‘छत्रपती शासन’ : प्रबोधनावर जास्त भर दिल्यानं मनोरंजनाची बाजू खचली आहे!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘छत्रपती शासन’चं पोस्टर
  • Tue , 19 March 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie छत्रपती शासन Chatrapati Shasan

सर्वसामान्य माणसाचं इतिहासाबद्दल असणारं अज्ञान समाजात कलह निर्माण करत असतं. अशा वेळी समाजातील बुद्धिवादी वर्गानं इतिहासाचं खरं रूप समाजापुढे मांडलं पाहिजे. या वर्गाचं ते कर्तव्य असतं. समाज खोट्या इतिहासाला कवटाळून बसलेला असताना त्यांच्यासमोर खरा इतिहास मांडून इतिहासाचा अन्वयार्थ लावला पाहिजे. जेणेकरून इतिहासाच्या नावावर प्रस्थापित वर्गाला राजकारण करता येणार नाही आणि सामाजिक एकोपा टिकून राहील. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रत्येकानं भूतकाळाकडे डोळे उघडे ठेवून पाहायला हवं. हेच सांगण्याचा प्रयत्न खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित ‘छत्रपती शासन’ हा सिनेमा करतो.

सिनेमाची कथा इतिहासाची उकल करू पाहते. भूतकाळाचं ओझं होऊ न देता, वर्तमानाच्या पटलावर खरा इतिहास तर्काच्या आधारे मांडू पाहते. त्या अर्थानं हा सिनेमा कालसुसंगत ठरतो. मात्र तांत्रिक पातळीवर सिनेमा कमकुवत आहे. उत्तम सिनेमा निर्माण करण्यासाठी नुसता तगड्या कलाकारांचा चमू पुरेसा नसतो, तर त्याचबरोबर सिनेमाची कथा आणि सिनेमात वापरलेलं तंत्रज्ञानदेखील महत्त्वाचं असतं. ही बाजू या सिनेमाला पुढे जाऊ देत नाही.

वाढती जातीय-धार्मिक कट्टरता आणि त्यात भरडला जाणारा वर्ग, या विषयावर बोट ठेवून इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांवर या सिनेमातून चपराक ओढली आहे. इतिहासातल्या महापुरुषांच्या नावे होणारं राजकारण आणि त्यातला फोलपणा दिग्दर्शकानं ठामपणे मांडला आहे. सामाजिक वास्तव मांडत असताना, त्याला दिलेली आदर्शाची जोड सिनेमाला भरभक्कम स्थितीत घेऊन जाते. सिनेमाची कथा त्यामुळे कालसुसंगत ठरते.

जातीय अभिमान सगळीकडे पसरला आहे. ही मानसिकता एका जातीत नाहीतर सगळ्याच जातीत कमी-अधिक प्रमाणात दिसते. हेच हेरून महापुरुषांची जातीत होणारी वाटणी सिनेमात प्रभावीपणे मांडली आहे. सिनेमात जातीय उतरंड आणि सामाजिक वास्तवाची ज्वलंत कहाणी मांडलेली आहे. त्याचबरोबर एका टप्प्यानंतर आदर्शवादी समाजाची निर्मिती होईल, असा आशावाददेखील दिग्दर्शकानं मांडला आहे. त्यामुळे सिनेमाची कथा अनेक घटनांच्या बेरीज-वजाबाकीच्या मिश्रणातून तयार झालेली आहे.

सामाजिक विषयाला सिनेमाद्वारे हात घातला आहे. त्यामुळे मनोरंजन हा भाग जवळपास मागे पडतो. निव्वळ प्रबोधनाची भूमिका सिनेमा मांडत असल्यानं तो काहीसा नीरस वाटते. सिनेमातले संवाद प्रभावी नाहीत. कलाकारांचा अभिनयही सिनेमाची दुसरी खचलेली बाजू. तर कॅमेरा आणि संगीत यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे सिनेमा पुढे सरकत नाही.

सिनेमाच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात कथा अखंड राहत नाही. कथेला एकसंध करण्याच्या प्रयत्नात सिनेमाची एकूण मांडणी बाजूला राहते. आणि मध्येच सुरू होणारी कथा सिनेमाची मजा हिरावून घेते. मराठी सिनेमामध्ये असे प्रयोग अधूनमधून होत राहतात. मात्र या प्रयोगाची पडद्यावरची मांडणी सिनेमाला परिणामकारक होऊ देत नाही. विषय गंभीर आहे आणि तितकाच वास्तववादीही. मात्र विषयाची सूत्रबद्ध पद्धतीनं मांडणी करण्यात दिग्दर्शक आणि टीम कमी पडली आहे.

सिनेमाची कथा गावगाड्यात होणाऱ्या राजकारणाची आहे. जातीआधारित केल्या जाणाऱ्या राजकारणाला महापुरुषांची ‘लेबलं’ लावून सत्ता मिळवणाऱ्या अभिजन पुढारी वर्गाची ही कथा आहे. महापुरुषांचं स्मरण जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त धांगडधिंगा करण्यापुरतं केलं जातं. मात्र त्यांचे विचार समजून घेतले जात नाहीत. हीच शोकांतिका सिनेमाच्या कथेचं गृहीतक आहे. मात्र हे गृहीतक सिद्ध करण्यात सिनेमाची टीम कमी पडल्याचं जाणवतं.

संतोष जुवेकर, मकरंद देशपांडे, किशोर कदम, प्रशांत मोहिते, अभिजीत चव्हाण, अशी तगडी कलाकार मंडळी अभिनयाच्या बाबतीत कमी पडतात. किशोर कदम यांच्या अधूनमधून येणाऱ्या अर्थपूर्ण कविता प्रभावी आहेत. बाकी इतर कलाकारांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत, मात्र त्या एकूण सिनेमात फारशा प्रभावी ठरत नाहीत.

थोडक्यात सामाजिक विषयाला हात घालताना प्रबोधनावर जास्त भर दिल्यानं सिनेमाची मनोरंजनाची बाजू खचली आहे. सिनेमा एका समान आणि पूरक रेषेत चालत नाही. त्यातले चढउतार उत्सुकता टिकवून ठेवत नाहीत. एका बाजूला सिनेमा भरकटत जातो, तर दुसऱ्या बाजूला गंभीर विषय मांडू पाहतो. दोन्ही पातळीवर दिग्दर्शकाची चाललेली धडपड सिनेमाचं वर्तुळ पूर्णत्वास पोहचू देत नाही. 

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......