‘हिरकणी’ : शिवकाळातल्या हिरकणीची जुनीच दंतकथा सांगणारा सिनेमा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘हिरकणी’ची पोस्टर्स
  • Sat , 02 November 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie हिरकणी Hirkani प्रसाद ओक Prasad Oak सोनाली कुलकर्णी Sonalee Kulkarni

शिवाजी महाराजांच्या काळातल्या हिरकणीची गोष्ट माहीत नाही, असा मराठी माणूस विराळाच असेल. या हिरकणीच्या नावानं रायगडाच्या पश्चिम कड्याला ‘हिरकणी बुरुज’ हे नाव खुद्द शिवाजी महाराजांनी दिलं. तिचीच कथा प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात पाहायला मिळते.

हा सिनेमा ज्या काळाचं चित्रण उभं करतो, त्या काळाच्या मर्यादेसहित सिनेमा पाहावा लागतो. त्यामुळे एका स्त्रीच्या पराक्रमाची गोष्ट पाहताना त्यातल्या मर्यादा लक्षात येत राहतात. सिनेमात रायगडवाडी नावाचं गाव दाखवलं आहे, ते शिवकालीन वाटत नाही. अशा छोट्या गोष्टींकडे कानाडोळा केला तर मात्र हा सिनेमा दीड तास खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो.

हिरकणी (सोनाली कुलकर्णी) रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीची गवळण असते. तिचा नवरा जिवाजी (अमित खेडेकर) शिवरायांचा मावळा असतो. हिरकणी नियमित गडावर दूध पोहचवण्याचं काम करते. तिला एक छोटंसं बाळ असतं. गडाची दरवाजे सूर्यास्त होताच बंद होतात. त्यामुळे गडावर जाणाऱ्याला खाली उतरायचं असेल तर सूर्यास्त होण्यापूर्वी म्हणजे गडाचे दरवाजे बंद होण्यापूर्वी गडावरून खाली यावं लागतं. एकदा दरवाजे बंद झाले की, थेट दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच उघडले जातात, असा कडक नियम असतो. कोजागिरीच्या रात्री गडावर मोठा उत्सव आयोजित करण्यात येतो. त्या साठी हिरकणी दूध गडावर पोहचवते आणि परतत असताना दरवाजे बंद होतात. बाळ घरी ठेवलेल्या हिरकणीचा जीव तळमळतो आणि मग त्यानंतर जे काही घडत ते म्हणजे हा सिनेमा. त्याला भावनिकता, राजनिष्ठा, धाडस, पराक्रम असे अनेक पदर आहेत. त्यामुळे कथानक रंजक ठरतं, मात्र त्याची परिणामकारकता केवळ एका घटनेपुरती मर्यादित राहते.

सिनेमाचा पूर्वार्ध हिरकणी आणि जिवाजी यांच्या नात्यातील गोडव्यानं ओतप्रोत भरला आहे. त्यात रोमँटिकपणाची जराही कमी नाही. नाजूक हिरकणी उत्तरार्धात मात्र बाळासाठी व्याकूळ झालेली आई होते, तेव्हा तिच्यातली धाडसी, पराक्रमी स्त्री जागी होते. उत्तरार्धात हिरकणी आणि बुरुज असा मोठा भाग येतो. त्या वेळी सिनेमा रटाळ वाटायला लागतो. मात्र ती कथानकाची गरज असल्यानं त्याचा फारसा नकारात्मक परिणाम होत नाही. मात्र मध्यांतरानंतर संवादाच्या पातळीवर सिनेमा निरस करत राहतो. परिणामी कथानक संवादापेक्षा अभिनयाच्या पातळीवर चढउतार पार करत राहतं.

सोनाली कुलकर्णी आणि अमित खेडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सोनालीने हिरकणीची भूमिका चांगल्या पद्धतीनं साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या रोमँटिक पठडीबद्ध अभिनयाची सीमा ओलांडताना मात्र सोनाली हिरकणीला न्याय देऊ शकलेली नाही. अमित खेडेकरचा अभिनय प्रभावी होऊ शकला नाही. एक तर त्याचा सिनेमातला वावर तुकड्या-तुकड्यात आणि खूपच कमी आहे. परिणामी त्याच्या भूमिकेवर मर्यादा आल्या आहेत.

सिनेमातली सर्वांत विचित्र वाटणारी बाब म्हणजे सिनेमा सुरू होतो आणि पहिली दहा मिनिटं गाणी वाजतात. कथानकाची लांबी वाढवण्यासाठी या गाण्यांना सुरुवातीला घेतल्यामुळे कथानक सुरू होण्याची वाट पाहत बसावं लागतं. मात्र सिनेमा पटकथा, संवाद, संगीत आणि तांत्रिक बाबीत समाधानकारक आहे. प्रसाद ओक यांनी दिग्दर्शनाचं आव्हान पेललं आहे. परिणामी सिनेमा गुंतून ठेवण्यात नक्कीच यशस्वी झाला आहे.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......