बापू, तुमची हत्या केली तरी तुम्ही संपायला तयार नाही. का?
सदर - गांधी @ १५०
विशाल बाळू डोळे
  • म. गांधींच्या विविध भावमुद्रा
  • Thu , 31 January 2019
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi

चालू वर्षं हे म. गांधी यांचं १५०वं जयंती वर्ष आहे. त्यानिमित्तानं २०१७पासून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींबद्दलचा एक लेख प्रकाशित केला जातो. ऑक्टोबर २०१९ पर्यंत हे लेख प्रकाशित होतील. हा लेख नेहमीपेक्षा थोडा आधीच प्रकाशित करत आहोत. कारण कालच देशभर अनेक ठिकाणी गांधींची पुण्यतिथी साजरी केली गेली. त्यांच्याविषयी बोललं, लिहिलं गेलं. एका तरुणाची ही प्रतिक्रियाही बोलकी व मननीय आहे.

या मालिकेतला हा पस्तिसावा लेख...

.............................................................................................................................................

प्रिय बापू, 

तुम्हाला काय म्हणावं, हा प्रश्न माझ्यापुढे आहे! महात्मा म्हणावं, मिस्टर गांधी म्हणावं की राष्ट्रपिता? पण चौथीत असताना जेव्हा मी डावा-उजवा किंवा कुठलाही वादी नव्हतो, तेव्हा मी तुम्हाला ‘बापू’ म्हटलं होतं. इतर सगळ्या पदव्यांपेक्षा तुम्हाला भारतातल्या जनसामान्यांनी दिलेली ‘बापू’ ही पदवी खूप मोठी वाटते. 

बापू, तुमच्यावर जगात सर्वांत जास्त पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यांची संख्या एका लाखाहून अधिक आहे. इतकी पुस्तकं कोणत्याच नेत्यावर लिहिली गेली नाहीत. तुमच्या विचारांना शंभर वर्षं होऊनसुद्धा जग त्याचा उलटसुलट विचार करतं. जगात सहाशेपेक्षा जास्त विद्यापीठात ‘गांधी आणि गांधीविचार’ शिकवला जातो. तुमच्या हयातीत असलेली अनुयायांची संख्या तुमच्या आधी व तुमच्यानंतर जगात कुणालाही लाभली नाही. आईनस्टाईन म्हणून गेले की, गांधी नावाचा हाडामांसाचा माणूस या भूतलावर होऊन गेला यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. पण माहिती आहे का बापू तुम्हाला, आम्ही त्यांचं म्हणणं खरं करून दाखवलं आहे? तुम्ही जगभराच्या स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा दिली असेल, पण आज तुमच्या प्रिय भारतात ‘समाजाला अहिंसेच्या शिकवणीनं दुबळं बनवणारा’ अशी तुमची ओळख आहे. खरंच बापू तुम्ही आम्हाला दुबळं बनवलंत?

‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’, फाळणीला जबाबदार गांधी, मुसलमानांचे गांधी, सनातनी हिंदूंचे गांधी, नेहरूंना पंतप्रधान करणारे गांधी… एवढे सगळे आरोप तुमच्यावर होत असताना तुम्ही गप्प कसे बापू? 

बापू, सध्या तुमचा गौरव थांबला आहे. तुम्ही या देशासाठी दिलेला लढा आणि त्यासाठी केलेलं बलिदान पुसून टाकायला आम्ही निघालो आहोत. राष्ट्रपिता महात्मा उर्फ मोहनदास करमचंद गांधी आज आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का बापू? का आजही नेहमीसारखं म्हणणार आहात की, काळ सर्व प्रश्नांची उत्तरं देईल?

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4712/Streevad-Sahitya-ani-samiksha

.............................................................................................................................................

सुरुवातीला ब्रिटिश साम्राज्याचा नम्र सेवक म्हणून घेणारा, इंग्रजांनी दिलेली ‘हिंदकेसरी’ पदवी मिरवणारा गांधी आम्हाला रोजच आठवतो. मात्र ते साम्राज्य मोडून काढायला, आरंभी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करणारे तुम्ही नंतर म्हणालात ‘यापुढे माझ्या आश्रमात फक्त आंतरजातीय विवाह होतील. इतर समाजा-समाजामधल्या विवाहांना मी येणार नाही.’

बापू, तुम्ही एवढं का बदलत गेलात दर दिवशी? तुम्ही सतत बदलत गेलेला माणूस आहात. मात्र त्यामुळे तुम्ही अनेकांना गूढ वाटला का? बापू, तुम्ही अभ्यासकांसमोर नित्यनियमानं नवी परिमाणं घेऊन कसं येता? आफ्रिकेतले गांधी, १९१५ मध्ये भारतात आल्यानंतर १९१९ पर्यंतचे गांधी, १९२० ते १९३६ या काळात देशाचे सर्वोच्च नेता असलेले गांधी, १९३९ ते १९४८ या काळात ब्रिटिशांशी लढत असलेले गांधी, हे सगळे मला वेगवेगळे वाटतात. मग यातला तुमचा कोणता खरा संदेश म्हणायचा? की आपल्या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणताही? 

नेहरू युवकांचे नेते होते, सरदार शेतकऱ्यांचे, मौलाना मुसलमानांचे, राजगोपालाचारी दक्षिणेचे… एवढे सगळे देशाचे नेते होते, पण या सगळ्यांचे नेते तुम्ही होता! तुम्ही चरखा चालवता चालवता असं काय केलं बापू? हे सगळे लोक म्हणतात की, आमच्या सभेला लोक येतात, भाषणं ऐकतात, कौतुक करतात, पण कार्यक्रम झाला की ‘महात्मा गांधी की जय’ म्हणतात आणि निघून जातात. आज पुढाऱ्यांना पन्नास हजाराच्या सभेसाठी लाखो रुपये द्यावे लागतात, पण लाखो लोक तुमच्या सभेसाठी का येत होते हो बापू? 

बापू, तुम्ही एवढ्या मोठ्या सम्राज्यासमोर कसं काय लढलात हो? सोबत शस्त्र नाही, पैसा नाही आणि तरीही तुमच्यासारख्या नि:शस्त्र माणसानं कशाच्या बळावर आम्हाला स्वातंत्र्य मिळून दिलं? ‘उचलले तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया’ हे कसं काय शक्य झालं बापू तुम्हाला! 

१५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. एकीकडे आनंदोत्सव सुरू होता, दुसरीकडे हजारोंच्या संख्येनं माणसं मारली जात होती, लाखो निर्वासित होत होती. धर्माच्या राजकारणानं विनयावर विजय मिळवला होता. जीना रक्तरंजित घटनांनी विचलित न होता पाकिस्तानच्या प्रमुखपदाची शपथ घेत होते. त्यावेळी तुम्ही कुठे होता? नौखालित होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आपल्या नि:शस्त्र हातांनी प्रयत्न करत होतात! कसं काय जमत होतं बापू तुम्हाला हे सगळं?

‘गांधी’ हा चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो भारतात आले, तेव्हा अनेक भारतीयांनी कुतूहल वाटलं. एका भारतीय दिग्दर्शकानं त्यांना प्रश्न विचारला- ‘अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी हाती तलवार घेऊन लढणारा वॉशिंग्टन तुमच्या समोर होता, आयर्लंडचा बेलरा, रशियाचा लेनिन, इटलीचा गॅरिबाँल्डी आणि चीनचा माओही. मात्र एवढे सारे नेते सोडून तुम्ही गांधींवर चित्रपट करायला का आलात?’ तेव्हा त्यांनी उत्तर दिलं- ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती तलवार घेऊन लढणारे नेते प्रत्येक देशातच लढले आहेत. मात्र स्वातंत्र्यासाठी नि:शस्त्र लढा देणारा नेता फक्त तुमच्याच देशात झाला आणि तो ‘गांधी’ होता.’

पण बापू आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला पाहिजे ती प्रतिष्ठा देऊ शकलो नाही. कारण तुम्ही कोणत्याच गटाचे नव्हता! ज्याच्यामुळे देश स्वतंत्र झाला त्याला तर आम्ही सिंहासनावर बसवायला पाहिजे होतं, पण तेव्हा तुम्ही दंगे थांबवत होता. बापू, तुम्ही एकमेव नेता आहात, ज्याला दिलेल्या स्वातंत्र्याची पावती म्हणून स्वतःला ‘सनातनी हिंदू’ म्हणणाऱ्या नथुरामानं गोळ्या झाडल्या. मात्र तरीही तुम्ही गोळ्या मारलेल्या त्या नथुरामाला नमस्कार करत होतास. का केलंत असं बापू? 

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

‘भारत म्हणजे गांधींचा देश’ असं का म्हणतात हो? बापू, तुमची हत्या केली तरी तुम्ही संपायला तयार नाही! का? सगळं जग तुमच्यासमोर नतमस्तक कसं होतं हो? बापू, तुमचा विचार मान्य नसलेली माणसंदेखील ‘साबरमती के संत’ म्हणत तुमच्यासमोर कसं झुकतात हो?

इतके सगळे शोध लावून, प्रगती होऊन आणि प्रचंड विकास होऊनसुद्धा शेवटी सगळे जुनाट विचार तुमच्या विचाराजवळ का येऊन थांबतात बापू? जगाला तुमचाच विचार वाचवेल असं सतत का वाटतं हो बापू? मार्टिन ल्यूथर किंगपासून ते नेल्सन मंडेलापर्यंत आणि बराक ओबामांपासून ते ऑन सांग सु कीपर्यंत या सर्वांनाच तुम्हीच का प्रेरणास्थान वाटतात हो बापू?

बापू, तुम्हाला मारलेल्या बंदुकीच्या गोळ्या अजूनही संपलेल्या नाहीत. कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश, दाभोलकर आणि कदाचित उद्या माझाही नंबर असेल बापू. पण मला त्याचं वाइट वाटणार नाही. कारण माणसं मारल्यानं विचार नाही मरत. पण वाइट याचं वाटतं की, तुम्ही आयुष्यभर खस्ता खाऊन, संघर्ष करून आम्हा सर्वांची ‘भारतीय’ नावाची जात बनवलीत, पण माहिती आहे का बापू तुम्हाला, एका पक्षाच्या नेत्यानं तुम्हाला अलीकडेच ‘चतुर बनिया’ म्हटलं. त्या दिवशी माझ्यासारख्या असंख्य भारतीयांना जेवणसुद्धा नीट गेलं नाही! 

बापू, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या… बापू, तुम्ही असं प्रेमानं आणि करुणेनं बघू नका माझ्याकडे! मला सहन होत नाही. इतकं क्षमाशील असणं बरं नव्हे, बापू!

.............................................................................................................................................

लेखक विशाल बाळू डोळे स. प. महाविद्यालयात एम.ए.करत आहेत.

vishaldole4@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Shital shelkee

Mon , 11 February 2019

विशाल दादा तुझे हे बापूंना लिहलेले पत्र वाचताना हात थरथरत होते, हृदययाचे ठोके वाढलेले होते अन नकळत डोळ्यांत पाणी आले होते. मला अस वाटत तुझ्या लिखानाची ताकत यातूनच दिसून येते. खूप शुभेच्छा!!


Poonam Dhavale

Mon , 04 February 2019

गांधींसारख्या महान व्यक्तिमत्वावर (मग ते आंबेडकर असोत वा नेहरू)आज अनेक टीका केल्या जातात...अगदी न विचार करता ... पण यांसारख्याच कर्तृत्वांमुळे,नेतृत्वांमुळे आज आपण राष्ट्रीय एकात्मता,सार्वभौम सोबतच 'विविधतेत एकतेचे' प्रतीक असलेल्या भारतात लोकशाही व नागरी स्वातंत्र्याचा उपभोग घेत गुण्यागोविंदाने राहतोय याची लोकांना विसर पडली आहे...या गोष्टींची समाजाला जाणीव असणे ही काळाची गरज आहे ... खूप सुंदर पत्र लिहिलं आहेस..


Shekhar Sonar

Sat , 02 February 2019

विशाल दादा! तुझा हा लेख खूप सुंदर आहे. या आधी वाचला आहे, त्या वेळेस ही तुला बोल की, खूप छान लिहिला आहेस. गांधी समजून घेनं जिकरीच काम आहे. साऱ्या जगाला अहिंसेच तत्त्व सांगणारा गांधी आज तरुणाईला अजून समजलेला नाही. मला वाट याच एक कारण असाव ते म्हणजे 'आमच्या शालेय शिक्षकांनी आम्हाला गांधी उलघडून सांगितलाच नाही, गांधीजींचे अहिंसेच तत्त्व सांगितले नाही, त्यांची शांतता सांगितली नाही. कदाचित त्यांना देखील हा गांधी कळाला नसावा.' आणि आजही नवीन शिक्षकांची तीच परिस्तिती दिसते. म्हणून युवकांच्या मनात गांधींबदल नकारात्मक मतं आहेत. डॉ. बाबासाहेब अंबेडकर म्हणतात की, 'या देशात माझे दुःख आणि मला समजून घेणार कोण असेल तर ते गांधीजी आहेत.' गांधीजींवर लाखहून अधिक पुस्तक लिहिली गेली आहे तसेच १५० हुन अधिक देश गांधीजींच्या विचार चाले आहेत. आणि आजही गांधी नाबाद -१५० आहेत. मात्र आपल्याच देशात काही ठरावीक लोकांकडून गांधींना आरोपी ठरवलं जात. परवाच गांधी पुण्यतिथी पार पडली मात्र काही समाज घटकाने गांधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडल्या पुन्हा गांधी मारला पण त्यांना इतकं साध कळाल नाही का की, गांधी मारला असला तरी त्याचे विचार मात्र जिवंत आहेत आणि त्यांचे विचार अजरामर राहतील. त्यांनी कितीही गोळ्या झाडल्यात तरी गांधी विचार मरणार नाही. हे शाषवत सत्य आहे. गांधीजी म्हणतात की, 'सत्य हेच ईश्वर आहे.' आणि हे सत्य कायम स्वरूपी टिकून राहणार आहे. जास्त काही बोलणार नाही अजून गांधींवर अभ्यास करुयात. बाकी तुझे खूप खूप अभिनंदन...!


rushikesh patil

Fri , 01 February 2019

विशाल भाऊ वास्तव वर्णिलस! तुझ्या लेखनीतला सच्चेपणा काळजाला स्पर्श करुण गेला. वाहुदे तुझ्या विचारांना निरंतर बांध नकोस घालु..! खुप खुप शुभेच्छा..!


Rohit Nale

Fri , 01 February 2019

अतिशय सुरेख लेख लिहिला आहे. खरच या समाजामध्ये बापू बद्दल अनेक गैरसमज आहेत.खरे बापू म्हणजे काय हे फार कमी जनांना समजल. ज्यांच्या समोर जग नतमस्तक झालं आणि अजून ही आहे, पण ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आज त्याच ठिकाणचे लोक त्यांच्यावर बोट उचलत आहेत...खरंच ही खूप मोठी शोकांतिका आहे.??या लेखातून तुम्ही अश्या बर्‍याच मुद्दय़ांवर प्रकाश टाकला खरंच खूप अतुलनीय लेख आहे. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! असंच लिहीत रहा.


lahu rathod

Fri , 01 February 2019

निशब्द करून टाकतो हा लेख विशालजी.... विचार पेटायला लागतात....आपल्याला बापू समजूनच घेता आले नाहीत याची मोठी खंत वाटते आज कारण जे विचार तळागाळापर्यंत जायला हवे होते ते गेलेच नाहीत आणि फक्त गांधी-आंबेडकर आणि गोडसे इतकच का आपल्या मनावर बिंबवले जातात हेच कळत नाही....बाकी मी गांधी आणि आंबेडकरांच्या सुद्धा विचारांचा समर्थक आहे...दोघेही महानतेने आणि विचाराने आपल्या जागी बरोबरच आहेत मग तरुण वर्गाने याचा विचार करायलाच हवा नाहीतर आपल्याला आंबेकर ही समजून घेता आले नाहीत आणि गांधी सुध्दा समजून घेता आले नाहीत ही मोठी तरुण वर्गाची दुर्दशा समजावी लागेल...... बाकी पत्र खूप जबरदस्त लिहिलंय.....


Gaurav Dhane

Thu , 31 January 2019

Good One


Prashant

Thu , 31 January 2019

Sir, This is one of the best article on Gandhji. Best & Thank u !!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......