‘फर्स्ट मॅन’ : चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या माणसाची गोष्ट
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘फर्स्ट मॅन’चं पोस्टर
  • Sat , 20 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie फर्स्ट मॅन First Man डॅमियन चॅझेल Damien Chazelle रायन गॉसलिंग Ryan Gosling

डॅमियन चॅझेलला या पिढीतील सर्वाधिक प्रभावशाली दिग्दर्शक मानता येईल. ‘गाय अँड मॅडेलिन ऑन अ पार्क बेंच’, ‘व्हिपलॅश’ आणि ‘ला ला लँड’ या तीनच चित्रपटांच्या माध्यमातून त्यानं थक्क करायला लावणारा क्राफ्ट, अनेकविध लोकांची अभिनयातील जुगलबंदी, कलर पॅलेट्स आणि परिणामकारक पार्श्वसंगीत-साऊंडट्रॅक या गोष्टींच्या माध्यमातून या माध्यमाची आपली जाण स्पष्ट केली आहे. ड्रमर बनण्याच्या ध्येयानं पछाडलेला नायक ते २१ व्या शतकातील सर्वोत्तम प्रेमकथेच्याही पल्याड जाणारी कथा, अशा कुठलीही समानता नसणाऱ्या चित्रपटांचं दिग्दर्शन केल्यावर त्याच्या अनिश्चिततेला जागत नील आर्मस्ट्राँगचा चरित्रपट समोर आणत या प्रकारातील बार अधिकच उंचावर नेऊन ठेवला आहे.

साठच्या दशकात स्पेस शटलची चाचणी करताना त्यावरील नियंत्रण हरवून, मृत्यूच्या दाढेतून परतत असताना जेव्हा स्पेस शटल वातावरणाच्या बाहेर फेकलं जातं, तेव्हा नीलला (रायन गॉसलिंग) दिसलेली निळसर चमक त्याच्या या एका ग्रहाच्या पलीकडे असलेल्या विश्वाबद्दलच्या आकर्षणात भर घालते. त्या क्लॉस्ट्रोफोबिक वातावरणाच्या निमित्तानं चित्रपटातील पुढे येणाऱ्या खिळवून ठेवणाऱ्या दृश्यांचा मूलभूत परिचय होतो. त्यानंतर लगेचच नील आपल्या मुलीला, कॅरनला कॅन्सरच्या टेस्ट्स देताना पाहताना दिसतो. लगेचच अंत्यसंस्कार करून परतल्यावर तो जेव्हा रडताना दिसतो, तेव्हा तिच्या मृत्यूपश्चात पृथ्वीवरील मानवी घडामोडींशी असलेलं त्याचं नातं काहीसं संपुष्टात येतं, असं म्हणायला वाव मिळतो.

बाब साधी असते. त्याच्या वैवाहिक, वैयक्तिक जीवनात तुटकपणा निर्माण झालेला असतो. आंतरिक पातळीवरील त्याची लढाई अवकाश मोहिमा आणि वैयक्तिक जीवन या दोन्हीही ठिकाणी खंबीरपणे टिकून राहण्याची असते. तर दुसरीकडे त्याची पत्नी, जेन (क्लेयर फॉय) तो त्याच्या कुटुंबापासून (लिटरली आणि मेटफरिकली, दोन्ही प्रकारे) दिवसेंदिवस दूर असताना ‘नसतोस घरी तू जेव्हा’ म्हणत सगळं काही सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसते. त्यामुळे साहजिकच या दोन्हींच्या मिलापानं चॅझेल अवकाशात असताना नील आणि त्याचे सहकारी जीवन-मरणाची झुंज देत असतानाच्या किंवा वैश्विक पातळीवर महत्त्वाच्या मोहिमांची आखणी करतानाच्या दृश्यांदरम्यान जेनच्या पृथ्वीवरील, घरातील आयुष्यातील दृश्यं दिसतात. नील संपूर्ण विश्वासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टी करत असतो, तर जेन त्याच्या पश्चात त्याचं ‘विश्व’ सांभाळते.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

‘जेमिनी ८’, ‘जेमिनी १०’ आणि इतरही प्रकल्पांदरम्यान नील आणि त्याचे सहकारी अपयशी होतात. पुढे ‘अपोलो ११’च्या पूर्वतयारीदरम्यानही सहकारी गमावताना रोव्हर सुरळीतपणे उतरत नसल्याचं दिसतं. अशा वेळी नील म्हणतो तसं ‘आपण इथं अपयशी होणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण अवकाशात, मूळ मोहिमेदरम्यान अपयशी होणार नाही याची खात्री करता येईल’.

‘फर्स्ट मॅन’ साधारणतः हेच स्पिरिट घेऊन वावरतो. अपयशी न होणं किंवा झालं तरी त्याची पुनरावृत्ती होऊ न देणं. कारण चरित्रनायक, त्याची पत्नी आणि इतरही लोकांना आपण वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यात बऱ्याचदा अपयशी होताना पाहतो. पण सोबतच दरवेळी तितक्याच जोमानं उभं राहतानाही पाहतो. दॅट्स व्हॉट इट्स अबाऊट.

दिग्दर्शक चॅझेल आणि सिनेमॅटोग्राफर लिनस सँडग्रेन आर्मस्ट्राँगची पर्सनल स्पेस ते शब्दशः ‘स्पेस’ ही दोन्हीही अवकाशं तितक्याच प्रभावीपणे समोर आणतात. ज्यामुळे आपल्याला क्लॉस्ट्रोफोबिक ओपनिंग सीननंतरही पडदा व्यापून टाकणारे क्लोज-अप्स, समोर दिसणारे आकडे, ह्युस्टन आणि अवकाशयानातील केबिन अशा दोन्ही स्तरांवरील तणाव आणि वारंवार क्लॉस्ट्रोफोबिया, एक प्रकारची सेन्स ऑफ अर्जन्सी आणि तणाव या सर्व भावना जाणवत राहतात. कॅरनच्या मृत्यूनंतर काहीच काळानं कामावर निघताना जेनला निरोप दिल्यावर काही काळ शेजारी असलेल्या रिकाम्या बेडवर रेंगाळणारा कॅमेरा तेवढ्या एकाच फ्रेममधून तिच्या जाण्यानं त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीचं दर्शन घडवतो. ‘अपोलो ११’च्या मूळ मोहिमेदरम्यान यानात बसण्याआधी क्षितिजसमांतर पसरलेला जांभळा रंग ‘ला ला लँड’ किंवा ‘व्हिपलॅश’मधील फ्रेम्सइतकाच सुखावून जातो. खासकरून जेव्हा आधीच्याच दृश्यात डिक स्लेटनसमोर (काईल चँडलर) यदाकदाचित ‘अपोलो ११’ मोहीम अयशस्वी ठरलीच तर अंमलात आणल्या जाणाऱ्या गोष्टींचं अधिकृत पात्र वाचलं जातं, तेव्हा त्या स्वप्नाळू दृश्याचं महत्त्व अधोरेखित होतं.

या सर्व गोष्टींना चॅझेलचा नेहमीचा साथीदार जस्टिन हरविट्झ आपल्या नोट्स घेऊन हजर असतोच. त्याचं स्ट्रिंग्ज छेडणं किंवा पियानो कीवरून बोटं फिरवणं किंवा समोरील दृश्याला ड्रम स्टिक्सनं साथ देणं किंवा इतरही वाद्यं स्वर्गीय अनुभूती प्राप्त करून देतील अशा प्रकारे वाजवणं सगळं काही परिपूर्ण आहे. त्याची ‘द मून लँडिंग’ चॅझेलच्या दृश्य स्वरूपातील मून लँडिंगशी तितक्याच सुंदरतेनं जुळून येते. ती दोघं एकत्र येतात, तेव्हा डोळ्यात पाणी आणणारा दृकश्राव्य अनुभव येणं ठरलेलं. पाय थिरकणं, हवेत बोटं फिरवणं ड्रम्सच्या बीट्स किंवा कीबोर्डवरील की किंवा व्हायोलिन, व्हायोला किंवा दुसऱ्याही कुठल्या वाद्याची तार छेडली गेल्यावर मानवी हृदयाची तार छेडली जाणंही ठरलेलं.

एकूणच चॅझेल जेव्हा आपापलं काम जाणणाऱ्या अनेक लोकांना एकत्र आणतो, त्यानंतर जे तयार होतं तो सिनेमा असतो. इथंही रायन, क्लेयर, काईल, जेसन क्लार्कसारखे लोक पडद्यावर पात्रांना जिवंत करतात, चॅझेलची दृष्टी ते सगळं थक्क करणाऱ्या प्रकारे टिपते आणि त्याला जस्टिन आपल्या स्कोअरनं सांगीतिक साथ देतो. प्रत्यक्ष मून लँडिंग झाल्यावर क्लिंट इस्टवूडप्रमाणे राष्ट्रप्रेम समोर न आणत (गमतीची बाब अशी की काही काळापूर्वी क्लिंटचं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलेलं होतं), अमेरिकन राष्ट्रध्वज उभारताना न दाखवता तो नंतर कधीतरी अगदीच आकस्मिकपणे दिसतो. कारण आर्मस्ट्राँग म्हणतो तसं हे कुणा एका राष्ट्रासाठीच नव्हे तर एकूणच विश्वासाठी, मानव प्रजातीसाठी महत्त्वाचं असं पाऊल होतं. म्हणूनच हा ‘फर्स्ट अमेरिकन मॅन’ नसून फक्त ‘फर्स्ट मॅन’ आहे!

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......