कविता ‘शिकविण्यापेक्षा’, तिचं ‘राजकारण’ का होतंय?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • दिनकर मनवर यांचा कवितासंग्रह
  • Tue , 09 October 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar दिनकर मनवर Dinkar Manvar पाणी कसं अस्तं दृश्य नसलेल्या दृश्यात

कवी दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेवरून, खरं तर त्या कवितेतल्या एका ओळीवरून आणि ओळीतल्या दोन शब्दावरून अस्मितेचं जे राजकारण तापलंय, ते आजच्या सोशल मीडियाच्या आक्रस्ताळी, विखारी, बेबंद, विवेकहीन प्रवृत्तीला साजेसंच आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, जग पुढे नेतं किंवा ते पुढे नेण्यासाठी वापरावं असं अभिप्रेत असतं. पण भारतात सध्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मुसक्या आवळून, त्याच्यावरच स्वार होत टोळीयुगाकडे जाण्याचा प्रवास सुरू आहे.

‘पाणी कसं अस्तं’ ही दिनकर मनवर यांची पाण्यावरची कविता त्यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहात आहे. ती यंदा मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाला अभ्यासाला आहे. विद्यापीठाची एक स्वायत्त समिती पुस्तकांची निवड करत असते. ज्यात साहित्य कळणारे लोक असतात. विद्यापीठानं त्यांना सर्वाधिकार दिलेले असतात. आता ही कविता अभ्यासाला कधीपासून आहे, याचा तपशील मिळालेला नाही. असो. कालच्या रविवारी प्रमुख दैनिकांत त्यावर लेख आलेत. सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधक यांचं तुंबळ युद्ध चालू आहे. दरम्यान दिनकर मनवरांनी माफी मागून कविता अभ्यासातूनच काढून घेतलीय. थोडक्यात मनवरांनी त्यांच्यातल्या लेखकाची झुंडीनं केलेलेली हत्या स्वीकारलीय.

बातम्या, लेख, चर्चा यात ती पूर्ण कविता (सोशल मीडिया) कुठे छापलेली आढळली नाही, वा आमच्या वाचनात आली नाही. लेखातसुद्धा ती ओळ, त्या आक्षेपार्ह ओळी, विशिष्ट शब्द अशा पद्धतीनं ज्यावर आक्षेप आहे, ती कविता अथवा ओळ कुणी दिलेली नाही. विस्तारभयास्तव दैनिकांनी ती छापणं टाळलं असावं.

रेखाचित्र - संजय पवार

आपण पहिल्यांदा ‘पाणी कसं अस्तं’ ही पूर्ण कविता वाचू.

पाणी कसं अस्तं

पाणी हा शब्द
मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीए,
मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज
मी चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून

पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार
किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या
रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर
पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ?

काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून ?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)

जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं?
पोहऱ्यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं?
पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं?
गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीतलं
या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठविले गेले नाहीत काय?
पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं?
नि दंगल घडवतं ते पाणी नस्तं?

पाणी पावसातून गळतं जमिनीवर
बर्फ वितळल्यावर पसरतं पठारावर
नदीला पूर आल्यावर वेढून घेतं गावं
धरण फुटल्यावर पांगापांग करतं माण्सांची
ते पण पाणी पाणीच अस्तं?

पाणी स्पृश्य अस्तं की अस्पृश्य?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य?
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र?
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?

आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं
की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं?
पाणी नदीतलं, नाल्यातलं, ओढ्यातलं, विहिरीतलं
पाणी तळ्यातलं, धरणातलं, सरोवरातलं, समुद्रातलं
पाणी ढगातलं, माठातलं, पेल्यातलं, डोळ्यातलं
हे पाणी कुणाच्या मालकीचं अस्तं?

पाणी नारळात येतं
छातीच्या बरगड्यात साचतं
फुप्फुसातून पू होऊन स्त्रवतं
पोटात पाण्याचा गोळा होऊन राहतं
ईश्वराचा कोणता देवदूत हे पाणी न चुकता सोडत अस्तो?

पाणी पारा अस्तं की कापूर?
जे चिमटीत पकडता येत नाही
नि घरंगळून जात राहतं सारखं
किंवा कापरासारखं जाळून जातं झर्कssन

पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या
निव्वळ पाण्यासारखा.

तर अशी ही पूर्ण कविता. नामदेव ढसाळ यांच्या ‘माण्साने’ या कवितेचा प्रभाव जाणवणारी. यातील

‘काळं असावं कदाचित

पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं

किंवा आदिवासी पोरीच्या स्तनासारखं जांभळं

किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून?

(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)’

या कडव्यातील ‘किंवा आदिवासी पोरीच्या स्तनासारखं जांभळं’ या ओळीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि श्रमजीवी संघटना यांनी तीव्र आक्षेप घेत ही कविता वगळावी, शिवाय कवी, कुलगुरू आणि शिक्षण मंडळावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीय. जिल्हानिहाय आंदोलन करून निवेदनं दिली गेलीत. श्रमजीवी संघटनेनं कवीला ‘माथेफिरू कवी’ असं म्हटलं आहे. विद्यापीठानं चौकशीची आदेश देत पुढील कारवाई करण्याचं ठरवलं आहे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

कविता तृतीय वर्ष मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेतील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात आदिवासी विद्यार्थी, इतर शहरी विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेतात. आदिवासीबहुल नंदुरबार, धुळे, गडचिरोली, मरा‌ठवाड्याचा आंध्र सीमेकडचा भाग येथील आदिवासी मुलामुलींच्या तुलनेत मुंबईला जवळ ठाणे, पालघर, रायगड भागातील मुलं-मुली महानगरी जीवनाशी परिचित आहेत. त्यामुळे ‘आदिवासी पोरीचा स्तन’ असा कवितेतील उल्लेख त्यांना लगेच शरमेनं माना खाली घालायला अथवा अंगचोर करणारा वाटण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण मुंबई विद्यापीठ व मुंबई शहर याच्याशी त्यांची सांस्कृतिक जानपहचान असणारच.

त्यामुळे या संघटनांचा आदिवासी मुलींना काय वाटेल अथवा इतर त्यांच्याकडे कसं पाहतील, हा आक्षेप तार्किक वाटत नाही. शिकताना अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतात.

याच न्यायानं मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकताना संपूर्ण महाराष्ट्रातील मुसलमान मुला-मुलींना काय वाटत असेल? उलट त्यांना तर ‘लांड्या’, ‘अफझलखान’, ‘औरंगजेब’ अशी विशेषणं लावली जातात सर्रास. मस्तानी शिकताना काय वाटत असेल? मग उद्या त्यांनी हा इतिहास वगळा म्हणायचं? आजवर ते म्हणाले?

आदिवासी स्त्रीच्या कष्टाचं, दैन्याचं, दु:खाचं, शोषणाचं वर्णन करणारं साहित्य - ज्यात कविताही आल्याच- त्याप्रमाणे तिच्या सौंदर्याचं, निर्व्याज प्रेमाचं वर्णन करणारं ‘अजिंठा’ (ना. धों. महानोर)सारखं दीर्घ काव्यही उपलब्ध आहे. ज्यावर चित्रपटही आला. ‘रेला रे’ या चित्रपटात आदिवासी जीवन आलंय. त्यासाठी स्त्री कलाकरांनी चोळी न वापरता पदरानंच भूमिका साकारल्यात. एरव्ही हे अंगप्रदर्शन ठरलं असतं. पण इथं ते रीत म्हणून येतं. आदिवासींच्या परंपरा, लग्नपद्धती, जोडीदार निवड, काडीमोड हे ‘प्रगत’ म्हणून पाहतात. घोटुल असेल किंवा ‘मी कात टाकली, मी रात टाकली, मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली’ ही आदिवासी स्त्रीची मोकळी भावना आता शहरी स्त्रिया घटस्फोटानंतर वापरू लागल्यात. कुसुमाग्रज ते ना. धों. महानोर, ते अगदी भालचंद्र नेमाडे यांच्या कविता, कादंबरीतून आदिवासी स्त्रियांच्या सौंदर्याची, देहांची वर्णनं आहेत. ती आजवर ‘कलात्मक’च मानली गेलीत. मग मनवरांच्या कवितेतील ‘जांभळे स्तन’ अश्लील, मानहानीकारक का वाटावेत? हे रंगसूचक विधान नैसर्गिक की अनैसर्गिक? यात स्त्रीत्वाचा नेमका अपमान कसा काय होतो?

संपूर्ण कविता वाचल्यावर ते ‘जांभळे स्तन’ लक्षात राहतात का कवी पाण्यावर जे प्रवाही भाष्य करतो ते?

आक्षेप घेणाऱ्यांत श्रमजीवी संघटना असावी याचं आश्चर्य वाटतं. श्रमजीवीचे विवेक पंडित हे साठोत्तरी साहित्य व ७४ नंतरच्या जनआंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व आहे. त्यांना साहित्य व समाज आणि साहित्य व सौंदर्य, त्याचं उपयोजन याची जाण आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘जांभळे स्तन’पाशी न अडता पूर्ण कविता व त्यातल्या कवीच्या वर्ग, वर्ण व पाणी संघर्षावर लक्ष केंद्रित करायला सांगावं. आज कुणा कवीच्या कवितेतल्या एका ओळीतल्या दोन शब्दांपेक्षा आदिवासी मुलांच्या अस्मितेचा प्रश्न राज्यभरातल्या आश्रमशाळा, वसतीगृह, शिष्यवृत्त्यांचे प्रश्न इथं जास्त महत्त्वाचा आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत आदिवासी मुलं-मुली लोककला शिकताहेत, काही पीएच.डी. झालेत, शिकवताहेत, तिथं लावणी शिकताना जी स्त्री देहाची, शृंगाराची वर्णनं येतात, त्यामुळे तिथले विद्यार्थी चेकाळतात का विद्यार्थिनी शरमेनं मान खाली घालतात? एकदा डॉ. गणेश चंदनशिवेंना विचारायला काय हरकत आहे?

मराठीला विद्यार्थी मिळत नसताना महाविद्यालयंच काय, विद्यापीठातील मराठीचे वर्ग बंद पडायच्या मार्गावर असताना ‘साहित्य’ साहित्यबाह्य कारणांनी बाद करून आपलं राजकारण तापवू पाहणाऱ्यांना विद्यार्थी शरण जातात हे समजू शकतो, पण शिकवणारे प्राध्यापकही त्यात सहभागी व्हावेत? विद्यापीठ यांना पगार ‘शिकवण्यासाठी’ देते की, अंतर्गत ‘राजकारण’ करण्यासाठी?

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Ajinkya Koliwa

Tue , 09 October 2018

कविता काढून टाकण्याची निसंशय काही गरज नव्हती. पण फक्त आदिवासींच्या पोरींच्या स्तनाचाच रंग जांभळा असू शकतो का ??


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......