‘हेडा गॅब्लर’ : आजकालची, शिकलेली तरुण पिढी छोट्याछोट्या कारणांवरून आत्महत्या का करते?
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘इब्सेन महोत्सव’ आणि ‘हेडा गॅब्लर’ यांची पोस्टर्स
  • Wed , 29 January 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe इब्सेन Ibsen हेडा गॅब्लर Hedda Gabler

पाश्चात्य रंगभूमीवर शेक्सपिअरच्या खालोखाल नॉर्वेजियन नाटककार हेन्रीक इब्सेनचे नाव आदराने घेण्यात येते. इब्सेन (१८२८-१९०६) नाटककार आणि नाट्यदिग्दर्शकही होता. त्याच्या नाटकांनी पाश्चात्य रंगभूमीवर ‘आधुनिकता’ आली असे मानण्यात येते. त्याच्या नाटकांचा प्रभाव जॉर्ज बर्नार्ड शॉ, आर्थर मिलर, युजिन ओ’निल वगैरे नाटकाकारांवर दिसून येतो. इब्सेनला १९०२, १९०३ आणि १९०४ साली साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळाले होते. आजही जगभर त्याची नाटकं मंचित होत असतात. त्याच्या अतिशय गाजलेल्या आणि काळाच्या पुढे समजल्या जाणाऱ्या ‘अ डॉल्स हाऊस’ या नाटकाचे प्रयोग आजही होत असतात. या नाटकाच्या शेवटी धाडकन दार लावून बाहेर पडणाऱ्या नोरापासून युरोपात स्त्रीमुक्तीची सुरुवात झाली, असे मानणारे अभ्यासक आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी रंगभूमीवर इब्सेनच्या नाटकांचा प्रवेश झाला. इब्सेनची काही नाटकं पुरोगामी आशय व्यक्त करणारी आहेत, तर काही जीवनातील संघर्ष, कारुण्य वगैरेंवर प्रकाश टाकणारी आहेत. मराठी रंगभूमीवर इब्सेनची पुरोगामी आशय असणारी नाटकं जास्त प्रमाणात झाली. याचे उत्तम उदाहरणं म्हणून ‘अ डॉल्स हाऊस’, ‘अ‍ॅन एनिमी ऑफ द पिपल’, ‘पिलर्स ऑफ सोसायटी’ वगैरे नाटकांचा उल्लेख करावा लागेल. मात्र ‘घोस्टस्’, ‘हेडा गॅब्लर’सारखी इब्सेनची इतर नाटकं मराठीत फारशी मंचित झालेली नाहीत.

मुंबईस्थित नाट्यसंस्था ‘सुरनई’तर्फे गेली काही वर्षं इब्सेनच्या नाटकांचा वार्षिक महोत्सव भरवण्यात येतो. ‘इब्सेन महोत्सवा’चं हे पाचवं वर्षं आहे. हा महोत्सव नुकताच जुहूच्या ‘पृथ्वी थिएटर’मध्ये संपन्न झाला. या महोत्सवाला रसिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद बघता आणि त्यातही मोठ्या प्रमाणात तरुणाईचा सहभाग बघता जातिवंत कलाकार कशा स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून रसिकांशी संवाद साधतो, याचा प्रत्यय आला.

इला अरुण यांनी इब्सेनच्या ‘हेडा गॅब्लर’चं स्वैर हिंदी रूपांतर करून या नाटकाला समकालीन संदर्भ दिले. म्हणूनच या नाटकातील पात्रं मोबाईल फोन वापरताना दिसतात. हे रूपांतर एवढं उत्तम वठलं आहे की, हे स्वतंत्र नाटक असल्यासारखंच वाटतं. इला अरुण यांनी या नाटकासाठी मुंबईतील श्रीमंत पंजाबी कुटुंब घेतलं आहे. म्हणूनच या रूपांतराचं नाव आहे ‘हरदित कौर गिल’. त्यामुळे एका युरोपीयन नाटक सहज आस्वाद्य झाले आहे.

एका मर्यादित अर्थानं इब्सेनला ‘स्त्रीवादी नाटककार’ म्हणता येतं. त्याने जसं ‘अ डॉल्स हाऊस’मध्ये एका विवाहित तरुणीची घुसमट व्यक्त केली आहे, तशीच ‘हेडा गॅब्लर’मध्ये एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची तरुण स्त्री उभी केली आहे. इब्सेनने नाटकाच्या शीर्षकापासून नायिकेचं वेगळेपण पकडलं आहे. हेडा स्वतःच्या नावासोबत ना वडिलांचं नाव लावते, ना पतीचं. आपल्याकडेही हा प्रकार १९८०-९०च्या दशकांत आला. अनेक महिला विवाहानंतर स्वतःचे आडनाव बदलत नसत.

नाटकाची सुरुवात होते, तेव्हा हरदित कौर गिल व तिचा नवरा देवेंद्र मल्होत्रा सहा महिन्यांचा युरोपातला हनिमूनवरून परत आलेले असतात. हरजित एका निवृत्त उच्च सेनाधिकाऱ्याची मुलगी पर्यायानं श्रीमंत घराण्यातील असते. सुंदर, स्वतःच्या शरीरसौष्ठवाबद्दल विलक्षण जागरूक असलेली, रिव्हॉल्वर शुटिंगचा छंद असलेली, घोडा चालवण्याची आवड असलेली हरदित विलक्षण हट्टी असते. अशा मुलींचे नवरे सहसा जसे असतात, तसाच देवेंद्र शामळू असतो. तो मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यासक असतो. त्याबद्दल संशोधन करत असतो. पुढे एकदोन प्रसंगात हेडा सांगतेसुद्धा की, ‘कधीही इतिहास संशोधकांबरोबर हनिमूनला जाऊ नये. यांना फक्त युरोपातील वस्तुसंग्रहालयं बघण्यातच रस असतो.’ अशा संवादातून इब्सेनने या नव दाम्पत्यातील सूक्ष्म ताण प्रेक्षकांपर्यत पोहोचवला आहे.

हेडा व तिचा नवरा देवेंद्र हनिमूनवरून परत येतात, तेव्हा मुंबईत त्यांचा जुना मित्र इंदरजितसुद्धा परतलेला असतो. तो गेली काही वर्षं पुण्यात होता. एके काळी अतिशय हुशार लेखक समजला गेलेला इंदर नंतर मात्र मद्यपानापायी वाया गेला असं मानलं जातं. नाटकांत हे सर्व उल्लेख इतर पात्रं करतात. इंदरची आताची मैत्रीण म्हणजे कांताने स्वतःच्या मनाविरुद्ध आणि केवळ गरजेपोटी एका वयस्कर श्रीमंत पुरुषाशी लग्न केलेलं असतं. कांता इंदरच्या प्रेमात असून आपलं प्रेम त्याला पुन्हा मोठा लेखक करेल, असा तिला विश्वास असतो. ती इंदरला वाईट व्यसनातून बाहेर काढण्यात बरीच यशस्वी झालेली असली तरी इंदर अधूनमधून नाव न घेता एका तरुणीबद्दल बोलत असतो. एक स्त्री म्हणून कांताला यातील धोका स्पष्ट दिसत असतो.

नाटक सुरू झाल्यावर थोड्याच वेळात कांता रंगमंचावर येते आणि देवेंद्रला इंदरबद्दल विचारते. दोन-तीन दिवसांपासून इंदर गावात असूनही तिला भेटलेला नसतो. इंदरच्या काळजीनं कांता देवेंद्रच्या घरी चौकशी करायला येते. तिथंच देवेंद्रचा न्यायमूर्ती असलेला पण स्वभावानं खुशालचेंडू असलेला मित्र बलविंदर ऊर्फ बल्लू येतो. त्याच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात लग्न करणं बसत नसतं. ‘खाओ, पिओ, मजा करो’ यानुसार जगणारा बल्लू जिवलग मित्रांसाठी मात्र सदैव उपलब्ध असतो. तो देवेंद्रच्या घरी नेहमी येत-जात असतो.

बल्लू व हरदित कौरच्या गप्पांतून प्रेक्षकांना समजतं की, हरदित वैवाहिक जीवनात सुखी नाही. याचा अंदाज बल्लूला आलेला असतो. बल्लूप्रमाणेच देवेंद्रची आत्यासुद्धा हरदित कौर गरोदर असेल अशा अपेक्षेत असते. (सहा महिने युरोपात मग केले काय? असा रास्त सवाल बल्लू व देवेंद्रची आत्या करते.) हरदित स्वतः जीवनाबद्दल खूप गोंधळलेली असते. तिला कळत नाही की, जीवनात तिला काय हवं आहे? नाटककारानं तिला अनेक प्रसंगांत कधी नाराज असलेली, तर कधी चिडचिड करणारी दाखवली आहे. यातून नाटककाराला आधुनिक, सुशिक्षित, श्रीमंत, सुंदर, जबरदस्त आत्मविश्वास असलेल्या स्त्रीचा गोंधळ दाखवायचा असेल. शेवटपर्यंत हरदित कौरला जीवनाकडून काय अपेक्षा आहेत, हे स्पष्ट होत नाही.

नंतर प्रेक्षकांच्या लक्षात येतं की, एकेकाळी देवेंद्र व हरदित कौरचे प्रेमप्रकरण होतं. अर्थात हे हरदित कधीच मान्य करत नाही. प्रेम यशस्वी होत नाही म्हणून देवेंद्र गाव सोडून जातो आणि दारूला जवळ करतो. आता तोच देवेंद्र परत येतो, ते एक जबरदस्त पुस्तक लिहूनच. त्याचं एक पुस्तक काही महिन्यांपूर्वीच बेस्टसेलर झालेलं असतं. या नव्या पुस्तकाचं हस्तलिखित तो देवेंद्रला वाचून दाखवतो. देवेंद्रला हे पुस्तक फार आवडतं. तो दिलदारपणे पुस्तकाची स्तुती हरदित कौरजवळ करतो. पण अशी काही परिस्थिती निर्माण होते की, देवेंद्रच्या या पुस्तकाचं हस्तलिखित हरदित कौरच्या हाती पडतं. ती ताबडतोब हस्तलिखित जाळून टाकते. तिच्या या कृत्यानं देवेंद्र हतबुद्ध होतो. कावेबाज हरदित कौर ‘मी तुझ्यासाठीच हस्तलिखित जाळले’, ‘मी आता गरोदर आहे’ असा कांगावा करते. जर देवेंद्रचे पुस्तक गाजलं तर तुझ्या पुस्तकाला कोणी विचारलं असतं, असं म्हणत ती स्वत:च्या कृत्याचं समर्थन करते.

नंतर हरदित कौर व इंदर समोरासमोर येतात. इंदर तिच्या स्वार्थी स्वभावाची निर्भर्त्सना करतो, तर हरदित कौर त्याला ‘भेकड’ म्हणते. एवढंच नव्हे तर ‘असेल हिंमत तर आत्महत्या कर’ म्हणत, त्याला स्वतःचं पिस्तुल देते. इंदर पिस्तुल घेऊन बाहेर जातो आणि स्वतःला गोळी मारून घेतो. बघता बघता या नाटकाला ‘मर्डर मिस्ट्री’चं रूप येतं. न्यायमूर्ती बल्लू हरदितसमोर घटनाक्रम बरोबर उलगडून दाखवतो आणि इंदरकडे तुझं पिस्तुल कसं गेलं असा नेमका प्रश्न विचारतो. हरदित कौर गडबडते. तिच्या लक्षात येतं की, आता बल्लू तिला ब्लॅकमेल करू शकतो. ती आतल्या खोलीत जाऊन स्वतःवर गोळी झाडून घेते.

नाटकाच्या शेवटी हौशी लेखिका असलेली देवेंद्रची आत्या ही सर्व कहाणी पुस्तक रूपानं प्रसिद्ध करते. ती एक जळजळीत प्रश्न उपस्थित करते - ही आजकालची, एवढं शिकलेली तरुण पिढी छोट्याछोट्या कारणांवरून आत्महत्या का करते? नाटक संपतं, तेव्हा प्रेक्षक हा अस्वस्थ करणारा प्रश्न घेऊन बाहेर पडतात.

हे इब्सेनचं जबरदस्त नाटक आहे. १८९१ साली पहिल्यांदा मंचित झालेलं हे नाटक २०२० सालीसुद्धा भिडतं, अस्वस्थ करतं आणि आजुबाजूच्या वास्तवाकडे डोळस नजरेनं बघायला भाग पाडतं.

हरदित कौरची भूमिका इरा दुबेनं फारच परिणामकारकरित्या सादर केली आहे. तिच्या प्रत्येक देहबोलीतून तिचं अंतर्विश्व बाहेर येतं. तिचा नवऱ्याबद्दलचा, त्याच्या मध्यमवर्गीय मूल्यं असलेल्या घराबद्दलचा तिटकारा प्रभावीपणे व्यक्त होतो. ते बघताना आज समाजातील अशा अनेक हरदित कौर दिसायला लागतात, ज्यांना नवरा अजिबात आवडत नाही, पण केवळ एक सामाजिक गरज म्हणून या महिला नवऱ्यांना सहन करतात. हरदित कौरला जेव्हा समजतं की, कांताला इंदरबद्दल प्रेम वाटतं आणि ती त्याच्यासाठी वाट्टेल तेवढा त्याग करू शके, तेव्हा ती ते सहन करू शकत नाही. तिला जमेल तेवढे टोमणे मारते.

हरदित कौरमधील आक्रमकपणा, तिचं सफाईनं घोड्यावर बसणं, रिव्हॉलर हाताळणं, या सर्व छटा व्यक्त करणं मोठं आव्हान होतं, ते इरा दुबेनं पेललं आहे. सुनिल पालवाल (देवेंद्र मल्होत्रा), राहुल बग्गा (इंदर), दोना मुन्शी (कांता), गौरव अमलानी (न्यायमूर्ती बबलू), शिल्पा वर्मा (घरात काम करणारी) व इला अरुण (देवेंद्राची आत्या) वगैरेंनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. यातही गौरव अमलानीचा खास उल्लेख करावा लागेल. त्याने खुशालचेंडू बबलू फार सफार्इनं सादर केला आहे. नेहमी हसत हसत जगणारा बबलू आणि जेव्हा हरदितचं पिस्तूल आत्महत्या करणाऱ्या इंदरजवळ सापडते, तेव्हाचा बबलू हा मोठा बदल गौरवनं छान सादर केला आहे.

नेपथ्य व प्रकाशयोजना सलिम अख्तर यांची आहे. प्रेक्षकांना रंगमंचावर हॉल दिसतो, ज्याला दोन दरवाजे आणि उजवी व डावी विंग आहेत. उजव्या विंगेतून पात्रं बाहेरून रंगमंचावर येतात, तर डावी विंग किचनमध्ये जाण्यासाठी असते. रंगमंचावरील एक दरवाजा हरदित कौरच्या बेड रूममध्ये, तर दुसरा आतून घराबाहेर जाणारा असतो. या घरात एक नवश्रीमंत कुटुंब राहतं, याची जाणीव होते.

पार्श्वसंगीत संजय दाझ व अम्बर दास यांचं आहे. खरी कसोटी होते ती दिग्दर्शकाची. ही जबाबदारी के.के. रैना या ज्येष्ठ रंगकर्मींनी सांभाळली आहे. रैना यांनी या आधी ‘सुरनई’साठी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. हे नाटक त्यांनी फार मनापासून दिग्दर्शित केलेलं जाणवतं. नाटकाला स्वतःची एक गती आहे आणि त्यात एक प्रकारचा सस्पेंस आहे. मात्र या नाटकात सततचा ताण नसून नाटककारानं एक प्रकारचं कौटुंबिक वातावरण ठेवलं आहे, याचं भान ठेवत रैना यांनी नाटक सादर केलं आहे. परिणामी हे नाटक बघणं हा एक विचारगर्भ अनुभव ठरतो.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......