(परवा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेल्या) सुधा भारद्वाज आहेत तरी कोण?
पडघम - देशकारण
महेंद्र दुबे
  • सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज
  • Fri , 03 December 2021
  • पडघम देशकारण सुधा भारद्वाज Sudha Bharadwaj छत्तीसगड Chhattisgarh शंकर गुहा नियोगी Shankar Guha Niyogi

कोरेगाव-भीमा हिंसाचार, तसेच माओवाद्यांशी संबंध या प्रकरणांतील कथित आरोपी वकील व सामाजिक कार्यकर्त्या  सुधा भारद्वाज यांना ३० नोव्हेंबर २०२१ रोदी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २८ ऑगस्ट २०१८पासून त्या अटकेत होत्या. त्यानिमित्ताने त्यांचे एकेकाळचे सहकारी महेंद्र दुबे यांनी त्यांनी करून दिलेली ही संक्षिप्त ओळख…

..................................................................................................................................................................

या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला एका व्यक्तीचा परिचय करून देत आहे. त्यांच्यासारखं होणं आपल्यासाठी कठीण गोष्ट आहे. त्या आहेत एका कोकणी ब्राह्मण कुटुंबाचं एकमेव अपत्य – सुधा भारद्वाज. कामगार पुढारी, सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील. या सर्व नावांशिवाय त्यांना फक्त ‘माणूस’ म्हटलं, तरी तुम्ही ‘माणुसकी’ या शब्दाला त्याच्या अर्थापर्यंत पोहचवाल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मी २००५पासून सुधा भारद्वाज यांना ओळखतो. अत्यंत साधा वेश, कपाळावर टिकली लावून त्या मजूर, शेतकरी आणि सामान्य वर्गातील लोकांसाठी छत्तीसगडमधल्या शहरांत आणि गावांत धावपळ करतात. त्यांच्यातील असामान्य प्रतिभा, उत्तम अकादमिक गुणवत्ता आणि व्यासंग यांच्या अंदाज मला त्यांच्यासोबत तीन वर्षं काम करूनही येऊ शकला नाही. त्याचं एक मोठं कारण हे होतं की, त्यांना स्वत:विषयी बोलणं आणि आपल्या कामाची टिमकी वाजवणं अजिबात आवडत नाही.

२००८मध्ये काही कामांसंदर्भात दिल्लीला गेलो होतो. त्याच दरम्यान माझ्या एका मित्राला सुधा भारद्वाज यांच्याविषयी एका इंग्रजी वर्तमानपत्रात पश्चिम बंगालच्या माजी अर्थमंत्र्यांनी लिहिलेला लेख वाचायला मिळाला. तो वाचून त्याने मला फोन करून त्यांच्या पूर्वायुष्याविषयी सांगितलं. तेव्हा अत्यंत सामान्य आणि साधी जीवनशैली असलेल्या त्यांच्या आताच्या आयुष्याची पूर्वायुष्याशी तुलना करून पाहिली आणि मी आश्चर्यचकित झालो.

मला याचं आश्चर्य वाटलं की, मजुरांच्या वस्तीत राहणाऱ्या सुधा भारद्वाज कानपूरच्या आयआयटीच्या १९७८च्या बॅचच्या टॉपर आहेत. त्या जन्मानं अमेरिकन, पण त्यांचं प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये झालं. सामान्य माणूस ही कल्पनाही करू शकत नाही की, अशी पार्श्वभूमी असलेली एक व्यक्ती मजुरांसोबत त्यांच्या वस्तीत राहते, दुधाशिवायचा चहा आणि भाजी-भात यांवर आपला उदरनिर्वाह करते.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

सुधा भारद्वाज यांच्या आई कृष्णा भारद्वाज दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. उत्तम शास्त्रीय गायिका आणि अमर्त्य सेन यांच्या समकालीन. दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या विद्यापीठात ‘कृष्णा मेमोरियल लेक्चर’ होतं. त्याला देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वान आवर्जून हजेरी लावतात. आयआयटीमधून टॉपर झाल्यानंतरही सुधा भारद्वाज यांनी करिअरचं आकर्षण मोहात पाडू शकलं नाही. आपल्या डाव्या विचारांकडील ओढीमुळे त्या ऐंशीच्या दशकात छत्तीसगढमधील कामगार नेते शंकर गुहा नियोगी यांच्या संपर्कात आल्या. नंतर त्यांनी छत्तीसगड हेच आपलं कार्यक्षेत्र मानलं.

गेल्या ३५हून अधिक वर्षांपासून त्या छत्तीसगडमध्ये मजूर, शेतकरी आणि गरिबांसाठीची लढाई रस्त्यांवर आणि न्यायालयात लढवत आल्या आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या आईच्या पीएफचे सगळे पैसे खर्च करून टाकले. त्यांच्या आईनं दिल्लीत एक घर घेऊन ठेवलं होतं. ते आता त्यांच्या नावावर आहे, पण नावालाच. ते घर त्यांनी भाड्यानं दिलंय आणि त्या भाड्याचे पैसे मजुर युनियनच्या खात्यात जमा होतात.

जे अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतीय लोक काहीही करायला तयार असतात, ते नागरिकत्व त्यांना जन्मानं मिळालं. पण ते त्यांनी खूप वर्षांपूर्वीच अमेरिकन वकालतीमध्ये फेकून दिलंय. भारतातील सामाजिक आंदोलन आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांतील मोठमोठी नावं सुविधासंपन्न आहेत. आणि आपल्या कामापेक्षा आपली पोच आणि जनसंपर्क यासाठी ओळखली जातात. पण ज्यांच्यासाठी ते काम करतात, त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आपलं सुखासीन आयुष्य सोडताना दिसत नाहीत. सुधा भारद्वाज यांनी मात्र अमेरिकन नागरिकत्व आणि आयआयटी टॉपर यांचा सहजपणे त्याग करून, नामानिराळं राहून अनामिकांची लढाई लढण्यासाठी आपल्या आयुष्याचा होम केला आहे.

कुठल्याही मोबदल्याशिवाब गोरगरिबांची वकिली त्या करतात. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची ऑफरसुद्धा नाकारली. ३५-४० वर्षांपासून सतत काम करून त्यांचे गुडघे त्रासून गेले आहेत. त्यांचे डॉक्टर मित्र त्यांना आराम करण्याचा सल्ला देतात. पण गरीब, शेतकरी आणि मजूर यांची एक छोटीशी आरोळी ऐकू येताच, त्यांच्या पायाला चाकं बांधली जातात… आणि मग त्या आपल्या शरीराचंही ऐकत नाहीत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्यांच्या कट्टर डावं असण्यामुळे माझे त्यांच्याशी वैचारिक मतभेद होत राहतात. पण त्यांच्या कामाविषयीच्या त्यागापुढे आणि सचोटीपुढे मी नेहमीच नतमस्तक होत आलो आहे. मी हे दाव्यानिशी सांगू इच्छितो की, त्यांनी आपल्या कामांचा १० टक्के जरी प्रचार केला असता, तरी जगभरातला असा पुरस्कार नसेल, ज्याने त्यांना सन्मानित केलं नसतं.

सुधा भारद्वाज होणं ही माझ्या-तुमच्या आवाक्यातली गोष्ट नाही. सुधा भारद्वाज या ‘सुधा भारद्वाज’च होऊ शकतात… इतर कुणी नाही…

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

.................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://hindi.newslaundry.com या पोर्टलवर ६ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा - 

https://hindi.newslaundry.com/2018/07/06/who-is-sudha-bhardwaj?fbclid=IwAR1ECONkKn07LAaOrM_OZLfckBP-tIl2TAQN2jh6RBBrkOHF6tGCepZPPLg

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vivek Date

Mon , 13 December 2021

Krishna Bhardwaj (nee Chandavarkar), mother of Sudha, was Professor of Economics at Department of Economics, University of Bombay and was my professor before she left in 1966. Her husband Ranganath Bharadwaj was also Professor of Econometrics in the same Department, he was Kannada. She divorced him and joined JNU. Her husband engaged in domestic violence and after divorced married his student half his age and she was my junior. She too left him out of disgust of violence. She later worked at Indian Merchants' Chamber. I am sure Sudha is no way connected with them and I do not know her.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा