जॉर्ज फर्नांडिस : एका लढवय्याची शोकांतिका
सदर - सडेतोड
निखिल वागळे
  • जॉर्ज फर्नांडिस (जन्म- ३ जून १९३० , निधन - २९ जानेवारी २०१९)
  • Thu , 31 January 2019
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle जॉर्ज फर्नांडिस George Fernandes

जॉर्जला ‘अहोजाहो’करणं मला जमणार नाही. तो नुसता जॉर्ज होता आणि शेवटपर्यंत ‘जॉर्ज’च राहिला. जसे दिलीप-राज-देव, सुनील किंवा लता तसाच ‘ए जॉर्ज’. पडद्यावरच्या अमिताभच्या आगमनापूर्वीचा ओरिजनल अँग्री यंग मॅन!

मी जॉर्जला पहिल्यांदा पाहिलं वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी. त्याच्या युनियनचं ऑफिस गिरगावात माझ्या घरासमोर होतं- ‘२०४, चर्नी रोड.’ जॉर्जनं नुकतीच १९६७ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. मुंबईचा नव्हे तर सगळ्या देशाचा तो हिरो झाला होता. स. का. पाटील हे काँग्रेसमधलं बडं प्रस्थ. जणू मुंबईचे सम्राटच. काँग्रेसच्या निधी संकलनाचं काम त्यांच्याकडे होतं. नेहरूंच्या काळापासून त्यांचा हा प्रभाव अबाधित होता. पैसा आणि गुंड यांच्या जोरावर मुंबईवर त्यांनी जबरदस्त पकड ठेवली होती. दक्षिण मुंबईतून त्यांना हरवणं अशक्य आहे असं राजकीय पंडित मानत होते. आणि जॉर्जनं त्यांच्याच खुर्चीखाली सुरुंग लावला. ‘पोलिटिकल मार्केटिंग’ हा शब्दही चलनात नसताना लोकांच्या मदतीनं निवडणूक कशी लढवावी याचा हा वस्तुपाठ होता. जॉर्जच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागला. त्यांचा प्रचार, वक्तृत्व, संघटना बांधणी यांच्या कहाण्या याच निवडणुकीत पहिल्यांदा देशभर पसरल्या.

अशा या नव्या हिरोला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होणं साहजिकच होतं. या गर्दीतून घेतलेलं जॉर्जचं पहिलं दर्शन विलक्षण चैतन्यदायी होतं. पुढारीपणाच्या प्रस्थापित कल्पनाना छेद देणारा त्याचा अवतार चक्रावून टाकणारा होता. विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे, ओसंडून वाहणारा उत्साह आणि ‘मीच जग बदलणार आहे’ हा आत्मविश्वास. पुढची अख्खी पिढी जॉर्जच्या बंडखोरीच्या प्रेमात पडली यात आश्चर्य काहीच नाही. त्याचं भाषण हा तर अखंड धबधबा होता. हिंदीतून सुरू झालेलं भाषण मराठीत कधी शिरायचं, तिथून इंग्रजी, कन्नड-तुळू असा प्रवास कसा करायचं हे कळायचंच नाही. पण हा धबधबा ज्याच्या अंगावर आदळायचा तो अक्षरश: संमेहनाच्या अवस्थेत जायचा.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha

.............................................................................................................................................

मग वस्तुस्थितीचं भान येईपर्यत जॉर्जच्या या असंख्य प्रतिमा तुम्हाला छळत रहायच्या. कधी भर पावसात महापालिका कामगारांसमोर भाषण करताना, कधी रेल्वेच्या पटऱ्यांवर पोलिसांचा मार खाताना, कधी आपल्या हातातल्या बेड्या फडकवताना किंवा इंदिरा-सोनिया गांधींवर अर्वाच्य टीका करताना, कधी मंत्रीपदाची शपथ घेताना, कधी कोकाकोलाला ‘चले जाव’ म्हणताना, कधी सियाचीनमध्ये जवानांना भेटताना, कधी अडवाणी-वाजपेयींच्या मांडीला मांडी लावून बसताना, कधी अणुस्फोटाचं समर्थन करताना, कधी ग्रॅहम स्टेन्सच्या मारेकऱ्यांचा बचाव करताना किंवा गुजरातमधल्या नरसंहारावर पांघरूण घालताना... प्रश्न पडतो की यातला खरा जॉर्ज कोणता? आपल्याला मुंबईत भेटलेला व्यवस्थेविरुद्ध लढणारा नायक की दिल्लीत जाऊन व्यवस्थेचा भाग बनलेला, धर्मांधांच्या हातचं खेळणं बनलेला न-नायक? या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत जॉर्ज तुम्हाला चकवा देऊन पुढे निघून गेलेला असतो. त्याच्या मते त्यानं केलेली प्रत्येक गोष्ट मनापासून केलेली असते!

जॉर्जच्या आयुष्याचे सर्वसाधारणपणे दोन भाग करता येतील. एक १९७७ पूर्वीचा मुंबईतला आणि त्यानंतर दिल्लीवासी झाल्यानंतरचा. मंगलोरमध्ये वडिलांनी त्याला पाद्री बनवण्यासाठी सेमिनरीत टाकला होता. तिथून तो का पळून आला हे पाहिलं तरी अन्यायाविरुद्ध त्याच्या मनात एवढी चीड का हे लक्षात येतं. टीबी झाल्याच्या संशयावरून त्याला फादरनं सेमिनरीतून काढून टाकलं. वडिलांनी वैद्यकीय तपासणी करून त्याला परत पाठवलं, पण जॉर्जच्या मनात सेमिनरीविषयी एवढी चीड निर्माण झाली होती की, तिथून ते थेट मुंबईत पळून आला. त्यानंतर त्यानं धर्म नावाच्या गोष्टीकडे वळूनसुद्धा पाहिलं नाही. तो जन्मानं ख्रिश्चन होता, पण राजकारणात त्यानं आपल्या अल्पसंख्याक असण्याचा कधीही वापर करून घेतला नाही. तो दक्षिण भारतात जन्मला, पण पश्चिम आणि उत्तर भारताला त्यानं कर्मभूमी बनवलं. जातीधर्म, भाषा, राज्य यांच्या सीमा ओलांडून खऱ्या अर्थानं भारतीय बनलेला असा दुसरा समकालीन नेता मला आढळत नाही. एका अर्थानं जॉर्ज हा नेहरूंच्या कल्पनेतल्या सेक्युलॅरिजमचं जिवंत प्रतीक होता. इंदिरा गांधीची लोकप्रियता देशभर असली तरी त्यांचं कार्यक्षेत्र दिल्लीतल्या वरिष्ठ वर्तुळापुरतं मर्यादित होतं आणि जॉर्जसारखा संघर्ष त्यांना कधी करावा लागला नाही.

जॉर्जचा मुंबईतला संघर्ष एखाद्या चित्रपटात शोभावा असाच आहे. आपल्या स्वप्नांसाठी लढण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुणालाही हे शहर निराश करत नाही. जॉर्जलाही या शहरानं यशाचा रस्ता दाखवला. १९५० च्या सुमाराला या शहरातले बडे कामगार नेते होते पी. डिमेलो आणि कॉम्रेड डांगे. इथं मंगलोर कनेक्शन उपयोगी पडलं. जॉर्जचे गुण डिमेलोनी नेमके हेरले आणि त्याला पंखाखाली घेतलं. सुरुवातीला हॉटेल कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या जॉर्जनं या असंघटित कामगारांकडे आपलं लक्ष वळवलं. हॉटेल कामगारांना आपली युनियन होऊ शकते हेच भान नव्हतं. तीच गोष्ट टॅक्सीवाले, बेस्ट आणि महापालिका कामगारांची. त्यांनाही आपल्या हक्कांची जाणीव पहिल्यांदा जॉर्जनेच करून दिली. सुमारे दोन लाखांहून अधिक कामगारांची ही ताकद होती. त्यांची संघटना बांधण्यासाठी जॉर्जनं घेतलेली मेहनत अभूतपूर्व होती. रात्री-बेरात्री हॉटेल कामगारांच्या सभा घेऊन सकाळी पहिल्या पाळीआधी हा बहाद्दर बेस्ट कामगारांच्या सभेसाठी डेपोत हजर व्हायचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांची हेटाळणी नशिबी येणाऱ्या सफाई कामगारांना त्यानं आवाज दिला. गरिबी टॅक्सीवाल्यांना बॅंका कर्ज देत नाहीत असं म्हटल्यावर त्यानं सहकारी तत्त्वावर लेबर बॅंक काढली आणि यशस्वीपणे चालवली. पुढे या टॅक्सीवाल्यांसाठी या युनियननं पेट्रोल पंपही काढले. नामदेव ढसाळच्या वेश्यांच्या युनियनसाठीही जॉर्जनं आपल्याच ‘२०४’ मध्ये सुरुवातीला जागा दिली होती.

पण आपल्याला हवं तसं हे युनियनचं काम पुढे गेलं नाही अशी खंत त्याला नंतरच्या काळात होती. ‘सफाई कामगारांना आम्ही आर्थिक ताकद दिली, पण सामाजिक ताकद देऊ शकलो नाही’, हे तो बोलून दाखवायचा. पण तोपर्यंत त्याच्या सर्व युनियनची दुकानं झाली होती. त्याचे सहकारी गरजेपुरता त्याचा वापर करत होते. पुढच्या काळात यातल्या बहुसंख्य युनियन्सवर त्याचे विश्वासू सहकारी शरद राव यांनी कब्जा केला आणि जॉर्जची साथ सोडली.

या प्रभावी युनियन्समुळे देशाच्या आर्थिक राजधानीच्या नाड्या, खरं तर चाकं जॉर्जच्या हातात आली. मनात येईल तेव्हा तो मुंबईचा ‘चक्का जाम’ करू शकत होता. ‘बंद सम्राट’ हे नाव त्याला पडलं याच काळात. पण जॉर्जनं आपल्या या ताकदीचा गैरवापर कधीच केला नाही. त्याच्या ‘बंद’मध्ये हिंसाचाराला प्रतिष्ठा नव्हती. संप किंवा आंदोलन किती ताणायचं याचं नेमकं भान त्याला होतं. काँग्रेसच्या गुंडांनी त्याच्या संपात फूट पाडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. सरकारनं त्याला अनेकदा तुरुंगातही डांबलं. पण संपात फूट पडली नाही कारण त्याची कामगारांशी जुळवलेली घट्ट नाळ. ‘बंद’मध्ये हिंसा घुसली ती पुढच्या काळात- बाळ ठाकरेंच्या उदयानंतर.

काँग्रेसविरोधाचं बाळकडू जॉर्जला पाजलं ते त्याचे राजकीय गुरू डॉ. लोहिया यांनी. देशातल्या बिगर-काँग्रेसवादाचे ते जनक होते. पण त्यावेळची परिस्थितीत अशी होती की, बराच काळ सत्तेत राहिल्यामुळे काँग्रेसवाल्यांना माज आला होता. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत होती. १९५७पासूनच काँग्रेसची लोकप्रियता उतरणीला लागली होती. जॉर्जसारख्या मूर्तीमंत विरोधकाला ही सुवर्णसंधी वाटली असल्यास नवल नाही. ६७च्या निवडणुकीनं त्याला नवा आत्मविश्वास दिला होता. त्यानं आपला काँग्रेसविरोध टिपेला नेला. ७१ ला इंदिरा गांधींच्या लाटेत याच सपशेल पराभव झाला, विरोधक भुईसपाट झाले. मग याच्या काँग्रेस विरोधाला ‘इंदिरा हटाव’चं स्वरूप आलं. इंदिरा गांधीही त्याला ‘शत्रू नंबर १’ मानत होत्या. १९७४ च्या रेल्वे संपात हा संघर्ष टोकाला गेल्या. इंदिरा गांधींनी सगळी सरकारी यंत्रणा वापरून संप दडपला. जॉर्जला तुरुंगात डांबलं. शेवटी संप मागे घ्यावा लागला. याचा राग बराच काळ जॉर्जच्या मनात असावा.

हा रेल्वे संप इंदिराजींच्या आणीबाणीच्या निर्णयाला कारणीभूत होता असं सांगितलं जातं. पण हे एकमेव कारण नव्हतं. १९७३ पासूनच परिस्थिती इंदिरा गांधीच्या हाताबाहेर जात होती. गुजरात आणि बिहार आंदोलनामुळे सरकारची कोंडी झाली होती. संजय गांधीच्या युवक काँग्रेसनं उच्छाद मांडला होता. कोलकत्यात जेपींच्या गाडीवर हल्ला करण्यापर्यंत ते बहकले होते. त्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानं त्या अधिकच असुरक्षित झाल्या आणि त्यांनी आणीबाणी जाहीर केली.

इथं जॉर्जचा इंदिराविरोध विरोध पराकोटीला पोचला. तो गांधी-लोहियांचा मार्ग विसरला आणि त्यानं देशभर सुरुंग लावून सरकारला हादरवण्याचा (बडोदा डायनामाईट) कट आखला. खरं तर ‘माँ-बेट्या’चा काटा काढण्याचंच त्याच्या मनात होतं, पण त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला आवरलं. समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी हे नमूद करून ठेवलं आहे. यावरून जॉर्जची मन:स्थिती लक्षात येईल.

लोकशाही वाचवण्यासाठी कोणत्याही टोकाला जायची त्याची तयारी होती. आपल्या विचारातला विरोधाभासही त्याला जाणवत नव्हता. ‘ती काळाची गरज होती, अपवादात्मक परिस्थितीत असे निर्णय घ्यावे लागतात’ असं तो समर्थन करायचा. पुढे ‘काळाची गरज’ ही त्याची आवडती ढाल झाली. आपल्या प्रत्येक उफराट्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी तो ती वापरायचा. ७७ साली जनता पक्ष सत्तेत आला नसता तर जॉर्ज फाशी गेला असता आणि शहीद झाला असता. राजद्रोहापासून अनेक गंभीर गुन्हे पोलिसांनी त्याच्यावर लावले होते. कोणत्याही परिस्थितीत हा सुटता कामा नये असं इंदिरा गांधीनी बजावून ठेवलं होतं. जॉर्जनं कायम ते मनात ठेवलं. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतरही त्याच्या मनातलं हे शत्रुत्वाचं विष संपलं नाही. फक्त इंदिरा गांधींची जागा सोनियाने घेतली. याचाच पुरेपूर फायदा संघ परिवाराने उठवला.

मला वाटतं, जॉर्जच्या शोकांतिकेची सुरवात १९७७ नंतर झाली. तो तुरुंगातून निवडणूक जिंकला तेव्हा त्याची लोकप्रियता जणू आकाशाला भिडली होती. १९ महिन्यानंतर जनता पक्षाचं सरकार कोसळलं तेव्हा तो लोकांच्या दृष्टीने खलनायक बनला होता. लोकसभेत आदल्या दिवशी त्यानं मोरारजी सरकारचं समर्थन केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यानं टोपी फिरवली. त्याच्या मनात नसताना मधु लिमयेंनी त्याला हे करायला भाग पाडलं, असं जया जेटलींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. हे खरं असलं तरी निर्णयाची जबाबदारी जॉर्जचीच आहे. तो जनतेचा नेता होता, जनभावना त्याच्या लक्षात यायला हवी होती.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4637/Maza-Talamay-Jeevan---Zakir-Hussain

.............................................................................................................................................

आधी समाजवादी पक्ष जनता पक्षात विलिन करायला आणि मग मंत्री बनायला जॉर्जचा विरोध होता. पुढच्या काळात तो तीनदा मंत्री बनला. जनता सरकारमध्ये उद्योग मंत्री, व्ही. पी. सरकारमध्ये रेल्वे मंत्री आणि वाजपेयी सरकारमध्ये संरक्षण मंत्री. मंत्री म्हणून त्याची कामगिरी अजिबात खराब नव्हती. आपल्या वृत्तीनुसार त्या त्या खात्यांवर त्यानं आपला ठसा उमटवला. कोकाकोला, आयबीएमला देशाबाहेर काढण्याचा त्याचा निर्णय धाडसी होता, तर कोकण रेल्वेची उभारणी करण्याचा विधायक. संरक्षण मंत्री असताना तो जवानांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला, पण नोकरशहा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रोष त्यानं ओढवून घेतला. परंपरेविरुद्ध वागणारा माणूस स्थितीवाद्यांना आवडत नाही. जॉर्जनं व्यवस्थेच्या चौकटीत केलेली किंचित बंडखोरीही त्यांना पचली नाही. जॉर्जच्या बदनामीचा प्रचंड मोहीम राबवण्यात आली. तहलका आणि शवपेटी प्रकरणात त्याला अडकवण्यात आलं. या सगळ्याला तो वैतागला होता. पण सत्तेत जीव रमत नाही आणि ती सोडवतही अशी त्याची कोंडी होती. म्हणूनच मंत्री झाल्यावरही त्यानं आपल्या घरी मानवी हक्क कार्यकर्त्यांना आसरा दिला होता. हे आक्षेपार्ह होतं, पण तोच खरा जॉर्ज होता.

भाजपशी युती करणं ही त्याची राजकीय गरज होती. बिहारमधल्या मंडलोत्तर राजकारणात तो कालबाह्य झाला होता. त्यात त्यानं लालूशी पंगा घेऊन नितीशकुमारांची बाजू घेतली. १९९०, ९५, २००० अशा तीन निवडणूका लालूनं जिंकल्या होत्या. समता पक्ष भाजपबरोबर गेला नसता तर लालूने आम्हाला संपवलं असतं, असं त्यानं म्हटलं आहे. भाजपबरोबर युती करून त्यानं स्वत:चं राजकीय आयुष्य दहा वर्षांनी वाढवलं. वाजपेयी-अडवाणींशी चांगले संबंध असल्यानं मंत्रिमंडळात त्याला मानाचं स्थान होतं. अनेकदा एनडीएचा तो संकटमोचक बनला. पण त्यातला समाजवादी लढवय्या मधल्या काळात घुसमटून मेला.

जॉर्जची त्याच्या चाहत्यांच्या मनातली प्रतिमा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली ग्रॅहम स्टेन्स हत्याकांडानंतर. त्याने ज्या प्रकारे हल्लेखोर दारासिंग आणि संघ परिवाराला वाचवण्याचा प्रयत्न केला तो लाजीरवाणा होता. गुजरातमधल्या दंगलीच्या काळात त्यानं लोकसभेत मोदींचं केलेलं समर्थन धक्कादायक होतंच, पण त्याहून किळसवाणा होता तिथल्या हिंसाचारावर पांघरूण घालण्याचा त्याचा प्रयत्न. वास्तविक, बाबरी मशिद पाडणाऱ्यांचा त्यानं निषेध केला होता. १९९२-९३च्या मुंबईतल्या दंगलीच्या काळात तो शांतता प्रस्थापनेसाठी फिरलाही होता. म्हणूनच त्याच्याकडून स्पष्ट भूमिकेची अपेक्षा होती. पण त्याने तर धर्मांधानाच साथ दिली. खरा जॉर्ज त्या दिवशीच संपला!

जॉर्जच्या वाट्याला आलेली अखेर शत्रूच्याही वाट्याला येऊ नये. सतत लोकात जगणारा हा उमदा नेता गेली साताठ वर्षं पूर्णपणे एकटा पडला होता, अल्झायमरची शिकार झाला होता. त्यात त्याच्या कुटुंबीयांची भांडणं.

त्याची ही अवस्था पाहून मन अस्वस्थ व्हायचं. वाटायचं, का ही वेळ आली जॉर्जवर? नियतीनं त्याच्यावर सूड उगवला... की प्रत्येक शोकांतिकेचा क्लायमॅक्स असाच असतो?

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................