‘केसरी’ : विलक्षणरित्या हास्यास्पद आणि अतर्क्य चित्रपट
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘केसरी’चं पोस्टर
  • Sat , 23 March 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie केसरी Kesari अक्षय कुमार Akshay Kumar परिणीती चोप्रा Parineeti Chopra

अनुराग सिंग दिग्दर्शित ‘केसरी’ हा एक ऐतिहासिक घटनेवर आधारित युद्धपट आहे, अशी त्याची प्रसिद्धी केलेली आहे. मात्र तो इतिहासाशी कितपत प्रामाणिक आहे, आणि त्यात किमान स्वीकारार्ह ठराव्याशा युद्धपटात अपेक्षित असलेल्या किती चांगल्या बाबी आहेत, तर जवळपास नगण्य. असं होण्याचं कारण म्हणजे चित्रपटाला २१ शीख सैनिक विरुद्ध दहा हजार अफगाणी घुसखोर यांच्यातील ऐतिहासिक संघर्ष यापेक्षा अक्षय कुमार नायक म्हणून शोभेल, आणि त्याला शक्य तितका वाव मिळेल, हे साध्य करण्यामध्ये गरजेहून अधिक रस आहे. परिणामी धर्मनिरपेक्षता मानणारा, ‘अबला’ स्त्रियांना वाचवणारा नायक पडद्यावर दिसतो, इतर वीस शीख सैनिक मात्र इतिहासातील पानांमध्ये दुर्लक्षित राहणाऱ्या या घटनेप्रमाणेच दुर्लक्षित राहतात.

साल आहे १८९७, ब्रिटिशकालीन भारताच्या वायव्य प्रांतातील लष्करातील हवालदार ईशर सिंग (अक्षय कुमार) आणि त्याची तुकडी निवांत बसलेली असताना टेकडीच्या मागच्या बाजूला अफगाणी लोक आलेले दिसतात. त्यांचं नेतृत्व करणारा मुल्ला एका स्त्रीला आपल्या पतीच्या आज्ञा न मानता घरातून पळ काढल्यामुळे शिरच्छेद करण्याची शिक्षा सुनावतो. चित्रपटाचा नायक ईशर सिंग अफगाणी भाषा जाणत नसला तरी तिच्यावर ओढवणारी परिस्थिती त्याला कळते. त्याचा वरिष्ठ असलेला ब्रिटिश अधिकारी (या पिढीचा बॉब क्रिस्टो बनण्याच्या वाटेवर असणारा एडवर्ड सॉननब्लिक) त्याला काहीही न करता सदर घटनेकडे दुर्लक्ष करण्यास सांगतो. पण सिंग बंडखोर, स्त्रीदाक्षिण्य दाखवणारा आहे. मुख्य म्हणजे तो नायक आहे! वाईट अभिनय करणाऱ्या अतिरिक्त कलाकारांनी वेढलेल्या आणि त्याहून वाईट मेक अप केलेल्या, चेहऱ्यावर जखमा असलेल्या अबला स्त्रीचा तो एकमेव सहारा आहे! मग काय, तो वरिष्ठाचा आदेश धुडकावून त्यांच्याशी लढतो. त्याचे इतर सहकारीही नंतर त्याला मदत करतात. पण हे सत्तेच्या हव्यासापुढे आंधळ्या झालेल्या (किंवा खरं सांगायचं झालं तर दोन धर्मांमधील तणाव टाळू पाहत तार्किकदृष्ट्या विचार करणाऱ्या) ब्रिटिशांना कसं कळणार! परिणामी ईशर सिंगची बदली करून त्याला त्यामानानं शांत असणाऱ्या सारागढ़ी किल्ल्यावर रवाना केलं जातं. पुढे इथेच दहा हजार अफगाणी हल्ला करतात, ज्यात लढताना ईशर सिंग आणि इतरही सैनिक शहीद होतात.

हे एकूण प्रकरण लक्षात घेता मूळ सारागढ़ी युद्ध हे एकूणच साहस आणि पराक्रमाचं उत्तम उदाहरण असलं तरी चित्रपटात मात्र ते अगदीच उथळ स्वरूपात दिसून येतं. ज्यात केवळ तांत्रिक पातळीवरील चुका ते इतिहासापासून घेतलेली फारकत हे सगळं काही येतं. एकतर चित्रपट अगदीच हास्यास्पद आणि अतर्क्य रूपात समोर मांडला जातो. ज्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे ईशर सिंगच्या निधर्मी दृष्टिकोनाच्या अगदी विरोधाभासी रूपात धार्मिक युद्ध रंगवलं जातं. परिणामी चित्रपटाचा उद्देश शौर्याचं चित्रण यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्याच्या पातळीवर कोण (अधिक) चूक आणि कोण (अधिक) बरोबर, अशा पारंपरिक स्वरूपाच्या नायक-खलनायकी संघर्ष रेखाटणं हा बनतो.

बरं, हे करण्यातही ना नाहीच. कारण जर दुसऱ्या महायुद्धाचा विचार केला तरी नाझी जर्मनी साधारणतः खलभूमिकेत दिसून येतेच. पण किमान हे चित्रण तरी उथळ असायला नको. पण या चित्रपटाला धड हेही नीट साध्य करता येत नाही. मुळात त्याचं नायकत्व आणि शौर्य याविषयीच्या संकल्पना केवळ एका व्यक्तीभोवती फिरणाऱ्या असल्यानं इतर सहाय्यक (असण्याची अपेक्षा असलेल्या) पात्रांना तसा वाव आणि न्याय मिळत नाही. मग तथाकथित खलनायक तर दूरच राहिले.

‘केसरी’ ऐतिहासिक चित्रपटाच्या आवरणाखाली सध्याच्या काळाहून वेगळा भासत नाही, यामागे धर्मयुद्ध हे एक कारण झालं. पण दुसरं त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे तो ऐतिहासिक चित्रपट किंवा युद्धपट यापेक्षा अक्षय कुमारच्या ‘सिंग इज किंग’ किंवा तत्सम चित्रपट मालिकेतीलच एक फार्सिकल प्रकार भासतो. चित्रपटाचा पूर्वार्ध तर अगदी या चित्रपट मालिकेत आढळणाऱ्या वैचित्र्यपूर्ण विनोदी शैलीत उभा राहतो. शूर असणं अपेक्षित असलेले शीख सैनिक हे दिग्दर्शक प्रियदर्शन किंवा अनीस बाझमीच्या चित्रपटातील सहाय्यक भूमिकांतील विनोदी कलाकार अधिक भासतात. (त्यांच्या चित्रपटातील नेहमीचा अभिनेता असलेला अक्षय कुमार इथंही असल्यानं तर हे अधिकच जाणवतं.) कुणी अंतर्वस्त्रात वावरत आहे, तर कुणी लग्न न झाल्याच्या दुःखात आहे. अर्थातच त्यांचा वरिष्ठ असलेला अक्षय कुमार आणि हे लोक मिळून विनोदी चित्रपटाहून जरा कमी, पण युद्धपटात असतात त्याहून बरेच जास्त ‘पंच’ मारतात.

‘केसरी’ जागतिक स्तरावरील बरेच चित्रपट आणि मालिकांमधून (अनपेक्षितपणे) प्रेरणा घेतो असं मानता येतं. त्यातही पुन्हा नोलन बंधूंकडून तर जरा अधिकच. ईशर सिंगचं गाव, अफगाणी लोकांची वस्ती आणि पडद्यावर दिसणारा वायव्य प्रांत ‘वेस्टवर्ल्ड’च्या सेटप्रमाणे (पण खरेपणाचा अभाव असलेला) भासतो. अक्षय कुमारला दिसणारी परिणीती चोप्राची स्मृती (की भूत?!) म्हणजे जणू ‘इन्सेप्शन’च! हो, आता तिथं अभाव असलेली नायक-नायिका गात असलेली गाणी इथं असली म्हणून काय झालं, शेवटी भावना महत्त्वाच्या.

याशिवाय क्लिंट इस्टवुड दिग्दर्शित ‘अमेरिकन स्नायपर’ ज्यापुढे तोकडा पडेल, अशी दृश्यं असलेला प्रकारही यात आहे. अलीकडे ऐतिहासिक पार्श्वभूमीवर घडणाऱ्या चित्रपटांमध्ये समलैंगिकतेच्या छटा असणारी पात्रं आणि त्यावर आधारित विनोद करण्याची सवय हिंदी चित्रपटांना लागली आहे. ‘फिरंगी’पासून ते ‘पद्मावत’पर्यंत आणि आता इथंही हे दिसून आलं आहे. मुख्य प्रवाहातील भारतीय लेखक-दिग्दर्शकांची ही असंवेदनशीलता तर्क आणि कल्पनेबाहेरची आहे. जी समलैंगिक संबंधांना मुख्य प्रवाहात आणू पाहणाऱ्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’सारख्या प्रयत्नांचं अवमूल्यन करणारी आहे.

दिग्दर्शक अनुराग सिंगच्या चित्रपटांची यादी मोठी असली तरी दिग्दर्शकीय हाताळणी मात्र किमान स्वीकारार्ह ठरणारा चित्रपटही निर्माण करू शकेल अशी नाही. चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स हे अगदीच सुमार दर्जाचे आहेत. इतके की ‘मणिकर्णिका’ यापुढे बरा वाटेल! हिंसेचा भडिमार केलेला असला तरी अनेकदा ती अतर्क्य आणि हास्यास्पद ठरेल अशी आहे. मात्र चित्रपटाचा मूळ उद्देश ती हास्यास्पद ठरावी असा नसल्यानं ती चित्रपटाची आणखी एक कमकुवत बाजू मानता येईल.

एकूणच ‘केसरी’ हा त्याच्या उथळ पार्श्वसंगीत आणि मांडणीमुळे हास्यास्पद ठरणारा चित्रपट आहे. त्याची वाढलेली लांबी (एकूण लांबी अडीच तास) तर त्याला असहनीय बनवण्यात अधिक भर घालते. तो ही लांबी सहन करावा इतपत चांगला नाही हे तर नक्की आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......