सोयगावकरांचा सोयीचा निषेध
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • गडकरी यांचा संभाजी ब्रिगेडने उखडलेला पुतळा
  • Tue , 10 January 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar राम गणेश गडकरी Ram Ganesh Gadkari संभाजी महाराज Sambhaji Maharaj संभाजी ब्रिगेड Sambhaji Brigade

४ जानेवारी २०१६च्या दै. लोकमतच्या पुणे आवृत्तीमध्ये ‘वेध’ या सदरांतर्गत एक छोटंसं टिपण प्रकाशित झालं आहे. ‘लोटू पाटलांचे सुसंस्कृत सोयगाव’ असं त्या टिपणाचं शीर्षक आहे. लोटू पाटील आणि सोयगाव ही दोन्ही नावं वेगळी वाटल्याने ‘वेध’ वाचलं. अजिंठा लेण्यांच्या कुशीत हे सोयगाव वसलं असून मराठवाडा साहित्य परिषदेचं ३८वं साहित्य संमेलन या सोयगावात पार पडलं. आजही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘गैर’सोयगाव असणाऱ्या या गावात अत्यंत नेटक्या व साध्या पद्धतीने संमेलन पार पडलं असा वृतान्त या टिपणात आहे. या गावाशी रानकवी ना. धों. महानोरांचंही नाव जोडलं जातं. पण महानोरांच्या आधीपासून ते लोटू पाटील नावाच्या अवलिया रंगकर्मीचं सोयगाव म्हणून ओळखलं जातं.

‘रंगकर्मी’ हा शब्द जन्माला यायच्या आधी, म्हणजे पाऊणशे वर्षांपूर्वी या गैरसोयीच्या, आडवळणाच्या सोयगावात लोटू पाटलांनी उत्तमोत्तम नाटकं केली! स्थानिक कलाकारांना घेऊन त्यांनी नाटकं तर केलीच, पण जयराम-जयमाला शिलेदार, दामूअण्णा मालवणकर, नूतन पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर या त्या काळातल्या महनीय, लोकप्रिय कलाकारांनी सोयगावात हजेरी लावून प्रयोग केले. हे करण्यामागे लोटू पाटलांचा हेतू हा की, या दिग्गजांना बघून स्थानिक कलाकारांनी काही शिकावं! (अलीकडची नाट्य प्रशिक्षण शिबिरं आणि मुंबईबाहेर पनवेलला प्रयोग लावायचा म्हटला तर निर्मात्यांच्या अंगावर कलाकार, तंत्रज्ञ मंडळी जो काटा आणतात, त्या पार्श्वभूमीवर धन्य ते लोटू पाटील आणि धन्य ते लोकप्रिय कलाकार!) ‘कवडीचुंबक’, ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ अशी त्या काळातील गाजलेली नाटकं सोयगावात ‘ओरिजिनल संचात’ (!) झाली! ‘श्रीराम संगीत मंडळ’ नावानं नाटकांची सांस्कृतिक चळवळ पाऊणशे वर्षांपूर्वी सोयगावात रुजवणाऱ्या लोटू पाटलांनी याच सोयगावात जयराम व जयमाला शिलेदार यांचा विवाहही लावून दिला! असे हे लोटू पाटील आणि त्यांचं सोयगाव!

हे टिपण ज्या दिवशी प्रसिद्ध झालं, त्याच दिवशी पहिल्या पानावरची बातमी होती- संभाजी ब्रिगेडनं उखडला राम गणेश गडकरींचा पुतळा, मुठा नदी पात्रात फेकून दिला : सांस्कृतिक-सामाजिक वर्तुळातून तीव्र निषेध. पुण्याच्याच संभाजी बागेतला (पार्कातला!) हा अर्धपुतळा आदल्या रात्री संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उखडून थेट नदी पात्रात फेकून दिला. त्याची जबाबदारी घेत हे कृत्य करणाऱ्यांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभीही राहिली.

पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर काही वर्षांपूर्वी केलेल्या विध्वंसक हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडने पुण्यात केलेला हा तिसरा हल्ला. भांडारकरशी संबंधित डॉ. श्रीकांत बहुलकर यांना धमकी देणं, काळे फासणं असा एक छोटा हल्ला मध्यंतरी झाला.

भांडारकर संस्था व बहुलकर यांच्यावरील हल्ल्यामागे कारणीभूत होते जेम्स लेन लिखित शिवाजी महाराजांवरील पुस्तकात राजमाता जिजाऊंबद्दलची आक्षेपार्ह विधानं, तर गडकरींचा पुतळा उखडण्यामागे कारण आहे गडकरींनी त्यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकात संभाजीराजांची उभी केलेली बदनामीकारक प्रतिमा.

आता सुरुवातीला दिलेल्या सोयगावच्या माहितीचा आणि या गडकरी पुतळा विध्वंसाचा काय संबंध असं तुम्हाला वाटेल. पण आम्ही तो कसा व का ते सांगतो. गैरसोयींना बाजूला सारून लोटू पाटलांनी सोयगावचं नाव सार्थ केलं. पण गडकरी पुतळा उखडण्याच्या निमित्तानं मराठी नाट्यपरिषदेसह मराठी नाट्य-चित्रपट-मालिका कलाकार व तंत्रज्ञांनी जो काही उत्स्फूर्त आणि पोटतिडकीनं निषेध केला ते पाहून आम्हाला वाटलं, या मंडळींनीही आपआपलं एक सोयगाव तयार केलंय. पण लोटू पाटलांप्रमाणे ते गैरसोयीच्या सोयगावपेक्षा सोयीच्या सोयगावचा रस्ता धरतात!

रेखाचित्र - संजय पवार

म्हणजे बघा, त्या दिवशी चार तारखेला बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात संभाजी ब्रिगेडचा निषेध करायला सात्त्विक आणि सांस्कृतिक संतापानं ही सर्व मंडळी थरथरत होती. याच संभाजी ब्रिगेडने पंधरवड्यापूर्वी कोल्हापुरात ‘हे राम, नथुराम’ या नाटकाच्या बोर्डाला काळं फासून प्रयोग कोल्हापुरातच काय महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा दम देऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला घेराव घातला होता. शेवटी शरद पोंक्षेंनी तो प्रयोग पोलिस बंदोबस्तात केला, तेव्हा ही सर्व मंडळी कुठे होती? तिथंही ‘न पटणाऱ्या विचाराला, लेखनाला, कलाकृतीला विरोध’ हेच सूत्र होतं ब्रिगेडचं. पण त्यावरचा निषेध वाचायला मिळाला नाही.

नथुरामच्या बाबतीत सोयीच्या सोयगावकरांची गैरसोय ही झाली असावी की, ब्रिगेडला विरोध म्हणजे पर्यायाने नथुरामला पाठिंबा आणि नथुरामची बाजू धरावी तर पर्यायाने गांधींना विरोध! नथुराम की गांधी? पोंक्षे की संभाजी ब्रिगेड? या टु बी ऑर नॉट टु बी मध्ये हे सव नव-सोयगावकर सोयीस्कर शांत राहिले!

परवाच्या संतप्त सुरातले काही सूर जे होते, त्यांची थोडीशी पूर्वपीठिका आपण पाहू. मग सोयीचे सोयगावकर अधिक समजून घेता येतील.

या संतप्त सुरात एक सूर होता ज्येष्ठ रंगकर्मी लेखक\दिग्दर्शक\अभिनेता योगेश सोमण यांचा. साधारण पंधरा-वीस (कदाचित जास्त) वर्षांपूर्वी पुण्याच्या त्यावेळच्या लोकप्रिय सोहम करंडक एकांकिका स्पर्धेत श्रीरंग गोडबोले लिखित ‘रामभरोसे’ (नाव नक्की आठवत नाही) या एकांकिकेत राम, सीता व एकुणच रामायण, पर्यायाने हिंदू दैवताची टिंगलटवाळी, विटंबना केली म्हणून त्यावेळच्या शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेने दुसऱ्या दिवशी भरत नाट्य मंदिरात घुसून स्पर्धा बंद पाडली. श्रीरंग गोडबोलेंना बोलवून रंगमंचावरच काळं फासण्यात आलं. त्यांना माफी मागायला लावली, आयोजकांना दमदाटी केली. रंगमंचावरील नटराज मूर्तीसह सर्व गोष्टींचा नासधूस केली. ती रात्र संपली. श्रीरंग गोडबोले भारतीय विद्यार्थी सेनेचे त्यावेळचे प्रमुख राज ठाकरे यांचे मित्र कम प्रसिद्धी प्रचार साहित्य निर्मिती करणारे. त्यामुळे रात्रीच फोन आला व प्रकरण शांत झाले. राज्यात युतीचं सरकार व भाजप तेव्हा धाकटं भावंड! सेना शांत झाली म्हणताच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाने भरत नाट्यमंदिर गाठलं. रंगमंचाचं शुद्धीकरण केलं आणि श्रीरंग गोडबोलेंची संहिता भर रंगमंचावर जाळण्यात येऊन देशप्रेमाच्या घोषणा देण्यात आल्या. शुद्धीकरण व संहिता जाळण्याचे सूत्रधार होते सन्माननीय योगेश सोमण!

आता मंडळी आम्हाला सांगा बदनामीकारक लेखन भर रंगभूमीवर जाळणं आणि बदनामीकारक लेखन केलं म्हणून त्या लेखकाचा पुतळा उखडणं यात गुणात्मक फरक काय? यातली कुठली निषेध पद्धत उजवी अथवा डावी ठरवता येईल?

म्हणजे गांधी खुनाचा समर्थक पोंक्षेकृत नथुराम (कारण मूळ दळवींचा नथुराम पोक्षेंनी अधिक कडवट केलाय) आणि त्याला विरोध करणारी ब्रिगेड नाट्यपरिषद व रंगकर्मींना निषेधार्ह वाटत नाही, पण त्याच ब्रिगेडने संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गडकरींचा पुतळा उखडला की निषेधार्ह?

याच संतप्त सुरात एक सूर प्रसाद ओक यांचाही होता. पण गंमत अशी आहे ओक जेवढे जोरात संतापतात, तेवढ्याच वेगात ते सोयीने शांत होतात. म्हणजे झी मराठी वाहिनीचे ते काही वर्षांपूर्वी डार्लिंग होते! झी मराठीच्या संगीत स्पर्धेत त्यांनी सुमित राघवनवर विवादास्पद जेतेपद मिळवत ते झी मराठीचे अजिंक्य तारा म्हणून ब्रँड अम्बॅसिडरही झाले! पण पुढे त्यांचेच परममित्र पुष्कर श्रोत्री व झी मराठी वाहिनीने चेष्टेचेष्टेत त्यांची एवढी मस्करी केली की, तो विनोद की जाहीर बदनामी असा संशय सामान्य रसिकांनाही पडला. मग चवताळलेल्या ओकसाहेबांनी झी मराठीला आवाजच दिला. पार रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत टाईप्स. मध्ये काही काळ गेला. आणि एक दिवस झी मराठीच्या ‘होणार सून मी…’ या मालिकेत ओक प्रकटले! सोयगावकर तयार होतात ते असे!

अशा लोकांनी शपथा वगैरे घेत, आविष्कारस्वातंत्र्य, जात, धर्म यावर तणतणत बोलावे? ओकांचेच परममित्र आणि आघाडीचे अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली, ‘पुतळा सन्मानपूर्वक बसवेपर्यंत पुण्यात प्रयोग करणार नाही!’ फेसबुकच ते! दुसऱ्या क्षणापासून श्रोत्रींना आपल्या ‘लोकप्रियते’चा प्रत्यय आला. आपला पुतळा व्हायच्या आतच मुळासकट उखडून टाकलो गेलोय हे त्यांच्या लक्षात आलं असावं. प्रतिज्ञा कुणीही करू नये हा धडा सर्वांसाठीच!

खरं तर मराठी नाट्यचित्रसृष्टीतले काही सन्माननीय अपवाद वगळले तर बाकी सगळ्यांचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आकलन हे साधारण ‘पाचवी (ब)’ पातळीवरचं आहे. पूर्वी बाळासाहेबांपाशी लिन होणारे वाऱ्याची दिशा पाहून आता मातोश्री किंवा कृष्णभूवनला दंडवत घालतात. काहीजण सिद्धीविनायक आणि महालक्ष्मीप्रमाणे एकाच तिकिटात दोन्ही बसस्टॉप करतात!

राज्यात होणाऱ्या विविध पालिका निवडणुका, एक मराठा-लाख मराठा या बिगर नेतृत्वाच्या समूहाला आपल्याकडे वळवण्यासाठी उत्सूक सर्व राजकीय पक्षांसह सर्व मराठा संघटना या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने स्वत:ची राजकीय पक्ष म्हणून केलेली नोंदणी, हा ताजा इतिहास लक्षात न घेता राणाभीमदेवी थाटात सूर लावणं म्हणजे अंधारात कुत्र्याचं केकाटणं.

संभाजी ब्रिगेडचा दावा असा – हा पुतळा हटवायची मागणी आठ वर्षं जुनी आहे. आठ वर्षांचा संयम आताच का तुटला असावा? कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मराठ्यां’ना दुखवण्याचं पातक कुठलाच राजकीय पक्ष करणार नाही, ही खात्री!

आणि झालंही तसंच! राजकीय पक्षांनी ऐकू जाईल असा निषेध केलाच नाही! ज्यांनी केला ते गडकरींवर व विध्वंसक वृत्तीवर बोलले. गडकरीकृत संभाजी महाराज बदनामी खरी की खोटी की त्या मागचा मेंदू कोण, यावर सर्वत्र चिडीचूप! संभाजी महाराजांची बदनामी सहन करणार नाही, याचा शूर पुरावा इतर कुणाआधी ब्रिगेडने ठेवून मराठा मतांवर आपला हक्क प्रस्थापित करण्याची सुरुवात केलीय. राजकीय पक्ष म्हणून शिवसेना आणि मनसे यांचीही सुरुवात अशीच अस्मितेच्या उद्रेकाची होती, हे आज शिवसेना व मनसेत कार्यरत रंगकर्मी व चित्रकर्मींनी विसरू नये. अथवा इतिहास वाचावा त्या पक्षांचा.

या सर्व प्रकारात गडकरी मास्तरांची नेमकी काय प्रतिक्रिया झाली असेल? अर्धपुतळ्यामुळे प्राणप्रिय व जिने प्राण घेतला ती बीडी कित्येक वर्ष शिलगावता आली नव्हती, ती मिळण्याची आशा पल्लवीत झाली असेल. आणि नदीत फेकताच किती दिवसांनी (का वर्षांनी) अंगाला पाणी लागल्याने मन सुखावलं असेल!

पुढे पोलिसांनी कहर केला. ‘एकच प्याला’ या नाटकाने अजरामर झालेल्या या लेखकाला डिजिटल पुरावा राहिला म्हणून नदीत दोनदा बुडवला! तालीममास्तर गडकरींवर या तालमींनी त्यांच्या स्वर्गस्थ सहकाऱ्यांनी सूडच उगवून घेतला बहुतेक.

या निमित्ताने गडकरींना तेव्हा न मिळालेलं कास्ट सर्टीफिकेटही मिळालं. ‘महाराष्ट्र देशा’ असं गीत लिहिणारा लेखक वादात सापडून मुळासकट उखडला जातो.

देशात इतिहासाचे पुनर्लेखन करू पाहणाऱ्या उजव्या व डाव्या या दोन गटांबद्दल पुरेसा अभ्यास नसताना, तारस्वरात काही बोलणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण हे आमच्या सोयीच्या सोयगावकर रंगकर्मी-चित्रकर्मींना लवकर कळेल तितकं बरं!

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

Post Comment

Sameer Kelkar

Thu , 12 January 2017

jabardast ... atishay khar aahe. mhatari melya ch dukha nahi pan kal ..... Aso


203mogra@gmail.com

Tue , 10 January 2017

वा संजयजी एक नंबर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......