‘फत्ते शिकस्त’ अर्थात ‘शायिस्तेखानाची फजिती’
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘फत्ते शिकस्त’चं पोस्टर
  • Sat , 16 November 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie फत्ते शिकस्त Fatteshikast चिन्मय मांडलेकर Chinmay Mandlekar मृणाल कुलकर्णी Mrinal Kulkarni

शिवस्वराज्याला बळकट करणाऱ्या मावळ्यांची कथा ‘फत्ते शिकस्त’ या सिनेमातून पाहायला मिळते. मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यासाठी ‘फत्ते शिकस्त’ असा शब्द त्या काळी वापरला जात असे. ऐतिहासिक घटना, लोककथा आणि आख्यायिका यांच्या मिश्रणातून तयार झालेला हा मनोरंजक सिनेमा आहे. शिवकालीन घटना पडद्यावर उभ्या करताना त्यातलं सर्वांत मोठं आव्हान असतं ते काळाचं! तो काळ पडद्यावर उभा करण्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना यश आलं आहे. सिनेमा सुरू होतो तेव्हाच दिग्दर्शक आपली सिनेमामागची भूमिका स्पष्ट करतो. त्यामुळे सिनेमा पाहताना केवळ मनोरंजन हा हेतू ठेवायला प्रेक्षक मोकळा होतो.

‘शायिस्तेखानाची फजिती’ हा इतिहासातील धडा सर्वांना माहीत असेल. त्याच घटनेचं चित्रण हा सिनेमा करतो. तत्कालीन पुणे शायिस्तेखानानं ताब्यात घेतलेलं असतं. गोरगरीब जनतेवर त्याचं सैन्य अत्याचार करत असतं. हळूहळू तो राजगडावर चाल करून येत असतो. त्यासाठी करतलब खान याला हजारो सैन्य देऊन राजगडावर चाल करण्यास सांगतो. मात्र शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यात खान फसतो. त्यामुळे शायिस्तेखान संतापतो आणि शिवाजी महाराजांना संपवण्याचे नवनवीन डाव पेच आखत राहतो. पण सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही सफल होत नाही. याच हतबलतेचा फायदा घेऊन शिवाजीमहाराज गनिमी काव्यानं लाल महालात घुसतात आणि शायिस्तेखानाला पळवून लावतात. ही या सिनेमाची कथा आहे.

सिनेमाची भव्यता टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ग्राफिक्स आणि सेटचा उत्तम उपयोग केला आहे. त्यामुळे गड किल्ले, घनदाट जंगल यांचं पडद्यावरचं चित्र गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतं. भाषेच्या अनुषंगानं केलेले बदलही उत्तम जुळून आली आहेत. हिंदी आणि मराठी या दोन भाषेतील संवाद कथानकाला पूरक ठरतात. सिनेमाचं कथानक एकाच घटनेभोवती फिरतं राहतं. मात्र कथानकाच्या प्रभावी सादरीकरणासाठी त्याचा बखूबी वापर केला आहे. परिणामी एका रंजक कथेचा चांगला प्रयोग पाहायला मिळतो.

प्रत्येक पात्र जेव्हा समोर येतं, तेव्हा त्याला एक पार्श्वभूमी तयार केलेली आहे. त्यामुळे तानाजी, कोयाजी अशा मावळ्यांची चित्रणं दिग्दर्शक पूर्वार्धात अचूक मांडत जातो. यालाच पूरक ठरणारा उत्तरार्ध सिनेमाची लयबद्धता टिकवून शेवटाकडे जाताना उत्सुकता निर्माण करत राहतो. त्यामुळे कथानकाची पकड घट्ट होत जाते.

बाजीप्रभू देशपांडे, बहिरजी नाईक, यसाजी, तानाजी, सर्जेराव, नेताजी, कोयाजी अशा शूर मावळ्यांचे धाडसी पराक्रम दाखवण्यासाठी अनेक लोककथांचा आधार दिग्दर्शकानं घेतला आहे. त्यामुळे सिनेमाचा गाभा या पराक्रमी मावळ्यांच्या धाडसी लढाया ठरतो. लाल महाल मध्यवर्ती असला तरी गराडखिंड, विसापूर, लोहगड, कासरखिंड, सिंहगड, पावनखिंड अशा काही ठिकाणांचा सिनेमात उल्लेख येत राहतो. त्यामुळे पुणे आणि पुण्याशेजारील शिवकालीन घडामोडींचा ओझरता इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो.

चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजीमहाराजांच्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. मृणाल कुलकर्णी नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसतात. अनूप सोनी, समीर धर्माधिकरी, अजय पुरकर, अंकित यांनीही चांगलं काम केलं आहे. मृण्मयी देशपांडे लक्ष वेधून घेते. कॅमेऱ्याचा वापर काही दृश्यात अप्रतिम केला आहे. पात्रांची ओळख करून देताना कॅमेरा नावीन्यपूर्ण पद्धतीनं हाताळला आहे. परिणामी दृश्याची भाषा अधिक प्रभावी ठरली आहे. त्याचबरोबर संवाद शैली, संगीत, पटकथा आणि तांत्रिक बाबी यामुळे सिनेमा परिणामकारक ठरतो.

दिग्पाल लांजेकर यांचा ‘फर्जंद’नंतर आलेला ‘फत्ते शिकस्त’ ऐतिहासिक घटनांची मनोरंजक पद्धतीनं आठवण करून देण्यात यशस्वी होतो.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......