राज ठाकरेंचं तुफान
सदर - सडेतोड
निखिल वागळे
  • राज ठाकरेंचं एक संग्रहित छायाचित्र
  • Thu , 18 April 2019
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle राज ठाकरे Raj Thackeray मनसे MNS राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congres भाजप BJP

महाराष्ट्रातली यंदाची लोकसभा निवडणूक रंगतदार करण्याचं संपूर्ण श्रेय राज ठाकरेंना दिलं पाहिजे. त्यांचा पक्ष एकही जागा लढवत नसताना त्यांनी आपल्या भाषणांनी राज्यभरात एक जबरदस्त तुफान निर्माण केलं आहे. १९७७पासून आजपर्यंत लोकसभा, विधानसभा आणि सर्व छोट्या-मोठ्या निवडणुकांचा मी साक्षीदार आहे. पण ज्यांचा एकही उमेदवार रिंगणात नाही, अशा पक्षाच्या नेत्यानं मैदान गाजवल्याची एकही घटना मला आठवत नाही.

एका दृष्टीनं राज ठाकरेंचा सध्याचा अवतार हा त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभूतपूर्व म्हटला पाहिजे. ते उत्तम वक्ते तर पूर्वीपासूनच आहेत, पण या वेळी त्यांच्या वक्तृत्वात मुद्देसूदपणा आणि अभ्यासू वृत्ती दिसते आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजवर कधीही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिला नव्हता. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव हे त्यांचं लक्ष्य आहे, पण त्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मत द्यायला ते सांगत आहेत. मोदी-शहा जायला हवेत, त्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान झाले तरी हरकत काय, हा त्यांचा आपल्या सभेला येणाऱ्या लाखो श्रोत्यांना थेट संदेश आहे. 

राज ठाकरेंच्या परिपक्व झालेल्या या वक्तृत्वाचं विश्लेषण मी करणार आहेच, पण त्या आधी या मागचं राजकारण बघूया. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेना यांच्यात थेट सामना होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे फारशी रंगतही नव्हती. पण अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅ. ओवैसींनी एन्ट्री घेतली आणि वातावरण बदलून गेलं. काँग्रेसशी समझोता करायला नकार देऊन अ‍ॅड. आंबेडकरांनी या आघाडीला अक्षरश: गॅसवर ठेवलं. साहजिकच आपली आघाडी मजबूत करण्याची गरज शरद पवारांना वाटली. त्यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घ्यावं, अशी सूचना काँग्रेस नेत्यांना केली. पवारांना प्रत्येक राजकीय नेत्याची ताकद नेमकी कळते.

राज यांचं आक्रमक वक्तृत्व, त्यांना मराठी तरुणांचा असलेला जोरदार पाठिंबा आणि शहरी मतदारसंघात असलेली त्यांच्या पक्षाची दीडेक लाख मतं यावर पवारांची नजर होती. पण कालबाह्य झालेल्या काँग्रेस नेत्यांना शरद पवारांचं हे चाणाक्ष गणित समजलंच नाही. किंवा समजूनही त्यांनी आपल्या कोषात राहणं पसंत केलं. राज ठाकरेंशी युती केली तर आपली उत्तर भारतीय मतं जातील अशी त्यांना भीती वाटली.

पण राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट होती. त्यांचा मुख्य शत्रू मोदी-शहा होता. त्यांची पाडव्याची सभा जबरदस्त झाली. मग मात्र काँग्रेस नेत्यांचा अहंकार गळून पडला. उलट, राजनी आपल्याकडे यावं म्हणून अशोक चव्हाणांपासून सुशीलकुमार शिंदेंपर्यंत सगळे काँग्रेसी गयावया करू लागले. आता निवडणुकीपर्यंत राज ठाकरेंच्या दहापेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात होतील. यातली प्रत्येक सभा प्रचंड होते आहे. राज ठाकरेंच्या भाषणाची धार सभेगणिक वाढते आहे. प्रत्येक सभेत ते एक नवं नाट्य उभं करत आहेत. साहजिकच याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल असा अंदाज आहे.

अडचण फक्त एकच आहे. मनसेच्या मतदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीचं बटण दाबायची सवय नाही. पण आपल्या नेत्याच्या आदेशामुळे मनसेचे कार्यकर्ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूनं प्रत्यक्ष प्रचारातही उतरले आहेत. ही मतं जर त्यांच्याकडे ट्रान्सफर झाली तर काँग्रेस-राष्ट्रवादीचं पारडं जड होऊ शकतं. आता येऊया राज ठाकरेंच्या भाषणशैलीकडे. राज ठाकरे आपल्या भाषणात ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशनचा वापर करत आहेत. त्याचा मोठा परिणाम श्रोत्यांवर होताना दिसतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्राचा वापर करणारा राज ठाकरे हा महाराष्ट्रातलाच नव्हे, तर देशातला पहिला राजकीय नेता असावा. या निवडणुकीतले विरोधी पक्षातले दुसरे प्रभावी वक्ते आहेत बॅ. ओवैसी. पण त्यांचा भर वक्तृत्त्वशैली आणि मुद्यांवर असतो. तेही श्रोत्यांना संमोहित करतात, पण ऑडिओ-व्हिज्युअलचा वापर त्यांनी आजवर केलेला नाही. राज ठाकरेंचं भाषण हा एका परीनं एकपात्री प्रयोगच आहे.

१९८८ पासून राज ठाकरेंना मी पाहतो आहे. ते सुरुवातीला विद्यार्थिसेनेत होते आणि मग शिवसेनेचे प्रमुख नेते झाले. १९८८च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी २५० ते ३०० सभा घेत महाराष्ट्र पिंजून काढला होता. एका बाजूला छगन भुजबळ आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे सेनेचा किल्ला लढवत होते. बाळासाहेब तर होतेच, पण त्या काळी उद्धव ठाकरे राजकारणातही नव्हते. राज बाळासाहेबांचे लाडके होते. त्यामुळे त्यांच्या पायात पाय घालण्याचा विचार दुसरा कोणताही शिवसेना नेता करू शकत नव्हता. सगळे जण राजनाच बाळासाहेबांचा खरा वारसदार मानत होते. 

राज यांचं संगोपन मातोश्रीवर बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या सहवासात झालं आहे. त्यामुळे व्यंगचित्रांपासून वक्तृत्वापर्यंत सगळी शैली त्यांनी बाळासाहेबांचीच उचलली आहे. सुरुवातीच्या काळात ते भाषण करत, तेव्हा तरुणपणीचे बाळासाहेबच बोलताहेत असं वाटत असे. त्यांची दुसऱ्याची खिल्ली उडवण्याची, विनोद-नकला करण्याची शैली किंवा ठाकरी भाषा आपल्या काकांकडून उचलली आहे.

आक्रमकपणा तर प्रबोधनकारांमध्येही होता. व्यासपीठावर उभं राहण्याची पद्धत, मधूनमधून रुमालाने तोंड पुसण्याची लकब बाळासाहेबांचीच आहे. पण आता भाषणाच्या बाबतीत राज ठाकरे बाळासाहेबांच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांचं भाषण मुद्देसूद असतं, त्यात विनोद असले तरी हल्ली त्याचा अतिरेक नसतो. नकलाही असतात, पण पूर्वीप्रमाणे त्या आता मुद्यांवर मात करत नाहीत.

जाहीर सभेत हातात कागदपत्रं घेऊन बोलण्याची पद्धत राज ठाकरेंनीच सुरू केली. ही मूळची जॉर्ज फर्नांडिस स्टाईल. आता भाषणाच्या वेळी राजसाठी माईकच्या बाजूला टेबल मांडलं जातं, त्यावर त्यांचे सहकारी अनिल शिदोरे कागदपत्रांच्या चळी रचून ठेवतात आणि मग भाषणाच्या दरम्यान त्यातला नेमका कागद त्यांच्या हाती देतात. याला व्हिडिओ क्लिप्सची जोड मिळाली आहे. शब्द आणि दृश्य यांचा प्रभावी संयोग त्यांच्या भाषणात असतो.

बाळासाहेबांप्रमाणे राज ठाकरेही उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणात व्यंगचित्रकलेचंही प्रतिबिंब असतं. बाळासाहेबांच्या भाषणात व्यंगचित्रकाराच्या मनातल्या प्रतिमा सहजपणे येत. (उदाहरणार्थ, ‘मैद्याचं पोतं’ बनलेले शरद पवार किंवा ‘डुकराच्या रूपा’तले आचार्य अत्रे). राज आपल्या भाषणात मोदी-शहा, फडणवीस, गडकरी यांचं जे काही चित्र रेखाटतात ती व्यंगचित्रकाराचीच ताकद आहे. एक प्रकारे ही गुंगवून टाकणारी मैफलच म्हणायला हवी. 

म्हणूनच एकदोन (भाजपधार्जिणे) अपवाद सोडता प्रत्येक मराठी न्यूज चॅनेल राज ठाकरेंचं भाषण संपूर्ण आणि लाईव्ह दाखवतं. इतर नेते यावर चिडतात, पण २९०७ पासूनच हा प्रकार सुरू आहे. कारण राज ठाकरे हे सर्वाधिक टीआरपी देणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी, केजरीवाल आणि काही प्रमाणात राहुल गांधी यांना हा टीआरपी मिळतो. डिजिटल माध्यमांच्या युगात श्रोत्यांना मैदानात खेचून आणण्याची करामत राज ठाकरे यांनी सातत्यानं करून दाखवली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच नव्हे, तर ज्यांना राजकारण करायचं आहे त्या सर्वांनाच राज ठाकरेंच्या वक्तृत्त्वापासून काही शिकता येईल.

गंमतीची गोष्ट म्हणजे, राज ठाकरेंना एरवी शिव्या घालणारी सेक्युलर मंडळीही या वेळी त्यांच्या प्रेमात पडली आहेत. अनेक हिंदी-इंग्रजी पत्रकार त्यांच्या भाषणाची वारेमाप स्तुती करत आहेत. त्यांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. कारण इतक्या प्रखरपणे कोणत्याही नेत्यानं मोदी-शहांवर आजवर हल्ला केला नव्हता. या हल्ल्यामुळे राज ठाकरे यांनी भाजपविरोधी मंडळींच्या मनाचा ठाव घेतला असला तरी त्यांची पूर्वीची मतं बदलली आहेत असं नाही.

मनसेच्या निर्मितीपासून भूमिकांचा गोंधळ राज ठाकरेंच्या मनात चालू आहे. अर्थात, त्यांना तो गोंधळ वाटत नाही. कारण कोणत्याही घटनेला उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया द्यायची सवय त्यांनी शिवसेनाप्रमुखांकडूनच घेतली आहे. ते गुजरातला गेले तेव्हा मोदींच्या विकासाच्या मॉडेलच्या प्रेमात पडले. मग हे मॉडेल बोगस आहे असं हळूहळू त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्यावर थेट हल्ला चढवायला सुरुवात केली.

बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरेंकडे लपवाछपवी नसते. जे आवडतं ते ते बोलून दाखवतात आणि जे आवडत नाही त्याला ठोकून काढतात. मनामध्ये राग ठेवण्याचा त्यांचा स्वभाव नाही. म्हणूनच टीकाकार त्यांचे कायमचे शत्रू कधीही होत नाहीत. या गोष्टीचा उपयोग भावी राजकारणात आपला राजकीय पाठिंबा व्यापक करण्यासाठी ते करतात का याकडे विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे. 

राज ठाकरे अशा प्रकारे जाहीर सभा घ्यायला का लागले, काँग्रेस-राष्ट्रवादीनं त्यांना काय आश्वासन दिलं हे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. भाजपवाले ते कुजकटपणे विचारताहेत, कारण राज यांच्या भाषणामुळे आपलं नुकसान होऊ शकतं याची भीती त्यांना वाटतेय. काही मोदीभक्त राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांत गरळ ओकत आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अशा एका भक्ताला सणसणीत प्रसाद दिला आणि त्याला उठाबशा काढून माफी मागायला लावली. कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीचं समर्थन मी करणार नाही. पण चेकाळलेल्या भक्तांना त्यांच्याच भाषेत असा धडा मिळाला तर मला वाईटही वाटणार नाही.

राज ठाकरे यांची ही शैली सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. ज्यांना त्याचा निषेध करायचाय त्यांनी तो जरूर करावा. पण सेना-भाजपनं कायम विरोधकांच्या अहिंसेचा आणि लोकशाहीचा गैरफायदा घेतला आहे हे विसरता येणार नाही. ‘महानगर’च्या काळात आमच्यावर एवढे हल्ले झाले, पण आम्ही हात उचलला नाही. २००९साली ‘आयबीएन लोकमत’वर शिवसैनिकांनी हल्ला केला तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ त्यातल्या काही जणांना चोपून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर ही सगळी मंडळी दयेसाठी माझ्यापुढे गयावया करू लागली. या प्रसंगातून माझ्यासारख्या अहिंसावाद्यालाही मोठा धडा मिळाला आहे. यापुढे सेना-भाजपवाले राज ठाकरेंबाबत तरी असा प्रकार करायला धजावणार नाहीत. 

राज ठाकरे यांच्या भाषणाचा परिणाम नेमका काय होतो हे निकालाच्या दिवशी, म्हणजे २३ मे रोजी कळेल. मात्र, गुढी पाडव्याच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीला १०-१२ जागा तरी मिळतील की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात होती. आता मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी १६ ते १८ जागांपर्यंत पोचेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे.

मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर आलेल्या बातम्या विचारात घेतल्या तर पुढच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीची परिस्थिती आणखी सुधारू शकते. याचं श्रेय जनतेच्या मनात मोदी सरकारबद्दल असलेल्या असंतोषाला तर आहेच, पण राज ठाकरेंच्या भाषणांनाही आहे. 

खरं राजकारण रंगणार आहे, ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी. शरद पवारांनी राज ठाकरेंना काही ठोस आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं. पवार राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या काही जागा मनसेला देऊ शकतात. अशा २५ ते ३० जागा मनसेला मिळाल्या तर त्यांचे आमदार विधानसभेत पुन्हा एकदा पोचू शकतात. मग पुढच्या राजकारणात राज ठाकरेंचा पत्ता निश्चितपणे महत्त्वाचा ठरेल. राज ठाकरे आणि मनसेच्या दृष्टीने ही नवीकोरी सुरुवात असेल.

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Thu , 18 April 2019


Dhananjay Bhosale

Thu , 18 April 2019

2019 ची निवडणूक रंजक बनविण्यात खरोखरच राज ठाकरेंचं मोठं योगदान आहेच पण दर्दी श्रोते तुमच्या बेधडक चर्चा पाहण्यापासून वंचित आहेत....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......