गांधींबद्दल गैरसमज आहेत, त्यामागे हितसंबंधांचा भाग आहे!
सदर - गांधी @ १५०
किशोर बेडकीहाळ
  • म. गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Mon , 02 October 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आणि युसुफ मेहेरअली सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी १५०’ निमित्त २२, २३ आणि २४ एप्रिल २०१७ दरम्यान एक अभ्यास शिबीर घेण्यात आलं होतं. त्याच्या सहाव्या सत्रात बेडकीहाळ यांनी ‘म. गांधी : समज आणि गैरसमज’ या विषयावर केलेल्या भाषणाचा संपादित भाग...

.............................................................................................................................................

१.

गांधी हा माणूस कधीही नीट समजावून घेतला गेलेला नाही, प्रतिगाम्यांकडूनही नाही आणि पुरोगाम्यांकडूनही नाही. विलक्षण गुंतागुंत असणारं हे व्यक्तिमत्त्व आहे. कुणी असं म्हणतं की, हा ‘संतांमधला राजकारणी’ होता; कोणी असं म्हणतं की, हा ‘राजकारण्यांमधला संत’ होता. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. दुसरं म्हणजे सातत्यानं प्रवाही असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणं जरा अवघडच असतं. आयुष्याबद्दलची, आयुष्यातील घडामोडींबद्दलची, राजकारणाबद्दलची, समाजकारणाबद्दलची ज्यांची मतं ठाशीव असतात, ठरीव असतात, जी काळ बदलला तरी बदलत नाहीत, अशा विचारवंताचा अभ्यास करणं तुलनेनं सोपं असतं. कारण ठरीव मत असल्यामुळे ते नंतर काय बोलले हे पाहावं लागत नाही. त्या ठरीव मतांसाठीच ते प्रसिद्ध असतात. दुर्दैवानं गांधी याला अपवाद आहेत. खरं तर सुदैवानं म्हणायला पाहिजे. 

गांधी हे अत्यंत प्रवाही असणारं व्यक्तिमत्त्व आहे. मी थोडं अतिशयोक्त विधान करतो आहे असं वाटत असेल, पण माझी खात्री आहे हे विधान बरोबर आहे. मला स्वतःला असं वाटतं की, विसाव्या शतकानं पाहिलेला हा जगातला एकमेव आणि धैर्यवान माणूस आहे. कारण आपलं आयुष्य इतक्या खुलेपणानं, इतक्या पारदर्शक पद्धतीनं लोकांसमोर ठेवण्याचं धाडस जगातल्या भल्या भल्या मंडळींनासुद्धा झालेलं नाही. आपल्या आयुष्यातल्या चुका कुठेतरी आपल्याला कुरतडत असतात, खात असतात. त्यामुळे आत्मचरित्र लिहिणारी माणसंसुद्धा सगळं सांगतात असं नाही. काही राखून ठेवतात. कारण त्या चुकांचा एक गिल्ट तयार झालेला असतो. गांधींच्या बाबतीत असं काहीही आपल्याला दाखवता येत नाही. ज्याला आपण आरसा म्हणतो तसा हा माणूस त्याच्या लेखनात दिसतो, बोलण्यात दिसतो, आत्मचरित्रात दिसतो, त्याच्या पत्रव्यवहारातही दिसतो. त्यात कुठेही दुभंगलेपणा नाही. 

ही विलक्षण धैर्याची गोष्ट असल्यामुळे मी म्हटलं की, हा एकमेव धैर्यवान माणूस विसाव्या शतकानं पाहिला. त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती... दुबळं असण्याची नाही, कृश असण्याची नाही, आपल्याला जगभर पाठिंबा मिळेल की नाही याची नाही. 

‘कोणत्याही वादग्रस्त विषयाच्या संदर्भामध्ये माझं शेवटचं म्हणणं प्रमाण माना’ हे म्हणणं कधीच सोपं नसतं. ‘शेवटचं म्हणणं’ याचा अर्थ पहिलं काहीतरी आपलंच खोडून काढायचं. कारण वेळोवेळी ते बदलत गेलेले आहेत. परिस्थितीच्या रेट्यानं त्यांच्यात बदल झालेला आहे. आंबेडकरांसारख्या एका अत्यंत बुद्धिमान प्रतिस्पर्ध्यामुळेही त्यांना बदलावं लागलं आहे.  

बदल हा त्यांच्या आयुष्यातील एक स्थायीभाव आहे. आपल्या सगळ्यांची अडचण अशी आहे, विशेषतः गांधींच्या टीकाकारांची अडचण अशी आहे की, ते एका विशिष्ट गांधींबद्दलच बोलतात. म्हणजे गांधी जातीयवादी आहेत, धर्मवादी आहे असं म्हणणारे लोक गांधींच्या १९१५-१६ सालच्या विधानांच्या आधारे बोलत असतात. त्याच्यानंतर ते १९४८सालापर्यंत जगले हे त्यांच्या गावीही नसतं. त्यांनी मुसलमानांचा अनुनय टोकापर्यंत केला, त्यामुळे फाळणी झाली हे तर आजतागायत बोललं जातं. 

या माणसाची आणखी दोन वैशिष्ट्यं आहेत, ज्याच्यामुळे आपल्यासारख्यांची पंचाईत होते. हा माणूस वेळोवेळी आपल्या चुकांची कबुली देई. एवढ्या मोठ्या माणसाला एखाद्या प्रश्नाविषयी आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या किंवा लहान असणाऱ्या माणसाला सल्ला विचारायची लाज वाटत नव्हती. 
गांधींचं वैशिष्ट्य हे होतं की, त्यांच्याभोवती अशा माणसांचा गराडा होता, ज्यांची जगातल्या नाना विषयांत तज्ज्ञता होती. उदाहरणार्थ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. त्यांच्याशी गांधी धर्मशास्त्राबद्दल चर्चा करत असत. असे अनेक लोक होते की, ज्यांच्याशी बोलायला गांधींना कधी कमीपणा वाटला नाही. कुठेतरी आपल्या आकलनात कमतरता आहे याची जाणीव असलेला हा नेता होता. नेत्याला नेहमी असं वाटत असतं की, माझं आकलन परिपूर्ण आहे आणि माझ्यानंतर दुसरं कोणाचं आकलनच असू शकत नाही. अशा प्रकारची भूमिका गांधींनी कधीही घेतली नाही. चुकांची कबुली ते सतत देत गेले. 

हौतात्म्याच्या दृष्टीनं पाहिलं तर प्रत्येक क्षणी सत्याग्रहीनं मरणाची तयारी ठेवावी लागते, असं गांधींचं एक वाक्य आहे. सत्याग्रहीला फक्त मरणाचंच संरक्षण असतं असं ते म्हणत. ते त्यांनी स्वतःलाही लावून घेतलं होतं. आयुष्यात सगळ्यात बदनाम होण्याचा कालखंड त्यांच्या वाट्याला आला तो नौखालीच्या दरम्यान, त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये. विशेषतः त्यांचे जे ब्रह्मचर्याचे प्रयोग आहेत त्या संदर्भामध्ये. सबंध काँग्रेस वर्किंग कमिटी नाराज होती. एका बाजूला जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आहेत आणि गांधी ब्रह्मचर्याचे प्रयोग करताहेत. हे काय चाललंय, यातून बदनामी पलीकडे काय होणार, असं सगळं बोललं जात असताना स्वतःच्या आत्मबळाची परीक्षा घेणं आणि आपला कमकुवतपणा तपासणं, यासाठी अत्यंत खुल्या पद्धतीनं त्यांनी ब्रह्मचर्याचा प्रयोग केला. त्याबद्दल पुष्कळ आक्षेप घेतले गेले तो नंतरचा भाग. पण इतका खुलेपणा या माणसाच्या जगण्या, बोलण्यात, लिहिण्यात आपल्याला दिसतो. कुठेच लपवाछपवी नाही. त्यामुळे त्यांचं कुठलं विधान प्रमाण मानायचं आणि कुठलं विधान अंतिम मानायचं, या गोष्टीचा जाणीवपूर्वक विचार केल्याशिवाय त्यांच्याबद्दल बोलता येत नाही. मात्र असं बोलण्याऐवजी समज-गैरसमज पसरवणं सोपं असतं.

एकोणिसाव्या शतकात जन्मलेला, विसाव्या शतकात हुतात्मा झालेला हा माणूस जगात सगळ्यात वंदनीय मानला गेलेला आहे आणि आताच्या कालखंडात आपल्याकडे सगळ्यात निंदनीय मानला जातो. जेवढे प्रशंसक गांधींना भेटले, तेवढेच टीकाकारही भेटले. अनेक अंगांनी गांधींचा अभ्यास झालेला आहे. मानसशास्त्रीय अंगानंसुद्धा. एरिक एरिसनसारख्या माणसानंसुद्धा त्यांचा अभ्यास केला. मानसशास्त्रीयदृष्ट्या हे व्यक्तिमत्त्व कसं दिसतं, काय काय कमकुवतपणा त्यांच्यात होता, हे शोधण्याचा प्रयत्न झाला. इतक्या बाजूनं अभ्यास होऊनसुद्धा या माणसाविषयीचं कुतूहल शिल्लक आहे. हे त्यांचं इतर सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळेपण आहे असं मला वाटतं.

गांधींनी स्वतःतील उणिवा कळल्यानंतर त्या दूर करण्याचा सतत प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की, जे आपल्यापैकी कोणालाही जमण्याची शक्यता नाही, ते म्हणजे माझ्या मनात ज्या प्रकारचा विचार आहे, भूमिका आहे त्याच्याशी मी स्वतःच्या जीवनात तडजोड करणार नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या विचारप्रणालीशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, पण सार्वजनिक जीवनात त्याबद्दल तडजोड करायला तयार आहे. म्हणजे समाजाच्या पुढे मी एक पाऊल असेल, समाज माझ्या मागे एक पाऊल आला तरी पुरे आहे, एवढ्या मर्यादेत सार्वजनिक जीवनात गांधी तडजोडीला तयार असत, पण स्वतःच्या वर्तनामध्ये मात्र तडजोडीला तयारी नसे. मग तो आफ्रिकेमध्ये असताना कस्तुरबांना मध्यरात्री उठवून बाहेर काढण्याचा प्रसंग असो. आजच्या स्त्रीवादी दृष्टीतून कदाचित ते मोठं गैरकृत्य ठरलं असतं, त्या काळात ४९८कलम असतं तर गांधींवर लागलंही असतं, इथपासून ते अहमदाबादच्या आश्रमातील भूमिकांपर्यंत कुठेही त्यांनी स्वतःची विचारप्रणाली आणि स्वतःचं जीवन यात अंतर ठेवलेलं नाही. 

ते स्वत:ला धार्मिक म्हणवत, पण ‘ज्या देवळात अस्पृश्यांना जाता येत नाही, त्या देवळात मी जाणार नाही’ ही त्यांची स्वच्छ भूमिका होती. गांधी म्हणाले होते की, ‘मी तर जाणारच नाही, पण माझ्या परिवारातील व आश्रमातील कोणीही तिथं जायचं नाही.’ ओरिसात जगन्नाथपुरीला काँग्रेसची बैठक संपल्यावर सायंकाळी कस्तुरबा, महादेवभाई देसाई, त्यांची पत्नी हे तिघं जगन्नाथपुरीच्या देवळात गेले. त्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. गांधींनी जाण्याचा प्रश्नच नव्हता. नंतर महादेवभाईंच्या चूक लक्षात आली. गांधी त्यांना असं म्हणाले की, ‘हे सांगायला तू परत आलास, त्याच्यापेक्षा तिथं सत्याग्रह करून मेला असतास तर मला अधिक आनंद झाला असता.’ इतक्या स्वच्छ शब्दांत त्यांनी महादेवभाईंची कानउघाडणी केली आहे. 

‘ज्या लग्नामध्ये जोडप्यापैकी एक पार्टनर दलित समाजातील नाही, अशा लग्नाला मी जाणार नाही,’ अशी गांधींची भूमिका होती. हेच कारण देऊन गांधी महादेवभाईंच्या मुलाच्या लग्नाला गेले नाहीत. स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा इतका परखडपणा गांधींकडे होता. आपल्या सगळ्यांची भूमिका बरोबर याच्या उलट असते. आपल्या सगळ्यांना सार्वजनिक जीवनात तडजोड नको असते, पण व्यक्तिगत जीवनात भरपूर तडजोडी हव्या असतात.  

गांधींनी हा महत्त्वाचा आदर्श घालून दिलेला आहे- ‘मी पुढे जात राहणार आहे या मूल्यांच्या अंगानं, माझ्या मागून तुम्ही या. एक पाऊल आलात तरी मला आनंद आहे.’ म्हणून इतकं खुलं जीवन लोकांसमोर असल्यानंतर अशा माणसाबद्दल खरं तर गैरसमज व्हायला नको आहेत. पण ते आहेत. याचाच अर्थ गैरसमज होतात, त्याच्यामागे विशिष्ट हितसंबंध कार्यरत असतात, त्याशिवाय ते होणार नाहीत.

गांधींनी सगळ्या भारतीयांसाठी सत्याग्रहाचं हत्यार उपलब्ध करून दिलं, हे आपल्याला माहीत आहे. सत्याग्रही उभा करण्यामागची भूमिका काय आहे? माणसाकडे असं कोणतं बळ असतं की, जे म्हटलं तर कोणाला नाहीसं करता येत नाही आणि ते जागं झालं तर त्या माणसाला थांबवता येत नाही? आत्मबळ. गांधींच्या वाङ्मयात ‘आत्मबळ’ या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. म्हणजे ते आत्मबळ एकदा जागं झालं तर त्याला शस्त्राची गरज नसते. त्या आत्मबळाची तेजस्विता जेव्हा प्रगट होते, त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या प्रखर प्रतिकाराला माणूस तयार होतो. हे आत्मबळ जागं करणं गांधींच्या सगळ्या आयुष्यभराच्या कार्यक्रमाचा मूलभूत गाभा आहे. 

प्रत्येक माणसाचं आत्मबळ जागं झालं पाहिजे. तुम्ही शस्त्र द्याल, पण लढणारं मन देऊ शकत नाही. तेव्हा लढणाऱ्या मनाला आत्मबळ असल्याखेरीज शस्त्राचाही उपयोग नाही. आत्मबळ जागं झालं तर शस्त्राची गरजही नाही. 

म्हणून हे आत्मबळ जागं केलेल्या माणसांना लढाईत आणतानाही त्यांनी काही पथ्यं पाळली. प्रत्येक आंदोलनाच्या आधी गांधी काही कसोट्या लावत असत. (याला फक्त १९४२चं आंदोलन अपवाद आहे.) कसोट्या असत- आंदोलनाला पात्र आहे का? सत्याग्रह कळला आहे का? सर्वांशी प्रेमानं वागावं ही भूमिका सत्याग्रहींच्या अंगी बाणली गेली आहे का? ब्रिटिशांचा द्वेष करत नाही आहे ना? कारण त्यांच्या सत्याग्रही असण्यामध्ये द्वेषाचा कुठे मागमूस नाही. सत्याग्रह कोणा व्यक्ती विरुद्ध नसून व्यवस्थेविरुद्ध आहे. त्यामुळे ब्रिटिशांचासुद्धा द्वेष होता कामा नये, कुठल्याही ब्रिटिश व्यक्तीला इजा होता कामा नये, ते इथं राहतील तोपर्यंत आनंदानं आणि प्रेमानंच आपण त्यांच्याशी राहिलं पाहिजे. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेबद्दल आपल्याला राग आहे आणि तो सत्याग्रहामार्फत आपल्याला व्यक्त करायचा आहे. त्यामुळे प्रेम हा सत्याग्रहीच्या आयुष्याचा, लढाईचा पाया असला पाहिजे. या प्रेमाधारे जे आत्मबळ होईल, ते सत्याग्रहीला क्लेष सोसण्याची ताकद देतं. आणि क्लेष कुठपर्यंत सोसायचे तर गांधींनी त्याची कसोटी सांगितली आहे. हे क्लेष सोसण्याची शेवटची कसोटी मरणाची आहे. सत्याग्रहीनं कोणतंही संरक्षक कवच घ्यायचं नाही, मरण हे त्याचं अंतिम संरक्षक कवच आहे.

म्हणून अशा मरणाची तयारी असणारा, प्रेममय दृष्टीनं सगळ्यांकडे पाहणारा, स्वतःच्या आत्मबळाच्या आधारे पुन्हा पुन्हा उभा राहणारा असा माणूस लढवय्या होता. ‘माझ्यावर हात उगारला तरी चालेल, पण मी हात उगारणार नाही’ असं म्हणत सत्याग्रहाच्या तंत्रामध्ये गांधींनी प्रयोगशीलता आणली होती.
१९३०च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी असं लक्षात आलं की, आंदोलनात तोच तोचपणा यायला लागला. गांधींनी ताबडतोब तंत्र बदललं आणि मिठाच्या गोदामांवर धाडी घालायला सुरुवात केली. मग सत्याग्रही रोजच मार खायला लागले. काल सायंकाळी ज्यांनी मारामुळे पट्ट्या बांधल्या होत्या, तेच लोक पुन्हा आंदोलनात यायला लागले. तेव्हा मारणाऱ्यांनाच लाज वाटायला लागली. हा गांधींनी ३०च्या आंदोलनात केलेला प्रयोग होता. 

गांधींनंतरचं किंवा आजचं नेतृत्व कशावर खूश असतं, तर प्रतिसाद किती मिळतो यावर. एकच माणूस सगळ्या जगभर टीव्हीवर दिसणार. त्या माणसाला बरं वाटतं की, आपल्याशिवाय कोणी नाही. इतका प्रतिसाद मिळाला, इतके लोक आपल्या पाठीमागे आहेत. याची गांधींना बिलकूल तमा नव्हती. ही त्यांची कसोटी नव्हती. एका जरी माणसाकडून ब्रिटिशांची हानी झाली, इजा झाली, द्वेष झाला तर त्याक्षणी टिपेला गेलेलं आंदोलन मागे घेण्याची हिंमत असलेला हा एकमेव नेता होता. हे चौरीचौराच्या वेळी त्यांनी केलं होतं.  

दुसऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलंत तर असं दिसेल की, गांधी राजकीय स्वातंत्र्याची लढाई स्वराज्यासाठी लढत होते. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होणं एवढ्या मर्यादित उद्दिष्टाशी गांधींची लढाई नव्हती. ती स्वराज्यासाठी होती. इतर बाकी सगळे पक्ष स्वराज्य मिळालं की, तिथंच थांबणार होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी पुढचे मुद्दे महत्त्वाचे नव्हते. गांधींसाठी ती एक स्वराज्याची पूर्वअट होती. स्वराज्याची शर्त कोणती तर स्वातंत्र्य. म्हणून स्वातंत्र्यलढा हा गांधींच्या आयुष्यातला एक टप्पा आहे... साधारण १९१९पासून सुरू होऊन १९४७साली संपलेला. 

याच्यापलीकडेही गांधी आहेत. १९१९ ते १९२२, ३०, ३२, ४२ नौखाली, बिहार, कलकत्ता हा गांधींच्या लढ्यांचा काळ. मधल्या काळात गांधींचं स्वराज्याची पायाभरणी कशा पद्धतीनं करता येईल, त्याच्या रचना कशा असतील, त्याच्या संस्था कशा असतील याचं काम चालू होतं. पण या सगळ्या संस्था अशा रीतीनं बांधल्या जात असत की, स्वातंत्र्याच्या लढ्याचा जर निर्णायक क्षण आला तर या सगळ्या संस्था मोडून लोक आंदोलनात येऊ शकले पाहिजेत. ४२ सालचा जो लढा झाला, त्यावेळी गांधी चार दिवस आधी सर्वोदयी कार्यकर्त्यांसमोर बोलताना असं म्हणाले होते की, ‘मी आतापर्यंतच्या आंदोलनांमध्ये माणसं पारखून घेतली, कसोट्या लावल्या. यावेळी मी कसोटी लावणार नाही. तुम्ही स्वतंत्र आहात असं समजून वागायचं. आतापर्यंतच्या आंदोलनात मी हिंसा-अहिंसा असा विवेक केला, आता तोही विवेक या आंदोलनापुरता करणार नाही. तुम्हाला जे जे या देशाला स्वतंत्र करण्यासाठी करता येईल, ते ते करा.’ पुढे ते असं म्हणाले की, ‘सर्वोदय संस्था या क्षणाला आंदोलनात आल्या नाहीत, तर त्यांचं आयुष्य व्यर्थ आहे.’ संस्था निर्माण करायच्या पण त्यांच्यात अडकून पडायचं नाही. स्वातंत्र्यासाठी त्या संस्था मोडायची पाळी आली तर मोडल्या पाहिजेत. पुन्हा नव्यानं उभ्या केल्या पाहिजेत, ही त्यांची दृष्टी होती. तिथं त्यांनी हिंसा-अहिंसेचा मुद्दा केला नाही. 

आपण सत्याग्रहासंदर्भात बोलत आहोत तर हिटलर-मुसोलिनीच्या संदर्भामध्ये याचं काय झालं असतं याचा विचार करू. सत्याग्रहीची मूलभूत भूमिका अन्यायाविरुद्ध लढणं, अन्याय्य कायदा तोडणं, प्रसंगी मरण पत्करणं. ज्यावेळी आपण असं म्हणतो हिटलर आणि मुसोलिनीनं गोळ्या घातल्या असत्या, तुम्हाला उभंच राहू दिलं नसतं. त्याचा एक अर्थ असा आहे की, नसतं राहू दिलं, पण आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न केला असता. गांधींच्या लेखी किती लोकांनी सत्याग्रह केला हा मुद्दा नव्हता, कशासाठी केला हा मुद्दा असे. राज्यकर्ता सुसंस्कृत आहे का खुनशी आहे हे बघून सत्याग्रही उभा राहात नाही. तो अन्यायाच्या विरोधात उभा राहतो. अन्याय करणारे इंग्रज असतील नाहीतर हिटलर-मुसोलिनी. 

दुसरं मरणापर्यंत जाण्याच्या वेळेपर्यंत सत्याग्रही व्यक्तीचं रूपांतर आत्मबळाचं तेज लाभलेल्या एका संपन्न माणसाच्या व्यक्तिमत्त्वात झालेलं असतं. तो लढायला उभा राहतो, तेव्हा त्याची भूमिका मरण आलं तर माणूस म्हणून मरण्याची असते. 

२.
गांधींमध्ये काय काय बदल झालेत पहा. ३२नंतर गांधी अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात जास्त आग्रही आणि आक्रमक झाले होते. काँग्रेसच्या सभासदत्वाचं जोखड तोडल्यामुळे पूर्णवेळ ते अस्पृश्यता निवारणाला घालवायला तयार झाले आहेत. या काळामध्ये गांधींनी देवळं मुक्त करा, अस्पृश्यांचा शाळाप्रवेश, शिष्यवृत्त्या, त्याचा फंड याकडे लक्ष केंद्रित केलं. म्हणजे ते या कार्यात आणखी आक्रमक झाले. ३२ पूर्वी निवडक सत्याग्रहांना गांधींनी पाठिंबा दिलेला आहे. ही गांधींची भूमिका ३२नंतर सुटलेली आहे. आंबेडकरांच्या दबावाचा भाग असेल आणि आंबेडकरांबाबत काय घडलं बघा. ३३-३४पर्यंत सत्याग्रही पद्धतीनं देऊळ प्रवेश करा. आता यापुढे सत्याग्रहाची आंदोलनं नाही, यापुढे संसदीय राजकारण असं आंबेडकर म्हणतात. म्हणजे आंबेडकर ज्यावेळेला संसदीय राजकारणाकडे आक्रमकरीत्या गेले, त्यावेळेला गांधी अस्पृश्यता निर्मूलनाकडे अधिक अग्रक्रमानं वळले. हे कशातून निर्माण झालं, तर या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या ज्या क्रिया-प्रतिक्रिया आहेत याच्यातून दोघेही घडत गेले. म्हणून असं मानलं जातं की, गांधींच्या महात्मा बनण्यामध्ये आंबेडकरांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आंबेडकरांनी गांधींना बदलवलं.

तीच गोष्ट धर्मांतराबद्दलची आहे. गांधींना धर्मांतराची कल्पना अमान्य होती. घटनासमितीत याची चर्चा झाली, त्यावेळी धर्मांतराचं स्वातंत्र्य मान्य करावं लागलं. धर्मांतराच्या संदर्भातली जी उपसमिती होती घटनासमितीची, त्याचे अध्यक्ष सरदार पटेल होते. पटेलांच्या समितीनं धर्मांतराचा हक्क मान्य केलेला आहे. 

पण धर्मांतरापेक्षा गांधींची दुसरी एक भूमिका महत्त्वाची आहे. ती आहे सर्वधर्मसमभावाची. त्याच्याविषयी विलक्षण गोंधळ आहे. ही भूमिका सेक्युलॅरिझमची नाही असं सांगण्यात येतं. माझं असं म्हणणं आहे की, भारतातील सेक्युलॅरिझम बळकट व्हायचा असेल तर सर्वधर्मसमभावाखेरीज पर्याय नाही. ‘सर्व धर्म खरे आहेत’ हे गांधींचं म्हणणं एका अर्थानं गंभीर आणि एका अर्थानं मिस्किल आहे. गंभीर या अर्थानं की, सर्व धर्म खरे आहे म्हटल्याबरोबर धर्मांतराचा मुद्दाच उरत नाही. या धर्मात राहिला काय आणि त्य धर्मात गेला काय फरक काय पडतो? म्हणून गांधी असं म्हणतात, ‘मी चांगला हिंदू आहे, पण मला चांगला मुसलमान होता यायला पाहिजे. मी चांगला मुसलमान असेल तर मला चांगला ख्रिश्च होता आलं पाहिजे. म्हणजे मी हिंदू राहूनही ख्रिश्चन होता यायला पाहिजे, हिंदू राहूनही मला मुसलमान होता यायला पाहिजे.’ याचाच अर्थ माझ्या धार्मिक जीवनामध्ये मी या सगळ्या सत्याला सामोरं जाणार्या आणि शोध घेणाऱ्या ज्या ज्या धर्मांची तत्त्वज्ञानं आहेत, ती मला जगता यायला पाहिजेत. ती जर जगायला मिळत असतील तर मला धर्मांतराची गरजच उरत नाही.

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

सर्वधर्मसमभावाला दुसरी एक व्यावहारिक बाजू आहे. आपल्या सगळ्या नेत्यांनी असं गृहीत धरलं आहे की, भारताची राज्यघटना सेक्युलर आहे. धर्म आणि राज्याची फारकत केलेली आहे. कोणतंही राज्य धर्माप्रमाणे चालणार नाही. पण हा देश तसा सेक्युलर होत नाही. इथं धर्मांना एक विधायक स्थान आहे, भूमिका आहे. नेहरूंपासून सगळ्या नेत्यांनी हे गृहीत धरलं होतं की, जसजसा आर्थिक विकास होईल तसतसा भारताच्या सार्वजनिक जीवनात धर्माचा प्रभाव निष्प्रभ होत जाईल, कमी कमी होत जाईल. याला अपवाद आहेत गांधी. ते म्हणाले होते, ‘हे होणे नाही. इथं धर्म हा कातडीला चिकटला आहे गोचिडासारखा. कातडं वेगळं काढलं तर रक्त बाहेर येईल, पण धर्म जाणार नाही. तेव्हा इथल्या धर्माविषयी काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. ती सर्वधर्मसमभावाची भूमिका.’ 

गांधींनी सर्वधर्मसमभाव ही नागरी समाजातल्या जीवनाची मूलभूत अट मानली आहे. हे असल्यशिवाय तुम्ही उभेच राहू शकत नाही. माझ्या दृष्टीनं गाय पवित्र आणि पूज्य आहे, पण एक समाज असा आहे की त्याचं ते अन्न आहे. त्याच्या अन्नाच्या आड मी येऊ शकत नाही. त्याचं अन्न आहे असं म्हणणं ही गोष्ट वेगळी आहे आणि इटस् अ फ्रीडम ऑफ टेस्ट असं म्हणणं ही गोष्ट वेगळी. फ्रीडम ऑफ टेस्टमध्ये तुम्हाला मी आज गाय खाल्ली, बैल खाल्ला असं म्हणता येतं. गांधींची ती भूमिका नाही. ते असं म्हणत की, ते अन्न आहे पण त्यांना गाय मारू नका हे सांगणार नाही. मात्र त्यांनी गाय मारायची नसेल तर गायीचं पालन मी केलं पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे. माझी जबाबदारी मी न पाळता राज्यानं ती घ्यावी. 

धर्माच्या बाबतीत व्यक्तीनं धर्मपालन करायचं. त्याच्याबद्दलची कोणती जबाबदारी व्यक्तीच्या वतीनं राज्याने घेता कामा नये, हे गांधींचं दुसरं सूत्र आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की, कायद्यात पडूच नका. गांधींनी कुठल्याच एका धर्मासाठी राज्याचा निधी खर्च होऊ नये ही भूमिका घेतलेली आहे. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, ‘सरकारनं एक नवा पैसा देता कामा नये. हिंदूंचं मंदिर आहे हिंदूंनी पैसा उभा करावा, जीर्णोद्धाराला माझा विरोध नाही.’ इतक्या स्वच्छ भूमिका गांधींनी घेतलेल्या आहेत. 

तरीही गांधींबद्दल गैरसमज आहेतच. त्यामागे हितसंबंधांचा भाग आहे. ते गैरसमज या प्रकारच्या भाषणातून किंवा वस्तुस्थिती सांगण्यातून दूर होण्याची शक्यता कमी आहे. कारण हा एका लढाईचा, वर्चस्वाचा भाग आहे. फक्त एवढंच आहे की, ही लढाई गांधींच्या पद्धतीनं करायची असेल तर त्यांचंही परिवर्तन करावं लागेल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण परिवर्तीत आहोत, आपल्याला कळलं आहे, पण त्यांनाही आपल्याबरोबर आणायचं आहे. म्हणून संवादाच्या प्रक्रियेला पर्याय नाही. गांधींच्या सगळ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा संवाद आहे. ‘हरिजन’, ‘यंग इंडिया’चे अंक काढून पाहिले तर कोणाकोणाशी गांधींनी संवाद केला आहे हे वाचून अवाक् व्हायला होतं. या माणसाजवळ किती वेळ होता? हा किती लिहितो, किती लोकांशी पत्रव्यवहार करतो, किती साध्या साध्या पत्रांना वर्तमानपत्रांतून उत्तरं देतो… हे सगळं विलक्षण आहे. पण संवाद हाच आधार आहे. संवाद हाच आधार असेल तर वितुष्ट येण्याचं कारणच नाही समाजात. म्हणून गांधी एका अर्थानं मॅनेजमेंटचं एक वेगळं सूत्र आपल्याला सांगतात. ते प्रेमाच्या आधारे सांगतात, ते सत्याग्रहाच्या आधारे सांगतात आणि स्वतः जगून दाखवतात. ते जगल्यानंतर समोरच्याला त्याच्याबद्दल पुन्हा शंका घ्यायला जागा राहत नाही, हे गांधींचं टेक्निक आहे!

(शब्दांकन - विजय तांबे)

लेखक किशोर बेडकीहाळ ज्येष्ठ अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आहेत.

kishor077@yahoo.co.in

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.