सतीच्या कलेवराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी गळून पडले, त्या त्या ठिकाणी शक्तीपीठं निर्माण झाली!
कला-संस्कृती - कृष्णकथांजली
श्रीकृष्ण तनया
  • शंकर आणि सती
  • Tue , 02 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कृष्णकथांजली KrushnaKathanjli सती Sati शंकर Shankar दक्ष प्रजापती Daksha Prajapati

भारतीय पुराणांतील मिथककथांची ओळख करून देणारं हे नवंकोरं साप्ताहिक सदर आजपासून दर शनिवारी प्रकाशित होईल. ‘Myth’ या मूळ इंग्रजी शब्दावरून मराठीत ‘मिथ’, ‘मिथक’ हे शब्द रूढ झाले. या मिथकालाच ‘प्राक्कथा’ किंवा ‘पुराणकथा’ असंही म्हटलं जातं. ज्येष्ठ समीक्षक मिथककथांना ‘व्याजविज्ञान’ म्हणतात. म्हणजे कार्यकारणभावरिहत, केवळ कल्पनेतून निर्माण झालेलं. मात्र या कथा अदभुत, अविश्वसनीय, सुरस आणि चमत्कारिक असतात. रंजकता हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य असतं. आणि तेच या सदराचंही प्रयोजन आहे.

.............................................................................................................................................

ब्रह्मदेवाचा मानसपुत्र दक्ष प्रजापती याला राणी विरणीपासून साठ सुंदर व गुणी कन्या झाल्या होत्या. यापैकी तेरा कन्या मुनी कश्यपांना दिल्या. या पत्नींपासून मुनींनी पक्षी, नाग, गायी, अप्सरा, ब्राह्मण आदींची निर्मिती केली. दहा कन्या यमधर्माला दिल्या. दोन-दोन कन्या अनुक्रमे अंगिरस व कृशाश्‍व मुनींना दिल्या. सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या, ज्यांनी सर्व भूमंडल नक्षत्रांच्या स्वरूपात व्यापून टाकलं. उरलेल्यांपैकी एक शंकराला व बाकीच्या तर्क्ष्याला अर्पण केल्या. या सर्व कन्यांमध्ये सती ज्येष्ठ व श्रेष्ठ होती. इंद्र, वरुण, कुबेर, विष्णू व अग्नी यापैकी कुणाला तरी एकाला ती द्यावी अशी दक्षाची खूप इच्छा होती. पण ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून नाखुषीने त्यानं सतीचा विवाह भगवान शिवाबरोबर करून दिला.

एकदा प्रयाग तीर्थात सर्व ऋषींनी मिळून महायज्ञ केला. प्राचीन काळी यज्ञादि धार्मिक कृत्यं, अनुष्ठान, व्रतवैकल्यं करून मुनीवर्ग पुण्यसंचय करत असे. देवदेवतासुद्धा यज्ञाला उपस्थित राहून आपला भाग ग्रहण करून आशीर्वाद देत. यज्ञाचं फल त्वरित मिळे. असाच हा यज्ञ चालू असता शंकर आपल्या भूतगणांसह तिथं गेले. सर्वांनी उठून त्यांचा मान राखून त्यांना आसन दिलं. त्यांत ब्रह्मा-विष्णू व इंद्रादी देवसुद्धा होते. काही समयानंतर दक्षही आपल्या वैभवानिशी तिथं गेला. पुन्हा सर्वांनी उठून त्यांचं स्वागत केलं. फक्त शंकर उभे राहिले नाहीत व त्यांनी दक्षाकडे लक्षही दिलं नाही. ही गोष्ट दक्षाच्या ध्यानी येताच शंकरांनी आपला अपमान जाणूनबुजून केला आहे असा त्याचा ग्रह झाला. त्याला शंकराचा राग आला व त्यानं त्यांची नानाप्रकारे निंदा केली.

सर्वांना उद्देशून दक्ष म्हणाला, ‘‘उपस्थित जन हो, या गोसावड्याला जनरीत नाही. याच्यावर चांगले संस्कार नाहीत. अंगाला राख फासून कमरेला केवळ हस्तीचर्म गुंडाळणार्‍या व हाती कटोरा घेऊन भिक्षा मागणार्‍या या उपटसुंभाला माझी देखणी व गुणी कन्या, सती दिली हेच माझं चुकलं. पाहा कसा निलाजर्‍यासारखा आसनावर बसलेला आहे. खरं म्हणजे याचा वध करावा अशीच याची योग्यता आहे. परंतु सतीकडे पाहून मी याला फक्त यज्ञातून बहिष्कृत करतो. या भिकार्‍याला यज्ञाचा भाग देऊ नका.’’ दक्षाच्या बोलण्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही, पण शिलादपुत्र नंदी क्रोधानं फुलला व म्हणाला, ‘‘मूर्खा, जो तप, ज्ञान व यश यात सर्वश्रेष्ठ आहे, त्या माझ्या स्वामीला बहिष्कृत केलंस? तुझा अंत जवळ आला आहे हे तूच सूचित केलंस. मीही सर्वांना शाप देतो की, तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. भिक्षा मागाल. वेद व धर्म या विषयी वाद घालाल आणि दक्षा, तुला बोकडाचं मुख लागेल. स्वामी, चला. इथं थांबू नका. चला.’’

दक्षाची मुक्ताफळं ऐकून सर्व आपापसांत कुजबूज करू लागले. या कोलाहलात एकटे शंकर शांतपणे बसले होते. ते नंदीला म्हणाले, ‘‘नंदीकेश्वरा, दक्ष जरी ब्रह्माचा पुत्र असला तरी मीच साक्षात यज्ञ आहे. मीच पुरोहित व मीच यजमान. दक्षिणासुद्धा मीच. मीच कर्ता, करविता आणि नाश करणारा आहे. माझं स्वरूप या अज्ञानी जनांना ठाऊक नाही. मी सर्वव्यापी असून अलिप्तही आहे. तेव्हा मला यज्ञांतून वगळलं त्याचं दुःख मानू नकोस. उगाचच त्यांना तू शाप दिलास. चल कैलासाला जाऊ. सती वाट पाहत असेल.” असं म्हणून भगवान शंकर आकाशमार्गानं नंदीवर स्वार होऊन कैलासाला गेले. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. नंतरही दक्ष त्यांची निंदाच करतच होता. काहींना हे रुचलं नाही, तर काहींनी दक्षाला पाठिंबा दिला. शंकरांनी या प्रसंगाविषयी सतीला काहीही सांगितलं नाही व नंदीसह सर्व भूतगणांनाही तसं बजावलं.

असेच काही दिवस गेले. पुन्हा एकदा दक्ष प्रजापतीनं कनखल क्षेत्रांत महायज्ञाचं आयोजन केलं. त्याप्रीत्यर्थ देवदेवता, यक्षकिन्नर, अप्सरा, विद्याधर यांना अगत्यपूर्वक निमंत्रित केलं. भृगू, नामदेव, दधिची, अगस्ती, अत्री आदी मान्यवर ऋषींना आमंत्रण गेलं. शुभदिवस पाहून सुफला भूमीचं पूजन केलं. सप्तसागर व सप्तनद्यांचे निर्मळ पवित्र जलकुंभ, पंचामृताचे सुवर्णकलश, पंचगव्य, नानाविध फळांचे हारे, गंधपुष्पांच्या दुरड्या, समीधा, दर्भ, चंदनादी सुगंधित द्रव्यं व काष्ठं, सर्व प्रकारची धान्यं यज्ञवेदीभोवती ठेवली गेली. दानधर्मासाठी स्वतंत्र कक्ष उघडून पशु, दास-दासी, धन, भूमीपुत्र यांची व्यवस्था केली. अशा रीतीनं यज्ञाची जय्यत तयारी झाली. हळूहळू निमंत्रित अतिथी व प्रत्यक्ष यज्ञांत भाग घेणारे सर्व ऋषीमुनी आपापल्या शिष्यगणांसह त्या क्षेत्रांत येऊ लागले. त्यांचं आदरातिथ्य करण्यात दक्षाचे आप्त पुढाकार घेऊ लागले. त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात सेवक वर्ग दंग झाला. दक्षाच्या कन्या या सोहळ्यांत आपल्या पतींसह सामिल झाल्या होत्या. कनखल क्षेत्राला देवसभेचं स्वरूप प्राप्त झालं होतं.

ऋषीवृंदामध्ये दधिची सूज्ञ व विचारी होते. दक्षानं रुद्राला आमंत्रण दिलं नाही, हे कळताच त्यांनी दक्षाला सावध करून म्हटलं, ‘‘दक्षा, रुद्राला डावललंस हे बरं नाही केलंस. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवाविना यज्ञाला ना पूर्तता ना शोभा. उगाच विषाची परीक्षा नको.’’ तेव्हा दक्ष आढ्यतेनं म्हणाला, ‘‘मुनीश्रेष्ठ, रुद्राचं इथं काय काम? तो माझा जामात असला तरी त्याची तशी योग्यता नाही. त्याला मी मानत नाही. घाबरत नाही आणि त्याला आमंत्रितही करत नाही. सत्यलोकांतून पितामह ब्रह्मा, सुखानगरीतून वरुण, विभावरीनगरीचा माझा जावई चंद्र, मंदाकिनी नगरीचा राजा कुबेर, तसंच भोगावती तथा पाताळांतून दिग्गज नाग यज्ञाला येणार असून साक्षात् इंद्र व विष्णूही सपत्नीक येणार आहेत. तेव्हा रुद्राचं भय बाळगायचं कारण नाही. आणि त्या गोसावड्याला काय भ्यायचं!’’

यावर दधिचींना दक्षाची किव आली व त्यांनी खांदे उडवले. ते तिथं न थांबता आपल्या आश्रमांत निघून गेले. पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याचा त्यांना उद्वेग आला असावा. दक्षाला हसू आलं. त्यांनी दधिचींना अडवलं नाही. एकादा ऋषी नसल्यानं यज्ञकर्म खोळंबेल अशातला भाग नव्हता.

याच समयी दक्षाची ज्येष्ठ कन्या सती आपल्या सरन्यांसह गंधमादन पर्वतावर विहार करत होती. त्यात विजया नावाची सतीची खास मैत्रीण होती. पर्वत फुलाफळांच्या वृक्षांनी समृद्ध होताच, परंतु सृष्टीसौंदर्याचा अनोखा आविष्कार तिथं होता. निसर्गदेवता गंधपुण्यांचे वस्त्रालंकार लेवून प्रसन्नपणे पर्वतावर फिरत होती. शंकर नेहमीप्रमाणे समाधी लावून एकांतस्थळी बसले होते, तर सती वृक्षराजीतील मयुरभारद्वाजांचे थवे पाहत, मृगांची लीला अवलोकीत, निर्झर-झर्‍यांचे तुषार अंगावर झेलत निसर्गाशी रममाण झाली होती. मध्येच श्रमपरिहारासाठी ती एका तलावाजवळील शिलाखंडावर विसावली. तो तलाव नानाविध कमळांनी आच्छादित झाला असून भ्रमर गुंजारव करत कमलीनींचं प्रियाराधन करत होते. गवताच्या मखमली गालिच्यावर व झाडाझुडूपांत पडलेली रंगीबेरंगी पिसं अलगदपणे गोळा करण्यात विजया दंग झाली होती. भारद्वाज, मयूर, चक्रवाक, पोपट, निलकंठ, गरुड आदी निसर्गसुंदर पक्ष्यांची पुष्कळशी पिसं तिनं पदरांत गोळा केली होती. ती सर्व पिसं एकमेकांत गुंफून नवाच ‘अलंकार’ सतीसाठी करण्याचा तिचा मानस होता. सतीचे सर्व साज असे निसर्गदत्त असत व ते घडवणारी कल्पक सोनारीण होती विजया. साजांत फुलं, मोहोर, पिसं, पानं, शंख-शिंपले यांचा ती मुक्तपणे वापर करत असे.

मोहाच्या व बूचाच्या पुष्पांचे हार-गजरे तसंच केळीच्या सोपट्यांत बकुळीचे वळेसर गुंफावेत ते विजयानंच. आम्रमंजिर्‍यांचा मुगुट, मोगरा-अबोली यांचे गजरे, शंखांच्या माळा, कमळांचा कमरपट्टा व बाजूबंद करण्यांतही विजया कुशल होती. या साजशृंगारात सतीचं रूप देवीसारखं खुलून दिसे. शंकर होते विरक्त संन्याशी. नाग, चंद्र, विभूती, अक्षमाला, हस्तीचर्म, त्रिशुल-डमरू, कपाल आणि खडावा हेच त्यांचे अलंकार, वैभव, खजिना आणि सर्व काही. अशा ऐश्वर्यसंपन्न पतीचा व त्याच्या अलंकारांचा सतीला कधी विषाद वाटला नाही. पण स्त्रिला जन्मजातच नटण्यामुरडण्याची आवड असते. सती त्याला अपवाद कशी ठरावी? ती तर ऐश्वर्यसंपन्न राजनंदिनी होती व सर्वव्यापी ईश्वराची सहधर्मचारिणी होती.

एकीकडे सख्यांशी वार्तालाप करत असताना, जलाशयातील हंसांना मोत्याचा चारा भरवत असताना पाण्यात दिसणारं विमानाचं प्रतिबिंब पाहून तिनं आकाशाकडे दृष्टिक्षेप केला. ते कुबेराचं देदीप्यमान पुष्पक विमान होतं. पाठोपाठ हरणं जोडलेल्या रथांतून पवनदेव जाताना दिसला. दहा श्वेत अश्‍व जोडलेल्या रत्नजडीत रथांतून सोळा कलांनी परिपूर्ण असलेला चंद्रमा राणी रोहिणीसह घाईघाईनं जात असलेला दिसला. सतीचं कुतूहल जागं झालं. विविध आकारप्रकारची विमानं व रथ येतच होते. हे सर्व कुठे चालले आहेत? सतीनं विजयाला चंद्र-रोहिणी कुठे चाललेत ते विचारून येण्यास सांगितलं. विजयानं उड्डाण करून रथ गाठला. पुन्हा सतीजवळ येऊन ती म्हणाली, ‘‘सती, ते दक्ष महाराजांकडे यज्ञकार्यासाठी चालले आहेत.’’ तेवढ्यात गरुड, हंस, मगर व कासवही जाताना दिसले. गरुडावर श्रीविष्णूसह लक्ष्मी, हंसावर ब्रह्मासह गायत्री, मगरावर वरुण-गौरी तर कासवावर नदी यमुना चालली होती. सागरही सर्व नद्यांसह वर्तमान पूर्ण ऐश्वर्यानिशी चालला होता. निळ्या नभाच्या पार्श्वभूमीवर काळ्या-पांढर्‍या मेघपटलांआडून दिसणारी स्वयंप्रकाशित रथ व विमानं फारच नयनरम्य दिसत होती. पित्यानं एवढे महान कार्य आरंभलं आणि आपल्याला बिलकूल गंधवार्ता नसावी याचं सतीला आश्चर्य वाटलं.

‘‘विजया, तू थांब इथेच. मी आलेच.’’ सती धावतच एकांतस्थळी निघाली, जिथं तिचं सुखनिधान तपश्चर्येत मग्न होतं. गंधमादन पर्वतावर खिंडारवजा छोटीसी गुहा होती. बाहेरून ती नैसर्गिकरित्या गवततृणांनी आच्छादलेली असली तरी आत मंद दिव्य प्रकाश होता. एका प्रशस्त शिलाखंडावर भस्मचर्चित भगवान शंकर तीनही नेत्र मिटून ध्यानस्थ बसले होते. जवळच भूमीत त्रिशूल खोचून ठेवला होता व त्यालाच डमरू अडकवलेला होता. गळ्यात फणी नाग होता. सतीच्या पैंजणांचा ध्वनी ऐकून शंकरांनी नेत्र उघडून मोठ्या प्रीतीनं सतीकडे पाहात विचारलं, ‘‘प्रिये, काय झालं? अशी पळत का आलीस? काही विघ्न?’’

‘‘स्वामी, विघ्न वगैरे काही नाही. आपल्याला ठाऊक नाही का माझे तात कनखल क्षेत्री महायज्ञ करत आहेत ते?’’

‘‘आहे ठाऊक. मग?’’ इति शंकर

‘‘स्वामी, आत्ताच मी चंद्र, पवन, विष्णू-वरुण आदींना पत्नीसह माझे तात दक्ष यांच्या गृही जाताना पाहिलं. म्हणजे चौकशी करता ते सर्व यज्ञासाठी चाललेत असं कळलं. मी जाऊ? आपणही चला ना!’’

किती निरागस व बालीश होती सती!

‘‘सती, आपल्याला आमंत्रण नसताना तिथं जाण उचित आहे असं तुला वाटतं का? आगंतुकपणे जाऊ नये.’’ एखाद्या लहान बालकाची समजूत काढावी तसं शंकरांनी विचारलं. सती शिवाच्या मांडीवर बसून लाडिकपणे म्हणाली, ‘‘स्वामी, माहेरी जाण्यासाठी कन्येला आमंत्रण लागत नाही. कामाच्या गडबडीत तात विसरले असतील. चला ना, आपण उभयता गेलो तर सर्वांनाच आनंद होईल.’’

‘‘सती...!’’ न ऐकणार्‍या बालकाला थोडं रागानं बोलावं तसे शंकर तिला म्हणाले. पण सतीनं ते मनावर घेतलं नाही.

‘‘हे काय स्वामी. एवढाही हट्ट पुरवणार नाही माझा? आपल्याला माता-पिता नाहीत, तेव्हा त्यांची माया कशी कळावी?” सती फुरंगटून म्हणाली.

‘‘तुला तरी सासू-सासरे कुठे आहेत, तर त्यांचा रोष वा नाराजी कळावी? हे बघ. तू जावंस व अपमानित व्हावंस असं मला वाटत नाही. याउप्पर तुझी मर्जी. यज्ञसमाप्तीनंतर त्वरित ये. नंदीकेश्वरला बरोबर ने.’’

शिवानं परवानगी दिल्यानं सतीला आनंद झाला. माता, भगिनी व इतर सख्या भेटतील. तातांचा मजवर खूप जीव आहे. त्यांनाही हर्ष होईल, असा विचार मनात येऊन तिनं विजयाकडून साजशृंगार करून घेतला. भगवी वस्त्रं परिधान केली. विपुल केसांचा घट्ट बुचडा मस्तकावर बांधला. त्यावर रानपुष्पं माळली. दंडांत, मनगटांत व गळ्यांत विजयानिर्मित अनमोल अलंकार घातले. शिवाचा निरोप घेत त्याला वंदन करून ती नंदीवर स्वार झाली. नंदीला पूर्वीचा मानहानीचा प्रसंग आठवला. ‘ईश्वरानं पत्नीला माहेरी जाण्याची कशी परवानगी दिली? मागचा प्रसंग विचारले की काय? असो. तसंच काही घडायची चिन्हं दिसली तर आपण त्वरित स्वामिनीला घेऊन येऊ,’ असा विचार करून नंदीनं साठ हजार रुद्रगणांनाही बरोबर घेतलं. शिव म्हणाले, ‘‘सती लौकर ये. मी प्रतीक्षा करतो आहे.’’

‘‘होय स्वामी. तातांना आपला प्रणामही सांगेन.’’ सती सुहास्य मुद्रेनं पतीला म्हणाली. तिनं त्यांचा निरोप घेतला. हा निरोप अखेरचा असेल असं तिच्या मनातसुद्धा आलं नसेल. नंदीसह रुद्रगण कनखलचा मार्ग आक्रमू लागले. सतीची प्रसन्न मुद्रा व तिचा साजशृंगार पाहून शिवाला विवाहापूर्वी सतीशी झालेल्या संवादाची आठवण झाली. विष्णू, वरुणादी मान्यवर ऐश्वर्यसंपन्न देवांना डावलून सतीनं शंकराला वरण्याचा निश्चय पक्का केल्यावर ते तिला म्हणाले, ‘‘सती विवाह होण्यापूर्वी नीट विचार कर. मागून पश्चाताप नको. तुला मी सुवर्ण, हिरे, मोती वा तत्सम अलंकार देऊ शकणार नाही. माझी ऐपतही नाही व मला आवडतही नाही.’’

‘‘नकोत मला. आपणच माझा सौभाग्यालंकार आहात.’’ इति सती.

‘‘माझ्याकडे हत्ती-अश्व वा रथ, विमान यासारखी वाहनंही नाहीत.’’

“नसेनात. आपला नंदी आहे ना! मला चालेल तो वाहन म्हणून.’’

‘‘मी पडलो भिक्षेकरी, पंचपक्वान्नं तुला कोठून देऊ?’’ शिवानं विचारलं.

‘‘स्वामी, आपलं उच्छिष्ट मिळालं तरी मी संतुष्ट राहिन. माझं भाग्यच समजेन.’’

‘‘तुझ्या तातांसारखा इथं महाल-वाडा-प्रासाद वा भवनही नाही.’’ इति शिव.

‘‘मी आपल्या सहवासांत वनांतसुद्धा स्वर्ग निर्माण करेन. संपूर्ण विश्वच आपलं घर असताना वेगळ्या प्रासादाची गरजच काय म्हणते मी.’’

‘‘तुला परिधान करायला भरजरी वस्त्रं तरी हवीत ना. मी तर गजचर्म, मृगचर्म वापरतो. थंडी-वारा-पाऊस यापासून कसा निभाव लागेल?’’

‘‘त्यात काय एवढं? मला काषाय वस्त्रं भावतात.’’ तिला या विवाहापासून परावृत्त करण्याचे सर्व उपाय थकल्यावर शिवानं अंतिम प्रश्न विचारला- ‘‘सती, आता एकच प्रश्न विचारतो. तुला सवत वगैरे चालेल ना?’’ सती या प्रश्नानं क्षणभर गांगरली.

‘‘स्वामी, तेवढं मात्र...!’’

सती वधू परीक्षेत उत्तीर्ण झाली व विवाह संपन्न झाला. दक्ष प्रजापतीच्या मनात मात्र या युगुलाविषयी कायम अप्रीती निर्माण झाली. हे सारं आठवलं व शिवानं पुन्हा आपले नेत्र मिटून घेतले. परीक्षेतील शब्द न् शब्द सतीनं आचरणांत आणून पतीला आपलंसं केलं होतं.

सारे रुद्रगण वाजतगाजत, आरोळ्या ठोकीत कनखलकडे निघाले. प्रमाणबद्ध शरीर असलेला, बळकट शिंगं व झुपकेदार शेपूट असलेला नंदीसुद्धा अलंकारानं नटला होता. चारी पायांमध्ये बळकट व घुंगूर लावलेले चांदीचे तोडे, गळ्यामध्ये नानाविध कवड्या-शंखाच्या सुवर्णमाळा, शिंगांना मोत्यांचे घोस लावलेली सुवर्णाची टोपणं, भालप्रदेशी किनखापाचे आच्छादन व पाठीवर मखमली झूल घातलेला नंदी दृष्ट लागण्यासारखा देखणा दिसत होता. शिवाची त्याच्यावर खास मर्जी असल्यामुळे तो मधूनमधून भोवतालच्या गणांना शिस्तीत व लौकर चलण्याविषयी आज्ञा करत होता. अखेर तो गणसागर सतीसह कनखल क्षेत्रांत दाखल झाला.

यज्ञस्थळी अतिभव्य मंडप घातला होता. वार्‍याच्या झुळकीसरशी त्याला लावलेल्या मखमली व मोत्यांच्या झालरी झुलत होत्या. स्तंभांना रंगीत रेशमी वस्त्रं गुंडाळली होती. ठिकठिकाणी सुगंधीत पुष्पांचे हारे-दुरड्या-परड्या ठेवल्या होत्या. त्यांचा गंध मंडपांत व बाहेर वातावरणांत दरवळला होता. छताला लावलेल्या असंख्य झुंबरांच्या प्रकाशांत सर्व आमंत्रित, अतिथी, देवदेवता, ऋषीमुनी परस्परांशी संवाद करताना दिसत होते. रत्नजडीत सुवर्णसिंहासनावर देव-यक्ष-गंधर्व व दिग्विजयी राजे विराजमान झाले होते. दर्भासनं, मृगचर्म, व्याघ्राजीन, गजचर्म यावर वेदसंपन्न ऋषी स्थानापन्न झाले होते. भोगावतीच्या दिग्गज नागनागिणींच्या रूपानं तिथं चैतन्य सळसळत होतं. यौवन-वृद्धत्व, ऐश्वर्य-वैराग्य, ज्ञान व उत्साह यांचा सुरेख संगम झालेला दिसत होता. समुद्र, पर्वत व नद्या यांच्या उपस्थितीमुळे थोडंसं गांभीर्य निर्माण झालं होतं. देवदेवता, मेनका रंभादी लावण्यखणी अप्सरांमुळे सारा परिसर तेजोमय झाला होता. मंडपाबाहेरचा विस्तीर्ण भूभाग, दैवी विमानं, रथ, पालख्या-मेणे, शिबिका यांनी भरून गेला होता.

पवित्र भूमीवर प्रचंड यज्ञवेदीवर विशाल कुंड स्थापन केलं होतं. स्वर्गीय कामधेनूंच्या शेणानं ते सारवलं होतं. भोवताली स्वस्तिक, कमळ, शंख-चक्र व गदा ही शुभचिन्हं रेखाटली होती. यज्ञांत लागणार्‍या वस्तू देण्यासाठी तत्पर दास-दासी नियुक्त केले होते.

यज्ञाला प्रारंभ होण्यापूर्वीच नंदीनं सतीसह मंडपांत प्रवेश केला. सती नंदीवरून पायउतार झाली. स्त्रियांच्या खास कक्षाकडे नजर जाताच तिचे नेत्र अत्यानंदानं भरून आले. आपलं वय व स्थळकाल विसरून ती त्या दिशेला धावली. विरणीमातेचे चरणस्पर्श करून ती तिच्या गळ्यांत पडली. भोवताली सर्व भगिनी म्हणजे कश्यपमुनींच्या, चंद्राच्या, यमधर्माच्या, सर्व स्त्रिया आपापल्या पूर्ण वैभवनिशी हजर होत्या. सतीला पाहून काहींना आनंद झाला, तर काहींनी नाकं मुरडली. कारण त्या ऐश्वर्यसंपन्न भरजरी वस्त्रं लेवून जडावाच्या सुवर्णालंकारांनी मढलेल्या दिप्तीमान व सुंदर स्त्री समूहांमध्ये जाडंभरडं काषाय वस्त्रं नेसून रानफुलांचेच अलंकार धारण केलेली शिवप्रिया सती विसंगत दिसत होती. सौभाग्यसूचक मंगलसूत्र व भालप्रदेशी कुंकूमतिलक या वैभवानिशी तिला तिथं आलेली पाहून भगिनींनी तिचं वर वर हसून स्वागत केलं. राणी विरणीनं मात्र आपल्या लाडक्या लेकीला दृढ अलिंगनांत बद्ध करून तिच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. तिची ख्यालीखुशाली विचारून तिला आपल्याजवळ बसवून घेतलं.

नंतर सती दक्षाजवळ जाऊन म्हणाली, ‘‘तात, मीपण या समारंभाला आले आहे. स्वामींना वेळ नाही म्हणून येणं जमलं नाही. मी मात्र आवर्जून आले.’’

‘‘तू कशाला आलीस? मी तुला आमंत्रण दिल्याचं मला आठवत नाही. कशाला त्या जोगड्याला सोडून आलीस? जा. चालती हो.’’ दक्ष इतक्या जोरात गरजला की, सर्वांचाच श्वास क्षणभर थांबला. आशीर्वादाऐवजी असलं दुःसह कटूवचन ऐकून सती अपमानीत झाली. पिता आपल्या विवाहित कन्येला असं झिडकारतो यावर तिचा विश्वास बसेना. तिचं सर्वांग थरथरू लागलं. पापण्यांचे काठ झुगारणार्‍या आसवांना तिनं निर्धारानं थोपवलं. सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्यानं ती कावरीबावरी झाली. आपल्याविषयी तातांच्या मनी इतका आकस आहे याची तिला या प्रसंगामुळे कल्पना आली. त्यामागे शंकराशी विवाह केला हेच प्रमुख कारण होतं.

आता पुढे काय होणार याची चिंता सर्वांपेक्षा नंदीला भेडसावू लागली. मागचा प्रसंग शिवाच्या शांतपणामुळे निभावला, पण नारी जगतात हाच प्रसंग रौद्ररूप धारण करू शकतो. नंदी तिला परत चलण्याविषयी विनवू लागला पण सती ऐकेना. ती तशीच यज्ञवेदीजवळ आली. तिनं सर्व यज्ञीय वस्तू लक्षपूर्वक नजरेखाली घातल्या. त्यांत शंकराशिवाय सर्व देवांचे भाग काढलेले तिनं पाहिले. तिनं दक्षाकडे वळून विचारलं, ‘‘तात, ते जाऊ दे. कल्याणमय शिवाला आपण का बोलावलं नाही? त्याची योग्यता आपण जाणत नाही? त्या देवेश्वराचा भागही इथं दिसत नाही. असं का? हे जाणून बुजून केलंत की अनवधानानं झालं? महर्षी कश्यप, आपण तरी तातांना सूचना करायची. आणि देवेंद्रा, आपण इतके यज्ञ केलेत तरी ही महत्त्वपूर्ण बाब आपण विसरलात. अत्री अगस्ती, कण्व, वसिष्ठ आपणही त्या ईश्वराला मानत नाही असं मी समजू का? बोला.’’

सतीच्या प्रश्नांना कुणापाशीच उत्तर नव्हतं. दक्षच सतीच्या अंगावर ओरडला. ‘‘ते सर्वजण माझे अतिथी आहेत. कुणाला बोलवायचं अन् कुणाला नाही हा माझा प्रश्न आहे. मीच शंकराला बहिष्कृत केलं आहे. त्या भस्म फासणार्‍या भिक्षेकर्‍याचं इथं काय काम आहे? त्याला जामात म्हणवून घ्यायची मला शरम वाटते. तू तरी न बोलावता कशी आलीस? घराण्याचे रीतीरिवाज तुला ठाऊक नाहीत? तुझ्या इतर भगिनी बघ व तुझा अवतार बघ. वैभवानं व कर्मानं तू दरिद्री आहेस. तुझ्या त्या कफल्लक पतीचा टेंभा व भय मला दाखवू नकोस, आल्या पावली परत जा. नीघ. मला क्रोध आणू नकोस.’’

आता मात्र अति झालं. सतीच्या भावनांचा कडेलोट झाला. शिवानं का जाऊ नको म्हटलं, ते तिच्या ध्यानी आलं. पण आता खूप उशीर झाला होता. आत हा वादविवाद चाललेला ऐकून रुद्रगण मंडपांत घुसू लागले. अति क्रोधानं सतीनं यज्ञकुंडाला तीन प्रदक्षिणा घातल्या. पतीचं व कुलदेवतेचं स्मरण केलं व कुणाच्या लक्षात येण्यापूर्वीच तिनं त्या विशाल धगधगत्या कुंडात उडी घेतली. जळत्या समिधा, गोवर्‍या व गरम राख भोवताली उडून जवळ बसलेले पुरोहित, ऋत्विज भयानं उठले. तेल-तूप-धान्यं यांची पात्रं कलंडली. पवित्रजलाचे कुंभही कलंडले. बघता बघता सर्व मांडवांत हाहाःकार झाला. राणी विरणी मूर्च्छित झाली.

इकडे ही अमंगल घटना घडली व तिकडे मुनी नारदानं शंकराजवळ जाऊन म्हटलं, ‘‘नारायण नारायण. भोलेनाथ, तप करत काय बसलात? सतीनं दक्षाच्या यज्ञात आत्मदहन केलं. जागे व्हा. भोलेनाथ उठा. उठा.’’ मुनींचं वचन ऐकून शिवाची समाधी भंग झाली. ते ताडकन् शिलाखंडावरून उठले. अंतर्ज्ञानानं त्यांनी सर्व प्रकार जाणून घेतला. शिवाचा अवतार पाहून मुनी गुप्त झाले. दक्षाची आता खैर नाही हे त्यांनी ताडलं.

शंकर गुहेबाहेर आले. ‘सतीऽऽऽ!’ शंकरांची आर्त साद त्या दर्‍याखोर्‍यांत घुमली. त्रिभुवनांतून त्याचे पडसाद येऊ लागले. दशदिशा थरारल्या. वायुदेव मूक झाला. सागर खवळले. नक्षत्रांनी जागा सोडल्या. ग्रह कक्षा सोडून फिरू लागले. पशुपक्षी भयानं इतस्ततः पळू व उडू लागले. वृक्षवेलींची फळं-फुलं गळू लागली. कारण निसर्गाचा समतोल बिघडावा अशीच त्या सादेमध्ये अगम्य शक्ती होती. दुःख होतं. चिरकालचा विरह होता. एका मनस्वी स्वयंभू पतीची पत्नीला घातलेली विमनस्क साद होती. तिची अनेक रूपं त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेली. मनातील अंगार त्यांच्या नेत्रद्वयांत उतरला. त्यांनी अतिव क्रोधानं आपल्या जटेच्या बटा सर्व शक्तीनिशी पर्वतशिखरावर आपटल्या. पुन्हा दशदिशा व भूमंडळ डळमळलं. महायशस्वी भयावह वीरभद्र प्रगट झाला. रुद्राच्या निश्वासांतून तेरा प्रकारचे असाध्य रोग व शेकडो ज्वर निर्माण झाले व सार्‍या पृथ्वीवर फैलावले. जळजळीत नेत्र दुःखाश्रुंनी भरून आले. त्यांनी विरभद्राला आज्ञा केली- ‘‘जा. त्या दुष्ट दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर. माझ्या निरागस निष्पाप सतीचा त्यानं नाहक बळी घेतला.’’

विरभद्रानं ती आज्ञा ऐकून रुद्रांना प्रणाम केला व तो असंख्य भूतगण घेऊन कनखल क्षेत्री अवतीर्ण झाला. देवी कालकाही त्याला सैन्यासह येऊन मिळाली. क्षेत्रांत विघ्नं व अपशकून होऊ लागले. धुळीसह वारा वाहू लागला. उल्का कोसळून रक्तवर्षाव होऊ लागला. दिशा अंधारून आल्या. अभद्र पशुपशी ओरडू लागले. ते पाहून दक्षाचं धाबं दणाणलं. त्याला दधिची मुनी आठवले. दक्षानं स्वतःच्या हातांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता. तो ब्रह्मा, विष्णू व इंद्र यांना शरण आला, पण तिघांनीही असहायता प्रगट केली. रुद्राला डावलल्यामुळेच हा प्रसंग आला असाच सर्वांचा सूर होता. दक्षानं वेळीच दक्षता घेतली नाही त्याचाच हा परिणाम होता. जिकडे पाहावं तिकडे नवदुर्गा, राक्षस, भूतं व चौसष्ट योगिनी यांनी थैमान घातलं होतं. बृहस्पती, सूर्य, इंद्र व कुबेर पलायनांत यशस्वी झाले. आपल्याच वाहनातून नव्हे तर मिळेल ते वाहन घेऊन. दूर अंतरावर जाऊन त्यांनी वाहनं बदलून घेतली.

वीरभद्राचं तर तांडव नृत्यच चाललं होतं. सर्वांनाच पळता भुई थोडी झाली. वीरभद्रानं पूषाची बत्तीशी त्याच्याच घशात घातली. भगाच्या नेत्रांतील बुब्बळं बोटं घालून काढली. भृगुंची दाढी खसकन उपटली. सर्व आमंत्रितांची अवहेलना करून त्याचं समाधान झालं नाही. दक्ष भयानं यज्ञकुंडाच्या अंतर्वेदित लपून बसला, पण वीरभद्रानं त्याला शोधून त्याचं शिरकमल खुडून टाकलं. यज्ञकुंडात फेकलं. त्या धुमचक्रीत साक्षात् यज्ञदेव मृगाचं रूप घेऊन पळून गेला. ब्रह्मदेव शंकराला शरण आला. ब्रह्मासह शंकर क्षेत्री आले. वीरभद्रानं दक्षाचं धड रुद्रापुढे ठेवलं. या रणधुमाळीत बरेचसे मृत झाले. उरलेले पळून गेले. फक्त एकच निष्पाप जीव वाचला होता, कारण बिचार्‍याला शृंखलेनं यज्ञवेदीला जखडलं होतं व त्याच्या बेंबेंकडे लक्ष द्यायला कुणालाच फुरसत नव्हती. तो जीव म्हणजे एक बोकड होता. नाईलाजानं बोकडाचं शीर कापून दक्षाच्या धडाला लावताच तो जिवंत झाला. एका नव्या दक्षाचा म्हणजे शंकरभक्ताचा जन्म झाला. शंकराच्या चरणांवर स्वतःला झोकून देऊन त्यानं अभय मागून म्हटलं, ‘‘देवेश्वरा, आपली योग्यता न जाणता या सर्वनाशाला मी कारणीभूत झालो. माझी निष्पाप कन्या मला अंतरली. द्याल ते प्रायश्चित्त भोगायला मी तयार आहे.’’ दक्ष खरंच पश्चातापदग्ध झाला होता.

शंकर येईपर्यंत हा विध्वंस चालू होता. मंडपाबाहेर पळालेल्या मृगरूपी यज्ञाचाही कुणीतरी शिरच्छेद केला. क्षेत्रपालानं विष्णूचं सुदर्शन गिळलं. ते पुन्हा विष्णूला मिळालं पण शंकराच्या प्रभावानं ते त्याच्याच हाती स्तंभित झालं. दक्ष जेव्हा रुद्राला शरण आला, तेव्हा हा संहार थांबला व पूर्वी नंदीनं शाप दिल्याप्रमाणे दक्षाला बोकडाचं मुख लागलं. ब्रह्माचा मानसपुत्र असल्यानं दक्ष प्रजापती उन्मत्त झाला होता. सर्व देवांनी त्याची निर्भर्त्सना केल्यामुळे तो शरमिंदा झालाच, पण बोकडाच्या मुखामुळे तो ओशाळलासुद्धा.

या रणकंदनांतून वाचलेल्या ऋषीमुनींनी भगवान रुद्राची स्तुती केली. त्यांनी सर्वांना अभय देऊन आपलं ‘भोलेनाथ’ हे नाव साथ केलं. पूषाचे दात, भृगूंची दाढी व भगाचे नेत्र परत मिळाले. भृगुंना दाढी मिळाली पण ती बोकडाची. शंकरानं दक्षाला भक्तीमार्गाचं महत्त्व विशद केलं. अर्थार्थी, जिज्ञासु, आर्त व ज्ञानी माणसालाच शंकर प्रसन्न होतो. ब्रह्मा-विष्णू-महेश यांची भक्ती सर्वश्रेष्ठ असून जो एकाची भक्ती करून अन्य दोघांची निंदा करेल त्याला ईश्वर कधीच प्राप्त होणार नाही.

अशा प्रकारे ईश्वरसेवेचं मर्म सांगून त्या विश्वनियंत्या आदीअनादी ईश्वरानं कुंडात अर्धवट जळालेलं सतीचं कलेवर उचलून आपल्या खांद्यावर टाकलं. अश्रुविमोचन करत शंकर भारतभूमीवर संचार करू लागले. विष्णूंनी सुदर्शन चक्रानं सतीच्या कलेवराचे बावन तुकडे केले. ते अवयव ज्या ज्या ठिकाणी गळून पडले, त्या त्या ठिकाणी शक्तीपीठं निर्माण झाली. ही शक्तीपीठं अत्यंत ज्वलंत आहेत. शंकराचे अश्रु ज्या मातीत पडले, त्या ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण झाले. सतीचे कर्ण, नासिका, वक्ष, चरण, हात, कटी इ. अवयव पडलेली तीर्थक्षेत्रं आजही पूजनीय आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 03 October 2018

पहिल्याप्रथम पुराणकथांची ओळख करवून देणारं सादर सुरू केल्याबद्दल श्री. राम जगताप व त्यांच्या चमूचे अनेकानेक आभार. बऱ्याचशा पुराणकथा भाकडकथा आहेत. त्यांच्यात सत्य शोधायचं नसतं. पण ज्याअर्थी त्या अद्यापही प्रचलित आहेत त्यावरून त्यांच्यात काही सत्त्व असलं पाहिजे असा निष्कर्ष निघतो. तर हे सत्त्व बोधरूपी असावं, अशी माझी धारणा आहे. म्हणजेच पुराणकथा या एका अर्थी बोधकथा आहेत. गरीबाची चेष्टा वा अवहेलना करू नये असा बाळबोध प्रस्तुत कथेतनं मिळतो. पण त्याच सोबत ही कथा रूपक देखील दिसते आहे. या रूपकाचा माझ्या परीने शोध घेतो. कश्यापांच्या १३ पत्न्या म्हणजे चंद्राचे १३ महिने होय. वस्तुत: १२ च महिने असतात, पण इथे जास्तीचा १ असा तो अधिक महिना धरल्यास ते १३ होतात. चंद्राला दिलेल्या २७ कन्या म्हणजे २७ नक्षत्रे होय. सतीच्या शरीराचे ५२ तुकडे हे वर्षाचे ५२ आठवडे होत. अर्थात पूर्ण रूपक उलगडून दाखवणं माझ्याही आकलानाबाहेरचं आहे. अल्प यत्न गोड मानून घ्यावा ही वाचकांना विनंती. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......