बहुत मर्दाना चीज है ये, मेरी बुलेट!
सदर - लक्ष्मणरेषेवरून
डॉ. कुंदा प्रमिला निळकंठ
  • ‘धूम’ चित्रपटातील एक दृश्य
  • Thu , 23 February 2017
  • पोर्नोग्राफी Pornography स्त्री-पुरुष असमानता Gender inequality लैंगिकता sexuality लिंगभाव Gender

“पितृसत्ताक व्यवस्थेविरुद्ध लढायला हवं”, “आमचा स्त्री-मुक्तीला पाठिंबा आहे” असं अलीकडे सोशल मीडियावर खूप बोललं जातं, फेसबुकवर अनेक कॉमेंटसमधून तर अगदी मोठमोठी भाषणे झोडण्यात अनेक पुरुष देखील आघाडीवर असतात. सगळ्यांना अगदी प्रामाणिकपणे पितृसत्ता घालवायला हवी असं वाटत असलं तरी आपल्या व्यवहारातून ती कशी घालवणार? आपल्या रोजच्या जीवनात ‘पितृसत्ता’ अगदी घट्टपणे खोलवर रुजलेली आहे, ती निपटून काढण्यासाठी नेमकं आपण काय करतो यांचा सूक्ष्म पातळीवर विचार करायला हवा.

“मी बायकोला स्वयंपाकाला, पाणी भरायला मदत करतो, धुणी भांडी करायला मदत करतो,” असं एक वाक्य मोठ्या अभिमानानं नेहमी ऐकवलं जाते. पण वर्षाचे ३६५ दिवस, तिन्ही त्रिकाळ आपला नोकरी व्यवसाय सांभाळून हेच काम करणारी स्त्री, “मी नवऱ्याला घरकामात नेहमी मदत करते”, असं म्हणताना दिसते का?

जणू विनातक्रार केलं जाणारं घरकाम हे फक्त स्त्रीचंच आहे, तिच्या जन्मासोबत आलेलं नैसर्गिकच आहे. त्यात पुरुष मदत करतो म्हणजे तो स्त्रीमुक्तीवादी आहे. हे नक्कीच स्वागतार्ह आहे, पण दैनंदिन व्यवहार पाहता, ती कृती ही उपकाराच्या भावनेतून आलेली म्हणून ‘उपरेपणा’ची ठरते. परिणामी ती फक्त प्रतीकात्मक ठरते. अशा प्रतीकात्मक कृती जोवर तुमच्या जगण्याचा अपरिहार्य भाग बनत नाहीत, आसपासच्या पारंपरिक समाजमनात घट्ट रुजत नाहीत, तोपर्यंत अशा कृती पाहून जुन्या विचारांचे लोक घरातल्या बाईला दोष देऊन म्हणतातच, “पहा, नवरा कसा घरकाम करतो आणि बाई किती ऐषआरामी, भटकभवानी” इ. इ..!

जर पितृस्ताक कुटुंबपद्धतीच्या ढाच्यात अमूलाग्र बदलायचे असेल तर प्रतीकात्मक कृतीमध्ये अडकून पडण्यापेक्षा, समाज मनात खोलवर रुजलेल्या मर्दानगीच्या किंवा पुरुषार्थाच्या प्रतीकांचा अभ्यास करायला हवा. पुरुषार्थ मनात खोलवर रुजवणारी प्रतीकं खणून काढायला हवीत. म्हणूनच मी माझ्या या सदरातील ‘मर्दानगी विरुद्ध पुरुषभान’ या मालिकेत या मर्दानगीभारीत प्रतीकांचा ऊहापोह करत आले. मागच्या लेखात ‘जलिकटटू’सारख्या खेळात दडलेल्या मर्दानगीच्या कल्पनेबद्दल बोलले, तर या लेखात ‘बुलेट मोटारसायकल’ या प्रतीकाबद्दल बोलणार आहे.  

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईत आमच्या शेजारच्या बिल्डिंगमधल्या पंजाबी कुटुंबाच्या घरातून जोराजोरात आरडाओरडा ऐकू येत होता. एक १८ वर्षीय मुलगा, सुमित आपल्या सरदारजी बापाला म्हणत होता, “डॅड, आप मेरे लाईफ में बार बार कायको टांग अडाता हो? मेरेको बस ‘बुलेट’ चाहियेही चाहिये! आपने पैले बोला था, बारवीके बाद देदुंगा, अभी मैनें बारवी पास करके दिखाया ना? और गावके दादाजीने मेरेको १० हज्जार दिया है, तो आपका क्या प्रॉब्लेम है? ७० हजार की ‘बुलेट’ हप्तेपे खरीदते है. जब मेरेको नौकरी लगेगा तब चाहे तो मैं ६० हज्जार रुपया वापस करुंगा, बस?”

सुमितचा सरदारजी बाप आणि आई त्याला समजावत होते की, “बाबारे, माझ्या एकट्याच्या २०-२५ हजार रुपयाच्या पगारातून आधीच घराचा हप्ता जातोय त्यात तुझ्या ‘बुलेट’ गाडीचा हप्ता मला परवडणार नाहीय. त्यापेक्षा तू माझी अॅक्टिवा स्कूटर वापर ना! मी बसने जाईन हवं तर.”

 पण सुमित काही केल्या ऐकेना. म्हणाला, “डॅड, तूम समझते क्यूं नही? अॅक्टिवा ये लेडीज व्हेईकल समझा जाता है. आपने मेरेको क्या ‘करीना कपूर’ समझा है क्या? मेरे जिम के ट्रेनरने बताया है की ‘तेरा इतना अच्छा हाईट बॉडी है, तू तो एकदम सलमान जैसा बॉडीबिल्डर दिखता है, तो तेरेको सिर्फ ‘बुलेट’ यातो ‘यामाहा’ मोटरबाईकही सूट करेगा. दुसरा कोई भी मोटरबाईक तेरे हाथ में अच्छा नही दिखेगा.’ या वादात सुमितच्या धाकट्या बहिणीने अचानकपणे एन्ट्री घेतली, म्हणाली,  

“मालूम है तेरेको ‘बुलेट’ क्यूं चाहिये, वो तेरी गर्लफ्रेंड है ना उसको गाडीपे लेके घुमाना है ओर सबको शायनिंग मारना है. डॅड, उसको ‘बुलेट’ वुलेट कुछ भी मत देना. उससे अच्छा मुझे हिमालया ट्रेकिंग पे जाना है तो मुझे ट्रेकिंग के लिये पैसा देना.”

 असे तिने म्हटल्याबरोबर सुमित तिच्या अंगावर धावून गेला, आई-वडिलांनी त्याला आवरलं. त्यानंतर घरात तुंबळ युद्ध झालं. काय झाले असेल त्याची आपल्याला कल्पना आलीच असेल. साधारण एक महिन्यानंतर मला संध्याकाळी अचानक धाडधाड धाडधाड असा कानाला प्रचंड त्रासदायक वाटावा असा मोटारबाईकचा जोरदार आवाज आला म्हणून मी खिडकीतून बाहेर पाहिले तर बिल्डिंगच्या खाली सुमितकुमार आपल्या समवयस्क मित्रांना आपली नवी कोरी ‘बुलेट’ गाडी रेझ करून दाखवत होता. मित्रांना तो सांगत होता,  “अरे, ये तो ‘बुलेट’ है यार, बहोत मर्दाना (manly) गाडी समझी  जाती है. वो ‘धूम’ फिल्म में ... अॅक्टरने चलाई थी ना, वैशीच है ये गाडी. एकदम तगडे पुरुषोंके लिये बनी है. मेरे जिम के ट्रेनर बोला था ... इ. इ.”  

‘बुलेट’ मोटरबाईक रेझ करून दाखवताना गाडीचा मर्दानी रुबाब फक्त मित्रांना दाखवणं एव्हढाच सुमितचा उद्देश नव्हता, तर आजूबाजूच्या इतरांचंही लक्ष वेधून घेणं हाही हेतू होता. सुमितकुमारच्या चेहऱ्यावर आपण बादशहा आणि इतर सारी गरीब प्रजा असे वर्चस्वाचे हावभाव होते. त्या नव्या मोटारबाईकच्या फडफडाटाचा कानाला त्रास झाला, तेव्हा दुसऱ्या कुणीतरी त्याला सांगितलं की आवाज बंद कर पण सुमित काही ऐकेना. १८ वर्षीय सुमितची रुबाब दाखवण्याची ती तऱ्हा पाहून खरं तर मलाही राग आला होताच पण गंमतही वाटली की, कसा आपला समाज उमलत्या वयात एखाद्या मुलाला पूर्ण पुरुष बनवण्यासाठी ‘मर्दानगीचं मूल्य’ रुजवत असतो. मुलग्यांच्या वागण्यातील आक्रमकता ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे असंच प्रत्येकाला वाटत असतं.

सुमितकमारसारखे डोळ्यासमोर लहानाचं मोठं होणारं उमलतं फूल संपूर्णपणे मर्दानगीचा खुलेआम आविष्कार करू लागलं, तेव्हाच लक्षात आलं की त्या आक्रमक आविष्काराकडे नुसतं पाहत राहण्यापेक्षा त्याच्या आई-वडिलांच्या हातात आता फारसं काही उरलेलं नाहीय. खरं म्हणजे यात सुमितचा किंवा त्याच्या आई-वडिलांचा फार दोष नाहीय. ही कथा एकट्या सुमितच्या आई-वडिलांची नाहीय तर थोडाफार आर्थिक वर्गाचा आणि ग्रामीण/शहरी तपशिलाचा फरक सोडला तर पुरुषत्वाच्या सामाजिक जडणघडणीतील मानसिकता मात्र सर्वत्र सारखीच आहे.

सुमितकुमार आणि त्याच्यासारख्या हजारो किशोरवयीन भारतीय मुलग्यांची मानसिकता घडवण्यात आई-वडील आणि कौटुंबिक संस्कार यांचा फार तर ३० टक्के वाटा असेल, पण जवळ जवळ ७० टक्के वाटा सभोवतालच्या समाजाचा असतो, हे निरीक्षण आता अनेक सर्वेक्षणातून जोर धरू लागलं आहे. मर्दानगीच्या आक्रमक मूल्याची जडणघडण शाळेत होत असते. शिक्षक आणि सोबतची मित्रमंडळी त्यात भर टाकतात. तो वाचत-पाहत असलेल्या प्रसारमाध्यमांतून, जाहिरातींतून, मालिकांतून, सिनेमांतून किंवा अन्य मनोरंजनातून जो आशय त्याच्या कोवळ्या मनापर्यंत पोहोचत असतो, त्यातून त्याचे विचार घडत जातात. या खेरीज इंटरनेटवरील विविध प्रकारचा माहितीचा साठा व्हिडिओ गेम्स, व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे अवास्तवपणे फुगवलेल्या मर्दानगीच्या मूल्य संकल्पना.

साधी जॉन अब्राहम करत असलेली ‘यामाहा’ मोटारबाईकची जाहिरात उदाहरणादाखल घेऊ. काय आहे या जाहिरातीत? म्हणजे इतक्या अनेक वर्षांपासून भारतात मोटारसायकली आणि त्यांच्या जाहिराती होत नव्हत्या का? मग अचानक गेल्या २० वर्षांत जाहिरात क्षेत्रात नेमकं काय बदललं? बदललं हे की प्रत्येक विक्रीयोग्य वस्तूला लैंगिक मूल्य चिकटवलं गेलं किंवा लैंगिकतेचं वस्तूकरण झालं असंही आपण म्हणू शकतो. स्त्री शरीराचं वस्तूकरण कसं झालं आहे याबद्दल खूप बोललं गेलं आहेच, पण १९९१ नंतर भारतात सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून मर्दानगीच्या नव्या व्याख्या पुरुषमनावर ठसवण्याचा प्रयत्न भांडवलशाहीतील या मुक्त बाजारव्यवस्थेनं केलेला आहे.  

सुमितसारख्या किशोरवयीन मुलग्यांच्या मनावर मोटारबाईकच्या रूपात मर्दानगीची मूल्यं त्याच्याही नकळतपणे कशी घट्ट ठसवली गेली? पहिली गोष्ट म्हणजे त्या मोटारसायकलीची रचना. दिसता क्षणी मोटारसायकलचा आकार आणि घाट हा एखाद्या पिळदार अंगयष्टी असलेल्या ‘मॅचो’ पुरुषांच्या अंगयष्टीसारखा घडवला गेला. मोटारसायकलचं ‘मॅचो’ असणं पुरुषांच्या मनावर ठसवण्यासाठी ‘सिक्स पॅक’, बलदंड, ताकदवान वाटणाऱ्या जॉन अब्राहिमची निवड जाहिरात करण्यासाठी केली गेली. दुसरी गोष्ट म्हणजे जाहिरातीत नुसता ‘मॅचो ‘मॅन’ किंवा पहेलवानसुद्धा दाखवायचा नाहीय, तर तो बलदंड पुरुष असा आहे की, जो स्त्री-पुरुष लैंगिक सबंधांत मर्दानी आविष्कारात किंवा ‘सेक्शुअल परफॉरमन्स’मध्ये आपलं ‘मॅचो’पण सिद्ध करणारा पुरुष आहे. त्यासाठी कामातुर किंवा प्रणयातूर स्त्री तिथं आणली जाते. त्या स्त्रीचे लैंगिक हावभाव पाहणाऱ्याला त्या ‘मॅचो ‘मॅन’चं आणि त्याचं प्रतीक असणाऱ्या त्याच्या ‘मोटारबाईक’च्या मर्दानगीचं मूल्य मनोमन पटतं. परिणामी आपणही असेच ‘मर्द’, ‘मॅचो ‘मॅन’ दिसावं म्हणून तो कामाला लागतो. प्रथम तो पिळदार अंगयष्टी मिळवण्यासाठी जिम्नॅशियमला जाऊ लागतो आणि नंतर ‘मॅचो ‘मॅन’च्या प्रतिमेशी घट्टपणे जोडलेल्या मोटारबाईकवरून फिरणं प्रतिष्ठेचं मानू लागतो.

तिसरा एक प्रचलित गैरसमज मोटारबाईकच्या मर्दानी प्रतिमेशी जोडलेला आहे, तो म्हणजे मोटारबाईकची पेट्रोलची टाकी पुढे असते आणि स्कूटरला ती मागे जोडलेली असते. जे स्त्री-पुरुषांच्या शारीरिक रचनेशी मिळतेजुळते आहे. मोटारबाईकची ‘मॅचो मॅन’ प्रतिमा वाढवणारा चौथा घटक म्हणजे त्या गाडीचा उरात धडकी भरवणारा गडगडाटी आवाज. हा गडगडाट ऐकणाऱ्याला नुसती धडकीच भरवतो असं नव्हे तर एक दहशत आणि आक्रमकतासुद्धा प्रस्थापित करतो. जी आक्रमता प्रत्येक पुरुषात असायलाच हवी, नाहीतर त्याची ‘बायकी’ पुरुष म्हणून खिल्ली उडवली जाऊ शकते. या आक्रमकतेची पुढची पायरी म्हणजे स्त्रियांवरील अत्याचार व हिंसा. घरात बायकोला मारणं किंवा प्रेयसीनं प्रियकराचं ऐकायला नकार दिल्यास तिला मारणं. ‘सैराट’ सिनेमामध्ये दिसलेली हिंसा हीसुद्धा जातीय विद्वेषातून, पुरुषसत्ताक अहंकारातून पेटलेल्या मर्दानगीचा परिपाक आहे.    

पण समजा एखादा पुरुष अगदीच कृश अंगयष्टीचा, बुटका, काळा, सावळा, असेल तर त्याने काय करावं? त्यालाही उत्तर एकच आहे, नसली तर नसली अंगयष्टी पण ‘मॅचो ‘मॅन’चं प्रतीक आणि प्रतिष्ठा मिळवून देणारी मोटारबाईक तर आहे ना! मग आपलं पुरुषत्व सिद्द करण्यासाठी तो सर्वस्वी ‘पल्सर’, ‘यामाहा’ ‘बुलेट’वर अवलंबून राहू लागतो. ‘मॅचो मॅन’ची प्रतिष्ठा सोबत नसेल तर हतबल होतो, किरकिरा बनतो. अशा पुरुषाला बायकी ठरवलं जातं. बुळ्या पुळचट किंवा प्रसंगी छक्का अशी विशेषणं त्याला लागतात. थोडक्यात, त्याची पुरुष म्हणून ओळख संपुष्टात येते. अवहेलनेमुळे तो विकल होतो. आत्मविश्वास हरवून बसतो. असा पुरुषसत्ताक समाजरचनेत विस्थापित झालेला हतबल पुरुष आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी इरेला पेटतो, अनेक विकृत गोष्टी करू लागतो. लैंगिक सुख ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करतो. स्त्रीने दिलेला नकार तो पचवू शकत नाही, तो हिंसक बनतो.  इथंच नेमकं लिंगभावाचं स्त्रीवादी दृष्टीकोनातून आकलन व समज वाढवण्यासाठी किशोरवयीन मुलग्यांसोबत काम करायला हवं, असं स्त्री मुक्ती चळवळीला वाटू लागलं आहे.

वर सांगितलेल्या सुमितच्या आणि मोटारबाईकच्या उदाहरणातून वयात येणाऱ्या मुलांच्या मनावर फक्त दोनच प्रकारची ओळख म्हणजे स्त्री किंवा पुरुष ठसवली जाते. या दोहोंमधील कोणतीही ओळख सिद्ध करू शकत नाही त्याला किंवा तिला तृतीयलिंगी म्हणून हिणवलं जातं, समाज व्यवहारातून वगळलं जातं, अपमानित केलं जातं. स्त्रीने नाजूक असणं, फेमिनाईन वागणं-बोलणं आणि नेहमी पुरुषाला शरण जाणं, हे निकष आदर्श गुणधर्म म्हणून तिच्या मनावर ठसवले जातात.

तर याउलट वर सांगितलेल्या मोटारबाईकच्या उदाहरणातील ‘मर्द’ असणं म्हणजे १) तगडी पिळदार अंगयष्टी असणं, ताकदवान असणं. २) कामातुर स्त्रीसोबत लैंगिक समागमासाठी केव्हाही तयार असणं. ३) मर्द असणं म्हणजे आक्रमक असणे, प्रसंगी हिंसा करायला मागेपुढे न पाहणं. ४) मर्द असणे म्हणजे स्पर्धात्मक असणं. स्पर्धेमध्ये समोरच्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याची क्षमता असणं. ज्याला ‘किलिंग इनस्टिंक्ट’ असणं असं म्हटलं जातं. ही स्पर्धा, ही आक्रमता, ही ताकदवान अंगयष्टी ही मदनाचा पुतळा असलेली लैंगिकता सारं काही एखाद्या मोटारबाईकच्या जाहिरातीतून ठसवले जातं, तर ‘अमूल माचो, बडे आरामसे,’ अशा कधी बनियन आणि अंडरवेअरच्या जाहिरातीतून तर कधी सोड्याच्या नावाखाली केलेल्या दारूच्या जाहिरातीतून किशोरवयीन मुलांच्या मनावर ठसवली जाते. कोवळ्या वयात समोर आलेल्या प्रतिमांचा प्रभाव किशोरवयीन मुलांच्या विचारांवर पडतो आणि आजचा आक्रमक वर्चस्ववादी पुरुष, या वातावरणात वेगवेगळ्या माध्यमातून घडवला जातो.     

या मुलांच्या मनात रुजलेल्या मर्दानी-पुरुष प्रतिमेला पुष्टी सभोवतालच्या वातावरणात सतत मिळते. स्त्रियांची माणूस म्हणून दडपणूक करणारी अनेक सनातनी नैतिकतावादी मूल्यं आजूबाजूची मोठी माणसं सांगताना दिसत राहतात. दारू पिऊन आपल्या आईला (वा बहिणीला) मारणारा बाप ‘तुला काय कळतं तू चुलीपाशी बस’ अशी तिची हेटाळणी करतो. बाप भाऊ, मामा काका डोळ्यासमोर पुरुषसत्ता राबवताना दिसत असतात. बाहेर शाळा-कॉलेजात शिक्षक सातत्याने मुला-मुलींमध्ये अकारण तुलना करून सोबतच्या मुलींना कमी लेखतात. कधी शंकराचार्य, कधी शरद यादव, मुलायमसिंह, कधी अबू आझमी यांच्यासारखे राजकारणी मुली तोकडे कपडे घालून पुरुषांना चेतवतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात असं म्हणतात, कधी सोबत वावरणाऱ्या मुलांनीच  कुणावर तरी सामुहिक बलात्कार केल्याचं कानावर येतं.

कुणीतरी व्हॉटसअॅप नाहीतर युट्यूबवरील रेप व्हिडिओ किंवा ‘चाईल्ड पोर्न’ मालिकेतला बलात्काराचा व्हिडिओ दाखवतो, कधी ‘यो-यो हनी सिंग’, कधी कपिल शर्मा, कधी ‘AIB Show’ तर कधी चेतन भगत यांच्या तोंडूनच स्त्रियांवरील अश्लील संभाषणं कानावर पडतात. अनेकदा सलमान खान किंवा जॉन अब्राहमसारखे रोल मॉडेल हिरोच अतिशय गलिच्छ हावभाव करताना दिसतात. या वातावरणात ‘स्त्रियांचा सन्मान’ करणं तर दूरच, पण अशा तऱ्हेचा विषमतेचा पुरस्कार करणारेच जास्त दिसतात. स्त्रीला उपभोगाची वस्तू मानणं, स्त्री ही आपल्या पायातली वहाणच राहिली पाहिजे, असे अनेक कुरूप संस्कार या मुलांचं पुरुषत्व घडवत जातात.   

२०१४ला युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड (UNDP) यांच्यातर्फे एक सर्वेक्षण प्रसिद्ध झालं. त्यात असं समोर आलं की, इतर देशांच्या तुलनेत सांस्कृतिक महत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या भारतात स्त्री-पुरुष विषमतेचं प्रमाण सगळ्यात जास्त असून स्त्रियांच्या प्रती हिंसेचं प्रमाणही खूप जास्त आहे. या सर्वेक्षणात असं निदर्शनाला आलं आहे की, १६ ते १९ वयोगटातील ५५ टक्के मुलग्यांना असं ठामपणे वाटतं की, ‘स्त्रिया-मुली तोकडे कपडे घालून पुरुषाला चेतवतात (Provoke) करतात, म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात’. लिंगभावविषयक समतेच्या जाणीव जागृती अभावी असे विचार ५५ टक्के किशोरवयीन मुलांचे असतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण मर्दानगीची जडणघडण कशी विविध अंगाने होत असते, हे आपल्याला दिसतंच आहे. त्यामुळेच सामूहिक बलात्काराचं प्रमाण गेल्या १० वर्षांत दुपटीनं वाढलं आहे.

एकीकडे भारतातल्या स्त्रीवादी चळवळीच्या प्रयत्नाने चांगले कायदे बनले, स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न झाले, त्यामुळे जवळ जवळ ४५ टक्के स्त्रिया घराबाहेर पडून स्वतंत्रपणे आयुष्य जगू लागल्या, परंतु त्याच्या उलट कोणत्याही लिंगभावयुक्त मूल्यांची नैतिक जबाबदारी वाटत नाही, अशा पुरुषांचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे.

२००१४ साली युनायटेड नेशनने केलेल्या सर्वेक्षणात भारतीय पुरुषांची तीन प्रकारामध्ये विभागणी केली आहे. त्यातील पहिल्या प्रकारात ३२ टक्के पुरुष हे सनातनी विचारांचे व कर्मठ पुरुषसत्ताक कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारे आहेत. दुसऱ्या प्रकारात ४५ टक्के पुरुष हे सर्वसाधारण विचारांचे खूप कर्मठ नाहीत आणि खूप पुढारलेले पण नाहीत, अशा प्रकारचे आहेत. कारण स्त्री-सन्मान करणारी संस्कृतीच आपण घडवू शकलेलो नाही. तिसऱ्या प्रकारात मात्र २३ टक्के पुरुष हे जास्तीत जास्त समतावादी विचारांचा पुरस्कार करणारे आहेत. हे पुरुष समतेसाठी स्वत:हून पुढाकार घेऊन स्वत:च्या आचरणात ही स्त्री पुरुष समता आणण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात, जवळपास ७५ टक्के भारतीय पुरुषांच्या मनात स्त्री-सन्मानाची वृत्ती जागवणं गरजेचं आहे. मर्दानगीचे वर्चस्ववादी विचार मनातून काढून स्त्री-पुरुष समतेचं भान देणारी, जोतीबा-सावित्रीचं ‘पुरुषभान’ देणारी जाणीव रुजवणं गरजेचं आहे. हे केलं तरच आपलं सर्वांचेच जीवन सुसह्य होईल.

लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

kundapn@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......