‘सिम्बा’ : सिनेमा रोहित शेट्टीचा, आठवण देतो डेव्हिड धवनच्या फॉर्म्युल्याची
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘सिम्बा’चं एक पोस्टर
  • Sat , 29 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie सिम्बा Simmba रणवीर सिंग Ranveer Singh सारा अली खान Sara Ali Khan सोनू सूद Sonu Sood रोहित शेट्टी Rohit Shetty

ऐंशीच्या दशकाच्या शेवटी कारकिर्दीला सुरुवात करणारे दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचे सुरुवातीचे काही सिनेमे हे अॅक्शनला वाहिलेले असायचे. नव्वदनंतर त्यांनी विनोदीची कास धरली, ती मात्र अजूनपर्यंत सोडलेली नाही. पण विनोदी असले तरी त्या सिनेमांचा एक फॉर्म्युला असायचा, जो हमखास यशस्वी होण्याची पावती होती. फॉर्म्युला समजून घ्यायचा असेल तर ‘हिरो नं. १’ किंवा ‘कुली नं. १’ टीव्हीवर लागतात, तेव्हा बघावेत. यात नायकाला नायिकेला जिंकण्यासाठी जवळपास सर्व दिव्यातून जावं लागतं. तो गाणी म्हणतो, मारामारी करतो, विनोद करतो, भावूक होतो. त्याच्यात असं काहीही नसतं की, जे त्याला जमत नाही. तसंच धवनचे बरेचसे सिनेमे हे इतर सिनेमांवर आधारित असायचे. स्वतंत्र कथा कमीच असाव्यात बहुदा. रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ हा असाच धवनच्या फॉर्म्युल्याची आठवण करून देणारा आहे.

शिवगडमध्ये लहानाचा मोठा होणारा संग्राम ‘सिम्बा’ भालेराव (रणवीर सिंग) हा चोरी करून गुजराण करणारा असतो. एका केसमध्ये पोलिसांना पैसे घेताना बघून भविष्यात त्यांच्यासारखाच वर्दीचा वापर करायचा ठरवतो. इन्स्पेक्टर होतो. कर्तव्य करताना पैसे खायला चुकत नाही. त्यातच त्याची पोस्टिंग मिरामार पोलीस ठाण्यात होते. तिथं ड्युटी जॉईन करण्याआधीच कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना प्रेमानं जेवू घालणाऱ्या शगून साठेशी (सारा अली खान) त्याची ओळख होते. तिच्या प्रेमात पडलेला सिम्बा दुर्वा रानडेच्या (सोनू सुद) अवैध धंद्यांना चाप लावायचं ठरवतो. सोबतच त्याची ओळख मेडिकलचं शिक्षण घेत रस्त्यावरच्या अनाथ मुलांना शिकवणाऱ्या आकृती दवेशी (वैदेही परशुरामी) होते. तिला असा संशय असतो की, दुर्वा रानडेचे भाऊ गौरव व सदा पबच्या नावाखाली ड्रग्जचा व्यापार करतात. त्यासाठी ते ती शिकवत असलेल्या मुलांचा वापर करत असतात. तिचा संशय बळावतो, तेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जाते.

रोहित शेट्टीच्या सिनेमाचं एक बरं असतं. जगात काय चाललंय याचा त्याच्या सिनेमातल्या विश्वाशी काहीही देणंघेणं नसतं. व्यावसायिक सिनेमांचे फॉर्म्युले किती व कशा प्रकारे हाताळायचे याचा विचार मात्र प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांगणिक चालू असताना दिसतो. त्यासाठी इतर सिनेमांचे अधिकृत रिमेक करायला तो घाबरत नाही. डेव्हिड धवनचे बरेचसे सिनेमे हे रिमेकच असायचे, पण अनधिकृत. शेट्टी व धवनमधलं वैचारिक साम्य इथेच संपत नाही. ‘युनुस सजवाल’ या पटकथाकाराचा त्यांच्या बऱ्याच सिनेमात असणारा हात या फॉर्म्युल्याला घट्ट करणारा आहे. त्यामुळे या सिनेमातसुद्धा नव्वदच्या दशकातल्या कथानकाच्या चौकटीचा वापर सुरुवातीपासून दिसून येतो. पटकथाकार युनुस सजवाल व साजिद सामजी ‘टेम्पर’ (२०१५) या तेलगु सिनेमाचा आधार घेतात. निव्वळ एकाच सिनेमाचा आधार न घेता शेट्टीच्याच पूर्वीच्या ‘सिंघम’च्या विश्वात कथा घडवतात. बाजीराव सिंघमची छोटी भूमिका, कथेचं निवेदन व शिवगड गाव याच्याशी नातं जोडतात. त्यामुळे कथा जरी स्वतंत्र असली तरी तिचा पुसटसा धागा त्याच्याशी जोडून हॉलीवुडमध्ये जसे स्पिन ऑफ सिनेमे असतात, तसा प्रकार इथं केला जातो. पण हे पूर्णतः खरं म्हणता येणार नाही. कारण त्याचं जोडकाम सफाईदार नाही.

तसंच स्पिन ऑफ सिनेमांमध्ये त्यातली एका पात्रावर कथानक रचून त्याचं विश्व उलगडलेलं असतं. उदा. ‘डिस्पीकिबल मी’ मालिकेतील ‘मिनियन्स’वर आधारित ‘मिनियन्स’ हा सिनेमा. इथं ‘सिम्बा’ जरी ‘सिंघम’सारखा शिवगडचा असला तरी तो प्रत्यक्ष त्याच्यासोबत नव्हता. सिंघमचा त्याच्यावर कुठलाही प्रभाव नाही किंवा त्यानं लहानपणी त्याला बघितलंय वगैरे भानगडी नाहीत. त्यामुळे याला एकाच विश्वात घडवण्याचा अट्टाहास कशासाठी हे मात्र कळत नाही. तसंच ही कथा त्याच विश्वात घडते, हे सांगण्यासाठी कथाबाह्य निवेदकाची नेहमीची क्लृप्ती वापरली जाते.

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्ससारखा एखादा युनिव्हर्स आपल्या यशस्वी सिनेमांचा करावा हा हेतू यात जास्त आहे. खरं तर हे धोकादायक आहे. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सला त्यांच्या प्रदीर्घ काळ लोकांच्या स्मृतीत असणाऱ्या कॉमिक बुक्सचा मोठा आधार आहे. अमेरिकन भावविश्वाचा तो अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यांचा फॉर्म्युला वापरायचा तर आधी तशा पद्धतीनं साहित्याची निर्मिती होणं आणि ती भारतीय जनमानसात मुरणं गरजेचं आहे. अशानं शेट्टीला व प्रेक्षकांना फारसा फरक पडणार नाही, पण हिंदी सिनेमाची वाढ होणार नाही. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तर हा धोका दीर्घकाळ टिकणारा असेल. ते मोडायचं असेल तर शेट्टीनं स्वतंत्र कथेच्या सिनेमांची निर्मिती करणं नितांत गरजेचं आहे.

उडणाऱ्या गाड्या हे शेट्टीच्या सिनेमांचं एक व्यवच्छेदक लक्षण. यात त्या नसल्या तरी अतार्किकता मात्र अथपासून इतिपर्यंत आहे. मध्यंतरापूर्वीचं कथानक बऱ्यापैकी रचणारा व चिक्कार हसवणारा भाग नंतर एकदम गंभीर होतो. बलात्कार वगैरे विषयाला हात घालतो. ‘सिम्बा’ हे पात्र एकाच वेळी विनोद व गांभीर्याचं मिश्रण असणारा आहे. त्यामुळे पहिल्या भागात मजा आणणारा सिम्बा खासकरून फरहाद सामजीच्या संवादांनी धमाल उडवणारा नंतरच्या भागात नको इतका गंभीर होतो. ‘बलात्कार’ या विषयाकडे सामाजिक समस्या म्हणून बघायला लागतो. त्यामुळे त्याचा विनोदाचा बाज हरवतो. तो भावूक होतो. पटकथाकार व दिग्दर्शक इथं त्याच्याकडे आपण सामाजिक समस्या हाताळतो आहोत अशा दृष्टीनं बघतात. निर्भया प्रकरण व नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो वगैरे संस्थेचे दाखले दिले जातात. हा भाग संवादांच्या सहाय्यानं हाताळला जातो.

इतर छोटी पात्रं लगेच खाऊ की गिळू या नजरेनं वागायला लागतात. प्रत्येकाला मनातली चीड बाहेर काढावीशी वाटते. पडद्यावर प्रेक्षकांच्या मनातली खदखद मांडली की, तो त्याच्याशी तादात्म्य पावतो अशी काहीतरी धारणा शेट्टी व टीमची असावी. भारतीय प्रेक्षकांना प्रत्यक्षात जे करता येत नाही, ते पडद्यावरील पात्रांनी केलं की खूप आनंद मिळतो. एका अर्थानं त्यांचं कॅथार्सिस होत असावं. त्यामुळे शेट्टीला वाटतं बलात्कार व त्यावरील टाळ्यापिटू संवाद वापरले की, आपण संवेदनशील झालो. पण सोबतच्या व्यावसायिक सिनेमांच्या हातखंड्याचं काय! कथेतल्या फुलवता येणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विसर पडला की, कथेनं घेतलेलं गंभीर वळण प्रभाव टाकत नाही. ‘सिम्बा’कडे झालेलं दुर्लक्ष याचंच उदाहरण. शेट्टीच्या सिनेमांकडून खूप अपेक्षा असतात असं नाही, पण संवेदनशील विषयाचा अशा पद्धतीनं केलेला वापर खटकतो.

तनिष्क बागची, डीजे चेतस व एस. थमननी संगीतबद्ध केलेली गाणी मात्र मनात रूंजी घालणारी. राहत फतेह अली खान व असीस कौरने गायलेलं ‘तेरे बिन’ हे गाणं कथेला तोडून येत असलं तरी त्यातल्या मधाळपणामुळे ऐकीव असं. कुमार सानूच्या हिट गाण्याचं रीमिक्स ‘आंख मारे’, त्याच्या चित्रिकरणासाठी लक्षात राहणारं. इतर गाणी ठीकठाक.

अभिनयात मात्र एक से एक अभिनेते बघायला मिळतात. छोट्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर, नंदू माधव, विजय पाटकर, उदय टिकेकर, आश्विनी काळसेकर, अरुण नलावडे, नेहा महाजन, सौरभ गोखले, अशोक समर्थ, सुलभ आर्य, वैदेही परशुरामी, सारा अली खान वगैरे मंडळी दिसतात. आशुतोष राणा व सोनू सुदना इतरांपेक्षा मोठी भूमिका मिळाली आहे. त्यांनी ती नीटच सांभाळली आहे. पण रणवीर सिंगच्या झंझावाता पुढे कमीच. ‘बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ व ‘पद्मावत’मधला ‘अल्लाउद्दिन खलजी’नंतर त्याची ही भूमिका बघण्यासारखी. तीन वेगळ्या काळातल्या भूमिका करून आपण वैविध्यपूर्ण भूमिका सहज करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलंय. ‘सिम्बा’च्या भूमिकेसाठी इतरांचा विचारसुद्धा रोहित शेट्टीच्या मनात आला नसणार इतकी उत्तम भूमिका त्यानं केली आहे. निव्वळ त्याच्या अभिनयासाठी सिनेमा बघायला हवा.

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्राच्या एका कार्यक्रमात रोहित शेट्टी आला असताना त्यानं त्यांच्या समीक्षेबद्दल त्याचं प्रांजळ मत मांडलं होतं. तो म्हणाला, “तू माझ्या सिनेमांना दोन स्टार्स देतेस तरीही तू इथे मला बोलावलं आहेस.” समीक्षकांनी आपल्याला नाकारलं म्हणून त्यांच्यावर आगपाखड न करणारा, कथांबद्दल सुस्पष्ट व प्रामाणिक असणारा हा दिग्दर्शक... त्यानं त्याचं बलस्थान असणारेच सिनेमे बनवावेत.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................