सत्यजित राय यांची गणना डी सिका, फेडरिक फेलिनी, किंवा अकिरा कुरोसावा यांच्याबरोबर केली गेली. भारतीय सिनेमासाठी ही एक मोठीच गोष्ट होती, आहे
कला-संस्कृती - चलत्-चित्र
जयंत राळेरासकर
  • सत्यजित राय (२ मे १९२१ - २३ एप्रिल १९९२)
  • Mon , 03 May 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र सत्यजित राय Satyajit Ray गणशत्रू Ganashatru अपुर संसार Apur Sansar

“Not to have seen the Cinema of Satyajit Raymeans Existing in the World without seeing the Sun and the Moon.” - Akira Kurosava

लहान असताना सत्यजित एकदा शांतीनिकेतनमध्ये गेले होते. रवीन्द्रनाथ यांच्यासोबतच्या त्या भेटीत त्यांना फक्त एक संदेश हवा होता. त्यांनी पुढे केलेल्या वहीत त्या महाकवीने काही लिहिले आणि ते म्हणाले, “याचा नेमका अर्थ तुला तू मोठा झाल्यावर कळेल.” अर्थातच तो संदेश म्हणजे एक कविता होती. “मी जगभर प्रवास केला, खूप दूरवर भटकलो, पण माझ्या घरासमोरील गवताच्या पात्यावरील दंवात दिसणारे विश्व पाहायचे मात्र मी विसरलो…” अशा काही अर्थाची ती कविता होती. आज जेव्हा आपण सत्यजित आणि त्यांचे चित्रपट पाहतो, त्या वेळी त्यांच्या चित्रपटांतून आपण त्यांच्या प्रतिभेतील हे विश्व पाहू शकतो.

सत्यजित राय हे स्वत: लेखक आणि चित्रकारसुद्धा होते. त्यांच्या अनेक कथा, रहस्य-कथा, विज्ञान-कथा आहेत. शिवाय त्यांनी स्वत: संपादक म्हणूनही काम केले आहे. इतकेच नव्हे तर, ते स्वत: संगीताचे जाणकारही होते. त्यांच्या अनेक चित्रपटांचे संगीत त्यांनी स्वत: दिले होते. मुळात राय यांचे सगळेच घराणे कला-प्रेमी होते. सत्यजित यांचे आजोबा (उपेंद्रनाथ) लेखक होते. त्यांना पियानो, व्हायोलिन वगैरे वाद्ये वाजवता येत असत. उपेंद्रनाथ आधुनिक विचाराचे होते. सत्यजित राय यांच्या वडिलांनी (सुकुमार राय) मुलांसाठी काही गाणी लिहिली. त्यांची आईसुद्धा गायिका होती. या समृद्ध परंपरेतून सत्यजित यांच्यावर सहजपणे कलेचे संस्कार होत गेले. शांतीनिकेतनमधील त्या वर्षात मला आपसूक एक दिशा मिळाली, असे ते म्हणत. शांतीनिकेतनमधील ती दोन वर्षे दीर्घकालीन परिणाम करणारी अशीच होती. नंतर त्यांनी एका जाहिरात संस्थेत काम केले. याच संस्थेने सत्यजित यांना परदेशी पाठवले. परदेशातील या मुक्कामात त्यांनी जगभरचे चित्रपट पाहिले. ‘बायसिकल थीफ’ या वित्तोरीया डी सिकाच्या चित्रपटामुळे ते खूप प्रभावित झाले होते. काल (३ मे २०२१) राय यांच्या जन्मशताब्दीची सांगता झाली.

सत्यजित राय आपल्या चित्रपटाबद्दल कसा विचार करत याबद्दल बरेच लिहिता येईल. आणि तसे लिहिले गेलेसुद्धा आहे. चित्रपट ज्या वेळी त्यांच्या मनात प्राथमिक अवस्थेत असतो, त्या वेळी पटकथादेखील आकार घेत असे.  मात्र त्याचसोबत आणखी एक महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट ते करत, ती म्हणजे प्रत्येक फ्रेमची स्केचेस ते स्वत: काढत. त्यामुळे अनेक निर्जीव वस्तूंनादेखील एक भूमिका मिळत असे. त्यांच्या चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील हे वेगळेपण आहे. आपण ते आजही त्यांच्या चित्रपटांतून अनुभवू शकतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘पाथेर पांचाली’मधील रेल्वे आठवून पहा. मोठ्या शहरात जाण्याची भविष्यातील अपरिहार्यता स्पष्ट करणारी ती रेल्वे काय किंवा पडक्या कुडाच्या भिंतीचे हरिहर-सर्वजया यांच्या घराचे ते दार काय! अनेक प्रसंगातून हे दार आपल्याला दिसते आणि काही संकेत देते. ‘चारुलता’मधील दुर्बीण, पत्ते आणि वादळदेखील आठवून पहा. याच वादळाच्या पार्श्वभूमीवर चारुलताच्या आयुष्यातील येऊ पाहणारी एक अस्फुट रंगत फक्त सूचित होते. बोलता बोलता जमा होणारे ‘कांचनजंगा’मधील धुके असेच आहे. ‘अपराजितो’मधील हरिहरच्या मृत्यूचा प्रसंग. गंगाजल आणण्यासाठी गेलेला अप्पू, एका विशाल आणि दगडी घाटाच्या पार्श्वभूमीवर दाखवला जातो… अप्पूचे लहान वय, आणि भविष्यातील कठोर वास्तव नकळत सूचित होते.

‘आगंतुक’मध्ये सुधींद्रला जुन्या शिल्पाकृती जमवण्याचा छंद आहे. पण तो जोपासताना केवळ एक उच्चभ्रू समाधान आहे. त्या प्राचीन मूर्तीच्या इतिहासाबद्दल तो अनभिज्ञ आहे. दिवाणखाण्यातील त्यांचे डौलदार प्रदर्शन फक्त त्याला अभिप्रेत आहे. घरात एक अनोळखी माणूस पाहुणा (त्याच्या पत्नीचा हा मामा, त्यांच्याकडे मुक्काम करणार आहे) म्हणून येणार म्हटल्यावर त्या मूर्तींची चोरी तर होणार नाही ना, याची सुधीन्द्रला भीती वाटते. त्याची पत्नी पाहुण्यासाठीच्या खोलीची स्वछता करताना त्या निर्जीव मूर्ती कपाटात ठेवते आणि कुलूप लावते. हे किती बोलके आहे! जणू त्या शिल्पाकृतींचे अबोल स्वगतच.

‘टू’ हा लघुपट या दृष्टीने विलक्षण अनुभव देऊन जाणारा आहे. या लघुपटात संवाद नाहीत. वेगळ्या आर्थिक परिस्थितीतली दोन लहान मुले. श्रीमंत मुलाचे प्रासादतुल्य घर, तो अधाशासारखे पीत असलेले शीतपेय, त्याची स्वयंचलित खेळणी, वस्तीतील मुलाचे पतंग, बासरी... या सगळ्याचा उपयोग केवळ अफलातून आहे. राय यांचा सिनेमा प्रत्येक वेळी एक नवीन दृष्टी देत राहतो... हेच खरे!

सत्यजित राय यांचे अनेक चित्रपट हे प्रसिद्ध अशा साहित्यकृतीवर आधारित होते. ‘साहित्यकृतीचे चित्रपटीकरण’ या विषयावर बरीच चर्चा, आणि वाद होत असतात. मूळ कथा किंवा कादंबरी माध्यमांतर करताना दिग्दर्शकाने किती बदल करावेत, किती स्वातंत्र्य घ्यावे, घ्यावे की नाही, याबद्दल खूप भवती-न-भवती झालेली आहे. त्या चर्चेत आपण पडायचे कारण नाही. ते खरे असले तरी, मात्र ते दिग्दर्शक म्हणून स्वत:चे स्वातंत्र्य अबाधित ठेवतात.

विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांवर त्यांनी तीन चित्रपट (‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’, ‘अपूर संसार’) केले. शिवाय रवींद्रनाथ टागोर (‘घरे-बाईरे’, ‘तीन कन्या’, ‘चारुलता’), नरेंद्रनाथ मित्रा (‘महानगर’), प्रेमचंद (‘शतरंज के खिलाडी’), सुनील गांगुली (‘अरण्येर दिन रात्री’), ताराशंकर बंडोपाध्याय (अभिजन) अशा काही लेखकांच्या कथा-कादंबऱ्या त्यांनी पडद्यावर आणल्या. ‘तीन कन्या’ या रवींद्रनाथ यांच्या तीन स्वतंत्र कथा होत्या. ‘पोस्टमास्तर’, ‘मोनिहारा’ आणि ‘समाप्ती’ या त्या तीन कथा होत्या. इब्सेनच्या नाटकावरून त्यांनी ‘गणशत्रू’ हा चित्रपट केला.

सत्यजित राय यांनी स्वत:च्या कथांवरसुद्धा काही चित्रपट केले आहेत. ‘कांचनजंगा’, ‘शाखा-प्रशाखा’, ‘आगंतुक’ आणि  आणखीही काही कथा त्यांच्याच आहेत. ‘आगंतुक’ची कथा आधीच ‘अतिथी’ या शीर्षकाखाली प्रकाशित झालेली होती. मुळात लहान मुलांसाठी लिहिलेली ही कथा चित्रपटासाठी मात्र मोठ्यांची होऊन गेली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा एकत्रित, एका सूत्रात विचार करता येईल की, नाही मला माहिती नाही, परंतु एक खरे की, माणूस आणि त्याची वृत्ती-प्रवृत्ती हा त्यांच्या चिंतनाचा भाग आहे. ते परिस्थिती हादेखील एक महत्त्वाचा घटक मानताना दिसतात. व्यक्तिरेखा साकार करताना ते त्या ‘व्यक्तिरेखा’ समजून घेतात. त्यामुळे आपसूनक त्यांच्या पात्रांना एक मानवी चेहरा मिळतो. ‘महानगर’ची नायिका- आरती मुजुमदार, कुटुंबाची गरज म्हणून नोकरी करते. पण मुळात ती एक माणूसदेखील आहे. एका दुर्दैवी घटनेमुळे ती नोकरीचा राजीनामा देते. त्याच वेळी तिला हेही वाटत असते की, हा भलताच निर्णय आपण घेतला आहे. ती स्वत:ची समजूत घालू शकत नाही. ती द्विधा मन:स्थितीत आहे. मात्र या महानगरात आपण एकटे नाहीत, ही जाणीव तिला होते... आणि अखेर त्या महानगरात ती मिसळून जाते. तिचे वैयक्तिक दु:ख लाखोच्या संख्येत विभागले जाते.

‘चारुलता’ ही एकाकीपणाची शिकार झालेली नायिका. सतत आपल्याच विश्वात असणारा तिचा पती, तिच्या अस्तित्वाची दखल न घेणारा. साहजिक तिच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. नुसत्या वैभवाच्या राशीवर लोळत असणारी चारुलता एक वेगळी व्यक्तिरेखा आहे. आयुष्यातला रितेपणा घालवण्यासाठी ती पत्ते खेळते, विनाकारण लोळत राहते. एकावर एक नुसते पत्ते टाकत असताना तिचा निर्विकार चेहरा खूप काही सांगून जातो. शिवाय तिच्या हातातील ती दुर्बीण. त्यातून विनाकारण रस्ता बघत राहण्याची तिची लकब तिच्या मनाची अवस्था अधिक गडद करते.

आपल्या चित्रपटांबद्दल सत्यजित राय यांनी असे म्हटले होते की, मध्यमवर्गीय बंगाली संस्कृतीमधील प्रेक्षक मला अभिप्रेत असतो. त्याचमुळे त्यांनी बदलत चाललेल्या मूल्यांना स्वत:चे असे एक ‘स्टेटमेंट’ दिले होते. त्यांचे चित्रपट भारतातील गरिबीचे चित्रण करतात, अशी टीका झाली होती. मात्र त्यात काही तथ्य नाही, हे आपण सहज पाहू शकतो. नामशेष होत चाललेल्या संस्थानी बडेजावाचा ‘जलसाघर’ (यात छबी विश्वास यांची अप्रतिम भूमिका होती), अंधश्रद्धेवर डोळस प्रहार करणारा ‘गणशत्रू’, आपल्याच रईसी समजुतीमुळे विवाहसंस्थेबद्दल अवास्तव कल्पना असणाऱ्या श्रीमंत उद्योगपतीची कथा असलेला, त्यावर भाष्य करणारा ‘कांचनजंगा’ (पुन्हा छबी विश्वास यांचीच भूमिका), ‘शाखा-प्रशाखा’, ‘महानगर’, ‘अगांतुक’ हे सगळे चित्रपटाची भाषा बोलणारे चित्रपट आहेत. यात कुठे आहे गरिबी आणि तिचे अवास्तव चित्रण?

‘पाथेर पांचाली’मध्ये गरिबी असली तरी हरिहर आणि सर्वजया ती मिरवत नाहीत. ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ या चित्रपटांत एका विशिष्ठ वर्गाच्या जीवनाचा आणि त्यांच्या जिवट अशा धारणांचा विस्तृत आलेख आहे. ‘त्रिवेणी’बद्दल अनेकांनी स्वतंत्र लिखाण केले आहे. १९५५ साली प्रदर्शित ‘पाथेर पांचाली’ हा या मालिकेतला पहिला चित्रपट आज एक आदर्श चित्रपट म्हटला जातो.

सत्यजित राय यांच्या चित्रपटातील भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचेदेखील मोठे योगदान आहे. सौमित्र चटर्जी हा त्यांचा लाडका अभिनेता. ‘अपूर संसार’, ‘देवी’, ‘तीन कन्या’, ‘अभिजन’, ‘चारुलता’, ‘कापुरुष’, ‘अरण्येर दिन रात्री’, ‘अशांनी संकेत’, ‘सोनार केला’, ‘जय बाबा फेलूनाथ’, ‘घरे बाईरे’, ‘गणशत्रू’ अशा चित्रपटांतून चटर्जी यांनी विविध भूमिका साकारल्या. ‘गणशत्रू’मधील डॉ. अशोक गुप्ता ही त्यांची अखेरची भूमिका ठरली. ‘अपूर संसार’, ‘देवी’, ‘अरण्येर दिन रात्री’ या चित्रपटांत शर्मिला टागोर नायिका आहे. ‘तीन कन्या’ आणि ‘अरण्येर दिन रात्री’ या दोन चित्रपटांतून अपर्णा सेनने भूमिका केल्या. माधवी मुखर्जी आणि ममता शंकर या दोन अभिनेत्रींनादेखील सत्यजित राय यांनी काही भूमिकांसाठी निवडले. माधवी मुखर्जी यांची ‘चारुलता’ तर एक अविस्मरणीय भूमिका होती. याशिवाय ‘कापुरुष-ओ महापुरुष’, ‘महानगर’ या चित्रपटांत ती दिसली. ममता शंकर ‘अगांतुक’, ‘गणशत्रू’ अशा काही चित्रपटांतून दिसली. ‘आगंतुक’मधील मध्यवर्ती भूमिकेसाठी सत्यजित राय यांनी उत्पाल दत्तची निवड केली होती. ते ती भूमिका अगदी जगले. वास्तविक त्या भुमिकेला अनेक पैलू होते, आणि ते एकाच वेळी व्यक्त व्हायला हवे होते. स्वत: उत्पाल दत्तसुद्धा साशंक होते. मात्र त्यांची भूमिका सत्यजित राय यांना शंभर टक्के आवडली.

अभिनेता किंवा अभिनेत्री दोन्ही बाबतीत सत्यजित राय कधीच बॉलीवूडकडे वळले नाहीत. त्यांची भिस्त ही कायम बंगाली कलावंतावरच राहिली. ‘अभिजन’ या चित्रपटात मात्र वहीदा रहेमानची निवड त्यांनी केली होती. गुलाबी ही भूमिका वहीदाने साकारली. ही अपवादात्मक परिस्थिती नेमकी काय होती, हे समजत नाही. ‘महानगर’मध्ये जया भादुरीलाही एक भूमिका दिली आहे.

या शिवाय आणखी एक अपवाद होता- तो ‘शतरंज के खिलाडी’चा. सत्यजित राय यांचा हा एकमेव चित्रपट हिंदी भाषेत होता. त्यामुळे शबाना आझमी, अमजदखान, संजीवकुमार, सईद जाफरी, फरीदा जलाल, अशी बॉलिवुड मंडळी त्यात दिसली. ‘पाथेर पांचाली’मध्ये स्टार-इमेज असणारे कलावंत सत्यजित राय यांना नको होते. सर्व अभिनेते त्याच भूमिकेसाठी जन्मले असे वाटावे इतके ते चपखल होते.  हरिहरच्या भूमिकेतील कानू बंदोपाध्याय, सर्वजयाच्या भूमिकेतील करुणा बंदोपाध्याय आणि इंदर आत्याच्या भूमिकेतील चुनीबालादेवी केवळ अप्रतिम. लहान अप्पू आणि त्याची बहीण दुर्गादेखील त्यांच्या लोभस अस्तित्वाने प्रसंग जिवंत करत होते. ‘अपराजितो’मध्ये पुन्हा कानू आणि करुणा बंदोपाध्याय यांच्याच भूमिका असणे अपरिहार्य होते. त्यानंतर आलेल्या (पण उशीरा) ‘अपूर संसार’मध्ये मात्र सौमित्र चटर्जी सत्यजित राय यांच्या चित्रपटात प्रथम आले.

‘अगांतुक’ हा सत्यजित राय यांचा अखेरचा चित्रपट. ते एकदा असे म्हणाले होते की, मी मध्यमवर्गीय बंगाली माणसासाठी चित्रपट काढतो. ‘अगांतुक’मध्ये त्यांनी एक वेगळे चिंतन केलेले दिसते. मुख्यत्वे ‘अगांतुक’ ही चार भिंतीतील कथा होती. त्यामुळे साहजिक त्यात संवादाचे महत्त्व मोठे होते. त्यामधील मुख्य भूमिका असलेल्या ‘पाहुण्या’साठी असलेले ते संवाद तितकेच बंगाली मध्यमवर्गासाठीसुद्धा होते. समाजात येत चाललेला उथळपणा, असंस्कृत वातावरण त्यांना व्यथित करते आहे. प्रीतीश (धृतमान चटर्जी) आणि पाहुणा मामा भूमिकेतील उत्पाल दत्त यांच्यातील हे संवाद मुळातून अनुभवायला हवेत.

सत्यजित राय यांना संगीताचीदेखील उत्तम जाण होती. सुरुवातीचे चित्रपट सोडले तर त्यांनी संगीताची बाजू स्वत:च सांभाळली होती. सुरुवातीला पं. अविशंकर, विलायतखान, अलीअकबरखान यांच्यासारख्या दिग्गज मंडळीकडे त्यांनी संगीताची बाजू सोपवली होती. मात्र संगीतावर त्यांचे प्रभुत्व असले तरी, दृश्याचे अभिप्रेत अर्थ त्यांच्या लक्षात येत नाहीत, असे त्यांच्या लक्षात आले. पाश्चात्य-संगीताची जानकारीदेखील त्यांनी मुक्तपणे वापरली आहे. ‘गोपी गाने बाघा ब्याने’सारखा चित्रपट तर संगीताची पार्श्वभूमी असलेला चित्रपट होता. ‘जलसाघर’ची कथा पडझड झालेल्या ऐश्वर्याची कथा होती. त्यात बैठकी गाण्याचा, मैफिलींचा रिवाज स्पष्ट व्हावा म्हणून त्यांनी बेगम अख्तरसारख्या दिग्गज गझल-साम्राज्ञीला नुसते गायलाचा लावले नाही, तर प्रत्यक्ष पडद्यावरदेखील सादर केले. ‘शाखा-प्रशाखा’ या चित्रपटाचा कथा-विस्तार मोठा होता. त्यात त्यांनी बाख आणि बेथोवेन यांच्या संगीताचा उपयोग केला आहे.

सत्यजित राय यांच्या चित्रपटावर अनेक जणांनी टीकाही केली आहे. ‘पाथेर पांचाली’ किंवा ‘अशांनी संकेत’सारख्या चित्रपटांतून त्यांनी भारतीयांचे दारिद्र्य फक्त दाखवले अशी टीका झाली. खासदार असणाऱ्या नर्गिस दत्त यांनी तर ही भारतीय गरिबीची निर्यात आहे असे उद्गार काढले होते. ‘मदर इंडिया’सारख्या चित्रपटातून असलेले भारतीयत्व नर्गिस दत्त यांना अभिप्रेत असावे. मात्र सत्यजित राय यांनी असा भावनिक कल्लोळ चित्रपटातून कधी येऊ दिला नाही. वित्तोरीया डी सिकाच्या चित्रपटातील नव-वास्तववाद त्यांनी कायम स्वीकारला आणि तोदेखील कुठेही बोजड किंवा बटबटीत होऊ न देता. म्हणूनच त्यांची गणना डी सिका, फेडरिक फेलिनी, किंवा अकिरा कुरोसावा यांच्याबरोबर केली गेली. भारतीय सिनेमासाठी ही एक मोठीच गोष्ट होती, आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘अगांतुक’ हा सत्यजित राय यांचा अखेरचा चित्रपट. प्रकृती बरी नव्हती, पण चित्रपट पूर्ण झाल्याचे एक समाधान नक्कीच होते. ज्या मध्यमवर्गीय बंगाली माणसासाठी सत्यजित यांनी निर्मिती केली, त्यांच्यासाठी एक आरसा त्यांनी ‘आगंतुक’मधून दाखवला होता. सहज सोपे प्रसंग असूनसुद्धा ती ढोबळ नीतिकथा होत नाही. “यानंतर आपल्याकडे सांगण्यासारखे काही राहिले नाही, जे आहे ते सांगून झाले आहे…” असे सत्यजित राय आपल्या पत्नीला- बिजोयाला का म्हणाले असतील? त्यांचे अभ्यासक, प्रसिद्ध लेखक विजय पाडळकर यांच्या पुस्तकातील (‘आनंदाचा झरा’, अभिजित प्रकाशन, पुणे) हा प्रसंग खरेच चटका लावणारा आहे.

सत्यजित राय राहिले असते तर, त्यांनी आणखी काही कलाकृती दिल्या असत्या, पण ते होणे नव्हते. २३ एप्रिल १९९२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्युच्या बातमीने कोलकाता शहर जवळपास थांबले होते. हजारोंच्या संख्येने लोकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रांगा लावल्या होत्या… ऑस्कर मिळवलेल्या एका ‘भारतरत्ना’चे ते अखेरचे दर्शन होते…

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

‘गणशत्रू’ : माणसाच्या आशावादी दृष्टीकोनाची, त्याच्या जिद्दीची गोष्ट सांगणारा सिनेमा - जयंत राळेरासकर

साहित्य, सिनेमा आणि सत्यजित राय - जयंत राळेरासकर

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......