‘माय मरो, मावशी जगो’ या म्हणीच्या अर्थाला सामोरं जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही!
पडघम - साहित्यिक
चित्रलेखा अरुण मेढेकर
  • चित्रलेखा अरुण मेढेकर आणि कविता महाजन
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख... महाजन यांच्या आईसमान असलेल्या मावशीनं लिहिलेला...

.............................................................................................................................................

‘माय मरो आणि मावशी जगो’ या न्यायानं कविताची मावशी आणि आईपण या दोन सुंदर नात्यांचा गोफ माझ्या वाट्याला आला. माझी मोठी बहीण (प्रतिभा सखाराम महाजन- तिला आम्ही ‘आक्का’ म्हणत असू) ही कविताची आई.

कविताचा जन्म आणि बालपण रुजलं आणि बहरलं ते मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं नांदेड कलेचं माहेरघर होतं. अनेक नामवंतांची घरं नांदेडला वसलेली. त्यापैकी एक घर होतं कविताचं आजोळ – प्रसिद्ध चित्रकार कलामहर्षि त्र्यंबक वसेकर आणि आजी इंदिराबाई वसेकर यांचा वाडा. गोदावरीच्या नदीकाठी ‘होळी’ या नावानं ओळखला जाणारा भाग नांदेडचं केंद्रस्थान होता. होळीवरच्या वाड्यात माझ्या वडिलांनी (त्यांना ‘अण्णा’ म्हणत) मराठवाड्यातील पहिली चित्रशाळा ‘अभिनव चित्रशाळा’ या नावानं सुरू केली होती. अण्णा कलाशिक्षणाच्या ध्यासानं आणि देशभक्तीनं झपाटलेले. घरात कलाकारांची उठबस, पुस्तकं, रंगसाहित्य, कॅनव्हॉस आणि संगीतानं भारलेलं वातावरण असे. या कलासक्त वातावरणात अगदी सामान्य वाल्याचाही कलावाल्मिकी होऊन जाई. पांढरेशुभ्र धोतर-कुडता घातलेले भारदस्त, पण अत्यंत मृदु व्यक्तिमत्त्वाचे अण्णा केवळ लहानग्यांनाच नव्हे तर थोरांनाही चित्रकलेचा एका वेगळ्या दृष्टीनं विचार करायला भाग पाडत होते. चित्रकलेच्या शिक्षणाचा पाया अण्णांनी मराठवाड्यात घातला. काळाच्या पुढे विचार करणाऱ्या आणि विवेकवादी असणाऱ्या अण्णांनी कला आणि समाजजीवन यांचाही उत्तम मेळ घातला. त्यांना साथ होती आमच्या आईची. तिला सारे ‘मोठी आई’ म्हणत.

मोठी आई फारशी शिकलेली नव्हती, पण पारंपरिक चित्रकलेत तिला उत्तम गती होती. दिसायला अत्यंत देखणी, आकर्षक हसू, कपाळावर मेणानं लावलेलं रुपयाएवढं लालभोर कुंकू आणि गळ्यात सोन्याची एकदाणी. घराची व्यावसायिक बाजू तिनं आपल्या कडक शिस्तीनं, पण माणसं धरून ठेवण्याच्या वृत्तीनं चांगलीच सांभाळली होती. तिच्या धार्मिक आचारविचारांवर अण्णांनी कधीच बंधन आणलं नाही.

अशा कलासंपन्न घरात आम्ही पाच भावंडं वाढलो. प्रतिभा आमची सर्वांत मोठी आणि सर्वांची लाडकी बहीण. आक्का अत्यंत सुस्वभावी, शांत, सोशिक आणि कलाकार होती. तिच्या चित्रकलेला विशिष्ट लय होती. तिच्या रेषा सहजच बोलक्या होत. तिच्या पाककलेलाही तोड नव्हती. ती अत्यंत चविष्ट स्वयंपाक करी. ती कलाशिक्षिका म्हणून नावाजली गेली आणि तिच्या अकाली मृत्युपूर्वी ती लोककलेवर डॉक्टरेटसाठी संशोधन करत होती. आमचा मोठा भाऊ शरद याने शिक्षकी पेशा निवडला आणि अत्यंत प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावानं शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून तो निवृत्त झाला. आमचा दुसरा भाऊ सुभाष हा अत्यंत अबोल, हुशार, विचारी आणि कलेच्या आणि साहित्याच्या प्रांतात अग्रेसर ठरला. त्याला इंग्रजी साहित्याची प्रचंड गोडी होती. तो मुंबईच्या नावाजलेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून मानाची पदवी मिळवून पुढे अभिनव चित्रशाळेचा प्राचार्य झाला. त्याच्या ‘पऱ्यांची शाळा’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा बालसाहित्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर माझा नंबर. चित्रलेखा नावाप्रमाणेच मला चित्रकलेनं आपल्या विश्वात सामावून घेतलं आणि बालचित्रकला शिक्षणात मी स्वत:ला झोकून देऊन शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद इथून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले. चित्रकलेच्या बरोबरीनंच मी संगीत विशारदही झाले. आमची सर्वांत धाकटी बहीण सुरेखा. आमच्या घरातील शेंडेफळ आणि बुद्धिमान. रेखानं कलेचा वारसा जरूर जपला, पण तिला समाजशास्त्र विषयात अत्यंत गती आणि आवड होती. याच विषयात तिनं एम. फिल पदवी संपादन केली आणि औरंगाबादला शासकीय महाविद्यालयातून ती प्राध्यापक पदावरून निवृत्त झाली.

हे कविताचे आजी-आजोबा, मामा आणि मावशा. असं हे आजोळचं कुटुंब तिच्या बालपणाच्या आणि भावविश्वाचा मोठा भाग होतं.

आक्काचा विवाह सखाराम दिगंबर महाजन यांच्याशी झाला. (त्यांना सारे ‘स.दि.’ या नावानं ओळखत) महाजन भावजी सावळे, अत्यंत देखणे, कुरळ्या केसांचे आणि करारी वृत्तीचे. त्यांना मराठी साहित्याची प्रचंड आवड आणि जाण होती. भावजींची आई ते स्वत: लहान असतानाच वारली. पण नियतीनं त्यांच्या तरुणवयातच त्यांच्या वडिलांनाही ओढून नेलं. त्यामुळे महाजन आजी-आजोबांचा सहवास कविताला मिळाला नाही.

कविताचा जन्म ही माझी सर्वांत आनंदाची आठवण आहे. आमच्या होळीवरच्या घर आणि चित्रशाळा असलेल्या मोठ्या वाड्यात आक्का (प्रतिभा) तिच्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. आमच्या घरात इवलंसं बाळ येणार याची चाहूल माझ्या बालमनाला लागली होती. एकेक दिवस उत्सूकता वाढवणारा होता. घरापासून पाचच मिनिटांवर असलेल्या ‘प्रतिभा निकेतन’ शाळेत आम्ही सारी भावंडं शिकत होतो. दप्तर पाठीशी घेऊन उतारावरील शाळेत पळतच जात असू.

रोजच्या प्रमाणे त्या दिवशीही मी शाळेतून आले. आक्काची आणि माझी खूपच गट्टी होती. त्यामुळे आधी तिला घरभर शोधलं. ती दिसली नाही तशी धावतच आईकडे जाऊन विचारलं. आई अत्यंत खुशीत होती. ती मला म्हणाली, ‘अगं, तू तर आता मावशी झालीस, आक्काला मुलगी झाली!’ एवढं ऐकताच मी धावतच सुटले. आईचं पुढचं बोलणं जणू कानावरून गेलं. घरापासून दोनच मिनिटांवर असलेल्या डॉ. सहस्त्रबुद्धेंच्या दवाखान्यात मी तरंगतच पोचले. आक्काच्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. मी तिच्या खोलीत पाय ठेवला तर एक छोटंसं बाळ तिच्या कुशीत विसावलं होतं. दाट काळ्याभोर कुरळ्या केसांची महिरप असलेलं, मोठ्या टपोऱ्या डोळ्यांचं, लाल चुटूक ओठांचं बाळ बघताच मी त्याच्या विलक्षण प्रेमात पडले.

मी १४-१५ वर्षांची असेन. तिच्या जन्मापासूनच माझं तिच्याशी नातं जुळलं. पंधरा दिवस कविताला मांडीवर घेण्याची परवानगी नव्हती. पण तिच्या मऊ मऊ गालांवरून आणि कुरळ्या केसांमधून मी हात फिरवत बसे. बाळाशी गप्पा मारण्याचा छंद मला खूप दिवस पुरला. आक्का तेव्हा नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेत कलाशिक्षिका होती. त्यावेळी त्यांचं घर वजिराबाद भागात होतं. रोज शाळेच्या वेळेआधी आक्का सायकलरिक्षानं कविताला मोठ्या आईकडे आणून सोडी. दिवसभर आम्ही सारे कविताच्या तैनातीत असू. शाळा सुटल्यावर आक्का कविताला पुन्हा घरी घेऊन जाई.

माझे आणि कविताचे ऋणानुबंध खूप घट्ट झाले. मला कवितासोबत फोटो काढायची फार हौस वाटत होती. तिच्या पहिल्या वाढदिवसाला मात्र मी आपला हट्ट पुरा केला. छोटुकल्या कविताला छान तयार करून मी एकटीच वजिराबादला प्रसिद्ध फोटोग्राफर आणि पेंटर झाडबुके यांच्याकडे घेऊन गेले आणि आम्हा दोघींचा मस्त फोटो काढला. खट्याळ, मोठ्या डोळ्याच्या कवितानं नाकाची गुंजडी करून छान हास्य केलं होतं. तो फोटो आजही माझ्याकडे आहे. तो क्षण माझ्या काळजावर कोरला गेला आहे!

कविता वयानं वाढत होती, तसा महाजन भावजींचा कामाचा व्यापही वाढत होता. त्यांनी प्राध्यापकी पेशाबरोबरच संस्थांच्या प्रशासनातही लक्ष घालायला सुरुवात केली होती. त्यांचा दबदबा वाढत राहिला. घरी शिक्षण, साहित्य, प्रशासन, राजकारण आणि कलाक्षेत्रातले दिग्गज येत, भेटत, राहत. घरात गप्पांचा फड रंगे. जेवायच्या वेळी असतील ते सर्वजण आक्काच्या हातचं चविष्ट, गरमागरम जेवून तृप्त मनानं घरी परतत. लोकांचा राबता, साहित्यमय वातावरण, या गोष्टींचे संस्कार घरी आणि आजोळी असे दोन्हीकडून कविताला मिळाले.

कविता लहाणपणापासूनच खूप बोलकी होती. चित्रंही खूप छान काढायची. आम्हाला नेहमी वाटे की, हा वारसा आम्हा सर्वांना अण्णांकडून आला. त्यांनी सुरू केलेल्या आरंभ, बोध, आनंद आणि विशारद या चारही बालचित्रकला परीक्षा कविता लीलया प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाली. चित्रकलेत तिची नजर नेहमीच नवं काहीतरी शोधण्यासाठी भिरभिरत असे. अण्णांची ती फारच लाडकी नात होती. सतत त्यांच्या अंगाखांद्यावर असे. तिच्याही नकळत तिच्यात अण्णांचे कितीतरी गुण आले. कवितामध्ये चिकाटी, कामाची शिस्त, तासनतास बैठक, कलासक्त नजर आणि काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची वृत्ती, निर्भीडपणे आपले विचार शब्दांतून अथवा चित्रांतून व्यक्त करणं, प्रयोगशीलता असे गुण अगदी सुरुवातीच्या दिवसांतही दिसून येत.

कविताचं होळीवरील बालपण आजच्या काळापेक्षा वेगळं होतं. त्या काळी स्वतंत्र बंगले, दारं बंद असणं, आजूबाजूच्या लोकांमध्ये न मिसळणं, अशी स्वमग्नता नव्हती. होळी म्हणजे एक मोठं कुटुंब होतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. घरं, शाळा, दुकानं, दवाखाने, भाजीमंडई, सराफा, मारवाडगल्ली, धार्मिक स्थळं, सोनार सर्व काही एकाच मोठ्या भागात बसलेलं होतं. पुढे लग्न होऊन ती कळव्याला भाड्याच्या घरात राहिली होती, तिथं वसलेल्या मुस्लीम प्रबळ मोहल्ल्यात म्हणूनच ती माणसाचं माणूसपण ओळखून जगू शकली. वेगळी भाषा, पेहराव आणि खाद्यसंस्कृतीचे भेद पार करून तिनं मशेरी लावणाऱ्या भाभीला आपलं कुटुंब मानलं, त्यांचा मांसाहार, मासे चवीनं चाखले. धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली समाजानं उभारलेल्या कृत्रिम भिंती तिनं पार मोडून काढल्या. माणसांच्या हृदयाला हात घालण्याची कला तिनं होळीवरच्या बालवयात आत्मसात केली आणि पुढच्या आयुष्यात लोकलमधील स्त्रियांना, वेश्यावस्तीतील स्त्री-पुरुषांना, आदिवासींना, नक्षलवादी स्त्रियांना बोलतं केलं.

१९७१ साली माझं लग्न औरंगाबादच्या अरुण मेढेकरांशी झालं. मी नांदेड सोडून औरंगाबादला स्थायिक झाले. तेव्हा नांदेड-औरंगाबाद हा प्रवास फार लांबचा वाटे. मराठवाड्यात ब्रॉडगेज रेल्वे आलेली नव्हती. मीटरगेजच्या गाड्या कासवाच्या गतीनं चालत. मध्यरात्री मनमाडहून येणारी अजिंठा एक्सप्रेस पकडून अत्यंत कंटाळवाणा प्रवास करावा लागे. बसेससाठी रस्ते अत्यंत खराब होते. तरीही माहेरची ओढ प्रचंड असे.

आक्काला कविताच्या पाठीवर दोन मुलं झाली – मुलगा गिरीश (भावड्या) आणि मुलगी कल्पना (आता पळणीटकर). गिरीश अत्यंत देखणा, नाकेला आणि प्रयोगशील वृत्तीचा होता. त्याला इलेक्ट्रॉनिक्सची प्रचंड आवड होती. अगदी लहानवयातच त्यानं टेपरेकॉर्डर, रेकॉडप्लेअर स्वत: बनवला. रेडिओ-टीव्ही उघडायचा, दुरुस्त करायचा. आक्काच्या चैत्रगौरीच्या हळदी-कुंकवाला भावड्याच्या वैज्ञानिक करामतीतून वाहतं पाणी, लायटिंग, पार्श्वसंगीत यामुळे वेगळीत खुमारी येई. कल्पनाचा ओढा संगीताकडे, नाटकाकडे अधिक होता. ती संगीत विशारद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिनं संगीत नाटकात उत्तम भूमिका करून पुरस्कार मिळवले.

तिघा भावंडांत जिव्हाळा होता, मात्र आवडीनिवडी अगदीच भिन्न होत्या. कविता लिहू-वाचू लागली होती. नांदेडला झालेल्या एका हुंडाबाळी प्रकरणात कविता मोर्चा काढून रस्त्यावर उतरली. तिला स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली होती आणि मनात अंगार पेटला होता.

कविता-गिरीश-कल्पना ही मुलं मोठी झाली, तशी आक्का आणि महाजन भावजी छोट्या किरायाच्या घरातून भाग्यनगरच्या मोठ्या बंगल्यात राहायला आले. तिथंच दोन-चार घरं सोडून अण्णा-मोठ्या आईचंही घर झालं होतं. शाळेला सुट्ट्या लागल्या की, मी माझ्या दोन मुलांना – अर्चना आणि अमित - घेऊन माहेरी जात असे. सुभाषदादाचे पराग-पल्लवी, शरददादाचे संगीता-हेमंत, रेखाचे प्राजक्ता-प्रतीक या मुलांची सुट्टीत एकत्र धमाल चाले. एका क्षणी मुलांची फौज अण्णांच्या घरी लाल पेरूच्या वा चिकूच्या झाडावर असे, तर दुसऱ्या क्षणी आक्काच्या घरी बदामाच्या किंवा अंजिराच्या झाडावर. रात्रीच्या जेवणाला अंगत-पंगत असे. रात्री सर्वजण प्रशस्त गच्चीवर गाद्या घालून चांदण्यांच्या छताखाली झोपत. सकाळी सगळे उठण्याच्या आधी पितळेचा बंब लख्ख करून सर्वांसाठी गरम पाण्याची चैन मोठी आई तयार ठेवी. रोज स्टोव्हच्या वाती स्वच्छ करून ‘प्रोत्साहन’, ‘बोर्नव्हिटा’ गरम दुधासोबत मोठी आई नातवंडांना प्रेमानं देई. तिच्याभोवती अर्धगोलाकार पाट मांडून मुलांची सकाळची न्याहारी आणि दुपार-रात्रीची जेवणं होत. कविता सतत आजीच्या मागे-पुढे असे. कुणाचं काही चुकलं तर ‘अगं सटवाई’ म्हणून पाठीत रपाटा ठरलेला असे. कविता मला खूपदा सांगायची की, मी मध्ये पडून तिचा मार कितीदा चुकवला होता, याची तिला नेहमी आठवण येते. पुढच्या आयुष्यात ती कधी दुखावली गेली तर मला फोन ठरलेला असायचा. तो विश्वासाचा धागा आम्हाला जन्मभर पुरला! तिनं जिद्दीनं अनेक संकटांचा सामना केला. पण ही मायेची पाखर तिला पुरेशी होती का? माझ्याकडे तिच्या प्रश्नांची उत्तरं नसली तरी तिचं बोलणं ऐकून घेताना मला समाधान असे आणि तीही शांतावत जाई.

कविता बहीण-भावंडांत वयानं मोठी म्हणून माहेरी सर्वांचीच ‘कविताताई’ होती. ती मोठीही भरभर झाली आणि विचारीही. ती अधाशासारखी वाचत असे आणि वक्तृत्व कलेतही अग्रेसर होती. तिचे नेतृत्वगुण वाखाणण्याजोगे असत. तिच्या कविता, लिखाण, चित्रकला आणि अभ्यास अशा चौफेर आवडी. कविता दहावी उत्तीर्ण झाली आणि तिनं प्रतिभा निकेतन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बोर्डात मराठी विषयात ती राज्यात पहिली आली होती. तिचे बाबा तिथे प्राचार्य होते. कॉलेजमध्ये तिला एखादं बक्षीस मिळालं तर लोक म्हणत- ‘तिचे वडील प्राचार्य आहेत म्हणूनच तिला हे बक्षीस मिळालं!’ मग काय कविताला राग यायचा. आपली स्वत:ची ओळख आपल्या व्यक्तिमत्त्वातून निर्माण करायची असं तिनं मनोमन ठरवलं आणि पुढे तसं करूनही दाखवलं. एक दिवस असा आला की, लोक तिच्या वडिलांना ‘प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे वडील’ म्हणून ओळखू लागले. अर्थातच त्यासाठी आयुष्यात आलेले अनेक अडथळे पार करून स्वकष्टानं, जिद्दीनं आणि स्वत:च्या हिमतीवर कविता पुढे आली.

नांदेडचं आकाश कविताला अपुरं पडू लागलं. पंखांमध्ये आलेलं बळ आजमावायला ती सज्ज झाली होती. तिला औरंगाबादला शिक्षण घेण्याची इच्छा होती. आक्का-भावजींनी ‘तिला तुझ्याकडे शिक्षणासाठी पाठवू का?’ अशी विचारणा केली आणि आम्हा दोघांनीही त्याला आनंदानं संमती दिली. कविताच्या आयुष्यातील नवीन पर्वाला सुरुवात झाली आणि आम्हा दोघींच्याही!

कवितानं औरंगाबादमधील लेबर कॉलनीजवळील शासकीय चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. एवढुशी, बुटकी, रोड, दाट कुरळ्या केसांची, तारुण्यात प्रवेश करणारी कविता स्वत:चा शोध घेत होती. रोजचा दिवस नवा होता. कधी दोन-तीन महिने शुभ्र पांढरे कपडे, तर पुढचे दोन-तीन महिने फक्त काळेच कपडे वापरायचे, कमरेएवढे मोठे दाट केस, दोन वेण्यांच्या जागी खांद्यावर रुळणारा स्टेपकट आला, गळ्यात रुद्राक्षांची माळ आली, खांद्यावर शबनमची बॅग असे. अनेक अवतार! मित्रमैत्रिणींमध्ये कविता भरपूर रमायची. चित्रकलेत तर रमत होतीच, पण त्यासोबतच एम.ए.च्या परीक्षेचा जिद्दीनं अभ्यास करून उत्तीर्ण झाली.

एका वर्षी त्यांच्या कला महाविद्यालयात वार्षिक चित्रकला प्रदर्शन होतं. कलाशिक्षक आणि पालक या दोन्ही नात्यानं मला निमंत्रण होतं. तेथील व्यक्तिचित्रं, लाईफ या विषयाविषयांवरील चित्रं बघताना एका जागी माझी पावलं थबकली. मी त्या व्यक्तीचित्राकडे बघतच राहिले. इतर चित्रांच्या तुलनेत त्या चित्राची लाकडी जाड चौकट मोठी होती. एका तरुणीचं ते पोर्ट्रेट अगदी रंगासह तजेलदार आणि जिवंत वाटत होतं. मी थबकून बघतच राहिले. थोड्या वेळानं चित्राची चौकट बाजूला सारून ते पोर्ट्रेट मिश्किलपणे हसत माझ्याशी बोलायला लागलं! कवितानं तिचे केस, कपडे, चेहरा शेडलाईटनं रंगवला होता. त्यातून तिचा अवखळ स्वभाव आणि तिच्यातला अवलिया कलाकार दोन्ही अधोरेखित होत होते. मला तिच्या या प्रयोगात अनेक जगन्मान्य थोर चित्रकारांची सेल्फ-पोर्ट्रेटस आठवली. तिची कलेची वाट लिओनार्दो दा विन्सी, विन्सेट व्हॅन गॉग आणि पाब्लो पिकासोच्या वळणावर जाताना दिसली. कलाकाराकडे असणारी दृष्टी आणि धाडस दोन्ही तिनं त्या तरुणवयात दाखवलं.

कवितामधील कलाकाराचा कलंदरपणा अगदी ऐन भरात आला होता. तिच्या स्वभावाचे निरनिराळे पैलू, तिचे मूडस मला जवळून बघायला मिळाले. ती सकाळी उशिरा उठायची आणि मूड लागला असेल तर दुपारी बारा-एक वाजेपर्यंत चित्र काढत माडीवर बसायची. अशा वेळी तिला चहा-नाश्त्याचीही शुद्ध नसे. अशा वेळी मी तिला रागवत असे, ‘अगं किती वाजले! तुला कॉलेज नाही का?’ ती हसून माझा राग घालवण्यासाठी गळ्यात पडायची. मग झालं, मावशीचा राग कुठल्या कुठे पळून जाई! असे ते फुलपाखरी दिवस होते, तिच्या सोबतीचे!!

एका वर्षी कवितानं स्वत: हातानं बनवलेल्या दिवाळी भेटकार्डांचं प्रदर्शन औरंगाबादला भरवलं. अंदाजे पाच हजार ग्रिटिंग कार्डस. प्रत्येक कार्ड वेगळं आणि देखणं. प्रचंड विक्री झाली. आता मागे वळून बघताना मला वाटतं की, काम करण्याची तिची चिकाटी आणि आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा हा तिचा पहिलाच यशस्वी प्रयत्न होता.

पुढे लग्न होऊन कविता आधी ठाणे-कळवा आणि नंतर वसईला राहायला गेली. आई-वडिलांच्या विरोधाला न बधता केलेलं लग्न म्हणून स्वत:वर अधिकची जबाबदारी घेतलेली. आपल्या स्वतंत्र निर्णयाची तिनं पुरेपूर किंमत दिली. मुंबईमध्ये लेखन वा कलाक्षेत्रात तिची ओळख नव्हती. वारली आणि इतर आदिवासींसोबत काम करणं, वारली शब्दकोषावरचं काम करतानाच त्यांच्या जीवन आणि खाद्यशैलीवर दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील लेखन सुरू झालं. तिनं लिहिलेला ‘घुशीचा रस्सा आणि मुंग्यांची चटणी’ अशा काहीशा मथळ्याचा लेख अजून आठवतो. आदिवासी पाड्यांवर पायी चालणं आणि संशोधन, भवन्स कॉलेजमधील तात्पुरती नोकरी, जे. जे. स्कूलमध्ये मिळालेली अॅडमिशन, असा अडखळता प्रवास सुरू झाला. तिच्या मुलीचा – दिशाचा – जन्म ही तिच्यासाठी अत्यंत आनंददायी क्षण होता. दिशा लहान असतानाच आमची आक्का वयाच्या ५१-५२व्या वर्षी हृदयविकारानं वारली.

कविताला लग्नातली घुसमट सहन होत नव्हती. वेगळं होण्याचा निर्णय झाला, तेव्हा अट्टाहासानं तिचा बाबा दिशाला आपल्यासोबत घेऊन गेला, तेव्हा कविता आतून हलून गेली होती. लग्न मोडल्यानं आलेलं एकटेपण हा स्वीकार होता, पण दिशाच्या नसण्यानं आलेलं एकाकीपण तिला फार अवघड गेलं. मात्र या साऱ्या अवघड प्रसंगांना कवितानं अत्यंत धीरानं तोंड दिलं. आणि पुढे दिशाला स्वत्व गवसण्यासाठी जिवाचा आटापिटा केला, तिला आपल्या पायावर उभं केलं!

कविताचं लिखाण विविध कारणांनी तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू ठरलं. स्वत:ला आलेले क्लेशकारक अनुभव, भोवतीच्या समाजात उठणारी वलयं आणि समस्यांचा ती तिच्या दृष्टीनं नवा अन्वयार्थ लावून मांडू लागली. वास्तवाचा अभ्यास करणं, लोकांमध्ये राहून त्यांचे दृष्टिकोन समजून घेऊन समरसून आणि निर्भीडपणे कविता लिहू लागली. तिची ‘ब्र’ ही पहिली कादंबरी राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली आणि साहित्य वर्तुळात तिच्या परखड लिखाणानं खळबळ माजली. पुरुषप्रधान कुटुंबात, समाजात स्त्रियांना ‘ब्र’ही न काढता अन्याय कसा सहन करावा लागतो, याचं अत्यंत वास्तववादी चित्र तिनं या कादंबरीतून मांडलं. वाचकांनी ही कादंबरी अक्षरक्ष: डोक्यावर घेतली. तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. पुढे तिचा ‘चूं’ या नावानं हिंदी अनुवादही झाला. ती महाविद्यालयीन अभ्यासक्रमाला लागली!

त्यानंतर कवितानं मागे वळून पाहिलं नाही. आयुष्यात आलेली वेगवेगळी वळणं, त्यांचे शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम यांचा विचार न करता ती लिहीत राहिली, तिच्या अंतापर्यंत.

कविताची ‘भिन्न’, ‘ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम’ या कादंबऱ्या; ‘मृगजळीचा मासा’, ‘धुळीचा आवाज’, ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ हे कवितासंग्रह; ‘जोयानाचे रंग’, ‘बकरीचं पिल्लू’ हे बालवाङ्मय; ‘वारली लोकगीते’ हे संपादन; ‘ग्राफिटी वॉल’ हे सदरलेखन, अशी अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. यशाच्या एका पायरीवर उभी न राहता कवितानं नवनवीन लेखनप्रकार अत्यंत ताकदीनं हाताळले. ‘कुहू’ ही तिची पहिली मराठी मल्टीमीडिया कादंबरी. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते त्यातील चित्रं, कविता आणि सर्व काही तिनं जीव ओतून केलं. तिच्यातील लेखक-कवी-चित्रकार आणि निसर्गाकडे बघण्याची संवेदनशील वृत्ती, या सर्वांचा उत्तम मेळ जमून आला होता. आर्थिकदृष्ट्या ‘कुहू’नं तिला विशेष यश दाखवलं नाही, मात्र मराठी साहित्यात अशा प्रकारचा प्रयोग करण्याचं आणि कलात्मकदृष्ट्या यशस्वी करून दाखवण्याचं धाडस फक्त कविताच करू जाणे! तिचं प्रत्येक पुस्तक प्रकाशित झालं की, त्याची एक प्रत माझ्याकडे कुरिअरनं येत असे.

आमच्यातली एवढी ओढ नकळत कुठून आली, हे सांगता येणार नाही!

कविताला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. नवा पुरस्कार जाहीर झाला की, फोन करून मला सांगायची की, ‘एक आनंदाची गोष्ट आहे. मला अमूक पुरस्कार जाहीर झाला आहे. पहिला फोन तुलाच लावला आहे.’ माझं मन अभिमानानं भरून यायचं. पण प्रत्येक वेळी वाटायचं की, हे कौतुक बघायला तिची आई राहिली नाही. तिला २०११ साली इस्मत चुगताईच्या ‘रजई’च्या अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. कविता नेहमी म्हणायची की, या अनुवादानं तिला कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिण्याचं बळ दिलं! तिच्या आधीच्या पिढीच्या महाश्वेतादेवींसारख्या लेखिका आणि तिच्या अनेक समकालीन लेखिकांनी तिच्या लिखाणाच्या जाणीवा विस्तीर्ण केल्या.

समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन, मृत्युशी झुंज देऊन कविता २०१४मध्ये अक्षरक्ष: तरली. त्यानंतर शरीरानं साथ सोडली, तरी त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा तिनं पुरेपूर उपयोग करून घेतला. अत्यंत समरसून जगली आणि प्रचंड लिखाण केलं. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कविताचा मला फोन आला. म्हणाली, ‘मावशी आज माझी हाताची बोटं खूप दुखताहेत.’ मी म्हणाले, ‘कविता, तू तासनतास लिखाण करतेस. त्या बोटांना जरा आराम दे.’ कवितानं मला दिलेलं उत्तर मी कधीही विसरणार नाही. ती म्हणाली, ‘मी पडले लेखिका. लिखाण म्हणजे माझा श्वास. मी सतत लिहिणार आणि त्यावरच माझं घर चालणार. मग लिहू नको तर जगू कशी?’

तेव्हा पुन्हा एकदा प्रखरतेनं जाणवलं की, कविताचं जीवन म्हणजे एक संघर्ष होता. स्तंभलेखनाचं मानधन, पुस्तकांची रॉयल्टी, पुरस्कारांची रक्कम, भाषणांचं मानधन, दिशा क्रिएटिव्हजच्या माध्यमातून केलेलं प्रकाशन आणि मांडणीचं काम हेच तिचं आर्थिक स्थैर्याचं साधन होतं. ती तिनं आनंदानं निवडलेली वाट होती. खूप बिकट आणि चढणीची. मात्र एकदा तो मार्ग निवडल्यानंतर तिनं योग्य मानधनासाठी, लेखकांच्या हक्कांसाठी रोखठोक बोलणी करण्याचा निर्णय घेतला होता. तो अनेकांच्या पचनी पडत नसे. तिला मात्र मराठी आणि भारतीय साहित्याचा पलीकडे साहित्यक्षेत्रात लेखकांना मिळणाऱ्या अत्यंत सन्मानपूर्ण वागणुकीची जाणीव होती आणि स्वत:च्या कामाच्या माध्यमातून तिनं इतर अनेक लेखकांसाठी हा मार्ग खुला केला. कॉपीराईट, रॉयल्टी, प्रकाशन यासंबंधीचे व्यवहार लिखित, कायदेशीर आणि पारदर्शी असावेत, याचा अट्टाहास धरला. तिच्या लेखनकर्तृत्वाइतकंच मला तिच्या या लढ्याचंही फार महत्त्व वाटतं.

मागच्या वर्षी एक दिवस मला कविताचा अचानक फोन आला. मला म्हणाली, ‘तू इतके दिवस माझं माहेरपण केलंस, आता तू वसईला माझ्याकडे माहेरपणाला ये. खूप आराम कर. दिशा आता खूप छान स्वयंपाक करते. आपण खूप धमाल करू.’ अरुणकाकांशीही तिचं फार गूळपीठ होतं. आम्ही दोघंही आनंदानं तयार झालो. मात्र आम्हाला मुंबई-औरंगाबाद असं परतीचं तिकीट मिळेना. ती म्हणाली, ‘तुम्ही या. मी परतीच्या तिकिटाची व्यवस्था करते.’ आम्ही वसईला चार-पाच दिवस अत्यंत आनंदात काढले. तिचा छोटासाच पण टुमदार फ्लॅट अत्यंत नीटनेटका, स्वच्छ होता. पुस्तकांनी आणि पुरस्कारांनी गच्च भरलेली शोकेस, मोजक्याच पण कलात्मक वस्तूंनी सजवलेलं घर, तिचं लिखाणाचं टेबल आणि भारदस्त खुर्ची, तिचा मदतनीसांची जागा सारं काही डोळे भरून पाहिलं. ‘आम्हा घरी शब्दांचेच धन’ हे मनोमन जाणवत राहिलं. मन खूप अभिमानानं भरून आलं. गच्च मिठीत घेऊन मी तिचं कौतुक केलं. खाणं-पिणं-गप्पा, जुन्या आठवणी, जुने-नवे फोटो पाहणं, थिएटरमध्ये जाऊन सिनेमा, हॉटेलमध्ये जेवणं अशी खूप मजा केली. औरंगाबादच्या परतीची तिकिटं मागताच तिनं आम्हा दोघांची विमानाची तिकिटं हाती ठेवली. आम्ही तिच्या प्रेमात न्हाऊन निघालो! तिच्यासोबत आनंदात राहण्याचे ते शेवटचे दिवस आहेत, असं तेव्हा मनातही आलं नाही.

कविता-दिशा पुण्यात शिफ्ट झाल्या आणि भेटी सहज होतील अशी स्वप्नं आम्हाला पडू लागली. आम्ही पुण्यातच असताना कविताला चेलाराम हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचं कळलं. तेव्हा मृत्युशी शांतपणे, निकरानं झुंड देणारी कविता पाहिली. एका झंझावाताप्रमाणे आलेलं वादळ चटका लावून पन्नाशीतच शांतावलं यावर अजूनही विश्वास बसत नाही.

कविताचं असं अर्ध्यावरच डाव टाकून निघून जाणं म्हणजे कुटुंबाचं आणि तिच्या मित्रपरिवाराचं कधीही न भरून येणारं नुकसानच! मात्र मी विचार करते की, कवितासारखी अत्यंत मनस्वी, अभ्यासू आणि प्रतिभाशाली कलावंत स्त्री काळाच्या पडद्याआड जाते, तेव्हा सामाजिकदृष्ट्या नक्की काय हरवतं? एक बाई म्हणून तिच्या संघर्षामुळे इतरांच्या वाटा सुकर होतात का? कविताच्या बंडखोरीचा, परखड प्रश्न विचारण्याचा, आडपडदा न ठेवता लिहिण्याचा, तिच्या लिखाणाच्या ताकदीचा, असंख्य नाती जोडण्याचा, नकोशी नाती घाव घालून तोडण्याचं धैर्य दाखवण्याचा दीर्घकालीन परिणाम समाजजीवनावर होणार आहे, याची मला खात्री वाटते.

तिनं चौकटी मोडून काढल्या आणि त्यासाठी भरपूर सोसलं. तिचं वयानं आणि कर्तृत्वानं मोठं होणं मी अभिमानानं मिरवलं. वयानं माझ्याहून लहान असूनही माझं क्षितिज तिनं विस्तारलं. तिचे अनेक प्रकल्प अर्धवट राहिले आणि तिच्या हातून आणखीही भरीव काम होणार होतं, ते राहून गेलं, याची खूप खंत वाटते. मात्र तिचे शब्द आणि त्यातून झालेलं परिवर्तन मृत्युही हिरावून घेऊ शकत नाही. तिनं आकाश कवेत घेतलं आणि पराभवाची तमा बाळगली नाही. तिच्या जीवनप्रवासाच्या आठवणींची शिदोरी माझ्या हृदयाच्या एका खास कप्प्यात मी जपून ठेवली आहे. कविता अशीच अनेकांच्या हृदयात कायमची जगत राहणार आहे. कविता कधीच थांबणार वा संपणार नाही.

इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते ते पहा… कविताच्या झंझावाती आयुष्यासारखाच तिच्या मृत्यूही तडकाफडकी झाला. आता पुढे काय या विचारानं आम्ही सुन्न झालो होतो. पण कवितानं तिच्या तर्कशुद्ध विचारसरणीनं दिशाला आधीच तयार केलं होतं. म्हणूनच ती कोवळी पोर आयुष्याशी चार हात करायला हिमतीनं उभी राहिली. मी नसेन तेव्हा माझ्यानंतर अर्चूमावशीचं म्हणजे माझ्या मुलीचं ऐकायचं, हेही तिनं दिशाला सांगून ठेवलं होतं. प्लॅनिंग तरी किती करावं माणसानं! तिच्या प्लॅनिंगनुसार आता दिशा माझी मुलगी अर्चनाकडे कॅनडाला पुढचं शिक्षण घेतेय आणि स्वतःची ओळख तयार करतेय.

‘माय मरो, मावशी जगो’ या म्हणीच्या अर्थाला सामोरं जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही!

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Sat , 28 September 2019

तुमच्यासारखी मावशी सगळ्यांना लाभो! ♥️


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा