‘पुणे-मुंबई-पुणे-३’ : कौटुंबिक मनोरंजन नाट्याचा तिसरा अंक 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘पुणे-मुंबई-पुणे-३’चं पोस्टर
  • Sat , 08 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie पुणे-मुंबई-पुणे-३ Mumbai Pune Mumbai 3 स्वप्निल जोशी Swapnil Joshi मुक्ता बर्वे Mukta Barve सतीश राजवाडे Satish Rajwade

लेखक-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी कौटुंबिक मनोरंजनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबई यांच्यातील जगजाहीर खुन्नस दाखवण्यासाठी अगदी सुरुवातीला ‘पुणे-मुंबई-पुणे’ हा चित्रपट केला. त्यामध्ये स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही तरुण जोडगोळी होती. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर त्याचा सिक्वेल म्हणजे ‘पुणे-मुंबई-पुणे-२’ हा पुढील भाग काढला. त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याचाही सिक्वेल आला. तो म्हणजे ‘पुणे-मुंबई-पुणे-३’ हा चित्रपट होय.

‘पुणे-मुंबई-पुणे’च्या पहिल्या भागात गौरव आणि गौरी (स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे) यांचे प्रेम जमते, दुसऱ्या भागात अर्थातच त्यांचे लग्न होते आणि आता तिसऱ्या भागात लग्नानंतर अपेक्षित असलेल्या ‘वंशवेल’ विस्ताराचे प्रकरण दाखवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाला तशी ठाशीव कथा नाही.  मुख्य कलाकारांसह मागच्याच भागातील काही कलाकारांना घेऊन कौटुंबिक मनोरंजन नाट्याचा हा तिसरा अंक पार पाडण्यात आला आहे. अर्थात मनोरंजनाच्या दृष्टीने हा अंक अधिक उठावपूर्ण झाला आहे. कारण या चित्रपटात गौरव आणि गौरी बरोबरच गौरीला होऊ घातलेल्या बाळांनीही मजा आणली आहे. 

मागील पानावरून पुढे जायचे असल्याने या चित्रपटात अपेक्षेप्रमाणे पुढील कथानक पाहायला मिळते. गौरव आणि गौरीचे लग्न होऊन तीन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. दोघंही स्वतःच्या करिअरच्या मागे आहेत. त्यामुळे दोघानांही तसा वेळ नाही, मात्र नकळत ‘घोटाळा’ होऊन बसतो. एका टेस्टमध्ये गौरी गरोदर असल्याचे निष्पन्न होते. उभयतांच्या घरातील ज्येष्ठ मंडळींना साहजिकच ही ‘गोड बातमी’ कळल्याने आनंद होतो. मात्र दोघांनाही स्वतःचे ‘करिअर’ महत्त्वाचे असल्याने दोघेही ‘आताच मूल नको’ या निर्णयाप्रत येतात. त्यातही ‘आई’ होणे हे गौरीला लगेच झेपणार नाही असे वाटून गौरव या निर्णयावर ठाम राहतो.

मात्र पुढे परिस्थितीच अशी येते की, गौरी गौरवला डावलून आधीचा आपला निर्णय बदलते आणि ‘आई’ होण्याचे ठरवते. त्यामुळे आधीच्या निर्णयामुळे नाराज झालेले दोघांचेही आई-वडील आनंदीत होतात आणि नव्या पाहुण्यांच्या स्वागताला उत्साहाने तयार होतात. या अपेक्षित कथानकात शेवटी थोडेसे नाट्य दाखवल्यामुळे उत्कंठेबरोबरच ते चांगले मनोरंजकही झाले आहे. 

‘पुणे-मुंबई-पुणे-३’ या तिसऱ्या भागातही सुरुवातीला गौरी आणि गौरवचे ‘पुण्या-मुंबई’बाबतचे ‘गौ-गौ’ चालूच असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे थोडीफार मजा येते. गौरी आणि गौरव ही जोडगोळी आधुनिक काळातील असल्याने ‘मूल’ होण्याबाबतचे त्यांचे विचार हे आधुनिक पिढीला साजेसे असेच आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे कथानकात निर्माण झालेले नाट्य पुढे काही काळ चांगले टिकून राहते. मूल उशीरा होऊ देण्याकडे आधुनिक पिढीचा वाढत असलेला कल आणि त्याचा घरातील जुन्या पिढीला होणारा त्रास आणि त्यातून निर्माण होणारे मतभेद या महत्त्वाच्या प्रश्नावरही या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

गंमत म्हणजे अशा निर्णयामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत ‘पोटातून येऊ घातलेल्या बाळांनी’ पडद्यावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया ऐकायला मिळते. दिग्दर्शकाच्या या नव्या ‘कल्पने’मुळे मनोरंजनात चांगली भर पडली आहे. 

कथानक पूर्णपणे कौटुंबिक असल्यामुळे साहजिकच संवादावर अधिक लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे मध्यंतरापर्यंत खुसखुशीत घरगुती संवाद आणि त्याच्या जोडीला कलाकारांचे अभिनय चांगली करमणूक करतात.

मध्यंतरानंतर मात्र कथानकात थोडासा रटाळपणा येतो. काही ठराविक प्रसंग ‘मालिके’तील वाटायला लागतात. मात्र शेवटी कथानकात जे नाट्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळे कथानकाची उत्सुकता पुन्हा वाढायला लागते. आणि ‘पुणे-मुंबई-पुणे’चा प्रवास त्याच्या शेवटासह चांगला होतो. 

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी गौरव आणि गौरीच्या भूमिकेत याही चित्रपटात धमाल केली आहे. उभयतांची ‘केमिस्ट्री’ वरचेवर परिपक्व झाली असल्याचे प्रत्यंतर या चित्रपटात आले आहे. त्यांना प्रशांत दामले यांनी ‘संवादिनी’ बरोबरच अभिनयाचीही चांगली साथसंगत केली आहे. याशिवाय सुहास जोशी (आज्जी), रोहिणी हट्टंगडी (मावशी), सविता प्रभुणे आणि विजय केंकरे (गौरीचे आई-वडील) आदी कलाकारांच्याही भूमिकाही चांगल्या झाल्या आहेत. नीलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही विरंगुळा निर्माण करतात. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......