मर्दानी झाँशीवाली!
सदर - लक्ष्मणरेषेवरून
डॉ. कुंदा प्रमिला निळकंठ
  • झाँशीची राणी लक्ष्मीबाई
  • Thu , 26 January 2017
  • झाँशीची राणी लक्ष्मीबाई Jhansi ki Rani Lakshmibai सुरज लता देवी Suraj Lata Devi

झाँशीची राणी लक्ष्मीबाईची आठवण निघाली की, आपल्या सगळ्यांचा उर अगदी अभिमानानं भरून येतो. इतिहासांच्या पुस्तकांनी आपल्या मनावर ठसवलेलं तिचं घोड्यावर बसलेलं अन् तलवार उंचावून त्वेषानं ब्रिटिशांविरुद्ध लढायला निघालेलं मर्दानी पोषाख घातलेलं राजबिंडं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. स्त्री ही ‘मर्दानी’सुद्धा असू शकते, असा आपल्या सांस्कृतिक मानसिकतेवर पहिल्यांदाच खोल ठसा उमटवणारी पहिलीच भारतीय राजकारणी स्त्री म्हणजे झाँशीची राणी लक्ष्मीबाई! आम्हा स्त्रियांवर म्हणूनच तिचे थोर उपकार आहेत. आपल्याकडे करारी राज्यकर्त्या स्त्रिया तर अगदी भरपूर होऊन गेल्या आहेत, अगदी ‘रझिया सुलताना’ आणि ‘चाँद बिबी’पासून ते ‘इंदिरा गांधी’पर्यंत. पण स्त्रीत्वाच्या पलीकडे जाऊन सर्व पुरुषी कौशल्यं आत्मसात करणारी मर्दानी स्त्री म्हणून झाँशीच्या राणी लक्ष्मीबाईकडे उदाहरणादाखल पाहिलं जातं.

पण असं असलं तरीही आज ज्या स्त्रिया आपलं स्त्रीत्व जपत न राहता त्या पलीकडे जाऊन स्वतःचा विकास करून घेऊ लागतात, तेव्हा नाना परीनं त्यांची ‘पुरुषी’ म्हणून अवहेलना केली जाते. प्रचंड मानसिक कोंडी केली जाते. उदाहरणार्थ, फुटबॉल खेळाचं स्वप्न पाहणाऱ्या एका किशोरवयीन मुलीची कथा ‘बेन्ड इट लाईक बेकहॅम’ या इंग्रजी-भारतीय चित्रपटात सांगितली गेली आहे. त्यानंतर शाहरूख खान, आमिर खान, प्रशिक्षक असलेले, बॉक्सिंग चॅम्पियन बनण्याचं स्वप्न बाळगणारी मेरी कॉम असेल किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या ‘दंगल’सारख्या चित्रपटांत, मुलांच्या मर्दानी खेळात आपलं करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण करताना त्यांना पारंपरिक पितृसत्ताक व्यवस्थेशी कसे लढे द्यावे लागले, स्त्रीच्या वागण्या-बोलण्या संबंधांत जुनाट रूढी परंपरांना धक्का देत उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्या अनेक स्त्रियांचं अत्यंत हृदयद्रावक चित्रण केलं आहे.

एखाद्या स्त्रीनं नाजूक हालचालींचं, स्त्रीत्वाचे विभ्रम सोडून पुरुषांसारखं वागू लागणं म्हणजे जणू काहीतरी गुन्हा आहे, अशा विचित्र नजरेनं समाज तिच्याकडे पाहू लागतो. त्यामुळेच ‘मैदानी खेळ’ ही गोष्टच स्त्री मानसिकतेतून अगदी हद्दपार झालीय. एकीकडे स्त्रियांच्या युद्धनैपुण्याचं वर्णन करताना अगदी कौतुकानं झाँशीच्या राणीचं उदाहरण द्यायचं, पण आपल्या घरात एखाद्या मुलीनं कब्बड्डी, क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकी खेळायचं म्हटलं की, तिच्यावर रागावून तिच्या पुरुषी प्रवृत्तीवर ताशेरे झोडायचे, अशी आपली विसंगत परंपरा! खरं म्हणजे, आपल्याकडे अनेक स्त्रियांना अतोनात शारीरिक कष्ट करायची सवय आहे. शरीर स्वास्थ्य चांगलं राखण्यासाठी पुरेसं सकस अन्न नसलं तरी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याइतका काटकपणा त्यांच्या अंगी असतो. त्यामुळेच खरं तर भारतीय स्त्रियांना योग्य प्रोत्साहन आणि अनुकूल स्वास्थ्यवर्धक परिस्थिती उपलब्ध करून दिली, तर अशा अतिशय काटक चणीच्या भारतीय स्त्रिया जागतिक पातळीवरील मैदानी खेळात कुठल्या कुठे पोहोचू शकतील.

‘कॉमनवेल्थ गेमच्या’ जागतिक क्रीडास्पर्धेत रौप्य व सुवर्ण पदक मिळवून आणणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या हॉकी टीमनं, तसंच सिंधूनं हेच सिद्ध करून दाखवलं आहे. पण विराट, धोनी, क्रिकेट टीमच्या छोट्या-मोठ्या यशानं, त्यांच्या अनेक बारीकसारीक तपशीलानं रकानेच्या रकाने भरणाऱ्या छापील माध्यमांना, तसंच त्यावर वीसेक मिनिटांचं फुटेज घालवणाऱ्या टीव्हीवरील बातमीपत्रांना ‘कॉमनवेल्थ गेम्स’मधून सुवर्णपदक आणणाऱ्या स्त्रियांच्या हॉकी कॅप्टन, सुरज लताचं ना एक छायाचित्र छापावंसं वाटतं की, ना या स्त्री खेळाडूंबद्दल इंचभर माहिती द्यावीशी वाटते. एवढंच काय पण या टीमच्या स्वागतालाही विमानतळावर कुणीही मान्यवर व्यक्ती गेल्या नाहीत. यातूनच भारतीय क्रीडा जगतात स्त्री खेळाडूंना किती भेदभावाची वागणूक मिळते याची झलक दिसते. ही गोष्ट गेल्या १०-१२ वर्षांपासून तशीच चालत आलीय.

प्रश्न फक्त स्त्री खेळाडूंना प्रसिद्धी देण्याचा नाही, तर मुळात स्त्रियांनी मैदानी खेळात भाग घेण्याबद्दलच आपल्या समाजाचे विचार बुरसटलेले आहेत. आपल्याकडे स्त्री एकतर दासी तरी असते नाहीतर पुज्यदेवता तरी. तिला साधं माणसासारखं माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. जेव्हा पी. टी. उषाने एशियाडमध्ये ताम्रपदक जिंकलं आणि तिच्या काटकपणाचं पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी तोंड भरभरून जाहीर कौतुक केलं, तेव्हा कुठे आपल्या प्रसारमाध्यमांचे डोळे उघडले. याचा अर्थ पाश्चात्य प्रसारमाध्यमं फार पुरोगामी आहेत आणि आपल्याकडची मागासलेली आहेत असा नव्हे.  त्यांची प्रसारमाध्यमं वेगळ्या अर्थानं विकृतही आहेत. टेनिसपटू मोनिका सेलेस, सानिया किंवा सेरेना विल्यमसच्या उघड्या मांड्या आणि आकर्षक बांध्याकडे नानापरीनं प्रेक्षकांचं लक्ष वेधणारे कॅमेरे आणि अॅना कुरनिकोव्हाच्या सेक्सी छायाचित्रांची विक्री करून खेाऱ्यानं पैसा ओढणाऱ्या पाश्चात्य माध्यमाचे हेतू फार मोठे शुद्ध असतात असंही नाही. पण अमेरिकेत ३० वर्षांपूवी स्त्री खेळाडूंना राष्ट्रीय खेळ जगतात समान स्थान मिळावं आणि काही ठिकाणी विशेष सवलतीसुद्धा मिळाव्यात, म्हणून तेथील स्त्री खेळाडूंनी जो संघर्ष केला, त्याची परिणती म्हणजे जागतिक खेळ जगतात ‘सर्व मैदानी खेळांमध्ये स्त्रियांनाही कायद्यानं समान संधी’ मिळू लागली! 

पण कायदा झाला म्हणजे मानसिकता बदलली असं नव्हे, असा अनुभव जागतिक पातळीवर सर्वच स्त्रियांना आहे. म्हणूनच इंग्लंडमध्ये ‘वुमेन स्पोर्टस प्रमोशन’ नावाची एक जागतिक स्त्री संघटनाही तयार झाली आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे प्रत्येक शाळा आणि कॉलेजांमध्ये मुलींना सर्व मैदानी खेळ शिकवले जावेत, त्यांच्या शरीरस्वास्थ्याची काळजी घेणाऱ्या सोयी असाव्यात, मुलींना विशिष्ट खेळ पारंगतता यावी म्हणून वेगळं प्रशिक्षण दिलं जावं, या साठी प्रत्येक देशात पाठपुरावा करणारी यंत्रणा राबवली जात आहे. या संदर्भात भारत सरकारकडे भारतीय मैदानी स्त्री खेळाडूंच्या अनेक समस्या, अडचणी आणि तक्रारींचे निवेदन केव्हाच सादर केलं गेलं आहे. पण सौंदर्यप्रसाधनांची जागतिक बाजारपेठ वाढवण्यासाठी लागोपाठ काही वर्षं विश्वसुंदऱ्यांचे किताब गरीब विकसनशील राष्ट्रांमधील सुंदर मुलींना देणाऱ्या जागतिक अर्थनीतीच्या लबाड आमिषाला  भारतासारखी अनेक राष्ट्रं बळी पडली नाही तरच नवल! म्हणूनच अलीकडे गल्लीबोळातून आणि शाळा-कॉलेजांतूनही सौंदर्यस्पर्धा होऊ लागल्या आहेत. हजारोंनी पैसा त्यात ओतला जाऊ लागला आहे. पण क्रीडा नैपुण्य दाखवणाऱ्या हिऱ्यांकडे मात्र अत्यंत दुर्लक्ष होत आहे.

एकीकडे ‘दंगल’ किंवा ‘मेरी कॉम’सारख्या चित्रपटाचं तोंड फाटेस्तोवर कौतुक करणारे आपण यातल्या खेळाडू स्त्रियांनी बक्षीस घेताना उपस्थित केलेले सपोर्ट स्ट्रक्चरबाबतचे, क्रीडा साहित्य मिळण्याबाबतचे, क्रीडा समितीच्या सहकार्याबाबतचे अनेक प्रश्न मात्र लक्षात घेताना दिसत नाही. गेल्या वर्षीसुद्धा धावपटूंना पाणी आणि पुरेसं मदतकार्य न झाल्यामुळे कामगिरीवर मोठा परिणाम झाल्याचं उघडकीला आलं होतं. विलक्षण चमक असणाऱ्या खेळाडू मुलींच्या क्रीडा सुविधांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून, आमच्या किमान अत्यावश्यक गरजा पुरवा म्हणून काकुळतीनं विनंती करणाऱ्या ‘मल्लेश्वरी’कडे, पी. टी. उषाकडे, सुजाता-लता, अंजली भागवत, सिंधू या सगळ्यांच्या आक्रोशांकडे दुर्लक्ष करून गल्लीबोळांतल्या सौंदर्यवती ‘ऐश्वर्यांना’ मात्र बोटाला धरून पायघड्यांवरून नेलं जातेय, हे दृश्य खरोखरच मर्दानी झाँशीची राणी लक्ष्मीबाईच्याच देशातलं आहे का असा प्रश्न पडतो.

आमीर खान निर्मित, अभिनित ‘दंगल’ या चित्रपटाचा या संदर्भात विचार केला तर दुसऱ्याच एका पारंपरिक दृष्टिकोनाची खूप गंमत वाटते. समाजात दोनच लैंगिक भूमिका असू शकतात, एक तर पूर्ण ताकदवान पुरुष किंवा एकदम नाजूक स्त्री. त्यांच्या मधलं काहीही नसतंच का? स्त्री आणि पुरुष या दोन साच्यापलीकडे काही नसतंच असा आपला सार्वत्रिक समज झालेला दिसतो. म्हणजे स्वत:चं ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायला फोगट नावाचा बाह आपल्या मुलींना स्वप्नपूर्तीचं साधन बनवतो. त्याला नाव कितीही उद्दात्त द्या. त्यासाठी तो त्याच्या दोन्ही मुलींना मुली म्हणून न वाढवता मुलगे म्हणूनच वाढवतो. मुलग्यासारखे छोटे केस, मुलींची छाती दिसू नये म्हणून त्यांना दिलेले विशिष्ट कपडे. इतके की, त्या मुलींनी बायकी नाजूकपणा सोडावा म्हणून तो आग्रही आहे. एकवेळ पारंपरिक पुरुषी मूल्यांच्या चौकटी तोडण्यसाठी ते आवश्यक असल्यानं हे सारं समजू शकतं. पण तो एके ठिकाणी टोक गाठतो आणि म्हणतो की, ‘मी माझ्या पोरींना इतकं सक्षम बनवेन की त्यांचा विवाह करायचा झाल्यास त्यांना मुलगा बघायला येणार नाही, तर त्याच मुलग्याच्या घरी मुलगा पाहायला जातील.’ रोल रिव्हर्सलकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन खूप बालिश आणि जुना आहे.

७०च्या दशकात पुरुष सत्तेविरोधात बंड करताना स्त्रीवाद्यांनी पुरुषांसारखं वागणं म्हणजे स्त्रीमुक्ती अशी एक उथळ व्याख्याच प्रचारात आणली होती. पुरुषसत्ता, पितृसत्ताक वर्चस्वाला सुरुंग लावणं म्हणजे नैसर्गिक स्रोतांना खीळ घालून अशा रोल रिव्हर्सलच्या उथळ कृती करणं नव्हे हे लक्षात घ्यायला हवं. पुरुषसत्ता अनेकांगी, अनेक पदरी, अनेक स्तरांवर काम करते. पितृसता ही जातीव्यवस्थेचं अविभाज्य अंग आहे, तितकीच ती धर्मव्यवस्थेतून, धार्मिक कर्मकांडांतूनही व्यक्त होत असते. या इतक्या सूक्ष्म पातळीवरील पुरुषसत्तेला आव्हान द्यायचं म्हणजे पुरुषपणाची इतरही अनेक प्रतीकं, प्रतिमा आधी डिकोड (विसंकेतीकरण) कराव्या लागतील. त्या पुरुषी मूल्य संकल्पना समाजाच्या मनातून काढण्यासाठी सूक्ष्म पातळीवर लढावं लागणार आहे.

रोल रिव्हर्सल सारख्या उथळ संकल्पना या केवळ प्रतीकात्मक (सिम्बॉलिक) आहेत. त्याने दोन हजार वर्षांपासून खोलवर रुजलेली मानसिकता बदलत नसते, तर त्या बद्दल फक्त स्वीकारार्हता वाढते, सहिष्णुता वाढते इतकंच. म्हणजे कोणी स्त्रियांवर उपकार करत नाही. माणूस म्हणून स्त्री म्हणून जगण्याचे जे नैसर्गिक मूलभूत अधिकार आहेत ते तिला मिळायलाच हवेत. आणि ही प्रतीकात्मक कृती आणखी किती दिवस करत राहणार आपण? वीस वर्षापूर्वीच मुली अंतराळात गेल्या, चंद्रावर पोहोचल्यात, अनेक क्षेत्रांत प्रगती केलीय, तरीही अशा प्रतीकात्मक कृतीमध्ये आपण किती वर्षं समाधान मानायचं?

लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

kundapn@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......