संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे काय बोलले, तुम्हाला काही कळले?
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टप्पू सुलतान
  • ९०व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह व संमेलनाध्यक्ष
  • Sun , 05 February 2017
  • साहित्य संमेलन Sahitya Sammelan अक्षयकुमार काळे Akshaykumar kale

९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची दखल ना प्रसारमाध्यमांनी घेतली, ना साहित्यक्षेत्राने घेतली ना साहित्य संमेलनाला उपस्थित असलेल्या साहित्यरसिकांनी घेतली. कारण तशी दखल घेण्यासारखे त्यात काहीही नाही. ३०-४० वर्षं निष्ठेने साहित्य समीक्षा करणाऱ्या व्यक्तीकडे इतक्या वर्षांनंतरही फारसे काही सांगण्यासारखे नसावे, हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. त्यामुळे त्यांच्या संपादित भाषणाचा अंश न देता त्याच्या छापील ४० पानी भाषणातील काही विधाने व परिच्छेद पाहू आणि त्यांचा समाचारही घेऊ.  

...........................................................................................................

मराठी साहित्याने प्राप्त करावयाच्या सर्वंकष महात्मतेचा व त्यांच्या प्रभावाने मराठी संस्कृतीला लाभणाऱ्या उज्ज्वलतेचा पुनःपुन्हा विचार करणे अपरिहार्य ठरते.

केला नसता तरी चालले असते. राजवाडे, केतकर यांच्यापासून फक्त विचारच केला जातो आहे. प्रत्यक्ष कार्यवाही कोण करणार? कधी करणार? आपल्या दारातील घाण इतरांच्या दारात लोटून आपला परिसर स्वच्छ होत नसतो.

मानवकेंद्री संपन्न संस्कृतिविचारांचा अवलंब...

म्हणजे काय? संदर्भासह स्पष्टीकरण द्यायला हवे होते.

अद्यतन संस्कृतीच्या विकासपूर्व अवस्थेत...

म्हणजे काय नेमके? जरा समजावून सांगता का?

भाषिक समृद्धता किंवा भाषिक विकास हा भाषेतील नैसर्गिक जोम आणि मानवी प्रयत्न यांच्या संमिश्रणाने घडून येतो.

नैसर्गिक जोम माणसं निर्माण करू शकत नाहीत, पण तिला खिळ घालण्याचे, अटकाव करण्याचे आणि त्यावर कुरघोडी करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचे उद्योग माणसं करत असतात. मराठी साहित्यिक, समीक्षक आणि संमेलनाध्यक्ष तर नेहमीच करतात. असेच होत असेल तर कसला डोंबलाचा होणार भाषिक विकास वा समृद्धता!

खेड्यापाड्यांतल्या, उपेक्षित वस्त्यांतल्या, कलाशाखेतल्या सतत हिणवले जाणाऱ्या, पोरक्या ठरू पाहणाऱ्या मराठी माध्यमातील शिक्षणाकडे कानाडोळा करून इंग्रजी शिक्षणमाध्यमाच्या राजरस्त्यावरून विज्ञान, तंत्रविज्ञान, वैद्यक, व्यवस्थापन, विधी इत्यादी क्षेत्रांतील शिक्षण पूर्ण करून युरोप-अमेरिकेची दारे ठोठावता येतात, याबद्दल पुरेपूर खात्री पटल्याने आमच्या केवळ उच्चभ्रू समाजानेच नव्हे, तर सर्व जातिगटांतील मध्यमवर्गीय समाजाने देखील मराठी माध्यमातील शिक्षणाकडे एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून, त्याकडे कायमची पाठ फिरविली आहे.

काळेसाहेब, ज्या विषयाबाबत आपला अभ्यास नाही, त्याबाबत इतकी धाडसी विधाने करायची नसतात, हा मूलभूत नियम तुम्हाला माहीत नाही का? एकवेळ विद्यापीठीय चर्चासत्रात अशा वावदूक विधानांना साहित्यसिद्धान्ताचे मोल येऊ शकते. सार्वजनिक व्यासपीठावरून अशी विधाने केली तर ती महागात पडू शकतात. मुख्य म्हणजे त्यामुळे आपली ‘गुणवत्ता’ पारखण्याची संधी इतरांना आपण देतो. त्यामुळे तुमच्या या अहर्निश धाडसाचे कौतुकच करावे लागेल.

एकीकडे आम्हाला इंग्रजीचे अवास्तव प्राबल्य नको आहे व दुसरीकडे इंग्रजीतून शिकले नाही तर जगण्याचेच प्रश्न निर्माण होतील, या भयंकर भीतीचा बागुलबोवा आमच्या मानगुटीवर बसला आहे. काही संवेदनशील मनांना याबद्दल वाटणारी खंत जांभईसारखी वर येते खरी, पण दोनचार आळोख्यापिळोख्यांत ती आपोआपच विरून जाते.

साफ चूक. मराठी भाषेला नेभळट, कुचकामी आणि निरुपयोगी बनवण्याचे काम तुमच्यासारख्या साहित्यातल्या लोकांनी केल्यामुळेच नव्या पिढीला इंग्रजीचा घ्यावा लागतो. फ्रान्स, जपान, चीनमध्ये जगातील सर्व ज्ञान त्यांच्या मातृभाषेत लगोलग उपलब्ध होते. आपल्याकडे मराठी विश्वकोश पूर्ण व्हायलाही चाळीस-पन्नास वर्षं लागली. याला जबाबदार कोण? मराठी साहित्यिक व समीक्षकच ना?

चतुर व्यावसायिक शिक्षणसम्राटांनी शुल्क आणि देणग्या घेण्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने, केवळ इंग्रजी शिक्षणाच्या आपल्या साम्राज्यांचा जगज्जेत्या अलेक्झांडरच्या पराक्रमाला लाजवेल असा वैभवशाली विस्तार केला. त्यांच्या पंचतारांकित शाळा आणि महाविद्यालयांसमोर आज आमच्या मराठी शाळा भिकारणीसारख्या आसवे गाळीत बसल्या आहेत.

बच्चेलोग, टाली बजाव. क्या बात कही है काळेजीने. अशी वावदूक विधाने करून फक्त टाळ्याच मिळवता येऊ शकतात, काळेसाहेब!

इंग्रजी भाषेच्या तोंडदेखल्या दिखाऊ दुस्वासापेक्षा या दुर्धर परिस्थितीत मराठी-इंग्रजीचा मुळापासून समन्वय कसा साधता येईल याचा प्रयत्न करणे अधिक अगत्याचे झाले आहे.

हे अगत्याचे प्रयत्नाचे रडगाणे दरवर्षीच्या संमेलनात गायले जाते. प्रयत्न मात्र कुणीच करत नाही. संमेलनाध्यक्ष भाषण ठोकून, तीन दिवस संमेलनात मिरवून घेतो आणि नंतर वर्षभर शाली, श्रीफळ यांचे सत्कार स्वीकारत राहतो. त्याला फक्त त्याच्याशी अगत्य राहते. आणि बाकीचे साहित्यिक ‘मेरा नंबर कब आयेगा’ करत संमेलनाध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावतात.

केवळ ओठांच्या पाकळ्या हलवून ‘इंग्रजी हटाव’ची केली जाणारी घोषणा सद्यःस्थितीत अतिशय पोकळ ठरलेली असून तिच्यात तत्त्वतः काही अर्थ उरलेला नाही.

हे मात्र सोळा आणे बरोबर बोललात तुम्ही!

इंग्रजी भाषेचे पाय न तोडता मराठी भाषेची उंची आपल्याला वाढविता का येणार नाही?

येऊ शकते. आपली उंची वाढवण्यासाठी इतरांना खुजे करण्याची गरज नसते, एवढे लक्षात घेतले तरी पुरेसे असते.

जाचक नसणारा प्रभावी कायदा, आत्म्याला हात घालणारे प्रबोधन आणि पुरस्कारात्मक उत्तेजन ही लोकशाहीतील परिवर्तनाची प्रभावी साधने होत.

कुठल्याही मराठी साहित्यिकाला लोकशाहीबद्दल ओ की ठो कळत नाही असं म्हणतात. आता तुमच्या रूपाने त्यात मराठी समीक्षकांचीही भर पडलेली दिसते. आपण काय आणि कशाबद्दल बोलतो, याबद्दल तरी तारतम्य बाळगा राव! शब्दांचे फुलोरे उडवून परिवर्तन होत नसते.

भाषा हे केवळ व्यवहारक्रियेचेच साधन नाही तर मानवी मनांना जोडणारे, व्याज धर्माभिमान आणि वृथा प्रदेशाभिमान यांना नष्ट करणारे प्रबलतम साधन आहे.

असेल असेल, कुणास दखल. पुराव्यादाखल प्रत्यक्षातली तशी काही उदाहरणे तुम्हाला दाखवता येतील का?

अगदी साहित्यशास्त्रीय संज्ञाबोधाप्रमाणे शब्दशक्तीद्वारा प्राप्त होणारा अर्थ मराठी भाषकांना समजला पाहिजे असेही नाही.

बरोबर आहे. साहित्यरसिक तेवढे सूज्ञ आहेत. म्हणूनच तर ते अगम्य आणि शब्दबंबाळ किंवा विनाकारण पांडित्याचा आव आणून केलेली निरर्थक साहित्यशास्त्रीय संज्ञाबोधमय समीक्षा वाचत नाहीत.

व्यावहारिक पातळीवर अनेक इंग्रजी शब्द-संज्ञा मराठी भाषेत प्रविष्ट होऊन रुळल्यावर त्यांच्या जागी नव्या कृत्रिम संज्ञा तज्ज्ञांकडून जरी करून घेतल्या, तरी सामान्य पातळीवर त्यांच्या उपयोजनाबाबत अनेक प्रश्न, अनेक अडचणी उभ्या राहतात. दुसरे असे की मराठी परिभाषेवर संस्कृत भाषेचा अतिरेकी प्रभाव आहे.

या तुमच्या निरीक्षणात नवे काहीही नसले तरी तुमचे निरीक्षण बरोबर आहे. पण नुसते आजाराचे निदान करून भागत नसते, त्यावर उपाययोजनाही करावी लागते. नाहीतर रोगी दगावतो.

‘मॅजिकल’साठी ‘जादुई’ अशी संज्ञा का रूढ करू नये?

करा की रूढ, कुणी अडवलंय तुम्हाला. चांगल्या कामासाठी इतरांची वाट पाहायची नसते. मुख्य म्हणजे त्याची सुरुवातही स्वत:पासूनच करायची असते. आता वर्षभर तुम्ही महाराष्ट्रभर जी भाषणं कराल, सत्कारप्रसंगी बोलाल, मुलाखती द्याल, चर्चासत्रात भाग घ्याल, त्या प्रत्येक ठिकाणी हा शब्द तुम्ही किमान दहा वेळा तरी वापरा, म्हणजे तो रूढ होण्याची मुहूर्तमेढ आपोआपच रोवली जाईल.

ज्ञानभाषेसाठी बहुजनसमाजाला धसका बसेल असे शब्दप्रयोग करण्यापेक्षा त्यांच्या किमान परिचयाचे शब्द, मग ते कोणत्याही भाषेतून आलेले का असेनात, त्यांचा आम्ही स्वीकार केला पाहिजे.

सहमत. घासलेट (रॉकेल), फुलवर (फ्लॉवर) यांसारखे कितीतरी नितांतसुंदर शब्द बहुजन समाजानेच तयार केलेले आहेत. त्याचा तुम्ही तुमच्या साहित्यातून आजवर फारसा वापर केला नसला, तरी निदान अध्यक्षीय भाषणात केला असता, तरी तुमचे भाषण सुसह्य झाले असते.

ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून आमचे अखंड प्रयत्न सुरू आहेत.

आमचे म्हणजे? कुणाचे? त्यात कोण कोण लोक येतात? अहो, निदान ‘आपण’ म्हणायला तरी शिकावे. इतका अपपरभाव बरा नाही. तुम्ही तर काहीच प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. साहित्य समीक्षा करून मराठी भाषा ज्ञानभाषा होणार आहे का? हरी नरकेंना हे कळले तर तुमची काही खैर नाही.

न्यायशील केंद्र सरकार अपेक्षित न्याय प्रदान करील, अशी मी आशा बाळगतो. यथोचित पुरावे दिल्यानंतर निर्णयात दिरंगाई होत असेल तर मराठी जनतेला यासंदर्भात आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही; तथापि अशी पाळी केंद्र सरकार आमच्यावर येऊ देणार नाही, अशी मला आशा वाटते.

समजा तशी पाळी आलीच दुर्दैवाने तर ती सुवर्णसंधी समजून असे आंदोलन उभारण्यात तुम्ही सक्रिय पुढाकार घ्यावा किंवा त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे. आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरू. व्हा नेता, बनू जगजेता!

इतिहासाचार्य राजवाड्यांचे, मराठी भाषा ‘मुमूर्षू’ आहे, हे भाकीत खोटे ठरवून त्यांच्या विधानाचा पराभव करण्यात राजवाड्यांच्या जाज्वल्य मराठी प्रेमाचा आणि मराठीची अहर्निश चिंता वाटणाऱ्या वृत्तीचा खरा गौरव होणार आहे.

शंभर टक्के सत्य बोललात! हा पराभव कसा करायचा? कुणी करायचा? त्यासाठी कुठली शस्त्रे वापरायची? कुणाच्या मार्गदर्शनाखाली हा लढा लढायचा? याबाबतही थोडे मार्गदर्शन करा, तमाम महाराष्ट्र तुमचा आभारी राहील.

मराठी लेखकाच्या कल्पनात्मक प्रतिक्रियांतील निर्जीव आवर्तितता आणि अंतर्निष्ठ अनुभवविस्तृततेचा अभाव या उणिवा दाखविताना लेखकाचा जीवनानुभव व्यापक असला पाहिजे, त्याच्या अनुभूतीत चैतन्य असले पाहिजे, त्याच्या कल्पनात्मक प्रतिक्रिया जिवंत असल्या पाहिजेत आणि त्याच्या विचारभावनांत सखोलता असली पाहिजे, हे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

तुम्ही साहित्य समीक्षक आहात आणि त्याला साजेसेच तुम्ही बोलता आहात. फक्त या विधानाचा आम्हा पामर वाचकांसाठी सुगम मराठीमध्ये अनुवाद कराल का?

शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ विश्वाविषयी, व्यक्तीविषयी, व्यक्तिसमूहाविषयी विज्ञानाच्या आणि तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जगाला ज्ञानसंपन्न करीत असतात तशी ज्ञाननिर्माणशक्ती आणि ज्ञानसंपन्नता लेखकाजवळ नसली तरी श्रेष्ठ लेखकाची स्वतःची म्हणून एक क्षमता असते.

तुमचा हा सिद्धान्तही आतापुरता मान्य करू. पण ती क्षमता कुठली? याबाबत काही मार्गदर्शन मिळवायचे झाले तर काय करावे? कुणाचे घ्यावे?

मराठी पंडित कवींची बहुतांश निर्मिती महाभारताचे पुनःसर्जन करण्यात आणि कृष्ण-रुक्मिणीचा तोच तो शृंगार आळवण्यात खर्ची पडली. समकाळाशी सहकंप पावण्याचे आणि विश्वातील नावीन्यशोधनाचे त्यांचे इंद्रिय लुळे पडले. या प्रवृत्तींचा आधुनिक आविष्कार मराठी पौराणिक कथा-कादंबऱ्यांच्या रूपाने झाला. ही प्रवृत्ती आज गाजरगवतासारखी फोफावतच चालली आहे. शिवशाहीच्या उदयापासून पेशवाईच्या अस्तापर्यंतच्या इतिहासप्रेमाचे गोड भूत आमच्या लेखक-रसिकांच्या मानगुटीवर असे काही स्वार झाले आहे की, त्यापुढे थोरल्या बाजीरावाची मांडही ढिली ठरावी. या काळातील पात्रप्रसंगांच्या नावावर कशाही कादंबऱ्या का लिहाना, पण नुसता मुखपृष्ठावरील उसळता घोडा, क्रुद्ध स्वार, स्तब्ध ढाल, उंचावलेली तलवार, नाचता भगवा झेंडा, पार्श्वभूमीला सह्याद्रीच्या पुसट रांगांचा आभास आणि मलपृष्ठावरील ‘समशेरी’ मजकूर एवढ्या भांडवलावर पुस्तकांच्या बाजारात त्या अगदी अटकेपार निघून जातात.

व्वा, काय पल्लेदार भाषा, काय ती शक्तिमान वाक्ये, काय ती बहारदार शैली! साक्षात सरस्वतीदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे, काळेसाहेब! भाग्यवान आहात!! (पण मनावर मनाभर वजनाचा दगड ठेवून हा परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचला तरी धाप लागण्यापलीकडे काहीच जाणवत नाही.)

लेखकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की समकालीन सामान्य अभिरुचीचा, बाजारलक्ष्यी विचाराचा किंवा तशी विचारगणिते करण्यात प्रवीण असणाऱ्या प्रकाशकांच्या आग्रहाचा विचार करून आपले साहित्य; विशेषतः नाटके आणि कादंबऱ्या निर्माण करण्यापेक्षा आपले हृदय, मन, चित्त ज्या अनुभूतीने भारून गेले आहे तिचे मर्म समजून आपल्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत वाङ्मयप्रकारात निर्मिती केल्यास तिला काही एक दर्जा मिळू शकेल.

नक्की ना? कन्फर्म? आपका जबाब लॉक किया जाय?

तीच ती ‘प्रणयरम्य(?)’ कथानके किंवा कथासूत्रे आपली रूपे थोडीफार बदलवून पुनःपुन्हा आविष्कृत होत जातात. अवास्तव लैंगिकता, जाणीवपूर्वक मधूनमधून पेरलेला रतिव्यवहार, अद्भुताकडे नेता येईल अशी धूसर स्थलवर्णने, थोडे रहस्य, थोडीशी गुंतागुंत, थोडा संघर्ष, व्याज भावनांचे भरणपोषण करणारे वातावरण यांनी भारलेल्या कथा-कादंबऱ्यांनी आमच्या साहित्याची अधिकांश जागा व्यापून टाकावी यात आश्चर्य नाही; तथापि ज्यांच्याकडून काही अपेक्षा बाळगावी असे लेखकही त्याकडे ओढले जाऊन त्याच युक्त्यांचा प्रच्छन्नपणे अनुनय करतात, तेव्हा स्वप्नरंजनाचे गारूड भल्याभल्यांवरही आपले स्वामित्व कसे गाजवू शकते, याचा प्रत्यय येतो.

या परिच्छेदाचेही उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले असते, तर तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे आणि मुख्य म्हणजे नेमके कुणाविषयी म्हणायचे आहे ते तरी कळले असते.

विशिष्ट काळात विशिष्ट वाङ्मयीन वाद मराठी साहित्यप्रांतात आपले अधिराज्य गाजवताना दिसतात. मग आशय-मजकुराची उसनवारी करून आमचे काही लेखक गांधीवादी, मार्क्सवादी, स्त्रीवादी, अस्तित्ववादी, देशीवादी साहित्य लिहू लागतात व आमचे तत्पर समीक्षक अशा साहित्यातील तो तो वाद शोधशोधून आपल्या शोधपत्रिकांचे लेखन पूर्ण करतात. पुष्कळदा अशा वादांचे हवाबंद कप्पेही पडलेले आढळतात. वस्तुतः श्रेष्ठ साहित्यकृती अशा कोणत्याही वादाची बटीक नसते. विशिष्ट वादाचे किंवा त्यातील काही तत्त्वांचे प्रकटीकरण करण्याकरिता ती जन्मास येत नाही.

अनेक वेळा अनेकांनी अनेक ठिकाणी सांगितलेले हे तत्त्वज्ञान आहे. पण ते अजून काही वर्षं असेच सांगितले गेले, तरीही त्याला साहित्यसिद्धान्ताचा दर्जा मिळेल असे वाटत नाही. कारण ते तसे सामान्य निरीक्षण आहे.

मराठीतील बहुतांश ‘वादनिष्ठ’ लेखकांनी गांभीर्यपूर्वक, जीवननिष्ठा म्हणून त्या वादांचा स्वीकार केलेला नसतो. ते केवळ त्या वादाच्या क्षणिक प्रेमात पडले असतात किंवा त्या वादातील फुटकळ तत्त्वपिसांनी आपला आशयपिसारा अधिक चांगला फुलवता येईल अशी निर्मितिव्यवहारासंबंधी व्याज समजूत त्यांनी करून घेतलेली असते.

वरकरणी तुमचे विधान पटते. पण करणी तशी भरणी!

वाङ्मयीन पंथप्रवाहांची, तत्त्वविचारांची आणि आचारधर्मांची वाढत चाललेली बंदिस्तता वाङ्मयविकासाच्या मार्गातला मोठाच अडसर आहे, हे आम्ही वेळीच ध्यानात घेतले पाहिजे.

बरोबर आहे, बरोबर आहे. (हंशा आणि टाळ्या)

निरीश्वरवाद्यांना आणि अनात्मवाद्यांना संतांच्या भक्तिकाव्याला स्पर्श करावासा वाटत नाही आणि अतिधार्मिक वृत्तीने ग्रासलेल्या वाचकांना बुद्ध, चार्वाक, मार्क्स यांच्या प्रभावाने निर्माण झालेल्या साहित्यकृतींकडे ढुंकून बघावेसे वाटत नाही.

कुणीही हातचे सोडू पळत्याच्या पाठीमागे धावत नसते! तुम्ही तरी धावाल का?

सौंदर्यरूप प्राप्त झाल्याशिवाय कलाकृतीला श्रेष्ठत्व लाभणे शक्य नाही. इतके तरी लक्षात घेणे अवश्यच आहे.

म्हणून तर लोकांनी हल्ली साहित्य समीक्षा वाचणे सोडून दिले आहे.

एक व्यवस्थाभंजक कादंबरी लिहून प्रस्थापित झालेल्यांनी बोटे शिणून जाईपर्यंत लिहिलेल्या कादंबऱ्या वाचणे हे एक आस्वादशून्य आवाहनच होऊन बसते.

आमच्या मनातलं बोललात! पण अशा कादंबरीकारांची काही नावे दिली असती, तर तुमचा रोख कळला असता!!

वैश्विकतेकडे स्फुरण पावणारे ज्ञानविज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व, व्यापक जीवनानुभव, आवर्तित जीवनकल्पनांना भेदणारे विकसनशील चिंतन, जीवनाचा पृथगात्म साक्षात्कार, त्याचा शैलीसंपन्न रूपसौष्ठवाने नटलेला आविष्कार व त्याची आस्वाद्यमानता या श्रेष्ठ वाङ्मयकृतीला महान बनविणाऱ्या अटी पूर्ण होणार असतील तरच मराठीत श्रेष्ठ पातळीवरचे साहित्य निर्माण होईल.

म्हणजे काय नेमके? आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलता आहात त्यांची नावे सांगितली असती उदाहरणादाखल तर बरे झाले असते.

ज्या मराठीच्या कुशीत ज्ञानेश्वर-तुकाराम जन्मले ती कूस अनुज्ज्वल आहे, असे आपण का समजावे? केशवसुतांनंतर वाट पाहावी लागते, पण मर्ढेकर जन्मतातच.

हा सोयीस्करपणा झाला. म्हणजे मर्ढेकरांनंतर मराठी साहित्यात नाव घ्यावे असे कुणीच नाही का? असे अनुल्लेखाने मारणे, ही समीक्षकांची फॅशनच झाली आहे हल्ली! ब्रुटस, यू टू?

प्रत्येक व्यक्तीलाच आपल्या कार्याचे कौतुक हवे असते. तिथे संवेदनशील कलावंताला ते अधिकच हवे असणार यात काही फार आश्चर्य नाही.

नव्या शब्दांत सांगितले म्हणून ते मौलिक ठरत नाही. हे हजार लोकांनी हजार वेळा सांगून झालेले आहे. तुम्ही याला अपवाद नाहीत, हे तुम्ही येत्या वर्षभरात दाखवून द्या.

पूर्वग्रहमुक्तता आणि व्यापक स्वीकारार्हता प्राप्त करणे या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नसतात. व्यक्तिमत्त्वाचे उन्नयन करून अभिरुचीचा विकास साधून, तिची परिशुद्धी करून प्रगल्भतेची पातळी त्यासाठी त्याला गाठावी लागते.

हातच्या कांकणाला आरसा कशाला. तुम्ही काय करता हे आम्हीच पाहू की!

भाषेची सातत्यपूर्ण वर्धिष्णुता, तिच्यात निर्माण होणाऱ्या श्रेष्ठतम साहित्यकृती, त्यांचा निर्विघ्नपणे घेतला जाणारा आस्वाद यातून श्रेष्ठ वाङ्मयीन संस्कृती आकारास येते. तिला निकोप करून दिशा दाखवण्याचे कार्य समीक्षा करीत असते.

तुमची समीक्षा या निकषावर तोलायची झाली तर?

समीक्षक हा ललित लेखकाला खिंडीत गाठून हल्ला चढविणारा आणि युयुत्सुपणाचे बिरुद मिरविणारा भयपुरुष नाही. मूलतः तो रसिक आस्वादक असून साहित्यकृतीचा संरक्षक आणि सुबुद्ध, सुसंस्कृत प्रशंसक आहे.

तुमच्या भाषणात तर तुम्ही या सुसंस्कृत प्रशंसकाची भूमिका निभावल्याचे कुठे दिसत नाही.

वाङ्मयीन संस्कृती अशा रीतीने मूलत: भाषेपासून सुरू होते. श्रेष्ठ वाङ्मयीन कृतींनी ती संपन्न होते, त्यांच्या आस्वादानेच ती बहरत असते व समीक्षेच्या पाठराखणीमुळे व दिशादिग्दर्शनामुळे विवक्षित आदर्श दिशेकडे निरंतर मार्गक्रमण करते. तिच्या वाढविकासावरच एकूण संस्कृतीचे भवितव्य अवलंबून असते.

एकूण संस्कृतीचे भवितव्य माहीत नाही. मराठी साहित्य समीक्षेला मात्र भविष्यकाळ उरलेला नाही आणि वर्तमानकाळ तर नाहीच नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

George Threepwood

Mon , 13 February 2017

इंटरेस्टिंग! या विषयावर बरेच काही लिहिता-बोलता येईल.


ADITYA KORDE

Sun , 05 February 2017

कोणतीही जिवंत भाषा एकाद्या साचलेल्या पाण्याच्या डबक्यासारखी नसते.वाहत्या नदी सारखी असते. मागून आलेल्या प्रवाहातले थोडे पाणी आणि त्यातला गाळ कांठावर पसरवत आणि ओहोळ, ओढे, नाले वगैरेमधून आलेल्या पाण्याला सामावून घेत नदीचा प्रवाह जसा पुढे जात असतो त्याचप्रमाणे उपयोगात नसलेले शब्दप्रयोग गाळून टाकत व निनिराळ्या ठिकाणाहून नवनवे शब्दप्रयोग घेत भाषा वहात असते. आज मी जे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात व लिखाणात वापरतो ते सारे मी कुठे ना कुठे कधी ना कधी पुनःपुनः ऐकलेले किंवा वाचलेले असतात. सतत उपयोग होत असल्यामुळे ते चलनात असतात. उपयोग कमी झाल्यानंतर ते बाहेर फेकले जातात. त्याचप्रमाणे जीवनशैलीतील बदल, वाचन, प्रसारमाध्यमे आणि इतर लोकांशी होणारा संपर्क इत्यादींमधून त्यात अनेक नवनवे शब्द समाविष्ट होत राहतात. ही प्रक्रिया अत्यंत संथपणे आणि बिनबोभाटपणे सतत चाललेली असते.मराठी भाषा गेल्या ५०-६० वर्षात फार बदलली. तिच्यातली संस्कृत प्रचुरता गेली, वाक्य छोटी झाली, ‘जेहत्ते काळाचे ठायी’ किंवा ‘ एकसमयावच्छेदेकरून’ अशा जडजंबाल शब्दांचे श्रीवर्धनी रोठे( सुपाऱ्या) फोडून अर्थ वेगळे काढायची गरज उरली नाही. नुसती लोकांची बोलणी नाही तर नाटक, सिनेमा, मालिकांमधून लांबच लांब पल्लेदार वाक्य आणि ती एका दमात म्हणून टाळ्या घेणारे अभिनय सम्राट हि गेले. लोक खरं खरं अभिनय वगैरे करू लागले.(काय हा अत्याचार!) एकदा रेडियो मिरची का असाच कुठला तरी तत्सम रेडियो चानेल ऐकताना RJ म्हणाला “हेल्लो पुनेकर, पुण्यात ( SORRY, पुन्यात) चिल आउट करायला स्पॉट शोधताय. लेट आवर शाम का साथी डू इट फॉर यु.” ह्या मराठी सारख्या दिसणाऱ्या वाक्याने आधी माझाही फ्युज उडाला पण नंतर विचार केला, तरुणाईला (घरच्या आया कमी वात आणायच्या म्हणून आता ह्या नव्या आया आल्यात छळायला, हिरवाई, निळाई, आणि सगळ्यात फेमस आणि डेंजर तरुणाई)ह्याच्या सारखीच भाषा( परत sorry, लँग्वेज) आवडते त्याला ते तरी काय करणार? आता बघा मी सुद्धा बोलताना ‘फ्युज उडाला’ रेडियो चानेल, डेंजर असे शब्द वापरलेच कि नाही. कोण वाचतय? हे जस महत्वाच तसचं जास्तिजास्त लोकांना कळेल आणि मुख्य म्हणजे आवडेल असं बोलण लिहिणं महत्वाच. मराठी साहित्य आणि भाषा ह्याबद्दल बोलताना एक वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे कि अनेक शतकं मराठी भाषा बहुतकरून पारमार्थिक स्वरूपाचे साहित्यच प्रसवत होती. पेशवाई बुडाल्यानंतर जसा जसा इंग्रजांचा आणि त्यांच्या इंग्रजीचा प्रादुर्भाव(!) वाढला तसा कथा, लघुकथा, निबंध, स्फुट, कादंबऱ्या, नवकविता वगैरे इतर साहित्य प्रकार मराठीत येऊ लागले.सुरुवातीचा संक्रमणाचा काळ सोडला तर साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करून मराठीला वैभव आणले हे खरे पण त्याच बरोबर भाषांतर/ अनुवाद करणाऱ्यांनी प्रचंड वात आणला. यासाठी एक अगदी रोजच्या बोलण्यातले उदाहरण देतो. पन्नास वर्षांपूर्वी बहुतेक प्रौढ स्त्रिया 'लुगडे' नेसत असत, तरुणी 'गोल पातळ' नेसत आणि लहान मुली 'परकर पोलके' घालत. 'साडी' हा शब्द तेंव्हा फारसा प्रचारात नव्हता. खरे वाटत नसेल तर पन्नाशीच्या दशकातले राजा परांजप्यांचे मराठी चित्रपट लक्षपूर्वक पहावेत. लहान मुलींसाठी हौसेने फ्रॉक, स्कर्ट, पंजाबी ड्रेस वगैरे फॅशनेबल कपडे शिवत असत. या रोजच्या वापरातल्या वस्त्रांच्या कापडाचा पोत, वीण, रंग, त्यावरील नक्षीकाम, किंमत, टिकाऊपणा वगैरेंची चर्चा, त्यांचे कौतुक किंवा हेटाळणी, त्यांची निवड करण्यापासून ते अखेरीस बोहारणीला देण्यापर्यंत त्यांवर घरात होत असलेल्या क्रिया यांच्या संदर्भात हे शब्द रोजच कानावर पडत असत आणि बोलण्यात येत असत. आज पन्नास वर्षांनंतर आपण ज्या सामाजिक स्तरात वावरतो तिथे लहानपणचे हे ओळखीचे शब्द आता कानावर फारसे येतच नाहीत. 'लुगडे' नेसणार्‍या स्त्रियांची पिढी काळाआड गेली. 'गोल पातळ' जाऊन आलेली 'साडी' मध्यमवयीन व प्रौढ महिला नेसतात. बहुतेक तरुण मुली जीन्स किंवा कॅप्री आणि टॉप घालतात. पंजाबी ड्रेस आता 'पंजाबी' राहिला नाही, 'सलवार कमीज' किंवा 'सलवार सूट' या नांवाने तो सर्वच वयोगटात वापरला जातो. फ्रॉक, स्कर्ट आणि त्यांचे मिनि, मॅक्सी, मिडी वगैरे अनंत प्रकार येत आणि जात असतात. राजस्थानी, गुजराती किंवा लमाणी पध्दतीच्या कपड्यांचाही क्वचित कधी वापर दिसतो. नव्या पिढीतल्या मुली 'फंक्शन' किंवा 'ऑकेजन' च्या निमित्याने कधी कधी "साडीही" 'घालतात'.(नेसत नाहीत ) आणखी तीन चार दशकांनंतरही कोणत्या ना कोणत्या नांवाने साडी शिल्लक राहील पण 'नेसणे' हा शब्द कदाचित राहणार नाही असा माझा अंदाज आहे. आपण ठरवू किंवा न ठरवू, बोलत असतांना आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणार्‍याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते. माझे आईवडील ज्या(मराठी) बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, त्या बोलीत मी माझ्या मुलीशी बोलत नाही. जरी ती मराठीच असली तरीही (तिची आणि तिच्या पिढीची भाषा मराठीसदृश कोणती तरी आहे पण आम्हाला एकमेकांशी संवाद साधता येतो हे काय कमी आहे! ). 'हंडा', 'कळशी', 'बिंदगी' असे जुने शब्द माझ्या बोलण्यात कधी आले नाहीत कारण त्या वस्तूंना माझ्या घरात स्थान नव्हते, तसेच ' सीडी' , ' मॉल' , 'रिमोट' आदि शब्दही आले नाहीत कारण त्या संकल्पनासुध्दा तेंव्हा अस्तित्वात नव्हत्या. आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. (निदान अशी माझी समजूत आहे?पण ते एक असो ) आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यातून जास्तीत जास्त लोकांना कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करणे आवश्यक असते. त्याचबरोबर त्यात वापरलेले शब्द मूळ मराठी आहेत, संस्कृतजन्य आहेत, आपल्याच देशातल्या परप्रांतातून आले आहेत की परदेशातून आले आहेत यापेक्षाही किती लोकांना ते समजतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे आपले मला वाटते. जिवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी हे मी वर सांगितलेच आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात कितीतरी नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे असे म्हणता येईल. आपण ते सगळे अगदी सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना निदान माझी जीभ तरी अडखळेल. उद्या एका मराठी माणसाने नव्याच तंत्रज्ञानावर आधारलेली एकादी नवी गोष्ट बाजारात आणली आणि सुरुवातीपासूनच तिचा वापर करतांना 'उचला', 'ठेवा', 'थांबा', 'चला', 'दाबा', 'सोडा' अशा सोप्या शब्दांचा प्रयोग केला तर त्या शब्दांचा उपयोग करायला मला मनापासून आवडेल. पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा असे माझे मत आहे. ----आदित्य


ADITYA KORDE

Sun , 05 February 2017

१९२६ मध्ये पुण्याच्या तत्कालीन सुप्रसिद्ध( पुण्यात सर्व संस्था नुसत्या प्रसिद्ध नसतात तर त्या सुप्रसिद्ध असतात, जसे पुण्यातला प्रत्येक विद्वान हा महापंडित असतो. नुसते पंडित हे आडनाव असते.) अशा ‘शारदा मंदिर’ या साहित्य सेवक संस्थेच्या पहिल्या वार्षिक ‘शारदोपासक संमेलनाचे’ अध्यक्षपद कधी नव्हे इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्वीकारले आणि व्यासपीठावरून “मराठी हि मुमुर्षु भाषा आहे. (म्हणजे मरण पंथाला लागलेली भाषा आहे) तिचे सोहळे कसले करता” असे म्हणून मराठीच्या एकूण अस्तित्वाबद्दलच चिंता व्यक्त केली होती. तेव्हा पासून आजपर्यंत ९० वर्षात मराठी नष्ट झाली नाहीच पण तिची अनेक अंगांनी भरभराट झाली. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही तरीहि सतत ह्या मराठीच्या अस्तित्वाबद्दल जाणकार लोक गळे काढताना आपण बघतो आहोत.इतिहासाचार्य राजवाडे आणि या दिग्गजांना वाटणारी भीती, चिंता काहीशी अनाठायीच होती असे मला प्रामाणिकपणे वाटते. मी माझा अनुभव सांगतो. आमच्या कॉलनीमध्ये २७ बंगले आहेत. त्यामध्ये साधारण ४५-५० शाळेत जाणारी मुलंआहेत. हि मुलं विविध वयोगटातली आहेत त्यामुळे अगदी अंगणवाडी पासून ९वी-१०वी पर्यंत ची मुलं यात येतात. महाविद्यालयातली मुलं यात धरली नाहीत. एक श्री. मुळे म्हणून आहेत त्यांच्या नातीचा सन्माननीय (!) अपवाद सोडला तर सर्व मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळात जातात. तरीही ही मुलं आपापसात खेळताना अस्खलित मराठी बोलतात. त्यांना मराठी की इंग्रजी असा पेच पडत नाही. त्यांचे आजी आजोबा लोक, जे मराठीच बोलतात, त्यांच्याशी संवाद साधताना ह्या मुलांना काहीही ‘प्रॉब्लेम’ येत नाही. ह्याचं कारण साधंसरळ आहे मुलांना आपण जरी शाळेत शिकायला पाठवत असलो तरी त्यांचं शिक्षण त्या आधीच सुरु झालेलं असत आणि ते घर, आसपासचा परिसर त्याच्या मित्रपरिवाराकडून बरच काही शिकत असतात.माझी मुलगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाते आणि तिथे असलेल्या हिंदी भाषक मुलांच्या संगतीने तिच्या वयाच्या मानाने बरे हिंदी बोलते. आम्ही गुजरात मध्ये राहत असतो तर तिला गुजराती सहजगत्या आले असते. ते कशाला, माझा मित्र बलराम छप्पर म्हणून एक कानडी आहे. त्याचा ८ वर्षांचा मुलगा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कानडी अस्खलित बोलतो. तेव्हा मातृभाषेतून शिक्षणाचा फार बागुलबुवा करायची गरज नाही. आणि तसही इंग्रजी माध्यमामुळे मुलांना मराठी नीट बोलता येत नाही असे बोम्बलणाऱ्या लोकांना ‘म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?’ असे विचारले तर त्यांना नीट सांगता येत नाही. मराठी बोलताना इतर भाषेतल्या शब्दांची फार सरमिसळ होते असा काहीतरी त्यांच्या तक्रारीचा सूर असतो . ठीक आहे, पण मग आपण आज जी मराठी भाषा बोलतो ती ५० वर्षापूर्वी वापरात होती काय? आणी १०० वर्षांपूर्वी? तेव्हा काय होतं? आज किती जणांच्या बायका पंजाबी ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख किंवा पेहेराव घालतात? साडी ऐवजी लुगडे किंवा पातळ कोण नेसते? आपण मोटार सायकल वरून(सांप्रत काळी तर बाईक वरून) नाहीतर स्वयंचलित दुचाकीवरून कितीवेळा जातो? पेट्रोल टाकणे, स्पार्कप्लग बदलणे , पंक्चर काढणे हे मराठीतून कसे सांगणार? आणि ज्याला ते सांगू त्याला समजेल काय? जुनेच पण रोजच्या वापरातले शब्द सुद्धा मराठी नसतात. पगार, बंब, इस्त्री, चावी,जबाब,जबाबदारी, हरकत,घड्याळ, हे शब्द काय मराठी आहेत कि संस्कृत? पण ते वापरताना आज आपल्याला उष्टावाल्यासारखे वाटत नाही. अस्खलित मराठी वापरून आज आपण कुणाशी संवाद साधू शकू? ते सोडा आजच्या विषयांवर तर आपण मराठीत बोलूच शकणार नाहि. मोबाईल, सीडी, पेन ड्राईव,digital, Analogue यांना पर्यायी शब्द मराठीत नाहीत. ते मराठीत नव्याने जन्माला घालायची गरज नाही. फार कशाला ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गाने हे लोक शहारतात, त्या इंग्रजीच्याच सोवळेपणाबद्दल काय? दरवर्षी ह्या भाषेत साधारण ८५० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले फार थोडे इंग्रजी असतात. साधी atomic theory हा शब्द आपण अस्खलित इंग्रजीत वापरुं शकणार नाही atom हा लाटिन आहे तर theory ग्रीक आहे.सरसकट वापरला जाणारा “सामान्यत: एकत्र जमण्याची जागा” अशा अर्थाचा Rendezvous हा शब्द मूळ फ्रेंच आहे तर Window म्हणजे खिडकी हा पोर्तुगीज शब्द आहे. भाषा जिवंत असते म्हणजे तिच्यात सतत बदल घडत असतो आणि तिचा एकूण तोंडावळा तोच राहिला तरी स्वरूप मात्र बदलत असते. नव्हे तोंडावळा सुद्धा बदलतोच.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......