‘चमत्कार’, ‘नमस्कार’ आणि ‘पुरस्कार’ या पलीकडे शास्त्रीय संगीत जाणार का?
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 11 March 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe धृपद Dhrupad ख्याल Khayal ठुमरी Thumri

शास्त्रीय संगीत हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. आज जगाच्या पाठीवर फार थोड्या संस्कृतीजवळ स्वत:च्या संगीताचा ठेवा उपलब्ध आहे. संगीतकलेचा निदिध्यास घेऊन उभं आयुष्यं संगीताला वाहिलेल्या विभूती होऊन गेल्या. कित्येकांचं जीवनध्येय बनावं एवढी महत्ता भारतीय संस्कृतीत शास्त्रीय संगीताला प्राप्त झाली होती.

आज मात्र भारतीय शास्त्रीय संगीताचं भवितव्य काय असा प्रश्न पडताना दिसतो. असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आज आहे. एखाद्या संस्कृतीचं संगीत लुप्त होणं ही गोष्ट त्या संस्कृतीच्या विलयाची निर्देशक खूण आहे, असं संस्कृती अभ्यासक म्हणतात. म्हणूनच भारतीय शास्त्रीय संगीताच्या भविष्यकाळाविषयी विचार करावासा वाटतो. भविष्यात डोकावून पाहता येईल, म्हणजे साधारण येत्या पंचवीस वर्षांतील शास्त्रीय गायनाचा विचार इथं केला आहे.

असा विचार दोन पातळ्यांवर करावा लागेल. पहिली, खुद्द संगीतातील अंतर्गत बदल आणि दुसरी, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं एकूण संस्कृतीतलं स्थान. पुन्हा हे दोन्ही प्रकारचे बदल परस्परावलंबी असतील. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या स्वरूपात सतत बदल होत गेले आहेत आणि असं घडणं स्वाभाविक व आवश्यक आहे. प्रबंध, धृपद आणि ख्याल असा रससंगीताचा प्रवास झाला आहे. शब्दबद्ध, लयबद्ध, तालबद्ध आणि रागबद्ध अशी बद्धता भोगून रागसंगीत या बद्धतेतून क्रमश: मोकळं होत गेलं आहे.

मुळात संगीताची प्राचीन व्याख्या ‘नृत्यं वाद्य-गीतच’ अशी आहे. या ललित-कला-समुच्चयातून एकेक घटक-कला स्वतंत्रपणे विकसित होत गेली. अष्टांग गीतातून अभोग, संचारी घटक जाऊन स्थायी (मुखडा) व अंतरा उरला आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तर अंतराही दुर्बल झाला. शास्त्रीय गायनात शब्द गौण असतात, असावेत, त्यांचे अर्थवाचक अस्तित्व जवळ जवळ नाकारलं जावं असा दंडक बनला. श्रोत्यांनाही शब्द न ऐकण्याचं शिक्षण मिळालं. हे शिक्षण न मिळालेले श्रोते आजही ख्यालाचे शब्द कळत नाहीत म्हणून शास्त्रीय गायन कळत नाही अशी कैफियत सांगतात. हा सर्व प्रवास अर्थातच स्वप्रचीतीचा आहे. आजच्या अमृतमहोत्सवी दिग्गज कलावंतांनी स्वरासाठी मुक्त प्रांगण मिळवलं.

हा शास्त्रीय गायनाचा आजपर्यंतचा परमोत्कर्ष आहे. यापुढे शास्त्रीय गायनाचा या मितीतला विकास काय असेल? मुळात गायकांना स्वरभाषेच्या सामर्थ्याचा कितीसा प्रत्यय आला आहे? स्वराच्या सूक्ष्मतेची समय्यक जाणीव गायकांना आहे का? निखळ स्वर या तत्त्वावर आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून त्यांची किती भिस्त आहे? श्रोत्यांना स्वरभाषा ऐकण्या-समजण्याची कितीशी सवय कलाकारांनी लावली आहे? आपलं अबोध मन आपल्या माध्यमातून शोधण्याची असोशी कलाकाराला किती आहे? गानसरस्वती किशोरी आमोणकर ‘उर्ध्व बाहु विरम्येय’ या स्वरभाषेबद्दल नव्या गायकांना जागृत करू पाहत आहेत. सर्व वस्त्र-प्रावरणं बाजूला सारून स्वरांच्या सरोवरात उतरण्याची आजही गायकांची तयारी नाही, अशी काहीशी त्यांची खंत आहे.

हे सर्व लक्षात घेता या दिशेनं शास्त्रीय गायन येत्या २५ वर्षांत काही लक्षणीय कूच करेल असं वाटत नाही. पुन्हा अशा पुढच्या विकासासाठी ख्याल हा आकृतिबंध पुरेसा ठरेल की, ख्यालाचं उत्क्रांत रूप गवसेल? शास्त्रीय गायनाची लय म्हणजे विलंबित ठेक्याची लय, हळूहळू कमी होत गेली आहे, हा इतिहास आहे. ती इतकी कमी झाली की, विलंबित ठेका कोणता चालू आहे याचं भानही राहू नये. (तानेची गती मात्र वाढत गेली.) मुक्त स्वरविस्तार करताना विलंबित ठेक्याचं बंधन ही जाणवू नये. ख्यालातली उरलीसुरली गीतात्मकता निघून जावी, या सांगीतिक गरजेपोटी लय विलंबित झाली असावी. ही लय वाढू लागली आहे. आणि येत्या काळात ती लक्षणीय वाढेल, अशी शक्यता मात्र कधीच नाकारून चालणार नाही.

ख्याल गायनात शब्दांकडे अधिक डोळसपणे बघण्याकडे गायकांचा कल होईल, यासाठी वातावरण पोषक बनत आहे. ख्याल गायनातील नवीन बहुतांश बंदिशी द्रूत किंवा छोट्या ख्यालाच्या आहेत. त्या अलंकारिक आणि चमत्कृतीपूर्ण बनवण्याकडे कल आहे. बंदिशीची अंतर्गत लयही भूतकाळाच्या तुलनेत अधिक द्रूत आहे. नवीन बंदिशी हिंदी- व्रजभाषेत आहेत आणि त्यांचे विषयही जवळजवळ  तेच आहेत. लाडिक, श्रृंगांरिक, स्तुतिपर अशा बेगडी रूपापलीकडे ख्यालातील बंदिशींचं साहित्यमूल्य जाईल अशी शक्यता वाटत नाही. मुळात शास्त्रीय गायनाच्या जीवनाभिमुखतेविषयी विचार होताना दिसत नाही. आजच्या जगण्याची वैयक्तिक किंवा सामाजिक स्पंदनं धारण करण्यासाठी शास्त्रीय गायक उत्सूक दिसत नाहीत. शास्त्रीय गायनाकडे गतकाळाचं – भौतिक, नैसर्गिक आणि भावनिकसुद्धा - वा गतवैभवाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात आहे. साहजिकच शास्त्रीय गायनाची जागा देव्हारा किंवा पुराणवस्तू संग्रहालय हीच असणं तर्कसंगत आहे.

कोणार्कच्या सूर्यमंदिरासारखं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं मंदिर ढासळणार का? येत्या पंचवीस वर्षांत तर मुळीच नाही. कारण पंचवीस वर्षांचा काळ तसा त्या तुलनेनं थोडा आहे. काळाबरोबर हे संगीत प्रवाहित राहणार का, विकसित होत जाणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

क्लासिकल आणि पॉप्युलर असे कलाक्षेत्राचे विभाग नेहमीच असतात. परंतु या दोन विभागांतही काही दुवा असतो, असावा लागतो. पॉप्युलर कलेचं परिपक्व, प्रगल्भ विशुद्ध रूप म्हणजे क्लासिकल कला, असं म्हटलं तर पॉप्युलर व क्लासिकल या दोन्ही संगीतात ध्वनी आहेत, एवढंच साम्य ठरेल अशी स्थिती आहे. ही गोष्ट क्लासिकल संगीताला धोकादायक नक्कीच आहे. जगाच्या पाठीवर लिप्या, भाषा लुप्त झाल्या. संगीतही लुप्त झालेलं आहे.

काही वर्षांपूर्वी एका जाहिरात कंपनीमध्ये गेलो होतो. एका नव्या आंघोळीच्या साबणाची जाहिरात करायची होती. चर्चेत सकाळचा राग- अहिर भैरव, ‘पुछो ना कैसे मैने रैने बिताई’ आणि ‘मेरी बिना तुम बिन रोये’ या हिंदी चित्रपटगीतांचे संदर्भ येत गेले. एजन्सीच्या अधिकाऱ्याला यातल्या कशाचीच गंधवार्ता नव्हती. लता मंगेशकरांनी गायलेली गाणी म्हणजे क्लासिकल, अशी त्याची ठाम समजूत होती आणि त्या क्लासिकलबद्दलही तो पूर्ण अनभिज्ञ होता. भारतात कार्यरत असलेल्या जाहिरात कंपनीचा एक महत्त्वाचा माणूस लाखो भारतीयांसाठी जाहिरात करणारा आणि त्याला इथं पॉप म्हणजे चित्रपटसंगीतही ठाऊक नसावं? अव्वल शास्त्रीय संगीत तर त्याच्यासाठी सातव्या स्वर्गापलीकडे होतं. फार वैषम्य वाटलं आणि असुरक्षितही.

शास्त्रीय संगीताचं स्वरूप तानसेनानं बदललं. सदारंग-अदारंगांनी बदललं. अल्लादियाँ खान, अब्दुल करीम खान, फैय्याज खान यांनी विविध दिशांनी त्याचा विकास केला. कोणाही एका तत्कालीन मानदंडाचं अनुकरण न करता अमीर खान, किशोरी आमोणकर, कुमार गंधर्व, जसराज यांनी नवीन वाटांनी ते समृद्ध केलं. या कलाकारांनी त्यांच्या तरुणपणात बंडखोरी केली, आपली नवीन वाट धुंडाळली. शास्त्रीय संगीत पुढे नेलं. त्यावर त्या काळी टीकाही झाली. ती अगदी बिनबुडाची होती असंही नाही. परंतु या कलाकारांनी केलेले बदल काळाशी सुसंगत होते. म्हणूनच शास्त्रीय गायनाला कलाटणी देण्याचं श्रेय या कलाकारांना मिळालं आहे. राजाश्रय, लब्धप्रतिष्ठांपुरतं मर्यादित दरबार गायन हे रूप बदलून लोकाश्रय आणि शास्त्रीय गानरसिकवर्गात निदान मध्यमवर्गाचा अंतर्भाव हे परिस्थितीतील बदलाचे महत्त्वाचे भाग होते. ध्वनिवर्धक, रेडिओसारखं माध्यम, ध्वनिमुद्रण या तांत्रिक बाबींनीही परिस्थितीला आकार देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

साहित्य, चित्र, शिल्प, नाट्य या अन्य ललितकलांमध्ये अनेक प्रवाह येत राहिले. अभिजातवाद, रोमँटिसिझम, वास्तवतावाद, अतिवास्तवतावाद इत्यादी वाद संगीतात येऊ शकतात का हाच वादाचा मुद्दा आहे. क्लासिकल म्हटल्या गेलेल्या संगीतात अभिजातवादाखेरीज दुसरा कोणता वाद कसा येईल, असाही युक्तिवाद करता येईल. तरीही गेल्या पन्नास वर्षांत शास्त्रीय संगीतात रोमँटिसिझम आला आहे, असं विधान करता येईल. त्यामुळे शास्त्रीय संगीतकलेचं नातं तत्कालीन साहित्य, चित्र, शिल्प, नाट्य यांच्याशी जोडून दिलं. तसंच ते त्या त्या कलाक्षेत्रातील मान्यवर कलाकारांशीही जोडून दिलं.

आजच्या काळाचा आणि येत्या काळाचा इझम कोणता? त्याच्याशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत कसं नातं ठेवेल? या दृष्टीने विचार करता येत्या २५ वर्षांत काळ कसा बदलतो आहे?

दिवाणखाना ते ८००-१००० आसनांचं प्रेक्षागार हा प्रवास तीन-चार हजारांनी फुललेलं पटांगण ते स्टेडियम असा होईल का की, पुन्हा दिवाणखान्याकडे (नव्या काळात – मिनी थिएटर) की, फक्त सीडी, असा एक प्रश्न आहे. अभिजातवाद ते रोमँटिसिझम तर पुढे काय? राजाश्रय ते लोकाश्रय आणि कॉर्पोरेट आश्रय तर पुढे निश मार्केटिंग? या सर्व प्रश्नांची उत्तरं शास्त्रीय संगीताच्या बदलत्या रूपात आहेत, पण पुन्हा शास्त्रीय संगीताच्या रूपातील बदल या सर्व प्रश्नांच्या उत्तरात आहेत.

शास्त्रीय संगीत मनोरंजन व्यवसायाच्या परिघात बसू शकत नाही. कॉर्पोरेट प्रायोजनाशिवाय शास्त्रीय संगीताला तरणोपाय नाही. कॉर्पोरेटसही शास्त्रीय संगीताचे प्रायोजन करतात, त्यात वस्तुविशेषाच्या (Product) जाहिरातीचा विचार नसून कंपनीसमूहाच्या (Brand image) प्रतिष्ठेची जाहिरात असते. (कॉर्पोरेट प्रायोजनामागचा हा हेतू किती वर्षं सफल होऊ शकेल असाही प्रश्न आहे. वीस-पंचवीस वर्षांत त्यात फार फरक पडेल असं वाटत नाही.) कलाकारांनी ‘चमत्कार’ करावा, सर्वसामान्य माणसांनी त्यांना ‘नमस्कार’ करावा आणि मग कॉर्पोरेटसनी त्यांचा ‘पुरस्कार’ करावा असाच शिरस्ता आहे. चमत्कार करणारा संगीतेतर कलाक्षेत्रातील कोणी असेल तर याबाबतीत शास्त्रीय संगीतकलेला केवळ पॉप्युलर संगीताशीच नाही तर अन्य दृकश्राव्य कलांशी स्पर्धा करावी लागेल. यासाठी शास्त्रीय संगीताचा चांगला, उत्कृष्ट एवढ्या विशेषणात ज्यांचं वर्णन भागेल असा नाही, तर चमत्कारी, अवतारी कलाकार निर्माण करावा लागेल.

शास्त्रीय संगीताच्या श्रोतृवर्गात संख्यात्मक वाढ होणं गरजेचं आहे. परदेशस्थ भारतीय हे शास्त्रीय संगीताचं एक चांगलं मार्केट आहे. भारतीयत्वाशी भावानुबंध हा त्यांच्या शास्त्रीय संगीत रसिकतेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. सर्वसाधारण हा वर्ग जागतिक मानकांनुसारही उच्च मध्यमवर्गीय आहे. शास्त्रीय संगीतासाठी थोडासा वेळ आणि पैसा खर्च करण्याची त्याची मानसिकता आहे. हा वर्ग संख्येनंही वाढतो आहे.

याचबरोबर दुसरी आशादायक गोष्ट म्हणजे जगभरात संगीतकलाकारांचं लक्ष भारतीय शास्त्रीय संगीतानं वेधलं आहे. अभारतीयही शास्त्रीय संगीत मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत. हे नवशिक्षित कलाकार भारतीय शास्त्रीय संगीताचा त्यांचा त्यांचा श्रोतृवर्ग तयार करतील. परदेशस्थ भारतीयांची पुढची पिढी भारतीय शास्त्रीय संगीत किती प्रमाणात आपलंसं करेल हा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचे नवशिक्षित विदेशी कलाकार ते कसं मांडतील, त्यावर आपले असे कोणते संस्कार करतील हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. जगभरात विशेषत: अमेरिकेत संगीत कलेकडून मन:शांतीची अपेक्षा करण्याची वृत्ती मूळ धरत आहे. उपचारक संगीत आणि कलासंगीत यांच्या हेतू, प्रस्तुती, परिणाम या सर्वांत फरक आहे. तरीही मन:शांतीच्या अपेक्षेचा परिणाम भारतीय शास्त्रीय संगीताच्या रूपावर होईल.

(पंचवीस वर्षांनंतरच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताविषयी अंदाज बांधताना बुद्धीला स्पर्शून गेलेले मुद्दे इथं नुसते नोंदले आहेत.)

(दहा वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख आहे. २००७ ते २०१७ या दशकातल्या काही गोष्टींची दखल पुढे केव्हा घेईनच.)

लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com