महानायक इतका ‘दुर्लक्षित’ का राहिला सर्वोच्च सन्मानानंतरही?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • महानायक अमिताभ बच्चन
  • Thu , 03 October 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar अमिताभ बच्चन Amitabh Bachchan दादासाहेब फाळके पुरस्कार Dadasaheb Phalke Award

या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार महानायक, बिग बी, आदी संबोधनाने नावाजल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला. पण कुठेही त्याबद्दल उत्साह, कौतुक, पसंतीची पावती, त्यानिमित्ताने विशेष लेख वगैरे काही घडले नाही. नाही म्हणायला गेल्या काही वर्षांपासून गोदी मीडियात भरती झालेल्या प्रसिद्ध अमूल होर्डिंगवर एक अभिनंदन नजरेस पडले. इतरत्र मात्र शांतता.

काय कारण असावं? २०१४नंतर टीव्हीचा पडदा २४ तासांतल्या २२ तास व्यापणाऱ्या सरकारी जाहिराती आणि या जाहिरातीतील ९० टक्के भाग व्यापणारे अमिताभ बच्चन हे आता अभिनेते कमी व ‘सरकारी योजना प्रचारक’ जास्त भासतात. त्यामुळे या सरकारने हा सन्मान त्यांना दिला यात नवल ते काय? असं वाटलं असावं? त्यात पुरस्कार जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच बच्चन यांनी आरेमधील मेट्रो कारशेडला पाठिंबा दर्शवला होता! त्यामुळे या समजुतीत आणखीनच भर पडली.

याशिवाय आणखी एका तांत्रिक कारणाची त्यात भर पडली. हा पुरस्कार दरवर्षी ३ मे रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासोबत दिला जातो. पण यंदा लोकसभा निवडणुकांमुळे राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणाच मुळी दोन महिने उशिरा झाली आणि ती घोषणा झाल्यानंतरही आजतगायत हा पुरस्कार प्रदान सोहळा कधी होणार, हे सरकारने जाहीर केलेले नाही. साहजिकच सोहळ्याच्या निमित्ताने बच्चन यांच्यावर चार शब्द लिहिले, बोलले गेले असते तेही राहून गेले. त्यानंतर कलम ३७० कलम, आर्थिक मंदी चर्चा, विधानसभा निवडणुका, हाऊडी मोडी, राष्ट्रभक्ती या गदारोळात बच्चन दादासाहेब फाळक्यांसारखेच विस्मरणात गेले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खरं तर ज्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो, त्या क्षेत्रातले बच्चन यांचे योगदान वादातीत व १०० टक्के खणखणीत आहे. या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची चर्चा अनेक वर्षांपासूनची आहे. गांधी परिवाराशी बिनसणे व यादव परिवाराशी घसट, काँग्रेस काळात त्यांना पुरस्कारापासून लांब घेऊन गेली. त्यांचे नाव आपोआप मागे पडले.

२०१४ला मोदी सरकार आले. मोदी पंतप्रधान झाले. त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बच्चन यांना राज्याचे दूत बनवले होतेच. ते पंतप्रधान झाल्यावर त्यांनी बच्चन यांच्यासाठी जणू ‘रोजगार हमी योजना’च सुरू केली!

सरकारी जाहिरातीत मोदींनंतर सर्वाधिक झळकण्याचा विक्रम बच्चन यांच्याच नावावर असेल. बच्चन त्यानंतर इतरही जाहिरातीत वरचेवर दिसू लागले. मग ते डोक्याचे तेल असो की, सोने तारण कर्ज… अंडरवेअर असो की सूटाचे कापड. स्टोव्हचा पिन सोडून सर्वच उत्पादनाच्या जाहिरातींत बच्चन दिसू लागले. यावर चित्रपटसॄष्टीत सत्त्यावर आधारित एक विनोद प्रचलित आहे – ‘क्या करेगा बूढा! घर में कमानेवाला बेचारा अकेला ही तो है!!’

या सर्व वस्तुस्थितीला स्वत: बच्चनच जबाबदार आहेत. राजीव गांघींच्या मैत्रीला बळी पडून ते निवडणुकीच्या राजकारणात पडले खरे, पण बोफोर्स प्रकरणात अडकल्यावर राजकारणही संपले व मैत्रीही. नंतर त्यांनी एबीसीएल कंपनी सुरू केली व चित्रपट निर्मिती केली. या व्यवसायाचा कोणताही अनुभव नसलेले कॉर्पोरेट गणंग यात निर्णयप्रक्रियेत होते. स्वत: बच्चन यांनाही तसा अनुभव नव्हता. त्यांच्यासोबत काम केलेला मित्र सांगत होता- ‘बच्चनसाब हल्के कान के है... जो कानसे लगता है उसकी सुनते है.’ या हलक्या कानांनी कंपनीची टायटॅनिक पदार्पणातच बुडाली आणि बच्चन कर्जबाजारी होऊन अक्षरश: रस्त्यावर आले! त्या काळाचं वर्णन स्वत: बच्चन यांनी अनेक ठिकाणी करून ठेवलंय. ते असं की, ‘मी मित्रांकडून उसने पैसे घेऊन घर चालवत होतो. मग एक दिवशी घराजवळच राहणाऱ्या यश चोप्रांकडे गेलो आणि म्हणालो, यशजी, माझ्याकडे काम नाही, मला काम द्या!’ आणि यशजींनी ‘मोहब्बते’ चित्रपटात मला घेतलं!

बच्चन यांचा हा खडतर काळ होता. गोविंदाची चलती होती, तेव्हा बच्चन यांना घेऊन ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ हा चित्रपट तयार झाला. त्या आधी ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है’, ‘नाम है शहेनशहा…’, ‘हम जहाँ खडे रहते है, लाईन वहीं से शुरू होती है’, अशा संवादांनी पूर्ण पडदा व्यापणारे बच्चन ‘बडे मियाँ…’त चक्क गोविंदाच्या सावलीत वावरतात. कॅमेरा सतत गोविंदावर ठेवत निर्माता /दिग्दर्शकांनी काळाप्रमाणे गोविंदाला कुर्निसात केला!

या काळातच अमरसिंह नामक सत्तादलालाने या ‘गंगा किनारे छोरे’वर जाल बिछाया. मुलायमसिंहाच्या प्रचारयात्रेत बच्चन सपत्निक सामील झाले व नव्या पर्वास सुरुवात झाली! या नव्या समीकरणास मिसेस बच्चन तयार नव्हत्या. त्यावेळच्या कार्यक्रमातील त्यांची अलिप्तता आजही आपण डिजिटल माध्यमात पाहू शकतो. पण आज गंमत अशी आहे की, मिस्टर बच्चन या समाजवादी परिवारापासून कोसो दूर गेलेले असताना मिसेस बच्चन मात्र राज्यसभेच्या या पक्षाच्या खासदार आहेत! हे कमी की काय म्हणून मिसेस बच्चन यांच्यासाठी एका ज्येष्ठ यादवाला घरी बसवण्यात आले. आजही मिसेस बच्चन समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत राज्यसभेत. बच्चन परिवार आणि अमरसिंह हा एक स्वतंत्र अध्याय आहे! याच अमरसिंहानी बच्चन यांना मुलायमसिंह व सहाराश्री यांच्या मदतीने करोडोंच्या कर्जातून चुटकीसरशी मुक्ती दिली! बच्चन यांचे ग्रह फिरले आणि ‘कौन बनेगा करोडपती?’ शो आला!

या कार्यक्रमाने भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात अनेक मैलाचे दगड रोवले आणि बच्चन यांनी तिथून पुन्हा जी भरारी घेतली, ती आजतगायत चालूच आहे. ‘चिनीकम’, ‘पिकू’, ‘पिंक’सारख्या चित्रपटांतून त्यांनी अगदी अलीकडे अभिनयाचे नवनवे वस्तुपाठ घालून दिले. नागराज मंजुळेसारख्या नव्या दमाच्या दिग्दर्शकासोबतही काम करत बच्चन आजही सर्व पिढ्यांत अभिनेता म्हणून लोकप्रिय राहण्याचा पराक्रम केलाय. कारण हिंदी चित्रपटसृष्टीत नायक वा नायिका पुनरागमानंतर पुन्हा यशाचे शिखर गाठण्याचा इतिहास नव्हता, तो बच्चन यांनी रचला.

अभिनयाच्या क्षेत्रात बच्चन यांचा प्रवेश त्यावेळच्या प्रभावी नेत्या व पंतप्रधान इंदिरा गांधींचे पत्र घेऊन झाला. पण इंदिरा गांधींनी फक्त पत्र दिले. ज्यांना दिले त्या के.ए. अब्बास व सुनील दत्त यांनी आजच्या पीएमओसारखा लगेच दंडवत घातला नाही. बच्चन यांना एका मूक माणसाची दुय्यम भूमिका दिली! यावर पीएमओनेही जाब विचारला नाही!

सामान्य स्ट्रगलरसाररखा बच्चन यांचा प्रवास झाला. त्या काळात ते आधी कुलाब्यात रूम शेअर करून राहत होते, तर पुढे कॉमेडिअन मेहमूदकडे!

मेहमूदनेच त्यांना ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये अरुणा इराणीसोबत हिरो केले. तेव्हा मेहमूद व अरुणा इराणी हिंदीतले दादा कोंडके व उषा चव्हाण होते! दरम्यान ‘आनंद’ सिनेमाने त्यांना किंचित ओळख दिली होती. पण पुढे ओळीने अपयश. अपवाद ‘नमक हराम’.

‘बॉम्बे टू गोवा’मधली हाणामारी व नाच पाहून प्रसिद्ध सलीम-जावेदमधील जावेदना हा नवा मुलगा आवडला. ‘जंजीर’ची तयारी चालू होती, देवआनंदपासून अनेकांनी नकार कळवला होता. अशात आधी जावेद, नंतर धर्मेंद्र यांनी बच्चन यांच्यासाठी शब्द टाकला. बच्चनना ‘जंजिर’ मिळाला आणि पुढचा इतिहास घडला!

बच्चन पर्वामुळे गुलाबी राजेश खन्ना पर्व लयाला गेलं आणि राजकुमारनंतर खर्जातल्या आवाजानं झोप उडवणारा नायक अवतरला! ज्येष्ठ साहित्यिक व सिनेअभ्यासक समीक्षक भाऊ पाध्ये यांनी या नव्या नायकाचे वर्णन ‘बेबस जिंदगी में सपने बेचनेवाला’ असं काहीसं यथार्थ केलं होतं. कारण तो काळच जगभर बंडाळी, विद्रोहाचा होता. व्यवस्थेविरोधात जगभरचा तरुण उभा रहात होता. त्यात कुटुंबव्यवस्थेतील बाप या व्यवस्थेविरोधातही जो आवाज उठत होता, त्याला बच्चन यांच्या लावारिस, बेवारस, गरीब, नाडलेला, परिस्थितीने गुंड बनलेला अशा अनेक व्यक्तिरेखांनी प्रथमच अॅंटी हिरो हिंदी चित्रपटात प्रस्थापित केला. (स्वत:बच्चन प्रस्थापित झाल्यावर ‘कभी खुशी, कभी गम’ असे कौटुंबिक मेलोड्रामा करू लागले!)

बच्चन यांनी केवळ अँटी हिरो नाही, तर हिंदी सिनेमाला आवश्यक अशा नाच, गाणी, विनोद या आघाडीवरही एकछत्री अंमल चालवला. बच्चन म्हणजे कम्प्लीट पॅकेज झाले.

बच्चन सुपरस्टारपदी पोहचले, पण त्यांना राजेश खन्नांसारखे वेडेपणाकडे नेणारे ‘सुपरस्टारपद’ लाभले नाही. त्याला कारण त्यांचं व्यक्तित्व! शारीर उंची, आवाज, हिंदीसह उर्दू-इंग्रजीभाषेवर असलेला प्रभाव. चाल चलनातील शालीनता, विनम्रता आणि तशी फारशी उपजत नसलेली,  पण त्याचा आभास तयार करणारी बुद्धिमत्ता यामुळे ते सर्वमान्य लोकप्रिय झाले तरी खन्नासारखे अनुकरणीय (केस, कपडे, इ.इ.) अंधभक्त तयार करू शकले नाहीत.

बच्चन कार्यरत असतानाच समांतर सिनेमाही मूळ धरत होता. त्यातील शबाना, नसीर, ओमपुरी, स्मिता पाटील, अमरिश पुरी, अनुपम खेर अशी मोठी पलटण त्यात होती. त्यांच्यासाठी व्यावसायिक सिनेमा व त्यातले नट हे अभिनेते नव्हेच असा दर्प होता. त्यात या सर्वांना आलटून-पालटून अभिनयाचे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले! त्यामुळे यांची विमाने हवेतच होती. कालांतराने समांतर सिनेमा चळवळ संपली आणि विमाने जमिनीवर आली, तसे यातले अनेक मुख्य दरवाजाने तर काही चोर दरवाजाने व्यावसायिक चित्रपटात शिरले.

तिथे गेल्यावर या सर्वांना व्यावसायिक हिंदी सिनेमा म्हणजे काय हे ‘याचि देही याची डोळा’ कळले. हिंदी सिनेमा, त्याची भव्यता, बजेट, हिरो हिरोईन्सचा आब रूबाब नखरे, बालिशपणा ते क्षूद्र राजकारण आणि यातही बच्चन नावाचा खांब काही काळ एकखांबी ही इंडस्ट्री सांभाळत होता, अर्थकारण स्वत:भोवती फिरवत होता. हे सर्व समांतर कलाकार बच्चन यांच्याविषयीची कुत्सितता, असूया वगैरे पूर्वग्रहासह त्यांच्या समोर तोफेसारखे उभे राहिले खरे. पण लवकरच लक्षात आले की, हा त्या अर्थाने अशिक्षित नट बराच पोहचलेला आहे! दरम्यान व्यावसायिक चित्रपटातलं मान व धन असे होते की, समांतरच्या तुलनेत जि.प. शाळेत पोषण आहार म्हणून रोज खिचडी खाणाऱ्यांना अमर्याद बुफे मिळावा! साहजिकच हे सर्व स्थिरावले, पूर्वग्रह कमी झाले. बच्चनपण मान्य करावे लागले आणि बच्चन यांनीही राष्ट्रीय पुरस्कार मिळवत राहिलेली कमी भरून काढली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बच्चन यांच्यासोबत मराठीतील विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये ते निखिल रत्नपारखी अशा एका मोठ्या फळीने काम केले, तर महेश मांजरेकर, नागराज मंजुळे यांनी त्यांना दिग्दर्शनही केलेय. सर्वांचे एकच मत, खरंच ‘महानायक’!

‘महानायक’ म्हणून सर्वगुणसंपन्न असले तरी बच्चन यांच्या व्यावसायिक नातेसंबंधाबद्दल फारसं बरं बोललं जात नाही. त्यांच्यावर स्वार्थीपणापासून असंवेदनशीलतेपर्यंतचे अनेक आरोप एकेकाळी त्यांच्या जवळ असणारे, त्यांना मदत मिळवून देणारे, ओळख बनवणारे असे सर्वच त्याबद्दल बोलतात. मेहमूद, कादरखान, अमजदखान, शत्रुघ्न सिन्हा, परवीन बाबी, अमरसिंह अशा अनेकांचे व्हिडिओ युट्यूबर उपलब्ध आहेत. पट्टीच्या राजकारण्यासारखे बच्चन यावर कधीच तोंड उघडत नाहीत. तशी एक दिवारच त्यांनी उभी केलीय.

बच्चन ही एक जिवंत आख्यायिका आहे, हे त्यांच्या कट्टर विरोधकाला पण मान्य करावे लागेल. पण त्यांचा सारा प्रवास, त्यातले चढउतार आणि त्यातून सुरक्षित वाट शोधून पुढे जाणारे बच्चन त्यांच्या या व्यामिश्र व्यक्तित्वामुळेच एवढा मोठा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावरही त्या अर्थाने बेदखल राहिले असावेत!

बाकी विनोद खन्नाला मरणोत्तर फाळके सन्मान देऊन या पुरस्काराची गेलेली इभ्रत परत आलीय, हेही काही कमी नाही.

...............................................................................................................................................................

‘हमरस्ता नाकारताना’ या बहुचर्चित पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5071/Hamrasta-Nakartana

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

...............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......