‘कलंक’ : बडा घर, पोकळ वासा!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘कलंक’चं पोस्टर
  • Sat , 20 April 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie कलंक Kalank

‘कलंक’च्या श्रेयनामावलीत त्यात मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या तिन्ही स्त्री कलाकारांची नावं पुरुष कलाकारांच्या आधी पडद्यावर झळकतात. १९४०च्या दशकात घडणाऱ्या या कथेतील स्त्री पात्रं स्वतंत्र विचारसरणी ते काही वेळा तुलनात्मकरित्या पारंपरिक दृष्टिकोन घेऊन वावरतात. (सुरुवातीच्या अर्ध्या तासात तरी) त्यांच्या कृती न्याय्य ठरतात. सदर श्रेयनामावलीची योजना चित्रपट आपल्या पात्रांच्या स्वभावविशेषाशी तडजोड करू पाहणारा नाही, ही गोष्ट अधोरेखित करते. मात्र चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो, तसा या बाबीचा जणू लेखक-दिग्दर्शकाला विसर पडू लागतो. चित्रपटकर्त्यांना मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटाकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी पात्रांवर आणि कथेवर लादल्या जाऊन पात्रं सुरुवातीच्या भागात प्रतिबिंबित होणाऱ्या त्यांच्या स्वभावविशेषांहून फारकत घेणाऱ्या गोष्टी करत जातात. रटाळ आणि क्लिशेड कथानकातील पात्रं पुस्तकी संवाद बोलत राहतात. एवढं करून तीनेक तास चालणाऱ्या या चित्रपटातील पात्रांच्या तथाकथित समस्यांची समाधानकारक ना उत्तरं त्यांना मिळतात, ना चित्रपट पाहणाऱ्या व्यक्तीला. अशा वेळी त्याचं मोहक छायाचित्रण किंवा कला दिग्दर्शन या गोष्टीही काही काळानं चित्रपटाच्या कंटाळवाण्या कथानकापासून दुर्लक्ष करू पाहणाऱ्या गिमिक वाटू लागतात.

‘कलंक’ची कथा अगदीच पारंपरिक आणि रटाळ स्वरूपाची आहे. ज्यात ‘काकस्पर्श’ अधिक ‘गदर’ अधिक इतर काही चित्रपट असं भासणाऱ्या समस्या आणि उपकथानकांची सरमिसळ आहे. सत्या (सोनाक्षी सिन्हा) या हुस्नाबादमध्ये राहणाऱ्या चौधरी परिवाराच्या सर्वगुणसंपन्न सुनेला कॅन्सर झालेला आहे. त्यामुळे ती आपल्या मृत्यूपश्चात आपल्या पतीशी विवाह करून, चौधरी घराण्याची सून बनू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात आहे. तिला ही व्यक्ती रूपच्या (आलिया भट) रूपात (नो पन इन्टेन्डेड) भेटते.

इंग्लंडवरून उच्चशिक्षण घेऊन भारतात आलेला (या गोष्टीचा आपल्याला विसर पडणार नाही इतक्या वेळा उल्लेख केला जातो) देव चौधरी (आदित्य रॉय कपूर) आपल्या पित्याच्या, बलराज चौधरीच्या (संजय दत्त) मालकीचं वर्तमानपत्र चालवतो आहे. तो सत्याच्या आग्रहावरून रूपशी लग्न करूनही तिच्यात भावनिक पातळीवर गुंतण्याची शक्यता नाही. सत्या एक वर्षाच्या कालावधीत मृत पावण्याचे संकेत असल्यानं रूपला परिवाराची परंपरा, प्रतिष्ठा समजून घेत पती-परमेश्वर देवचं प्रेम संपादन करायचं आहे. त्याचा एक मार्ग म्हणजे चौधरी कुटुंबाच्या वर्तमानपत्रात कार्यरत होऊन देवशी जवळीक साधणं. रूपला हा मार्ग पटतो, आणि ती तिथं पत्रकार म्हणून रुजू होते. एव्हाना चित्रपटातून तर्क नामक गोष्ट गायब झालेली असते.

याखेरीज रूपला गायनातही रस असल्यानं ती बहार बेगम (माधुरी दीक्षित) या वेश्येकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात करते. वेश्यागृहं, मुस्लिम वस्ती या गोष्टींमुळे बदनाम असलेल्या हिरा मंडी भागात राहणाऱ्या बहार बेगमकडे येण्यानं आणि पुढे जाऊन एका लेखाच्या निमित्तानं जफर (वरुण धवन) या लोहाराशी रूपचा संबंध येतो. उच्चशिक्षित आणि स्वतंत्र विचारसरणीच्या रूपचं भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातील प्लेबॉय असलेल्या जफरकडे आकर्षित होणं चित्रपटकर्त्यांच्या दृष्टीनं अपरिहार्य असतं.

बंड पुकारणारी, स्वतःच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी नायिका पत्रकार बनण्यापासून ते जफरच्या प्रेमापर्यंतचा प्रवास एका झटक्यात पार पाडते. त्यामुळे बहार बेगम आणि जफरमधील तणाव, त्यातून निर्माण होणारा तथाकथित ट्विस्ट, रूप-जफरची पारंपरिक स्वरूपाची प्रेमकथा या चित्रपटाला पुढे नेणाऱ्या मध्यवर्ती घटनांसोबतच १९४५ च्या दरम्यान उद्भवणारा हिंदू-मुस्लिम वाद, औद्योगिक क्रांती आणि कामगारांचा उठाव अशी एक अन् अनेक उपकथानकं समांतरपणे सुरू राहतात. मात्र पात्रांच्या स्वभावाशी ताळमेळ नसलेल्या कृती, इतक्या साऱ्या विषयांची सरमिसळ असलेला हा चित्रपट एकसंध पटकथेच्या अभावामुळे अविरत गोंधळात परिवर्तित होतो.

‘कलंक’मधील तर्काचा अभाव हा एक निराळा मुद्दा असला तरी त्याकडे ‘सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ’ या गोंडस संज्ञेच्या नावाखाली दुर्लक्ष करता येणं शक्य आहे. नसता जफरच्या बुलफायटिंगच्या दृश्यापासून ते इतरही अनेक दृश्यांची तर्कहीनता कुणाही व्यक्तीला खटकणारी आहे. उदाहरणार्थ, आलिया भट कुणा व्यक्तीला आपली कथा सांगत असल्याचं दृश्य चित्रपटाचा एक तृतीयांश भाग येऊन गेल्यानंतर अचानक सुरू होतं. त्यानंतर विनाकारण या दोन टाइमलाइन्समधील स्वैर वावर चित्रपटाच्या लांबीत आणि अतार्किकतेमध्ये अधिक भर घालतो. ज्याला चित्रपटाचं सुमार संकलन कारणीभूत आहे.

हल्ली बरेच चांगले म्हणावेसे कलाकार धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या चित्रपटांमध्ये नीरस चेहऱ्यानं वावरत वाईट कामगिरी का करतात ते कळण्यास मार्ग नाही. त्यातल्या त्यात आलिया भट आणि माधुरी दीक्षित त्यांचं मोहक रूप आणि चांगल्या अभिनय कौशल्यामुळे चित्रपटास सहनीय बनवतात. सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर यांची पात्रं त्यांच्या जुन्या चित्रपटांतील पात्रांचा विस्तार वाटावीत इतक्या अप्रभावी पद्धतीनं लिहिलेली आहेत, तर किआरा अडवाणी या उत्तम अभिनेत्रीलाही एका संक्षिप्त भूमिकेत जवळपास वाया घालवली आहे. संजय दत्त आणि कुणाल खेमू अभिनयाऐवजी अनुक्रमे खर्जातील आवाज आणि वेशभूषेवर काम चालवतात.

अभिषेक वर्मनची कथा-पटकथा अपरिपक्व स्वरूपाची आणि समस्यांनी ग्रासलेली आहे. ऐतिहसिक पार्श्वभूमीवर घडणाऱ्या चित्रपटात कथेप्रमाणेच महत्त्वाचे असलेले हुसेन दलालचे संवाददेखील चित्रपटाला मारक ठरणारे आहेत. बिनोद प्रधान यांचं छायाचित्रण आणि चित्रपटाचं कलादिग्दर्शन नेटकं असलं तरी इतर बाबींतील उणिवांमुळे चित्रपटाला निव्वळ या दोन गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं, तेव्हा या तांत्रिक बाबींच्या मर्यादा जाणवतात. शिवाय, कलादिग्दर्शनातही ओढूनताणून आणलेली अतर्क्य भव्यता खटकणारी ठरते. चित्रपटातील गाणी ही बहुतेक वेळा त्याच्या लांबीत भर घालणारी आणि अनावश्यक आहेत.

‘कलंक’ची सर्वांत मोठी समस्या म्हणजे दिग्दर्शक अभिषेक वर्मनचं वारंवार संजय लीला भन्साळीच्या चित्रपटांतील रंगसंगती आणि दृश्यपटलाकडून (सौम्य शब्दांत) प्रेरणा घेणं. मात्र चित्रपटाची कथा आणि पात्रं उथळ असताना भव्यतेच्या अट्टाहासामुळे निर्माण झालेल्या व्हिज्युअल्सचं विशेष वाटत नाही. कारण भन्साळी त्याच्या दृश्यांची रचना कशा पद्धतीनं करतो, त्यात पात्रांचा अर्क कसा एकवटला जातो, या गोष्टी केवळ सर्व पात्रांना चकाकणारी वेशभूषा आणि पार्श्वभूमीवर तितकेच चकाकणारे सेट्स उभे करून साध्य होत नाहीत, हे एव्हाना चित्रपटकर्त्यांच्या लक्षात यायला हवं होतं. एकूणच, ‘कलंक’ भन्साळीनं न लिहिलेल्या आणि दिग्दर्शित न केलेल्या भन्साळीच्या चित्रपटाप्रमाणे भासतो. चकाकणाऱ्या महालांमध्ये राहत, उर्दूमिश्रित संवादांचा अट्टाहास धरणाऱ्या पात्रांनी नटलेल्या सदर चित्रपटाचं वर्णन ‘बडा घर, पोकळ वासा’ ही म्हण समर्पकपणे करते.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......