उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारी मागील इंगित काय आहे? आताच त्यांना राममंदिर का आठवलं?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’ या घोषणेचं शिवसेनेचं पोस्टर
  • Wed , 21 November 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi संघ RSS शिवसेना Shiv Sena उद्धव ठाकरे Uddhav Thackeray राममंदिर Ram temple चलो अयोध्या Chalo Ayodhya Chalo Varanasi

‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ ही घोषणा देत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत दाखल होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांना खुले आम शाबासक्या दिल्या होत्या, त्यांच्याविषयी गर्व बाळगला होता. पण ते कधी अयोध्येत भगवान रामाला भेटायला गेले नव्हते. एकूणच बाळासाहेब महाराष्ट्राबाहेर फार जात नसत. त्यामागे सुरक्षेची कारणं दिली जात. बाळासाहेबांचे टीकाकार मात्र म्हणत की, बाळासाहेब बाहेर जायला घाबरतात, मातोश्री सोडत नाहीत. ते काहीही असो, पण बाळासाहेब अयोध्येत गेले नाहीत. मात्र आता उद्धव ठाकरे जात आहेत.

दोन दिवस उद्धव, त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत आणि इतर नेते अयोध्येत असतील. तिथं उद्धव साधू, बैरागी आणि गोसाव्यांच्या भेटी घेतील. शरयू नदीच्या किनारी महाआरती करतील आणि ‘राम मंदिर का बांधले नाही?’ म्हणून भारतीय जनता पक्षाला जनसंवाद सभेत जाब विचारतील.

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारी मागील इंगित काय आहे? आताच त्यांना राममंदिर का आठवलं? भाजप राममंदिर बांधायला उशीर करतंय हा साक्षात्कार शिवसेनेला आताच का झालाय? हे समजून घेताना राममंदिराचा प्रश्न गेली तीस  वर्षं भारतीय राजकारणात कसा निवडणुकीच्या आणि ‘वोट बँके’च्या मतलबाचा मुद्दा झालेला आहे हे समजून घ्यावं लागेल. गेल्या तीस वर्षांत केंद्रात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सरकारं आली. भाजपच्या वाजपेयी सरकारमध्ये शिवसेनाही सहभागी होती. या सर्व सरकारांनी राममंदिराच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल  मानण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमीच्या जागेची सुनावणी सुरू आहे. या जागेची मालकी कुणाची, हे न्यायालय सांगेन त्याप्रमाणे या प्रकरणातील सर्वांनी मानायचं असं ठरलेलं आहे. 

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

मात्र न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहायची सोडून शिवसेना आक्रमक झाली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही झडझडून जागा झाला आहे. राममंदिर बांधण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तो पास करावा, अशी संघ परिवाराची भूमिका आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटना या मुद्द्यावर जोर-बैठका काढायला लागल्या आहेत. भाजपमधील काही खासदार खुलेआम भाषणं ठोकत आहेत की, ‘नरेंद्र मोदी महान पीएम आणि योगी आदित्यनाथ अतिमहान सीएम, फिर भी टेंट में भगवान श्रीराम!’

शिवसेना, संघ परिवार आणि भाजप यांनी राममंदिराचा मुद्दा तापवायला सुरुवात केली, त्यामागचं खरं इंगित २०१९ च्या लोकसभेची निवडणूक हे आहे. गेली साडेचार वर्षं संघ परिवार झोपला होता काय? शिवसेना केंद्र आणि राज्यात भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा लाभ चाखत आहे, तेव्हा राममंदिर का आठवलं नाही?

मोदी सरकारचं हे पाचवं आणि शेवटचं वर्ष आहे. या सरकारवर देशभर जनता नाराज होत चालली आहे आणि झपाट्यानं जनमत विरोधात जातंय. अर्थात हे मोदी आणि भाजपलाही कळून चुकलंय. जनमत भाजपच्या विरोधात जातंय हे संघ परिवाराला परवडणारं नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे तिन्ही पॉवरबाज नेते आज संघ परिवाराची ओळख आहे. हे नेते असताना जर जनमत विरोधात जात असेल आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसून सत्ता जाणार असेल तर संघ परिवाराच्या तोंडचं पाणी पळणं स्वाभाविक आहे. 

मोदी सरकारच्या विरोधात जनमत का जात आहे? राफेल घोटाळा, नोटबंदी, पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किमती, त्यातून वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न मिळणं आणि देशभर वाढणारी बेरोजगारीची भयानक समस्या, हे प्रश्न मोदी सरकारला सोडवता आलेले नाहीत. काळा पैसा आणू, वर्षाला दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, १५ लाख रुपये प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात टाकू ही आश्वासनं लबाडीची होती, ही भावना लोकांमध्ये वाढली आहे. तेव्हा आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांना सामोरं कसं जायचं या चिंतेत भाजप आणि संघ परिवार आहे. म्हणूनच कालच्या दसऱ्याला नागपुरातल्या संघ मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या प्रश्नाला जाहीर समर्थन दिलं. आणि उद्धव ठाकरे यांनीही मुंबईत शिवाजी पार्कवर ‘चलो अयोध्या’ची हाक दिली. 

भाजप आणि शिवसेना या दोन्हीं पक्षांची एकमेकांशी स्पर्धा आहे, हिंदुत्ववादी मतदार आकर्षित करण्यासाठी ती आहे. आजपर्यंत ही स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक अशा शहरी भागांत असे. आता सेना अयोध्येत जाऊन ही स्पर्धा अधिक तीव्र करू पाहत आहे.

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

शिवशेना हा प्रादेशिक पक्ष, त्यानं खरं म्हणजे राज्यातल्या गंभीर प्रश्नावर राजकारण करावं, पण सेना आता राममंदिर प्रश्नात पुढे होऊन देशव्यापी बनण्याच्या नादात प्रादेशिक आत्मा समाप्त करून घेतेय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. सेनेची अडचण अशी आहे की, मुंबईत आत्ता त्यांना मराठी आणि परप्रांतीय या मुद्द्यावर मतांची विभागणी करून प्रभावी राजकारण करता येत नाही. सध्या राज्यात दुष्काळ आहे, शेतकरी हैराण आहे, पण या प्रश्नावर शिवसेना टोकाचा संघर्ष करू इच्छित नाही, कारण भाजप बरोबर सत्तेत बसून त्याची फळं चघळत राहणं सेनेला आवडतं. या भूमिकेमुळे आपण सत्ताधारी की विरोधी, या गोंधळाच्या वातावरणात सेना आमदार आणि सामान्य शिवसैनिक आहेत. ही विसंगती लपवण्यासाठी सेनेनं राममंदिर आणि अयोध्यावारीचा आसरा घेतलेला दिसतोय. 

संघ परिवार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राममंदिराचा मुद्यावर देशात मतदारांची विभागणी करण्याची खेळी खेळेल असं दिसतंय. त्यात भाजपशी स्पर्धेत आपणही मागे राहायचं नाही, असा सेनेचा इरादा दिसतोय. संघ परिवार आणि सेनेच्या या ‘वोट बँके’च्या राजकारणाला मतदार किती भुलेल, हे येत्या काळात पाहायला मिळेलच.

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......