धृपदाच्या जागी ख्याल, पण मग ठुमरीचं काय?
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • पं. अजय चक्रवर्ती यांची एक भावमुद्रा
  • Sat , 11 February 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe धृपद Dhrupad ख्याल Khayal ठुमरी Thumri

२२ जानेवारीला सुप्रसिद्ध अष्टपैलू गायक गुरू पं. अजय चक्रवर्ती यांची प्रत्येकी दीड तासांची दोन सत्रं झाली. आयोजकांनी जवळ जवळ हे गृहीतच धरलं होतं की, धृपदातून ख्यालाची निर्मिती झाली आणि पुढे ख्यालातून ठुमरीची. त्यामुळे या दोन सत्रांचे छापील विषय असेच होते. ख्यालाच्या बाबतीत निदान एवढं म्हणता येईल की, धृपद हा गानप्रकार (Form, आकृतीबंध) ख्यालाच्या आधी सुस्थिर, विकसित होता. पण ठुमरी ही ख्यालानंतरच आली असं इतिहासकार खात्रीनं सांगत नाहीत. ख्यालाचं पितृत्व अमीर खुस्रो यांना दिलं जातं. (अमीर खुस्रो यांच्याविषयी अंजली मालकर यांचा एक चांगला ब्लॉग वाचनात आला होता.)

काही विद्वान मात्र देवगिरीच्या राम अमात्यांच्या ‘रूपक प्रबंधा’त ख्यालाची बीजं शोधतात. कव्वाली (आणि ठुमरीसुद्धा?) परिष्कृत होऊन ख्यालाचं अंग बनली या मताला व्यापक मान्यता आहे. आकृतिबंधाला एवढं महत्त्व का द्यावं? टाळीचं वाक्य लिहायचं तर, कपडे बदलले तर आतला माणूस बदलतो का? या वाक्यावरची टाळी म्हणजे केवळ टाळाटाळी ठरते. अगदी कपडे-माणूस या रूपकात बोलायचं तरी कपड्यांच्या निवडीतून माणसाची ओळख होते. कपडे माणसाला स्थळ-काळ-संस्कृतीचा संदर्भ देतात. आणि जरा माझ्यासारखं (जड) बोलायचं तर प्रत्येक कलेत एका पातळीवर आशय-अभिव्यक्ती यात जवळजवळ अभेद असतो. म्हणून कलेच्या इतिहासात आणि अभ्यासात आकृतिबंधाला महत्त्व असतं.

नवा आकृतिबंध म्हणजे अभिव्यक्तीच्या एका नव्या युगाची सुरुवात, आशयाचं एक नवं दालन! (निदान, नवं दर्शन!) नव्या सांगीतिक गरजांतून नवा गानप्रकार – ख्याल – निर्माण झाला. नव्या सांगीतिक गरजा म्हणजे संगीताकडून उत्पन्न झालेल्या नव्या अपेक्षा. संगीतकला भविष्यात काय करू जाईल याची चाहूल. संगीत (ज्या काळात हा शब्द नव्हता त्या काळात) हे तंत्र होतं. आणि अपेक्षित परिणामांसाठी कमालीचा काटेकोरपणा अपेक्षित होता.

कला हीसुद्धा माणसाची आदिम प्रेरणा आहे हे जरी खरं असलं तरी माणसाच्या तांत्रिक वर्तनाचं कलाव्यवहारात रूपांतर होण्यासाठी शतकानुशतकांचा काळ लोटला असावा. ख्याल या गानप्रकाराची निर्मिती हा या प्रक्रियेतला निर्णायक टप्पा आहे. आणि एकंदर कालखंडाच्या तुलनेत तो अलीकडचा आहे.

ही पार्श्वभूमी स्पष्ट केली ती एवढ्याच साठी की, पं. अजय चक्रवर्ती जे काही बोलले (किंवा बोलले नाहीत) ते समजून घेता यावं. त्यांनी धृपदातून ख्याल (कसा) कसा उत्क्रांत झाला याचं तपशीलवार विवरण दिलं नाही (तशी अपेक्षा करणंही चुकीचं ठरेल). त्यांनी सुरुवात केली रागापासून आणि पहिल्या सत्रात ते प्रामुख्यानं रागाबद्दलच बोलले. रागाने येऊन आशीर्वाद दिला तरच (मैफलीत) काही जमतं…रागसंगीतात शक्ती आहे (काळाबरोबर) टिकून राहण्याची… राग म्हणजे काय? ‘रंजयति इति’ ही काही परिपूर्ण व्याख्या नाही. ग्रंथांत रागांचं योग्य वर्णन मिळत नाही. रागांची ओळख होत नाही. वादी-संवादी (दश लक्षणं) म्हणजे काही राग नाही. राग म्हटला की, मनात एक रूप येतं. हे रूप अर्थात त्या त्या कलाकाराच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून असतं. तुम्हाला किती आदर वाटतो, तुम्ही किती समर्पित होऊ शकता, या सगळ्यावर ते रूप अवलंबून असतं. जसं आमचं पाहणं तसं रागाचं रूप (आम्हाला दिसणार) देवाचं दर्शन मंदिरात घडत नाही, खरं दर्शन   -आत – आपल्या मनात घडतं.

संगीत म्हणजे ध्वनी नव्हे, संगीत म्हणजे पाहणं (दृष्टी!). रागाचं जे भावरूप- त्याच्याशी गीताच्या शब्दांचं लग्न लागलं की, संगीत उत्पन्न होतं. रागाचा एक दरारा (त्यांचा शब्द ‘डर’) वाटायला हवा. नुसत्या स्वरांच्या लड्या गुंफल्या की, राग बनत नाही.

आजकाल रागाचा दरारा कमी झाला आहे. इथं पं. अजय चक्रवर्ती यांनी नटभैरव रागाच्या स्वरांच्या काही ललित लड्या गुंफून दाखवल्या आणि विचारलं – “याला राग म्हणायचं का? कानाला गोड लागलं की झालं, तसं?” पुढे ते शेरा मारतात की, “आजकालचे कलाकार रागाचे स्वर पाहतात, रागाला पहायची तसदी घेत नाहीत. रागाचे स्वर वापरून जुळवलेल्या स्वरावल्या म्हणजे धून. तो काही रागाचा आविष्कार नाही.”

दुसऱ्या सत्रात याच संदर्भात ते म्हणाले – “राग उभा राहण्यासाठी लय समजणं फार महत्त्वाचं आहे. रागाचे निव्वळ स्वर घेतले आणि स्वरावली गुंफली तर ती धूनच राहते. स्वरावली रागवाचक होण्यासाठी त्या स्वरावलीच्या बांधणीत लयविचार हवा. लयीच्या सुयोग्य वापरानं एखाद्या स्वराचं प्राधान्य-गौणत्व व्यक्त व्हायला हवं.” राग सिद्ध करण्याच्या (सोप्या भाषेत उभा करण्याच्या) प्रक्रियेत आणखी एका घटकाकडे त्यांनी लक्ष वेधलं. तो घटक म्हणजे स्पर्श-स्वर. राग टिकून राहिले तर(च) आपल्या देशाचं संगीत टिकेल, राग गेले तर सर्व काही जाईल. राग राहिले तर धृपद, ख्याल, ठुमरी सगळं काही राहील.

रागाविषयी एवढं सारं बोलताना धृप-ख्याल ठुमरी याबद्दल त्यांनी काय सांगितलं? - ‘देशाचा राष्ट्रपती!’ हे एक रूपक घेऊन ते बोलले. राष्ट्रपती रस्त्याने जाऊ लागले की, आपण बाजूला होऊन उभं राहायचं असतं. पण तेच राष्ट्रपती जर घरी आले तर आपण त्यांच्याशी बोलू शकतो. राष्ट्रपतींवर बंधनं असतात. ते कुठेही जाऊ शकत नाहीत. आपण जाऊ शकतो. याच संदर्भात (बहुधा) ते म्हणाले, “हिंदुस्थानी संगीतात धृपद, कर्नाटक संगीतात कृती या निबद्ध असतात. त्या रचना आहेत तशाच्या तशा म्हणाव्या लागतात. या बंधनातून स्वातंत्र्य शोधताना ख्याल आला. ” त्यापुढे ते असंही म्हणाले की, “पूर्वी ख्यालात धृपदाचं अंग अधिक होतं. आता ते फार कमी आहे.”

हुश्श! हा वृतान्त वाचून तुम्हीही थकला असाल. पण प्रत्यक्ष सत्रांमध्ये अत्यंत तयारीची, सुमधुर प्रात्यक्षिकं ज्या तत्परतेनं दिली जात होती, त्यामुळे अवघा श्रोतृवृंद मंत्रमुग्ध होता!

या सर्व निरीक्षणांची काही एक संगती लावण्याचा प्रयत्न मला आता करायचा आहे. धृपदात शास्त्र चांगलं पाळलं जात असलं तरी त्या निबद्ध गानप्रकारात उत्स्फूर्ततेला वाव फारच कमी होता. कलाकाराला स्वत:साठी काही जागा हवी असते. त्यालाच स्वातंत्र्य म्हणता येईल. तर ही जागा ख्यालाने निर्माण केली. तुम्हाला दिसतो तसा राग उभा करा, ही ख्यालाची मागणी आहे. म्हणजेच एकजिनसी, सुसंगत, प्रसरणशील असं घटित म्हणजे राग.

ख्यालाच्या अलीकडे शास्त्रबद्ध रागस्वरूप आहे, पण त्या रूपाला आपल्या नजरेनं बघण्याचं स्वातंत्र्य नाही (किंवा तशी इच्छाच नाही). ख्यालाच्या पलीकडे सांगीतिक निर्मिती आहे. पण राग म्हणून जे अंतस्थ सुसंघटन हवं ते नाही. साहजिकच रागाच्या संदर्भात ख्यालाच्या उत्पत्ती-स्थिती (विकास)-लय या प्रवासाचा आलेख नजरेसमोर येतो. रागाच्या अभिव्यक्तीसाठी ख्यालाचा अवतार आहे. व्यक्तिसापेक्षता, उत्स्फूर्तता ही भूमी रागाच्या प्रकट होण्यासाठी आवश्यक, पोषक आहे. म्हणून धृपदाची निबद्धता ख्यालानं नाकारली आहे. (पंडितजींनी उल्लेख केला नाही, पण मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे ज्या अन्य गानप्रकारांत या मूल्यांना स्थान आहे, होतं, ते गानप्रकार ख्यालात अंतर्भूत आहेत.) व्यक्तिसापेक्षता, उत्स्फूर्तता म्हणजे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य मर्यादेबाहेर जाऊ लागलं तर रागपण राहणार नाही. आणि जर रागच उरला नाही तर ख्यालाचा अवतार संपलाच म्हणायचं! अजयजींनी जाता जाता हेही सांगितलं की, पं. रविशंकर यांचीही हीच तळमळ आहे की, राग टिकला पाहिजे. रविजींनी अजयींना सांगितलं की, संगीत शिकवताना शिष्यांना रागाचं भान द्या.

धृपद-ख्याल-ठुमरी हा कालक्रम सांगितला जातो. त्यामागे काही कारणं आहेत. ख्यालाच्या सुरुवातीच्या काळात ख्याल हा जनाना संगीतप्रकार समजला जाई. अधिकतर स्त्रिया ख्याल गात आणि विद्वान पंडित, उस्ताद धृपद गात. हळूहळू मैफलींतून धृपद मागे पडलं आणि ख्यालाला ‘मेन कोर्स’ मान्यता मिळाली. मग ख्याल हा गंभीर गानप्रकार समजला जाऊ लागला. म्हणजेच हळूहळू जुन्या काळातल्या धृपदाची जागा ख्याल घेऊ लागला.

मात्र अजूनही ठुमरी मैफलीचा मुख्य भाग बनलेली नाही. आजच्या घडीला ख्यालाच्या तुलनेत ठुमरीच कालबाह्य ठरू लागली आहे आणि मागेही पडली आहे. गंमत, हलकंफुलकं मनोरंजन जोराने पुढे आल्यामुळेही ठुमरी मागे पडली असेल. पण मग ख्याल तरुण तुर्क, बंडखोर अवतारातून कर्त्या, गंभीर तीर्थरूपांच्या श्रेणाला आणि आता हळूहळू पितामहांच्या श्रेणीला पोचत चालला आहे की काय? पितामहानंतर त्याची जागा भिंतीवरच्या फोटात किंवा पुराणवस्तू संग्रहालयात असेल की काय? की ख्यालाला चिरयौवनाचं वरदान लाभलेलं आहे? उत्तरं देता येत नसली म्हणून काय झालं? प्रश्न विचारण्याला कोण अडवतंय?

लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com