रजनी परुळेकर : परंपरेच्या संदर्भात दीर्घ कवितेचा रूपबंध व आशयसूत्र यांना उल्लेखनीय देणगी देणारी कवयित्री
पडघम - साहित्यिक
भाग्यश्री भागवत
  • रजनी परुळेकर यांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 06 May 2022
  • पडघम साहित्यिक रजनी परुळेकर Rajani Parulekar दीर्घ कविता Deergh Kavita स्वीकार Sweekar

मराठीतील एक लक्षणीय व उल्लेखनीय कवयित्री रजनी परुळेकर यांचं बुधवार, ४ मे २०२२ रोजी मुंबईत निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या कवितेविषयीचा हा एक लेख ...

..................................................................................................................................................................

रजनी परुळेकर यांच्या कवितांचे १) कवितेबद्दलच्या कविता, २) व्यवस्थेबद्दलच्या कविता, ३) एकटेपणाच्या कविता, ४) नातेसंबंधांबाबतच्या कविता, ५) नैसर्गिक प्रेरणांवर आधारित कविता, ६) बाईपणा व्यक्त करणाऱ्या कविता आणि ७) स्त्री-पुरुष संबंधावर आधारित कविता असे ढोबळमानाने भाग पाडता येतील. या विभागणीला अनुसरून ‘दीर्घ कविता’, ‘काही दीर्घ कविता’, ‘पुन्हा दीर्घ कविता’ या तिन्ही संग्रहांतल्या कवितांचा या लेखात विचार केला आहे.

परुळेकर यांच्या कवितांतील आशयसूत्रं वैविध्यपूर्ण आहेत. या सर्वच कविता जगण्याला थेट सामोऱ्या जाताना दिसतात. त्यातील व्यंग, वास्तव, क्रौर्य, लालसा, प्रेम, आत्मीयता अशा अनेक छटा कवयित्री सूक्ष्मपणे रेखाटते व कुठल्याही आच्छादनाशिवाय मार्मिकपणे या संवेदनशील जागा खुल्या करते. आशयसूत्रांच्या संदर्भात या कविता जितक्या समृद्ध ठरतात, तितक्याच त्यांतील नाट्यमय कथनामुळे त्या प्रत्ययकारी होतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

रजनी परुळेकर यांनी केलेले कथन दीर्घ आहे. अनेक भावांची व भावनांची एकत्रित संयुगे व त्यांच्या अनेक पातळ्या या कथनातून व्यक्त होत राहतात. त्यामुळे हे कथन रचना व अनुभूतीच्या बहुविध शक्यता पोटात घेऊन अवतरते.

त्यांच्या तिन्ही संग्रहांतील कवितेविषयीच्या बहुतांश कविता शब्दांच्या सर्जकतेविषयीचे अचूक भान व्यक्त करतात. ‘कविता’ या विषयाला अनुसरून येणाऱ्या संग्रहातल्या सगळ्याच कविता वास्तवाच्या पार्श्वभूमीवर निरागसता कायम राखून विकसनाच्या शक्यता आजमावत जाताना दिसतात. त्यामुळे या कवितांत आलेल्या विकसन शक्यतांना नेमकेपणा प्राप्त होतो आणि कवितेतील ‘निरागसता’ या मूल्याला आदिम प्रेरणेचे स्थान लाभते. विकसनाचा प्रवास सांगताना कवयित्री कविता व कवयित्री सायुज्य, कवितापण जोपासण्यातला व्रतस्थपणा इत्यादी अनेक चिंतनीय मूल्यांना स्पर्श करते; परंतु या विकासक्रमात आलेली कवितेबद्दलची एखादी कविता फसलेलीही आढळून येते. कवितेच्या सायुज्याच्या पलीकडे गेल्यावर आलेलं सामंजस्य, स्वीकार या कवितेत हरवल्यासारखा भासतो; पण तरीही एकूण कवितांचा विचार केल्यास सर्व कवितांतून ‘कविता’ या जाणिवेचा सातत्यपूर्ण शोध निश्चितपणे आढळून येतो.

कवितेशी असणारी गाढ बांधीलकी, तीच आपल्या व्यक्ततेचे माध्यम असल्याचे स्पष्ट भान कवितेवरच्या कवितांतून स्पष्ट होत जाते. एकूणच १९७५नंतर नावारूपाला आलेल्या कवयित्रींच्या कवितेतून त्यांचे कवितेशी असलेले गहिरे नाते सातत्याने अधोरेखित होत राहते.

त्यांच्या बाईपणाच्या कविता परंपरांचं घट्ट कवच नाकारून ‘स्व’ची नवी जाणीव शोधणाऱ्या आहेत. ‘स्व’चा शोध घेताना या कविता स्त्री-पुरुषातली निसर्गदत्त ओढ नाकारत नाहीत, पण या ओढीत सातत्याने स्त्रीच्या दयनीय अवस्थेच्या जाणिवेने त्या व्यथित होतात. स्त्रीच्या नैसर्गिक ओढीत भोगापेक्षा सर्जकतेची असलेली जाणीव त्या चित्रित करतात आणि त्यातून स्वत:तल्या निमिर्तीच्या शक्यतांचं अचूक भान प्रदर्शित करतात. बाईपण शोधताना ही कवयित्री पुरुषही शोधत जाताना दिसते. पुरुषी मनोवृत्तीचे सूक्ष्म बारकावे, शरीराच्या अनुषंगाने येणारे सत्ताकेंद्रित्व, त्यातून नैसर्गिक प्रेरणेत घुसणारा कावेबाजपणा त्या उघड करतात. त्यातून बाईच्या शरीर-गर्भाचं होणारं वस्तुकेंद्रित्व उघड होतं. बाईची या व्यवस्थेत होणारी असह्य घुसमट केंद्रभागी येते.

‘लग्न’ नावाच्या विशिष्ट चौकटीतून बघताना नाकारलं जाणारं बाईचं माणूसपण आणि या जाणिवेतून अंगावर येणारं भीषण वास्तव चितारलं आहे. तसंच भौतिक आधुनिकतेतून आलासा भासणारा, पण अधीकच जटिल झालेला स्त्री-स्वातंत्र्यातला भोंगळपणा या कवितेतून समोर येतो. विवाहसंबंधांतल्या बेगडीपणाचा तीव्र प्रत्यय ही कविता देते. प्रसंगी सामाजिक चौकटीत स्पष्ट दाद मागणारी अशीही ही कविता आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

स्त्री-पुरुष व्यवहारातला बेगडीपणा, मतलबीपणा परुळेकर अचूक पकडतात. स्वतंत्र निर्मितीक्षम असणाऱ्या बाईचं प्रत्येक वेळी दुर्लक्षित होणंही अचूक पकडतात. त्यामागची वेदना आणि तिचे गंभीर पडसादही त्यांच्या कवितेतून यथार्थपणे उमटतात, परंतु प्रत्येक वेळी नवीन रचनेची मागणी करताना त्यासाठी दिल्या जाणाऱ्या कसोट्या मात्र पुरेशा स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे तिच्यातील खुलेपणाला बाधा उत्पन्न होते आणि वेदनेच्या आवर्तातच ती पुन:पुन्हा फिरत राहिलेली दिसते. परंतु दीर्घ कवितेच्या दृष्टीने आशयसूत्राचा विचार करताना मात्र बहुतांश ठिकाणी तपशिलाचा चढत्या लयीशी अचूक मेळ घातला गेलेला दिसतो. त्यामुळे आशयसूत्राची मूलभूत गरज म्हणजे ‘वाढत जाणारी सल’ ही अट त्या बारीक बारीक तपशिलांतून पूर्ण होताना दिसते.

पुरुषसत्ताक व्यवस्थेसंदर्भातला विचार करता, स्त्री-निष्ठ पारंपरिक संकेत आणि त्यातून आलेली चिरेबंद व्यवस्था त्या विचक्षणपणे मांडत जातात आणि त्याबाबतची चीड या कवितांतून व्यक्त होताना दिसते. काही कवितांतून समाजव्यवस्थेतून आलेलं सांस्कृतिक नासकेपण व्यक्त होतं. व्यवस्थेतील मतलबीपण संवेदनशीलतेचा वापर करून सामान्यांच्या श्रद्धा-जाणिवांचा कसा खेळ करतं, हे या कवितांतून व्यक्त होतं.

या कवितांद्वारे कवयित्री व्यवस्था आणि नैसर्गिकतेतला तीव्र आंतरविरोध खुला करत जाते. चिरेबंद व्यवस्थेतून माणसात आलेलं वखवखलेपण, हिंस्रता, विकृती आणि पर्यायाने आलेलं कीडकेपण कवयित्री समोर आणते. काही कवितांतून व्यवस्थेतल्या उमद्या कार्यकर्त्या माणसाची परवड या कवयित्रीने रेखाटली आहे. या कवितांद्वारे व्यवस्थेच्या भीषण वास्तवात नितळतेची होत जाणारी शकलं ती अचूक पकडते; परंतु काही कवितांत नितळ व्यक्तिमत्त्वाद्वारे ते वास्तव सश्रद्धतेने अंगावर घेतले जाते. त्यामुळे प्रसंगी ही कविता शोषणाच्या पलीकडे जाऊन उभी राहते. परुळेकर व्यवस्थेसंदर्भातल्या कवितांतून या व्यवस्थेचा छेद घेताना दिसतात, परंतु त्यांचा आवाका मात्र मर्यादित आहे. त्यामुळे व्यवस्थांचे निरनिराळे स्तर, त्यांची गुंतागुंत व हितसंबंध सखोलतेने पुढे येत नाहीत. तरीही जो मर्यादित आवाका त्यांची कविता स्वीकारते, त्यातील व्यवस्थेने केलेल्या गळचेपीचे तपशील व अर्थवलयांच्या आर्ततेवर ती नेमकेपणाने बोट ठेवते.

परुळेकर स्वतंत्र व्यक्तिमत्त्वातून आलेला एकटेपणा चित्रित करतात. त्यांच्या एकटेपणाच्या कवितांची संख्या व तीव्रता लक्षणीय असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी त्या फसतात, तर काही ठिकाणी टोकदारपणे सखोल होत जातात. परंपरा नाकारताना आलेली हतबलता, संघर्ष त्यांची कविता चित्रित करतेच, परंतु एकटेपणाच्या विविध पातळ्या व या पातळ्यांवर चुकवाव्या लागलेल्या स्वतंत्रपणाच्या किमतीचाही ती वेध घेते. स्वतंत्र निर्णयशक्तीतून येणारा आत्मविश्वास आणि त्याच वेळी येणारी तीव्र हतबलता; थोडक्यात स्वप्न-वास्तवातला ताण त्यांची कविता अचूकपणे पेलते. जगाच्या व्यवहारीपणात निरागसतेची होणारी होरपळ, त्याचे तपशील आणि त्यातून पुढे उभं राहणारं प्रश्नचिन्ह नेमकेपणाने पुढे आणते. त्यामुळे या एकटेपणाच्या पार्श्वभूमीवर निरागसतेचा जिवंत प्रत्यय येतो. तसेच एकटेपणा रेखाटताना समोर आलेला मनस्वीपणा विविध पैलूदर्शी व्यक्तिमत्त्व उलगडत जातो; पण काही ठिकाणी हा एकटेपणा वयकेंद्रित होतो, तर काही ठिकाणी तो अपेक्षा-अपेक्षाभंग या पातळीपर्यंतच मर्यादित राहतो. त्यामुळे एकटेपणा ही वेगळेपणाची अपरिहार्य बाजू म्हणून न येता, तो एकच एक घटक उरतो. त्यात वेदनानुगामी सहनशीलता, सामान्यत्वाबाबत सामंजस्य दिसत नाही. त्यामुळे तो अधिक व्यक्तिकेंद्री होत जातो; पण तरीही स्त्री म्हणून स्वतंत्रता आणि सर्जनशीलता या दोन्ही वैशिष्ट्यांच्या बळावर एकटेपणा या भावनेसंदर्भात आलेल्या कविता महत्त्वाच्या ठरतात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

परुळेकर विविध प्रकारची पार्थिव-अपार्थिव नाती हाताळताना दिसतात. त्यांतील ताण, घुसमटही त्यांनी नेमकेपणाने पकडली आहे. मात्र या नात्यांमधील सूक्ष्म निरीक्षण जितके भेदक आहे, तितके त्यांमागील सामंजस्य व्यापक नाही. किंवा त्या सामंजस्याचा निश्चित विकासक्रम आढळून येत नाही. त्यामुळे नात्याचा संपूर्ण आवाका पकडीत येत नाहीसे वाटते. तरीही हर एक नातेसंबंधाचा उभा-आडवा छेद घेताना त्याचा तळ शोधण्यामागे घडणारी ही प्रक्रिया निश्चितच लक्षणीय व महत्त्वाची ठरते.

परुळेकर यांनी विविध मूलभूत नैसर्गिक प्रेरणांची आशयघन, टोकदार आणि तरल रचना केलेली दिसते. त्यामुळे त्या-त्या प्रेरणांचे मूलभूत भाव अथवा जाणिवा नेमकेपणाने प्रस्थापित होतात, तसंच या जाणिवा केवळ प्रभावी न ठरता परिणामकारक व अधीक गहिऱ्या होत जातात.

आपल्या कवितांतून परुळेकर मानवी नात्यांतले सुप्त क्रौर्य, राजकारण व अहं याचे दर्शन घडवतात. वास्तवाच्या पार्श्वभूमीवर नात्याच्या तद्दन कल्पना व कृतीसंबंध तासले जात असल्याने ही कविता अधीकाधीक सघन होत जाते. महानगराच्या वस्तु-सुविधा-लोलुप पार्श्वभूमीवर नात्यांचं भयावह व विकृत स्वरूप या कवितांतून नेमकेपणाने समोर येतं. नातेसंबंधांचा छेद घेता घेता या कविता व्यक्तिमत्त्वातलं खोल दुभंगलेपण उघड करत जातात. या सगळ्यात भोवतालपासून सततची तुटलेपणाची जाणीव व नातेसंबंधांच्या निर्मळ बंधाची घुसमट कवितांच्या अग्रभागी आहे. त्यामुळे काही ठिकाणी नात्याचं एकतर्फी आदर्श चित्र रेखाटून व नात्याच्या मर्यादित जाणिवा चित्रित करूनही ही कविता नात्यातील बोचऱ्या जागांवर अचूक बोट ठेवते.

परुळेकर यांच्या नैसर्गिक प्रेरणेसंदर्भातल्या कविता माणसाच्या मूळ नैसर्गिक प्रेरणा केंद्रस्थानी आणतात. त्यामुळे त्या संपूर्ण संरचनेवर या प्रेरणांचे पडसाद उमटत राहतात. उदा. मृत्यू या नैसर्गिक प्रेरणेचा विचार करता, जन्म-मृत्यूची प्रक्रिया त्या समोरासमोर आणतात. त्यामुळे या दोन्ही प्रक्रियांतील अंतर कमी होऊन या प्रेरणेची भयावहता वाढते व ती कवितेच्या तपशिलांतून पसरत जाते. या कवितांमध्ये मुख्यत: नैसर्गिक प्रेरणा केंद्रस्थानी असल्याने समाज-चौकटीतून उत्पन्न झालेल्या योग्य-अयोग्यतेच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन ही प्रेरणा उभी राहते. त्यामुळे कवितेची पातळी बदलते.

तसेच विस्कळीत वास्तवाच्या पार्श्वभूमीवर निव्वळ निसर्ग होऊन या प्रेरणा वाचकाचा कब्जा घेतात. आदिम, ऊर्जास्थित रूपांतून जिवंत राहण्याची व वाहण्याची प्रबळ प्रेरणा या कवितांत आहे. अनेक कवितांचे शेवट नैसर्गिक प्रेरणा विरुद्ध व्यावहारिक प्रश्नचिन्ह म्हणून उभे राहत असल्याने परिणामकारक ठरतात. रजनी परुळेकर यांच्या नैसर्गिक प्रेरणासंदर्भातल्या कविता मृत्यू, उत्कटता, मातृत्व, नैतिकता, स्त्री-पुरुष संबंध अशा हर एक भावनेचा तळ शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रसंगी कर्कश अथवा आघातीपणाचा धोका पत्करूनही व्यावहारिक जाणिवांच्या पार्श्वभूमीवर त्या वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.

परुळेकर यांच्या तीनही संग्रहातील अनेक कविता स्त्री-पुरुष संबंधांचा वेध घेणाऱ्या आहेत, परंतु त्यांच्या अगदी मोजक्या कविता स्त्री-पुरुष प्रेमाबद्दल काही बोलू पाहतात. विशेषत: या कविता फारकतींतून उत्पन्न होणाऱ्या विभ्रमांबद्दल बोलत राहतात. या कवितांतून नात्यातले घट्ट बंध प्रतीत होतात; पण कवितांत फारकतीतून येणारा आक्रोश कुठेही नाही. त्या निव्वळ वेदनेने व्याकूळ आहेत. म्हणूनच त्या परिणामकारक ठरतात. स्त्री-पुरुष प्रेमाचा आदिम शोध या कविता घेऊ पाहत असल्याने अनेकदा या प्रेमाकडे व्यापक परिप्रेक्ष्यातून बघण्यात असफल ठरूनही निखळ स्त्री-पुरुष नात्याच्या ओढीपायी त्या सार्थ ठरतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

परुळेकर यांच्या तिन्ही संग्रहातील दीर्घ कवितांच्या आशयसूत्रांचा विचार केल्यास त्यांच्या कवितांत आशयसूत्रांचे वैविध्य मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र ‘दीर्घ कविता’ या रूपबंधात असलेल्या पटाच्या अवकाशाचा आणि प्रयोगशील बांधणीच्या मुभेचा विचार करता, त्यांची आशयसूत्रे विस्तारताना दिसत नाहीत. महानगरीय आविष्काराच्या पार्श्वभूमीवरच ती कायम राहतात व त्यातीलच संकल्पना, प्रश्न अथवा संबंधांच्या आवर्तात फिरत राहतात. त्यामुळे त्यांच्यातील खुल्या शक्यतांना अवसर प्राप्त होत नाही आणि आशयाची घनता मर्यादित होते. ‘अनुभूतीचा एक क्षण कवेत घेऊन तो आंदोळत बसण्याची तिची (या कवितेची) वृत्ती आहे. जाणिवांचे क्षेत्र फार चिंचोळे आहे, स्त्रीच्या कवितेची स्वत:ची अशी भाषा नाही आणि प्रतिमांचा शोध नाही,’ हे प्रभा गणोरकर यांचे मत म्हणूनच सार्थ ठरते.

आशयसूत्राप्रमाणेच रूपबंधाचा विचार करता, रूपबंधाच्या बाबतीत मात्र त्यांनी लय आणि आविष्कारांचे अनेक प्रयोग केलेले दिसतात. कवितेतली दृश्यात्मकता, नाट्यमयता, शब्दांपेक्षा निव्वळ विशिष्ट लयीवरच पेलली जाणारी कविता असे अनेक प्रयोग दीर्घ कवितेच्या परंपरेला पोषक ठरणारेच आहेत; परंतु तरीही कथनशक्यतांच्या तुलनेत या प्रयोगांची एकत्रित संयुगक्षमता कमी पडल्यासारखी भासते. उपलब्ध कथनांच्या प्रभावी वापराबरोबरच त्यांच्यातील परिणामकारक शक्यतांचा शोध, मोडतोड आणि त्यातून नवीन विविध आविष्करणांपर्यंतचा प्रवास या रूपबंधांतून आकाराला येताना दिसत नाही. त्यामुळे कथनसूत्रांचे एकत्रित कथन त्या सशक्तपणे सादर करू शकत असल्या, तरीही त्यांतून नवीन रसायन साधण्याच्या संदर्भात त्या मर्यादित ठरतात. मात्र एकूण परंपरेच्या संदर्भात दीर्घ कवितेच्या रूपबंध व आशयसूत्रांना या कवितांनी दिलेली देणगी निश्चितच उल्लेखनीय आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका भाग्यश्री भागवत ग्रंथसंपादक असून त्यांनी ‘रजनी परुळेकर यांची दीर्घ कविता’ या विषयावर पुणे विद्यापीठात एम. फील केली आहे.

bhagyashree84@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा