प्रेम हा सिनेमाचा पाया आहे. त्यावर रचलेला प्रत्येक इमला हा इतका सुंदर आहे की, त्याच्या प्रेमात पडावं!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘गर्लफ्रेंड’चं पोस्टर
  • Sat , 27 July 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie गर्लफ्रेंड Girlfriend अमेय वाघ Amey Wagh सई ताम्हणकर Sai Tamhankar

‘तुझ्याबरोबरच्या सगळ्यांची लग्न झाली!’हे वाक्य उठता-बसता ऐकणाऱ्या लग्नाळू मुलाची मनस्थिती मांडणारा ‘गर्लफ्रेंड’ हा सिनेमा अनेक अंगानं बहरत जातो. प्रेम हा सिनेमाचा पाया आहे. त्यावर रचलेला प्रत्येक इमला हा इतका सुंदर आहे की, त्याच्या प्रेमात पडावं. त्याचं कारण उपेंद्र सिधये यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा प्रेमाचे विविध रंगरूप पुढे आणताना त्यातलं मानसिक द्वंद आणि त्याच्यातल्या छोट्या-छोट्या गमतीजमती दाखवतो. त्यामुळे सिनेमा वास्तव आणि कल्पना यांची जुळून आलेली कलाकृती ठरतो.

सिनेमाची कथा नचिकेत नावाच्या तरुणाची आहे. तो भौतिक गोष्टींबाबत ‘सेटल’ आहे. म्हणजे नोकरी आणि पैसा या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत. लहानपणापासून अत्यंत निरागस आणि सोज्वळ स्वभावाच्या नचिकेतला शल्य फक्त एकाच गोष्टीचं आहे. ते म्हणजे त्याला एकही गर्लफ्रेंड नाही. त्याच्या मित्रांची लग्नं झाली, त्यामुळे ‘सिंगलत्व’ वाट्याला आलेल्या नचिकेतचा जीव गुदमरतो. खरं तर गर्लफ्रेंड असणं प्रतिष्ठेचं समजलं जाणाऱ्या त्याच्या भोवतालात नचिकेत गरज म्हणून गर्लफ्रेंड शोधतोय की, भोवतालचं वातावरण त्याला तसं वागायला भाग पाडतं, याची उकल एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला सिनेमा तितकाचं रोमेंटिक आहे. या दोन्ही बाजू एकमेकांना समांतर जात त्यातून सिनेमा तयार होतो. त्यामुळे त्यात दोन विशाल नद्यांचा सुखकर संगम आहे!

प्रेम आणि लग्न यांच्यामध्ये असणाऱ्या छोट्या रेषेवर कथा पुढे जात राहते. जोडीदार कसा असावा याचं स्वप्न रंगवलेली असताना आपण पुढे येणाऱ्या व्यक्तीकडे काय म्हणून पाहतो? अशा नात्यातला गोड, तिखट आणि तिखटपणा मुक्तपणे चाखत पुढे जाण्याची तयारी असते का? मानसिक गरज म्हणून ज्याचा स्वीकार केला जातो, त्याला व्यवहाराचं स्वरूप मिळालं की त्यातला गरजेचा भाग संपतो. मग सोयीस्कररित्या त्याला दूर सारलं की, आठवणी पुसल्या जातात का? या प्रश्नांची उत्तरं सापेक्ष असली तरी त्यातला व्यक्तिगत वास्तवाचा भाग विसरून चालत नाही.

हे चित्रण सिनेमात दाखवताना त्यातल्या कुठल्याही प्रश्नांची ठाम उत्तरं देण्याचं दिग्दर्शक टाळतो. त्यामुळे सिनेमा मनोरंजक तर ठरतोच, पण त्यातला मोठा भाग मानसिक पातळीवर चालणाऱ्या द्वंद्वाचा प्रत्येकाला स्वतःच्या पद्धतीने अर्थ लावण्याची मोकळीक देतो, हे या सिनेमाचं वेगळंपण ठरतं.

लयबद्ध कथा या सिनेमाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. कथेत अत्यंत संथगतीनं चढउतार येतात. त्यामुळे सिनेमा लय सोडत नाही. संवाद नक्कीच वाखण्याजोगे आहेत. काही ठिकाणी तर संवादांपेक्षा पडद्यावर जे काही दिसतं, त्यातला प्रभावीपणा कॅमेऱ्यानं अचूक टिपला आहे. सोशल मीडियासारखा विषय हाताळताना त्यावर थेट भाष्य न करताही त्याचं प्रभावी चित्रण करण्याचं कौशल्य अधिक परिणामकारक ठरतं. संगीताला दिलेला ‘तडका’ त्यात वैविध्य निर्माण करतो. सिनेमातल्या तांत्रिक बाजूही पूरक आहेत. नाविन्यपूर्ण असं काही नसलं तरी सिनेमा म्हणून दिग्दर्शकानं वापरलेली तंत्रंही उत्तरोत्तर अधिक प्रभावी ठरतात.

अमेय वाघ आणि सई ताह्मणकर या जोडीनं धमाल केली आहे. अमेयनं गोंधळलेल्या मुलाच्या, तर सईनं बिंदास्त जगणाऱ्या मुलीच्या भूमिकेचं आव्हान बखूबी पेललं आहे. त्यामुळे दोघांचा अभिनय सिनेमाला अधिक बहरदार बनवतो.

दिग्दर्शक म्हणून उपेंद्र सिधये यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. हिंदी सिनेमा जवळून पाहणाऱ्या सिधये यांनी या सिनेमातलं मराठीपण अबाधित ठेवलं आहे. हे त्यांचं कौशल्य कौतुकास्पद म्हणावं लागेल.

‘गर्लफ्रेंड’ तरुणांची मानसिक पातळीवर होणारी घालमेल दाखवतो. मात्र त्याच वेळी सिनेमा या सगळ्या चढउताराकडे अधिक सकारात्मक दृष्टीनं पाहायला लावतो. म्हणूनच सिनेमाचं नाव ‘गर्लफ्रेंड’ असलं तरी तो तरुण मुलात लपलेल्या ‘बॉयफ्रेंड’चा शोध घेण्याची यशस्वी धडपड करतो. त्यामुळे ‘बॉयफ्रेंड’ हा त्याचा व्यापक अर्थाने गाभा घटक आहे. हे लक्षात घ्यायला हवं.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......