विवेक हरवलेला, नागरिकांच्याच मुळावर उठलेला हा काळ आहे. तो पुस्तकांचा शत्रू आहे, ज्ञानाचा शत्रू आहे. समता, स्वातंत्र्य, इतिहास, सत्य यांचा वैरी आहे
पडघम - साहित्य संमेलन विशेष
गणेश विसपुते
  • १६व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते आणि संमेलनाचे बोधचिन्ह
  • Sat , 23 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 16th Vidrohi Marathi Sahitya Sammelan गणेश विसपुते Ganesh Visputay

उदगीर, जि. लातूर इथं आजपासून १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुरू झाले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष मराठीतील प्रसिद्ध कवी गणेश विसपुते आहेत. त्यांच्या भाषणाचा हा तिसरा आणि शेवटचा भाग...

..................................................................................................................................................................

विवेकाची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आपल्याला विद्रोहाची कास धरावी लागते. गेल्या ऑगस्टमध्ये एजाज़ अहमद यांचं एक व्याख्यान झालं होतं. त्यात त्यांनी आजच्या काळाचं सार्थपणे वर्णन करतांना म्हटलं होतं- “विवेकी भाषा आणि अविवेकी भाषा यातली सीमारेषा पुसून गेली आहे. सत्य भाषा आणि असत्य भाषा यातली रेषा पुसली आहे. कोण बोलतो यावर सत्य ठरतं. गेल्या २०० वर्षात तराजूचा काटा विवेकाच्या विरुद्ध आणि अविवेकाच्या बाजूनं प्रथमच ढळला आहे. राजकारण, धर्म, मास मीडिया अशा सर्वच क्षेत्रांत... आधुनिक समाजाला असलेल्या ३-४ मोठ्या धोक्यांमध्ये मीडियाचा समावेश होतो. वास्तव, सत्य यावर आधारलेली मानके मोडली आहेत. सरकार, मिडिया, वकील, पोलीस हे उदाहरणार्थ मुस्लिमांचे कसे चित्र रेखाटतात, पहा. डोळ्यांना दिसतं त्याहून विपरीत समज सत्ताधारी निर्माण करतात आणि उदारमतवादी लोकशाहीच्या संस्था ते विनातक्रार स्वीकारतात, हे अनाकलनीय आहे. सर्वत्र दैनंदिन क्रौर्याचं साम्राज्य पसरलं आहे.’

अविवेकाचा प्रादुर्भाव आता केवळ उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांपुरताच सीमित राहिलेला नसून तो इतर जातींमधल्या वर्गापर्यंतही पोहोचलेला आहे. या बहुजन जातीतलेही आता अविवेकाचे समर्थक झाल्याचे दिसते. प्रगतीशील म्हणवले जाणारे वेगवेगळे समूह चिरफाळलेले आहेत. कम्युनिस्ट, समाजवादी, दलित या सगळ्यांच्या अस्मिता टोकदार झाल्यानं जोतिबा फुल्यांच्या कल्पनेतला एकमय लोक कसा निर्माण होणार? त्यामुळे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली असून त्या मूलतत्त्ववाद्यांनी लावलेले सापळे, दाखवलेली आमिषं आणि विषारी प्रचारांनी भरवलेली डोकी कारणीभूत आहे. हे मूलतत्त्ववाद्याचं, जमातवाद्याचं यश आहे. जमातवाद्यांनी आता त्यांना जी अपकृत्यं करवून घ्यायची आहेत, जो अनाचार करायचा आहे, त्यासाठीचं माध्यम म्हणून त्यांनी बहुजनांमधलेल्यांनाच चलाखीनं कामाला लावलं आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

घराघरात, नात्यांमध्ये, सोबत्यांमध्ये दऱ्या निर्माण झाल्या आहेत. कुटुंबांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये सर्वंकषवादातली विषारी मेख समजणारे आणि ती बोलून दाखवायचा प्रयत्न करणारे एकटे पडत आहेत, हद्दपार केले जात आहेत. ह्या प्रकारचा विचार करणारे कवी, लेखक, रंगकर्मी, चित्रपटलेखक बाजूला फेकले जात आहेत. आणि द्वेष पसरवणारे सिनेमे बनवणारे राजाश्रय, पुरस्कार मिळवून बसले आहेत.  

बहुजनांच्या सशक्त संस्कृतीचा विकल्प

अश्या परिस्थितीत काय करायचं? महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कॉ. शरद् पाटलांपर्यंत अनेकांनी आपल्याला यावरचा उतारा सुचवलेला आहे आणि तो आजही प्रस्तुत आहे. जोतिबा फुले म्हणतात त्याप्रमाणे शूद्रातिशूद्र, स्त्री आणि आदिवासी अशा सर्व समुदायांचं अब्राह्मणी तत्वज्ञानाने प्रबोधन करणे हाच त्यावरचा इलाज आहे. हे करताना त्यात एक अशा धर्मनिरपेक्षतेची आपल्याला आवश्यकता आहे, जी वर्गविरोधी तर असेलच, पण ती भारतीय संदर्भात मुख्यतः जातविरोधी आणि स्त्रियांच्या हक्काचा हिरीरीनं विचार करणारीही असेल. म. जोतिबा फुलेंच्या आयुष्यभराच्या कामाचा जो मोठा प्रकल्प होता तो प्रस्थापित, शोषक, असहिष्णू आणि अन्याय्य अशा संस्कृतीला बहुजनांच्या समांतर आणि सशक्त संस्कृतीनं विकल्प देणं. जोतिबा फुलेंनी इथल्या समाजातल्या हिणाचं, अन्यायाचं मर्म ओळखलं होतं. सगळ्या प्रश्नांचा समग्रतेनं विचार करून त्यांनी या प्रस्थापित संस्कृतीला पर्याय उभा करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी ते संघर्ष करीत राहिले. अब्राह्मणी प्रबोधनातून अब्राह्मणी संघर्ष उभा करणं, त्यासाठी व्यापक चळवळ उभी करणं या त्यांच्या विलक्षण विचाराची आणि त्यातून ते जे ‘एकमय नेशन’ची कल्पना मांडतात, ती आजच्या काळात पुन्हा निष्ठेनं अनुसरण्याची अत्यंत गरज आहे. सध्याच्या जमातवादाला, मूलतत्त्ववादाशी भिडण्यासाठी त्याची आवश्यकता आहे.

सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर जोतिबांनी आपला रोख निश्चित केलेला होता आणि या दोन्ही गोष्टींत त्यांना आमूल परिवर्तन अपेक्षित होतं. सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, सामाजिक अधिकार मिळावेत यांसाठी ते निव्वळ मागणी करत नव्हते तर तो त्यांचा आग्रह होता. ही डिमांडेड दॅट. एकोणिसाव्या शतकात स्थिरावलेल्या ब्राह्मणी संस्कृतीच्या वसाहतवादाला घालवण्याचे त्यांचे प्रयत्न होते. कारण समाजाची संस्कृती एकजिनसी, एकरंगी नसते हे ते जाणत होते. म्हणूनच बहुलतावादाला, समतेला, बंधुतेला ते प्रक्षेपित करीत राहिले. त्यांचं आकलन समग्रतेनं असल्यानं त्यांची बंधुतेची कल्पनाही विश्वबंधुत्वाची होती. ‘ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी ।। धरावे पोटाशी ।। बंधूपरी ।।’ असे ते सर्वांना बंधुभावाने कवटाळू पाहात होते.

आजच्या सांस्कतिक राष्ट्रवादाच्या उन्मादी अतिरेकाच्या काळात जोतिबांनी वापरलेल्या साधनांचाही आपल्याला विचार करावा लागेल. फुल्यांनी परंपरेतले अभंग, पोवाडे, जलसे, प्रश्नोत्तरांचे रूपबंध आपल्या खास श्रमिकांच्या भाषेत घडवून स्वभाषेचा जोरकस ठसा उमटवला. त्यांच्या भाषेत संस्कृत-फारशी-गुजराती-हिंदी वाक्यरचना आणि म्हणी येतात. इंग्रजी पद्धतीच्या मराठी वाक्यांत खास गावठी मराठी लयीतले शब्द डोकावतात. लोकसमूहांनुसार त्या त्या लोकांसाठीची बोली ते वापरतांना दिसतात. त्यांनी वापरलेली ठेवणीतली विशेषणं आणि खास शिव्यांचा तर स्वतंत्र अभ्यास होणं आवश्यक आहे. त्यांचं लेखन वाचताना आपल्याला लक्षात येतं की, तत्कालीन जागतिक सांस्कृतिक घडामोडींची अद्यावत माहिती ते ठेवत होते, होमर, शेक्सपिअर आणि मुस्लीम-ख्रिश्चनांचे धर्मग्रंथ, मराठी-हिंदी संतकाव्यं, जैन-इस्लामची तत्त्वज्ञानं, समकालीनांचं साहित्य तसेच इतिहास आणि भारतविद्येचे ग्रंथ यांचं त्यांनी सूक्ष्म वाचन केलेलं होतं. त्यातून आपली धारदार भाषा घडवली होती आणि ती त्यांनी आपल्या कार्यात त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर-लोकहितार्थ आणि शेतकऱ्यांच्या बचावासाठी वापरली. भाषेबद्दल जोतिबा किती जागरूक होते आणि भाषेमागचं राजकारण त्यांनी किती बारकाईनं समजून घेतलं होतं हे कळल्यावर असं वाटतं की, ते विसाव्या शतकात असते तर भाषाशुद्धीसारख्या विभेदनवादी प्रकाराची त्यांनी कठोरपणे चिकित्सा केली असती. ब्राह्मण्याची त्यांनी केलेली चिकित्सा ही त्यांना सामाजिक गुलामगिरीविरुद्ध विद्रोह करणारा पहिला क्रांतिकारक विचारवंत ठरवते. ब्राह्मण्याविरुद्ध युद्ध पुकारलेले असतांनाही त्यांचा ‘शत्रू-मित्र विवेक’ ते विसरत नाहीत, कारण त्यांना मोठ्या शत्रूचं स्पष्ट आकलन झालेलं होतं. डोंगरी तुरुंगातून टिळक-आगरकरांची सुटका झाल्यावर त्यांचा ते सत्कार करतांना दिसतात तसेच दयानंद सरस्वतींच्या सत्कारप्रसंगी उद्भवलेल्या अरिष्टाला आपल्या फौजेनिशी मदत करायला न्यायमूर्ती रानडेंच्या मदतीलाही धावून जातात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

फुलेंनी एकूण सामाजिक व्यवस्थेचा समग्रतेनं विचार केला होता. भांडवलशाही आणि धर्मव्यवस्था या किती शोषणव्यवस्थांना जन्म देतात हे नेमकं ओळखलं होतं. तत्कालीन सुधारकांपैकी अनेकांनी प्रामाणिक प्रयत्न केले असले तरी त्यांच्या उदारमतवादाचा परीघ ब्राह्मण व उच्चवर्गीयचांपर्यंतच होता. धर्मविषयक त्यांनी वापरलेल्या संज्ञाही (हिंदू, आर्य इ.) ढिसाळ असल्याने त्या विसाव्या शतकातल्या हिंदुत्त्ववाद्यांच्या पथ्यावर पडल्या. हिंदू आणि ख्रिश्चन, हिंदू आणि मुसलमान अशा प्रकारे विचार झाल्यानं त्याचा फायदा केवळ उच्चवर्णीयांना झाला आणि त्यातच त्यांचा मतलबही होता. त्यांनी मांडलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादातच दुहीची बीजं होती. याउलट जोतिबा जे द्वैत मांडतात त्याचा त्यांनी साकल्यानं विचार केलेला दिसतो. अभिजन आणि बहुजन किंवा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा भेद करतांना त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या होणाऱ्या पिळवणूकीला लक्ष्य केलं होतं. त्यांनी ज्यांचा उल्लेख वारंवार केलेला आहे ती नावं म्हणजे शिवाजी, महंमद, येशू ख्रिस्त, बुद्ध, बळी, बृहस्पती. जोतीबांनी निर्माण केलेली ही मिथकं आजही मूलतत्ववाद्यांना अडचणीची वाटतात, त्यावरून आजच्या संघर्षात फुल्यांनी दिलेली दिशा किती महत्त्वाची होती हे लक्षात येईल. प्रस्थापित सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विरोधात ते  त्यांच्या कार्यातून, लेखनातून आणि प्रतीकं-मिथकातून नवी जीवनदृष्टीच देत होते.

आज आपण भयंकराच्या दारात येऊन उभे राहिलो असतांना ती आपल्याला पुन्हा दिशादर्शक ठरू शकते. मूलतत्त्ववादी विचारांमध्ये स्त्री ही सर्वात शोषित असते. जोतिबांनी समतेचा विचार मांडतांना सर्व वर्ण-वर्गातल्या स्त्रीला सुद्धा विचारात घेतलं होतं. विषमतेला नकार देतांना जोतीबा स्त्री-पुरुष सर्वांचा एक घटक म्हणून विचार करतात. ते समाजाचा एक भाग म्हणून विचार करण्याअगोदर एकेका व्यक्तीला समतेची संधी मिळायला हवी असा आग्रह धरतात. फाशिस्ट, हुकूमशाही व्यवस्थेत नेमकं याउलट असतं. झुंडी आणि समूह म्हणून ओळखी उरलेल्या असतात. आजच्या काळात हाही फरक लक्षात ठेवायला पाहिजे.

जोतीबांनी आपला वैकल्पिक संस्कृती उभारणीचा प्रकल्प मांडला त्या आधुनिक विचारात परंपरेतील सत्वशील तत्त्वं आणि नवतेचा स्वीकार केलेला दिसतो. त्यांच्या या अब्राह्मणी आधुनिकतेचा विचार म्हणूनच आजच्या काळातही तितकाच प्रस्तुत आणि सार्थ आहे. जमातवाद हा जातीय आणि धार्मिक अस्मितेला खतपाणी घालून आपला मतलब साधतो हे त्यांनी जाणलेलं होतं. त्यामुळे आजच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला तोंड देण्यासाठी त्यांनी जे नेमकं सर्वसमावेशक पर्यायी ठोस प्रारूप उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यावरूनच आपल्याला आपल्या संघर्षाची दिशा ठरवावी लागणार आहे. फक्त त्याच्यासाठी परस्परांतील कलह, जाती-जातीच्या टोकदार अस्मिता, फालतू अहंगंड, विसरून, वेगवेगळ्या दिशेला झालेली तोंडं सामोरी करून खुलेपणा स्वीकारला पाहिजे. प्रगतीशील समूह जाती-जातींच्या अस्मितांनी चिरफाळले गेले आहेत. असहमतीतून सहानुभाव, परिवर्तनशीलता आपण अंगिकारणं गरजेचं आहे. सद्यकालीन मोठे धोके ओळखून कॉ. पानसरेंनी सांगितलेल्या शत्रू-मित्र विवेकाचं भान ठेवून आपल्याला साथीनं उभं राहणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या काटेकोरपणे एक कार्यक्रम ठरवणं, या नव्या दृष्टीनं त्याची तातडी पटवून देणं करावं लागेल. आता अटीतटीची, कडेलोटाची वेळ आलेली आहे. आता आलेलं संकट सभ्यतेवरचं संकट आहे. ते ओळखलं तरच आपण जागे झालो असं म्हणता येईल. संकट जागतिक आहे. माणूस हा केंद्र धरून केलेल्या विवेकी विचारांनी वर्चस्ववादाला प्रतिवर्चस्ववादी चळवळीचा कार्यक्रम आखूनच मुकाबला करता येणार आहे. त्यासाठी भपकेदार इव्हेन्ट्स, उत्सवी बाजार टाळून लहान लहान आणि सुट्या सुट्या सातत्यपूर्ण कार्यक्रमांची गरज आहे. प्रगतीशील विचारांतल्या अस्मितेच्या मुद्यांवरून चिरफाळलेल्या समूहांनी एकत्र येऊनच हा विचार करावा लागेल. अन्यथा नंतर अस्तित्वाच्या कडेलोटाची वेळ येईल.

मानव सभ्यतेवरचं अरिष्ट आणि संस्कृतीची लोकशाहीवादी बीजं

जगभरच्या सामाजिक-राजकीय घडामोडी पाहाता आपल्या मानव म्हणून असलेल्या सभ्यतेवरच जमातवादाचं, मूलतत्त्ववादाचं, वंशवादाचं अरिष्ट आलेलं दिसत आहे. तिकडं कृष्णवर्णीय लोकांशी श्वेतवर्णीयांचं वर्तंन अत्यंत अमानुष झालेलं आहे. अलीकडे जॉर्ज फ्लॉईड याला पोलिसांनी  त्याच्या गळ्यावर गुडघा दाबून ठार मारलं.  त्याचा श्वास कोंडला होता. दहा मिनिटं तो ‘आय कान्ट ब्रीद’ असं म्हणत राहिला. अन्यायी, राक्षसी आणि अमानुष व्यवस्था वंचितांना, वर्जितांना विकल बनवू पाहाताहेत. मूक करू पाहाताहेत. संपवू पाहाताहेत. ही मानवी सभ्यता नाही.

संस्कृती ही कधीही एकसाची, एकरंगी अशी व्यवस्था नसते. ती तिच्या पोटातल्या विविध मताचं-रूपांचं-वादविवादांचं, वितंडांचं, असहमतींचं, सुसंवादांचं सरमिसळ झालेलं रूप असतं. अनेक लोक, अनेक मतं, विचार, वंश, भाषा, धर्म अशा अनेक संस्कृती मिळून भारताची सभ्यता निर्माण झालेली आहे. प्राचीन काळात सुमेरिअन, इजिप्शिअन वगैरे ज्या मोठ्या सभ्यता निर्माण झाल्या, त्यात भारताची सभ्यता ही महत्त्वाची आहे.

इथं मराठवाड्यात किती धर्म आणि संप्रदाय आणि चळवळी झाल्या. कोणत्याही धर्मात हिंसेला, अत्याचारांना परवानगी दिलेली नाही. भक्ती चळवळ आणि इथला सूफी संप्रदाय हे आपलं सांस्कृतिक संचित आहे, वारसा आहे. आपल्या संस्कृतीच्या समृद्धीत त्यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे. इथल्या भक्ती चळवळीतूनच उत्तरेतल्या संतकवींनी प्रेरणा घेतली. मंडन-खंडन-वितंडा अशी आपली वादविवादाची परंपरा होती. तित इतरांच्या वेगळ्या विचाराला, टीकेला जागा होती. संस्कृतीतच कलांची, साहित्याची, विचारांची, ज्ञान आणि तत्त्वज्ञानांची, सहमती-असहमतींची  आणि  विरोधांची असंख्य रूपं निर्माण होत असतानाच ती संस्कृतीला संपन्न करीत असतात. एकच एक विचार, एकाच पद्धतीचा आहार, एकाच पद्धतीची भाषा, जीवनदृष्टी असं काही संस्कृती स्वीकारत नाही. संस्कृतीतच लोकशाहीची बीजं असतात. कारण याच संस्कृतीत संतांनी, धुरीणांनी, विचारवंतांनी, संतांनी सवाल करण्यासाठीचे पायंडे पाडून ठेवलेले आहेत. सगळे प्रवाह स्वीकारत लोकशाहीची तत्त्वं सामावून घेत बहुलतावादी रूपातच संस्कृतीचं चरित्र घडत असतं. त्याचं सद्यपरिस्थितीत कधीही विस्मरण होऊ न देणं ही आपली जबाबदारी आहे. कर्तव्य आहे. भक्ती आणि सूफी चळवळींनी आपल्याला दिलेला संदेश आणि छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, वि. रा. शिंदे, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनी आपल्याला दिलेली प्रश्न विचारण्याची, चिकित्सा करण्याची, समतेची, करूणेची आणि न्यायाची शिकवण आज कधी नव्हे ती निष्ठेनं अंमलात आणण्याची गरज आहे. कारण तो मानुषतेचा संदेश आहे. कारण तो लोकतंत्राचा पायाभूत विचार आहे.

मित्रहो, समकालाविषयी बोलतांना मी खूपच दुःस्वप्नकारक गोष्टींचे दाखले दिले ते त्यामुळे निराश आणि हतबल होण्यासाठी नव्हे, तर मुळात रोग काय आहे, याचं निदान तुमचं तुम्हाला करता यावं म्हणून दिलेले आहेत. लेखकासाठी आजचा काळ अनेक स्वातंत्र्याचे संकोच झाल्याचा काळ आहे. पण लेखकाला अस्वस्थ वाटत राहाणं ही त्याच्या लेखक असण्याची मूळ अटही असते. मुनीर नियाजी नावाचा शायर म्हणतो तसं,

बेचैन बहुत फिरना, घबराये हुए रहना

इक आग़ सी जज़्बों की दहकाये हुए रहना

हे केल्याशिवाय लिहित्या लेखक-कवीला इलाज नसतो. ‘जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची । तया भोजनाची रूचि प्राप्त कैची’ असं स्वतः प्रत्यक्ष वास्तवाचा उलगडा होऊन अस्वस्थ व्हायचं आणि इतरांनाही अस्वस्थ करत राहायचं हे लेखकाचं काम असतं. नोबेल पुरस्कार स्वीकारतांना ग्युंटर ग्रास या थोर जर्मन लेखकानं सांगितलं होतं- “भूतकाळात सुखानं राहू द्यायचं नाही हे लेखकपणाच्या (कलावंत असण्याच्या) व्याख्येत अनुस्युत असतं. सतत भूतकाळाविषयी बोलणारे हे लोक बुजलेल्या जखमा उघड्या करतात. बंद दारांतून आत डोकावतात. कपाटांत दडवलेले सांगाडे शोधतात. सगळ्यात वाईट म्हणजे ते विजयी बाजूच्या मतांशी जोडून घ्यायचं नाकारतात. ते विजयांवर प्रश्नचिन्हं उमटवत राहतात.” हे लक्षात ठेवायला हवं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भारतात प्रादेशिक भाषांचा एकूण व्यवहार फार मोठा नसतो. मराठी भाषेचंही आपलं साहित्यिक व्यवहाराचं जे जग आहे. तेही लहानसं आहे. तिथले बहुतेक व्यवहार ओळखी-पाळखींवर चाललेले असतात. मोठ्या कळीच्या प्रश्नांवर सहसा इथं मौन पाळलं जातं. १९९२, २००२, २००७ सारख्या घटना घडतात. त्यावर फारसे तरंग मराठी साहित्यात उमटत नाहीत. तिकडं हिंदी जगतात याच विषयावरच्या कवितांचे मलयश्री हाशमी दोन खंड प्रकाशित करतात. मिया कवितेचं आंदोलन होतं. असमी-बंगाली भाषेतले कवी-कलावंत-चित्रपट-नाट्य कलावंत त्यावर आपापल्या माध्यमातून अभिव्यक्त होतात. 'कागज़ नहीं दिखाएंगे' अशी घोषणा त्यांच्या व्यक्त होण्यातून दिसते. मराठीत थंडगार शांतता असते. लेखकांच्या तीन-चार पिढ्या एकाच वेळी मराठीत असतांना फारसे आवाज न उठता मौन अबाधित राहातं. मुक्तिबोध म्हणतात तसं,

सब चुप, साहित्यिक चुप और कविजन निर्वाक् 

चिंतक, शिल्पकार और नर्तक चुप हैं

याच कवितेत मुक्तिबोध मध्यम वर्गाचं-- जो तथाकथित बौद्धिक वर्ग आहे त्याचं वर्णन क्रीतदास असं करतात. क्रीतदास म्हणजे विकला गेलेला गुलाम. जो ७० वर्षांतल्या कल्याणकारी राज्यातल्या फायद्यांची फळं चाखून स्थिरस्थावर होऊन आता वर डोळे लावून खालच्या वर्गातल्या लोकांचा द्वेष करीत आणि सर्वंकषवादी सत्तेचा आंधळा, विखारी विद्वेष पसरवण्यात अतिशय सक्रीय आहे. यांना ब्राह्मणेतरांतील वर्ग आणि दलितांमधीलदेखील काही वर्ग सामील आहेत. यांच्याच खांद्यावर बंदुका ठेऊन प्रस्थापित व्यवस्थेला त्यांची दुष्कृत्यं करवून घेता येत असतात.

त्याचबरोबर जे कोणी सत्तेशी सलगी करत राहिलेले विद्वान, विचारवंत, कवी, समीक्षक अशा लोकांनाच उद्देशून बहुधा मुक्तिबोधांनी लिहून ठेवलेलं आहे-

अब तक क्या किया,

जीवन क्या जिया,

ज़्यादा लिया और दिया बहुत-बहुत कम 

मर गया देश, अरे, जीवित रह गए तुम।"  

बैंड के लोगों के चेहरे 

मिलते हैं मेरे देखे हुओं से 

लगता है उनमें कई प्रतिष्ठित पत्रकार 

इसी नगर के !!

बड़े- बड़े नाम अरे, कैसे शामिल हो गए !!

उनके पीछे चल रहा 

संगीन नोकों का चमकता जंगल,

चेहरे वे मेरे जाने बूझे से लगते 

उनके चित्र समाचार पत्रों में छपे थे,

उनके लेख देखे थे,

यहाँ तक कि कविताएँ पढ़ी थीं 

भई वाह !

उनमें कई प्रकांड आलोचक, विचारक, जगमगाते कविगण 

मंत्री भी, उद्योगपति और विद्वान 

यहाँ तक कि शहर का हत्यारा 

डोमाजी उस्ताद। 

(मुक्तिबोध रचनावली-२, पृ. ३२८-३०)

अशा प्रकारचे मौन पाळत राहाणारे आणि पाळतखोर सत्तेला भिऊन असणारे जे लोक आहेत ते वास्तवाला केवळ कॅमेऱ्याच्या निर्ढावलेल्या भिंगासारखे आहेत. वास्तवाचं पृथःकरण न करताच आहे तसं प्रतिबिंबित करणारे आहेत.

मला इथं मला अरुण कोलटकरांची 'क्यामेरा' ही कविता आठवते. त्यात ते कॅमेऱ्याला भिंग घाश्या संबोधत म्हणतात- “तुझ्यात दोन गोष्टी नाहीत। स्मृती।आदल्या चौकटीची। आणि अश्रुग्रंथी।कितीही दुःख पाहिलं तरी तुझं भिंग पाणावत नाही। दुःख पाहून तू द्रवत नाहीस। पण दुसऱ्याच्या डोळ्यातला अश्रू कसा टिपावा । तो न पुसता न खाली पडू देता। हे तुला चांगलं माहीत आहे।”

कोलटकरांची ही कविता वेगळ्या व्यथेची आणि वेदनेची कविता असली तरी ती प्रतिमांच्या सृष्टीतले आपण कॅमेऱ्यासारखे निर्जीव अलिप्त असे झालेल्या बघ्यांनाही लागू होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला फ्रान्समध्ये सैन्यातल्या देफ्रस नावाच्या ज्यू अधिकाऱ्याला न केलेल्याही गुन्ह्यासाठी राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून टाकून, तसा गुप्तपणे खटला चालवून त्याला गुन्हेगार जाहीर केलं गेलं होतं. तिथले लेखक, कवी, शिक्षक, पत्रकार वगैरेंनी एका सूरात त्याचा निषेध केला. सैन्याचा आणि सरकारचा धि:कार केला. न्याय, समता या गोष्टी धर्मनिरपेक्षतेनं सर्वांना मिळायला हव्यात हा त्यांचा आग्रह होता. एमिल झोलानं तेव्हाच ती प्रसिद्ध पुस्तिका लिहिली- ‘ज्यक्यूज़’ (मी आरोप करतो की-). या रेट्यामुळे देफ्रसची मुक्तता झाली. कारण तेव्हाचे लेखक डोळस, बोलू शकणारे आणि एकूणेक आवाज ऐकता येतील एवढ्या तीक्ष्ण कानांचे होते. कारण ते मौन बाळगणारे नव्हते. त्याचसाठी मीर तक़ी मीर कवींना उद्देशून जो एक इशारा देतो- शायर हो, मत चुपके रहो, अब चुप में जानें जाती हैं.

आणि हा इशारा समजून त्याला प्रतिसाद देणारेही काही लोक आहेत. बरेच असे लोक आहेत जे अजुन मुके झालेले नाही. बरेच असे लोक आहेत जे बोलत आहेत. सकारात्मक उन्मेषांची कितीतरी उदाहरणं आहेत जी या परिस्थितीतही हिंमत देत आहेत. महामारीच्या काळात पंजाबमधल्या शीख-स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर उन्हा-पावसात-कडाक्याच्या गारठ्यात जे आंदोलन केलं ते इतिहासातलं इतका काळ लांबलेलं लोकशाही अहिंसक आंदोलनाचं विलक्षण उदाहरण होतं. उत्तर भारतात विद्यार्थांनी बेरोजगारी आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या अव्यवस्थेविरुद्ध जो संघर्ष उभा केला होता तो प्रश्न पडू पाहणाऱ्यांसाठी उत्साहवर्धक होता. सीएए-एनआरसी विरोधात दिल्लीतल्या शाहीनबागमधला  निकराचा लढा भारतभर प्रेरणा देणारा ठरला. असंख्य ठिकाणी शाहीनबाग आंदोलनाला पाठिंबा देणारी त्याच धर्तीची आंदोलनं झालेली दिसून आली. देशभर त्यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या प्रचंड होती जी माध्यमांमधून दिसत नव्हती. अहिंसेनं, ठामपणे, संविधानाला सर्वोपरी मानून हा जो संघर्ष होता, तो संवेदनशील नागरीकांच्या आदराला पात्र ठरला होता. त्यानं विवेक, सत्यावरची निष्ठा आणि विद्रोहातलं सौंदर्यही दाखवलं.

त्या दरम्यान लोककलेचे, दृककलेचे कितीतरी प्रकार सार्वजनिक पातळीवर राबवले गेले होते. अशी कला आपल्या काळाशी जोडलेली आणि भिडलेली असते. ग्राफिटी, घोषणा, पोस्टर, गाणी आंदोलनाच्या जागी केलेली वैविध्यपूर्ण सजावट, चित्रं, कविता ह्यातून अनेकानेक प्रकारे समाजानं सत्तेला प्रश्न विचारले. पण ते प्रश्न कायम लोकशाहीवादी मार्गांनी विचारले. हजारो लोक एकत्र असताना तिरंगा, राष्ट्रगीत आणि एकत्र पंगतीत जेवणे असे नवेच प्रकार आपण गेल्या दोन वर्षात पहिले. असंख्य तरुणांची अस्वस्थता दिसत नाही, पण ती आहे. कारण विरोधाचा कोणताही स्वर ऐकू-दिसू द्यायचा नाही अशा व्यवस्थेत या तरुणांना भविष्य दिसतंय, जे अनिश्चित, बेभरवशी आहे. ते आपापल्या पातळीवर आणि आपापल्या प्रकारे व्यक्त होत आहेत आणि व्यक्त होत राहाणार आहेत.

मित्रांनो,

समकाळ अतिशय क्रूर आहे. पण तरीही मला एक स्वप्नलोक खुणावत असतो. मी आणि किंवा कोणताही भानावर असलेला कवी हा सत्तेच्या समोरचा अस्वस्थ नागरिक असतो. सतत विरोधातल्या पहिल्या रांगेत असतो. कारण मला दुर्लक्षित राहिलेले, अन्याय झालेले स्त्री पुरुष दिसत असतात. काळ असा आहे की, सामान्य नागरीकाचं अस्तित्व प्रश्नांकित झालं आहे. कुणीही कधीही झुंडीनं येईल याचं संकट वाटत राहण्याचा काळ आहे. कशातही तुम्हाला अडकवलं-फसवलं जाईल  अशी परिस्थिती आहे. विवेक हरवलेला, नागरिकांच्याच मुळावर उठलेला हा काळ आहे. तो पुस्तकांचा शत्रू आहे, ज्ञानाचा शत्रू आहे. समता, स्वातंत्र्य, इतिहास, सत्य यांचा वैरी आहे. आपण हातोहात लुबाडले गेलो आहोत असं वाटतं. आजची सत्ता वंचितांच्या, वर्जितांच्या, दलितांच्या, बुद्धिवंतांच्या विरुद्ध असलेली सत्ता आहे. तिला भाषा, साहित्य, तत्वज्ञान, कला, परंपरेतलं धवल सौंदर्य यांचं वावडं आहे. त्यामुळे जागं राहणं गरजेचं वाटतं. कारण माणुसकीची पुन्हा पुन्हा स्मरण करून देणं हेच कवीचं आणि कोणत्याही कलावंतांचं आणि भान असलेल्या नागरिकाचं कर्तंव्य असतं. ते आपण केलं पाहिजे. कवी जे बोलू पाहतो ते शांत, दुखऱ्या स्वरात. ते सांगतो की अमानुष हुकूमशहांच्या सावल्या मोठ्या होत होत जिवंतपणाच्या, स्वातंत्र्याच्या, भलेपणाच्या अस्तित्वाला झाकोळून टाकताहेत. सत्य हाच द्रोह मानला जात असेल तर कवी आणखीनच ठामपणे सत्य की जय म्हणणार आहे. त्याच्या स्वरात आपले सगळे लोक, आपला देश वाचवण्याची काळजी आहे. कविता लिहिणं हे सत्याचा उच्चार करणंच आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अखेरीला माझे मित्र उदय प्रकाश यांची एक लहानशी कविता वाचतो आणि माझं हे भाषण संपवतो. आपल्याला आज आपली संस्कृती, आपलं संविधान आणि मानवी सभ्यतेतली मौलिक अशी मूल्यं टिकवायची असतील तर आपल्याला माणूस म्हणून आपण जिवंत आहोत हे सिद्ध करावं लागेल. माणूस म्हणून प्रिय असलेलं स्वातंत्र्य, समता, करूणा, न्याय यांच्यासाठी मौन सोडून बोलावं लागेल. फैज़ म्हणतो तसं ‘ये थोड़ा वक़्त बहुत है। बोल, बोल के लब आज़ाद है तेरे।’

उदय प्रकाशसुद्धा आपल्या जिवंतपणाची आठवण करून देण्यासाठी म्हणतात-

आदमी
मरने के बाद
कुछ नहीं सोचता.

आदमी
मरने के बाद
कुछ नहीं बोलता.


कुछ नहीं सोचने
और कुछ नहीं बोलने पर
आदमी
मर जाता है.

हे आपण लक्षात ठेवू. आणि तसं वागण्याचा कसोशीनं प्रयत्न करू.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा