बातापाटील नावाचा एक शिपाई चारपाटील पंतांच्या गोटांनी कसा वापरला, याचा ‘कुल’वृत्तांत!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 21 April 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar बातापाटील कुलवृत्तांत Saatpatil kullvruttant

महामारी बंदिवासात आम्ही नुकतीच ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची तब्बल साडेसातशे पानाची महाकादंबरी ‘सातपाटील कुलवृत्तांत’ वाचून काढली. ‘हिंदू’नंतर एवढा ऐवज प्रथमच हाती लागला. आणि कादंबरी मस्ट वाचनीय असा आमचा अभिप्राय पडला.

पण आज विषय सातपाटलांचा नाही. त्यावर नंतर कधीतरी. पण या सातपाटलांच्या निमित्ताने आम्हालाही या महामारीच्या बंदिवासात एक कुलवॄत्तांत लिहिण्याची प्रेरणा मिळाली. पठारेसाहेब कुलवृत्तांत नकलून काढण्याचा गुन्हा दाखल करणार नाहीत ही आशा. तेव्हा त्यांच्या पावलावर नाही तर पानांवर आमची पानं ठेवत आम्ही ही गुस्ताखी जाणीवपूर्वक करत आहोत. त्याचा खुलासा पुढे येईलच.

भाग पहिला

बातापाटील

म्हाराष्ट्रदेशी गावात बातमी पसरवायचं काम परंपरेने बलुतेदारांकडे. ते दवंडी पिटवत. निरोप पोहचवत. आणि पायरीने वागत. वॉस्को द गामा नि नंतर ईस्ट इंडिया कंपनीमुळे म्हाराष्ट्रदेशी बरीच प्रगती झाली. त्यात दवंडी गेली नि कर्णा आला. कर्णा आला नि दवंडीवाला रुबाबदार दिसू लागला. अशाच एका बलुतेदाराचा तरणा पोरगा या कर्णा उद्योगात यायला बाशिंग बांधून तयार असतानाच एक जादू म्हणा भानामती म्हणा कर्णा धरून बोलणारा माणूस एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसू लागला. म्हणजे तो कर्णावत एकाच जागी, पण त्याची प्रतिमा घरोघरी. अशा मंत्रभरल्या वातावरणात त्या बलुतेदाराचा तो तरणा पोरगा कर्णावत होऊन जागोजागी दिसू लागला. त्याला वाटलं आपण परमेश्वरासारखे एकाच वख्ताला देशभर दिसतो. बातमी देतो. पण सरतेशेवटी आपण बलुतेदारातलेच एक. हे काही त्याला पटेना, रूचेना. पोरगा तसा हुशार. बुद्धी तल्लख नि वरच्या पायरीच्या पोटात शिरून बात काढणारी. गावचे त्यावेळचे पाटील कर्णावताच्या या एकाच वेळी अनेक ठिकाणी अवतारामुळे त्याला पायरीनेच पण सन्मानाने वागवत. कारण कर्णा वाजवायला जी बात लागते, ती त्याला तेच देत. हळूहळू कर्णावत काही बाता पाटलांना न विचाता जनहितार्थ देऊ लागला. पाटील चक्रावले पण कर्णावत न डगमगता म्हणाला, काळ बदललाय. आता बात वा बाता एकतर्फी नसणार, त्या दुतर्फा, प्रसंगी चौफेर असतील. कंपनी सरकारने हा बदल केलाय. नवीन माध्यम व तंत्र समजून घ्या. पाटलांनी पार चहूदिशांनी माहिती घेऊन कर्णावतचे म्हणणे तपासून घेतले, तेव्हा त्याच्या बातांमध्ये दम आहे, असा त्यांचा अभिप्राय पडला.

वेळ आणि गोष्ट पुढे सरकत असताना हा बलुतेदारापैकी कर्णावत आलेल्या तरुणाला वाटू लागले आपण परमेश्वरासमान काम करतो, पण गावगाड्यात आपण बलुतेदारच ठरतो. त्याच्या मनास पटेना. तो पाटलाकडे गेला आणि म्हणाला मी जे काम करतो, ते आता बलुतेदारीतलं समजू नये. त्याची प्रत वाढवा. आणि मला पाटीलकी द्या म्हणजे लोक मला तो मान देतील. पाटील म्हणाले, अशी कशी पाटीलकी देता येईल? हुशार तरुण म्हणाला का नाही? पोलीस पाटील थोडाच मूळचा पाटील असतो. पण तो जे काम करतो त्यातून तो पाटील होतो. तसा मी बाता सांगतो. लोकसेवा करतो तर मला बातापाटीलकी द्या. पाटलाला त्याची हुशारी पटली नि अडचण बी कळली. बलुतेदारीत कसला मान. मग पाटलानंच एक दिवस जाहीर केलं आजपासून हा बातापाटील. तर एका बलुतेदाराचा ‘पाटील’ झाल्याचा हा असा आहे ‘कुल’वॄ‌त्तांत.

भाग दुसरा

चारपाटील

बलुतेदाराची झूल उतरवून कर्णावत बातापाटील म्हणून पाटीलकीचा फेटा बांधून गावभर फिरू लागला तर अनेक जणांना तो मूळचाच पाटील वाटू लागला. यावर त्याने लगेचच मुंबई गादीशी संधान बांधून तिथल्या चारपाटील यांच्या गोटात प्रवेश मिळवला.

बातापाटील प्रमाणेच चारपाटील यांचा पण कुलवृत्तांत आहे. तर झाले असे मुंबई गादीचे लोकशाहीकरण झाले आणि या लोकशाहीचे कारभारी, दरबारी, दंडाधिकारी नि खबरी हे लोकशाही राबवणारे चार खांब जाहीर करण्यात आले. पण खांब म्हणजे नेमके काय हे लोकांना कळण्यासाठी यांना वेगवेगळ्या पाटीलकी दिल्या गेल्या. जे कारभारी ते एकपाटील, जे दरबारी ते दोनपाटील, जे दंडाधिकारी ते तीनपाटील, व जे खबरी होते ते चारपाटील झाले. आपला बातापाटील  लगेचच चारपाटलांचा स्थानिक कारभारी झाला. तर झाली ही गोष्ट अशी झाली की, जन्मकर्माने वेगळे असलेले लोक लोकशाहीत कर्माने परंपरेत मूळ जन्मकर्माने मिळणारी पाटीलकी मिळवून बसले.

भाग तिसरा

चारपाटील पंतांचा गोट

मूळचा बलुतेदार जसा बातापाटील बनला, तसेच पूर्वावार जे गादीचे भाट होते, जे जन्मकर्माने पंततंत होते, तेच गादीच्या डाव्या-उजव्या कानाला लागून खबरी झाले व पुढे चार खांबी व्यवस्थेत चारपाटील झाले. पाटीलकीची झूल मिळाली तरी या मूळ पंतांचे आतले महावस्त्र तेच राहिले. त्यामुळे या चारपाटील यांनी पाटीलकीच्या नावाखाली पंतांचा गोटच तयार केला आणि मग त्यात जन्मगुणकर्माने वेगळे, पण लोकशाहीने कर्मानुसार दर्जा बदललेले बातापाटलांसारखे लोक घेऊन चारपाटील समाजमान्य झाले. शिवाय त्यांनी निर्भीड, बाणेदार, अमुककार, तमुककार अशा उपाध्याही लावून घेतल्या. वेगवेगळ्या भाषा शिकून त्यांचे भाषांतर करून काही विचारवंत म्हणूनही आपसात शेलापागोटे वाटत फिरत राहिले. चारपाटलांच्या पंतांच्या गोटात बातापाटीलही मग स्वहुशारीने घुसला.पंतांच्या गोटात बातापाटलाची कुंडली माहीत होती. पण गोट वाढवण्यासाठी त्यांना असे बाटगे हवेच होते, कारण ते अधिक कडवे असतात. पण या कडव्या बाटग्याने अलीकडेच चारपाटील पंतांचा प्राण कंठाशी आणला, त्याची गोष्ट ऐका. गोष्टीचे नाव आहे - पुष्पक विमानाचे पुनरागमन

गोष्ट अशी झाली की, तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमनास पुष्पक विमानातून गेले ही गोष्ट आता तशी जुनी. पुष्पक विमान होते कसे? आले कुठून? गेले कुठे? याचे मूळ साक्षीदार कोणी नाही तरीही लोकांनी तुकारामबुवांएवढीच पुष्पक विमानावर श्रद्धा ठेवली, जशी त्यांच्या बुडविलेल्या गाथा वर आल्या यावर ठेवली तशी.

आपल्या पंतांच्या गोटात नव्हे तर पार त्यांच्या पोटात शिरलेल्या बातापाटीलने एके सकाळी आपल्या कर्ण्यातून सदेह बातमी दिली की, मुंबईची गादी लवकरच वैकुंठ वारीचे पुष्पक विमान सुरू करणार. झालं. बातमी वाऱ्यासारखी फिरली. मग घोंघावली नि मग वादळच उठवून गेली. इतिहासात तुकोबारायांना निरोप द्यायला जमले नाहीत, त्याच्या दहापट माणसे जमली. मुंबईच्या गादीसह एकपाटील, दोनपाटील व तीनपाटीलही हैराण झाले. लोकशाहीत वैकुंठ म्हणजे पालिकेची स्मशाने. तिथे जायला विमान नाही तर शववाहिका वा चार खांदे (खांब नव्हे!) लागतात. मग हे पुष्पक विमान कुठून येऊन कुठे जाणार?

बातापाटील कर्णा वाजवून झोपला. पण मुंबई गादीसह चारपाटलांची झोप उडाली. चारपाटील पंतांची धोतरे पितांबरे होण्याची वेळ आली, असा चहू दिशांनी दाब वाढत चालला. हा असा भानवेचा खेळ? चारपाटील हा मूळचा पंतांचा गोट असल्याने गोटातील सर्व पंतांनी बातापाटील म्हणजेच पर्यायाने चारपाटील चामडी संरक्षक योजना तयार करून बातापाटील हा शिपाईगडी जणू आता शहीदच होणार अशी वातावरणनिर्मिती करून बातापाटीलच्या बंडखोरीसह अटकेपार झेंडे लावल्याच्या अमरचित्रकथा प्रसृत करून जो तो मी बातापाटील असे गोंदवून मिरवू लागला.

तिकडे गादीतील एकपाटील, दोनपाटील, तीनपाटील यांनी खलबत करून बातापाटीलला झोपेतून उचलून मुंबई गादीच्या गेटावर आणून जाग आणली. दिवसभर गेटावर ठेवले. तोवर पंतांच्या गोटांनी पळीपंचपात्रे घेऊन पूजा घातल्या. वरच्या पाटलांना क्रमवारीने भेटून रतबदली केली. मोहिमांच्या वेळी ब्राह्मणभोज घेऊन दिलेल्या आशिर्वादांची आठवण करून दिली. रमण्यात मिळालेल्या अंगठ्या, कंठहार दाखवले. व यापुढे खबरदारी घेऊ वगैरे लाळघोटेपणाचे चाटण लावून बाहेर येऊन निर्भिड बाणेदारपणाचे शेले उडवत चारपाटील नित्यकर्मास लागले.

सूर्यास्ताला गादीने बातपाटील याची सशर्त व काही मोहरा घेऊन हमीवर सुटका केली. लगेच बातपाटील गादीच्या गेटाबाहेरच कर्णा घेऊन उभा राहिला नि करुण कहाणी सांगू लागला. माझी म्हातारी आय जात्यावर दळत ओवी म्हणत होती. शिपायांनी सत्तर वर्षांत पहिल्यांदाच तिची ओवी तोडत मला उठवायला सांगितले. सर्व घर हादरले. बाहेरच्या शेवग्यासह त्यावरच्या शेंगा शहारल्या. चिमण्या चिडीचूप झाल्या. पण शिपायांनी मला उचललेच.

पुष्पक विमानाची बातमी मला जशी कळली, तशी मी सांगितली. मला कशी कळली? तर नदीचे मूळ, ॠषीचे कूळ नि खबरीचा घागा शोधू नये. तरी मी धागा दाखवलाच. आता वैकुंठ नि पुष्पक विमान आहे, असे समजून लोक जमा होतात हा दोष खबरीचा की, लोकांच्या श्रद्धा की अंधश्रद्धेचा?

बातापाटीलचा हा प्रश्न पंतांच्या गोटातील चारपाटलांनी मग तात्त्विक चर्चेचा मुलामा देत बातपाटील या भुरट्या खबरीला पार राजबंदी बनवून चारपाटलांनी आधीच वाढून ठेवलेल्या पानांवर बसून आपआपल्या वाट्याचे तूप ओढून घेत गादीकडून धाडलेले भोजन ओरपून घेत ही कथा सुफळ संपूर्ण केली.

आता शांतीपर्वात बातापाटील पंतांच्या गोटातील कुठल्या पुरस्काराचा मानकरी करायचा; चारपाटील पंत गोटातील कुणाला आता महर्षि, आचार्य, स्वामी या उपाध्या द्यावयाच्या यावर खलबते चालू असून याला समांतर मुंबई गादीसच सुरूंग लावण्यासाठी बारभाईचे कारस्थानही शिजतेय व त्यासाठी दिल्ली सलतनीसह नागपुरातही काही घोडी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होऊन फुरफुरूही लागलीत.

बातापाटील नावाचा एक शिपाई चारपाटील पंतांच्या गोटांनी कसा वापरला याचा हा ‘कुल’वृत्तांत.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Sanjay Pawar

Fri , 24 April 2020

धन्यवाद!


ADITYA KORDE

Wed , 22 April 2020

आम्हाला वाटते नगपुरातील घोडी कितीही फुरफुरली तरी द्वादशमेधापूर गावातील टग्यापाटीलच बाशिंग बधून बोहल्यावर चढणार सध्या त्याला बाशिंगबळ प्राप्त आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......