अमीन सायानी : ‘नमस्ते बहनों और भाईयों I’ अशी मधुर साद घालून श्रोत्यांच्या हृदयात घर करणारा आवाजाचा जादूगार
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
प्रवीण घोडेस्वार 
  • अमीन सायानी
  • Tue , 20 December 2022
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा अमीन सायानी Ameen Sayani बिनाका गीतमाला Binaca Geetmala

‘बिनाका गीतमाला’ हा स्वातंत्र्योत्तर पहिल्या दशकांत जन्मलेल्या पिढीला मिळालेल्या संस्कारांपैकी एक संस्कार! ‘बिनाका गीतमाला’ म्हणजे अमीन सायानी आणि अमीन सायानी म्हणजे ‘बिनाका गीतमाला’! बुधवार हा ‘बिनाका गीतमाले’चा वार! आधी ‘सिलोन रेडिओ’ आणि त्यानंतर रेडिओ सिलोनला स्पर्धा म्हणून आकाशवाणीनं सुरू केलेली ‘विविध भारती’, या दोन्ही ठिकाणी सायानी यांनी आपल्या बहारदार आवाजाच्या जोरावर अनेक वर्षं अक्षरशः राज्य केलं.

प्रख्यात निवेदक अमीन सायानी उद्या, २१ डिसेंबर २०२२ रोजी ९०व्या वर्षात पदार्पण करताहेत. त्या निमित्ताने त्यांच्यावरील हा विशेष लेख….

..................................................................................................................................................................

क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन, पार्श्वगायनांत लता मंगेश, हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीपकुमार-अमिताभ बच्चन यांचं जे स्थान आहे, तेच भारतात रेडिओ निवेदनात अमीन सायानी यांचं आहे. ते एका अर्थानं भारतीय निवेदन विश्वातले ‘महानायक’च म्हणता येतील.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदन शैलीने रेडिओच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सायानी यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी दक्षिण मुंबईत झाला. त्यांचं कच्छी खोजा कुटुंब व्यापार-उद्योगात, समाजकारणात आणि राजकारणातही अग्रेसर होतं. त्यांचे वडील जानू मोहम्मद सायानी व्यवसायानं डॉक्टर होते. त्यांना अमीनसह तीन मुलगे. आई कुलसुम गांधीजींची शिष्या होती. त्या ‘नेहरू साक्षरता पुरस्कार’ मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. गांधीजींच्या सूचनेवरून कुलसुम यांनी १९४०मध्ये ‘राहबर (म्हणजे रस्ता दाखवणारा/पथदर्शक) नावाचं एक पाक्षिक सुरू केलं. हे हिंदी, गुजराती आणि उर्दू या तीन भाषांमध्ये प्रसिद्ध व्हायचं. सुमारे दोन दशक  म्हणजे १९६० पर्यंत हे मासिक सुरू होतं. त्या सुमारास स्थापन झालेल्या ‘All India Women’s Conference’ या संस्थेच्या कार्यकर्त्या म्हणून कुलसुम काम करू लागल्या.

त्यांच्या कुटुंबात सरोजिनी नायडू, उषा मेहता, हंसा मेहता, अशा गांधीवादी कार्यकर्त्यांचा राबता असायचा. काका त्यांना संस्कृत श्लोक, हिंदी गाणी शिकवत. शाळेच्या कार्यक्रमांमध्ये ते गाणं म्हणायचे. त्यांच्यावर सर्वांत जास्त प्रभाव वडील बंधू हमीदभाईंचा पडला. ते पट्टीचे वक्ते, लेखक, स्काऊट मास्टर, उत्कृष्ट निवेदक, जादूगार असे हरहुन्नरी कलाकार होते. अनेक प्रांतात त्यांचा संचार होता. घरातच ते तालमी घ्यायचे. आठ-दहा वर्षांचा अमीन त्यांच्या समोर जाऊन बसायचा. त्यांची रुची आणि कल ध्यानात घेऊन हमीदभाई अमीनला शिकवू लागले. ते एकदा त्यांना रेडिओ केंद्रावर घेऊन गेले. तिथं त्यांनी अमीन यांच्या आवाजात एक इंग्रजी कविता ध्वनिमुद्रित करून ऐकवली. पण त्यांना स्वत:ला त्यांचा आवाज पसंत पडला नाही. हमीदभाईने त्यांना आवाजावर मेहनत घ्यायला सांगितलं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मुंबईची न्यू इरा शाळा, ग्वाल्हेरचं सिंदिया विद्यालय आणि मुंबईचं सेंट झेव्हियर्स महाविद्यालय, इथं त्यांचं शिक्षण झालं. बंगाली भाषेची आवड असल्यानं तीही ते शिकले. रवींद्र संगीतातली गाणीदेखील ते म्हणायचे. तसंच पंजाबी, पारसी, संस्कृत, उर्दू या भाषादेखील त्यांनी आत्मसात केल्या. मात्र दक्षिणात्य भाषा आत्मसात करता न आल्याची त्यांना खंत होती.

सायानी यांचं कुटुंब देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालं होतं. रहमतुल्ला सायानी हे त्यांच्या वडिलांचे काका. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पदाधिकारी होते. त्यांचे आजोबा (आईचे वडील) डॉ. रजब अली पटेल हे मौलाना आझाद आणि गांधीजींचे डॉक्टर होते. आई गांधीजींची शिष्या असल्याने ते एकदा तिच्यासमवेत गांधीजींना भेटायला गेले. गांधीजींनी आत्मीयतेने त्यांची विचारपूस केली. लहानपणी त्यांनी प्रभात फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला होता. ‘कदम कदम बढाये जा...’, ‘भारत का डंका आलम मे बजवाया वीर जवाहरने...’, ‘चरखा चला चला कर लेंगे स्वराज्य...’ ही गाणी त्यांनी प्रभात फेऱ्यांमध्ये म्हटली. गांधीजींचा उपवास असेल तेव्हा ‘एनी जीवन ज्योत ज्वलंत रहो...’ ही  गुजराती प्रार्थना ते म्हणायचे. गांधीजींनी त्यांच्या आईला शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला होता. १९४०मध्ये इतरांसोबत त्यांच्या आईने ‘बंबई समाज शिक्षण समिती’ या संस्थेची स्थापना करून प्रौढ शिक्षणाचं उल्लेखनीय काम केलं.

हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रख्यात दिग्दर्शक विजय आनंद उर्फ गोल्डी हे सायानी यांचे महाविद्यालयीन काळातले मित्र. ते हिंदी नाटकं करायचे. त्यांचं पाहून सायानी यांनीही इंग्रजी आणि उर्दू नाटकं केली. त्यांनी शौकत खानवी या नाटककाराच्या दोन उर्दू नाटकांचं दिग्दर्शन केलं. मुंबईच्या ‘भारती विद्याभवना’त आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा पाहायला ते जायचे. दामू केंकरे आणि विजया मेहता यांची नाटकं खूप आवडत असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेऊन वकिली करावी, अशी हमीदभाईंची इच्छा होती. पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं.

त्या काळात सआदत हसन मंटो, हरिवंशराय बच्चन, उपेंद्रनाथ अश्क, सुमित्रानंदन पंत, इस्मत चुगताई, महादेवी वर्मा, कृष्णचंद्र, अमृतलाल नागर, अलेक पदमसी यांचे मोठे भाऊ सुलतान पदमसी, अब्राहम अल्काझी असे प्रतिभावंत लोक रेडिओशी जोडलेले होते. ही परंपरा सुनील दत्त, पंडित नरेंद्र शर्मा, विनोद शर्मा, कमलेश्वर यांनी पुढे नेली. या माध्यमात काम करण्याची संधी मिळणं, हे अभिमानाचं आणि गौरवाचं समजलं जायचं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सुरुवातीला सायानी रेडिओच्या हिंदी निवेदकाच्या परीक्षेत चक्क अनुत्तीर्ण झाले होते! कारण त्यांची वाचनाची शैली चांगली होती, पण हिंदी उच्चारणात गुजराती आणि इंग्रजी भाषांचा प्रभाव होता. पुढे आवाज फुटल्याने त्यांना गाणं बंद करावं लागलं. बडे गुलाम अली खाँ, हिराबाई बडोदेकर, केसरबाई केरकर या श्रेठ कलावंतांचं गाणं त्यांनी ऐकलं. त्या काळचे विख्यात निवेदक आणि चित्रपटकथा लेखक बालगोविंद श्रीवास्तव यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी पहिल्यांदा सायानी यांना रेडिओवर काम करणार का, अशी विचारणा केली. तेव्हा ‘रेडिओ सिलोन’वर ‘फुलवारी’ नावाचा लोकप्रिय कार्यक्रम प्रसारित व्हायचा. यात नवीन गायकांना संधी मिळायची. कधी-कधी तत्कालीन आघाडीच्या गायकांनाही आमंत्रित केलं जायचं.

या कार्यक्रमाचा नेहमीचा निवेदक अनुपस्थित राहिल्यानं सायानी यांना संधी मिळाली. कार्यक्रम आधी ध्वनिमुद्रित न करता थेट प्रसारित होणार होता. काहीशा ताणातच त्यांनी निवेदन केलं. ते छान झालं. व्यावसायिक प्रसारण करण्याचा त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता. पुढे श्रीवास्तव यांच्या संकल्पनेतूनच ‘बिनाका गीतमाला’ हा प्रचंड लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम सुरू झाला. त्याचा पहिला भाग ३ डिसेंबर १९५२ रोजी प्रसारित झाला. आता हा कार्यक्रम सुरू नसला तरी आज पन्नाशी-साठी-सत्तरीत असलेल्या अनेक रसिक श्रोत्यांनी आपल्या मनात त्याच्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत.

सिबा गायगी लिमिटेड कंपनीच्या ‘बिनाका टूथपेस्ट’ या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अर्ध्या तासाचा एक प्रायोजित कार्यक्रम करायचं ठरवण्यात आलं. हा एक अभिनव उपक्रम होता. याकरता रेडिओ सिलोन नव्या दमाच्या आवाजाचा शोध घेत होतं. कार्यक्रमाचं लेखन, निवेदन, श्रोत्यांच्या पत्रांची निवड आणि त्यास प्रतिसाद देणं, अशी सर्व जबाबदारी पार पाडू शकणारा तरुण त्यांना हवा होता. मात्र मानधन फक्त २५ रुपये मिळणार होतं. त्यामुळे नामांकित निवेदक तयार झाले नाहीत.

स्वातंत्र्योत्तर भारतातला उत्साही युवक असलेल्या अमीन सायानी यांना ही संधी मिळाली नि त्यांनी पुढे इतिहास घडवला! निवेदन हे जरासं वेगळं कार्यक्षेत्र आहे. यात यश मिळवण्यासाठी योग्य ते कष्ट घ्यावे लागतात. ‘बिनाका गीतमाला’ सादर करण्याआधी सायानी इंग्रजी भाषेतले निवेदक होते. त्यामुळे हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली. योग्य वेळी समर्पक शब्द सुचणं, निवेदनाचा मजकूर सोप्या, सहज आणि प्रवाही भाषेत लिहिणं, शब्दांचा उच्चार अचूक व स्पष्ट असणं, आवाजातले चढ-उतार, आवाजाची पट्टी, यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले.

‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमासोबतच त्यांनी इतरही काही लोकप्रिय कार्यक्रम सादर केले. त्यात ‘सॅरिडॉन के साथी’, ‘जोहर के जवाब’, ‘मराठा दरबार अगरबत्ती’, ‘रिको घडी’, ‘एस. कुमार की फिल्मी मुलाकात’, ‘एस. कुमार का फिल्मी मुकदमा’, ‘बोर्नव्हीटा क्विझ कॉन्स्टेट’, ‘शालीमार सुपरलक जोडी’, ‘सितारों की पसंद’, ‘महकती बाते’, ‘कोलगेट संगीत सितारे’, ‘संगीत के सितारों की महफिल’ यांचा उल्लेख करता येईल.

................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘पायदान नंबर’, ‘चोटी की पायदान’, ‘सरताज गीत’, ‘सालाना प्रोग्रॅम’, ‘धूम मचाई थी’, ‘बारहाल’, ‘श्रोता संघो की राय’, ‘अगली बुध की शाम फिर मिलेंगे’, ‘गीत की झलक’ या सारखे शब्द रूढ करून जणू काय यांची निर्मिती त्यांनीच केली आहे, असं वाटावं, इतके हे शब्द अमीन सायानी या नावाशी जोडली गेले आहेत! 

हे प्रायोजित कार्यक्रमही त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत सादर केले. ‘बिनाका गीतमाला’ लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांच्या कार्यालयात एका सुंदर मदतनीसाची नियुक्ती झाली. तिची त्यांना कामात फार मदत व्हायची. कामाच्या निमित्तानं त्यांचा सतत संपर्क यायचा. रमा मट्टू हे त्या तरुणीचं नाव. ती सायानी यांच्या मनात भरली. रमा आणि अमीन १९५८मध्ये परिणय सूत्रात बद्ध झाले. रमा या हिंदू – काश्मिरी ब्राह्मण. सयानींशी लग्न झाल्यावर त्यांनी ना आपलं नाव बदललं, ना धर्म! त्यांच्या विवाहसोहळ्याला चित्रपटसृष्टीतले जवळपास सारे कलावंत हजर होते. त्या वेळी रमा यासुद्धा ‘जोहर के जबाब’, ‘अफगाण स्नो के साथी’ हे कार्यक्रम सादर करायच्या.

याशिवाय त्या ‘Eve’s Weekly’च्या आघाडीच्या मॉडेल होत्या. त्यांचं २००२मध्ये निधन झालं. त्यांना राजील नावाचा एक मुलगा असून तो वेब रेडिओशी निगडीत एका कंपनीत काम करतो. तसेच लघुपट, वृत्तचित्रपटांची निर्मितीही करतो. त्याने दूरचित्रवाणी आणि त्यावर सादर होणारे कार्यक्रमांचं शिक्षण घेतलं आहे. त्यांची सूनबाई (रजीलची पत्नी) कृष्णज्योती व्यावसायिक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ती आहे.

‘बिनाका गीतमाला’ सादर करणारे सायानी लाखो श्रोत्यांसाठी केवळ निवेदक राहिले नाहीत, तर ते त्यांचे मित्र, सखा, फ्रेंड झाले. एक असा दोस्त जो श्रोत्यांना आवडणारी गाणी ऐकवतो, त्यांनी लिहून पाठवलेली पत्रं आत्मीयतेनं, जिव्हाळ्यानं वाचून दाखवतो, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं देतो, त्यांच्या अडी-अडचणी व समस्यांवर व्यावहारिक उपाय सुचवतो आणि त्यांच्या मनाला स्पर्शून जाणारे किस्से, गोष्टी, अनुभव सांगून रंजनही करतो. हा कार्यक्रम सुरुवातीला ३० मिनिटांचा होता, नंतर तो एक तासाचा करण्यात आला.

सायानी भारतातले पहिले असे रेडिओ निवेदक आहेत, ज्यांचा हिंदी फिल्मी दुनियेतले बडे-बडे तारेदेखील आदर, सन्मान करतात. हे भाग्य त्यांच्यानंतर इतर कोणत्याही निवेदकाला फारसं लाभलं नाही. खूप कमी लोकांना माहीत असेल की, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी रेडिओ निवेदक होण्यासाठी मुंबई आकाशवाणीवर स्वरचाचणी दिली होती. ती देण्याआधी अमिताभला सायानींना भेटायचं होतं. त्यांनी भेट होण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, पण तरीही त्यांची तेव्हा भेट होऊ शकली नाही. कारण त्या वेळी सायानी यांच्याकडे प्रचंड काम होतं. एका आठवड्याला ते  २० कार्यक्रम करायचे.

त्या वेळी आपण अमिताभला भेट नाकारली, याचा सायानींना खेद होतो. मात्र ‘‘जे झालं ते आमच्या दोघांसाठी चांगलंचं म्हणावं लागेल. अमिताभ रेडिओ निवेदक झाले असते, तर मी रस्त्यावर आलो असतो आणि सिनेरसिकांना महानायकाच्या अभिनयापासून वंचित राहावं लागलं असतं’’, असं त्यांनी म्हणून ठेवलंय! सायानी रस्त्यावर आले असते असं नाही वाटत, पण अमिताभ निवडले गेले असते, तर चित्रपट रसिकांची फार मोठी हानी झाली असती, हे नक्की!

सायानींच्या मते निवेदन प्रभावी होण्यासाठी सात घटकांची गरज असते- 

१) निवेदकाचं बोलणं ‘सही’ म्हणजे अचूक असायला हवं. चुका नसाव्यात.

२) निवेदकाच्या बोलण्यातून ‘सत्य’ प्रतीत व्हायला हवं. श्रोत्यांना त्याचं बोलणं खोटं वाटता कामा नये.

३) निवेदकाचं बोलणं ‘स्पष्ट’ असायला हवं. बोललेलं श्रोत्यांना समजायला हवं.

४) निवेदकानं ‘सरल’ अर्थात सरळ शब्दांत, भाषेत बोललं पाहिजे.

५) निवेदनाची भाषा ‘सभ्य’ असावी. त्यात असभ्यपणा, अश्लीलता, उर्मटपणा नसावा.

६) निवेदन ‘सुंदर’ असायला हवं. त्यात सौंदर्य असावं.

७) निवेदन ‘स्वाभाविक’ असावं. त्यात कृत्रिमपणा नसावा. ते नैसर्गिक असावं. 

ही सात सूत्रं आपल्या यशाची गमक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘पूछो ना कैसे मैने रैन बिताई’ (मेरी सुरत तेरी आंखे/ मन्ना डे/ शैलेन्द्र/ सचिनदेव बर्मन) आणि ‘मन रे तू काहे न धीर धरे’ (चित्रलेखा/ मोहम्मद रफी/ साहीर/ रोशन), ही सायानी यांची आवडती चित्रपटगीतं. किशोरकुमार, आशा भोसले हे त्यांचे आवडते पार्श्वगायक. त्यांनी ‘भूतबंगला’, ‘जीनी और जॉनी’ या चित्रपटांमध्ये लहानशा भूमिका केल्या आहेत. सावनकुमारच्या ‘हवस’ चित्रपटाचं संवादलेखन आणि ‘ये दिल किस को दू’ या सिनेमाचं लेखनही केलंय. हेमामालिनीचा ‘सपनों का सौदागर’ हा पदार्पणाचा चित्रपट. तिच्यासाठी सायानी यांनी ‘ड्रीम गर्ल’ हा शब्दप्रयोग केला होता. पुढे हीच हेमामालिनीची ओळखी झाली!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१९५६ ते १९७५ या काळात जेवढे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी १५ टक्के चित्रपटांच्या जाहिराती सायानी यांनी केल्या आहेत. आकाशवाणीसाठी त्यांनी ‘एडस’ या आजाराविषयी १३ भागांची मालिका सादर केली आहे, तर दूरदर्शनवरच्या आठ कार्यक्रमांचे संचालन केलंय. देश-विदेशात सुमारे दोन हजार कार्यक्रमांचं निवेदन केलंय. सायानी यांना आजवर विविध मान-सन्मान-पारितोषिक यांनी गौरवण्यात आलंय. ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमामुळे जगातल्या पाच सर्वोत्कृष्ट निवेदकांमध्ये त्यांनी गणना व्हायची. भारत सरकारने ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला आहे.

सायानी ‘My Life Garland of Songs’ या नावानं आत्मकथन लिहीत आहेत. ते लवकरच प्रकाशित होईल. ‘बिनाका गीतमाला’ हा स्वातंत्र्योत्तर पहिल्या दशकांत जन्मलेल्या पिढीला मिळालेल्या संस्कारांपैकी एक संस्कार! ‘बिनाका गीतमाला’ म्हणजे अमीन सायानी आणि अमीन सायानी म्हणजे ‘बिनाका गीतमाला’! बुधवार हा ‘बिनाका गीतमाले’चा वार! आधी ‘सिलोन रेडिओ’ आणि त्यानंतर रेडिओ सिलोनला स्पर्धा म्हणून आकाशवाणीनं सुरू केलेली ‘विविध भारती’, या दोन्ही ठिकाणी सायानी यांनी आपल्या बहारदार आवाजाच्या जोरावर अनेक वर्षं अक्षरशः राज्य केलं.

निवेदकांच्या नव्या पिढ्यांनी सायानींकडे एक ‘स्कूल’, एक परंपरा म्हणूनच पाहिलं’, अशा शब्दांत ज्येष्ठ संगीतसमीक्षक सुरेश चांदवणकर यांनी त्यांचा गौरव केलाय. ‘नमस्ते बहनों और भाईयों I मैं आपका दोस्त अमीन सायानी बोल रहा हूँI’ अशी मधुर साद घालून श्रोत्यांच्या हृदयात घर करणाऱ्या अमीन सायानी नावाच्या आवाजाच्या जादूगाराला शतक-महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा!

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. प्रवीण घोडेस्वार चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.

gpraveen18feb@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......