‘गुलाबजाम’ : स्मृती, मुक्ती आणि आनंद!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
वसुंधरा काशीकर
  • 'गुलाबजाम'चं एक पोस्टर
  • Sat , 24 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie गुलाबजाम Gulabjaam सचिन कुंडलकर Sachin Kundalkar सोनाली कुलकर्णी Sonali Kulkarni सिद्धार्थ चांदेकर Siddarth Chandekar

काल अखेर बहुचर्चित ‘गुलाबजाम’ सिनेमा बघितला. फूड डिझायनिंगची नवी संकल्पना प्रथमच या सिनेमात वापरल्यानं या सिनेमाची खूप चर्चा होते आहे. शिवाय सचिन कुंडलकर यांचं दिग्दर्शन, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर असल्यानं उत्सुकता होतीच.

कलाकृतीचं मोठेपण ठरवण्यासाठी वेगवेगळे निकष असू शकतात. पण मला तरी एखाद्या कलाकृतीत ‘अर्थाच्या किती शक्यता’ आहेत, यावर त्या कलाकृतीचं मोजमाप करावं असं वाटतं. ‘गुलाबजाम’ या सिनेमात अर्थाच्या खूप तरल जागा आहेत. आणि एखाद्या कादंबरीत अप्रत्यक्षरित्या जसं भाष्य असतं तशा पद्धतीनं त्या आल्या आहेत. आदित्य नाईक (सिद्धार्थ चांदेकर) नावाचा तरुण. लंडनमध्ये भरमार पगाराची नोकरी आणि सुखी आयुष्य. ती सोडून पुण्यात मराठी पदार्थ शिकायला येतो. त्याला लंडनमध्ये महाराष्ट्रीय पदार्थांचं रेस्टॉरंट काढायचं असतं. हे पदार्थ करायला त्याला शिकवणार कोण? या शोधात त्याला राधा आगरकर (सोनाली कुलकर्णी) भेटते. मग त्यांचा शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रवास सुरू होतो. अशी ढोबळमानानं कथा आहे.

चित्रपटात राधा ही व्यक्तिरेखा सुरुवातीला खूप तुसडी, माणूसघाणी आणि विक्षिप्त दाखवली आहे. खूप दिवसानंतर राधा आदित्यला स्वत: बद्दल सांगते. तेव्हा तीच्या अशा वागण्याचा आणि स्वभावाचा उलगडा होतो. एका अपघातामध्ये राधाची स्मृती गेलेली असते. तिला तिचं वय आठवत नाही, ती पैसे मोजणं विसरलेली असते. तिच्या मेंदूनं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली असते, ती म्हणजे ‘स्वयंपाक’! माणूस लक्षात काय ठेवतो किंवा माणसाला लक्षात काय राहतं यावर चिंतन करायला लावणारा हा प्रसंग आहे. उर्दूतले प्रसिद्ध शायर बशीर बद्र सध्या डिमेन्शिया या आजारानं ग्रस्त आहेत. त्यांना जे काही थोडं आठवतं ते म्हणजे केवळ त्यांची शायरी. माणसाला हृदयाचा भाग असणारी, खूप आवडणारीच गोष्ट लक्षात राहते. राधाला स्वयंपाक लक्षात राहिला त्या अर्थी राधाला स्वयंपाक खूप आवडत असावा.

माणसाचं बाह्य वर्तन हे केवळ हिमनगाचं एक टोक असतं. त्यामागचा भूतकाळ किती अकल्पनीय असू शकतो. आणि त्यामुळेच अनेकदा भराभरा निष्कर्षाप्रत येणं किती चुकीचं ठरू शकतं, हेही या प्रसंगातून कळतं. निदा फाजली म्हणतात,

हर आदमी में होते है दस-बीस आदमी

जिसको भी मिलना कई-बार मिलना

शेवटी शेवटी आदित्य राधाला स्वत:बद्दल सांगतो. लहानपणी आईजवळ ओट्यापाशी आदित्य पोळी लाटत असतो. तेवढ्यात वडील येउन फाड्कन त्याच्या थोबाडीत मारतात आणि म्हणतात, ‘भविष्यात तुला काय पोळ्या लाटायच्या आहेत का?’ आपल्यातली स्वयंपाकाची ही आवड आदित्य त्या क्षणाला घाबरून मनाच्या खोल डोहात बुडवून टाकतो. पुढे अनेक वर्षांनी एमबीए होऊन लंडनमध्ये खूप पैसे कमावल्यावर ही आवड पुन्हा त्याच्या मनाच्या दरवाज्यावर धडका देते... फार तरल प्रसंग आहे…

स्वयंपाक या कलेला नसलेला सन्मान, अभिव्यक्तीचा शोध, त्यातून आलेली अस्वस्थता, समाज आणि पालकांचा दबाव, त्यातून होणारी घुसमट, पालकांचं त्यांच्याही नकळत होणारं असंवेदनशील वागणं... कितीतरी गोष्टी... आदित्यच्या वडिलांची एक थापड किती महाग होती याची कदाचित त्यांनाही जाणीव नसेल. पालक म्हणून खूप काही समजावून सांगणारा प्रसंग आहे. असे हजारो आदित्य समाजात मिळतील. आणि आपल्या Expressionच्या शोधात असलेले अनेक तरुण-तरुणी ते रिलेटही करतील.

जे आवडत नाही नेमकी तीच गोष्ट करण्यात आदित्यची अनेक वर्षं गेलेली असतात. त्यात त्याला पैसा, मान्यता आणि प्रतिष्ठा मिळालीय, पण त्याची आतली आवड, अभिव्यक्ती त्याला काही स्वस्थ बसू देत नाहीये. शेवटी तो लंडनची भरपूर पगाराची नोकरी सोडून देतो. त्याच्या या निर्णयापायी त्याची होणारी बायको त्याला सोडते. अभिव्यक्ती, आवड आणि समाजमान्यता यामध्ये संवेदनशील माणसाचं जे काही गुदमरणं होतं, ते दिग्दर्शकानं फार अचूक मांडलंय आणि सिद्धार्थ चांदेकरनं त्याला पूर्ण न्याय दिला आहे. एकीकडे लंडनमध्ये नोकरी करणारा स्टायलीश, टेक्नोसॅव्ही, फंकी आणि दुसरीकडे अगदी घरगुती असं बेहतरीन कॉम्बीनेशन सिद्धार्थनं अभिनयात मस्त उतरवलं आहे. शिवाय तो दिसतोही देखणा!

सोनालीनं राधाचे काही काही प्रसंग तर असे केले आहेत की बस! लाजवाब!...विशेषत: आदित्य आणि राधा दोघं एका आजी-आजोबांच्या घरी स्वयंपाक करून द्यायला जातात आणि स्वयंपाक झाल्यावर निघताना व्हिलचेअरवर असणाऱ्या आजी राधाला भेट म्हणून साडी देतात. त्यावेळचं राधाचं कोसळणं सोनालीनं जे उभं केलंय ते पाहून अश्रू आवरले नाहीत.... अनेक वर्ष प्रेमासाठी भुकेली, एकटी, असुरक्षित अशी राधा… आजींनी प्रेमानं साडी देण्याचा क्षण... ‘इतना टूट चुका हूँ, की छुने से बिखर जाऊंगा’... अशी कोसळते. 

चित्रपटातली एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट म्हणजे चित्रपटातलं पार्श्वसंगीत (बॅकग्राऊंड स्कोअर)... या सिनेमाचा प्रभाव अनेक पटींनी वाढवण्यात या पार्श्वसंगीताचा खूप मोठा वाटा आहे. तेजस मोडकचं खूप अभिनंदन...

सिनेमातलं फूड डिझायनिंग तर डोळ्यांसाठी मेजवानी आहे. सायली राजाध्यक्षांना त्याचं श्रेय आहे. सेपिया कलरमध्ये सुरुवातीला पदार्थांच्या पार्श्वभूमीवर कलाकार आणि इतर लोकांची नाव दिली आहे. ती फारच सुंदर आहेत. दिग्दर्शकाची कलात्मक नजर अशी ठिकठिकाणी दिसून येते. सिनेमात खूप छान सस्पेन्सही दिग्दर्शकानं ठेवला आहे. स्वयंपाकाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देणारा हा सिनेमा आहे. या सिनेमामुळे गृहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. आणि न जाणो ‘डायल अ शेफ’ म्हणून कुणी स्टार्टअप ही सुरू करावा. हॅट्स ऑफ टू सचिन कुंडलकर!

मध्यंतर होतानाचा एक प्रसंगही फार बोलका आहे. राधा स्मृती गेल्यानं पैसे मोजणं विसरलेली असते. रस्त्यात एक भीक मागणारी मुलगी राधाला दिसते. राधा तिला अख्खं पैशाचं पाकिट देते. ती मुलगी पर्स उघडून फक्त दहाची नोट घेते. आणि पर्स राधाच्या हातात देते. ती नोट राधाच्या हातात देतानाच मध्यंतर होतो. निरागसपणावरचा विश्वास दाखवणारा हा प्रसंग.

सिनेमाच्या मध्यंतरानंतर राधाला तिचा कॉलेजमधला मित्र भेटतो.. तिची स्मृती गेल्यानं ती त्याला पूर्ण विसरलेली असते. तो तिला आठवण करून देतो. त्यावेळी खूपदा आठवणी या दु:खद असल्यानं त्याची स्मृती होते. एका अर्थानं बरंच झालं माझी स्मृती गेली, पण त्यासाठी किंमत फार द्यावी लागली असं राधा म्हणते.

इकडे नावडत्या कामातून मुक्ती मिळवण्यासाठी आदित्यलाही बायको गमवावी लागते... ‘गुलाबजाम’मध्ये हे प्रसंग बघताना आठवलं. माझ्या एका मित्राची आजी अनेक आजारांनी ग्रस्त होती. त्यात अचानक त्यांची स्मृती गेली. आणि आश्चर्य म्हणजे जशी त्यांची स्मृती गेली तशा त्यांच्या सर्व व्याधी गेल्या. थोडक्यात मुक्तीसाठी किंमत ही चुकवावीच लागते, पण मुक्तीच्या तुलनेत तिच्यासाठी चुकवलेली कुठलीही किंमत ही नेहमीच कमी असते...

.............................................................................................................................................

लेखिका वसुंधरा काशीकर आय ट्रान्सफॉर्म या संस्थेच्या संचालक आहेत.

vasu.rubaai@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Deepali Khavanekar

Wed , 05 January 2022

अतिशय सुंदर लेख. समिक्षा


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......