अतिरंजित, पण समाजाचा भोचकपणा अधोरेखित करणाऱ्या मालिका!
सदर - सिनेपंचनामा
सायली राजाध्यक्ष
  • ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील एक दृश्य
  • Thu , 06 April 2017
  • सिनेपंचनामा सायली राजाध्यक्ष Sayali Rajadhyaksha टीव्ही सिरिअल्स TV Serials खुलता कळी खुलेना Khulata Kali Khulena कुछ रंग प्यार के ऐसे भी Kuch Rang Pyar Ke Aise Bhi तुझ्यात जीव रंगला Tuzhat Jeev Rangala काहे दिया परदेस Kahe Diya Pardes

मी रात्री जेव्हा सिरिअल्स बघत असते, तेव्हा माझी धाकटी मुलगी बाजूला येऊन बसते आणि सतत मालिकांवर टिप्पणी करते. परवा अशीच एक सिरिअल बघत होते. त्यात लग्न झालेल्या जोडप्यानं आपापसातले प्रश्न कसे सोडवावेत याविषयी संपूर्ण कुटुंब त्यांना सल्ला देत होतं. ते बघून ती म्हणाली, ‘आई, इतक्या मोठ्या झालेल्या, लग्न झालेल्या व्यक्तींना आपले प्रॉब्लेम्स सोडवता येत नाहीत का? सिरिअल्समधले आई-वडील त्यांच्या मुलांच्या आयुष्यात इतकी ढवळाढवळ का करतात?’ त्यावर मी तिला म्हटलं की, ‘अग, जर त्यांनी ढवळाढवळ केली नाही तर त्यांची आयुष्यं सुरळीत नाही का चालणार? आणि मग सिरिअल्समध्ये काय दाखवणार?’

दुर्दैवानं हे खरं आहे. मराठी किंवा हिंदी मालिकांमध्ये नायक-नायिकांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबाचा प्रचंड हस्तक्षेप दाखवला जातो. त्याशिवाय चॅनल्सना, दिग्दर्शकांना आणि लेखकांनाही काही वेगळं लिहावंसं वाटत नाही. इंग्रजी मालिका मी कमी बघते. त्यामुळे मला त्यातलं फारसं माहीत नाही, पण ज्या काही बघितल्या आहेत, त्यात असं काही दिसलं नाही. मग आपल्याकडे असं का? चॅनलचे लोक टीआरपी हे एकच कारण सगळ्या गोष्टींना देत असतात. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं बरोबरच आहे. कारण त्यांना व्यवसाय करायचा आहे. पण आपण प्रेक्षकही ते चवीनं बघतोच की! मग एकूण भारतीय लोकांनाच दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची सवय आहे. शेजारी काय करताहेत, एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर सतत दिसते आहे, एखादी बाई सतत नटते आहे, एखादा पुरुष फारच खरेदी करतो, खरं तर ती बाई सतत घरात असते- तिला काय करायचंय कामाला कुणी? असे असंख्य संवाद आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या कानावर येत असतात.

भारतीय माणसाला कोंडाळ्याचं फार आकर्षण आहे. एकटी व्यक्ती आपल्या आयुष्याबद्दलचे निर्णय घेऊ शकते हे आपल्याकडे मान्यच नाहीये. आपल्या आजूबाजूलाच बघा ना, मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना लहान लहान गोष्टीही एकेकट्या न करू देणारे पालक आपण बघतो. लग्न होऊन घरात आलेल्या सुनेला काहीच येत नसणार हे गृहित धरून सतत सूचना करणाऱ्या सासवा बघतो. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला तिच्या सासरी फक्त त्रासच होत असणार हे गृहित धरून तिला सल्ले देणाऱ्या आया बघतो. हे जे आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो, त्याचंच प्रतिबिंब आपल्याला मालिकांमध्ये दिसतं. अर्थातच त्या अतिरंजित केल्या जातात, हे जरी खरं असलं तरी त्यातला आशय अनेकदा खरा असतो.

झी मराठीवर सध्या ‘काहे दिया परदेस’ नावाची हिंदी-कम-मराठी मालिका सुरू आहे. मुंबईत टिपिकल निम्न मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेली मुलगी आणि बनारसच्या टिपिकल उत्तर हिंदुस्तानी कुटुंबात वाढलेला मुलगा यांच्यातली हे प्रेमकहाणी. ही मुलगी शिकलेली आहे, मुंबईतल्या असंख्य मुलींसारखी ती नोकरी करते आहे. मराठी कुटुंबासाठी हे काही नवीन नाही. पण ती ज्या मुलाशी लग्न करते तो आहे उत्तर हिंदुस्तानी कुटुंबातला, बनारसमध्ये राहणारा. जिथं बायका डोक्यावरून पदर घेतात, सगळ्यांशी सतत अदबीनं वागतात (अर्थात सुना! सासवा महाकजाग आहेत), सतत स्वयंपाक करत असतात, त्या कुटुंबाला हिचं नोकरी करणं मान्य नाहीये. मग अर्थातच सुरू होतो कौटुंबिक ड्रामा.

या नायक-नायिकेचं मीलन (हो, मालिका आणि चित्रपटांसाठी हाच शब्द बरोबर आहे) होऊ नये यासाठी प्रयत्न करणारी सासू, तर ते व्हावं म्हणून प्रयत्न करणारा चुलत सासरा. तिनं नोकरी केलीच पाहिजे असा आग्रह धरणारे वडील तर तिची मुलाच्या आयुष्यातून हकालपट्टी व्हावी म्हणून कारस्थानं करणारी सासू. आता यात चूक काय, बरोबर काय हा प्रश्नच नाहीये, पण त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या की.

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ नावाची हिंदी मालिका सोनी टीव्हीवर सुरू आहे. या मालिकेनं आता सात वर्षांची लीप घेतली आहे. पण त्याआधी ही मालिका इतर मालिकांपेक्षा मला वेगळी वाटली होती. सामान्य माणसं आपापसात बोलतील अशी भाषा आणि संवाद, प्रेमात पडलेल्यांची मनोवस्था, त्यांच्यात होणारे रूसवेफुगवे हे फार मस्त रंगवलं होतं. या मालिकेत आपल्या मुलावर अतिरेकी प्रेम करणारी आई आहे. मुलगा मोठा उद्योजक आहे, त्यानं लहान वयात अमाप यश मिळवलेलं आहे. याचाच अर्थ तो बुद्धिमान आहे, पण हे फार तर्कसंगत झालं. त्याच्या आईला वाटतं की अजूनही त्याला काहीच कळत नाही, त्याचे निर्णय घेता येत नाहीत. असा हा मुलगा (थोडक्यात नंदीबैल!) त्याच्या आईच्या डाएटिशियनच्या प्रेमात पडतो. प्रेमात पडल्यावर ठरलेलं लग्न मोडण्याची हिंमत दाखवतो. आपल्या प्रेयसीला प्रेमाबद्दल सांगतो. हे सगळं करायचं करणारा हा नायक आपल्या आईला मात्र आपल्या प्रेमाबद्दल सांगू धजावत नाही. अनेक वादाचे आणि विरोधाचे प्रसंग घडल्यावर अखेर त्यांचं लग्न होतं. शिवाय त्याची एक भोचक मामी घरात आहे. तिला या सगळ्या प्रकरणाचा सुगावा आहे. तीही त्यांनी एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करते आहे.

लग्नानंतर नायक-नायिकेनं एकत्र येऊ नये म्हणून त्याची आई प्रयत्न करते. पण नायिका स्मार्ट असल्यामुळे ती तसं होऊ देत नाही. पण नंतर मात्र आपला मुलगा बायकोच्या प्रेमात पडलाय हे आईला सहन होत नाही आणि ती सतत त्यांच्या गोष्टींमध्ये लुडबूड करत राहते, त्यांच्यात फूट पडेल असं बघते. तसं होतंही. त्यानंतर सात वर्षानंतर आता ते परत एकत्र आले आहेत ते त्यांच्या मुलीसाठी. तर अजूनही सात वर्षांनी वय वाढलेल्या आपल्या मुलाला त्याची आई सतत डॉमिनेट करतेच आहे.

लग्नानंतर नायकनायिकेच्या सेक्स लाइफमध्ये तर घरातल्या सगळ्यांनाच फार इंटरेस्ट असतो. ते दोघं एका बिछान्यावर झोपताहेत की नाही यात तर कमालीचा रस! मग घरातल्या खलनायक-नायिकांपासून ते आईपर्यंत सगळ्यांना हा विचार फारच छळत असतो. अरे, दोघे वयानं वाढलेले, सज्ञान आहेत. त्यांना आपल्या आयुष्याबद्दल निर्णय घेऊ द्या की. आणि त्यांना नसेल जमत तर काउन्सिलर आहेत की, जातील ते आणि बघतील काय करायचं ते.

 ‘तुझ्यात जीव रंगला’ ही झी मराठीवर सध्या सुरू असलेली मालिका. या मालिकेतले सगळे कलाकार उत्तम अभिनय करतात. यातला नायक कोल्हापूरचा रांगडा पहेलवान आहे, तर त्याचं जिच्यावर प्रेम आहे ती शहरी ब्राह्मण शिक्षिका आहे. खरं तर मालिका रंगण्यासाठी ही सगळी पार्श्वभूमी उत्तम आहे. कलाकार उत्तम काम करत असूनही केवळ त्याच त्या संवादामुळे कधीकधी कंटाळवाणी होते. तर या मालिकेतल्या नायक-नायिकेचं नुकतंच लग्न झालंय. मालिकांच्या पद्धतीप्रमाणे अजूनही त्यांच्यात नवरा-बायकोचं नातं निर्माण झालेलं नाहीये. रांगडा दिसणारा नायक प्रत्यक्षात फारच बुजरा आहे. तर आता ते शेतातल्या घरातून वाड्यावर राहायला आलेत. त्या घरात खलनायिका म्हणून नायकाची वहिनी आहे. ही वहिनी त्यांच्या खोलीत येते आणि नायकाचा बिछाना अर्थातच खाली जमिनीवर घातलेला बघते. तिला जे हवं ते घडलेलं असतं. मग अर्थातच ती खूश.

‘खुलता कळी खुलेना’ ही झी मराठीवरची सगळ्यात अतर्क्य मालिका. यातली जी खलनायिका आहे खरं तर तिचं वागणंच योग्य वाटतं. मोनिका ही ती खलनायिका. तिला मित्रमंडळींबरोबर वेळ घालवायला आवडतं. कधीतरी पार्टी करायला आवडते. यात खरं तर काहीच चूक नाही. पण घरातले सगळे भोचक. तिनं सगळ्या गोष्टींसाठी आपली परवानगी घेतली पाहिजे असं घरातल्यांना वाटतं. ती लग्नाआधी गरोदर आहे. पण पुढे काय करायचं हे तिचा नवरा आणि ती बघून घेतील असं घरातल्यांना अजिबातच वाटत नाही.

तर अशा या आपल्या मालिका आणि त्यातली पात्रं, कथानकं, संवाद – भारतीय मनोवृत्तीचं बऱ्यापैकी चपखल चित्रण करणाऱ्या. अतिरंजित नक्कीच, पण आपल्या समाजाचा भोचकपणा अधोरेखित करणाऱ्या.

लेखिका ‘डिटीजल कट्टा’ या ऑनलाइन नियतकालिकाच्या संस्थापक संपादक आहेत.

sayali.rajadhyaksha@gmail.com

Post Comment

Sanjana Nargolkar

Thu , 06 April 2017

माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेत पण जरा अतिशयोक्तीच दाखवली आहे.शेजाऱ्यांकडे रहाणे, सोसायटीत-आॅफीस मधे सगळीकडे फक्त राधिका ला तिचा नवरा परत मिळवून द्यायला मदत करणे हा एकच विषय!! कोणाकडे हल्ली वेळ असतो एवढा?