विपरीत परिस्थितीत शरद पवार ज्या दुर्दम्य इच्छाशक्तीने लढत आहेत आणि सत्ताधार्‍यांना शिंगावर घेत आहेत, ते वाखाणण्याजोगे आहे!
सदर - सत्योत्तरी सत्यकाळ
परिमल माया सुधाकर
  • शरद पवार
  • Tue , 01 October 2019
  • सदर सत्योत्तरी सत्यकाळ परिमल माया सुधाकर Parimal Maya Sudhakar काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार देवेंद्र फडणवीस भाजप शिवसेना

महाराष्ट्रात अगदी अलीकडच्या काळापर्यंत शरद पवार म्हणजे ‘राजकीय पॉवर’ हे समीकरण रूढ होते. आज शरद पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार आणि स्वत:च्या पक्षातील घरभेदी यांच्या अभद्र युतीच्या विरोधात एकटेच लढत आहेत. त्यांच्यासाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई झाली आहे. त्यांच्या जागी इतर कुणीही असता तरी त्याची ‘दयनीय’ अशी प्रतिमा उभी राहिली असती. मात्र, सर्व विपरीत परिस्थितीत पवार ज्या दुर्दम्य इच्छाशक्तीने लढत आहेत आणि सत्ताधार्‍यांना शिंगावर घेत आहेत, ते वाखाणण्याजोगे आहे. महाराष्ट्रातील विरोधकांच्या जवळपास ढासळलेल्या किल्ल्यांत शरद पवार नावाचा बुरुज आज अधिकच बुलंद दिसतो आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी पवार राज्यातील सर्वाधिक सक्रिय नेते आहेत. त्यांनी केवळ स्वत:चे राजकीय महत्त्व अबाधित राखलेले नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येत्या विधानसभेत एकहाती विजयप्राप्तीबाबतचा आत्मविश्वास त्यांनी डगमळीत केला आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्यात तीन वेगवेगळ्या संस्था/माध्यमांनी केलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजप युती न करतासुद्धा बहुमत प्राप्त करू शकतो किंवा बहुमताच्या अगदी जवळ पोहोचू शकतो, असे निष्पन्न झाले असतानाही फडणवीस शिवसेनेशी काडीमोड घेण्याच्या मन:स्थितीत नाही. यामागील मुख्य कारण पवारांनी डावपेच लढवणे सोडलेले नाही, हे आहे.       

लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि त्यानंतर पवारांच्या राजकारणाचे लाभार्थी असलेल्या अनेक लहान-मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर पवारांनी अखेर कात टाकण्याचा प्रयत्न केला. गेली अनेक वर्षे आपले सरदार, जमीनदार, देशमुख यांच्यामार्फत राजकारण करणार्‍या पवारांनी पुन्हा एकदा थेट कार्यकर्त्यांशी व जनतेशी संपर्क साधण्यासाठी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा सहा दिवसांचा झंझावाती दौरा केला. संघ व राज्य सरकार पुढे शरणागती न पत्करता त्यांच्याविरुद्ध मुलुख मैदान एक करण्यासाठी आपण सज्ज असल्याचा संदेश कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या मतदारांना देणे हा या दौर्‍याचा मुख्य उद्देश होता, ज्यात पवार कमालीचे यशस्वी झाले.

जे नेते पक्ष सोडून भाजप/शिवसेनेत दाखल झाले आहेत, त्यांच्याच मतदारसंघात सभा घेत कार्यकर्त्यांचे मनोबल आणि आपल्या मतदारांचा विश्वास उंचावण्याचा प्रयत्न पवारांनी केला. एवढ्यानेच फडणवीस सरकारचे धाबे दणाणले असावे. कारण ईडीने तत्काळ कारवाई करत पवारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. साहजिकच ईडीची कारवाई प्रतिशोधाच्या भूमिकेतून करण्यात आल्याचे चित्र महाराष्ट्रात उभे राहिले. विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक व आचारसंहिता लागू झाल्यानंतर, आणि ज्या बँकेत पवार कधीही कुठल्याही पदावर नव्हते तिथल्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात पवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यामागील राजकारण सामान्य जनतेच्या नजरेतून सुटले नाही. लगेच चाणाक्ष पवारांनी आपण स्वत: ईडी कार्यालयात हजर राहण्याचे जाहीर करत ‘कर नाही त्याला डर कशाचे’चा प्रत्यय दिला.

मागील तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच पवारांविरुद्ध दाखल झालेल्या आर्थिक गुन्ह्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच झाला आहे. अद्याप राष्ट्रवादी सोडून न गेलेल्या तसेच सोडण्याची इच्छा नसलेल्या अथवा पर्याय नसलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीतच आशेचा किरण दिसू लागला आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ‘फक्त तू लढ म्हण’ची आकांक्षा मनी बाळगून असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नवी उमेद प्राप्त झाली आहे.

मात्र, याचा अर्थ विधानसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढले नाही तरी किमान घटणार नाही, असा काढता येणार नाही. लोकसभा निवडणुक निकाल आणि त्यानंतर विरोधकांच्या झालेल्या दयनीय परिस्थितीचा पगडा मतदारांच्या मनावर अद्याप कायम आहे. पण या सर्व परिस्थितीत पवारांनी दाखवलेल्या जिगरीमुळे सत्ताधार्‍यांच्या विरोधात फक्त राष्ट्रवादीने शड्डू ठोकल्याचे चित्र उभे राहिले आहे.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असली तरी, ईडीने दाखल केलेल्या प्रकरणानंतर राज ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ शांत झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा केलेला नसताना नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या राजकारणाच्या विरोधात राज ठाकरे एक प्रमुख आवाज म्हणून पुढे आले होते. राजने लोकसभेत केलेल्या प्रभावी प्रचाराने विधानसभा निवडणुकीत मुंबई, मुंबईची उपनगरे, पुणे व नाशिक अशा शहरी भागांमध्ये मनसेमुळे भाजप-सेनेला किमान २० ते २५ जागांवर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यासाठी मोदी-शहा यांच्या राजकारणाविरुद्ध सातत्य राखणे आणि दररोज लोकांमध्ये जाणे गरजेचे होते. मात्र ईडीने दिलेल्या नोटिशीने मनसेच्या इंजिनातील वाफच काढून घेतली आहे.

मनसेबाबत जी शक्यता निर्माण झाली होती, त्याहून अधिक आशा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने जागृत केल्या होत्या. लोकसभेनंतर जर बाळासाहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला असता तर आज वंचित बहुजन आघाडी मुख्य विरोधकाच्या भूमिकेत आली असती. पण ज्या अनाकलनीय कारणांनी आंबेडकरांनी पुन्हा कोशात शिरणे पसंत केले, तेवढ्याच अनाकलनीय कारणांनी त्यांनी एमआयएमशी असलेली आघाडी फिस्कटू दिली.

तुलनेने नव्या असलेल्या राजकीय पक्ष/आघाड्यांची जी स्थिती झाली आहे, तीच भारतातील सर्वांत जुन्या पक्षाची –म्हणजे काँग्रेसची अवस्था झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस जसा राष्ट्रीय स्तरावर जसा दिशाहिन झाला आहे, तसा तो महाराष्ट्रात उद्देशहिन झाल्याचे जाणवते आहे. राज्याच्या विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष या नात्याने भाजप-सेनेच्या सरकारच्या चुका, गलथानपणा, निष्काळजीपणा आणि जनतेच्या मुख्य समस्या – रोजगार, रस्ते, शेतीतील समस्या या सर्व मुद्द्यांवर रान उठवण्याची जबाबदारी काँग्रेसची होती. या साठी राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम काँग्रेसला करायचे होते. मात्र, कोण-कोण सोबत येऊ शकतात याचा विचार करण्याऐवजी कोण-कोण सोबत नकोत याची लक्ष्मण रेखा आखण्यात काँग्रेसने धन्यता मानली. मुख्य विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडण्यात काँग्रेस सपेशल अपयशी ठरली. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी काँग्रेसला अपयशी केले. राज्यात ‘वरिष्ठ नेतृत्वा’चे बिरुद लावून मिरवणार्‍या फळीतून एकाही नेत्याने काँग्रेसला राज्यात पुन्हा प्रतिस्थापित करण्याचा विडा उचलला नाही. निवडणूक प्रचार सुरू होण्याच्या आधी स्वत:ला पूर्णपणे पक्षासाठी झोकून देण्याचे आणि प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या फळ्या उभारत सत्ताधार्‍यांना आव्हान उभे करण्याचे धारिष्ट एकाही ‘वरिष्ठ नेत्याला’ दाखवता आले नाही.

पण यात या ‘वरिष्ठ नेत्यांची’ तरी काय चूक? त्यांचे याबाबत मुळात प्रशिक्षणच कधी झाले नाही. पक्षासाठी गांधी-नेहरू कुटुंबीयांनीच प्रयत्नांची शर्थ करावी अशी सर्व ‘वरिष्ठ नेत्यां’ची इच्छा असते. दिल्ली दरबारावर सगळी भिस्त ठेवण्याची त्यांची सवय अगदी अलीकडच्या काळापर्यंत काँग्रेस श्रेष्ठींनी खपवून घेतली आणि वापरून घेतली. शरद पवारांची उंची कमी करता येत नाही म्हणून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना राष्ट्रीय पदे देत त्यांची उंची कृत्रिमपणे वाढवण्यात काँग्रेस श्रेष्ठींनी वर्षानुवर्षे धन्यता मानली. आज या ‘राष्ट्रीय स्तरा’च्या नेत्यांनी महाराष्ट्रात तरी काँग्रेसला तारून न्यावे, अशी श्रेष्ठींची इच्छा असताना हे ‘वरिष्ठ नेतृत्व’ आपापल्या मतदारसंघात स्वत:च्या किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या विजयासाठी धडपडत आहेत. ‘खडतर परिश्रम करा आणि विजयाचे श्रेय घ्या’ अशी संधी उपलब्ध असतांना महराष्ट्रातील काँग्रेसचे सन्माननीय ‘वरिष्ठ नेते’ परिश्रम नको व श्रेयही नको, अशा भूमिकेत गेले आहेत.

एकेकाळी मध्य प्रदेशात दिग्विजय सिंग, दिल्लीत शीला दीक्षित, आंध्र प्रदेशमध्ये राज शेखर रेड्डी आणि पंजाबमध्ये अमरिंदरसिंग यांच्यापुढे अशीच परिस्थिती होती. देशभरात काँग्रेस गलितगात्र असताना या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत आपले सर्वस्व झोकून देत पक्षाला विजय मिळवून दिले होते. पण महाराष्ट्रात असे होताना दिसत नाही. ‘वरिष्ठ नेत्यां’नी पक्षाशी प्रामणिक राहण्यापलीकडे झेप घेत योगदान द्यावे अशी पक्षश्रेष्ठींची मनोमन इच्छा असताना, ‘वरिष्ठ नेते’ कधी नव्हे ते आपापसात ‘पहिले आप, पहिले आप’चा खेळ रंगवण्यात मग्न आहेत. अशा एकंदर वातावरणात भाजप-सेनेच्या विरोधात महाराष्ट्राने शरद पवारांकडे बघू नये तर कुणाकडे बघावे?

शरद पवारांच्या गोतावळ्यातील अनेक जण त्यांचा पक्ष सोडून भाजप/शिवसेनेत गेल्याने पवार आपल्या मूळच्या प्रतिभेत परतल्याचे जाणवू लागले आहे. त्यांच्या गोतावळ्यात परिस्थितीवादी, आहे-रे, सामाजिक दबंग आणि आर्थिकदृष्ट्या भ्रष्ट लोकांचा झालेला जमावाडा त्यांच्यासाठी घातकच ठरत होता. त्यांच्याशिवाय पवारांचे मूळ रूप – जनतेचा पुरोगामी नेता – पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसेल अशी अपेक्षा त्यांच्या सहा जिल्ह्यांच्या दौर्‍याने निर्माण झाली आहे. अन्यथा, एकेकाळी सरंजामशाही मराठा नेतृत्वाची पर्वा न करता मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी सरसावलेल्या पवारांचे नेतृत्व त्याच सरंजामशाही मराठा नेत्यांवर विसंबले होते.

महाराष्ट्रात महिलांसाठी जवळपास सर्व क्षेत्रे खुले करत महिलांच्या सामाजिक-राजकीय सहभागाला प्रोत्साहन देणारे पवारांचे नेतृत्व नंतरच्या काळात पुरुषप्रधानतेचा टेंभा मिरवणार्‍या बुरसट मतदारांवर विसावले. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यावरून उत्तर भारतात सामाजिक कलह माजला असतांना महाराष्ट्रात त्याची शांत पण खंबीरपणे अंमलबजावणी करणार्‍या पवारांच्या पक्षात अन्य मागासवर्गीयांची उपेक्षाच झाली. महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराच्या सर्वाधिक संधी निर्माण करणार्‍या शरद पवारांकडे तरुणांनी पाठ केल्याचे चित्र मागील काही वर्षांत उभे राहिले होते.

हे सर्व बदलत आपल्या मूळ राजकारणावर परत येण्याची संधी आज पवारांना मिळाली असल्याची जाणीव पवारांना नक्कीच झाली असेल. पवार या नव-जाणीवेला जागतील यावर विश्वास असलेला तरुणांचा एक वर्ग पुन्हा पवारांभोवती गर्दी करू पाहत असल्याचे चित्र त्यांच्या ताज्या दौर्‍यात बघावयास मिळाले. या तरुणाईच्या त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत आणि त्यांच्या सोबत कठोर परिश्रम घेण्याची इच्छाशक्ती या तरुण वर्गात आहे. पक्ष-संघटनेची नव्याने दमदार बांधणी करण्यासाठी एवढे भांडवल पुरेसे आहे. पवार या भांडवलाची नीट गुंतवणूक करतील का आणि त्यातून मिळू शकणार्‍या लाभापासून कुटुंबीयांना दूर ठेवू शकतील का, हे कळीचे प्रश्न आहेत. 

.............................................................................................................................................

लेखक परिमल माया सुधाकर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे इथं अध्यापन करतात.

parimalmayasudhakar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......