‘तो फुकट फौजदार आपला दारजी, माझं बरं झालेलं त्याला पाहवेल काय?’
ग्रंथनामा - आगामी
वसंत नरहर फेणे
  • कारवारी माती’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 01 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama आगामी कारवारी माती Karwari mati वसंत नरहर फेणे Vasant Narhar Fene ग्रंथाली Granthali

वसंत नरहर फेणे यांच्या ‘कारवारी माती’ या नव्या कादंबरीचे प्रकाशन उद्या, शनिवार (२ डिसेंबर) रोजी मुंबईत होत आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीतला हा संपादित अंश. या कादंबरीला स्वातंत्र्यपूर्व काळाची अधिक आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची अल्प अशी पार्श्वभूमी आहे. त्या काळातील सामाजिक अवकाशाच्या प्रभावपरिणामातून जे काही रचित निर्माण होते, त्यातून ही चित्रमय कादंबरी साकार झाली आहे. 

.............................................................................................................................................

असो. तर या एडवर्डचा राज्यारोहण सोहळा सर्वत्र गाजला. तोही अंकोल्या जवळील अवर्सा या गावी व त्यामुळे अंकोला, होन्नेकेरी या पंचक्रोशीत तो विशेष गाजला! हा भाग काही वेगळा म्हणून नव्हे, सबंध हिंदुस्तान म्हणजे खंडीभर भात असं समजलं तर, अवर्सा-अंकोल्याचा परिसर म्हणजे त्यातील काही शितं होत! इथं राज्यारोहणाचा सोहळा विशेष गाजला, कारण अवर्शाचा शानभोग (कुलकर्णी) मंगेशबाप्पा देसाई याला राज्यारोहणानिमित्त सरकारकडून मानाची पगडी मिळाली होती. त्यांची राजनिष्ठा व कर्तव्यनिष्ठा यांना मिळालेली ती पावती होती.

गंगाबाईच्या माहेरचा मंगेशबाप्पा जवळचा- म्हणजे तेरा दिवसांतला- दाराद! (कुटुंबी) तिनं त्या सायंकाळी दारा-खिडक्यांत दिवाळसणाप्रमाणे पणत्या लावल्या. गणानं मात्र तिच्या या उत्साहाकडे आणि ‘माझ्या कुळारच्या (माहेरच्या)चा बहुमान झाला तर, मला आनंद होणारच!’ यासारख्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. याचं गंगाबायला आश्चर्य वाटलं नाही. तिला माहीत होतं की, तिच्या नवऱ्याच्या मते हिचकड हेच सर्वांपेक्षा सर्वच बाबतीत सदासर्वदा सर्वश्रेष्ठ!

गंगाबायचं सोडा, मात्र गणाच्या अभिमानाला भक्कम पाठबळ होतं. त्याचा एक पूर्वज शाबाजी सुब्याय नशीब काढायला ‘हिचकड’ गावाहून अंकोल्याला आला. आपल्या अक्कल-हुशारीनं त्यानं अंकोल्याच्या मूळच्या त्याच्या जातवाल्यांपेक्षा अधिक इस्टेट केली! शाबाजीच्या नातवानं आपल्या मूळ गावाचं नाव ‘हिचकड’ हे आडनाव म्हणून स्वीकारलं. त्याचा धाकटाभाऊ शिवराय यानं होन्नेकेरी येथे बस्तान मांडलं, ती शाखा होन्नेकेरी हिचकड म्हणून ओळखली जाऊ लागली. गणाला आपल्या या शाखेचा भलताच अभिमान! तो म्हणायचाच- हिचकडात हिचकड होन्नेकेरी हिचकड! नवरा आपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो म्हणून गंगाबाय मोठ्यानं बोलली, ‘मथे! हो मंगेशबाप्पा तुर्गेर्लो खास्सा बापोल्यॉ आज्जॉ! (मथे, हे मंगेशबाप्पा तुझे सख्खे चुलत आजोबा!) अंकोल्यापासून उत्तरेला एकवीस मैलांवर कारवार. कारवारच्या उत्तरेला पंधरा-वीस मैलांवर पोर्तुगीजांच्या अंमलाखालील गोवे होते. त्यास गोमांतक असंही म्हणतात.

वास्तविक अंकोल्याच्याही दक्षिणेस गंगावळी नदीपर्यंतचा भूभाग हा गोमांतकाचाच भाग शोभावा. मात्र गोमांतकाचा बहुतेक भाग पोर्तुगीजांकडे असल्यामुळे, इंग्रजांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या माजाळीपासूनचा गंगावळी नदीपर्रंतचा भाग दक्षिणेकडील कन्नड भागाशी जोडला व होनावरा या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण केलं. अशा प्रकारे उत्तर कन्नड जिल्हा तयार झाला. त्यानंतर म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सरकारने योजनापूर्वक कारवार गाव वसवले. त्यामुळे कारवार गावाचे मुख्य रस्तेच नव्हे तर, लहान रस्ते नि पाणंदीदेखील (ओढ्याच्याकडेने काढलेली पायवाट) आखीवरेखीव झाल्या. त्यामुळे इतर लहान-मोठ्या गावांपेक्षा कारवार हे गाव नमुनेदार झाले!

त्यांनी कारवार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण केले. कारवार येथे कन्नड- भाषक नसल्यातच जमा. अंकोला इथंही कन्नडिगांची वस्ती किरकोळच होती. गोव्याप्रमाणेच या भागातील लोकांची बोलीभाषा कोंकणी, पोथ्यापुराणांची भाषा मराठी, पत्रव्यवहारासुद्धा मराठी भाषेत व मोडी लिपीत होत असे.

मात्र, जिल्ह्याची सरकारी भाषा कन्नड (किंवा कोंकणी भाषकांच्या लेखी कानडी) असल्यामुळे व नोकरीचाकरी ही मुलांनीच करावराची असल्यामुळे, येथे कोंकणी भाषक मुलांसाठी कन्नड प्राथमिक शाळा सुरू केल्या. त्यात व्ह.फा.- म्हणजे व्हर्नेक्रुलर फारनल- पर्यंत वर्ग होते. इंग्रज सरकार प्रजेचे हित जाणणारे आणि प्रजेवर विनाकारण अन्याय करणारे नसल्यामुळे, त्याने कारवार-अंकोला येथे मुलींसाठी फक्त मराठी शाळा सुरू केल्या होत्या. त्यामुळे या भागातील मुली बाळबोध मराठीच शिकत.

भाषेच्या बाबतीत कारवार अंकोल्यात अशी तिरपागडी स्थिती झाली. असो. बारकोच्या मंगेशबाप्पा देसाराबद्दलच्या बोलण्याकडे गणानं दुर्लक्ष केलं. कारण त्या किंवा दुसऱ्या कोणाही देसायानं शिक्षणात दिवे लावले नव्हते! उलट गणा मुलकी (व्ह.फा.) परीक्षेत सबंध उत्तर कन्नड जिल्ह्यात पहिला आला होता. तो इंग्रजी शिकला तर, मोठा अंमलदार होऊन गावोगाव फिरेल; घराशेतीकडे त्याचं दुर्लक्ष होईल म्हणून म्हाबळूशेणैनं आपल्या एकुलत्या एक मुलास इंग्रजी शिकवलं नव्हतं. तरीही गणा तसा एकपाठी असल्यामुळे त्याला तुकारामाची गाथा बरीचशी पाठ होती. एकनाथी रामारण व भागवत त्यानं आपल्या मातापित्यांना वाचून दाखविले होते. तो अंकोल्याच्या कन्नड प्राथमिक शाळेत मास्तर होता. पित्याच्या मृत्यूनंतर तो अंकोल्याच्या केणी मास्तरांकडून इंग्रजी शिकला. मूळचाच हुशार असल्यामुळे, तीनेक वर्षांतच मॅट्रिकच्या दर्जाचे इंग्रजी त्याने आत्मसात केले; आणि केणी मास्तरांकडे असलेली, ‘ए टेल ऑफ टू सीटीज’, ‘डॅविड कॉपरफील्ड’सारखी नावेलेही त्याने वाचली.

गणाचे लग्न होऊन त्याला एक-दोन मुले झाल्यावर, त्याचे आईबाप त्या काळाच्या प्रथेनुसार साठीच्या अलीकडे पलीकडे वारली आणि गणा आपल्या मनाप्रमाणे वागावयास मोकळा झाला. गणा शाळेत मास्तर होता; मात्र त्याचा जीव शेतीतच गुंतला होता. गणा मनापासून मानायचा की, उत्तम शेती, मध्यम व्यापार व नोकरी ही कनिष्ठच! त्याला जन्मभर नोकरीत अडकायचं नव्हतं. शेतीत देदीप्यमान यश मिळवून होन्नेकेरी हिचकडाचं नाव त्याला सर्वत्र दुमदुमवयाचं होतं. अशा या अत्यंत बुद्धिमान, अत्यंत कर्तबगार आणि महत्त्वाकांक्षी गणा हिचकडला त्या अवर्शाच्या देसाय मंगेशाच्या किरकोळ पगडीभर यशाचं काय होय? त्या देसाय शानभोगालाच नव्हे तर, पंचक्रोशीतील कुणालाच गणा मोजीत नव्हता. त्यात त्याचे काय बरे चुकले? रुद्रण्णा होन्नेकेरीला गणाच्या घराच्या आखंड्यापाशी पोहोचले. तिथंच थांबून गुरांसाठी वईला असलेल्या झडप्यामधून बाहेर पडणाऱ्या विशीच्या पोराला त्यांनी ‘यारू?’ (कोण रे) म्हणून जरबेनं विचारलं. पुढं पदर सोडलेली कास्टी (लंगोटी) आणि डोकीवर लाल चौकड्याचं जुनाट पटकूर हा त्याचा वेश होता. त्याच्या करगोट्याला आकडी होती. तीतून कोयता लटकत होता व त्या पोराच्या हातात असोला नारळ होता.

तो पोरगा नम्रपणे कोंकणीतून उत्तरला, ‘हांव तो शेणै-धाकू!’ (मीच तो धनी-धाकू) ‘म्हळ्यार?’ (म्हणजे?) रुद्रण्णाचा प्रश्न. ‘कोमारपंतालॉ.’ रुद्रण्णांना त्याची जात समजली नि पूर्ण ओळख झाली. दोघांनाही त्यात काही गैर वाटलं नाही. कारण यामागं शतशतकांची अद्वितीय परंपरा होती. तीनुसार एकाच धर्मातल्या लोकांत अनंत जाती नि जातीतही बऱ्याच पोटजाती होत्या... उच्चनीचतेवर आधारलेल्या व कर्मफळानुसार मिळणाऱ्या जन्मानंच सिद्ध होत असलेल्या. रुद्रण्णांसारखे ब्राह्मण म्हणजे उच्च जातीचे. कोमारपंत खालचे! कोमारपंतांहून अधिकाधिक ‘वर’ असलेल्या नि अधिकाधिक ‘खाली’ अनेक जाती. धेड, चांभार, महार, आगेर जाती तर अस्पृश्यच. अस्पृश्य जातीतही ‘वरचे-खालचे’पणा होता, नि त्यांच्यातही पोटजाती होत्या. एकाच लहानशा गावात असूनही, माणसं जातीनुसार आजन्म वेगवेगळ्या पातळ्यांवर जगत नि मरतही. साहजिकच माणूस हा जातीनंच अधिकतर ओळखला जाई. रुद्रण्णांच्या ‘म्हळ्यार?’ (म्हणजे?) या चौकशी मागं या दीर्घ परंपरेचा संदर्भ होता. रुद्रण्णा उंचीनं मध्यम आणि अंगानं स्थूलसर होते. भरघोस छपरी मिशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर घालीत होत्या. त्यांनी जरीकाठी किरमिजी रुमाल सुडौलपणे डोक्याला बांधला होता. भव्य कपाळावर चंदनाचा टिळा होता. उपरण्याप्रमाणे त्यांचं धोतरही बऱ्यापैकी होतं आणि त्यांच्या हातात चांदीच्या मुठीची काठी होती. पायात जाड जुती होती. ‘गणा, रे-गणा- आहेस ना रे घरात?’ आखंड्यातून शिरताना त्यांनी पुकारा केला.

पूजेला बसलेल्या गणाच्या ओठाचा डावा कोपरा आक्रसला. त्याची बायको गंगाबार रगड्यावर मसाला वाटीत होती. उजव्या हातावरनं रगड्यात पाणी सोडून ती उठली. ती पदराला हात पुसतच आली. वर्षाचा लाजकुरा विद्याधर चौकावरून सैपाकघरात आला. तिनं त्याला चौकीवर चटई पसरायला सांगितली. तर तो ‘हांव-ना’, ‘हांव ना’ करू लागला. ते काम चटकन् व्हायला हवं, म्हणून तिनं त्याचं डोकं भिंतीवर दोनदा आपटलं. जोरात नव्हे; पण अगदी हळूही नव्हे. तो रडत बाहेर गेला. चटई पसरून परत आला नि पालथ्या मुठींनी डोळे चोळत मुसमुसू लागला. पाहुण्यामुळे नीट रडता येत नसल्यानं त्याचं बिचाऱ्याचं दुःख गुदमरत होतं. तेव्हा रुद्रण्णा घराच्या उत्तराभिमुख दारासमोर उभे होते. दारासमोर काही अंतरावर विहीर होती. विहिरीजवळील माडाच्या आळ्यात एका फळकुटावर बसून मथी कळशी, तांब्या घासत होती. रुद्रण्णांना न पाहिल्यासारखं करीत होती. असं करण्यात आपण मोठ्या कामसू आहोत असं त्यांना वाटावं एवढंच, हौसेनं नऊवारी लुगडं नेसलेल्या त्या पोरीचा हेतू होता. तिला एकदोन क्षण निरखून पाहून रुद्रण्णांनी वहाणा काढल्या आणि ते चौकीवर आले. आदल्या दिवशीच काजळी घालून शेणानं सुरेख सारवलेली जमीन तजेलदार कुळकुळीत काळी वाटत होती. तीवर रुद्रण्णांची चार पावलं उमटली. वाटेवरची लाल माती जुत्यांना जुमानणारी नव्हतीच.

तोवर गंगाबार माजघरात येऊन मोठ्यानंच म्हणाली, ‘विद्याधर, सांग रे, पूजेला बसायचं झालं आहे!’ ‘असूं दे-असूं दे! म्हणून रुद्रण्णा चटईवर बसले. त्यांनी काठी मांडीसमोर ठेवली.

सैपाकघरात आलेल्या मथीच्या नऊवारी लुगड्याच्या निऱ्यांचा घोळ गंगाबायनं डाव्या हातानं वर करून, उजव्या हातानं झटकला. तिचं लुगडं जरा बरं दिसलं. गंगाबायनं तिच्या एका हातात पाण्याचा गडू दिला आणि केळीच्या पानाच्या एका चोळक्यावर (तुकड्यावर) गूळ ठेवून, तो तिच्या दुसऱ्या हातात दिला. तिला नमस्कार करायची सूचना दिली. मोठ्या जबाबदारीची कामगिरी पार पाडीत असल्याप्रमाणे मथी पावलं तोलून टाकत बाहेर आली. गूळ, पाणी पाहुण्यांसमोर ठेवून, तिनं वाकून नमस्कार केला आणि ती घाईघाईने आत जाऊ पहाते; तर रुद्रण्णांनी ‘नाव कितँ गो तुजे?’ असा प्रश्न तिला केला. ती अडखळली. दुसऱ्याच क्षणी प्रसंगावधान राखून म्हणाली, ‘मथी!’ आपला आवाज अस्पष्टसा वाटून, तिनं आपल्या नावाचा मोठ्यानं उच्चार केला. रुद्रण्णा हसले. म्हणाले, ‘त्या नावानं तुला बोलावतात. तुझं नाव मथुरा. कुणी नाव विचारलं तर, मथुरा म्हणून सांगायचं. समजलं?’ मान डोलावून ती आत जाऊ पहाते तर; त्यांचा दुसरा प्रश्न, ‘बाप्पानं तुला अंकलिपी शिकवली ना?’ ती दचकलीच. आणि तिनं ‘ना-ना’ अशी मान हलवली.

‘मराठी अआइई शिकवलं का कानडी?’ रुद्रण्णांचा हिकमती प्रश्न. कशी नकळे, ती निर्धास्तशी झाली. तिनं हसत मानेनंच नकार दर्शविला. ‘खरंच सांगतेस?’ या त्यांच्या प्रश्नावर पोरीनं चटकन् गळ्याचं कातडं चिमटीत धरलं नि म्हटलं, ‘खरंच!’ ‘बरं जा’ पोर आत पळाली. गंगाबायचं तोंड फुलून आलं. रुद्रण्णा नेक माणूस म्हणून प्रसिद्ध. कुणाकडेही मुलीबद्दल त्यांच्या तोंडून दोन चांगले शब्द निघाले, तर तिची सोयरीक जमण्याच्या दृष्टीनं चांगलंच! बाकी त्यांच्या प्रश्नाचं गंगाबायला आश्चर्य वाटलं नाही. कारण तिचा नवरा चक्रम म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध! चार लोकं करणार नाहीत, ते करण्यात हे चिरंजीव सर्वात पुढे! तेव्हा मुलीला शिकवण्याचा अगोचरपणा त्यानं केला असावा, असं रुद्रण्णांना का वाटू नये? म्हणूनच त्यांनी वडलांनी शिकवलं कां, असं विचारलं.

पूजा आटोपून गणा पीतांबरावरच रुद्रण्णांसमोर येऊन, त्यांचा मान ठेवत उभा झाला. रुद्रण्णांनी आपल्या सख्या चुलतभावाच्या या मुलाकडं पाहिलं. त्याच्या पीतांबराच्या जवळचा पोटाचा भाग बराच उजळ होता. वरचा भाग नि चेहरा चांगला रापलेला होता. त्याचे बाहू पिळदार नि खांदे बाभळीच्या गांठीसारखे. चांगला उंच-निंच आणि चेहरा उभट. डोळे सतेज. डोकीवरील घेरा, शेंडी. त्याच्या बगलेतून केस बाहेर पडले होते आणि त्याच्या पाराचीच नव्हे, तर हाताची नखाग्र चांगली काळी होती. गणा मान देऊ दे त्यांना, मात्र तो जाणत होता की ते कितीही मोठे अंमलदार असले तरी बुद्धीनं, कर्तृत्वानं आपणच या म्हाताऱ्यापेक्षा हजार हिश्शांनी सरस!

‘अरे, तू म्हणे त्या शूद्रातिशूद्र आगेरांना शेतात कामाला घेतोस आणि त्यांच्याबरोबर तूही काम करतोस! तुला शेतात काम करायला घाडी-गौडा मिळत नाहीत या होन्नेकेरीत? मग मी अंकोल्याहून पाठवतो! अरे, तुला जग म्हाबळूशेणैचा पूत म्हणून ओळखतं आणि तू शेतात राबायचं?’ आपली प्रतिक्रिया चेहऱ्यावर न दाखवता गणा गप उभा. मग रुद्रण्णांतल्या अंमलदाराला राग आल्याशिवाय कसा राहील? त्यांनी सरकारी खात्यातील आपल्या प्रतिष्ठेस अनुरूप प्रश्न केला, ‘का सिंहासनावर बसल्या, बसल्या सातव्या एडवर्ड बादशहानं शेतात काम करायला आगेरांनाच घ्यावं, अशी आरडर बिर्डर काढली? मी आठ महिन्यांमागं रिटायर झालो ना? मी गोऱ्या साहेबांचा असिस्टंट म्हणून काम केलं तरी आता नवीन बादशहा, नवीन विसावं शतक, आता मीच तुझ्यासारख्या प्रारमरी टीचरकडून शिकून घ्यायला हवं!’ केवळ वडिलकीचा मान राखायचा म्हणून, गणा ‘बघतो-बघतो’ असं पुटपुटला. आत गंगाबायला या चांगल्या वडीलमाणसानं नवऱ्याचा अपमान करू नये, असं वाटत होतं.

गणा पुन्हा तोंडातल्या तोंडात पुटपुटला, ‘बघतो- करतो काहीतरी...’ ‘आणि तू म्हणे त्या सावळ्या शेटीकडून कर्ज काढलंस?’ गणानं मान वर करून एकवार नजर त्यांच्यावरून फिरवली. तो मनातून सरपटला. कुणाला सांगणार नाही, असा शब्द देऊन त्या सावळ्यानं... आतमध्ये ‘कर्ज’ हा शब्दच लोखंडाच्या तप्त रसाप्रमाणे गंगाबारच्या कानात पडला. पुरुषांनी सर्वच व्यवहार बायकांना सांगायलाच पाहिजेत, असं नाही. तरीही काही कारण नसताना कर्ज काढणं म्हणजे? तिच्या उरावर त्या कर्जाचा भयंकर भार जाणवू लागला. गणाच्या डोक्यात सावळ्या शेटबद्दल राग गरगरत होता.

‘कर्ज असं नाही... थोडे उसनेच...’ गणा चाचरला. आत गंगाबाय हबकली.

‘तो शेट्टी तुला व्याजाशिवार पैसे देणार? हं?’ ते नाराजीनं ‘हुं’कारले. मग त्याला फूस लावत, रागावत रुद्रण्णांनी बराच हितोपदेश केला. त्यांचं म्हणणं असं की संसार म्हटला, की अडअडचणी या यायच्याच. गणाला वडिलोपार्जित थोडीफार जमीन आहे. घर आहे. बाग आहे. आठदहा माड आहेत. चारसहा फोफळी आहेत. आंबा, फणस, कोकम, रिठा सारं काही आहे. शिवार भक्कम नोकरी आहे. काही अडचण आलीच तर, त्यांच्यासारखे वडीलधारे आहेत. ते मदत करतीलच. पण असं कर्जवाम करणं वाईट! वाईट म्हणजे एकदम वाईट!! गणा ‘हूं-हूं; हूं-हूं’ करीत मान डोलावीत होता. मात्र मनात म्हणत होता, काहीही होवो, तुझ्यासारख्या फुकटफौजदारापुढे नाक घासणार नाही. रुद्रण्णांशी त्याचं वितुष्ट होतं असं नाही. केवळ वर आणि त्याचं सरकारी अंमलदारपण यांच्या जोरावर, त्यांच्याहून सर्वच बाबतीत उजवा असलेल्या गणाला ते उपदेश करीत होते. लायकी काय त्यांची? आज मात्र गंगाबायला आपल्या झंड नवऱ्याला, रुद्रण्णांसारखा मोठा पुरुष दोन खडे बोल सुनावतो, याचं मनापासून बरं वाटत होतं. मनात कर्जाची धास्ती वाटत असूनही. आखंड्यातून बाहेर पडताना रुद्रण्णांना सात्त्विक समाधान वाटत होतं. आपल्याच एका हुशार मात्र चुकीच्या मार्गानं जाणाऱ्या तरुणाला त्यांनी चांगला उपदेश केला होता; तो आता मार्गावर येईल. आपल्या हातून परोपकार घडला तर, कुणाला आवडत नाही? पीतांबर सोडून गणा पंचा नेसला आणि सैपाकघरात पेज जेवायला आला. नेहमीप्रमाणे पुरुषांच्या पंक्तीत तो आणि विद्याधर होते. त्याचं जेवण पुरं होईपर्यंत, धीर धरलेल्या गंगाबायनं त्यानं अपोष्णी घेतल्यावर विचारलं, ‘रुद्रबाप्पा काय म्हणत होते कर्जवामाबद्दल?’ ‘तुला काय करायच्यात नस्त्या उठाठेवी?’ तो कांहीसा उसळून म्हणाला, ‘तो फुकट फौजदार आपला दारजी. (दारजी म्हणजे वैरी). माझं बरं झालेलं त्याला पाहवेल काय?’ ‘तरी ते कर्जा-ब-द्द-ल?’ ‘गप बस म्हटलं तर समजत नाही?’ नवऱ्यानं बायकोवर जसं ओरडायचं असतं तसं तो पद्धतशीर खेकसला आणि तिचं गोरंमोरं अपमानित तोंड पाहून आचवायला गेला.

गंगाबाय त्याच्यासारखी उंच नव्हती, मात्र जिथल्या तिथं गोंडस बांध्यामुळे डोळ्यांत भरणारी होती. डोळे खोल; तरीही डोळ्यांचं पाणी वेगळंच आहे, हे पहाताक्षणी लक्षात येई. तिची पाच बाळंतपणं झाली होती. तरीदेखील आता वयात येणारी मथी आणि सात-आठ वर्षांचा विद्याधर तेवढी ती होती.

गंगाबाय चारचौघींसारखी होती. चारचौघींसारखी आपला संसार व आपली मुलं; आपला नवरा व आपलं घरदार यात स्वतःला झोकून देणारी. गणाचं तिच्याशी वितुष्ट नव्हतं, मात्र नेमकं कशामुळे कुणास ठाऊक, त्याला वाटे ही बायको आपल्याला अनुरूप नाही. हे तो तिला किंवा कुणाला बोलला नाही; उलट चार नवऱ्यांप्रमाणेच तो बायकोशी वागत होता.

‘कारवारी माती’ ​(​कादंबरी​)​ - वसंत नरहर फेणे, ग्रंथाली​, मूल्य - ६०० रुपये.​

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4295

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......