बाबा रामदेव, अनिल अंबानी, डोनाल्ड ट्रम्प आणि कोविड-१९
सदर - वास्तव-अवास्तव
संजय
  • अनिल अंबानी, डोनाल्ड ट्रम्प आणि बाबा रामदेव
  • Thu , 28 May 2020
  • सदर वास्तव-अवास्तव अनिल अंबानी Anil Ambani डोनाल्ड ट्रम्प Donald Trump बाबा रामदेव Baba Ramdev कोविड-१९ COVID-19

म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं सदर आजपासून...

..................................................................................................................................................................

दृश्य एक

पॅरिस एयरपोर्ट.

विमानं कमी, प्रत्येक विमानात करोनामुळं प्रवासी कमी, यामुळं तिकीटं चौपट-पाचपट झालेली, प्रवाशांची संख्या रोडावलेली. वर्दळ नाही. तुरळक माणसं. एयरपोर्ट कर्मचारी आळसावल्यासारखे मंदगतीनं फिरताना दिसतात.

दोनच विमान सुटणार होती, एक न्यू यॉर्कसाठी, दुसरं दिल्लीसाठी. दिल्लीहून येणारं विमान न्यू यॉर्कला जाणार होतं आणि न्यू यॉर्कवरून येणारं विमान दिल्लीला जाणार होतं. दोन्ही विमानांची ठरलेली वेळ टळून तीन तास उलटून गेले होते. ती येणार केव्हां, इंधन भरणार केव्हा आणि पुढं जाणार केव्हा ते सांगता येत नव्हतं. बोर्डिंग गेटं शेजारी-शेजारीच होती. 

दिल्लीहून आलेले काही प्रवासी न्यू यॉर्कला जाणाऱ्या विमानात जाणार होते आणि न्यू यॉर्कवरून आलेले काही प्रवासी दिल्लीच्या विमानात बसणार होते.

वीस-पंचवीस माणसं दुनियेतून कुठून तरी आली होती आणि गेले वीसेक तास या विमानांची वाट पहात गेट बाहेरच्या खुर्च्यांवर ताटकळत बसली होती.

एक शीख माणूस पेंगताना शेजारच्या माणसाच्या अंगावर पडत होता. त्याची दाढी त्या माणसाला बोचायची, तो सरदारला थापटून उठवून बाजूला सारायचा.

एका रांगेत एक भारतीय कुटुंब बसलं होतं. त्यांच्या आसपास जमिनीवर वर्तमानपत्राचे कागद, फरसाणाचे तुकडे, शेंगदाण्याची सालं  पडली होती. क्षणभर एसटी स्टॅंडवरच आहोत असं वाटावं.

दिल्लीला जाणाऱ्या विमानासाठी थांबलेला एक गट ट्रॅक सूट्स, हाफ पँट्स, फुल टीशर्ट्स अशा वेशातल्या तरुणांचा होता. सगळ्यांच्या कानात वायरी कोंबलेल्या होत्या आणि मांडीवर लॅपटॉप होते. त्या गटामध्ये एकच जण व्यवस्थित ऑथेंटिक सुटात होता. ते सूटवाले गृहस्थ होते अनिल अंबानी. ते पॅरिसमधला मुक्काम संपवून दिल्लीला निघाले होते.

दिल्ली आणि न्यू यॉर्कवरून विमानं पाचेक मिनिटांच्या अंतरानं आली. आधीपासून थांबलेल्या प्रवाशांची बोर्डिंगची लगबग सुरू झाली.

दिल्लीहून आलेल्या विमानातून एक भगवी वस्त्रं नेसलेल्या साधूटाईप लोकांचा गट उतरला. जांभया देत, हातातली बोचकी, झोळ्या जमिनीवर ठेवून खुर्च्यांवर विसावला. आधीपासून ताटकळत बसलेल्या प्रवाशांनी त्या साधूला ओळखलं. ते साधू होते बाबा रामदेव. ते न्यू यॉर्कला निघाले होते.

थोडे हातपाय मोकळे करणं, टॉयलेटला जाणं अशासाठी अगदी थोडा अवधी त्यांना होता.

अंबानींच्या बरोबर असलेल्या एका तरुणानं बाबा रामदेवना ओळखलं. लॅपटॉप दूर ठेवून तो पुढे गेला आणि त्यानं बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. खरं म्हणजे बाबा रेस्टरूमकडं जाण्याच्या बेतात होते, ते अवघडले. इतर तरुणही आता जागे झाले, त्यांनीही पटापट लॅपटॉप दूर ठेवले आणि बाबांकडं सरसावले. बाबा अस्वस्थ, त्यांना बहुदा घाई लागलेली असावी.

अनिल अंबानी आपल्या आयपॅडमध्येच गुंतलेले होते. इकडं सहकारी बाबांकडं गेलेत हे त्यांच्या उशिरा लक्षात आलं. त्यांनी बाबांकडं पाहिलं, मंदसं हसले, नमस्ते म्हणाले. बाबा रामदेवनी क्षणभर अंबानीना ओळखलं नाही. पण लक्षात आल्यावर खांद्यावरची झोळी सावरत त्यांनी प्रती नमस्ते केला. इकडं मुलांचं पाया पडणं चाललंच होतं.

“तुम्ही कुठं निघालात?” दिल्लीहून आलेल्या विमानातून बाहेर पडलेले रामदेव बाबा न्यू यॉर्कलाच जाणार आहेत की इतर कुठं की पॅरिसला हे अंबानीना माहीत नव्हतं.

“तुम्ही? दिल्ली की न्यू यॉर्क?” रामदेव बाबांनी विचारलं.

“चार दिवस पॅरिसमध्ये होतो, दिल्लीला चाललोय.” अंबानी म्हणाले.

प्रवाशांची गर्दी अजिबातच नसल्यानं सेक्युरिटीचे सर्व सोपस्कार मूळ विमानतळ आणि पॅरिस विमानतळावर पार पडल्यानं बहुतेक माणसं थेट या विमानातून त्या विमानात जाणार होती. दोहोंपैकी कुठल्याही शहराला न जाणारे लोक त्यांच्या विमानाची वाट पहात थांबणार होते.

आलेली विमानं तेल भरून लगोलग सोडली जाण्याची शक्यता होती. अंबानी आणि बाबा यांची माणसं लगबगीनं रेस्ट रूम्सकडं पळाली.

अंबानींनी कोटाच्या आतल्या खिशातून लाल रंगाचा सेल फोन काढला. अंबानींकडं तीन रंगाचे तीन फोन आहेत, लाल, हिरवा आणि पिवळा. अंबानी प्रत्येक फोन वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात.  कपाळावरची एक बारीकशी आठी हातानं कुरवाळत हलक्या आवाजात अंबानी लाल फोनवर बोलले “हा रामदेव बाबा इथं काय करतोय, कशाला त्याला न्यू यॉर्कला जायचंय?”

पलिकडून उत्तर आलं की, पाचच मिनिटांत सांगतो.

अंबानींच्या कोटात हिरव्या रंगाचा फोन वाजला. प्रत्येक फोनचा रिंग टोनही वेगळा होता. तो फोन अंबानीनी घेतला, काही वेळ बोलले.

तो फोन चालू असतानाच लाल फोनची रिंग वाजली. अंबानीनी हिरवा फोन बाजूला ठेवला आणि लाल फोनवर ऐकू लागले, ऐकताना मान हलवत ते मधे मधे बाबा रामदेवांकडं पाहत. बाबांचा उल्लेख फोनवर येत असावा.

इकडे बाबांच्या झोळीतला फोन वाजला. ते फोनवर बोलताना अंबानींकडं पाहत होते. अंबानींचाच काही तरी संदर्भ असावा.

दोघंही एकाच वेळी फोनवर बोलत होते, असं वाटावं की दोघे एकमेकांशी सेलफोनवर बोलत आहेत.

गेटवर घोषणा झाली. बोर्डिंग लवकरच सुरू होईल.

दोघांनीही गेटकडं पाहिलं आणि फोनवर बोलत बोलत दोघं रेस्ट रूमकडे निघाले.

 रेस्टरुमच्या प्रवेशाशी दोघं उभे राहिले. रामदेव बाबा उजव्या बाजूला गेल्यावर अंबानी डाव्या बाजूला गेले. टॉयलेटमध्ये जाऊन दरवाजा बंद केल्यावर अंबानीनी लाल रंगाचा फोन काढला. पलीकडून माणूस बोलला “सर, पीएमओच्या सांगण्यावरून रामदेव बाबा न्यू यॉर्कला निघालेत. पण न्यू यॉर्क वारीचा उद्देश मात्र कळला नाही.”

“शिट. कळायला मार्ग नाही म्हणजे काय?”

अंबानीनी पिवळ्या रंगाचा फोन काढला. “बॉस. रामदेव बाबाला तुम्ही पाठवलंय असं ऐकतोय. आता रामदेव बाबा तुमचा खास दूत झालाय की काय?”

“नाही रे. तसं नाहीये. त्याच्या खाजगी कामासाठी तो चाललाय.”

“खाजगी कामासाठी?” अंबानी.

“हो. खरंच. तुला नव्हतं कां खाजगी कामासाठी फ्रान्समध्ये पाठवलं. मी कामात आहे, नंतर बोलू.” पलीकडला आवाज.

अंबानी टॉयलेटमध्ये गेले.

त्यांनी लाल फोन काढला.

“काही तरी गडबड आहे. रामदेव बाबा काही तरी मोठ्ठा डल्ला मारत असणार. शोधून काढ. पुढल्या साडेतीन मिनिटांच्या आत.” अंबानी.

अंबानीनी फोन खिशात ठेवला. फ्लश केलं.

अंबानींच्या टॉयलेटच्या बरोब्बर पाठीमागे भिंती पलीकडच्या टॉयलेटमध्ये रामदेव बाबा होते. त्यांच्याकडं एकच फोन होता.

“गुरुदेव, अंबानी सतत पीएम ऑफिसशी बोलत आहेत. तुमच्याबद्दल विचारत आहेत.” रामदेव बाबांचा माणूस फोनवर बोलला.

“असेल त्यांचं काही तरी काम. आपल्याला काय करायचंय. आपण आपल्या कामावर लक्ष ठेवायचं. तुम्ही पुढली तयारी नीट केलीयत ना? कराराचे कागद तयार ठेवा.” रामदेव बाबा म्हणाले.

रामदेव बाबा टॉयलेटच्या बाहेर पडले. जणू ठरवलं असल्यासारखंच दोघेही एकदमच रेस्टरूमच्या दारात आले. दोघे पुन्हा एकमेकाकडं पाहून हसले.

अंबानींचा लाल फोन वाजला. ‘एक्सक्यूज’ मी असं म्हणून अंबानी थबकले आणि त्यांनी हात हलवून रामदेव बाबांना ‘पुढं जा’ अशी विनंती केली.

 अंबानी पलीकडच्या माणसाचं बोलणं ऐकत होते, हं हं म्हणत होते.

“वेल डन” म्हणत अंबानींनी फोन खिशात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

वाट पाहणाऱ्या सहकाऱ्यांना अंबानी म्हणाले, “तुम्ही ठरलेल्या शेड्युलप्रमाणं दिल्लीला रवाना व्हाल. मी न्यू यॉर्कला जातोय.”

सहकारी चकित झाले.

“सर?” एका सहकाऱ्यानं अंबानींकडं पाहिलं. अंबानींकडं अमेरिकेचा व्हिसा असतो, ते केव्हाही अमेरिकेला जाऊ शकतात हे त्या सहकाऱ्याला माहीत होतं. पण तिकीट कसं झालं असा प्रश्न त्याला पडला होता.

अंबानी न्यू यॉर्क फ्लाईटच्या गेटकडं निघाले. त्यांना रांगेत जावं लागलं नाही, गेटवरच्या माणसानं वाकून आदरानं त्यांना बाजूनं आत प्रवेश दिला.

रांगेत मागे असलेले रामदेव बाबा चकित झाले.

..................................................................................................................................................................

दृश्य दुसरं

अनिल अंबानी सुपर क्लब क्लासमध्ये होते. 

रामदेव बाबा आणि त्यांची माणसं फर्स्ट क्लासमध्ये.

विमान हवेत भरपूर वर पोचल्यावर पट्टे सोडायची परवानगी मिळाली. 

पट्टे सुटल्यावर दोघांनीही आपापले फोन काढले. विमानात फोन चालतात.

दोघांसमोर स्वतंत्रपणे एयर होस्टेस ड्रिंकचे ट्रे हातात घेऊन उभ्या.

दोघांचंही तिच्याकडं लक्ष नाही. फोनवर बोलतात.

अनील अंबानी “रामदेव न्यू यॉर्कमध्ये कुठं उतरणार आहे? त्याचा कार्यक्रम काय आहे?”

पलीकडून “सर, मी बाबांच्या  ऑफिसमध्ये बोललो. तिथून काही सांगत नाहीत. मी पीएमओमध्ये फोन केला. तिथूनही प्रतिसाद नाही.”

अनिलनी हातातल्या पॅडवर पेन्सिलनं एक दाढीवाल्याचं स्केच काढलं. स्केचभोवती वर्तुळ केलं. विचार केला. मग वर्तुळाभोवती आणखी एक वर्तुळ केलं. अंबानी एका बाहेर एक वर्तुळं करत गेले आणि शेवटी पान भरल्यावर उजव्या कोपऱ्यात उरलेल्या जागेत एक प्रश्नचिन्हं काढलं.

इकडे बाबांचा फोन चालला होता. “अनिल अंबानीनं तिकीट बदलून घेतलंय, तोही न्यू यॉर्कला येतोय. काय गौडबंगाल आहे? मोदीनं तर त्याला आपल्यावर सोडलं नाहीये ना. चौकशी करा”.

अनिल लाल फोनवर “आपला माणूस काय करतोय? मोदी भेटत नाहीत? शक्य नाही. मोदी आणि रामदेव यांच्यात काही तरी शिजतंय.”

अंबानींनी पॅडवरचा कागद फाडला. दुसऱ्या कागदावर पुन्हा दाढीवाल्याचं स्केच काढलं. हा दाढीवाला मोदींसारखा वाटत होता. स्केचभोवती एक वर्तुळ. नंतर मात्र वर्तुळं नाहीत. वर्तुळातून एक रेष काढून कागदभर पुरेल येवढं एक प्रश्नचिन्ह.

तो कागद फाडला. नव्या कागदावर एक विमानाचं चित्र काढलं. त्याच्या भोवती वर्तुळ. त्या वर्तुळावर काट मारला. नंतर एक प्रश्नचिन्ह.

कागदाचा बोळा खाली पडला की, पर्सर तो उचलत असे. खिडकीपाशी असलेली टोपली बोळ्यांनी भरली.

इकडे रामदेव बाबांसमोर वाकून एयर होस्टेसनं कोणतं ड्रिंक घेणार असं विचारलं.

रामदेव बाबा म्हणाले “उकाळा.”

होस्टेसला हे उकाळा प्रकरण कळेना. तिनं पुन्हा विचारलं. बाबा पुन्हा ‘उकाळा’ म्हणाले.

होस्टेस ‘एक्सक्यूज मी’ असं म्हणून तिच्या वरिष्ठांकडं गेली. त्यालाही ‘उकाळा’ म्हणजे काय ते माहीत नव्हतं. तो बाबाकडं आला.

बाबा त्याला रेसिपी सांगू लागले. इतकं दूध, इतकं पाणी, आलं, लवंग, मिरी, पाती चहा,…..

पर्सर म्हणाला “सर पातीचहा कुठून आणू? आणि पुदिना? शक्य नाही हो…” काकुळतीला येऊन पर्सर म्हणाला.

बाबा आणि पर्सर काही क्षण एकमेकाकडं पाहत होते.

गोंधळलेला पर्सर म्हणाला “आय अॅम अफ्रेड, उकाळा देऊ शकत नाही याबद्दल दिलगीर आहोत. पण आमच्याकडं १२० वर्षं जुनी स्कॉच आहे. पहा, तुम्हाला आवडेल.”

रामदेव बाबांचे डोळे चमकले. काही काळ बाबा पर्सरकडे बघत राहिले. पर्सरनं मान खाली घातली.

“बेटा. नशा येण्यासाठी दारू प्यायला हवं असं नाही. नशा कशाचीही येऊ शकते.” असं म्हणून बाबांनी त्या पर्सरकडं पाहिलं. तो गरगरला. बाबा म्हणाले “एक काम कर. चार वाट्या श्रीखंड खा. नाही तर चार वाट्या बासुंदी खा. मग पहा कशी गुंगी येते.”

पर्सरला चक्कर आली. शेजारी उभ्या असलेल्या एयर होस्टेसचा हात धरून त्यानं स्वतःला सावरलं.  बाबा श्रीखंड-बासुंदी आणायला सांगायच्या आत त्यानं काढता पाय घेतला.

अंबानींना राहावेना.  एक मजला उतरून ते बाबांच्या क्लासमध्ये आले.

बाबांच्या पायाला हात लावला आणि बाबाच्या सीटसमोर उभे राहिले.

बाबा अवघडले. तेही उठून उभे राहिले.

“बाबा, काय काम काढलंत, असं अचानक न्यू यॉर्कला?”

“एक शिष्य आहे, त्यानं बोलायवलंय, योगावर एक सप्ताहाचा कार्यक्रम ठेवलाय, त्यासाठी निघालोय. तुमचं काय? राफेलच्या कामासाठी आला होतात काय? तुमचं उत्पादन सुरू झालं का?” बाबा.

अंबानींची प्रतिक्रिया नाही.

विमान जोरात हललं. ढगात होतं. अंबानी पडत होते, बाबांनी त्यांना सावरलं.

“हां, तर मी काय विचारत होतो की, तुमचा राफेलचा कारखाना अजून सुरू झालेला नाही असं ऐकतोय.” बाबा.

“ते जाऊ द्या. बाबा, गेल्या आठवड्यात तुमच्या कारखान्यावर रेड पडली होती म्हणे. चीनमधून आणलेली सीरपची पिंपं सील केलीयत म्हणे. मला आश्चर्य वाटलं. काय मामला आहे?” अंबानी.

असा प्रश्न बाबा रामदेवांना अनेक वेळा विचारला गेला असल्यानं क्षणभरही न दवडता त्यांचं उत्तर आलं. “काही नाही हो. एफडीएचं म्हणणं की, आम्ही मधात सीरप मिसळून विकतो. तसं काहीही नव्हतं. एफडीएमधल्या माणसाला पैसे हवे होते झालं. मिटलं सगळं. ते जाऊ द्या. तर तुमच्या विमानांचं काय? मी ऐकतो की राफेलकडून तुम्हाला पैसेच आले नाहीत. खरं की काय?” बाबा.

अंबानींचं उत्तर तयारच होतं.

“सगळीकडं राजकारण चाललंय. मोदींच्या भरारीमुळे भारत महासत्ता बनेल या भीतीनं फ्रान्सच्या पोटात दुखतंय. त्यांनी पेपरवाल्यांना उचकवून दिलं आणि राफेल करारावर राळ उडवली. राफेल कंपनी चालढकल करू लागलीय. भारतात काही लोकांना मोदी नकोसे झालेत. तिकडं ट्रम्पचंही तसंच. येवढा भला आणि क्रांतिकारी माणूस, अमेरिकेला टेरिफिक वेगानं पुढं न्यायचं म्हणतोय तर तिथले पेपर आणि चॅनेल त्याला विनाकारण विरोध करताहेत. मधल्या मध्ये आपल्यासारख्या उद्योगींना मात्र त्रास सहन करावा लागतोय. खरं की नाही?” अंबानी.

“अगदी करेक्ट बोललात. आमचे आणि मोदींचे चांगले संबंध आहेत हे लोकांना, प्रेसला पाहवत नाहीये. म्हणून काही तरी खुसपटं काढून आम्हाला त्रास देतात. असो. बरं ते जाऊ द्या. तुम्ही अचानक दिल्ली रद्द करून न्यू यॉर्ककडं निघालात, काय घडलंय?” बाबा.

“काही नाही हो. पॅरिस एयरपोर्टवर असतानाच एक फोन आला. न्यू यॉर्कहून. रिलायन्सचा एक करार अनेक दिवस अर्धवट राहिला होता. माझ्याजवळ वेळ होता. म्हटलं उरकून टाकूया. बाय द वे, तुमचा योगा सप्ताह कुठं होणार आहे? मी विचार करतोय की दोन दिवस तुमच्या योगा कार्यक्रमात यावं.” अंबानी.

पुन्हा विमान हललं.

“काय गंमत आहे पहा. हवेतही खड्डे दिसतात, आपल्या दिल्लीतल्या रस्त्यांवर असतात तसे.” बाबा स्वतःच्या विनोदावर डोळे मिचकावत हसले.

विमान स्थिर होईपर्यंत कोणी बोललं नाही. स्थिर झाल्यावर बाबा आपल्या जागेवर बसण्यासाठी वळले.

“तर मी काय म्हणत होतो की, तुम्ही मला तुमच्या कार्यक्रमाची जागा आणि तारीख सांगणार आहात ना? म्हणजे त्या नुसार ती तिकडच्या हॉटेलचं रीझर्वेशन करेन.” अंबानी.

बाबांना टॉयलेट लागली. ‘येतोच’ असं म्हणून बाबा टॉयलेटकडं रवाना झाले आणि अंबानी त्यांच्या जागेकडं.

नंतरचा प्रवासात दोघांची भेट झाली नाही.

सकाळी सहा वाजता विमान न्यू यॉर्क विमान तळावर उतरलं.

आधी सुपर क्लब क्लासवाले बाहेर पडले. त्यानंतर फर्स्ट क्लास.

बाबा रामदेव इमिग्रेशन करून बाहेर पडले, त्यांना आसपास अंबानी दिसेनात. 

बाबा रामदेवनी निःश्वास टाकला.

बाबा रामदेवनी टॉयलेट वगैरे आटोपलं. ते विमानतळाबाहेर पडले नाहीत. अंतर्गत ट्रेननं ते दुसऱ्या टर्मिनलमध्ये पोचले. वॉशिंग्टनला जाणाऱ्या विमानाच्या गेटजवळ पोचले.

त्यांनी आसपास पाहिलं. अंबानी दिसले नाहीत.

बाबा खूष झाले. वॉशिंग्टनचं फ्लाईट अजून अनाऊन्स व्हायचं होतं.

बाबांनी मोकळ्या जागेत जाऊन श्वासोछ्वासाची आसनं करायला सुरुवात केली. पोट आतबाहेर करू लागले, जोरात श्वास सोडू लागले, घेऊ लागले. घिसाड्याचा भाता हलतांना जसा आवाज यावा तसा आवाज येऊ लागला.

प्रवासी चकित झाले. प्रथम त्यांनी बाबांकडं थेट पाहिलं नाही, डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिलं. पण नंतर प्रवाशांचा धीर चेपला. ते बाबांचं आसन थेट पाहू लागले. काही प्रवासी बाबांभोवती गोळा झाले. ते आसन संपलं. मग बाबांनी शीर्षासन सुरू केलं. शीर्षासनात ते पाचेक मिनिटं होतं. शीर्षासन आटोपून बाबा सरळ झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या.

फ्लाईट अनाऊन्स होईपर्यंत बाबा आसनं करत होते.

फ्लाईट अनाऊन्स झालं. कर्मचाऱ्यांनी सर्वांना दूर ठेवून बाबा आणि त्यांच्या अनुयायांना आधी आत सोडलं.

बाबा विमानात बसले.

विमान सुटलं. हसत हसत बाबांनी आपल्या एका अनुयायाला टाळीही दिली, अंबानींची ब्याद सुटली असं म्हणत.

तिकडं स्वतंत्रपणे अंबानींनी एक खाजगी विमान भाड्यानं घेतलं होतं. बाबा रामदेव यांचं विमान सुटायच्या आधी अंबानींचं विमान हवेत उडालं होतं.

..................................................................................................................................................................

दृश्य तीन

व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर पत्रकार परिषदेची तयारी चालली होती.

कॅमेरे सेट होत होते. पत्रकार तर होतेच पण खूप इतर मंडळीही गोळा झाली होती. प्रेसिडेंट ट्रम्पनी लोकांना निरोप पाठवून बोलावून घेतलं होतं. ते काही तरी ग्रेट अनाऊन्समेंट  करणार होते.

नेहमीप्रमाणं वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क टाईम्स आणि सीएनएनला सुगावा लागला होता. कोविड-१९बद्दल काही तरी घोषणा ते करणार होते.

पहिल्या दोन रांगांत पत्रकार होते. त्यांच्या मागं शे-दोनशे खुर्च्या होत्या. लोक गोळा होत होते, कुजबुजत होते. संभाव्य घोषणा हा विषय त्यांच्या बोलण्यात होता.

व्हाईट हाऊसचा दरवाजा उघडला. कॅमेरे रोखले गेले. ट्रम्प नव्हे तर आतून बाबा रामदेव बाहेर आले. त्यांनी समोर पाहून नमस्कार केला, वाकले आणि हिरवळीवरच्या एका खुर्चीवर बसले.

जमलेल्या लोकांना बाबा रामदेव परिचयाचे नव्हते. कोणी तरी भगव्या वस्त्रातला भारतीय माणूस आहे, एवढाच काय तो उलगडा त्यांना झाला. परवाच ट्रम्पनी ट्वीट करून भारताला दम दिला होता की, बऱ्या बोलानं हायड्रोक्सीक्लोरोक्वीन भारतानं द्यावं नाही तर भारतावर कारवाई करावी लागेल. उपस्थित लोकांना वाटलं की, त्याबाबत काही तरी घोषणा असणार.

पोस्ट आणि सीएनएनचे पत्रकार बाबाच्या भोवती गोळा झाले. बाबा आणि त्यांच्यात काही तरी बातचीत सुरू झाली. बाबा हातवारे करून पत्रकारांना काही तरी सांगत होते.

व्हाईट हाऊसचा दरवाजा उघडला. पत्रकार बाबापासून दूर झाले, कॅमेरे पुन्हा दरवाजाकडं सरसावले. ट्रम्प आलेच नाहीत. एक सुटातला भारतीय माणूस बाहेर आला. त्यानंही वाकून नमस्कार केला आणि तो हिरवळीवर उतरला. एका सेवकानं घाईघाईत एक खुर्ची आणली आणि बाबांच्या शेजारी काही अंतरावर ठेवली. ते गृहस्थ त्या खुर्चीवर बसले.

प्रेक्षकांतली कुजबूज वाढली. नक्कीच भारतविषयक काही घोषणा असणार असं लोक म्हणत होते. ट्रम्प भारतावर लढाऊ विमानं वगैरे तर पाठवणार नाहीयेत ना असं सीएनएनच्या पत्रकारानं शेजारच्या पत्रकार सहकाऱ्याला विचारलं. शेजारचा पत्रकार म्हणाला की, ट्रम्प यांच्या बाबतीत काहीही शक्य आहे.

आलेले गृहस्थ अनिल अंबानी होते. ते बाबाच्या शेजारी बसले आणि बाबांचा चेहरा एकदम पडला. आता बाबाचा स्वर चिडका झाला- “तुम्ही इथे काय करताय? पॅरिसला भेटलात, न्यू यॉर्कमध्ये भेटलात पण बोलला नाहीत.”

अंबानी प्रसन्न हसले. “तुम्ही तरी कुठं सांगितलंत की, तुम्ही वॉशिंग्टनला व्हाईट हाऊसमध्ये जाणार आहात.”

व्हाईट हाऊसचा दरवाजा उघडला. पत्रकार आणि उपस्थित मंडळींच्या मनात आलं की, आता तरी ट्रम्प येणार की नरेंद्र मोदी बाहेर येणार?

पण खरोखरच ट्रम्प दरवाजातून बाहेर आले आणि टाळ्या वाजवत पोडियमशी हजर झाले.

ट्रम्प बोलू लागले. “एक फँटास्टिक घोषणा करायची आहे. कोविड-१९वर रामबाण औषध सापडलं आहे. ग्रेट प्राचीन भारतीय परंपरेनं ते औषध तयार केलं आहे... औषधाचं नाव आहे...” ट्रम्प नाव उच्चारायचा प्रयत्न करतात, पण ते त्यांना जमत नाही. ते चाचरतात. ते बाबा रामदेवना औषधाचं नाव जाहीर करण्यासाठी पोडियमवर बोलातात. बाबा अत्यंत आनंदानं एक उडी मारून पोडियमपर्यंत पोचतात.

बाबा रामदेव गायत्री मंत्र गायला लागतात. पहिली ओळ होते न होते तोवर अस्वस्थ ट्रम्प बाबांच्या खांद्यावर हात ठेवतात. आपण असताना इतर कोणी कॅमेऱ्यासमोर येणं, भाषण करणं ट्रम्पना आवडत नाही.  ट्रम्प म्हणाले-  “नो सिंगिंग, नो स्पीच. नाव सांगा.”

बाबांच्या चेहऱ्यावर एक केविलवाणं हास्य येतं. ‘ओके’ असं म्हणून बाबा नाव जाहीर करतात. “कोरोनाविनाशक”

ट्रम्प टाळ्या वाजवतात, बाबा रामदेवना दूर सारतात. ‘तुमच्या जागेवर बसा’ असं सांगतात.

सीएनएनचा पत्रकार म्हणतो- “आम्हाला त्या औषधाबद्दल काही तरी सविस्तर सांगा.”

ट्रंप म्हणतात- “ते औषध गोमुत्र, गाईचं शेण, गवत, गाईचं तूप यांच्यापासून तयार केलं आहे. बाबा रामदेवनी सांगितलंय की, एका सहा हजार वर्षांपूर्वीच्या संहितेमध्ये ते औषध रामदेवच्या लोकांनी शोधलंय.  दोन गोळ्या दिवसातून सहा वेळा. बाकी काहीही नाही. कोरोना विल बी फिनिश्ड.”

वॉशिंग्टन पोष्टच्या माणसानं प्रश्न विचारला- “त्या औषधाच्या ट्रायल झाल्या का? त्याचं पेटंट कोणाकडं आहे? ट्रायल केव्हा झाल्या, कुठं झाल्या?”

ट्रंप भडकले. “तुम्ही पत्रकार विकृत आहात. उगाचच प्रश्न विचारून फाटे फोडता. हज्जारो वर्षांपासून ते औषध भारतात प्रचलित आहे, करोडो माणसं तिथं बरी होत आलीयत आणि तुम्ही ट्रायलचं विचारतायत. भारतात इतकी करोडो माणसं इतके करोडो रोग असतानाही करोडो वर्षं जगत आहेत म्हटल्यावर ट्रायल घ्यायची आवश्यकताच काय?”

अनेक पत्रकार उठून एकाच वेळी प्रश्न विचारू लागले.

पत्रकारांकडं दुर्लक्ष करत ट्रम्प बोलत राहिले. “हे औषध फन्टास्टिक ग्रेट आहे. १४ दिवसांत रोगी बरा होतो, व्हायरस नष्ट होतो. मला जाहीर करायला ग्रेट आनंद होतोय की, या औषधाची निर्मती ह्यूस्टनमध्ये सुरू होणार आहे. दिवसाला पाच लाख गोळ्या तयार होतील. जगभर वितरणाची यंत्रणा असेल.”

ह्यूस्टनच्या मेयरला कार्यक्रमासाठी बोलावलेलं होतं. घोषणा ऐकून तो बुचकळ्यात पडला. त्याला याचा काहीच पत्ता नव्हता. पत्रकार त्याच्याकडं पाहू लागले.

बाबा रामदेवांच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत असाव्यात असं त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं.

फॉक्स न्यूजच्या पत्रकारानं विचारलं- “कोणती कंपनी औषधाची निर्मिती करणार आहे?”

बाबा रामदेव मागं वळून पत्रकार व उपस्थितांकडं पहात हसले, त्यांना सुचवायचं होतं की, पहा कशी ग्रेट गोष्ट ट्रम्प सांगणार आहेत.

“माझे ग्रेट मित्र अनिल अंबानी यांची रिलायन्स कंपनी तो कारखाना उभारणार आहे.”

बाबा रामदेव यांचा चेहरा खर्रकन उतरला. ते क्षणभर थिजले. त्यांना थोडंसं गरगरल्यासारखं झालं. शेजारच्या पाच-सात माणसांना ऐकायला जाईल इतक्या जोरात ओरडले- “मादरचोद”.

सभोवतालच्या अमेरिकन लोकांना ही शिवी होती हे कळलं नाही. अनिल अंबानींनी बाबा रामदेवकडं पाहिलं, हसले.

“रिलायन्स कंपनीला औषध निर्मितीचा अनुभव काय” पाच सात पत्रकार उभे झाले आणि एकदम प्रश्न विचारू लागले.

बाबा उठून उभे राहिले. अंबानींच्या जवळ गेले. “हे तुम्ही केव्हा साधलंत? कारखाना माझा व्हायचा होता. तुम्ही दगाफटका केलाय.”

अंबानी उभे राहिले. बाबांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले- “ तुमच्यासारख्या योगी माणसानं इतकं चिडावं, शिवी द्यावी हे बरं नाही. शांत व्हा. जरा वाट पहा.”

“वाट कसली पहायची. सगळं संपलं आहे. मी चाललो.”

अंबानींनी बाबांना जवळ घेतलं, रेटत रेटत खुर्चीपर्यंत नेलं, रेटूनच खुर्चीत बसवलं.

ट्रम्प यांची घोषणा संपली नव्हती.

“याच बाबतीत मला दुसरीही घोषणा करायची आहे. ग्रेट प्राचीन हिंदू औषधांबरोबर ग्रेट हिंदू योगालाही महत्त्व आहे हे मला कळलेलं आहे. कोविडचा नायनाट करण्यात योगाचाही मोठा वाटा असणार आहे. आयुर्वेद आणि योगा या दोन्ही गोष्टींचा विकास व्हावा यासाठी एक भव्य आयुरोगा नावाचा कॉम्प्लेक्स तयार करायचं ठरलं आहे. ग्रेट बाबा रामदेव यांनी ती जबाबदारी घेतली आहे. ओरेगनमध्ये ओशोपुरममध्ये हा कॉम्प्लेक्स बाबा रामदेव उभारणार आहेत. तिथं सारं इन्फ्रास्ट्रक्चर ग्रेट ओशो यांनी तयार करून ठेवलेलं आहे. ग्रेट बाबा रामदेवनी ती जबाबदारी घेण्याचं मान्य केलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.”

रामदेव चकित झाले. त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं.

अंबानी वाकले, बाबांच्या कानात बोलले “बाबा, चिंता करू नका. चार हजार हेक्टर जागा आहे. विमानतळ तयार आहे, थोडी दुरुस्ती केली की भागेल. धरण बांधलेलं आहे. एक बारमाही नदी आहे. आसपास भरपूर डोंगर आहेत तिथं तुम्हाला वनस्पती लावता येतील, तिथं देशी गायी चारता येतील.  वीसेक हजार गायी सहज पाळता येतील. शेण, गोमूत्र, तूप आणि गवत. सारा कच्चा माल मला मिळेल. तुम्ही आणि मी मिळून हा उद्योग चालवूया. कसं?”

बाबा रामदेव यांच्या चेहऱ्यावरचा राग निवळत गेला, चेहऱ्यावर आनंद विलसू लागला.

ट्रम्प यांची घोषणा संपली, ते व्हाईट हाऊसमध्ये निघून गेले.

पत्रकार अंबानी, बाबा रामदेव यांच्याभोवती गोळा झाले.

आता रामदेवनी अंबानींच्या खांद्यावर हात ठेवला. बाबानी हसत हसत विचारलं- “तुमचं परतीचं नियोजन काय आहे?”

अंबानी म्हणाले- “माझं जेट तयार आहे. त्यात तुमच्यासाठी जागा आहे. थेट पॅरिसलाच जाऊ. तिथं एक दिवस थांबू. मग दिल्ली.”

“अरे, असं लगेच जाऊन कसं चालेल. तुमची ह्यूस्टनची तयारी असेल, मला ओरेगनला जावं लागेल…”

अंबानी हसले. म्हणाले- “काय घाई आहे हो. होतील गोष्टी आपापल्या गतीनं. आपण निघूया.”

समाप्त

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......