करोना व्हायरस आणि पाण्याच्या बुडबुड्यावरचे इंद्रधनुष्य!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 15 April 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona virus लॉकडाउन Lockdown

लॉकडाऊनचे वाढीव दिवसासहितचे पहिले पर्व संपले. महाराष्ट्राच्या ३१ मार्चपर्यंतच्या लॉकडाऊनला मोदींनी १४ एप्रिलपर्यंत वाढवले होते. असे ते वाढीव पर्व संपले. दुसरे पर्वही ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह अनेकांनी ठरवले, त्यात काल मोदींनी येऊन ३ मे पर्यंतची वाढ केली! सर्वच मुख्यमंत्री ठरवू लागले, तर प्रधानसेवकांनी काय करायचे? म्हणून तीन दिवस त्यांचे! असो.

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर लॉकडाऊन वाढणार हे स्पष्टच होते. कारण वाढते रुग्ण व तबलिगींसह ‘निवडकांची’ बेपर्वाई, तसेच चाचण्या करण्यास असणाऱ्या मर्यादा.

आता सरकारवर, राज्य व केंद्र दोन्हींवर लॉकडाऊन उठवण्यासाठी वा शिथिल करण्यासाठी दबाव वाढतोय. कारण व्हेंटिलेटरवर असणारी अर्थव्यवस्था. त्यामुळेच लॉकडाऊन पर्व-२मध्ये हळूहळू शिथिलता आणण्याचे संकेत आधी मुख्यमंत्र्यांनी व काल पंतप्रधानांनीही दिलेत. पण आता खरी परीक्षा सुरू होणार आहे. दरवाजे उघडल्यानंतर, शिथिलता दिल्यावर वा पूर्णच बंदी उठवल्यावरही, बंद होतेवेळी ज्या गोष्टी ज्या स्थितीला होत्या, त्याच स्थितीपासून पुढे कार्यरत होतील?

लॉकडाऊन पूर्ण मागे घेण्यातच अजून दोन-तीन महिने जातील. त्यात मे च्या शेवटापासूनचा पावसाळा, पावसाळ्यातले नियमित आजार! या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर गोष्टी पूर्णपणे पूर्वपदावर यायला दिवाळी उजाडेल! विशेषता या संपूर्ण लॉकडाऊन पर्वात ज्याची फारशी चर्चा झालीच नाही, कुठेतरी छुटपूट बातम्या आल्या, त्या भारतातल्या व विशेषत: मुंबईतील मनोरंजन उद्योगाबद्दल माध्यमांनीही जी अनास्था दाखवली ती अनाकलनीय आहे!

भारतीय चित्रपट उद्योग आज जगात नंबर एक वर आहे. भारतात चित्रपट निर्मितीत दक्षिण भारतानंतर मुंबईचा नंबर आहे. या शिवाय दूरचित्रवाणी मालिका व व्यावसायिक नाटक यांची निर्मिती महाराष्ट्राइतकी देशात कुठेच होत नाही. पण माध्यमांनी याची दखलच घेतली नाही.

माध्यमांनी दखल घेतली. पण कशाची? तर कुठल्या स्टारने किती कोटीची मदत केली, यापैकी अनेकांनी घरी बसून कसे जनजागृतीचे व्हिडिओ अपलोड केलेत ते आणि ही मंडळी सध्या घरबसल्या आपला वेळ कसा घालवताहेत याची. जोडीला जे बॅकस्टेज वर्कर आहेत, त्यांना काही कलाकारांनी मिळून केलेली पैसे व अन्नधान्याची मदत. याच्याही बातम्या आल्या. काल-परवा एकच बातमी आली की, सुस्थिर कलावंतांनाही आता भविष्याची काळजी वाटू लागलीय.

आश्चर्य हे वाटतं की, ऑलिम्पिक होणार की नाही यावर चार दिवस आठ पाने खर्च केली, विम्बंलडनवर अशीच दोन दिवस चार पाने खर्च केली, बदमाशांचे आगार असलेल्या आयपीएलवरही चर्चा झाली. हातावर पोट असणारे मजूर पायपीट करून मरत असताना आयपीएलमधल्या क्रिकेटपटूंना पगार मिळणार नाही याची चिंता वाहणाऱ्या बातम्या म्हणजे बेशरमपणा होता! आजही या महामारीच्या युद्धात धोनीच्या निवृत्तीवर एक पान खर्च करतात वृत्तपत्रे?

मग सवाल असा विचारावासा वाटतो, रोज दीड-दोन पाने नाटकाच्या जाहिरातींनी महसूल वाढवणारी वृत्तपत्रे नाटकवाले जिवंत आहेत का मेलेत एवढीही दखल घेऊ शकत नाहीत? आजघडीला नाट्यनिर्मितीत व प्रतिदिन प्रयोगात वर्तमानपत्रातली जाहिरात हा सर्वांत जास्तीचा खर्च आहे. असा हा उद्योग आपल्या दीड-दोन पानांतून महिनाभर गायब आहे, तर काय स्थिती आहे त्यांची? कसं जगताहेत? काय चिंता आहेत?

कशाचीच दखल नाही.

त्या चष्मा हरवलेल्या बच्चनच्या व्हिडिओतले एखाद-दुसरे सोडले तर बच्चनसह सर्व आत्तापासून कायमस्वरूपी घरी बसले तरी काहीही बिघडणार नाही, ना त्यांचं ना इंडस्ट्रीचं.

महाराष्ट्रात आज चित्रपट, मालिका व नाटक ही क्षेत्र पूर्ण ठप्प झालीत. मुळात मालिका सोडल्या तर चित्रपट व नाटक व्यवसायातून परताव्याची कसलीच खात्री नाही! खात्री असलीच तर ती तोट्याचीच! या तिन्ही क्षेत्रात कुशल-अकुशल असे कोट्यवधी लोक कार्यरत आहेत. आज हे सर्व बिनकामाचे, बिनपगारी घरी बसलेत. यात जसा शेवटच्या पायरीवरचा स्पॉटबॉय आहे, तसाच पहिल्या पायरीवरचा सेलेब्रेटी अभिनेता/अभिनेत्रीसुद्धा आहेत.

बाहेरून बघताना या रूपेरी चंदेरी दुनियेचा झगमगाट, प्रसिद्धी व काही काळ हाती नांदणारा पैसा दिसतो खरा, पण त्यामागचे वास्तव धडकी भरवणारे आहे. या क्षेत्राइतके अस्थिर क्षेत्र जगात कुठले नसेल. त्यामुळेच मिळाले की ओरबाडून, ओरपून खायचे आणि फाके पडायला लागले की, विस्मृतीच्या गर्तेत जात व्यसनाधीन, डिप्रेस वा लाचार व्हायचे वा अपमान गिळत मिळेल ते काम करायचे! भारताचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना शेवटच्या काळात नॉन एसी मारुती 800 चालवत असे आणि संध्याकाळी ओल्ड मंकची (इंडस्ट्रीची फेवरिट व स्वस्त दारू) क्वार्टर घेऊन कुणी येईल का, याची वाट पाहात असे! या एवढ्या शितावरून भाताची कल्पना यावी!

आज मराठी चित्रपट, मालिका व नाटक यात हुकमी पैसे मिळायचे माध्यम म्हणजे मालिका! यात काम करणाऱ्या कलाकारांना प्रसिद्धी वारेमाप मिळते. पैसे वारेमाप नसले तरी नियमित म्हणजे ९० दिवसांनी मिळतात. प्रतिदिन असा मेहनताना ९० दिवसांनी देणारा व अजिबात का-कू न करता घेणारी जगातली ही एकमेव इंडस्ट्री असावी. या प्रतिदिन मानधन कम मजुरीचे तास निश्चित नाहीत, कामाची सांगितल्याप्रमाणे शाश्वती नाही व मालिका बंद झाली तर बाकी रक्कम मिळण्याची शक्यता शून्य! निर्माता वाहिनीकडे बोट दाखवतो, वाहिनी जाहिरातदार व टीआरपीकडे बोट दाखवतो. संपले!

आज मालिकांमध्ये अभिनयापासून इतर विभागांचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित झालेले कलाकार तंत्रज्ञ काम करतात. त्यातले ८० टक्क्यांहून अधिक मुंबई बाहेरून आलेले. आजच्या लॉकडाऊन काळात घरभाडे, कौटुंबिक खर्च, मालकीचे घर असेल तर ईएमआय, गाडी असेल तर तिचा खर्च याशिवाय जिम, सलून, व्याधी व काही असलीच तर व्यसनं यांचा मेळ कसा घालणार? यात स्त्री व पुरुष असे दोघेही धरलेत. ज्यांची बायको वा नवरा कमावता आहे, ते नेतात निभावून एरव्हीही, पण आता तर दोघे घरी, वेतनात कपात वगैरे. याशिवाय इथे एकल पालकही भरपूर! त्यात स्त्री कलाकारांचे प्रमाण लक्षणीय. त्यांची तर कमाईकाळातही जी उरफोड होते, तर आता काय होत असेल?

मराठी चित्रपट कोट्यवधी रुपये कमवू लागलेत या अंधश्रद्धेत अजूनही मोठी जनता आहे! ‘सैराट’ने तो विक्रम रचला, पण त्याचवेळी त्याने चित्रपट निर्मितीच्या मुंबई-पुणे केंद्रीकरणाचं विकेंद्रीकरण करून गावोगावी चित्रपट निर्मितीला चालना दिली. परिणामत: मुंबई-पुण्यातील निर्मिती थंडावली. प्रसिद्ध, लोकप्रिय अभिनेता/ नेत्री हवी या गृहितकाला मोडीत काढत गावोगावी नायक-नायिका पुढे आले आणि काही प्रमाणात लोकांनीही त्यांना स्वीकारले. त्यातून बडे कलाकार घेऊन करोडोचा तोटा सोसण्यापेक्षा काही लाखात नवोदित सिनेमा करून मापात खर्चून मापात कमवू वा मापात बुडू हे नवे अर्थशास्त्र रूजलं. या लॉकडाऊनने मोठ्या बॅनरसह या जिल्हा बॅनरनाही मंदी वा बंदीचा तडाखा दिलाय. म्हणजे शहरात सेलेब्रेटी घरात, तर गावोगावी लोकल टॅलेंट घरात!

एक मालिका वा एक चित्रपट निर्मिती बंद म्हणजे प्रत्यक्ष चित्रिकरणस्थळीचे किमान ५० जण बेकार, तर पडद्यामागचे लेखक ते वितरक असे आणखी किमान ५० जण बेकार! यातले ९९ टक्के हा व्यवसाय सोडून दुसरा कुठलाच व्यवसाय करू शकत नाहीत. कारण तशी शैक्षणिक पात्रता, अनुभव नसणे व या क्षेत्रात अनेक वर्षे राबून मिळवलेले स्थान!

हीच गत नाटकांची. नाटकांचा प्रेक्षकवर्ग गेल्या काही वर्षांत झपाट्याने कमी झालाय. नाटकांचे दौरे आता होत नाहीत, कारण अर्थकारणात निर्माते व कंत्राटदार दोघांना परवडत नाहीत. आज नाटकाचा प्रतिप्रयोग खर्च मुंबईत जाहिरातीसह किमान १ लाख रुपये आहे. तिकीट दर कमाल ३०० रुपये ठेवला व हाऊसफुल झाले तर नाटक फायद्यात. प्रशांत दामले हे एकमेव कलाकार असे आहेत, जे सतत व कायम फायद्यात आहेत! दुसरं नाव भरत जाधव. बाकी मग सिरिअल प्रसिद्ध कलाकार घेऊन जी नाटके येतात, ती पहिले काही प्रयोग उत्पन्न देतात, काही वेळा तेही गणित फसतं.

आज मुंबई-पुण्यात मोजकीच नाट्यगृहे, त्यातल्या अनेकांची दुरव्यस्था वेळोवेळी समोर आलेली. बाकी मग उर्वरित महाराष्ट्रात तुरळक अपवाद वगळता आनंदी आनंदच. यामुळे शासनाने चित्रपटांप्रमाणेच नाटकांनाही अनुदान सुरू केलेय, यावरून या व्यवसायाची नाडीपरीक्षा करता येते.

मराठी जनतेला मराठी भाषेचा अभिमान फार. पण या भाषेतून निर्मिती होणारे साहित्य, चित्रपट, नाटक पैसे खर्चून बघण्याची मानसिकता नाही. नुस्ताच भाषिक अस्मितेचा उरबडवेपणा नि अभिमान गीताचा कंटाळवाणा कोरस. मालिका तुलनेने फुकटच बघायला मिळतात म्हणून बघतात. उद्या प्रति एपिसोड प्रतिमाणशी दहा रुपये लावले तर टीव्ही बंद करून लोक एफएम रेडियो लावतील वा मोबाईलवर पायरेटेड काहीही बघतील.

अशा या व्यवसायाबद्दल, त्यात कार्यरत इतक्या मोठ्या संख्येने कलाकार, तंत्रज्ञ, शिवाय पूरक उद्योग वगैरे धरले तर ती संख्या हिरे वा सोने व्यापारापेक्षाही जास्त होईल. यांची या महामारीत म्हणावी तशी दखलच घेतलेली नाही. कारण आजवर या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा न मिळाल्याने याची कसलीच गिनती होत नाही!

परवाच या व्यवसायात व्यवस्थापक म्हणून काम करणारा सहकारी म्हणाला, ‘आपली हालत अशी आहे- आपण या चमकत्या धंद्यामुळे ना अन्नछत्रात जाऊन बसू शकत ना कोण आपल्याला कर्ज देईल, कारण परतफेडीचा भरोसा काय द्यायचा?’ या क्षेत्रात कार्यरत आहे, त्यामुळेच या महामारीत प्रत्यक्ष रोगापेक्षा त्याच्या साईड इफेक्टने अनेकांना मरणयातना भोगाव्या लागणार आहेत. कारण लॉकडाऊन उठले तरी संसर्गाची जास्त शक्यता असलेली सिनेमा नाट्य थिएटर्स लगेच उघडणार नाहीत. या बंद काळात त्यांची जी दुर्दशा झाली असेल, ती नीट करण्यात किमान महिना जाईल. मग तारखा वाटप!

इतर उद्योगात मंदी असल्याने चित्रपट निर्मितीत पैसा लगेच येणार नाही. याचा फटका मोठ्या प्रॉडक्शन हाऊस व निर्मात्यांना बसणार. त्यातून काही करायचे ठरले तर शूटिंगला कुठे जाणार?

ज्या मालिका आज वेगवेगळ्या भागात चित्रित होताहेत, त्यांना तर गावकरीच पळवून लावतील! स्टुडिओत सेट लावायचे तर निर्जंतुकीकरणापासून पन्नास परवानग्या वा नियम पाळावे लागतील. यातून हात ओले करणे व नियम तुडवणे वाढेल नि कदाचित प्रादुर्भावही!

मुळात प्रेक्षक जमवायला परवानगीच मिळायला तीन महिने किमान लागतील! लॉकडाऊननंतरही पूर्ण लॉकडाऊन स्थितीत असणारं एकमेव क्षेत्र असेल मनोरंजन क्षेत्र. पण यावर कोणी काही बोलतच नाहीए. आज अनेक कलाकारांनी नव्याने घरं घेतलीत, त्यासाठी कर्जे घेतलीत. जरा बरे दिवस आले म्हणून गाड्या घेतल्यात. काहींची ऑफिसेस आहेत. त्यात स्टाफ आहे. चित्रपट व नाट्यक्षेत्रातल्या मंदीने व तोट्याने अनेक जण आधीच कर्ज व देण्यांच्या ओझ्याखाली आहेत. प्रचंड तणावात आहेत.

वरकरणी सर्व चकचकीत व सामान्य दिसत्येय. पण शेतकरी आत्महत्या करतात तशी परिस्थिती आहे अनेकांची.

पुन्हा हे क्षेत्र असे की सरशी तिथे पारशी!

तुम्ही काम, पैसे देताय तोवर व्हॉटसअॅप फुल्ल! एकदा का खबर लागली की, इथे पुढे काही नाही की दुसऱ्या दिवसापासून तुमचा मेसेज अलर्ट टोन लॉकडाऊनमध्ये!

जितकं झगमगतं, जिवंत, सळसळतं हे क्षेत्र तितकेच निर्दयी, क्रूर व असंवेदनशील.

या विरोधाभासामुळेच कदाचित या क्षेत्राचं एकत्रित परिणामाचं चित्रं कधीच समोर येत नाही.

त्यामुळेच महामारीत व महामारीनंतरही सर्वांत गाळात जाणारे हे क्षेत्र माध्यमांनाही विचारात घ्यावेसे वाटत नाही.

मसालेदार वा झगमगीत बातमीखेरीज माध्यमांनाही या मनोरंजन उद्योगाच्या तळाशी जो अंधार आहे, तिथवर जावंसं वाटत नाही. कारण त्यांनाही खाली वाढत जाणाऱ्या अंधारापेक्षा वर उडणाऱ्या झागवाल्या पाण्याच्या बुडबुड्यावरच्या इंद्रधनुष्यी रंगाचीच भूरळ अधिक!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-00@cloudtestlabaccounts.com

Thu , 30 April 2020

text


5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-00@cloudtestlabaccounts.com

Thu , 30 April 2020

text


5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-00@cloudtestlabaccounts.com

Thu , 30 April 2020

text


5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-00@cloudtestlabaccounts.com

Thu , 30 April 2020

text


5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-00@cloudtestlabaccounts.com

Thu , 30 April 2020

text


5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-00@cloudtestlabaccounts.com

Thu , 30 April 2020

text


5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-00@cloudtestlabaccounts.com

Thu , 30 April 2020

text


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......