गांधीवाद इतिहासजमा झाला?
सदर - गांधी @ १५०
आचार्य कालेलकर
  • म. गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Mon , 02 October 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

कित्येक लोक आता म्हणू लागले आहेत की, भारताला स्वराज्य मिळालेच नाही. जागतिक परिस्थिती बदलली, युद्धे अंगाशी आली म्हणून इंग्रजांना येथून जावे लागले. सशस्त्र क्रांतिकारकांची सरकारला भीती वाटली. म्हणूनही ते येथून गेले. त्यांना लोकांनी विचारले की, “एवढ्या मोठ्या देशातून इंग्रजांना जावे लागेल, तसेच ते इतर लहान मोठ्या प्रदेशांतूनही गेले असते, पण तसे झाले नाही. हे का?”

गांधींनी देशात अभूतपूर्व जागृती आणली, राष्ट्रीय जीवनाला नवा पाया दिला, हिंदू संस्कृतीला नवे वळण लावले आणि जगात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले ही गोष्ट नाकबूल करता येणार नाही. इतर देशांनादेखील गांधींपासून प्रेरणा आज मिळत आहे ही गोष्ट ध्यानात आणली पाहिजे. या गोष्टी ज्यांना मान्य आहेत असे लोकदेखील आता म्हणू लागले आहेत की, गांधीजींची लोकोत्तर कामगिरी मान्य, पण आता त्याचे महत्त्व किती? फार तर गांधीजींविषयी कृतज्ञता व्यक्त करू. पण गांधी आता इतिहासजमा झाले आहेत एवढे गांधीवाद्यांनी मान्य केले पाहिजे.

कित्येक लोक गांधीजींचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्रांतिकार्य मान्य करतात, पण राजकारणात या वस्तूंना महत्त्व देऊ इच्छित नाहीत. अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे.

सर्वच लोक स्वीकारतात की, गांधीजींची हिंदुस्थानाला आणि जगाला सर्वांत मोठी देणगी म्हणजे सत्याग्रह. तो तर गांधीवादी राज्यकर्त्यांनी सोडून दिला. इतकेच नव्हे तर सार्वत्रिक बहुमताने चालणाऱ्या सरकारविरुद्ध सत्याग्रह होऊच शकत नाही, असा प्रचार करून त्यांनी जिकडे तिकडे सत्याग्रहाला विरोध चालविला. याचा परिणाम असा झाला की काही लोक म्हणू लागले, “एव्ही तेव्ही सत्याग्रहाला नेत्यांचा पाठिंबा मिळणार नाही आणि सत्याग्रहाला चारित्र्याचा भक्कम पाठिंबा असावा लागतो तेव्हा त्या शस्त्राने जाच कशाला? बहुमताच्या जोरावर चालणारे प्रजाराज्य कधीही खंबीर असत नाही. अशा राज्याचा एक डोळा असतो पुढची इलेक्शने जिंकण्यावर, तेव्हा सत्याग्रहापेक्षा हत्याग्रह चांगला.” हत्याग्रहाविरुद्ध गोळी चालवण्याची पोलिसांना मुभा असते हे खरे. पण नेत्यांना त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण हत्याग्रह सुरू होण्यापूर्वीच नेत्यांना सरकार पकडून ठेवते. आणि थोडी शांतता होताच लोकक्षोभ टाळण्यासाठी नेत्यांना तुरुंगातून सोडून देते. त्यामुळे नेत्यांना भिण्याजोगे काही नसते. हत्याग्रहात सामान्य लोकांपैकी थोडी लोकं मरतात हे खरे पण तेवढ्या बलिदानाच्या जोरावर पुष्कळ मिळवता येते.

अशा रीतीने विचार करणाऱ्या लोकांनी हाकाटी चालवली आहे की, “आजच्या काळात गांधीविचार कितपत ग्राह्य आहे? कितपत व्यवहार्य आहे?”

गांधी होऊन गेल्या गोष्टीला शंभर दोनशे किंवा हजार वर्षे झाली नाहीत. दहा वीस वर्षांत काळ बदलत नसतो. तेव्हा त्या प्रश्नाचा अर्थ एवढाच होतो की, गांधींच्या काळी लोकांत स्वार्थत्याग करून देशसेवा करण्याची वृत्ती होती. उच्च जीवनाची प्रेरणा झाल्यास तिचा स्वीकार करून लोक बलिदानाला तयार होत. तसे आता आम्ही उरलो नाही. आम्हाला निवडणुका जिंकून राष्ट्रीय सत्ता आणि संपत्ती वापरण्याची संधी मिळवावयाची आहे. या कामी गांधीवाद काय मदत करणार? एवढाच वरील प्रश्नांचा अर्थ होतो. गांधींनी कोठेही म्हटले नाही की, लोकनियुक्त सरकार कधीच चुका करणार नाही आणि त्याच्या विरुद्ध सत्याग्रह होऊच शकत नाही! आणि सत्याग्रह हे काही फक्त सरकारविरुद्ध वापरण्याचे शस्त्र नव्हे. व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात, राष्ट्रीय जीवनात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत तेजस्वी, सात्त्विक लोकांनी केव्हाही वापरण्याचे ते शस्त्र आहे. ते नेहमी पाजळून तयार ठेवावयाचे असते. सत्याग्रहाचे शेवटचे बळ म्हणजे जगातील सर्व तेजस्वी सज्जनांचा त्याला पाठिंबा मिळत असतो आणि दुर्जनांनादेखील हे शस्त्र वापरणाऱ्या पक्षाची तेजस्विता आणि नैतिक श्रेष्ठता स्वीकारून तिच्यापुढे मान वाकवावी लागते. सत्याची ही शक्ती अपार आहे आणि सार्वभौम आहे. एवढा विश्वास ज्यांच्यात आहे तेच लोक खरे आस्तिक. स्वराज्य होताच आणि नेत्यांच्या हाती अधिकार येताच त्यांनी ठरवून टाकले की आता या देशात आमचे राज्य झाले. त्यामुळे सत्याग्रहाला आधार राहिला नाही. लोकांनीही पाहिले की खरा सत्याग्रह करू जाता, या गांधीवादी नेत्यांचाही पाठिंबा मिळणार नाही. तेव्हा अन्याय दिसला तरी डोळेझाक करून गप्प बसणे हाच मार्ग आहे. पण जगाचा सिद्धान्त आहे – Nature abhors vacuum. निसर्गामध्ये म्हणजेच जगामध्ये पोकळी फार वेळ टिकू शकत नाही. पोकळी उत्पन्न झाली की, ती जागा भरून काढण्यासाठी कसले तरी तत्त्व धावून येतेच. सत्याग्रहाला अवकाश राहिला नाही तेव्हा ती जागा हत्याग्रहाने घेतली. आणि हा हत्याग्रह वाटेल तसल्या लोकांनी चातुर्याने हाती घेतला. वर म्हटलेच आहे की, लोकसत्तात्मक राज्यात हत्याग्रह चालविणारे नेते सुरक्षित असतात. लढाईत ज्याप्रमाणे सैनिकांचा बळी द्यावाच लागतो त्याचप्रमाणे भावनेला वश होणाऱ्या सामान्य लोकांना थोडासा वाव दिला अथवा होऊ  दिला तर पुष्कळसे काम होते. हे चातुर्य आजच्या लोकनेत्यांमध्ये आहे. आणि जे सरकार सत्याग्रहाला दाद देत नाही त्या सरकारला हत्याग्रहापुढे नमावेच लागते.

यालाच जर ‘आजचा काल’ म्हणावयाचा असेल तर लोकांनी खुशाल म्हणावे. अशा कालोचित मार्गाने कोणतेही लोकनियुक्त सरकार सहज पाडता येईल. पण त्याच्या ठिकाणी दुसरे तेजस्वी किंवा समर्थ सरकार स्थापन होणे शक्य नाही. एकामागून एक सरकारे कोलमडून पडू लागली म्हणजे जनता आणि नेतृत्वाचे उमेदवार लोक डिक्टेटरशिपचे आवाहन करतात, “या निवडणुका नकोत, लोकमताचा खेळखंडोबा नको, मारील त्याला तलवार या न्यायाने नादीरशाही स्थापन केली पाहिजे.”

आपल्याला एक खूणगाठ बांधून ठेवलीच पाहिजे की, हिंदुस्थानात आपल्याला स्वर्ग उत्पन्न करता येईल. नरकही उत्पन्न करता येईल पण डिक्टेटरशिप या देशात कधीही येऊ शकणार नाही. एखादा मंत्र बोलल्याबरोबर स्थापन होणारा तो राज्यप्रकार नव्हे. हिंदुस्थानाची जनता एकजिनसी (Homogenous) नाही. हिंदुस्थानची फौज एकजिनसी नाही (आणि हेही लक्षात ठेवले पाहिजे की, ज्याला आपण हिंदुसमाज म्हणतो त्यातही आंतरिक एकजिनसीपणा नाही). किती का असेना, एक मनुष्य डिक्टेटर म्हणून उभा राहताच त्याला प्रतिस्पर्धी दुसरा डिक्टेटर उभा राहणारच. आणि दोघांनाही जनतेचा पाठिंबा मिळणार. फौजेची निष्ठादेखील अशा डिक्टेटरांमध्ये वाटली जाणार. मग यांनी वाटल्यास एकमेकांना मारून क्षीण व्हावे किंवा देशाचे तुकडे पाडून लहान लहान राज्ये स्थापन करावीत.

दहा हजार वर्षांच्या आपल्या इतिहासात राजनैतिक एकता केव्हा व किती वर्षे टिकली याचा हिशोब काढला पाहिजे. ‘आविक्षित’ सारखे वेदकालीन सम्राट केवढ्या मुलखावर राज्य करीत होते. आणि त्यांचे स्वराज्य अथवा साम्राज्य किती टिकले यांची चर्चा न करणे बरे! आपले सर्व सम्राट राजसूय यज्ञ करून सम्राट झाले. त्यांचे ते साम्राज्य दोन पिढ्या चालले की नाही याची वानवाच आहे. बाकी हिंदू काळात अधिकांश तर लहान लहान राज्येच होती. या राज्यांचे आपापसात हेवेदावे चालत. सामान्य प्रजा शांततावादी, शांतताप्रेमी आणि सांस्कृतिक एकता चालवणारी हाती. प्रजेला स्वदेशी- परदेशी कोणीही राजा असो, चालत असे. त्याने लोकजीवनात ढवळाढवळ न केली म्हणजे बरे. आणि त्याने ढवळाढवळ केली तर जनता ईश्वराची प्रार्थना करीत असे की, देवा, आता अवतार घे आणि आम्हाला या जुलमातून वाचीव. सत्यवानाचा पिता लोकप्रिय राजा होता. त्याला गादीवरून हाकून लावणाऱ्या राजाविरुद्ध प्रजेने काहीच केले नाही. राजा गेला वनवासाला आणि प्रजा मुकाट्याने बसून राहिली. पुढे देवाला दया आली. शत्रूचा नाश झाला. प्रजा आनंदली.

म्हणूनच तर कोट्यवधी जनतेच्या देशात लाखाहून कमी परकीय लोक घुसून राज्य करू शकले.

परकीय लोकांनी या देशातील लहान लहान राजांना पाळीपाळीने परास्त करावे. संबंध देश पादाक्रांत करावा. पण चार क्षत्रिय एकत्र होऊन लढणार नाहीत. पठाणांनी येऊन हिंदुस्थानावर प्रत्येक ठिकाणी आपली राज्ये स्थापन केली. तत्पूर्वी शंभर वर्षे तरी ते या देशात येऊन लोकस्वभाव अजमावू शकले होते. हीच गोष्ट मोगलांची. त्या दोघांना अनुभव आला की येथील लोक विदेशी आक्रमणकारी लोकांचे राज्य मजबूत करायला तटस्थ असतात. ते खाल्ल्या मिठाला जागतील आणि स्वदेशी रक्ताचा द्रोहदेखील करतील. जो कोणी अन्न देईल त्याच्याशी स्वामिनिष्ठ राहिलेच पाहिजे असे मानणाऱ्या लोकांना परक्याचे अन्न खाऊ नये असा उपदेश कुणीच दिला नव्हता. आजही परक्याचे अन्न खाऊ नये असा बाणा दिसून येत नाही!

राजनैतिक एकता आपण टिकवू शकू असा आत्मविश्वास आज किती लोकांत आहे? आणि सांस्कृतिक एकता तर भूतकाळाची उपासना करून, जुने हेवेदावे जिवंत ठेवून, कधीच उत्पन्न करता येत नाही. हा सार्वभौम सिद्धान्त नेत्यांच्या  डोक्यात तरी कधी आला आहे का? सांस्कृतिक एकता समाजाच्या जोरावरच उत्पन्न करता येते. सांस्कृतिक एकता जर मजबूत करावयाची तर भूतकाळाचे ध्यान धरून चालणार नाही. त्यांना भविष्यकाळ समजला पाहिजे. समन्वयाच्या जोरावर तो निर्माण करता आला पाहिजे. जे लोक भूतकाळ विसरू शकत नाहीत त्यांना वर्तमानकाळात सुप्त असलेले सामर्थ्य ओळखता येत नाही. गांधींना हे ओळखता येत होते. त्यांनी आत्मघाती चर्चा न करता, राष्ट्राला समन्वयाचा रस्ता दाखवून दिला आणि आंतरिक एकता वाढविण्यासाठी उदारतेचा उपदेश शहाणपणाने कसा करावा हेही दाखवून दिले. खरे म्हणावयाचे म्हणजे, गांधींचा पूर्ण उपरोग आजच आहे. त्यांच्या मार्गाने जाण्याची हिंमत दीर्घदृष्टी आणि कुशलता जर आपण मिळवू शकलो तर आजचे जटिल प्रश्न सोडविता येतील. जे लोक गांधीमार्गाला कालबाह्य ठरवतात त्यांनी आजचे प्रश्न सोडविण्याचा एकही मार्ग अमलात आणून दाखवला नाही. वादाच्या इरेस पेटलेल्या एकाने जोराने म्हटले, “जीवनात हरलो तरी बेहत्तर पण वादांत आम्ही हार खायला तयार नाही.” माणूस सहज बोलून गेला खरा, पण त्याने आपल्या लोकांच्या स्वभावावर या एका वाक्याने चांगलाच विदारक प्रकाश पाडला आहे.

आज जगात युद्धाची तयारी सर्वत्र चालत असते. या क्षेत्रात पुढारलेली राष्ट्रे दोन, रशिया आणि अमेरिका. या दोन्ही राष्ट्रांजवळ आज शस्त्रांचा साठा इतका तयार आहे की, जगाचा नाश त्यांना तीन वेळा करता येईल. तरीही हे लोक युद्ध छेडू धजत नाहीत. त्यांना कळून चुकले आहे, युद्धाच्या अंती एका पक्षाचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय ही स्थिती आता उरली नाही. आधुनिक शस्त्रास्त्रे वापरून युद्ध सुरू केले तर दोन्ही पक्षांचा सर्वनाश खात्रीने होणार याविषयी शंका उरली नाही. या दोन्ही राष्ट्रांचे पुढारी म्हणतात, युद्धावर आमचा विश्वास नाही. पण सैन्यावाचून आणि आधुनिक शस्त्रास्त्रांवाचून राष्ट्र सुरक्षित कसे राहील, हे आम्हाला समजत नाही. म्हणून आम्ही युद्धाची तयारी ठेवून आहोत. पण ही तयारी दिवसेंदिवस इतकी महाग होत आहे. युद्धात राष्ट्राचे रक्त सांडेल तेव्हा सांडेल पण तत्पूर्वी युद्धाच्या तयारीतच राष्ट्र रक्ताचे भयंकर शोषण करावे लागत आहे.

तेव्हा एकीकडे युद्धाला तयारी तर दुसरीकडे आपापल्या बाजूला अनेक राष्ट्रांना खेचून गटबंदीचे राजकारण आणि तिसऱ्या बाजूने सामोपचाराचे प्रयोग अजमावून पाहणे. अशी त्रिविध राजनीती चालू आहे. पहिले दोन प्रकार जुन्या विचाराचे, अप्रतिष्ठित पण जोरावर आणि तिसरा प्रकार हळूहळू विश्वमान्य होण्याच्या मार्गावर. ही आहे जागतिक परिस्थिती. जागतिक नेतृत्व करणाऱ्या लोकांना आता गांधीविचाराकडे ध्यान देण्याचे सुचू लागले आहे.

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

स्वराज्य आल्यानंतर मी जगाचा प्रवास केला. अमेरिका पाहून घेतली. दोनदा युरोपात आणि आफ्रिकेत थोडे डोकावून पाहिले. एकदा चीन सरकारच्याच मदतीने त्या देशात थोडे फिरून घेतले आणि जपानात तिकडच्या लोकांच्या आमंत्रणामुळे आणि अधिकांश त्यांच्याच खर्चाने पाचदा जपानात जाऊन आलो. सर्वत्र लोक म्हणतात, गांधीजींच्या तेजस्वी सत्याग्रहाने आम्ही आकर्षित झालो. जगावर दरारा चालवणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या तावडीतून त्यानी देश स्वतंत्र केला. त्यामुळे आम्हाला अंधुक आशा वाटू लागली की, त्यांचा मार्ग कदाचित उपरोगी ठरेल. आम्ही गांधींना श्रेय देतो ते त्यांच्या सत्याग्रहाच्या कोऱ्या कल्पनेसाठी नव्हे. कल्पना कुणालाही करता येते. पण या कल्पनेच्या जोरावर त्यांनी राष्ट्राला तयार केले. भारतीय जनतेने त्यांच्या हाकेला ओ दिली. आवश्यक असा त्याग करून दाखवला. या वस्तुस्थितीने आम्ही प्रभावित झालो. आणि म्हणून मोठ्या आशेने स्वराज्यप्राप्तीनंतरच्या भारताच्या कामगिरीचे आम्ही अत्यंत आस्थेने अध्ययन चालविले आहे. या वीस वर्षांत गांधींच्या मार्गाने तुमच्या देशाने एकही पाऊल पुढे टाकले नाही. यामुळे आता आम्हाला वाटू लागले आहे की भारतीय जनतेमध्ये तेजस्विता आहे, गांधीनी ती जागृत केली, पण तसे नेतृत्व त्यांच्या देशात आज उरले नाही. तेव्हा गांधीमार्ग खरा. जनतेची संस्कृतीदेखील आशास्पद. पण ती शिकवून तिचा उपरोग करणारे नेतृत्व मात्र गांधींना पुढे चालविता आले नाही. किंवा गांधींची प्रेरणा पचवून तुमच्या राष्ट्रनेत्यांना राष्ट्रीय शक्ती प्रगट करून दाखविता आली नाही. आम्हाला गांधीवादाविषयी जी आशा वाटत होती, तिच्यावर भारताच्या नेत्यांनी पाणी फिरविले, याचे आम्हाला फार वाईट वाटते. जपानातील काही विचारवंत मला म्हणालेदेखील गांधी असताना आम्हाला भारताविषयी आदर आणि प्रेम वाटत होते. या वीस वर्षानंतर आमचे प्रेम कायम आहे, आदर मात्र तुम्ही लोकांनी घालविला, याचे आम्हालाच वाईट वाटते.

जितकी वर्षे गांधीजी जगले त्या ७०-८०  वर्षांना ‘गांधीयुग’ काय म्हणून म्हणावे? ते तर जगाच्या दृष्टीने युद्धयुग होते. या साठ ते सत्तर वर्षात किती तरी युद्धे झाली आणि तीही जागतिक युद्धे झाली! या युगात गांधीजींनी अहिंसायुगाचे बीज पेरले. त्याला जर गांधीयुग म्हणावयाचे असेल तर ते बीज उगवल्यानंतरच म्हणता येईल. जे गांधीयुग अजून उगवलेच नाही ते संपले असे म्हणणाऱ्यांना ऐतिहासिक दृष्टीच नाही. गांधीयुग या पुढेच उगवणार आहे. विज्ञानाच्या लोकोत्तर विकासामुळे युद्धे सर्वनाशी होणार इतकी खात्री ज्यांना झाली आहे, दोन-तीन युद्धांमुळे ज्या लोकांच्या प्रत्येक घरातील तरुणांचे रक्त सांडले आहे, त्या लोकांनाच गांधीविचार, गांधीसाधना आणि गांधीनिष्ठा लवकर पटण्याचा संभव आहे. सत्याग्रहाचा जन्म झाला आफ्रिकेत. त्याचा राष्ट्रव्यापी प्रयोग गांधीनी करून दाखविला भारतात. हे जसे अदभुत स्थलांतर झाले, त्याचप्रमाणे सत्याग्रहाची आणि गांधीपणाची विशाल प्रयोगभूमी भारत आणि विजयभूमी अन्यत्र असे होणार असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

जेव्हा जेव्हा आपण गांधीजींना महात्मा म्हणत असू तेव्हा तेव्हा ते खरोखर दु:खी होत असत. ते म्हणत, “मी जे करतो ते प्रत्येक मनुष्याला साध्य आहे. मला अवतारी पुरुष ठरवून माझ्या कार्याचा नाश करू नका. मी जे करतो ते तुम्हाला शक्य आहे. तुम्ही ते केले पाहिजे. माझे अनुकरण करणे हाच माझी कदर करण्याचा एकमात्र प्रकार आहे. एरव्ही मला अवतारी पुरुष ठरवून देवाची प्रार्थना करत बसला की ‘देवा, आम्ही तर तुच्छ माणसे. जर तुला लाज असेल तर दुसरा अवतारी पुरुष पाठवून दे’ तर देवाला तुमची दया येणार नाही.” संतवचनांपैकी एकच वचन गांधींनी सिद्ध करून दाखविले-

“नर करणी करे तो नरका नारारण हो जाय” गांधींना इतिहासजमा करणे म्हणजे राष्ट्राला दुर्दैवी आणि करंटे बनविणे आहे. गांधीमार्गाचा उज्ज्वल इतिहास बनविण्याचे दिवस समोर असताना गांधींना भूतकाळात जमा करणे म्हणजे राष्ट्राचा घात करून त्याला भूतलोकात पाठवून देणे आहे. खरोखर आपल्याला आपल्या राष्ट्राची दया वाटली पाहिजे की, त्याचे नेतृत्व इतके आंधळे आणि निरुत्साही होऊ पहात आहे.

(‘गांधी नावाचे महात्मा’ या रॉय किणीकर संपादित आणि डायमंड पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित (२०१२) पुस्तकातून साभार.)

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.