‘दारिद्र्याच्या शोधयात्रे’त मला भेटलेल्या महिला...
अर्धेजग - महिला दिन विशेष
हेरंब कुलकर्णी
  • ‘दारिद्रयाची शोधयात्रा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि या शोधयात्रेतल्या काही महिला
  • Fri , 08 March 2019
  • अर्धे जग women world जागतिक महिला दिन International Women's Day दारिद्रयाची शोधयात्रा Daridryachi Shodhyatra हेरंब कुलकर्णी Heramb Kulkarni

महिला दिनाच्या दिवशी महिलांच्या प्रश्नावर चर्चा होते. दुर्दैवाने बोलका वर्ग असलेल्या महिला या जास्त मध्यमवर्गात असल्याने महिलांच्या प्रश्नाची जास्त चर्चा ही मध्यमवर्गीय परिघात फिरत राहते. उपेक्षित वर्गातील महिलांचे प्रश्न या दिवशी फारशे चर्चिले जात नाहीत.

मागील वर्षी मी महाराष्ट्रातील दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी २४ जिल्ह्यातील १२५ गावांना भेटी दिल्या. त्या निरीक्षणावर आधारित ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ (समकालीन प्रकाशन) हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या शोधयात्रेत मी शेकडो महिलांशी बोललो. मी निवडलेली गावे ही त्या त्या जिल्ह्यातील अतिदुर्गम व सर्वात गरीब होती. नंदुरबार जिल्ह्यात तर आम्ही उंच डोंगरावर चढून तिथले पाडे बघितले. त्यामुळे गांधींच्या शब्दात ‘अंतिम आदमी’ असलेल्या महिला बघता आल्या. त्यांच्याशी बोलता आले. शोषणाच्या उतरंडीवर सर्वांत शेवटी उभ्या असलेल्या महिला मी बघितल्या.

एक सर्वसाधारण निरीक्षण म्हणजे गरीब कुटुंबाचे उत्पन्न कमी असल्याने या महिलांना कुटुंबासाठी खूप कष्ट करावे लागतात, पण मजुरी कमी मिळते. विदर्भाच्या अनेक भागात मजुरी महिलांना फक्त १०० रुपये आहे, तर पुरुषाला २०० ते २५० आहे. त्याचे कारण विचारले तर म्हणाले की, पुरुष सकाळी ८ वाजता येतो आणि महिला सकाळी १० वाजता येते. पुरुष जड काम करतो, तर महिला हलके काम करते. मजुरीबाबत महिला वाद करू शकत नसल्याने त्यांना कमी मजुरी मिळते.

कमी मजुरीमुळे महिलांना जास्त काम करावे लागते. अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात शिफ्टमध्ये मजुरीचे काम असा नवीन वाटणारा प्रकार दिसून आला. सकाळी ७ ते १२ व दुपारी १ ते ६ अशा दोन शिफ्टमध्ये महिला कामे करतात. सकाळी आपल्या शेतात काम करणे आणि दुपारी मजुरीने जाणे किंवा सकाळी मजुरीला जाऊन मग दिवसभर आपली घरातली कामे करणे असा पर्याय महिला निवडतात. केवळ दोन वेळची १०० प्रमाणे २०० रुपये मजुरीसाठी दोन्ही शिफ्टमध्ये सकाळी ७ ते संध्याकाळी ५ पर्यंत महिला काम करत राहतात. त्यात पहाटे उठून स्वयंपाक करतात आणि सकाळी ७ ला कामावर हजर होतात. शिफ्ट संपल्यावर दुसरे काम. दुसरे काम जर लांब असेल तर तिथपर्यंत पायी जायचे आणि संध्याकाळी ६ वाजता घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करायचा. २०० रुपयांसाठी ही अमानुष कसरत दिसली.

पुन्हा निंदणीचे काम दोन पायावर बसून करावे लागते. १० तास सलग असे काम महिला करीत राहतात. इतर कामातही असेच अमानुष कष्ट आणि कमी मजुरी आहे. नागपूर जिल्ह्यात लाल मिरची खुडण्याचे काम गरीब महिला करतात. एक किलो मिरची खुडली की सहा रुपये मिळतात. एका किलोत चारशे मिरच्या बसतात. म्हणजे एक मिरची खुडण्याची मजुरी दीड पैसे पडते. रोज महिला वीस किलो म्हणजे आठ हजार मिरच्या खुडतात आणि बारा तास काम करून त्यांना १२० रुपये मिळतात. तिखटाने हाताची जळजळ होते. रायगड जिल्ह्यात मजुरांकडून गवत कापण्याचे काम करून घेतले जाते. एक किलो गवत कापण्याची मजुरी ४० पैसे आहे. रोज पती-पत्नी दोनशे किलो गवत कापतात. वीटभट्टीवर मजुरी करणाºया मजुरांना एक हजार विटा पाडल्यावर पाचशे रुपये मिळतात म्हणजे एका विटेला ५० पैसे मिळतात. हे काम पती आणि पत्नी करते. त्यामुळे एकाला २५ पैसे मिळतात. काम मात्र पहाटे ३ वाजता सुरू होते व संध्याकाळी संपते. किमान रोज १५ तास काम होते. भंडारा, उस्मानाबाद जिल्ह्यात भटके पती-पत्नी महिलांचे केस गोळा करण्याचे काम करतात. केसाच्या बदल्यात महिलांना भांडी देतात. एक किलो केस जमायला १५०० रुपयाची भांडी द्यावी लागतात व तीन दिवस लागतात. दोनशे रुपये पेट्रोल खर्च होतो व ते केस दोन हजार रुपये किलोने विकले जातात. भटक्या विमुक्तातील महिला तर भीक मागण्यापासून सर्व कामे करतात.

भटक्या विमुक्तांच्या घराची स्थिती खूपच वाईट आहे. अजूनही अनेक भटके हे पालावर राहतात. त्यामुळे महिलांच्या जगण्याची परवड तर विचारूच नका. एक महिला म्हणाली, “आमच्या गावातील हा ओंजळभर रस्ता. आमची घरं म्हणजे जणू डुकराची खुराडी. रात्री कौल अंगावर पडतील की काय असं भ्याव वाटत.” महिलांना उघड्यावर विधी उरकावे लागतात आणि आंघोळही कडेला साड्या लावून उघड्यावर करावी लागते. लाज आणि इज्जत हे शब्द गरिबांना परवडत नाही. अनेकदा भिकेचे अन्न मागून खाल्ल्याने त्या आजारी पडतात. भंगार विकून मिळालेल्या पैशांतून किराणा भरतात. धान्य खरेदी करतात. मटनसुद्धा विकत आणताना कोंबडीच्या दुकानाबाहेर पंख आणि आतडे साफ करताना टाकून दिलेले मटन २० रुपया किलोने आणतात. किनवटमधील बिलोली जागीर येथील मजूर महिला म्हणाल्या की, ४० रुपयाचे तेल १ आठवडा वापरतो. तेल लागते म्हणून भाजीपाला जास्त आणत नाही..

गरीब असल्याने महिलांवरचे अत्याचार दडपले जातात. हिंगोली जिल्ह्यात जोडतळा या गावात पारधी जमातीच्या मंगलाबाई पवार भेटल्या. त्यांच्या मुलीची गावातील तरुणांनी छेड काढली. त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली. तेव्हा सूड भावनेने गावातील तरुणांनी त्या ३ मुली तळ्यात पोहायला गेल्या, तेव्हा त्यांना पाण्यात बुडवून मारले. वडील वाचवायला गेले तर त्यांनाही बुडवून मारले. हे चार खून होऊन पोलिसांनी पुरावे मिळत नाहीत, म्हणून कोर्टात सांगून केस फाईल बंद केली. मंगलाबाई पवार आजही न्यायासाठी वणवण करीत आहेत. ही घटना जर दिल्लीत घडली असती तर देशभर हलकल्लोळ झाला असता. दुर्दैवाने अत्याचार कुठे होतो व कुणावर होतो यावर आपल्या देशात दखल घेणे अवलंबून असते.

या सर्व प्रवासात मला स्थूल महिला खूप कमी दिसल्या. अनिमिक म्हणजे शरीरात कमी रक्त असलेल्या आणि अशक्त महिलाच जास्त दिसल्या. महिलांना मी अनेक प्रश्न विचारले. कोलामी महिलांना तुम्हाला साड्या किती आहेत? असे विचारले तेव्हा २०० ते ३०० रुपये किमतीच्या ३ साड्या असल्याचे अनेकींनी सांगितले. त्यात एक साडी कार्यक्रमाला जाण्यासाठी ठेवतो आणि दोन साड्या रोज वापरतो असे म्हणाल्या. सोन्याचे मणी किती जणीच्या गळ्यात आहेत असे विचारल्यावर लिंगापूर पोडावर १६ पैकी फक्त ५ महिलांच्या गळ्यात एक एक मणी होता. तुमच्या घरात येवून आता तपासले तर किती रोख रक्कम निघेल असे विचारले, तेव्हा ५०० रुपये निघतील असे दोघी म्हणाल्या तर २०० ते ३०० रुपये निघातील असे ५ जणी म्हणाल्या. उरलेल्या काहीच बोलल्या नाहीत!!! गावात राहतांना त्या स्लीपर वापरतात आणि बाहेर जाताना चप्पल वापरतात.

वृद्ध महिलांची स्थिती तर अधिक विदारक असते. जालना जिल्ह्यातील जांब येथील पारधी वस्तीत ७५ वर्षांच्या सुंदराबाई जाधव आपल्या ९३ वर्षाच्या सासुला घेऊन राहतात. मजुरीने जाऊन काम होत नाही तरीही मजुरीला जातात आणि मजुरी नसेल त्या दिवशी भीक मागतात. सासू जागेवरून उठू शकत नाही. अनेकदा प्रयत्न करूनही मात्र निराधार पेन्शन मिळत नाही. या पेन्शनसाठी एजंट तयार झाले आहेत. ते ५००० रुपये मागतात. सुंदराबाई म्हणतात, आम्ही निम्मा पगार द्यायला तयार आहोत. सुंदराबाईचे घर आतून बघितले तेव्हा भडभडून आले. घरात मोजून ७ ते ८ वस्तू होत्या. एक चूल, पाण्याचे भांडे, तवा, पातेले व परात आणि काही कपडे. पण सुंदरबाईंना या व्यवस्थेत निराधार पेन्शन मिळू शकत नाही.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या एकल महिलांना भेटलो. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात कांताबाई दौलत हेलगोटे ही शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची पत्नी शाळेबाहेर भर उन्हात गोळ्या बिस्कीटे विकत होती. ते बघून खूप गलबलून आले. आजही ४२००० रुपये कर्ज तसेच अंगावर आहे. नवर्‍याच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मुलीनेही आत्महत्या केली. पतीची आत्महत्या हा विषय निघताच त्या रस्त्यावर चरडायला लागल्या. त्याच तालुक्यात परशराम हडोळे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या घरी पत्नी भेटली. पतीबद्दल त्या सांगू लागल्या. ५ मुली व १ मुलगा अशा जबाबदारीत असलेल्या परशराम यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. उपचार करायलाही पैसे नव्हते आणि सतत नापिकीमुळे कर्ज अंगावर होते. त्यात ५ मुलींचे लग्न कसे होईल ही चिंता होती. रोज सकाळी डॉक्टरने सांगितल्यामुळे ते फिरायला जात होते. सोबत पत्नीही होती. पत्नी सोबत असताना एकदम रस्त्यावरच्या कोरड्या विहिरीत त्यांनी उडी मारली आणि आत्महत्या केली. सोबत चालणारा पती एका क्षणात विहिरीत स्वत:ला संपवतो. आणि आपल्याला त्याच्या मनातील कल्लोळाचा अंदाज ही येत नाही ही वेदना तिने कशी स्वीकारली असेल?

खाजगी कर्ज घेण्याचे प्रमाण गरीब महिलांत खूप वाढले आहे. गरीब कुटुंबातील महिला खूप बचत करून दागिने हौशेने करतात. पण अडचण आली की ते दागिने सावकाराकडे गहाण ठेवतात. १० ग्रॅम दागिन्यावर १५००० कर्ज मिळते. त्यावर महिना शेकडा ४ रुपये व्याज असते म्हणजे वर्षाला ७ हजार २०० रुपये व्याज होते. मी विचारले की तो दागिना कधी सोडवता येईल? एका वर्षात जर तो सोडवला नाही तर त्याचा लिलाव होतो. महिला हसून सांगत होत्या की, एकदा दागिना घराबाहेर गेला की पुन्हा येत नाही. असे म्हणून त्या सगळ्याच हसल्या. त्यांचे हसणे खूप करुण वाटले.

बचत गटांना बँकेने वित्तपुरवठा कमी केल्यापासून खाजगी वित्त पुरवठा करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनी वाढल्या आहेत. त्यात अट अशी असते की एकाच वेळी सर्व महिलांचा हप्ता आला पाहिजे. एकीचा जरी हप्ता आला नाहीतर ते इतर महिलांचा हप्ता स्वीकारत नाहीत. त्यातून जी महिला हप्ता देऊ शकणार नाही तिच्यावर इतर महिला दडपण आणतात आणि ती पुन्हा कर्ज काढून का होईना हप्ता भरतेच... महिला घरातील छोट्या छोट्या वस्तू घेण्यासाठी अनेकदा पतीला न सांगता हे कर्ज उचलतात आणि नंतर वसुलीचा तगादा सुरू झाला की त्या घरातही सांगू शकत नाही. यातून महिलांनी घाबरून आत्महत्या करण्याचे प्रकार ही घडले आहेत. मनीषा कोडे या महिलेने रॉकेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुरेखा भारसागडे या महिलेच्या  घरावरचा पत्राच काढून नेला. सर्वांत करुण कहाणी एका वृद्ध महिलेची वसुलीला लोक आल्यावर ती धान्याच्या कोठीत लपून बसली. तेव्हां ते झाकण लागले आणि गुदमरून तिचा मृत्यू झाला. इतकी प्रचंड दहशत महिलामध्ये या मायक्रो फायनान्सची आहे.

पेठ तालुक्यात गिरनारे येथे रोज मजुरांचा बाजार भरतो. ७०० पेक्षा जास्त मजूर तिथे जमतात. तिथे शेतकरी व इतर लोक येऊन पाहिजे ते मजूर नेतात. शनिवारी, रविवारी कॉलेजला शिकणारे विद्यार्थी मजुरीला या बाजारात येऊन उभे राहतात आणि आलेले शेतकरी तरुण मजूर नेतात. उरलेल्या महिला परत जातात. एका मजूर महिलेची ही वेदना ऐकली. ही सलग दोन दिवस तिथे जात होती आणि काम न मिळाल्याने १२ किलोमीटर पायी चालत घरी आली होती. सकाळपासून ती चहासुद्धा पिलेली नव्हती. जेवण तर दूरच.

दारूचा प्रश्न गरीब महिलांना जास्त त्रासदायक आहे. गावोगावी दारू खुलेआम विकली जाते. त्यातून पुरुष सकाळपासून दारू पितात. कामाला जात नाहीत. महिलांचे पैसे हिसकावून घेतात. मारहाण करतात. महिलांना संसार ओढावा लागतो. असे पुरुष लवकर मरतात. संसार महिलांना ओढावा लागतो. किनवट येथील झोपडपट्टीत आजपर्यंत दारू पिऊन ४५ पुरुष मृत्यू पावले. त्यांच्या अनेक विधवांना भेटलो. भकास नजरेने बोलत होत्या. झरी येथील महिला सांगत होती की दारूच्या व्यसनाने तिच्या नवर्‍याने ८ एकर शेत विकले आहे. बारमध्ये जाताना सोबत अनेक मित्र असायचे त्यातून खूप कर्ज झाले. शेवटी ती आता कुटुंबासह माहेरी येऊन राहते आहे. इथेही तो मारहाण करतो. जास्त बोलले की मुलाला पळवून नेईल असे धमकावतो, असे ती महिला सांगत होती.

महिलांच्या आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर झाला आहे. एका वस्तीत महिलांना आजार कोणते आहेत? हे विचारले, तेव्हा त्या म्हणाल्या, आम्ही तपासणीच करीत नाही त्यामुळे कळत नाही. खाजगी डॉक्टर बाळंतपणात सीझरच करतात. बाळंत झालेल्या महिलेला दवाखान्यात ७०० रुपयाचा चेक दिला जातो. चेक हा त्या महिलेच्या नावावर असतो. बुलढाणा जिल्ह्यात डोंगरावर राहणारी बाळंत झालेली महिला व पती २० किलोमीटर चालत गेले. तेथे गेल्यावर एकदा खात्यात पैसे नव्हते. तिथे गेल्यावर खाते उघडा असे सांगितले. पुन्हा एक चक्कर झाली. एक आदिवासी तेथे गेला तर तो चेक ३ महिने झाल्यामुळे चेकची मुदत संपली होती.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील भटक्यांच्या वस्तीत राहणार्‍या उषा गंगावणे या महिलेच्या आरोग्याची कथा विषण्ण करून टाकते.उषा आपल्या दोन मुलांसह राहतात. भंगार गोळा करतात. त्या मुलांना घेऊन या झोपडपट्टीत आल्या. मुलेही मजुरी किंवा काम साफ करणे किंवा तत्सम कामे करतात. उषाबाईंना एकाचवेळी हृदयविकार, अल्सर आणि किडनीचा विकार आहे. त्यांनी जवळच्या पैशाने अंजिओग्राफी केली .त्यात त्यांच्या हृदयाची झडप नादुरुस्त आहे. तुमचे जिवंत राहणे कठीण आहे असे डॉक्टर सांगतात. त्याचे तातडीने ऑपरेशन करणे आवश्यक आहे. पण त्याचा खर्च शासकीय मदत वगळता आणखी दीड लाख रुपये लागतील. इतकी रक्कम त्यांच्याकडे नाही म्हणून मग आता त्या केवळ गोळ्या घेतात आणि राहतात. किडनीसाठी ही गोळ्याच घेतात. हृदयविकारामुळे त्या जड वस्तू उचलू शकत नाही. भंगार गोळा करायला फार फिरू शकत नाहीत. कधीकधी गोळ्या घ्यायलाही पैसे नसतात. अशा वेळी खूप छाती दुखते. जीव घाबरा होतो. पण अशा वेळी त्या तशाच पडून राहतात. मुलांना फार वेळा पैसे मागता येत नाही. येथे भटक्यांच्या वस्तीवर पिंकी नावाची गरोदर महिला भेटली. तिला ६ वा महिना सुरू होता. तिच्यात रक्त खूप कमी होते. रक्त का भरले नाही? विचारले तर डॉक्टर उत्पन्नाचा दाखला मागतात असे सांगितले. तेव्हा दारिद्र्यरेषेखाली समजून तिला उपचार मिळेल. हे कुटुंब गावकर्‍यांनी वस्ती पेटवल्यामुळे मूळ गाव सोडून इथे वस्तीला आलेले. त्यांना इथला रहिवासी दाखला कोण देणार? तलाठ्यांना फोन केला तर ते म्हणाले की, ती वस्ती माझ्या हद्दीत येत नाही. अशा स्थितीत या लोकांनी काय करावे? गरोदर असलेल्या तिला काय जेवण केले? विचारले तर ती म्हणाली की, फक्त भात, भाजी व वांग्याची भाजी खाल्ली आहे. सोनोग्राफी केलेली नाही.

मला दिसलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील महिला अशा आहेत.

.............................................................................................................................................

'दारिद्रयाची शोधयात्रा' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4720/Daridryachi-Shodhyatra

.............................................................................................................................................

लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आहेत.

herambkulkarni1971@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

anand ingale

Tue , 12 March 2019

सर, लेख वाचून मन सुन्न झालं