‘कॉल हिम एडी’ - ‘स्पर्शा’बाबतचे भयानक आणि भयंकर गैरसमज दूर करणारा लघुपट
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अनुज घाणेकर
  • ‘कॉल हिम एडी’ या लघुपटाचे एक पोस्टर
  • Mon , 31 August 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र कॉल हिम एडी Call Him Eddy संजय सुरी Sanjay Suri इशा चोप्रा Eisha Chopra संजीव विग Sanjeev Vig

‘स्पर्श’ या संकल्पनेशी फारकत घेतलेल्या भारतातील जनमानसाला ‘कुशीत घेणारा’ असाही एक व्यवसाय आहे, असं सांगितलं तर? काय होईल? बहुतेक जण भुवया उंचावतील, हसतील, थट्टा वा निंदा करतील, ‘आधुनिक थेर’ म्हणून उडवून लावतील.

पण ज्यांचे ‘स्पर्शा’बाबत भयानक आणि भयंकर गैरसमज आहेत, त्यांनी ‘कॉल हिम एडी’ हा नवीन हिंदी लघुपट पाहायला हवा. तो पाहून आपल्या मनातल्या वर्षानुवर्षं ठाण मांडून बसलेल्या कल्पना बदलणार नाहीत कदाचित, पण एक नवीन विचार आपण निदान आपल्या भावविश्वाला देऊ शकू, एवढं नक्की.

हा काय नवीन पैसे कमवण्याचा धंदा, याच विचाराने बंगळूरमधील ‘कुशीत घेणाऱ्या’ व्यावसायिकाला म्हणजेच ‘कडलर’ एडीला भेटायला मुलाखतकार रिया येते. भारतात अवैध असणारा हा व्यवसाय जगात काही ठिकाणी मात्र एक भावनात्मक उपचार म्हणून प्रसिद्ध आहे. मुलाखत घेऊन झाल्यावर रिया स्वतः हा उपचार घ्यायला उत्सुक असते, पण अर्थातच साशंक मनाने.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘सातपाटील कुलवृत्तांत’ : मानवी ‘अहं’ना नख लावणारी कादंबरी!

..................................................................................................................................................................

स्पर्श म्हणजे काय, निव्वळ लैंगिक संबंध असणार, हा संस्कृतीने रुजवलेला प्रश्न अर्थातच ती एडीला प्रथम विचारते. तिच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे एडीकडे असतात आणि कुठलाही आवेश न आणता माणसाच्या ‘स्पर्श’ या मूलभूत गरजेचं तत्त्वज्ञान एडी सांगतो. कथा जशी जशी पुढे सरकते, तशी त्याची प्रात्यक्षिक अनुभूती रिया घेते. सुरुवातीची तिची साशंकता लवकरच भावनिक उपचाराने झालेल्या शांत मनात रूपांतरित होते. दुसऱ्या बाजूने एडीच्या आयुष्यातील या व्यवसायाची प्रेरणा आपल्याला उलगडत जाते.

आपल्याकडे लैंगिक शिक्षण निषिद्ध, तसंच स्पर्श ही मूलभूत गरजही निषिद्धच मानली जाते. लहानपणी आपल्या मनात चूक-बरोबर कल्पनांमध्ये स्पर्शाचे वर्गीकरण झालेले नसते, वासनेचा शिक्का स्पर्शाला बसलेला नसतो, आपण बिलगतो, जवळ जातो, जवळ घेतो, मिठी मारू शकतो. वयात येणाऱ्या मुलांसाठी, मुलींसाठी, पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी, वृद्ध व्यक्तींसाठी, पुढे सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे बंधनं लादली जातात.

सध्याच्या करोना काळात तर मानवी स्पर्शाचे महत्त्व माणसाला एका वेगळ्या पातळीवर उलगडत आहे. ‘स्पर्श’ निषिद्ध करून भावनांच्या व्यक्त होण्याला रोखू पाहणाऱ्या आपल्या संस्कृतीला २० मिनिटांचा हा लघुपट बेधडक प्रश्न विचारतो. सोबतच पाच इंचाची मोबाईलची दुनिया, आजच्या जगात महत्त्वाकांक्षी असण्याची आपली पळापळ यावरही शंका उपस्थित करतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या लघुपटामध्ये या माध्यमाची सगळी बलस्थाने पुरेपूर वापरली आहेत. मोजके पण ताकदीचे संवाद, पूरक संगीत, कमीत कमी फ्रेम्समधून जास्तीत जास्त गोष्ट सांगणे, धक्कातंत्राचा सौम्य विषयानुरूप वापर, या सगळ्यातून एक गहन सामाजिक विचार सोपा करून सांगितला जातो.

एका नवीन विचाराचा परिचय करून देताना ना त्यातील कथामूल्य हरवते, ना विषयाला रंजित करण्याच्या नादात कुठले दृश्य भडक केले जाते. जगातला विषय भारताच्या संदर्भात उलगडताना काळजी घेतली आहे. संजय सुरी आणि इशा चोप्रा या प्रयोगशील कलाकारांचा अभिनय, त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांच्या छटा निव्वळ बघण्याजोग्या आहेत.

‘मागच्या वेळी कधी तुम्ही कुणाला प्रेमाने जवळ घेतले होते?’ हा प्रश्न दर्शकांना अंतर्मुख करतो, आणि कुठल्याही कला प्रकाराचं हेच यश आहे. दिग्दर्शक संजीव विग यांनी हे यश कमवलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

..................................................................................................................................................................

लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.

anujghanekar2@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......