राजस्थानात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • वसुंधरा राजे यांची विविध रूपे
  • Wed , 14 February 2018
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar वसुंधरा राजे Vasundhara Raje

राजस्थानमध्ये सध्या एक लेटर बॉम्ब चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार, इतर मागासवर्गीय (ओबीसी) सेलचे प्रमुख अशोक चौधरी यांनी भाजपचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एक पत्र पाठवलं. त्यात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना हटवा, अन्यथा लोक भाजपला हटवतील, अशी मागणी केलीय.

राजस्थानमध्ये दोन लोकसभा आणि एक विधानसभा पोट निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. काँग्रेसनं या तिन्ही जागांवर विजय मिळवला. त्यानंतर अशोक चौधरींनी हे पत्र लिहिल्यानं राजस्थानचं राजकारण ढवळून निघालंय. भाजपचा एक गट वसुंधरा राजे यांच्या विरोधात गेलाय, हे या लेटर बॉम्बमधून स्पष्ट झालंय.

या वर्षी अखेर डिसेंबरपर्यंत राजस्थानात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या घटना घडत असल्यानं त्यांचं राजकीय महत्त्व जास्त आहे. वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली २०१३ साली विधानसभेत भाजपनं राजस्थानात नेत्रदीपक विजय मिळवला होता. राजस्थानच्या विधानसभेत २०० आमदार आहेत. त्यापैकी काँग्रेसला फक्त २१ जागा कशाबशा मिळवता आल्या. अशोक गेहलोत मुख्यमंत्री होते. त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ हरलं होतं. वसुंधरा राजेंनी स्वतःच्या बळावर १७९ आमदार निवडून आणल्यानं त्यांचं नेतृत्व बळकट झालं होतं. म्हणून मुख्यमंत्रीपदीही त्यांनाच निवडण्यात आलं.

राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधरा राजेंच्या नावावर विक्रम आहे. राजस्थान हा राजे, राण्या, त्यांचे राजवाडे, त्यातील प्रेम, वैर, शौर्य, दगाफटके यांच्या कहाण्यांचा प्रदेश आहे. राजस्थानी माणसांच्या मनात या गोष्टींना एक हळवा कोपरा राखीव असतो. पण म्हणूनच या माणसांना आधुनिक होताना खूप त्रास होतो. इतिहासातून वर्तमानात येताना या माणसांची खूप त्रेधातिरपीट होते. हा प्रदेश पुरुषसत्ता मानणारा आहे. त्यामुळे या राज्यातून राजकारणात महिला पुढे येत नसत. तो प्रांत पुरुषांना राखीव असं मानलं जाई. असं असूनही राजघराण्यातल्या राणी असणाऱ्या वसुंधरा पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या अन् तो बदल इथल्या लोकांनी मनोभावे स्वीकारला.

वसुंधरा राजे त्यांच्या राजघराण्यातल्या काही राजकारणात पहिल्या पुढे आलेल्या महिला नाहीत. त्यांच्या आई ग्वाल्हेरच्या विजयाराजे सिंदिया या आधी जनसंघात आणि नंतर भाजपमध्ये मान्यवर नेत्या होत्या. त्यांचा वारसा वसुंधरा राजे सोबत घेऊन राजस्थानात धोलपुरला गेल्या. १९८४ साली त्या सक्रीय राजकारणात उतरल्या. अर्थशास्त्र, राज्यशास्त्राची पदवी त्यांनी घेतली होती. मुंबईत शिक्षण झालं होतं. व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि वक्तृत्व उठून दिसणारं. स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता या बळावर त्यांचा राजस्थान भाजपमध्ये दबदबा वाढला.

राजस्थानमध्ये एकेकाळी भैरवसिंह शेखावत यांच्याभोवती राजकारण फिरे. शेखावत तिथले ‘शरद पवार’ होते. शेखावत भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या पंक्तीतले मोठे नेते होते. शेखावत थकले. त्यांचा प्रभाव ओसरला आणि वसुंधरा राजेंच्या नेतृत्वाला बहर आला. आधी २००३-२००४ आणि आता २०१३-२०१८ अशा दोन टर्ममध्ये त्या मुख्यमंत्री पद भूषवत आहेत.

२०१३-२०१८ या दुसऱ्या टर्ममध्ये वसुंधरा यांच्याभोवती अनेक वादांची वादळं उठली. त्यातलं पहिलं वादळ ललित मोदी आणि त्यांच्या उद्योगधंद्यातल्या संबंधाचं होतं. ललित मोदी भारतातून पळाले आणि वसुंधरा यांचे ते मित्र व उद्योगधंद्यात भागीदार म्हणून आरोपबाजीला उत आला. सत्तेच्या बळावर त्या आरोपबाजीला वसुंधरा पुरून उरल्या असल्या तरी आरोपातून अजून त्या मुक्त झालेल्या नाहीत. त्यानंतर त्यांचा मुलगा आणि जवळच्या सहकाऱ्यांवरही भ्रष्टाचार, सत्तेच्या दुरुपयोगाचे आरोप झाले. त्याचे शिंतोडेही त्यांच्या अंगावर अद्याप आहेतच.

आता लेटर बॉम्बमधून अशोक चौधरी यांनी वसुंधरा यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वसुंधरा बेफाम वागत असून जवळच्या भ्रष्टांना साथ आणि पक्षातल्या इमानदारांना लाथ अशी त्यांची वागण्याची पद्धत आहे. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था गंभीर असून सरकारचा कारभार अंदाधुंद आहे. त्यामुळे लोक दु:खी आहेत आणि भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळलाय, अशी तक्रार अशोक चौधरींनी केलीय.

अशोक चौधरींचा ओबीसी गट इतके दिवस वसुंधरा राजेंविरोधात तक्रार करायला धजत नव्हता. कारण २०१४ च्या लोकसभेत वसुंधरा यांनी राज्यातल्या लोकसभेच्या २५ पैकी २५ जागा भाजपला मिळवून इतिहास घडवला होता. काँग्रेसला एकही जागा मिळू न देणं हा अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला हा मोठा हादरा होता. तो हादरा बसला आणि राजस्थानमधला गेहलोत यांचा प्रभाव कमी झाला. त्यानंतर काँग्रेसनं गेहलोत यांना हटवून सचिन पायलट यांना पक्षाचा राज्याचा नेता बनवलं. सचिन चाळीशीत आहेत. परदेशातून एमबीए शिकून आलेला, राजेश पायलट यांचा वारस, आधुनिक विचाराचा, राहुल गांधींचा विश्वासू अशी त्यांची प्रतिमा आहे.

चाळीशीतले सचिन पायलट आणि ६४ वर्षांच्या वसुंधरा यांचा गेल्या पोटनिवडणुकीत नेतृत्वाचा कस लागला. अलवार, अजमेर हे दोन्ही लोकसभेचे मतदार संघ काँग्रेसने जिंकले. मंडलगड विधानसभेची जागा भाजपकडून हिसकावून घेतली. ही पोटनिवडणूक म्हणजे येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकात जनमत काय असू शकतं याची झलकच म्हणता येईल. या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं वसुंधरा राजेंचा भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, गोरक्षकांचा धुमाकूळ, सरकारचा अंदाधुंद कारभार हे मुद्दे प्रचारात आणले होते. पोटनिवडणुकांत भाजपची हार झाल्यानं हे मुद्दे लोकांना पटतात असा अर्थ निघणं स्वाभाविक मानलं जाईल. त्यामुळे आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीतही हेच मुद्दे काँग्रेस अधिक जोरदारपणे पुढे आणणार हे उघड आहे.

राजस्थानची अर्थव्यवस्था पर्यटन आणि शेतीकेंद्रीत आहे. राज्यात ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या निमित्तानं राजपूतांची झालेली हिंसक आंदोलनं, अतिरेकी हिंदुत्ववादी गटांच्या कारवाया, बेगडी गोरक्षकांचे कारनामे या गोष्टींमुळे परदेशी पर्यटक राजस्थानमध्ये यायला घाबरतात, असं बोललं जातंय. त्यामुळे पर्यटन व्यवसाय मंदावल्याचं चित्र आहे. त्यामुळे लाखो लोकांच्या रोजीरोटीला फटका बसतोय. दुसऱ्या बाजूला देशातल्या इतर शेतकऱ्यांसारखाच राजस्थानी शेतकरीही संकटात आहे. त्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी होती. वसुंधरा सरकारनं प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपये मदत अनुदान देऊ असं आश्वासन दिलं होत. त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आपण फसवले गेलो, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. हा शेतकरी वर्ग आता भाजपविरोधी जात आहे.

नाराज घटकांची संख्या वाढली की, सगळे नाराज एकाच सुरात ओरडू लागतात. त्यांचा आवाजाला बळकटी येते. वसुंधरा विरोधी आवाजाचं संघटन आता भाजपमध्येच होऊ लागलंय. ओबीसी नेते अशोक चौधरींच्या लेटर बॉम्बनंतर दुसरे एक बंडखोर भाजप आमदार घनश्याम तिवारी यांनी वसुंधरांना हटवा अशी मोहीम सुरू केलीय. तिवारींच म्हणणं असं की, राजस्थानचे भाजप राज्य अध्यक्ष अशोक परमाणी हे वसुंधरा राजेंचे गुलाम आहेत. अशा गुलामांकडे पक्ष नेतृत्व असल्यास पक्ष रसातळाला जाईल.

राजस्थानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद प्रभावी आहे. पण वसुंधराविरोधी मोहिमेपासून संघ अंतर ठेवून आहे. नाराजांना संघाचा पाठिंबा नाही. पण वसुंधरा राजेंपासूनही संघ दूर आहे. या प्रकरणात संघाचा तटस्थपणा आणि मौन खूप बोलकं ठरावं.

वसुंधरा राजेंभोवती पक्षातून वादांचं वादळ घोंगावत असताना भाजपपासून राजपूत, गुज्जर, जाट आणि ब्राह्मण समाजाच्या संघटना दूर जात आहेत. राजपूत ‘पद्मावत’ चित्रपट प्रकरणात नाराज आहे. गुज्जर, जाट आणि ब्राह्मण समाजाचं आकर्षण, नोकऱ्यांविषयी प्रश्न आहे. या नाराज घटक-जातींना सचिन पायलट जवळ घेऊन त्यांना काँग्रेसच्या छत्रीखाली आणताना दिसत आहेत. या घडामोडींमुळे नवी जाती समीकरणं राजस्थानमध्ये आकाराला येत आहेत. राजपूत, ब्राह्मण हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे. तोच जर दूर गेला तर येत्या काळात भाजपला त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असं घनश्याम तिवारींनीच म्हटलं आहे. अशोक चौधरींनी ओबीसी समाजाची नाराजी मांडली आहे. मध्यम जाती आणि ओबीसी केवळ वसुंधरा राजेंच्या कारभारामुळे दूर जात असेल तर भाजप नेतृत्वाला त्याची दाखल घेणं भाग आहे. लेटर बॉम्बवर अमित शहा यांनी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. ते काय भूमिका घेतात यावर वसुंधरा राजेंचं भवितव्य अवलंबून आहे. ते भवितव्य काहीही असो पण त्याआधी राजस्थानचा मूड भाजपविरोधात जातोय, हे भाजप बंडखोर नेत्यांनीच स्पष्ट केलंय.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......