ख्याल गायन : धरून चढणाऱ्यासाठी कठडे, उडून जाणाऱ्यासाठी मोकळं आकाश!
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • पं. कुमार गंधर्व यांची गातानाची एक तल्लीन मुद्रा
  • Sat , 14 January 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe बंदिश Bandish

बंदिश म्हणजे काही भावगीत नव्हे, शब्दभाव गीत नाही, तर बंदिश हे रागभाव गीत आहे. चांगली कविता एकाच वेळी विशिष्ट आणि साधारण असते. म्हणजेच त्या कवितेला तिची स्वत:ची नेमकी ओळख असते. या अर्थानं ती विशिष्ट असते आणि साधारण असते. म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थल-काल-व्यक्तीच्या संदर्भातच तिला अर्थ असतो असं होत नाही. ती संदर्भापलीकडे अर्थगर्भ असते. स्थल-काल-व्यक्तीसापेक्ष अनुभवाचा एक अमूर्त अर्क तिच्यात असतो. म्हणून अशी कविता भावार्थाचे तरंग उत्पन्न करते. अनेक रूपांनी रसिकमनात प्रतिबिंबित होते. चांगल्या बंदिशीचंही असंच असतं. फरक एवढाच की, बंदिश ही सांगीतिक आशयाचं अर्करूप असतं. ज्यावेळी शब्दार्थ खुलवण्यासाठी, अगदी शब्दांतून सूचित होणारा भाव समृद्ध करण्यासाठी संगीताचा वापर केला जातो, तेव्हा संगीत ‘उपयोजित कला’ (Applied Art) ठरते. विशुद्ध कलाविष्कार आणि उपयोजित कला यात बरंच अंतर असतं. पण काही वेळा हे अंतर सहज लक्षात येत नाही इतकं कमी असतं. ख्याल गायन प्रकारात संगीतकलेचा उपयोजित ते विशुद्ध असा कलाप्रवास प्रतिबिंबित झाला आहे.

फार तात्त्विक वाटतंय ना? जरा व्यवहारात उतरून हे तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करू या, तुम्ही आणि मी दोघांनीही. ख्याल गायक काय करतो? सुरात लावलेले तंबोरे वाजत असतात. तो प्रथम सूर लावतो. जो राग तो गाणार असतो त्या रागाचे काही प्रारंभिक आलाप गातो आणि त्यानंतर बंदिश प्रस्तुत करतो. बंदिशीबरोबर तबलासंगत सुरू होते. गायनाची लय धीमी, संथ, विलंबित असते. या विलंबित लयीत तो बंदिशीचे शब्द गात रागाची बढत किंवा रागविस्तार करतो. अनेक वेळा तो शब्द न वापरता केवळ ‘आ’कारानं गायन सादर करतो. ‘समे’वर येताना बंदिशीचा मुखडा म्हणजे बंदिश-कवितेच्या धृपदाचा अंश नक्की गातो. सुरुवात खालच्या स्वरांच्या गायनानं करून हळूहळू वरचे उंच स्वर तो घेत जातो. वरच्या स्वरांच्या क्रीडेमध्ये तो बंदिशीचा अंतरा म्हणजे बंदिश कवितेचं कडवं म्हणतो. बंदिशीचे शब्द वेगवेगळ्या तऱ्हेनं, ढंगानं गातो. कधी स्वरवाचक वर्ण - सा रे ग म…नी - यांचा उच्चार तो सुरात करून स्वरावली गुंफत जातो. अधूनमधून तान सुरू होते. आणि शेवटी तर तानांची बरसात होते. बडा ख्याल – विलंबित संपतो.

बहुतेक वेळा बडा ख्याल गाऊन झाल्यावर गायक त्याच रागातला छोटा ख्याल गातो. या गायनप्रकारात लय द्रूत असते. छोटा ख्याल, विशेषत: छोट्या ख्यालाची बंदिश गीतासारखी दिसते. शब्द फार ताणलेले नसतात. एक चाल सहज लक्षात येते, गुणगुणतासुद्धा येते. अर्थात या छोट्या ख्यालाची बढत मात्र गीतासारखी नसते. बंदिशीच्या शब्दांपेक्षा बंदिशीची चाल पूर्णत्वाने अभिव्यक्त करण्याचा गायकाचा प्रयत्न असतो. छोट्या ख्यालाला प्राय: तानांची आतषबाजी होत असते. हे झालं ख्यालाचं ढोबळ वर्णन. आता थोडं खोलात जाऊन पाहू या.

भावगीतात एकानंतर एक येणारी कडवी धृपदाचा भावार्थ समृद्ध करत जातात. भावार्थानं आणि यमक साधून शब्द-नादाच्या अंगानेही प्रत्येक कडवं धृपदाशी येऊन मिळतं. भावगीत संपतं तेव्हा त्याच्या धृपदाला कडव्यांनी एक सघनता आणून दिलेली असते किंवा हा प्रवास उलट दिशेनं पाहिला तर प्रत्येक कडवं धृपदाच्या भावार्थाचा एकेक पदर उलगडून दाखवत असतं.

इथं भावगीताचा गानप्रकार म्हणून विचार केलेला नाही, तर एक साहित्यकृती म्हणून भावगीताकडे बघितलं आहे. बंदिशीच्या विस्तारात जवळ जवळ हेच घडतं. पण ते बंदिशीच्या शब्दार्थाच्या संदर्भात नाही तर बंदिशीच्या सांगीतिक रूपाच्या म्हणजे चालीच्या संदर्भात.

बंदिश ही एक चाल असते, एक स्वरावली असते. या स्वरावलीचा विस्तार ख्याल गायनात होत असतो. हा विस्तार लय-तालाशी नातं सांगत होत असतो. सांगीतिक विस्तार आवर्तनात्मक असतो. आवर्तन म्हणजे गोल फेरी मारून पुन्हा पहिल्या ठिकाणी येणं आणि पुन्हा पुढची फेरी मारण्यासाठी निघणं. ख्याल गायक हेच करत असतो. हे करताना तो संपूर्ण बंदिश पुन्हा पुन्हा म्हणत नाही. बंदिशीचा पहिला चरण- धृपदसुद्धा संपूर्ण पुन्हा पुन्हा म्हणत नाही, तर त्याचा एक अंश मुखडा पुन्हा पुन्हा घेतो. एक आवर्तन संपवताना संपूर्ण बंदिशीची खूण म्हणून तो मुखडा गातो. ‘उन की का कहिये बात जो’ ही बंदिशीची पहिली ओळ असली तर तो फक्त ‘उन की’ एवढंच म्हणतो. एकानंतर एक येणारी आवर्तनं भरतीच्या लाटेप्रमाणे पुढे पुढे जातात. नाटकात जशी प्रसंगांची मालिका, चित्रपटात दृश्यांमागून दृश्य एक कथानक पूर्ण करतात, तशीच ख्यालात आवर्तनांची मालिका एका रागाची अभिव्यक्ती करते.

आवर्तनांची जी मालिका गुंफली जाते तिला एक शिस्त असते. एक तर्कसंगती असते. एकच तर्कसंगती सर्वत्र असते असं नाही, पण संगती असते हे महत्त्वाचं!

ख्यालाची सुरुवात खालच्या सुरात आणि संथ होते. हळूहळू लय वाढते, स्वरावली उंच उंच जाऊ लागतात. सुरुवात साधी, सोपी असते. हळूहळू कलाकुसर वाढत जाते. यामागे काय तर्कसंगती आहे? ख्याल ही पूर्वनियोजित, ‘बसवलेली’ प्रस्तुती नसते. रागाचा अभ्यास, गळ्याची तयारी वर्षोनुवर्षं केलेली असली तरी ख्याल हा ‘त्या ठिकाणी, त्या क्षणी’ साकार होत असतो. गायक सुचून गात असतो. तो रागात शिरत असतो, अनुभवत, शोधत असतो आणि या सर्व क्रियांची नैसर्गिक लय संथ असते. श्रोतासुद्धा हळूहळू रागाच्या वातावरणात येतो. गायनाबरोबर बांधला जातो. ख्याल म्हणजे एक सजवलेला रथ आपल्याच वेगात रस्त्यातून दौडत निघून जातो, असा श्रोत्यासाठी अनुभव नसतो, तर श्रोत्याला ख्यालाच्या नौकेत बसवून विहार करायचा असतो.

नव्यानं ऐकणाऱ्यांना पुष्कळदा एक प्रश्न पडलेला असतो की, शास्त्रीय गायनात गायक तीच ओळ पुन्हा पुन्हा कितीतरी वेळा का म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, पुन्हा गाताना गायक जो लहानसा बदल करतो, तो विविधतेची लज्जत वाढवत असतो. पण गायक पुन्हा गातानाचा वेगळेपणा नवख्या श्रोत्याच्या लक्षात येत नाही. पण यापलीकडेही एक उत्तर आहे, तीच ओळ तशीच्या तशी पुन्हा पुन्हा गाण्यासाठी गायक वेध घेत असतो, त्याला धूसरपणे त्या ओळीत काही नव्या शक्यता दिसत असतात. सुईत दोरा ओवावा तसा त्याचा प्रयत्न चालू असतो आणि या प्रयत्नात तो किती वेळा ती ओळ म्हणतो याचं त्याला भान नसतं. आणि असं भान असण्याची ख्याल गायनात अपेक्षाही नसते! तिथं काही स्कोअर लिहून ठेवलेला नसतो. गायक आणि श्रोता यांत आडपडदा नसतो. जे घडतं ते श्रोत्यांसमक्ष. खऱ्या अर्थानं ही स्वर-लय क्रीडा असते. क्रिकेटच्या मैदानात खेळाडू आपल्या हालचाली आखूनरेखून ठेवू शकतो का? जसा बॉल पडेल तसा स्ट्रोक लागणार, जसा स्ट्रोक लागणार तशी फिल्डिंग होणार. तिथं एक बोलर बोलिंग करत असतो, इथं गायकाची कल्पनाशक्तीच बोलिंग करत असते. ख्याल गायनाची खुमारी वाढते, ती या खुलेपणानं, उत्स्फूर्तपणानं!

ख्याल गायकाची बांधीलकी बंदिशीच्या शब्दांशी नसते. ते शब्द भाववाही करण्यासाठी तो संगीताचं उपयोजन करत नाही. रागभावाला अनुकूल अशा भावार्थाची बंदिश गायकाने निवडली तरी भावाचं एक सर्वसाधारण, स्थूल सूचन बंदिश करते. त्यापुढे जे सांगायचं ते स्वरच सांगतात. आणि स्वरच (त्या रागाचे स्वर सामूहिकपणे) काय सांगायचं ते ठरवतात.

ख्याल गायकाची बांधीलकी विविक्षित भावाशी असते का? मला वाटतं, नाही, नसते! कारण ते पुन्हा उपयोजनच होईल. जर भाव व्यक्त करायचा असेल तर रागाची बांधीलकी सांभाळायची गरज नसावी. एका भावाच्या विविध छटा विविध सुरावटींतून – विविध रागांच्या सुरावटींतून – व्यक्त होऊ शकतात. ख्याल गायक काही अशा विविध सुरावटींची मालिका गुंफत नाही. नाटकांतील संवादांत किंवा सुगम संगीतात भावानुकूल असा आवाजाचा पोत वापरात आणतात. कधी खड्या मोठ्या आवाजात, कधी कातर आवाजात, कधी गदगदून, तर आणखी कसा कसा आवाज काढला जातो. ख्याल गायनात आवाजाचं असं उपयोजन अभिप्रेत नाही. (नसावं असं दिसतं!)

लयीचं आणि भावाचं काही एक साहचर्य सुगम संगीतात आणि नाटकात प्रस्थापित आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे द्रूत लय म्हणजे उत्साह, आनंद; धीमी, खंडित लय म्हणजे कारुण्य वगैरे. ख्याल गायनात असे संकेत पाळता येत नाहीत. प्रत्येकच राग धीम्यापासून द्रूतलयीपर्यंत लयींच्या विस्तृत पटावर अभिव्यक्त होतो. तीच गोष्ट संगीत-अलंकारांची. शोकगीतांत कोणी ताना मारणार नाही, पण शोकानुकूल रागात ताना घेतल्या जातात!

ख्याल गायनाचा एक आकृतीबंध, ढाचा बनला आहे आणि याच ढाच्यात सर्व राग गायले जातात. या ढाच्याबद्दल क्वचित कधी तक्रारीचा सूर कोणी लावला, पण तरी हा ढाचा तसा बदललेला नाही. या ढाच्याचं एक तर्कशास्त्र (तर्कविधान) आहे, ते नेमकं काय हे सांगणं कठीण आहे. पण ते आहे. सोप्या शब्दांत, ढोबळपणे सांगायचं तर ‘गाण्यासाठी गाणं’ हे ते तर्कशास्त्र आहे. गायकाला एक विस्तृत पट उपलब्ध करून देणारं ते तर्कशास्त्र आहे. धरून धरून चढणाऱ्यासाठी कठडे आहेत आणि उडून जाऊ बघणाऱ्यासाठी आकाश मोकळं आहे!

लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com