भाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Thu , 21 March 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi चौकीदार Chaukidar

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांनी केलेला वार सव्याज परत करतात, असा मोदीभक्त आणि आश्रित माध्यमांचा कौतुकमिश्रित दावा असतो. कुठलाही भक्त हा अंधच असतो. पण माध्यमं जेव्हा समूल्य भक्त होतात, तेव्हा विश्लेषण, चिकित्सा, दुसरी बाजू, प्रत्यक्ष वास्तव यांना फाटा दिला जातो. आणि मग उरतो तो फक्त हरिनामाचा टाळकुटा गजर.

१२ वर्षं गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी आपण लहानपणी चहा विकत होतो, हे सांगितलं नाही. मुंबईत राजस्थानी चहावाले असतात, दिसतात. त्यांना ‘भट’ म्हणतात. गुजराती चहावाला महाराष्ट्रात तरी अभावानंच (असलाच तर) असावा. २०१४च्या निवडणुकीत ‘चायवाला’ म्हणवून घेऊन मोदींनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून घेतली. त्यात फाटक्या तोंडाच्या मणिशंकर अय्यरांनी ‘चायवाला काय पीएम होणार?’ असं म्हटलं आणि मोदींसह त्यांच्या भक्तांचे ‘रुदाली ग्रूप’ सक्रिय झाले. ‘चायवाला म्हणजे छोटा स्वयंउद्योजकाचा अपमान’ वगैरे म्हणत ‘चाय पे चर्चा’ ही ‘स्लोगन’ संघ, भाजपच्या आवडत्या यमकजुळणी कारखान्यातून बाहेर पडली.

हिंदी सिनेमाच्या वरताण या ‘चायवाला’ स्टोरीत त्या वेळी छोटा नरेंद्र जवानांना चहा देत असे, हेही जोडलं गेलं. दरम्यान कुठल्या तरी एका रिपोर्ताजमध्ये मुळात ते साल कुठलं? त्या साली ते स्टेशन तरी अस्तित्वात होतं का इथपासून मोदींच्या तत्कालीन शेजाऱ्यांच्या मुलाखतीतून वेगळंच वास्तव समोर आलं. ठेला होता, पण नरेंद्र कधीच मदतीला जात नसे. आई चिडत असे. अर्थात आश्रित माध्यमांना हे वास्तव कसं दाखवता येईल?

कल्पना करा आश्रित माध्यमांना त्या ‘चायवाला’ कथेचे काही धागेदोरे, काही अवशेष मिळाले असते, तर त्यांनी त्याचं पर्यटनस्थळ नसतं केलं? पण ‘चायवाला’ कौतुक चालूच राहिलं!

आज नेतृत्व करणारे अनेक जण गरिबीतून आलेत. छगन भुजबळ भाजी विकायचे. सुशीलकुमार शिंदे कोर्टात शिपाई होते. लालूप्रसाद यादव तर इतक्या गरिबीत होते की, वेळप्रसंगी उंदीर भाजून खात. अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांच्या या अशा गरिबीच्या कहाण्या आहेत. पण ते ज्या जाती, धर्म, प्रदेशातून जन्माला आले, तिथला ८०-९० समाज त्याच परिस्थितीत जगत असे आणि उत्कर्षासाठी धडपडत असे. त्यामुळे कुणी कधी ते बिरुद म्हणून लावलं नाही. शिवसेनेत तर ९० टक्के नेतृत्व अशा गरिबीतलंच सापडेल. प्रमोद महाजन, मनोहर जोशींसारखे गरीब ब्राह्मणही परिस्थितीचे चटके सोसत पुढे आले होते. असो. आपल्या गरिबीचं भांडवल करण्याची मनोवृत्ती ही एक वेगळी कला आहे!

हे ‘चायवाला’ प्रकरण तेजीत असतानाच कधी तरी प्रियांका गांधी ‘मोदी नीच (वृत्तीने) आहेत’ असं म्हणाल्या. कारण त्या दरम्यान मोदी ‘माँ-बेटे की सरकार’, ‘शहजादे’ वगैरे सातत्यानं बोलत असत. मोदींनी ‘नीच’वृत्तीला ‘नीच’ जातीत बदललं. आणि पुन्हा ‘रुदाली ग्रूप’ अॅक्टिव्ह झाला... ‘मी मागास जातीचा. तेली. म्हणून त्या असं म्हणाल्या...’

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द करताना मोदींना कधी मी तेली, मागास जातीचा, हे सांगायची वेळ आली नव्हती. पण हेही त्यांनी या निमित्तानं वाजवून घेतलं. मोदींकडे विद्यापीठीय पदवी आहे, पण भाषाशिक्षणात ते कच्चे असावेत किंवा भाषा वाकवण्यात वाकबगार! आता मागास जातीचे कमी का लोक राजकारणात, नेतृत्वात आहेत? शिवाय जातीयवादी बोलण्याचा गांधी घराण्याचा इतिहास नाही. तरीही मोदींनी व्यवसायानंतर जातीचं भांडवल केलं. या ‘रुदालीपणा’ला जर कुणी ‘पलटवार’ म्हणत असेल तर मग प्रश्नच मिटला!

कृतक विनम्रता, नाटकी हावभाव आणि प्रसंगी अवैज्ञानिक, अनैतिहासिक उदाहरणं आणि सपशेल खोटं बोलणं ही मोदींच्या अखंड भाषणबाजीची व्यवच्छेदक लक्षणं आहेत. पण मोदी आणि मोदी सरकार यांची समीक्षाच करायची नाही, असं एकदा आश्रित आणि भयभीत माध्यमांनी ठरवल्यावर, मग ही सगळी भांडाफोड होणार कशी? ‘धोरणलकवा’ वगैरे नवनवीन शब्दसमुच्चय शोधणाऱ्यांचीही गेल्या पाच वर्षांतच ‘सोयीस्कर बोलती बंद’ पाहायला मिळाली!

‘मी पंतप्रधान नाही, तर चौकीदार आहे’, असा एक आणखी विनम्रभाव प्रचार काळात मोदींनी पसरवला. लोकांनाही ही प्रतीकात्मकता आवडली. देश माझ्या हाती सुरक्षित या अर्थानं किंवा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवेन इ. इ.

प्रत्यक्षात काय झालं? युपीए काळापासून राष्ट्रीयकृत बँकांकडून हजारो कोटींची कर्जं घेऊन नंतर ती न फेडता कर्जावर कर्ज घेत आणि शेवटी दिवाळखोरीत जात, तरीही बाकी आयुष्यात निलाजऱ्या रंगरलिया करणारा मद्यसम्राट विजय मल्ल्या अर्थमंत्र्यांना भेटून नंतर ३०-४० सुटकेस भरून सरळ भारताबाहेर पळाला.

या आधी असाच एक गैरव्यवहारी खेळाडू ललित मोदी पळाला होताच. त्याला नंतर वसुंधरा राजे, सुषमा स्वराज यांची हस्ते-परहस्ते मदतही मिळाली.

त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे दोन ‘हिरे’ परदेशी पळाले.

यातला ललित मोदी वगळता इतरांच्या प्रत्यार्पणाच्या वाटाघाटी चालू आहेत. पण त्यात तिथल्या न्यायालयाचा न्याय काय होतो, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

त्यानंतर आलं राफेल प्रकरण. दै. ‘हिंदू’नं त्यावर पुराव्यानिशी कागदपत्रं प्रसिद्ध केली.

सरकारनं आधी सर्वोच्च न्यायालयात कॅग अहवालाबाबत चुकीची माहिती दिली. त्यावर दुरुस्तीसाठी अपिल केलं.

त्यानंतर अॅटर्नी जनरलनं भर न्यायालयात फाईल चोरीला गेली असं सांगितलं. दोन दिवसांनी जीभ चावत सांगितलं की, फाईल नाही, फाईलच्या चोरून झेरॉक्स काढल्या!

आता यात फाईल्स चोरून झेरॉक्स काढल्या, की फाईल्सच्या चोरून झेरॉक्स काढल्या, यावर युक्तीवाद होऊ शकतो!

या झाल्या ठ‌ळक घटना. आता इतकं घडल्यावर ‘चौकीदारी’वर कुणी बोट ठेवलं तर उत्तर काय? टुजी, थ्रीजी, कोळसा खाण घोटाळा उपसून काढणारी २०१३-१४ मधली माध्यमं जाहिरातींचा मलिदा आणि मालकांचा दट्ट्या खाऊन गपगुमान बसली! अगदी आजही. त्यात राहुल गांधी ‘चौकीदार चोर है’ म्हणाले. आता त्यांचंही भाषा शिक्षण बेतास बेत असल्यानं किंवा वयोमानपरत्वे जोश किंवा पप्पू म्हणून हिणवल्याचा राग म्हणा ते असे थेट एकेरीवर आले. त्यांना ‘कुंपणच शेत खातं’ वगैरे सालंकृत काही सुचले नसावं! किंवा त्यांना करण जोहरच्या संवादापेक्षा अनुराग कश्यपचे संवाद यासाठी प्रभावी वाटले असावेत.

तीन राज्यातल्या विजयानंतर राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है’चा जाळ देशभर केला. इतका की मनसेच्या सभेत या घोषणा तर झाल्याच, पण आता कुशीत जाऊन बसलेले नेमस्त उद्धव ठाकरे यांनीही एक-दोनदा ‘चौकीदार चोर है’ असं म्हणून घेतलं. आता कदाचित ते ‘मेरा भाई चौकीदार’ किंवा ‘पडोसी चौकीदार है’ किंवा ‘चौकीदार जैसा कोई नहीं’ म्हणतील!

काही लहान मुलं बघा, त्यांना मारायला हात वा पट्टी उगारायचा अवकाश, ती आधीच भोकाड पसरायला सुरुवात करतात. आता विरोधी नेता बोलला ‘चौकीदार चोर है’ तर दुर्लक्ष करायचं. पण नाही. मनमोहनसिंगांना विद्यमान चौकीदार ‘मनमौन’ म्हणायचे! पितामह अडवाणींनी तर त्यांना (मनमोहनसिंगांना) ‘निकम्मा’ म्हटलं होतं. पण सभ्य, सुसंस्कृत मनमोहनसिंगांनी कशाचाच पलटवार केला नाही. ते त्यांना शोभेलसं वाक्य म्हणाले, ‘माझ्या कामाची दखल, नोंद इतिहास घेईल!’

तर ‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली! स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं! त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे!

याच्यापुढचं नाटक म्हणजे एकतर्फी संवाद खऱ्याखुऱ्या ‘चौकीदारां’शी! संवाद काय केला? तर ‘बघा तुम्ही आम्ही चौकीदार आणि ते म्हणताहेत चौकीदार चोर है! आहात का तुम्ही चोर?’ चोराच्या उलट्या बोंबा आणि वडाची साल पिंपळाला असे दोन खेळ एकाच तिकिटात!

आज जेव्हा रणजितदादा मोहिते पाटलांचा प्रवेश झाला, तेव्हा वाटलं होतं, उपरण्यासोबत भगवा शर्ट आणि हिरवी पँट असलेला ‘चौकीदारा’चा गणवेशही देतात की काय!

लहानपणीच्या खेळात लोकप्रिय असलेला ‘रडीचा डाव’ चक्क देशाच्या राजकारणात ‘पोरखेळ’ म्हणून खेळला जाईल, असं कधी वाटलं नव्हतं.

आता या निवडणुकीत ‘चौकीदार’ काय नवा व्यवसाय शोधतात, हे पाहणं रंजक राहिल.

ते म्हणू शकतील ‘काळ्या पैशावर सर्जरी करणारा मी तुमचा सर्जन’ किंवा ‘शत्रूवर बॉम्ब टाकणारा मी पायलट फायटर’ किंवा ‘सर्व व्यवस्थेची सफाई करणारा झाडूवाला’, ‘तुमची वस्तू थेट तुमच्यापर्यंत पोहचवणारा कुरिअरवाला’, ‘तुमचं आरोग्य शक्तिवर्धक करणारा दूधवाला’, ‘जगाची माहिती देणारा पेपरवाला’, ‘योग्य जागी पोहचवणारा रिक्शावाला’, ‘रोज भाषण, तेही साभिनय करून तुमचं मनोरंजन करणारा नौटंकीवाला’…

‘सर सलामत तो पगडी पचास’प्रमाणे ‘अहम् (इगो) सलामत तो बिरुदे पचास’!

एका राजकीय पक्षाची ‘स्वयंसेवक ते कबाडीवाला व्हाया चौकीदार’ अशी सर्व्हिस प्रोव्हायडर एजन्सी व्हावी, हे गमतीशीर नाही तर केविलवाणं आहे!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................