भारतमातेने जेवू घातले त्याची गोष्ट
पडघम - देशकारण
मिलिंद बोकील
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 18 October 2018
  • पडघम देशकारण मिलिंद बोकील Milind Bokil भारतमाता Bharat Mata

सामाजिक अभ्यासाच्या निमित्ताने देशाच्या निरनिराळ्या भागांत जाण्याची संधी मिळत असते. जी गावे आपण कधी पाहिलेली नसतात, ज्यांची नावेही कधी ऐकलेली नसतात, अशा ठिकाणी जाण्याचा योग येत असतो. एरवी माणसे सगळीकडे सारखीच असतात आणि ग्रामीण वातावरणही सारखे असते; पण कधी कधी असा अनुभव येतो की, त्यामुळे आपल्या मनाची कवाडे एकदम उघडल्यासारखी होतात.

त्या गावाचे नाव बिलखेडा असे होते. जिल्हा भोपाळ, मध्य प्रदेश. भारताच्या अगदी मध्य भागातले, गाभ्यातले असावे असे गाव. भोपाळमध्ये ‘मुस्कान’ नावाची एक संस्था खेडेगावातल्या मुलांसाठी काम करत होती. शहरातल्या मुलांना शाळेव्यतिरिक्त शिकवण्या, क्लासेस, खेळघर अशा निरनिराळ्या सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास तर सुधारतोच, पण अभ्यासाशिवाय इतरही गोष्टी करायची संधी मिळते. खेडेगावांमध्ये असे वातावरण नसते. तिथे शाळा असते, पण ती अगदी सरधोपट पद्धतीची. तिथले शिक्षण काही आनंददायक नसते. घरी कोणी अभ्यास करून घेत नाही. गोष्टींची पुस्तके वाचायला मिळत नाहीत. नवनवीन खेळ खेळायला मिळत नाहीत. कोणी नाचगाणी शिकवत नाही. खेड्यातल्या मुलांची वाढ त्यामुळे खुंटल्यासारखी होते. ती सगळ्याच बाबतीत मागे पडत जातात.

ही परिस्थिती सुधारावी म्हणून मुस्कान संस्था निरनिराळ्या गावांमध्ये पूरक शिक्षणाची केंद्रे चालवत होती. ती केंद्रे कशी चालतात ते आम्ही बघत होतो. सोबत संस्थेच्या भोपाळ ऑफिसमधली एक कार्यकर्ती होती- तिला आपण गीता म्हणू. तिच्यासोबत एक स्थानिक कार्यकर्ती होती, तिचे नाव रेश्मा. सकाळपासून एकामागून एक गावे बघत हिंडत होतो. तसे करता-करता दुपार झाली. रेश्माचं गाव बिलखेडा होतं. त्या गावाला नंतर जायचं होतं. आधीच्या गावात गेल्यावर गीता म्हणाली की, इथलं काम संपलं की आपण वाटेत कुठे तरी जेवण करू आणि मग बिलखेड्याला जाऊ. तेव्हा रेश्मा म्हणाली, की वाटेत कुठे जेवायची सोय नाही. त्यापेक्षा तुम्ही माझ्या घरी चला आणि तिथे जेवा. मी घरी फोन करून आईला सांगते. आपण पोहोचेपर्यंत आणि बाकीचे काम करेस्तोवर आई जेवण करून ठेवेल.

गीताने मला विचारले की, तुम्हाला चालेल का हे?

नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आपल्या घराबाहेर पडलो की जेवण कुठे तरी दुसरीकडे घ्यावे लागणार, हे उघडच असते. अशा वेळी एरवी ढाब्यात किंवा हॉटेलात जेवतो. पण तसे करण्याऐवजी कोणी जर घरी जेवायला चला म्हटले, तर ते कधीही चांगलेच. काही लोकांचे असे व्रत असते की, परक्या घरात जेवायचे नाही. माझे तसे अजिबात नव्हते. उलट कोणी प्रेमाने बोलावून जेवण वाढले, तर ते अंगाला अधिक लागते अशीच श्रद्धा. ते कोणी ज्या भावनेने ते करेल त्याचा नम्रपणे स्वीकार करायचा. त्या वेळी आपण त्यांना काय देणार, असा विचार मनात आणायचा नाही. माणसांनी एकमेकांना जेवू घालायचे, ही आपली परंपरा आहे. ते त्यांच्या घरी तसे करत असतील, तर आपण आपल्या घरीही तसेच करायचे. मी ‘हो’ म्हटले.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

बिलखेड्याला पोहोचलो. आधी तिथल्या शाळेला भेट द्यायची होती. तिथले शिक्षण कसे आहे ते बघायचे होते. शिक्षकांशी आणि मुलांशी बोलायचे होते. तिथे काय सोयी आहेत, काय अडचणी आहेत ते पाहायचे होते. ते केले आणि मग रेश्माच्या घरी गेलो.

तिचे घर शेतात होते. मातीच्या भिंती. कौलांचे छप्पर. घराभोवती मोकळे अंगण होते. त्यात दोन-तीन झाडे लावलेली. शेतीचे सामान ठेवलेले. गवताच्या गंजी. जनावरे बांधण्यासाठी लाकडी खुंट. जमीन चापूनचोपून घट्ट बसवलेली. घरासमोर उतरती पडवी. त्यात खाटा टाकलेल्या. दुपार भरात आलेली. सभोवार गव्हाचे पीक ताठ उभे होते. एका पट्ट्यात सूर्यफुले टवकारून बघत असलेली.

आम्ही अंगणात हात धुऊन आत गेलो. एकच मोठी-लांब खोली होती. स्वयंपाकघर आतल्या भागात होते. जमीन शेणामातीने सारवलेली. त्या सारवल्याचा वास सगळीकडे भरून राहिलेला. फारसे काही सामान नव्हते. शेतकऱ्याच्या घरात असते तसे. कोपऱ्यात दोन खाटा ठेवलेल्या. एका घडवंचीवर रचलेल्या गोधड्या. भिंतीला कुदळ-फावडी टेकून ठेवलेली. दोरीवर कपडे टांगलेले. खुंटीला लटकवलेल्या पिशव्या. देवादिकांच्या तसबिरी. रेश्माचे वडील घरात नव्हते. ते जनावरे घेऊन दुसरीकडच्या शेतात गेलेले.

खोलीच्या मधोमध सतरंजीची पट्टी घातली होती. त्यावर आम्ही बसलो. मी, गीता, गाडीचा ड्रायव्हर. रेश्मासुद्धा बसली, कारण तिला नंतर आमच्यासोबत यायचे होते. घरात तिची लहान बहीण होती. तिने स्वयंपाकघरातून स्टीलची ताटे समोर आणून ठेवली. जेवण साधेच होते. त्या भागात करतात तशा गव्हाच्या बाट्या बनवलेल्या होत्या, शेगडीतून नुकत्याच काढलेल्या. त्याच्यासोबत तुरीची डाळ. बटाट्याची भाजी. कांदा. मिरची.

थोड्या वेळाने रेश्माची आई आतून बाहेर आली आणि आमच्यासमोर येऊन बसली. मध्यम वय. अंगात रंगीत सुती साडी. डोक्यावरून पदर घेतलेला. त्यातून काही पांढऱ्या बटा डोकावत असलेल्या. चेहरा हसतमुख, पण शेतात काम करून रापलेला.

आम्ही जेवू लागलो.

रेश्माची आई समोर बसून हवं-नको बघू लागली. बाट्या चुरून कशा खायच्या, ते तिने दाखवलं. मुलीला सांगून डाळ आणखी वाढायला लावली. पानातल्या बाट्या संपल्या तशा आणखी घ्यायला लावल्या. भाजी वाढली. ‘सावकाश जेवा’ म्हणाली. तिच्या हातात लहानसा पंखा होता. ती तो स्वत:भोवती फिरवत होती. मधून-मधून आम्हालाही वारा घालत होती.

जेवणाला स्वाद होता. दमदार गहू. मध्य भारतातली टपोरी डाळ. सगळे जिन्नस त्यांच्या शेतातलेच असणार. ताटातून वाफा येत होत्या. त्या सगळ्या पदार्थांना रानातल्या मातीचा आणि चुलीचा वास होता. गावरान हळदीची आणि मिरचीची चव होती.

हा कोणता योगायोग आहे, ते मला कळेना. ते देशाच्या आतल्या भागातले कुठले तरी दूरचे गाव. मी कुठून तरी लांबून आलेला एका वेळेपुरता पाहुणा. तसे पाहिले तर त्यांच्याशी काहीच नातेगोते नसलेला. पुन्हा तिथे कधी येईन की नाही, पुन्हा कधी गाठभेट होईल की नाही- काहीच माहीत नसलेला. पण तरीही ह्या घरात बसून मी जेवतोय. ह्या घरात माझ्यासाठी स्वयंपाक केला गेलाय, कोणी तरी आग्रहाने मला वाढतंय, माझ्या भुकेची काळजी घेतंय.

जेवण झाल्यावर आम्ही निघालो. रेश्माच्या घरच्यांचा निरोप घेतला. गाडीत बसलो. दुसऱ्या गावाला जायचे होते. रस्ता आधीसारखाच ग्रामीण भागातला होता. दोन्ही बाजूंना हिरवी-पिवळी शेतं उभी होती. दुपारचे पिवळेधमक ऊन होते. लोंब्या वाऱ्यावर लहरत होत्या.

त्या सगळ्या दृश्याकडे बघता-बघता मनात आले की, मला कोणी जेवू घातले होते? वरकरणी पाहिले तर ती रेश्माची आई होती. त्या लहानशा खेड्यातली, चुलीपुढे बसणारी एक साधीभोळी, कदाचित अशिक्षित स्त्री. मला संपूर्णपणे अनोळखी. पण वेगळ्या दृष्टीने पाहिले, तर तिला ‘भारतमाता’च म्हणायला पाहिजे. मी असाच विचार करायला पाहिजे की, मला ‘भारतमाते’नं जेवू घातलं आहे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

आणि ते खरेच होते. ‘भारतमाता’ जर असलीच, तर अशीच असणार. राजस्थानात आणि मध्य प्रदेशात मी ‘भारतमाते’ची नव्याने बांधलेली मंदिरे पाहिली होती. कॅलेंडरवर चित्रे पाहिली होती. त्यामधली ‘भारतमाता’ भरजरी, शुभ्र रेशमी पातळ घातलेली होती. सिंहावर स्वार. डोक्यावर सोनेरी मुकुट. अंगात अलंकार. एका हातात भाला, दुसऱ्या हातात ध्वज!

पण ‘भारतमाता’ अशी कशी असेल? ‘भारतमाता’ तर रेश्माच्या आईसारखीच असेल. हाताला घट्टे पडलेली. पायांना भेगा. चेहरा उन्हात रापलेला. केसांत पांढऱ्या बटा. ती काम करून श्रमलेलीच असेल. पहाटे लवकर उठलेली. पाण्याच्या खेपा करून दमलेली. तिच्या हातात भाला कसा असेल? तिच्या हातात तर खुरपं असणार. आणि ती सिंहावर स्वार कशी होईल? तिला तर म्हशीला चारा घालायचा असेल. कोंबड्यांना दाणे टाकायचे असतील. संध्याकाळचं कालवण करायचं असेल.

मग मला दुसरेही सत्य कळले. भारतमातेची व्याख्या आपण अशी करतो की, भारत हीच माता. हे काही प्रमाणात खरे असेल. देश हीच माता. पण खरे तर ते उलट आहे. माता म्हणजेच भारत. त्या ज्या सगळ्या आमच्या माता आहेत- कुणी नवरा असलेल्या, कुणी नसलेल्या, कुणी मुलाबाळांतल्या, कुणी एकट्या, कुणी घरातल्या, कुणी घर सोडलेल्या- त्या म्हणजेच भारत.

देश म्हणजे माता असेल; पण खरं तर जे मातृतत्त्व आहे, ते म्हणजेच देश!

(‘साधना’ साप्ताहिकाच्या ६ ऑक्टोबर २०१८च्या अंकातून.)

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 18 October 2018

लेखाशी शंभर टक्के सहमत. अर्थात भारतमाता ही देवीच्या स्वरूपात पुजली जात असल्याने तिचा पेहराव देविसारखा असणे क्रमप्राप्त आहे. -गामा पैलवान


आयोजक संस्थेने व महामंडळाने झुंडशाहीपुढे व दबावापुढे जो लोटांगण घालण्याचा भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी प्रक्षुब्ध आहे!

यवतमाळच्या आयोजक संस्थेने व महामंडळ, त्याचे अध्यक्ष यांनी उद्घाटक म्हणून भारताच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भीड पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्या नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आधी निमंत्रण देऊन मग ते मागे घेतल्याचा जो अगोचरपणा आणि झुंडशाहीपुढे व दबावापुढे लोटांगण घालण्याचा जो भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी उदास आहे, चिंतीत आहे आणि त्याहून जास्त प्रक्षुब्ध आहे.......