युद्धपरिस्थितीही आपल्या मुलांचं उज्ज्वल भवितव्य अबाधित राहण्याकरता शक्य तितके प्रयत्न करणारे युक्रेनचे शिक्षक, हेच या युद्धाचे ‘खरे नायक’ आहेत!
पडघम - विदेशनामा
सुचिता देशपांडे
  • डावीकडे आणि उजवीकडे खालच्या बाजूला - बॉम्बहल्ल्यात युक्रेनमधील शिक्षण सं स्थांची झालेली दुर्दशा! आयरिना झ्हदानोवा, इस्रायलच्या युडिथ रोझेन्थाल, .ओल्गा चुपाखिना, एन्जेला ओस्ताप्चुक, ओल्गा बुदनिक आणि कॅटरिना पावलेन्को
  • Mon , 27 March 2023
  • पडघम विदेशनामा युक्रेन Ukraine रशिया Russia युक्रेन-रशिया युद्ध Ukraine-Russia War

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला वर्ष उलटले तरी अद्याप युद्ध सुरूच आहे. त्यामुळे युक्रेनची वाताहत होऊन, त्यात तिथले शिक्षणक्षेत्र मोठ्या प्रमाणावर पोळले गेले आहे. मात्र, या कठीण प्रसंगातही तेथील शिक्षणक्षेत्राने या आपत्तीलाच संधी मानून युद्धाच्या कोलाहलात हरेक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कसा केला आणि अध्यापन-अध्ययन पद्धतीत आमूलाग्र बदल करत परिस्थितीला साजेसे शिक्षण कसे उपलब्ध करून दिले, याची ही प्रेरक आणि तितकीच हृद्य सत्यकथा!

अलीकडेच इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय विकास सहकार्यासाठीच्या संस्थेतर्फे आयोजित वेबिनारद्वारे युक्रेनच्या शिक्षण विभागातील उच्चपदस्थ, शाळाचालक आणि शिक्षकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या वेळी तेथील मुलांचे शिक्षण सुरू राहण्याकरता शिक्षणाशी संबंधित प्रत्येकाने केलेले भगीरथ प्रयत्न ऐकून या वेबिनारमध्ये सहभागी झालेला आमच्यातील प्रत्येक जण स्तिमित झाला!

युद्ध परिस्थिती आणि त्यानुरूप गरजा लक्षात घेत, अभ्यासक्रमात तातडीने आमूलाग्र बदल करत आणि तो देशभरातील शिक्षकांपर्यंत- आणि पर्यायाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात युक्रेन कमालीचा यशस्वी झाला आहे. प्रत्येक शिक्षकाने, शाळा चालकाने स्वयंस्फूर्तीने, अधिक मेहनत घेत शिक्षण कसे सुरू ठेवले, हे त्यांच्या तोंडून ऐकण्याचा अनुभव रोमांचकारी होता. हे अनुभवकथन करताना त्यांच्यापैकी अनेकांचा कित्येकदा कंठ दाटून आला होता, डोळ्यात पाणी होते, मात्र एक नागरिक म्हणून समाजाप्रती स्वत:चे ठोस योगदान देण्यातील करारीपणा आणि निर्धार त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिक्षण, विज्ञान आणि क्रीडा या क्षेत्रांकरता असलेल्या ‘युक्रेन राष्ट्राध्यक्ष निधी’च्या सल्लागार-आयुक्त ओल्गा बुदनिक यांनी रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला, हा शिक्षणावर केलेला हल्लाबोल असल्याचा आरोप केला. लष्करी आक्रमणानंतर युक्रेनच्या शिक्षण क्षेत्रासमोर उभ्या असलेल्या विविध आव्हानांचा त्यांनी परामर्श घेतला. सर्वांत मोठे आव्हान हे निधीच्या कमतरतेचे असून, हल्लेखोरांकडून शैक्षणिक संस्थांतील पायाभूत सुविधांचा दररोज होणारा नाश सर्वांना चिंतीत करत आहे. हल्लेखोरांनी व्यापलेल्या प्रदेशातील मुलांना आणि शिक्षकांना शैक्षणिक प्रक्रिया प्रदान करणे अशक्यप्राय बनल्याची बोच त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.

ओल्गा बुदनिक यांनी सांगितले की, युक्रेनच्या शहरांवर आणि गावांवर रशियन सशस्त्र दलांनी केलेल्या प्रचंड बॉम्बस्फोटांत आणि गोळीबारांत युक्रेनच्या १८५० शैक्षणिक संस्थांचे नुकसान झाले असून, त्यापैकी २१२ शिक्षणसंस्था पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या आहेत. याची झळ थेट विद्यार्थ्यांना बसली असून, आणखी काही अवधीकरता ही मुले शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची खंत ओल्गा यांनी व्यक्त केली. अधिकृत आकडेवारीनुसार ४२८ मुलांचा मृत्यू झाला असून ८१७हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.    

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना, फेलोजना, शास्त्रज्ञांना आणि शिक्षकांना जगभरातील शैक्षणिक संस्थांशी जोडण्याकरता सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. युद्धप्रवण स्थितीत नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती जोमाने राबवणाऱ्या इस्रायलसारख्या देशाने युक्रेनच्या शिक्षकांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या प्रशिक्षणक्रमांचा मोठा उपयोग झाल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.

एन्जेला ओस्ताप्चुक या खारकिव १५६ शाळेच्या मुख्याध्यापक. त्यांच्या शाळेपासून रशियाची सीमा केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे युद्धाला तोंड फुटले, तेव्हा त्यांच्या जिल्ह्याला सर्वप्रथम झळ बसली आणि बॉम्बहल्ल्याने भोवतालचा परिसर बेचिराख झाला. त्या भागातील बहुतांश रहिवाशांना तातडीने स्थलांतर करावे लागले. मात्र, एन्जेला यांनी विद्यार्थ्यांना असलेली मदतीची निकड लक्षात घेत तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. घरदार उद्ध्वस्त झालेल्या अनेक स्थानिकांनी त्यांच्या शाळेत आसरा घेतला. त्यांच्या खाण्यापिण्याची, आरोग्यविषयक सुविधांची, त्यांच्यातील एकट्या, वृद्ध नागरिकांना आधार देण्याची जबाबदारी एन्जेला यांनी स्वीकारली. त्यांच्या मदतीला शाळेचा शिक्षकवर्ग धावून आला. सर्वांनी आपणहून कामे वाटून घेतली. शाळेत आसरा घेतलेल्या स्थानिकांपैकी काही कलावंतांनी मुलांना चित्रकला, हस्तकला शिकवण्याची जबाबदारी आनंदानं स्वीकारली. त्यामुळे मुलांना भोवतालच्या कटू वास्तवाचा चार घटका का होईना विसर पडू लागला.

अध्यापनापलीकडे जात स्वयंसेवक म्हणून काम करणारे युक्रेनचे शिक्षक

हल्ल्यानंतर दोन-तीन आठवड्यांत काही अंशी शिक्षण सुरू करता आले, तेव्हा शिक्षकांच्या लक्षात आले की, मुलांना मायेची, सहवेदनेची आणि संवादाची नितांत गरज आहे. प्रत्येक मुलाच्या कल्याणाची जबाबदारी शिक्षक म्हणून आपल्यावर आहे, असे मानून शाळेच्या शिक्षकांनी मुलांकडे जातीने लक्ष पुरवायला सुरुवात केली, असे एन्जेला म्हणाल्या.

युद्धामुळे युक्रेनमधील शिक्षकांची भूमिका पूर्णपणे बदलली. त्यांना सुरक्षित, आनंदी, सकारात्मक आणि सृजनशील वातावरण देणे, हा शिक्षकांचा प्राधान्यक्रम बनला. सततचे बॉम्बहल्ले, गोळीबाराचे आवाज, वाजणारे भोंगे, गायब होणारी वीज, हे भोवतालचे वातावरण मुलांना भयभीत करणारे होते.

या संदर्भात बोलताना, एन्जेला म्हणाल्या, “अगदी सुरुवातीला जेव्हा ऑनलाइन शिक्षण सुरू केलं, तेव्हा मानसशास्त्रज्ञांच्या सहाय्याने मुलांना बोलतं करणं, सहसंवेदना व्यक्त करणं, हाच शिक्षणाचा एकमेव केंद्रबिंदू राहिला. मुलांशी बोलताना त्यांचे विदारक अनुभव ऐकून आम्हीच सुन्न व्हायचो, मात्र त्यांना व्यक्त व्हायला देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा आमचा सततचा प्रयत्न असायचा. शाळेच्या वेळापत्रकात आम्ही संवाद तासिकाच सुरू केली होती. मुलांना वास्तवाचे भान देतानाच युद्धापासून त्यांचे विचार इतर सृजनशील गोष्टींकडे वळवणे, त्याकरता गायन, नृत्य, साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, विविध सण साजरे करणे, त्यांचे मन रमेल असे प्रकल्पकाम देणे, सकारात्मक भावना वाढीला लागेल असं पाहणं, हे शिक्षक आवर्जून करतात.”

या युद्धकाळात शिक्षक इतर नागरिकांसारखीच व्यक्तिगत स्तरावर वेगवेगळी आव्हानं पेलत आहेत आणि त्याच्या जोडीला विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठीही प्रयत्न करत आहेत. या आव्हानात्मक वातावरणाला आत्मविश्वासानं सामोरं जाण्याकरता, शिक्षण विभागातर्फे, तसंच स्वयंसेवी संस्थांनी शिक्षकांसाठी नियमित प्रशिक्षणवर्ग, समुपदेशनही आयोजित केलं जात आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी प्राधान्यक्रमाने निभावल्यानंतरच्या वेळेत युक्रेनमधील ठिकठिकाणच्या अनेक शिक्षक देशाच्या संरक्षणातही नागरिक म्हणून खारीचा वाटा उचलत आहेत. काही शिक्षक सैन्य दलात रुजू झालेत. जखमी सैनिकांची शुश्रुषा करणं, त्यांच्याकरता जेवण बनवणं, स्थानिकांकरता मदतीचं सामान गोळा करणं, या गोष्टी शिक्षक स्वत:हून करत आहेत. कुठलीही आपत्ती आमचं मनोधैर्य खच्ची करू शकत नाही, हेच जणू या शिक्षकांना दाखवून द्यायचं आहे.

एक प्रकारे या युद्धानं शिक्षणक्षेत्राला लवचीक असण्याचं महत्त्व पटवून दिलंय. ‘परिस्थितीनुसार नवनवे पर्याय अवलंबत राहणं आवश्यक असतं, हे आम्ही शिकलो,’ असे अनेक शिक्षकांनी, संस्थाचालकांनी सांगितलं.    

आयरिना झ्हदानोवा या युक्रेनच्या किव प्रांतातील गेली अनेक वर्षं कार्यरत आहेत. त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान, संशोधन, अभियांत्रिकी, कला आणि गणित या विषयांवरील नाविन्यपूर्ण शिक्षणासंदर्भात ‘ग्रीन स्ट्रीम’ नामक उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी मुलांचं शिक्षण सुरू राहावं, याकरता युक्रेनच्या विविध प्रांतांतील शिक्षकांचं नेटवर्क उभारण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. विद्यार्थी-पालकांच्या शंकानिरसनासाठी हेल्पलाइन सुरू केली. पहिल्या काही दिवसांतच या हेल्पलाइनची मदत घेणाऱ्यांच्या संख्येनं ५० हजारांचा टप्पा पार केला.

अगदी सुरुवातीच्या दिवसांत बॉम्बहल्ल्यात घरे उदध्वस्त झाल्यानं अनेक प्रांतातील लोक तात्पुरत्या उभारलेल्या निवाऱ्यात राहत होते. तिथं दूरध्वनी करण्याकरता मोठीच्या मोठी रांग असायची. अशा वातावरणात तासनतास रांग लावून एका आईनं आपल्या मेट्रिकला असणाऱ्या मुलाच्या अभ्यासाविषयीची शंका हेल्पलाइनवर विचारली होती, असं आयरिना त्यांनी सांगितलं. युक्रेनचा पालकवर्ग शिक्षणाला किती महत्त्व देतो, हे या घटनेवरून स्पष्ट व्हावं.  

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

ज्या विद्यार्थ्यांचे पालक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात, त्यांना विज्ञान शिक्षण अभ्यासक्रम माहिती तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात शाळेने सहभागी करून घेतलं. आयरिना यांनी या संदर्भातील एक स्वारस्यपूर्ण उदाहरण दिलं- “ज्या रात्री आमच्या शहरावर मोठा हल्ला झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकानं मला संदेश पाठवला. त्या बाई माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी लिहिलं होतं- ‘काल रात्री सतत झालेल्या हल्ल्यांमुळे, हल्लेखोर रशियाने मला काल रात्री झोपण्याऐवजी काही तास जागं राहण्याची संधी दिली. हा वेळ मी कॉम्प्युटर सायन्स प्रोग्राम तयार करण्यासाठी समर्पित केला. माझा मुलगा, ज्या चौथ्या इयत्तेत शिकत आहे, त्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या कॉम्प्युटर सायन्स प्रोग्राम सोबत जोडत आहे...’ तो अभ्यासक्रम आता आम्ही राबवत असून अनेक शाळांशीही आम्ही तो अभ्यासक्रम शेअर केला आहे.”

त्यांनी सांगितलेली आणखी एक प्रेरणादायी कथा खूप काही सांगून जाते. त्या म्हणाल्या- “दोन वर्षांपूर्वी, खारकिवमधील एका खगोलशास्त्रज्ञांनी आमच्या ग्रीन स्कूलला भेट दिली होती. गेल्या फेब्रुवारीत युद्ध सुरू झाल्यानंतर घर सोडून निघून गेलेलं ते खारकिवमधील खगोलशास्त्रज्ञांचं कुटुंब आमच्या ग्रीन स्कूलला भेट देण्याकरता मध्यंतरी आलं होतं. खगोलशास्त्रज्ञ असलेले वडील सध्या लष्करात भरती आहेत आणि ते किवमध्ये हवाई संरक्षण दलात सेवा बजावत आहेत. महिन्याभरापूर्वी ते भेटले, तेव्हा त्यांनी विचारलं, ‘मला तुमच्या शाळेत शिकवता येईल का?’ आयरिना यांनी प्रश्न पडला की, हवाई दलात सेवा बजावत असताना, ते शिकवण्याकरता वेळ कधी, कसा काढतील? आयरिना त्यांना म्हणाल्या, ‘हो हो, नक्कीच. तुम्हांला कधी वेळ काढता येईल?’ तर ते पटकन उद्गारले- ‘हे युद्ध जिंकल्यानंतर, लगेचच!’ त्यांच्या या उत्तरानं आयरिना यांना गहिवरून आलं. प्रत्येक नागरिकाच्या मनात विजयाची आशा किती जिवंत आहे, याचं हे उदाहरण आहे.

या काळात अनेक शिक्षिकांनी आपला नेहमीचा विषय सोडून नवनवी कामं, भूमिका स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलसारख्या युद्धप्रवण वातावरणात राहणाऱ्या देशाची आम्हांला आमचं शिक्षणक्षेत्र सावरण्यासाठी मोठी मदत झाली. युक्रेनच्या शिक्षकवर्गासाठी इस्रायलने तीन वेबिनार्स आयोजित केले होते. युक्रेनमधील सुमारे पाच हजार शिक्षक यात सहभागी झाले होते. आयरिना यांनी सांगितलं की, “मला आठवतं, एका वेबिनार दरम्यान माझ्या खिडकीबाहेर बॉम्ब फुटला होता, पण तो ताण मी माझ्या चेहऱ्यावर दिसू दिला नाही.”

विद्यार्थ्यांभोवतीचे वातावरण सकारात्मक राहण्याकरता शिक्षकांनी केलेले सृजनशील उपक्रम

गेली १५ वर्षं एका शाळेत दहावीच्या इयत्तेला इंग्रजी विषय शिकवणाऱ्या ओल्गा चुपाखिना यांचे अनुभव अस्वस्थ करणारे होते. त्या म्हणाल्या, “हल्ल्यानंतरचे पहिले दोन दिवस तर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला सामोरं जायला मी बिल्कुल तयार नव्हते, जणू काही मलाच भावनिक मदतीची गरज होती. पण नंतर मी सावरलं. माझ्या विद्यार्थ्यांचा फोनवर ग्रूप तयार केला. आम्ही सुखरूप आहोत, हा संदेश प्रत्येकानं रोज पाठवायचा, असं ठरलं. आणि हळूहळू आम्ही अभ्यासाकडे वळलो. सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा ‘डिजिटल लर्निंग’ सुरू झालं, तेव्हा अनेकांकडे पुस्तकं, लिहिण्याची सामग्री नव्हती, कारण त्यांना जीव वाचवण्यासाठी नेसत्या वस्त्रानिशी घर सोडावं लागलं होतं. गावांत आसरा घेतलेल्या मुलांना नेटवर्क उपलब्ध नव्हतं. तात्पुरत्या आश्रयस्थानात राहणाऱ्यांना मुलांनाही अनेक सुविधांची वानवा होती. त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे शिक्षक म्हणून माझ्यासमोर आव्हान होतं, आहे. धक्क्यातून सावरल्यानंतर शिक्षकांनी समोर ठाकलेल्या समस्यांवर, उपलब्ध साधनांबाबत विचार केला आणि मुलांच्या मानसिक, भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचं असं मी ठरवलं. मुलांना बोलतं करण्याला मी प्राधान्य दिलं. मुलांच्या समस्यांना समजून घेत, त्यांच्यात सकारात्मक भावना रुजवताना रोज रात्री मी रडकुंडीला येते. या प्रतिकूल परिस्थितीपासून मुलांना दूर कसं नेता येईल, याकरता सतत माझा विचार सुरू असतो. ‘माझे ख्रिसमसचे स्वप्न’ यासारखा विषय मुलांचं भावविश्व बदलून टाकतो. सोबतच मुलांना सद्यपरिस्थितीची जाणीव करून देणं, सैनिकांच्या संघर्षाचं महत्त्व सांगणं हेही मी आवर्जून करते. शिक्षकाची भूमिका पार पाडल्यानंतर निवारा केंद्रांमधील एकल, वृद्ध व्यक्तींच्या मदतीचं काम करते,” असं ओल्गा यांनी सांगितलं.

युक्रेनच्या ओडेसा प्रांतात राहणाऱ्या कॅटरिना पावलेन्को या युक्रेनच्या विद्यापीठातील तत्त्वज्ञान विषयाच्या विभागप्रमुख आहेत. त्या सध्या शिक्षक प्रशिक्षणाचं काम करत आहेत. त्या म्हणाल्या, “अगदी सुरुवातीच्या दिवसांत नेमकं काय करायचं, हे मला कळत नव्हतं. अशा वेळी एका निवारा केंद्रामध्ये स्वयंसेवी काम करण्याच्या भावनेने गेले. तिथं पहिल्याच दिवशी ‘पॅनिक अटॅक’ आलेली मुलगी आली होती. दोन दिवसांत अशी पौगंडावस्थेतील मुलांची तीन प्रकरणं आली आणि मग मुलांचं मानसिक आरोग्य जपण्याचं महत्त्व उमजलं. आणि मी माझ्या सहकाऱ्यांसोबत आणि काही मानसशास्त्रज्ञांसोबत कामाला लागले.”

‘ग्राफिक बटालियन’ प्रकल्पाअंतर्गत मुलांकरता बनवलेले व्हिडियोज

विद्यार्थ्यांसोबत काम करणाऱ्या शिक्षकांसाठी त्यांनी रीतसर प्रशिक्षणक्रम आखला, त्यांनी पद्धतशीर कसं शिकवावं, मुलांचं मानसिक आरोग्य कसं जोखावं, याचे धडे शिक्षकांना दिले. मुलांशी युद्धासंदर्भात काय व कसं बोलावं याचं प्रशिक्षण दिलं. कॅटरिना यांनी त्यांच्या ‘ग्राफिक बटालियन’ या प्रकल्पाची माहिती दिली. या अंतर्गत त्यांनी युक्रेनमधील कल्पक अ‍ॅनिमेटर्सच्या सहकार्यानं मुलांसाठी आवश्यक असे कार्टुन स्टोरी व्हिडिओज तयार केले आहेत. मुलांचा तणाव कमी करण्यावर बेतलेले हे व्हिडिओज मानसशास्त्रज्ञांच्या सल्ला-मसलतीने तयार करण्यात आले आहेत. दक्षतेचा इशारा देणारा भोंगा वाजल्यावर काय करायचं, हे एका व्हिडिओत सांगितलं आहे, तसंच मुलांशी युद्धाबाबत कसं बोलावं, हे पालकांना समजावणाराही एक व्हिडिओ आहे. हे सर्व व्हिडियोज मुलांना समजतील अशा प्रकारे तयार केले आहेत.

वर्षाहून अधिक काळ सुरू राहिलेल्या या समरप्रसंगीही युक्रेनमधील मुलांचं उज्ज्वल भवितव्य अबाधित राहण्याकरता शक्य तितके प्रयत्न करणारे शिक्षक हेच या युद्धाचे खरे नायक आहेत!

.................................................................................................................................................................

सुचिता देशपांडे

suchitaadeshpande@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा