‘तैमूर’ या अरेबिक शब्दाशी आपलं भांडणं असण्याचं काही कारण नाही!
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • तैमूर लंग
  • Thu , 22 December 2016
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar तैमूर लंग Timur Lang तारेक फतेह Tarek Fatah इरफान हबीब Irfan Habib करिना कपूर Kareena Kapoor सैफ अली खान Saif Ali Khan

तैमूर लंगडा…चेंगिजखानाइतकाच हिंदुस्थानी लोकांनी ज्याचा धसका घेतला आणि द्वेषही केला असा आक्रमक, क्रूर, लुटारू शासक. त्याचं नाव करिना कपूर-सैफ अली खान या दांपत्यान आपल्या नवजात बाळाला दिलं म्हणून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आले.

चर्चेखोर मंडळी भरमसाठ युक्तीवाद, मुद्दे हिरीरीने मांडत आहे, पण दोन युक्तीवाद महत्त्वाचे आहेत. पहिला, पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी मांडलाय. त्यांनी करिना-सैफ यांना उद्देशून म्हटलं आहे की, ‘अरे बाबांनो, तुम्ही अशिक्षित, अडाणी, घमेंडखोर, अहंकारी आहात काय? ज्याने हिंदुस्थानला लुटलं, त्या क्रूर शासकाचं नाव मुलाला का ‌ठेवलंत? तुम्हाला तैमूरचा काळा इतिहास, कर्मे माहीत नाहीत वाटतं! तुम्ही हे कर्म करून लोकांना काय संदेश देता आहात?’

दुसरी प्रतिक्रिया ख्यातनाम भारतीय इतिहासकार इरफान हबीब यांची आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘तैमूर लंग (लंगडा) याने हिंदू आणि मुसलमान दोघांच्याही कत्तली केल्या. तो हिंदुस्थानी मुस्लिमांचाही द्वेष करी. तो लुटारू शासक होता. हिंदुस्थानची लूट हे त्याचं उद्दिष्ट होतं. त्या उद्देशापायी त्याने इथं काळी कर्मे केली, पण त्याने फक्त हिंदूचीच कत्तल केली हे अर्धसत्य आहे. त्याने इथल्या सर्व हिंदू-मुस्लिम जनतेला त्रास दिला, लुटलं. त्यामुळे भारतीय मुस्लिमांनी कधी तैमूरविषयी प्रेम दाखवलेलं नाही. आणि दाखवायचं काही कारणही नव्हतं.’

हे असं सगळं असलं तरी इरफान हबीब यांचं म्हणणं असं आहे की, तैमूर हे नाव फक्त त्या अत्याचारी शासकाशी जोडलेलं आहे म्हणून कुणी ठेवू नये असं नाही. मुळात तैमूर हा अरेबिक भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ पोलादी, खुद्दार, इमानदार, न वाकणारा, खंबीर असा आहे. या चांगला अर्थ असणाऱ्या अरेबिक शब्दाबरोबर आपलं भांडणं असण्याचं काही कारण नाही. मध्य आशियात अनेक कुटुंबात तैमूर हे मुलाचं नाव ठेवलेलं आढळतं. हबीब यांनी स्वत:च्या हैदर नावाच्या मित्राने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्याचा दाखला दिला आहे.

हे मुद्दे मांडताना हबीब म्हणतात, एखाद्या कुटुंबाचा त्यांच्या मुलाचं नाव ठेवण्याचा अधिकार आपण मान्य केला पाहिजे. भारतात, दक्षिणेत ‘रावण’ हे अनेक मुलांचं नाव ठेवलेलं आढळतं. हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा मामला आहे. इतरांनी त्या मर्जीवर आक्रमण करता कामा नये.

यासारखीच अनेक मतं माध्यमांमधून पुढे येत आहेत आणि आणखीही येतील.

यातून एक दिसतं. आपला समाज सत्तेबद्दल खूप जागरूक दिसतो. चांगल्या सत्ताधाऱ्यांना तो डोक्यावर घेतो, तर वाईट सत्ताधाऱ्यांना पायदळी तुडवू पाहतो. सत्ता या घटकाची जादूच अशी असते. सत्ता लोकजीवन घडवते आणि बऱ्याचदा कुजवतेही. म्हणून सत्ता आणि सत्ताधारी यांच्या वर्तनाबद्दल लोक कमालीचे जागरूक असतात.

करिना-सैफ यांच्या बाळाच्या निमित्ताने तैमूरच्या सत्ताकाळाची, काळ्या कर्माची चर्चा सुरू झाली. तैमूर लंग किंवा तैमूर लंगडा याच्याविषयीचा खरा इतिहास या निमित्ताने समजून घेतला पाहिजे. त्यातून खोट्या गोष्टी खड्यासारख्या बाजूला टाकल्या पाहिजेत. तैमूरला तो लंगडा असल्याने ‘लंग’ हे नाव पडलं. (लंगचा अर्थ लंगडा.) त्याच्या जन्माची ८ एप्रिल १३३६ आणि मृत्यूची १८ फेब्रुवारी १४०५ अशी अधिकृत नोंद आहे.

चौदाव्या शतकातला हा शासक मूळचा मंगोलियन. त्याने तैमुरी राजवंशाची स्थापना केली. त्याचं राज्य पश्चिम आशियापासून मध्य आशिया पादाक्रांत करत भारतापर्यंत पसरलं होतं. त्याची गणना जगातल्या मोठ्या शासकांमध्ये जशी केली जाते, तशीच सर्वांत क्रूर शासकांमध्येही केली जाते. एका पाठोपाठ मोठमोठे विजय मिळवत त्याने अल्पावधीत स्वत:चं साम्राज्य पसरवलं. चेंगिजखान हा त्याचा ‘रोल मॉडेल’ होता.

तैमूरच्या बापानं इस्लाम धर्म कबुल केला आणि दोघे बाप-बेटे मुस्लीम झाले. तैमूर जसा आक्रमक आणि क्रूर होता, तसाच प्रतिभावान आणि महत्त्वाकांक्षीही होती. क्रूरता आणि प्रतिभा या एकाच माणसात फुलल्या तर काय महान रसायन तयार होतं हे तैमूरकडे पाहिल्यावर कळतं. महत्त्वाकांक्षी आणि आक्रमकता एकत्र आली की, जगाला पायाखाली तुडवत विश्वविजयी होण्याची धुंदी चढते. अशी धुंदी तैमूरला चढली आणि त्याने चेंगिजखानाच्या पावलावर पाऊल टाकण्याचा संकल्प केला. सिकंदरसारखा जगज्जेता होण्याचा निर्धार केला.

सैन्यानं कसं वागावं? तैमूरने नियम घालून दिला की, चेंगिजखानाच्या सैनिकी पद्धतीसारखं वागावं. क्रूरपणे आणि निष्ठुरतेनं शत्रूला तुडवत जावं, असा त्याने सैनिकांना हुकूमच केला होता. १३८० ते  १३८७ या फक्त सात वर्षांत तो खुरासान, सीस्तान, अफगाणिस्तान, फारस, अजर बैजार आणि कुर्दीस्तान पादाक्रांत करत हिंदुस्थानमध्ये घुसला.

भारतातल्या सोन्याच्या साठ्यांचं त्याला विशेष आकर्षण होतं. भारतातल्या वैभव आणि समृद्धीच्या लुटीची पूर्ण योजना बनवून त्याने १३९८मध्ये स्वारी केली. त्याची राजधानी समरकंद इथून तो सप्टेंबर महिन्यात सिंधू, झेलम, रावी पार करून ऑक्टोबर महिन्यात मुलतानात आला. मुलतान, पानीपत लुटून लोकांच्या कत्तली करत तो दिल्लीत घुसला. पाच दिवस त्याचं सैन्य दिल्ली लुटत होतं. दिल्लीतून त्याने अनेक शिल्पकारांना कैद करून समरकंदला नेलं. भारतावर राज्य करणं हा त्याचा मुख्य हेतू होता. त्यामुळे त्या लुटीच्या आड जे हिंदू-मुस्लिम येतील, त्यांची कत्तल हा त्याचा खाक्या होता. भारतातून कैद करून नेलेल्या शिल्पकारांकडून त्याने समरकंदमध्ये अनेक आकर्षक, भव्य इमारती बांधल्या. तिथली प्रसिद्ध, भव्य जामा मशिद या शिल्पकारांनीच बांधलेली आहे.

अशा या क्रूर सत्ताधाऱ्याविषयी भारतीय जनमानसात तीव्र भावना असणं साहजिक आहे. पण तरीही ‘तैमूर’ या अरेबिक शब्दाशी आपलं भांडणं असता कामा नये. करिनाला हा इतिहास माहीत आहे की नाही, हे कळायला मार्ग नाही. तिला तैमूर हा भोपाळच्या नवाबाचा वंशज आहे, पाच हजार कोटी रुपयाच्या संपत्तीचा वारस आहे आणि त्यात एक हजार एकर जमीन आहे, याचंच आकर्षण असणं स्वाभाविक आहे. तिच्यातल्या आईला बाकी कशाहीपेक्षा पुत्रप्रेमापुढे इतर मुद्दे गौण वाटतील हेही साहजिक म्हणावं असंच आहे.

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......