलनेत धनगर समाजाला त्याच्या संख्येच्या स्थानाच्या प्रमाणात वाटा मिळत नव्हता, ही टोचणी या समाजातल्या नव्या कार्यकर्त्यांमध्ये वाढत होती. या टोचणीचं पुढे अस्वस्थतेत रूपांतर होऊ लागलं. त्यातून आरक्षणाचं आंदोलन जन्माला आलं.

आरक्षण ही या समाजाची प्रमुख मागणी असली तरी धनगर समाजाचे इतर खूप महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्षं भिजत पडलेले आहेत. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आणि मेळी-मेंढीपालन हा आहे. शेतकरी म्हणून जे प्रश्न इतर समुदायांचे आहेत त्यात धनगर समाजही भरडला जातोच आहे. शेतीप्रश्नात भरडला जात असणाऱ्या या समाजाचे मेंढपाळ म्हणून असणारे प्रश्नही तेवढेच भीषण आहेत. शेळ्या-मेढ्यांना चारा न मिळणं, पाऊस कमी होतो त्यातून चराईची रानं कमी होणं, त्यामुळे चाऱ्याच्या शोधात मेंढ्या-शेळ्या घेऊन कुटुंबासह भटकंती वाढणं… पूर्वी सहा महिन्यांची चारणी करावी लागे, आता वर्षभर मेंढपाळांना शेळ्या-मेंढ्या-घोडे मुलं-बाळं घेऊन रानावनात भटकंती करावी लागते. या भटकंतीत शेळ्या-मेंढ्या चोरीचे प्रकार घडतात. त्यातून सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होतात. रानावनात भटकणाऱ्या या मेंढपाळांपर्यंत पोलीस पोहचत नाहीत. त्यामुळे या समाजाची लुबाडणूक करणारे गैरफायदा घेतात. ‘ख्वाडा’ या सिनेमाने मेंढपाळांचा हा प्रश्न आणि इतर अनेक प्रश्न चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या अडचणी, प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मेंढपाळांना पोलीस संरक्षण द्या, शेळ्या-मेंढ्यांना चरायला वनजमिनी भाड्याने द्या, शेळ्या-मेंढ्यांची खरेदी वजनावर, मटणाच्या बाजारभावानुसार करा, मेंढपाळांच्या मुला-मुलींना अनुसूचित जातीतल्या मुलांसारख्या शैक्षणिक सवलती द्या, शेळ्या-मेंढ्यांना आणि मेंढपाळ कुटुंबाला विमा सवलत द्या, शेळ्या-मेंढ्यांसाठी आरोग्यसुविधा पुरवा, अशा मागण्या या समाजातून पुढे येत आहेत. हे प्रश्न सरकार सोडवत नाही, त्या रागातून मग आरक्षणाच्या मागमीमागे या समाजाचा असंतोष एकवटताना दिसतोय.

आरक्षण आणि इतर प्रश्न यामुळे धनगर समाज अस्वस्थतेतून राजकीयदृष्ट्या संघटित होतोय. त्याचं प्रतिबिंब चोंडीच्या मेळाव्यात दिसणार आहे. चोंडीचा मेळावा सर्वपक्षीय व्हावा यासाठी जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी प्रयत्न केले. त्याला यश येताना दिसतंय. शिंदे हे चोंडी गावचे नागरिक आहेत. आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते दरवर्षी मेळाव्याला आलेल्या सर्वांना जेवण देतात. आमदार, मंत्री नसतानाही ते हे करत असत. आता जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली चोंडीचा मेळावा होतोय.

अहिल्यादेवी धनगर समाजाला प्रेरमा देणारं एक प्रतीक आहेत. सुभेदार मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवींचा राज्यकारभार, लोककल्याणकारी कामं यांचा स्वाभाविकपणे धनगर समाजाला अभिमान आहे. समाजकारणात, राजकारणात काम करायचं तर अहिल्यादेवींसारखं असं या समाजातल्या सर्वांना वाटतं. अहिल्यादेवींच्या प्रेरक चरित्रातून या समाजातल्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढतोय.

चोंडीच्या मेळाव्यात सर्वपक्षीय नेते सहभागी होत आहेत. त्यात धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार हे उघड आहे. भाजप सरकार राज्यात सत्तेत येऊन अडीच वर्षं झाली आहेत. केंद्रात तीन वर्षं भाजप सरकार आहे. एवढा कालावधी उलटला तरी आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाहीए. ही या समाजातल्या सर्वांचीच खंत आहे. या आरक्षणाचा प्रश्न तर सुटत नाहीच, उलट आरक्षण कधी मिळणार असा सवाल करणाऱ्यांना राज्य सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी उलटसुलट उत्तरं दिली होती. स्वत: जानकर हे धनगर समाजाच्या ताकदीवर राजकारणात आले. आता ते या समाजाचे नेते म्हणून मंत्रीपदावर आहेत. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याटं सोडून ‘मी काही धनगरांमुळे मंत्री झालो नाही. मला बारामतीच्या धनगरांनी मतं दिली नाहीत,’ अशी वादग्रस्त, डिवचणारी विधानं करून जानकरांनी कारण नसताना समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे समाजात जानकरांबद्दल नाराजी वाढतेय.

या आधीही जानकरांच्या वागण्यामुळे कार्यकर्ते दुखावलेले आहेत. त्यामुळे धनगर समाजाचा रोष भाजप सरकारविरोधात व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारांमुळे जानकरांचं धनगर समाजातलं प्रस्थ डळमळीत होत जाताना दिसतंय. राज्यात धनगर समाजाची संख्या जवळपास दीड कोटीच्या आसपास आहे. राज्यातल्या १५० विधानसभा मतदारसंघात या समाजाची संख्या दखलपात्र आहे. राजकीयदृष्ट्या संघटितपणे एखाद्या पक्षाच्या मागे उभं राहण्याची या समाजाची वर्तनपरंपरा आहे. माजी मंत्री शिवाजीराव शेडगे यांच्या नेतृत्वाखाली हा समाज काँग्रेससोबत राहत असे. अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली या समाजाने भाजप-शिवसेनेला १९९५साली साथ दिली होती. त्यानंतर मधल्या काळात हा समाज शरद पवारांच्या सोबतही दिसला. मात्र २०१४ नंतर हा समाज भाजपमागे एकवटला.

भाजपने शिंदे, जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपदं दिली. डॉ. विकास महात्मेंना खासदार केलं. जिल्हा परिषद, पंचायत समितीत या समाजाला तिकिटं दिली. या सर्व घुसळणीतून हा समाज स्वत:चा सत्तेतला वाटा मागतोय. स्वत:ची राजकीय ओळख ठसवू पाहतोय. बहुजन समाजातली एक महत्त्वाची जात असलेला हा समाज जागा होणं ही लक्षणीय घटना आहे.

समाजाच्या या जागृतीला सोबत घेऊन स्वत:चं नेतृत्व अधिक प्रगल्भ करण्याची संधी महादेव जानकरांकडे चालून आली होती, पण त्यांनी स्वकर्माने ती ठोकरल्याचं दिसतंय. जानकर समाजातल्या प्रवाहातून बाजूला पडत असताना राम शिंदे यांनी चोंडीत सर्व पक्षातले नेते आपल्यासोबत आहेत हे स्पष्टट केलंय. जलसंधारण मंत्री म्हणून त्यांच्या कामाची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे. चतुर वक्ते आणि पोलिटिकली करेक्ट भूमिका, समाजासोबत राहणं या खुब्यांमुळे शिंदे यांनी जानकरांवर मात करत भाजपमध्येही बहुजन नेता हे स्वत:चं स्थान पक्कं केलंय. चोंडीच्या मेळाव्यात आरक्षणाच्या मागणीचं पाऊल पुढे पडलं तर या समाजात योग्य राजकीय संदेश जाईल. त्या दृष्टीने या मेळाव्यात काय काय घडतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......