डिजिटल क्रांतीने ‘न्यूज’चं ‘नॉईज’मध्ये, ‘सेन्स’चं ‘सेन्सेशन’मध्ये आणि ‘क्रेडिबिलीटी’चं ‘केऑस’मध्ये रूपांतर केलं आहे!
पडघम - माध्यमनामा
अजय कौटिकवार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 30 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 डिजिटल क्रांती वर्तमानपत्र टीव्ही वृत्तवाहिन्या ऑनलाईन पोर्टल पत्रकारिता

कुणाला आवडो किंवा न आवडो ‘बदल’ हा होतच असतो. ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. कधीच न थांबणारी. या बदलाला कुठलंही क्षेत्र वर्ज्य नाही. त्यामुळं त्याला माध्यम क्षेत्र तरी कसं अपवाद असणार? पूर्वी बदलाचा काळ हा जास्त होता. आता तो अगदीच कमी झालाय. हा काळ एवढा कमी झालाय की, नव्याशी जुळवून घेता घेता जर जास्त वेळ गेला, तर तुमच्यासमोर आणखी नव्या गोष्टी येऊन हजर राहतात. याच बदलाच्या झपाट्यामुळे माध्यम क्षेत्राला प्रचंड हादरे बसत आहेत. या सगळ्या धक्क्यांना पचवून पुढे जाताना सगळ्यांचीच दमछाक होतेय. बदल होताना जशी पडझड होते, तसंच जुनं जाऊन नव्याची निर्मिती होते. ही सगळीच निर्मिती ही काही पूर्णपणे नव्या साधनांची नसते, तर पडझडीतही टिकून असणाऱ्या काही चांगल्या जुन्या गोष्टी घेऊनही नव्याची निर्मिती होत असते. पण ती निर्मिती ही शाश्वत होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जगभरातली माध्यमं सध्या याच संक्रमणावस्थेतून (Transition phase) जात आहेत. त्याला भारतही अपवाद नाही.

माध्यमांनी तीन महत्त्वाच्या क्रांती अनुभवल्या. पहिली क्रांती झाली कॉम्प्युटरच्या आगमनानंतर, दुसरी क्रांती झाली इंटरनेटच्या उदयानंतर आणि माध्यमांना आता सामोरे जावं लागतंय, ते डिजिटल क्रांतीला. ही क्रांती अफाट आहे. खऱ्या अर्थानं जगाला जवळ आणणारी आहे. त्यामुळं माध्यम क्षेत्र पूर्णपणे बदलून गेलंय, जात आहे.

गेल्या पाच वर्षांत माध्यमांमध्ये झालेला बदल हा तर चक्रावून टाकणारा, धडकी भरवणारा तर आहेच, पण त्याचबरोबर नवी उमेद घेऊन येणाराही आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे व्हॉट्सअॅप किंवा फोनवर इंटरनेट नव्हतं, ही नुसती कल्पनाही आता सहन होत नाही. जिओमुळे भारतात इंटरनेट सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलं आणि खऱ्या अर्थाने माध्यमांमधल्या एका क्रांतीला सुरुवात झाली. बहुउपयोगी ‘स्मार्टफोन’ हे माहितीचं आता नवं साधन झालंय.

याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे उपयुक्तता. स्मार्टफोन हा कायम सोबत असतो. तो कुठेही, केव्हाही वापरता येतो. त्याचबरोबर तो सहज आणि स्वस्तही झाल्यामुळे प्रत्येकाच्या आवाक्यात आलाय. ‘फिक्की’च्या अहवालानुसार सगळ्यात जास्त News Consummation हे आता मोबाईलवरच होणार आहे. वाचनं, ऐकणं आणि पाहणं या तीनही गोष्टींची ताकद डिजिटल माध्यमांकडे आहे. या सर्व गोष्टी मोबाईलवर करता येतात, त्यामुळे सगळ्या बाजारपेठेचा ओढा हा आता डिजिटल माध्यमांकडे आहे.

इंटरनेट आणि स्मार्टफोनची बाजारपेठ आणि व्याप्ती किती आहे यावर फक्त नजर टाकली तरी काय बदल होत आहेत आणि भविष्यात होतील याचा अंदाज येऊ शकतो.

- २०२२ मध्ये मोबाईल धारकांची संख्या तब्बल ८२ कोटींवर जाणार आहे.

- त्यातल्या ६० कोटी लोकांकडे इंटरनेट असणार आहे.

- २०२२ मध्ये इंटरनेट डेटाच्या वापरण्याचं प्रमाणे हे २.४ GB वरून १४ GB वर जाणार.

- इंटरनेटच्या जन्मानंतर गेल्या ३२-३४ वर्षांमध्ये जेवढा त्याचा वापर झाला, त्यापेक्षा जास्त वापर २०२२ मध्ये होणार आहे.

ही आकडेवारी यासाठी बघणं महत्त्वाचं आहे की, त्यामुळे माध्यमांचं सर्व गणितच बदलून जाणार आहे.

नवीन माध्यमं आणि तंत्रज्ञानामुळे झालेला मोठा बदल म्हणजे लोकांचा माहितीचा स्त्रोत (First Source of information) बदलला आहे. आता पारंपरिक (Traditional Media) नाही, तर नव्या माध्यमांच्या (New Media)द्वारे लोकांना बातमी आधी कळते. माध्यमांच्या दृष्टीनं हा खूपच मोठा बदल आहे. त्याचं कारण म्हणजे, नव्या माध्यमांचा असलेला वेग. नव्या तंत्रज्ञानामुळे ज्या क्षणाला घटना घडते, त्याच क्षणाला ती लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे वृत्तपत्र आणि टीव्ही या पारंपरिक माध्यमांना धक्का बसला आहे.

नवी माध्यमं आणि इंटरनेटमुळे माध्यमांचा वेग आणि पोहोच प्रचंड वाढला. मात्र त्याच प्रमाणात विश्वसनीयतेला ओहोटी लागल्याचंही दिसून आलं. ‘पेड न्यूज’ची जागा आता ‘फेक न्यूज’ (खोट्या बातम्या)ने घेतली आहे. जगभरच या प्रश्नावर चिंता व्यक्त होत आहे. विश्वसनीयता हा माध्यमांचा प्राण आहे. कितीही बदल झाले तरी मूळ गाभा कधीच बदलत नसतो. या वेगाशी स्पर्धा करत विश्वसनीयता जपण्याची कसोटीही माध्यमांना पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे मोठी आव्हानेही निर्माण झालीत आणि विश्वासालाही तडा गेलाय.

मुख्य आव्हाने

१) विश्वसनीयता निर्माण करणं

२) बदलत्या वेगाशी जुळवून घेत आपली उपयुक्तता टिकून ठेवणे

३) व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं नैतिक सामर्थ्य निर्माण करणे

४) पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांशी प्रामाणिक राहाणे

माध्यमांबद्दल जो अविश्वास निर्माण झालाय त्याची चार मुख्य कारणे आहेत.

१) आर्थिकस्वयंपूर्णतेचा अभाव (Crisis of commerce)

२) दर्जेदार साहित्याचा अभाव (Crisis of content)

३) आम्ही ‘विवेक’ गमावून बसलोय (Crisis of Conscience)

४)  समन्वय सोडून दुराग्रह (Crisis of cooptation)

अधिकार आणि कर्तव्य

नव्या माध्यमांमुळे आता प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळाली, माध्यमांचं लोकशाहीकरण झालं; पण हा मौलिक अधिकार मिळाल्यानंतर कर्तव्याची जाणीव ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचं बटबटीत रूप दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होताना ज्या किमान मर्यादा पाळायच्या असतात, त्याही पाळल्या जात नाहीत, हे स्पष्ट झालं. हे वेळीच थांबलं नाही तर या मुक्त स्वातंत्र्यावर बंधन यायला वेळ लागणार नाही. किंबहुना त्याची सुरुवातही झालेली आहे असं दिसून येतं.

देशभरात FICCI आणि KPMG यांसारख्या मान्यवर संस्था दरवर्षी माध्यमांच्या प्रगतीचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करत असतात. त्या सर्व अहवालांमध्ये डिजिटल हेच भविष्य असल्याचं सांगितलं आहे.

वर्षभरापूर्वी एशियाटीक सोसायटी, मुंबईच्या डॉ. अरुण टिकेकर फेलोशिपनिमित्त मला नवी माध्यमं, त्याची आव्हानं, तंत्रज्ञान आणि बलती पत्रकारीचा याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या अभ्यासाच्या निमित्तानं लोकांचा वाचन व्यवहार तपासण्यासाठी मी एक ऑनलाईन सर्व्हेही घेतला होता. त्याच बरोबर देशभरातले विविध भाषांमध्ये काम करणारे आजी-माजी ज्येष्ठ संपादक, काही वेगळे प्रयोग करणारे पत्रकार, सोशल मीडिया तज्ज्ञ यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्या चर्चा आणि अभ्यासानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुढं आल्यात.

महत्त्वाचे निष्कर्ष

- आता वृत्तपत्र किंवा टीव्ही नाही तर लोकांच्या माहितीचा पहिला स्त्रोत सोशल मीडिया झाला आहे.

- सोशल मीडिया आणि मोबाईलमुळे टीव्ही पाहण्याचं, वृत्तपत्र वाचण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी होतंय.

- त्याचं कारण म्हणजे या सर्व गोष्टी त्यांना मोबाईलवरच उपलब्ध होत असतात.

- फक्त बातम्यांसाठीच नाही तर मनोरंजन आणि इतर व्यवहारासाठीही मोबाईल हाच महत्त्वाचा घटक राहणार आहे.

- खोट्या बातम्यांच्या सुळसुळाटामुळे सर्वच माध्यमांची विश्वसनीयता धोक्यात आली, असं लोकांना वाटतं.

- प्रस्थापित माध्यमांनी कळत-नकळत ज्यांना संधी नाकारली, त्या सर्वांना डिजिटल माध्यमांनी सामावून घेतलं. व्यक्त होण्याची संधी दिली.

- त्यामुळेच डिजिटल माध्यमांना ‘विद्रोही माध्यम’ असंही म्हटलं जातंय.

- महत्त्वाचा बदल म्हणजे नव्या ‘डिजिटल’मुळे माध्यमांचं लोकशाहीकरण झालं.

- डिजिटल माध्यमं सर्वच बाबतीत वरचढ असली तरी त्याचं आर्थिक मॉडेल अजून उभं राहू शकलं नाही, ही वस्तुस्थिती आहे.

- इतर सर्वच बाबतीत आघाडीवर असलेला सोशल मीडिया विश्वसनीयतेच्या बाबतीत मात्र एकदम तळाशी आहे. लोकांना अजूनही ‘प्रिंट’ माध्यमांमध्येच आलेली बातमी सर्वाधिक विश्वसनीय वाटते.

- पारंपरिक माध्यमांना नव्या माध्यमांमुळे धोका आहे. मात्र ती माध्यमं संपून जातील असं त्यांना वाटत नाही.

- आम्हाला चांगलं, दर्जेदार आवडतं, पण दिलं जात नाही, अशी लोकांची तक्रार आहे. चांगलं दिलं तर आम्ही जास्त पैसे मोजायला तयार आहोत असंही मत पुढे आलंय.

- उत्तम कंटेटसाठी लोकांना जास्त पैसे द्यायला प्रवृत्त करण्यात माध्यमांना अजुन यश आलं नाही. जोपर्यंत लोक जास्त पैसे देणार नाहीत, तोपर्यंत ही माध्यमं स्वत:च्या बळावर उभी राहू शकणार नाहीत.

- २०२२ पर्यंत भारतात 5G चं आगमन होईल. तेव्हा इंटरनेटचा वेग आजच्यापेक्षा दहा पट जास्त असणार आहे. 4G आल्यानंतर भारतात माध्यमांमध्ये किती बदल झाले हे आपण पाहतोच आहोत. 5G आल्यानंतर माध्यमांचं गणित अमुलाग्र बदलेल असं सर्वच जण म्हणतात म्हणजे ते नेमकं कसं असेल ते कुणालाच सांगता येत नाहीये.

प्रादेशिक भाषांना ‘अच्छे दिन’!

असं असलं तरी सर्वच परिस्थिती निराश करणारी नाही, तर नव्या आशा पल्लवीत करणारी आहे. माध्यमांमधल्या या बदलामुळे जी पडझड होत आहे आणि होणार आहे, त्यापेक्षा जास्त नवनिर्मितीची क्षमता निर्माण होणार आहे. नवं काही करू इच्छिणाऱ्यांसाठी आकाशही ठेंगणं पडेलअशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे माध्यमांविषयीच्या सर्वच अहवालात आणि सर्व्हेंमध्ये प्रादेशिक भाषांना चांगले दिवस येतील, असा आशावाद व्यक्त केला आहे.

दुसरी बाजू

बदलत्या माध्यमांची ही एक बाजू. वस्तुस्थिती मात्र खूपच वेगळी आहे. मुद्रित माध्यमांच्या विकासाचा वेग झपाट्याने घसरतोय असं अनेक सर्व्हेक्षणांमध्ये आढळून आलंय. त्याची कारणंही बरीच आहेत. वाढता खर्च आणि घटतं उत्पन्न. नव्या डिजिटल माध्यमांचा उदय. लोकांचं नव्या माध्यमांकडे वळणं. जाहीरातींच घटलेलं उत्पन्न यामुळे वृत्तपत्रांचा पसारा चालवणं मालकांना कठीण जातेय.

तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचंही आता डिजिटलायजेशन होतंय. त्यामुळे मोठी घुसळण सुरू आहे. या सगळ्या वेगात पत्रकारितेच्या मूल्यांचा मात्र जीव गुदमरतोय. TRP आणि आकड्यांच्या खेळात सगळ्यांचच भान सुटलंय. डिजिटल माध्यमं ही तशी नवीन आहेत. अजून त्यांनी तारुण्यातही प्रवेश केलेला नाही. अशा माध्यमांना खरं म्हणजे योग्य आकार देण्याची हीच वेळ आहे. या माध्यमांची शक्ती आणि वेग अफाट असल्यानं त्याचं महत्त्वही प्रचंड प्रमाणावर वाढलंय. पण आकड्यांच्या खेळात या माध्यमांची दिशा भरकटतेय अशी स्थिती आज आहे. काही मोजकी माध्यमं सोडलीत तर काय वाट्टेल ते या माध्यमांवर दिलं जातं. त्यामुळे विश्वसनियतेचं संकट निर्माण झालंय. फेक न्यूज, ट्रोल्स आणि फक्त मार्केटिंगच्या जोरावरप्रतिमा निर्मिती करता येते याची जाणीव झाली की, त्यासाठी अनेक लोक तयार होताता. सध्या हाच खेळ सुरू आहे. त्यामुळे ही माध्यमं आपलीच कबर खोदून ठेवत असल्याची टीकाही जाणकार करत आहेत.

या माध्यमांमध्ये काम करणारी मंडळी म्हणतात- लोकांना चांगलं वाचायला आवडत नाही. तर लोक म्हणतात- आम्हाला चांगलं दिलं जात नाही. वाचकांची चव आणि कल बदलला हे खरं असलं तरी ते फक्त थिल्लर आणि ‘चटोर’च वाचतात हे मात्र खरं नाही. जर आपण वाचक अशाच पद्धतीचा घडवत असू तर त्याला चांगलंचुंगलं वाचण्याची सवय तरी कशी लागणार? त्यासाठी थोडं मोल चुकवून चांगला वाचक घडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. असा प्रयत्न झाला नाही तर नवी पिढी चांगलं वाचत नाही असं कुठल्या अधिकारात आपण म्हणणार हाच खरा प्रश्न आहे.

नव्या माध्यमांनी क्रांती आणली, पण या क्रांतीचं रूपांतर आता डिझास्टरमध्ये होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. या गोष्टींमुळे आज ‘न्यूज’चं रूपांतर ‘नॉईज’मध्ये, ‘सेन्स’चं रूपांतर ‘सेन्सेशन’मध्ये तर ‘क्रेडिबिलीटी’चं रूपांतर ‘केऑस’मध्ये झाल्याचं दिसून येतं.

ही सगळी बदलाची प्रक्रिया आणि घुसळण आता थांबणारी नाही. त्या वेगाशी जुळवून घेत प्रवाहासोबत पुढे जाणं, त्या बदलाला शक्य तेवढा मानवी चेहेरा देण्याचा प्रयत्न करणं आणि प्रवाहात वाहून न जाता त्याच्याशी मैत्री करत आपलं वेगळेपण टिकवून ठेवणं, यातच सगळ्यांचं शहाणपण आहे.

भविष्यात असे बदल होतील

नोव्हेंबर २०१८मध्ये चीनच्या झेजिंग प्रांतात World Internet Conference झाली. माध्यमांच्या दृष्टीनं ही परिषद क्रांतिकारी ठरली. त्याचबरोबर भविष्यात काय संकट येणार आहे याचे संकेत देणारी ठरली. यातली सर्वाधिक लक्षवेधी घटना ठरली ती ‘Artificial Intelligence’ (AI)वर आधारीत असलेला न्यूज अँकर. या व्हर्च्युअल न्यूज अँकरने जेव्हा या परिषदेत पहिलं बुलेटीन वाचलं, तेव्हा सगळ्यांना धक्का बसला आणि आश्चर्यही वाटलं.

त्या देखण्या तरुणानं जेव्हा बातम्या वाचायला सुरुवात केली, तेव्हा कुणाला शंकाही आली नाही की, हा व्हच्युअल अँकर आहे. बातम्या वाचून झाल्यानंतर जेव्हा हा व्हर्च्युअल अँकर आहे, हे सांगितलं गेलं तेव्हा लोकांचा विश्वासच बसला नाही. एवढं हुबेहूब सादरीकरण त्यानं केलं होतं.

चीनच्या शींहुआ माध्यम समूहानं चीनचं सर्च इंजिन असणाऱ्या सोग्यू या कंपनीच्या मदतीनं या व्हर्च्युअल अँकरची निर्मिती केलीय. इंग्रजी आणि मँडरिन या चिनी भाषेत तो बातम्या वाचू शकतो.

२४ तास काम करणारा, शून्य चुका करणारा, अफाट कार्यक्षमता असणारा आणि ब्रेकिंग न्यूजच्या परिस्थितीत काही क्षणात तयार होणारा हा अँकर असल्याचा दावा शींहुआने केला आहे. यावर अजून संशोधन सुरू आहे. त्यानंतर नंतर मानवी भावभावनाही तो व्यक्त करू शकेल, असा दावा शींहुआने केला आहे.

माध्यमांच्या क्षेत्रात कुठल्या पद्धतीचं नवं तंत्रज्ञान येऊ घातलं याची ही नांदी आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे आधीच मनुष्यबळ कमी झालंय. त्यात जर असे अँकर्स आलेत तर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी.

AI तंत्रज्ञानाने माध्यमातल्या अनेक गोष्टी आत्ताच बदलवून टाकल्या आहेत. भविष्यातले बदल हे आणखी परिणामकारक ठरणार आहे. भाषांतर, बातम्यांची विषयवार निवड करणं, त्यांची मांडणी करणं, फोटो निवडणं, ले आऊट तयार करणं अशी असंख्य कामं आता AI मशिन्सच्या साह्याने होणार आहेत.

पुढच्या दोन वर्षांत किंवा त्या आधीच 5Gचं आगमन होणार

4G च्या आगमनानंतर भारतात इंटरनेटच्या क्षेत्रात जो बदल झाला त्याचं वर्णन केवळ अफाट याच शब्दात करता येईल. केवळ माध्यमांनाच नाही तर जीवनाच्या सर्वच अंगांना त्यानं व्यापून टाकलं. पुढच्या दोन वर्षांत किंवा त्या आधीच 5Gचं आगमन होणार आहे. त्याने इंटरनेच्या वेगात आजच्या पेक्षा कितीतरी जास्त वाढ होईल. स्मार्टफोनचा वापर आणखी वाढेल. तेव्हा कितीतरी नव्या गोष्टी येतील. नव्या संधी निर्माण होतील. त्या काय असतील याचा अंदाज बांधणं हे खूपच कठीण आहे. आज अवघड आणि किचकट वाटणाऱ्या गोष्टी अगदी सोप्या होतील.

नव्या संधी

नवं तंत्रज्ञान हे जसं आव्हानं घेऊन येतं तसच नव्या संधीही घेऊन येत असतं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)ने तयार केलेल्या अहवालात सकारात्मक निरीक्षण नोंदवण्यात आलंय. AIमुळे जेवढ्या नोकऱ्या जातील, त्यापेक्षा जास्त सहा कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होतील असं म्हटलं आहे. म्हणजेच किमान १३ कोटी नव्या संधी निर्माण होतील असंही त्या अहवालात म्हटलं आहे. मात्र या संधी मिळवण्यासाठी नव्या गोष्टी शिकाव्या लागतील.

या क्षेत्रात असतील नव्या संधी

हा अहवाल विविध १२ उद्योगांमधल्या दीड कोटी लोकांचा आणि त्यांच्या कामाचा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे. ही चौथी औद्यागिक क्रांती असून त्यासाठी सरकारं किंवा उद्योग अजूनही तयार नाहीत असं निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. वेब आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, ई-कॉमर्स आणि सोशल मीडिया तज्ज्ञ अशा लोकांना यात सर्वाधिक संधी असतील.

सॉफ्टवेअर इंजिनियर्सनाही चांगले दिवस येणार आहेत. ज्या नविन मशिन्स येणार आहेत, त्यांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी नव्या दमाच्या तरुणांना संधी असणार आहे. त्याचबरोबर त्या मशिन्स चालवण्याचं प्रशिक्षण आणि मेंटन्ससाठीही मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून जे उद्योग किंवा क्षेत्र बदलतील तेच टिकून राहतील. जे बदलणार नाही ते संपून जातील हाच या संदेश आहे.

केपीएमजी आणि गुगल यांनी मिळून २०१७मध्ये भारतीय भाषा आणि इंटरनेट यावर एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यातल्या या काही ठळक गोष्टी.

२०२१मध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये प्रादेशिक भाषिकांची संख्या संख्या ५३ कोटींवर जाणार.

इंटरनेटवर इंग्रजी भाषिकांच्या वाढीचं प्रमाण हे फक्त तीन टक्के असून त्यांची संख्या १९ कोटींवर जाणार आहे.

२०२१मध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये हिंदी भाषिकांची संख्या सर्वाधिक असेल. हिंदी इंग्रजीलाही मागे टाकणार आहे. तर त्या खालोखाल बंगाली तेलुगू, तमिळ आणि मराठी भाषिकांचा क्रमांक आहे.

प्रादेशिक भाषांचा वापर वाढला तर त्या भाषेतल्या कंटेंटची निर्मितीही वाढणार आहे.

त्यामुळं गावपातळीवरच्या भाषांमधल्या बातम्यांची संख्या वाढेल. बोली भाषांनाही प्रोत्साहन मिळेल.

प्रादेशिक भाषांमधल्या व्हिडिओंना प्रचंड मागणी वाढणार आहे.

इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचा बेस वाढला की, जाहीरातदारांची नजर तिकडे वळणार आहे. त्यामुळे प्रादेशिक आणि बोली भाषेतल्या जाहिराती वाढलीत.

इंटरनेटवर प्रादेशिक भाषिकांच्या वाढीचं प्रमाण हे १८ टक्के असून इंग्रजी भाषिकांची हीच वाढ  तीन टक्के असेल.

पुढची पाच वर्षं इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक १० लोकांपैकी ९ जण हे प्रादेशिक भाषिक असतील.

प्रादेशिक भाषिकांना आपल्या भाषेत आलेली बातमी ही इंग्रजीपेक्षा जास्त विश्वसनीय वाटेल.

.............................................................................................................................................

यशवंत मनोहर यांच्या ‘भारताचे क्रांतिसंविधान’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5154/Bharatache-Krantisanwidhan

.............................................................................................................................................

जबाबदारीची जाणीव निर्माण करणं महत्त्वाचं

Right Click at Right Place : It Should be right Place and right Time or it vanish its own Power.

अधिकारांची जाणीव सगळ्यांना होत असते. कर्तव्याचा मात्र विसर पडतो. समाज जीवनात दिसून येणारी ही सार्वत्रिक भावना आहे. वाचक घडवणं ही जसी माध्यमांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यात जबाबदारीची जाणीव करून देणं हेही माध्यमांचं कर्तव्य आहे. या कर्तव्यपालनात माध्यमांनी कसूर केल्याचं आजचं वातावरण पाहिलं की, स्पष्टपणे जाणवतं. नवी माध्यमं आल्यानंतर तर याची जाणीव अधिक प्रकर्षाने व्हायला लागली.

नवी माध्यमं हाताळताना ती नेमकी कशी वापरावीत याची जाणीव आणि जागृती वाचकांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. ही जाणीव जेवढी जास्त निर्माण होईल त्या प्रमाणात समस्याही कमी होतील. समाज माध्यमांमध्ये व्यक्त होताना किमान सभ्यतेचं पालन केलं पाहिजे, हे साधं भानही आज सुटलेलं दिसतं. व्यक्त होण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असलं तरी त्याच्या काही मर्यादा असतात. एक पद्धत असते. ती पाळली गेली नाही त्यामुळं आज डिजिटल माध्यमात प्रदूषण दिसतं.

कुठलीही गोष्ट क्लिक करताना, फॉरवर्ड करताना, कॉपी करता, भावना, विचार, मत व्यक्त करताना क्षणभर थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि नंतरच व्यक्त झालं पाहिजे, जी जाणीव निर्माण होण्याची अत्यंत गरज आहे.

बदल होत असताना पडझड ही होतच असते. त्याकडे पाठ न फिरवता नव्याने काय उभारता येईल या विचार करून पुढे जाण्यातच शहाणपण असतं. माध्यमांमधल्या बदलामुळे खूप आव्हानं निर्माण झालीत. त्याचबरोबर तेवढ्याच संधीही निर्माण होणार आहेत. काळानुसार हा बदल सतत होतच असतो. पण सध्याचा त्याचा रेटा हा अतिप्रचंड असा आहे. बदल रोखणं हे काळाच्याही हातात नाही. गरज आहे ती बदलाची.

.............................................................................................................................................

लेखक अजय कौटिकवार ‘न्यूज 18 लोकमत’ या वृत्तवाहिनीमध्ये वरिष्ठ पत्रकार आहेत.

ajaykautikwar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा