‘कॅप्टन मार्व्हल’ : मार्व्हलला स्त्री सुपरहिरो मिळो न मिळो, जगाला मात्र प्रभावी स्त्री सुपरहिरो मिळाली!
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘कॅप्टन मार्व्हल’चं पोस्टर
  • Sat , 09 March 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie कॅप्टन मार्व्हल Captain Marvel

‘कॅप्टन मार्व्हल’चा एक चित्रपट म्हणून विचार करत असताना ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ (एमसीयू) आणि त्याचा भलामोठा पसारा यांनाही विचारात घेणं महत्त्वाचं ठरतं. हा ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मधील एकविसावा चित्रपट आहे. आणि एकवीस चित्रपटांच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या कथानकातून निर्माण झालेलं हे विश्व आता येत्या ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’च्या निमित्ताने शेवटाकडे प्रवास करत आहे. हे विश्व आता अशा ठिकाणी येऊन पोचलं आहे की, ‘अँट-मॅन अँड द वास्प’सारखे चित्रपट केवळ दोन चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान जागा भरून काढण्याचं आणि पुढच्या चित्रपटाचा (किंवा एका मोठ्या स्वरूपावर पहायचं झाल्यास एमसीयूचा) एखादा धागा पोस्ट-क्रेडिट आणि मिड-क्रेडिट दृश्यांमध्ये दाखवण्याचं माध्यम म्हणून वापरले जात आहेत. तरीही ते मार्व्हलच्या किमान मनोरंजक ठरण्याच्या स्तरावर खरे उतरतात. ‘कॅप्टन मार्व्हल’बाबतही तो एमसीयूच्या रांगेतील केवळ आणखी एक चित्रपट असल्याचं मान्य केलं तरी मूळ चित्रपट पाहताना तो पाडत असलेला प्रभाव या सगळ्या ऐहिक गोष्टी विसरून जायला लावणारा ठरतो.

‘कॅप्टन मार्व्हल’चा एकूणच प्रभाव हा मुळातच व्यामिश्र भावना निर्माण करणारा ठरतो. कारण तो एकीकडे मार्व्हलच्या रंजकतेच्या परिमाणांवर खऱ्या उतरणाऱ्या जेनेरिक सुपरहिरो ओरिजिन कथेप्रमाणे काम करतो, तर दुसरीकडे कथानकाच्या पातळीवर अपारंपरिक तऱ्हेनं प्रवास करतो. ज्यात थेट येणाऱ्या पॉप-कल्चर संदर्भांपासून ते इतर चित्रपटांच्या अप्रत्यक्ष प्रभावापर्यंत सगळं काही दिसून येतं.

यॉन-रॉगकडून (ज्यूड लॉ) आपल्या शक्तींवर नियंत्रण करण्याचं प्रशिक्षण घेत असलेली वियर्स (ब्री लार्सन) ही यापूर्वी ‘गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी’मध्ये (२०१४) दिसलेल्या क्री लोकांपैकी एक आहे. आपल्या भूतकाळाविषयी अनभिज्ञ असलेली वियर्स क्री आणि स्क्रल्समधील युद्धजन्य परिस्थितीदरम्यान सी-५३ या ग्रहावर अर्थात पृथ्वीवर येऊन पोचते. ज्याद्वारे तिचं या ग्रहाशी असलेलं नातं, तिचा भूतकाळ तिला माहीत होत जातो. पृथ्वीवर आल्यावर तिचा संपर्क निकोलस एजंट फ्युरीशी (सॅम्युएल एल. जॅक्सन) होतो. ज्याद्वारे तिची जुनी सहकारी मारिया (लाशना लिंच) आणि गूज नामक एक भन्नाट मांजर यांच्याशीही तिची पुनर्भेट होते. तिच्या या आत्मशोधाच्या आणि कॅप्टन मार्व्हल बनण्याच्या प्रवासाला सुरुवात होते.

मार्व्हलचं हे विश्व अगदी सहजपणे ‘गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी’च्या आधीचं आणि त्यानंतरचं अशा दोन प्रकारे विभागात येऊ शकतं. कारण ‘गार्डियन्स…’ मालिकेतील दोन्ही चित्रपटांचा आणि त्यांचा दिग्दर्शक जेम्स गनच्या वैचित्र्यपूर्ण शैलीचा न पुसता येणारा प्रभाव २०१४ नंतरच्या इतर मार्व्हल चित्रपटांवर दिसून येतो. ‘कॅप्टन मार्व्हल’चा तर गार्डियन्सच्या विश्वाशी थेट संबंध असल्यानं तर हे अधिकच ठळकपणे जाणवतं. ज्यामुळे यातील विश्वनिर्मितीपासून ते विनोदापर्यंत बऱ्याच गोष्टी गार्डियन्सप्रमाणे काम करतात. याखेरीज ‘मेन इन ब्लॅक’पासून ते इतरही बऱ्याच चित्रपटांच्या प्रभावाचीही जाणीव होते. लार्सन आणि जॅक्सनमधील केमिस्ट्री हे यामागील मुख्य कारण मानता येऊ शकतं.

लार्सनच्या मुख्य भूमिकेतील निवडीपासून ते तिच्या देहयष्टीपर्यंत अनेक गोष्टींवर टीका झालेली असली तरी ती मात्र तिची निवड सार्थ ठरवते. एव्हाना मार्व्हलच्या विश्वातील इतर सगळे स्त्री-पुरुष सुपरहिरो स्थिरस्थावर झालेले असताना इतक्या उशिरा येऊनही त्या सर्वांइतकंच प्रभावी ठरत जिचा जयघोष करावा अशी एक नायिका कॅप्टन मार्व्हलच्या रूपात पहायला मिळते, याचं श्रेय लेखक-दिग्दर्शकांसोबतच लार्सनलाही जातं. तर ९० च्या दशकात दिसायचा तसा दिसणारा, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून तरुण बनवलेला जॅक्सन आताच्या मार्व्हल चित्रपटांत असतो त्याहून अधिक बोलघेवडा आणि विनोदी असलेला एजंट फ्युरी साकारतो. ९० च्या दशकातील लोकप्रिय गाणी गाणारा, लोकप्रिय चित्रपटांचे संदर्भ देत बोलणारा फ्युरी अगदी खंबीरपणे लार्सनच्या बाजूनं उभा राहतो.

सदर चित्रपटाचं रंगपटल नितांतसुंदर असून बेन डेव्हिसचं छायाचित्रण अगदीच नेटकं आहे. अॅना बोडन आणि रायन फ्लेक या लेखक-दिग्दर्शक द्वयीचं दिग्दर्शनही प्रभावी आहे.  

‘कॅप्टन मार्व्हल’मधील स्त्रीवाद हा डीसीच्या ‘वंडर वुमन’प्रमाणे (२०१७) अंगावर येणारा नाही. त्याचं अस्तित्त्व चित्रपटात आहे, आणि तो अपवादात्मक परिस्थिती वगळता अगदी सूक्ष्मपणे टिपलेल्या निरीक्षणांतून दिसणारा आहे. म्हणजे जेवण झाल्यावर वियर्स आणि फ्युरी दोघेही सिंकसमोर थांबून काव्यशास्त्रविनोद करत प्लेट धुताना दिसतात किंवा त्याआधी कधीतरी मारिया वियर्सशी बोलताना स्त्री वैमानिकांना काही गोष्टी करणं नाकारलं जात असण्याच्या काळात आपण त्याच निषिद्ध मानल्या जाणाऱ्या गोष्टी केल्याचा उल्लेख करते. आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशीच सदर चित्रपट प्रदर्शित झाला, हे सूक्ष्मतेचं लक्षण नसेलही, पण ‘ग्रेटर गुड’साठी तेही एखाद्या दिवशी चालवून घ्यायला हवं. कारण सद्यपरिस्थितीत तिचं अस्तित्व जाणवणंही महत्त्वाचं वाटतं.

तसं पाहता ‘कॅप्टन मार्व्हल’ ‘वंडर वुमन’ला व्यावसायिक पातळीवर आव्हान देण्यासाठी आहे हे स्पष्ट असलं तरी त्यामागील व्यावसायिक कारणं पहायची की, पडद्यावरील प्रभाव, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. इथं तरी नंतरचा पर्याय अधिक योग्य वाटतो. ज्यामुळे मार्व्हलला व्यावसायिक पातळीवर यशस्वी अशी एक स्त्री सुपरहिरो मिळो अथवा न मिळो, जगाला मात्र एक प्रभावी स्त्री सुपरहिरो मिळाली आहे एवढं नक्कीच म्हणता येईल. कारण तसंही पूर्वी कधीतरी प्रक्षिक्षणादरम्यान ऐकलेल्या ‘दे आर नॉट गोना लेट यू फ्लाय’ या वाक्यांना खोटं ठरवत, सर्वांच्या नाकावर टिच्चून अवकाशात भरारी घेणारी ‘कॅप्टन मार्व्हल’ जर आदर्श नसेल तर कोण असणार?

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................