‘स्टॅलिनपर्व’ अस्थिर तामिळनाडूला स्थैर्य देईल?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • द्रमुक मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन
  • Wed , 12 September 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar द्रमुक मुन्नेत्र कळघम Dravida Munnetra Kazhagam एम. के. स्टॅलिन M. K. Stalin एम. करुणानिधी M. Karunanidhi

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचं निधन झालं, तेव्हा त्याचं वर्णन तमिळ प्रसारमाध्यमांनी ‘सूर्यास्त’ असं केलं होतं. कुणा नेत्याच्या जाण्यानं सूर्य अस्ताला जात नसतो. तो दररोज उगवतो, मावळतो. पण आपल्या प्रिय नेत्याविषयी भावना व्यक्त करण्याचा तो कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. करुणानिधी यांच्यानंतर द्रमुक मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या अध्यक्षपदी एम. के. स्टॅलिन यांची निवड झालीय. करुणानिधींनीच त्यांना आपला राजकीय वारस म्हणून जाहीर केलं होतं.

करुणानिधींची तीन अपत्यं राजकारणात अग्रभागी आहेत. स्टॅलिन, अलागिरी आणि मुलगी कनिमोझी. पण त्यातून अलागिरी यांना दूर ठेवून स्टॅलिन यांना करुणानिधींनी पसंती दिली. स्टॅलिन यांना करुणानिधींनी पसंती का दिली? सध्या ६५ वर्षं वय असलेले स्टॅलिन हे १४ व्या वर्षी राजकारणात सक्रीय झाले. हे साल होतं १९६७. तेव्हा स्टॅलिन यांनी करुणानिधींचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केला. पोक्त राजकारणी नेत्यासारखा हा पोरगा तेव्हा तमिळ मतदारांना भावला. त्याच्यातले राजकीय गुण पुढे अधिक स्पष्ट दिसू लागले. १९७५ साली आणीबाणीच्या आंदोलनात स्टॅलिन काँग्रेस विरोधात रस्त्यावर उतरले, तेव्हा ते पंचविशीत होते. त्या आंदोलनात त्यांना तुरुंगवासही घडला. पंचविशीच्या आत स्वतःची राजकीय कर्तबगारी दाखवून स्टॅलिन द्रमुक पक्षाच्या युवा आघाडीचे नेते बनले. पुढे १९९६ साली ते चेन्नईचे महापौर म्हणून निवडून आले. १९८९ साली तमिळनाडू विधानसभेचे आमदार झाले. महापौर, आमदार म्हणून स्वतःचा ठसा उमटवत करुणानिधी मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली. या वेगवान राजकीय वाटचालीत स्टॅलिन यांना घरातूनच अनेकदा विरोध झाला. पण करुणानिधी कायम या लाडक्या आणि कर्तबगार मुलाच्या बाजूनं कौल देत राहिले.

करुणानिधींचं कुटुंब मोठं आहे. तीन पत्नींचा त्यांचा अपत्य विस्तार. स्टॅलिन हे दुसऱ्या पत्नी दयाळू अम्माल यांच्यापासून झालेलं अपत्य. त्यांचं नाव स्टॅलिन का ठेवलं, त्याची कथा सुरस आहे. या मुलाचं नाव करुणानिधींना ‘अय्यादुराई’ ठेवायचं होतं. तमिळ लोक द्रविड अस्मिता चळवळीचे नेते पेरीयार रामस्वामी नायकर यांना आदरानं ‘अय्या’ म्हणत. ‘अय्या’ म्हणजे मोठा माणूस. पेरियार यांचं ‘अय्या’ हे संबोधन आणि द्रविड पक्षाचे संस्थापक ‘अण्णादुराई’ यांच्या नावातलं ‘दुराई’ हे नाव एकत्र करून या मुलाचं नाव ‘अय्यादुराई’ ठेवावं असं ठरलं. पण नेमकं त्याच वेळी रशियातील कम्युनिस्ट नेते स्टॅलिन यांचं १९५३ साली निधन झालं. स्टॅलिन वारले त्या साली जन्मलेला मुलगा म्हणून नाव स्टॅलिन ठेवलं. त्यात करुणानिधींची विचारसरणी डावीकडे झुकलेली. ते स्वतः नास्तिक. कम्युनिस्ट विचारांशी बांधिलकी आणि स्टॅलिनविषयी आदर… म्हणून मुलाचं नाव स्टॅलिन.

स्टॅलिन हे नाव असलेला हा मुलगा पुढे नास्तिक निघाला, हा योगायोग नाही. या मुलाची जडणघडण तशी झाली. द्रविड चळवळीचा पाईक, गरिबांसाठी झटणारा हा मुलगा हरहुन्नरी निघाला. मुळात करुणानिधी हे स्वत: कलाकार, लेखक, पत्रकार. तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांनी लिहिलेले चित्रपट गाजले. एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता अशा दिग्गज नटनट्यांनी करुणानिधींच्या चित्रपटात काम केलं. यश मिळवलं. हे चित्रपट तमिळ जनतेनं डोक्यावर घेतले. वडिलांचं चित्रपटसृष्टीशी असलेलं नातं स्टॅलिन यांनी वृद्धिंगत केलं. १९७८ साली त्यांनी ‘नबीक्कदूनचतक्रम’ हा तमिळ चित्रपट काढला. १९८८ साली स्वतः ‘ओरेरथम’ या चित्रपटात वाखानण्याजोगा अभिनय केला. अभिनेता म्हणून नाव कमावलं. नंतर काही तमिळ टीव्ही मालिकांमध्ये कामं केली. पण पुढे राजकारणात गुंतत गेल्यानं हा छंद सुटला.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

स्टॅलिन उत्तम अभिनेते तर आहेतच, पण त्यांचा खेळावरही जीव आहे. ते क्रिकेट खेळतात. बॅडमिंटन आणि बुद्धिबळात पटाईत आहेत. क्रीडाक्षेत्राची त्यांची समज चांगली आहे. करुणानिधींना वर्षभरापूर्वी मृत्यूची चाहूल लागली होती. तेव्हाच त्यांनी मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. तेव्हापासून अलागिरी हे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेले चिरंजीव दुखावून दूर गेले होते. पण तरीही पुढच्या काळाची गरज ओळखून करुणानिधी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. द्रमुकची सर्व सूत्रं त्यांनी स्टॅलिन हाती सोपवली.

द्रमुक पक्षाची सूत्रं स्टॅलिन यांनी हाती घेतली, तेव्हा तमिळ माध्यमांनी त्याचं वर्णन ‘नवा उगवता सूर्य’ असं केलं. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचं चिन्ह उगवता सूर्य आहे. झेंडा काळ्या आणि लाल रंगाचा आहे. तमिळनाडूत ‘नवा सूर्य’ असं प्रसारमाध्यमांनी स्टॅलिन यांचं वर्णन केलं, त्याला पार्श्वभूमी तशीच आहे. सध्या तमिळनाडू राज्य अभूतपूर्व अशा संकटातून वाटचाल करतंय. जयललिता, करुणानिधीसारखे नेते आता नाहीत. अण्णा द्रमुक हा पक्ष सत्तेवर असला तरी तो गटबाजीनं पोखरलाय. जयललितानंतर त्या पक्षाकडे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता नाही. अभिनेते कमल हसन, रजनीकांत हे तिथल्या राजकारणात हातपाय मारू पाहत आहेत, पण त्यांना अजून सूर गवसलेला नाही. प्रचंड मोठी राजकीय अस्थिरता तमिळ जनतेच्या वाट्याला आलेली आहे.

एकीकडे राज्याला नेता नाही, राजकीय अस्थिरता आहे आणि दुसरीकडे राज्यापुढचे प्रश्न बिकट होत आहेत. हे राज्य शेतीप्रधान आहे. शहरी भागात उद्योग आहेत. विशेषतः लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतीमालाला गेली चार वर्षं भाव नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. नोटबंदीनंतर लघुउद्योगाचं कंबरडं मोडलंय. राज्यात रोजगाराचं संकट मोठं आहे. आहे त्या कामगारांचे रोजगार धोक्यात येत आहेत. या राज्याला मोठी समुद्र किनारपट्टी आहे. त्या किनारपट्टीवरच्या मच्छिमारांचे प्रश्न आहेत. वेदान्ता कंपनीचा स्टरलाईटचा प्रकल्प स्थानिकांना डाचतोय. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झालेत. थुथुकुडी इथं स्थानिकांना या प्रकल्पामुळे प्रदूषणानं कॅन्सरसारखे भयावह आजार झाल्याचं वास्तव पुढे आलंय. तिथले गरीब, शेतकरी, मच्छिमार या प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करताहेत. केंद्र व राज्य सरकार या आंदोलकांना दडपतंय. त्यामुळे या किनारपट्टी भागात अशांतता आहे. कर्नाटक-तमिळनाडू या राज्यातलं भांडणाच कारण ठरलेला कावेरी पाणीवाटप प्रश्न लोंबकळता आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही. वीज, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचे नेहमीचे प्रश्न आ वासून आहेतच. तमिळनाडूत शिक्षणाचे प्रश्न तेवढे तीव्र नसले तरी राज्याची आरोग्यव्यवस्था जवळपास आजारी आहे. वाळू माफियांमुळे कायदा सुव्यवस्था आणि नदी पर्यावरण धोक्यात आहे. शेती संकटात आणि रोजगाराचा अभाव त्यामुळे शेतकरी जातीमध्ये असंतोष आहे. अशा अवघड वळणावर तमिळनाडू उभा असताना लोक स्टॅलिन यांच्याकडे ‘उगवता सूर्य’ म्हणून पहात आहेत.

स्टॅलिन यांनी जवळपास पन्नास वर्षं जवळून राजकारण बघितलंय. चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून इतिहासाची पदवी घेतलीय. त्यामुळे त्यांना द्रविड चळवळ आणि तमिळ अस्मितेचा परिचय आहे. तमिळनाडू या राज्याचं नेतृत्व करणं ही तारेवरची कसरत आहे. या राज्याच्या नेत्याला देशाचे प्रश्न बोलून चालत नाही. त्याला तमिळ हिताला प्राधान्य द्यावं लागतं. म्हणून तमिळ नेता कधी देशाचा नेता होत नाही. काँग्रेस नेते कामराज हे शेवटचे तमिळ राष्ट्रीय नेते झाले. त्यांना स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी होती. त्यांच्यानंतर अण्णादुराई, एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांनी तमिळनाडूचं नेतृत्व केलं. पण त्यांना राष्ट्रीय नेता होता आलं नाही. कदाचित तमिळ जनतेचीच तशी इच्छा असावी. केंद्रात आघाडीच्या राजकारणात करुणानिधी आणि जयललिता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली जरूर, पण तमिळनाडूबाहेर त्यांचं नेतृत्व कधी जाऊ शकलं नाही.

उत्तरेची मुजोरी आणि हिंदी भाषेला विरोध. तमिळ, द्रविड अस्मितेचा अहंगंड या कात्रीत आजपर्यंत तमिळ राजकारण हेलपाटत राहिलंय. या कात्रीतून स्टॅलिन कसा मार्ग काढतील? निर्णायकी तमिळनाडूला सर्वसमावेशक नेतृत्व ते देऊ शकतील काय, या प्रश्नांच्या उत्तरांना स्टॅलिन यांना येत्या काळात भिडावं लागणार आहे. शिवाय कमल हसन, रजनीकांत अशा लोकप्रिय नेत्यांशी त्यांना स्पर्धा करत स्वतःचं नेतृत्व सिद्ध करावे लागेल. आज स्टॅलिन यांच्याएवढा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव तमिळनाडूत नव्या नेतृत्वापैकी कुणाकडेही नाही. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्या जोरावर ते द्रमुकचे नेते झालेत. पण तमिळनाडूचं नेतृत्व ते करू शकतील काय या प्रश्नाचा सोक्षमोक्ष येत्या काळात लागणार आहे. म्हणून तमिळ प्रसारमाध्यमं ‘नवा सूर्य’ उगवेल काय, अशी चर्चा करत आहेत.

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......